सिनेसमीक्षक आणि कथाकार गणेश मतकरी यांचा ‘बटरफ्लाय इफेक्ट’ हा नवा कथासंग्रह नुकतचा मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊसतर्फे प्रकाशित झाला आहे. या संग्रहाला ज्येष्ठ कथा-कादंबरीकार भारत सासणे यांनी लिहिलेली ही प्रस्तावना...
..................................................................................................................................................................
गणेश मतकरी यांचा ‘बटरफ्लाय इफेक्ट’ या नावाचा लघुकथासंग्रह प्रकाशित होतो आहे, याचा मला अतिशय आनंद वाटतो.
गणेश मतकरी यांना घरातून लेखनाचा वारसा प्राप्त झाला. ते स्वतः ‘उत्तराधुनिक साहित्याच्या प्रस्तुत अशा कालखंडातील’ चिंतनशील लेखक आहेत. या कालखंडाचा समकालीन लेखनावर विविध स्वरूपात प्रभाव पडलेला पाहता येतो. एका फुलपाखराच्या पंखविभ्रमाचा व्यापक असा वैश्विक प्रभाव साखळीस्वरूपात पडून दूरवरच्या प्रदेशामध्ये हिमस्खलन होते, अशी फिजिक्समधली संकल्पना आहे. सामान्य माणसाचे सामान्य जीवन आणि त्याच्या जीवनातील साधे विषय, तसेच त्याच्या जगण्यातले संघर्ष आणि वेदना व्यापक आशय निर्माण करतात, अशी साहित्याची भूमिका आहे. सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून केलेले लेखन त्यामुळे वैश्विक होऊन जाते. गणेश मतकरींच्या लघुकथा अशाच भूमिकांकडे आपल्याला घेऊन जातात.
मराठी लघुकथेचा चेहरामोहरा वेगवेगळ्या टप्प्यांवर बदलत राहिला. समीक्षेने या बदलांची नोंद केल्याचे आपल्याला ज्ञात आहे. १९६० पूर्वीची लघुकथा व त्यानंतरची लघुकथा याबाबत पुरेशी चर्चा झालेली असल्यामुळे व जाणकार-रसिकवाचकांना त्याबाबतच्या इतिहासाची माहिती असल्यामुळे लघुकथेच्या बदलत्या तंत्ररूपाबाबत येथे चर्चा अपेक्षित नाही. उर्दू इत्यादी अन्य भाषांमधल्या लघुकथा सामाजिक जाणिवा प्रखरपणे प्रकट करत असताना मराठी लघुकथा त्या काळात प्राथमिक स्तरावर होती, अशी नोंदसुद्धा करण्यात आली आहे. उर्दूतील मंटो किंवा उर्दू-हिंदीतील प्रेमचंद यांचे लेखन करुणाधिष्ठित असल्यामुळे श्रेष्ठत्वाच्या दिशेने जायला लागले, याचीही नोंद समीक्षेने केलेली आपण पाहिली आहे. ही तांत्रिक चर्चा जाणकार-रसिकांना ज्ञात असल्यामुळे त्याचीही पुनरावृत्ती येथे न करता केवळ उल्लेख करणे पर्याप्त राहील.
..................................................................................................................................................................
.................................................................................................................................................................
पण एक सहसा न सांगितलेला मुद्दा येथे सांगावयाचा आहे. स्वातंत्र्यपूर्वकाळामध्ये जी मराठी लघुकथा लिहिली गेली तिची प्रकृती ‘समूहजीवनाबद्दल आस्था’ दर्शवणारी, अर्थात समूहकेंद्री अशी होती. समाज सामूहिकरितीने निर्णय घेत होता. समूहजीवन जगत होता. जात, बिरादरी, व कुटुंबव्यवस्थेमध्ये घट्ट होता म्हणून, साहित्यात प्रकटणाऱ्या जाणीवादेखील समूहजीवनाधिष्ठित अशा दिसतात. कालानुक्रमे समाजाचे विविध स्तरांवर विघटन सुरू झाले. एकत्र कुटुंबव्यवस्था क्षीण झाली. छोटी कुटुंबे अस्तित्वात आली. व्यक्तीला महत्त्व आले. व्यक्ती स्वतंत्रपणे वावरायला लागली. समूहाने एकत्रितपणे निर्णय घेण्याच्या प्रक्रियेच्या ऐवजी व्यक्तीला एकटेपणाने निर्णय घेण्याची सक्ती करण्यात आली. व्यक्तीच्या मनावर त्यामुळे ताण यायला लागला. विघटन प्रक्रियेतून जाणारा हा माणूस एकटेपणाच्या छळात भरडला जाऊ लागला. मराठी कथेने व्यक्तीच्या या ताण-तणावाची आणि त्याच्या एकटेपणाची दखल घेतली आहे. तेथून पुढे ‘व्यक्तिकेंद्रित मनोविश्लेषणात्मक मराठी कथा’ सापडायला लागतात. या काळात इंग्रजी मानसशास्त्राचा मराठीजनांना अधिक परिचय व्हायला लागला होता. मानवी मनाचे गूढ शोधण्यासाठी लघुकथा लेखनातून प्रयत्न सुरू झाल्याचे दिसून येते. याच बिंदूवर येऊन मराठी लघुकथा व्यक्तिकेंद्रित झाली आणि स्थिरावली असे माझे निरीक्षण.
सुदैवाने याच बिंदूवर मराठी कथा फार काळ स्थिरावली नाही. जागतिकीकरणाची चाहूल लागली होतीच. जग एका अर्थाने लहान होऊनही जाणिवा व्यापक झाल्या होत्या. दलित-ग्रामीण कथेने नवे भान दिले होते. त्यामुळे लघुकथा पुन्हा प्रवाहित होऊन नव्याने समूहजीवनाबद्दल आस्था दाखवू लागली. ‘सामाजिकतेच्या प्रकटीकरणाबाबतचा दृष्टीकोन’ लेखनपरिघावर प्रभाव टाकणारा होताच. त्याचा परिणाम म्हणून कदाचित, लघुकथा पुन्हा समूहकेंद्री व वास्तवाचे भान बाळगणारी अशी होऊ लागली.
त्यानंतर मात्र हा प्रस्तुत असा उत्तराधुनिक लेखनकालखंड अस्तित्वात आला आहे. व्यक्ती आणि समाज, व्यक्ती आणि समूह असा भेद न करता व्यापक असे समग्रतेचे भान साहित्यनिर्मितीमध्ये दिसायला लागले. उत्तराधुनिक कालखंडातली मराठी लघुकथा इंटिग्रेशनचे नवे भान घेऊन अवतरित होताना दिसते आहे.
उत्तराधुनिक साहित्याबाबत मराठीत पहिल्यांदा बोलले जायला लागले, त्या कालखंडाचे स्मरण उत्साहवर्धक नाही. तत्पूर्वीच्या व तत्कालीनसुद्धा लघुकथाकारांना गॅब्रियल गार्सिया माक्र्वेज् इत्यादी लेखकांबाबत आणि ‘लॅटिन अमेरिकन साहित्या’बाबत फारशी माहिती नसायची आणि या मुद्द्यावर काही टोळीबाज मंडळींनी मराठी लेखकांची कीव करायला सुरुवात केली होती अशी आठवण आहे.
..................................................................................................................................................................
अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5312/Checkmate
..................................................................................................................................................................
‘जादुई वास्तव’ इत्यादी शब्द खूप उशिराने मराठीमध्ये उच्चारले गेले. त्याबाबतसुद्धा कीव करण्यात आलेली होती. आधुनिकोत्तर कालखंडातील लेखकांना मात्र संगणकाच्या माहितीच्या तंत्रजालामुळे आता हे संदर्भ, या संकल्पना व विविध स्तरावर लिहिणाऱ्या जगातल्या अनेक लेखकांबाबत माहिती झालेली असते. जगभर काय लिहिले जात आहे, याबाबत त्यांना माहिती असल्यामुळे त्यांची आता कीव करण्याची गरज नाही. ज्ञान हा मक्तेदारीचा विषय नसतो. साहित्याने लघुकथेच्या संदर्भात स्वीकृत केलेले संकेत आणि लेखनाबाबतच्या ‘मिथ्स’ उत्तराधुनिक साहित्यातून मोडीत निघत असताना २०२०मध्ये मराठी लघुकथेच्या क्षेत्रात आपला ठसा उमटवू पाहणाऱ्या लेखकांच्या यादीमध्ये गणेश मतकरी यांचा प्रामुख्याने समावेश करावा लागतो.
केवळ दहा लघुकथांचा हा संग्रह. शैली, भाषा, अभिव्यक्ती, निवेदनपद्धती, मांडणी इत्यादी पारंपरिक घटकांच्या व संकेतांच्या साहाय्याने या दहा लघुकथा समजून घेता येणार नाहीत, कारण या उत्तराधुनिक लघुकथा आहेत. मात्र, निर्वात पोकळीतून काही निघत नसते. गणेश मतकरींच्या कथादेखील निर्वात पोकळीतून आलेल्या नाहीत. पूर्वसुरींचे आणि समकालीन लघुकथाकारांचे काही अंशी पडलेले प्रभाव दिसत असले तरी या दहा लघुकथा आश्वासक, सशक्त आणि उत्तराधुनिक कालखंडातील नव्या प्रवाहांचा वारसा सांगणाऱ्या आहेत.
‘जगबुडी’ ही लघुकथा उत्तराधुनिक अभिव्यक्तीशी जुळणारी आहे. पारंपरिक लघुकथेमध्ये आढळून येणारी गोष्ट, संवाद इत्यादी घटक याही कथेमध्ये अनुपस्थित आहेत. जगबुडी होणार आहे, अशा अफवेच्या पार्श्वभूमीवर महानगरातला जगव्याळ पाऊस भेटायला येतो आणि पात्र बनून जातो. पण ही कथा विशिष्ट महानगराची नाही. तेथे पडणाऱ्या अतिवष्टीचीदेखील नाही. विस्कळीत व भयभीत जनजीवनाचा संदर्भ व्यापक होऊन आपल्याला भेटतो. या कथेमध्ये संवाद नाहीत, जे आहेत ते अप्रत्यक्ष आहेत. कथा प्रथमपुरुषी पद्धतीने सांगितली जाते. महापालिकेच्या कुठल्याशा रस्तेदुरुस्तीच्या विभागात काम करणारा कथानायक सामान्य असाच आहे आणि त्याच्या जाणिवा विशेषत: महानगरीय आहेत. त्यामुळे भोवती पसरलेले अफाट असे महानगरीय जीवन आणि अफाट पसाऱ्यात राहत असलेली सामान्य कुटुंबं याबाबत तटस्थपणे कथानयक निवेदन करतो. ही तटस्थ निवेदनपद्धती आधुनिकोत्तर साहित्यप्रवाहाची देणगी मात्र नाही. या पूर्वीच्या जागतिक साहित्यातून ही निवेदनशैली प्रकटलेली आहे. अफाट जीवनाबाबत व्यक्त होणारी व्यर्थता, अर्थशून्यता, असंबद्धता इत्यादीबाबत जागतिक साहित्यातील नायकांनी संवेदना नोंदवलेल्या आहेत. ‘जगबुडी’तील नायक या अभिव्यक्तिची नक्कल करत नाही, ही देणारी बाब आहे.
अतिवृष्टीच्या दिवशी महानगर ज्या पद्धतीने ठप्प होते आणि एका अनामिक भयाखाली जगत राहते, त्याचे दर्शन या लघुकथेमध्ये होत असले, तरी ही लघुकथा अतिवृष्टीची किंवा सामूहिक भयाची नाही निवेदकनायकाचे नाव गायतोंडे असे आहे. पडवळ नावाचा त्याचा मित्र आहे. हे दोघेही एकाच विभागात काम करतात. कामाचे स्वरूप रोमहर्षक नाही. महापालिकेशी संबंधित रस्तेदुरुस्तीच्या डिपार्टमेंटचे काम नायक करतो. कथेची सुरुवात ज्या पारंपरिक रेखीव पद्धतीने व्हावी लागते, तशी होत नाही, हे या कथेचे बलस्थान. गायतोंडे आणि पडवळ यांच्या मैत्रीची ही कथा नाही. त्या मैत्रीबाबत निवेदक वाचकाला सांगत असताना मध्येच सरिताबाबत सांगू लागतो. तो ज्या बसमधून प्रवास करतो, त्या बसमध्ये एक मुलगी नायकाला दिसते आहे. तिचे नाव त्याला माहीत नाही, म्हणून त्याने स्वतःच्या सोयीसाठी तिचे नाव ठेवले आहे, सरिता. कथा या सरितेचीसुद्धा नसते. कथानायक, अर्थात गायतोंडे एकदा तिच्या मागोमाग उतरून ती राहते कुठे, हे शोधण्याचा प्रयत्न करतो आणि इमारत शोधून काढतो.
..................................................................................................................................................................
उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...
हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal
................................................................................................................................................................
पालेकरांच्या चित्रपटातून पाहिलेली पारंपरिक व साधी प्रेमकथा अवतरित होते आहे की काय, असे वाटत असतानाच पुन्हा ही लघुकथा वेगळ्या दिशेने प्रवाहित होऊ लागते. महानगरामध्ये अतिवृष्टी होते आहे. पाणी साचून राहणे हा अनुभव महानगराला नवा नाही. मात्र, अशा पावसातदेखील नायक बाहेर पडलेला आहे. प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये जपून ठेवलेला सेलफोन, या फोनवर रेंज न येणे आणि भोवतालचे सगळे संदर्भ पुसून टाकले आहेत, अशी अवस्था निर्माण होणे, यातून भोवतालातील व्यर्थता नायकाला जाणवते आहे.
सरिता ज्या इमारतीमध्ये राहते त्या जागी मोठा ढीग पडलेला त्याला दिसतो. तिथे माणसे मात्र दिसत नाहीत. नुसता पाऊसच दिसतो आहे. ही इमारत कोसळली की काय अशी शंका नायकाला येते. त्याला सरिताची आठवणसुद्धा येते, पण सरिताचे काय झाले असावे याबाबत नायक विशेष विचार करत नाही. प्रचंड पावसात आणि साठलेल्या पाण्यातून नायक घरी परत येतो. आश्चर्य वाटण्याचा आपला कोटा संपला आहे असे त्याचे म्हणणे. तथापि, आपल्या खोलीच्या समोरच उभ्या असलेल्या सरितेला तो पाहतो. सरिताने त्याला दिलेले स्पष्टीकरणदेखील अत्यंत साधे आणि सोपे असे आहे. गुंतागुंतीच्या संदर्भहीन अगम्यतेच्या महानगरीय जगतव्यवहारातील समस्यांची उकल सहजपणे होऊ शकते, याचा निर्देश कथानायक सूचकतेने करतो. या कथेमध्ये संवाद नाहीत. निवेदनामध्ये इंग्रजी शब्दांचा अतिरेकी वाटावा इतका वापर आहे. महानगरीय जीवनपद्धती, विचारपद्धती व संमिश्र भाषापद्धतीचा तो एकत्रित परिणाम असावा. कथेला सौष्ठव इत्यादी पारंपरिक वैशिष्ट्ये प्रदान न करता रेखीव स्वरूप येऊ न देण्याचा प्रयत्न लक्षात येतो. कथेतली वाचनीयता हे वैशिष्ट्य उपकारक आहे. उत्तराधुनिक कालखंडातील हा नवा लेखक अभिव्यक्तीच्या नव्या वाटा शोधतो आहे, हे अधोरेखित होत राहते.
सोपे, रोजच्या जीवनातले साधे प्रसंग मांडत जात जीवनस्पर्शी असलेले मोठे आशय प्रकट करण्याची पद्धती आधुनिक हिंदी लेखकांमध्ये प्रचलित झाली होती. गणेश मतकरी यांच्या लघुकथादेखील सोप्या प्रसंगाने सुरू होतात, निवडलेले विषय साधे व सोपे वाटतात. मात्र, प्रसृत होणारा आशय विस्तारत जातो. सामान्य माणसाच्या सामान्य जगण्यातलं सौंदर्य शोधण्याचा प्रयत्न अन्य भाषिक लघुकथाकारांनी आणि मराठीतल्यादेखील काही वास्तववादी लघुकथाकारांनी केलेला आहे. मतकरी या पद्धतीला वेगळे परिमाण देतात.
‘सेम ओल्ड, सेम ओल्ड’ ही वेगळ्या धाटणीची लघुकथा. ही लघुकथा संग्रहातल्या अन्य लघुकथांप्रमाणेच आविर्भावरहित आहे. इयत्ता आठवीतील मुलाच्या निवेदनातून ही कथा सुरू होते. तथापि आता निवेदक प्रौढ झालेला आहे. इयत्ता आठवीतील मुलगा जे काही तपशील सांगू शकत असेल, ते सगळे तपशील सांगत निवेदनपद्धती पुढे सरकू लागते. देशपांडे यांच्या घराची बेल कशी कर्कश होती, अशा निरीक्षणवजा टिपणीतून ही कथा सुरू होते. घर कसे अंधारे होते. परिसर हळूहळू बकाल होत गेला किंवा मनगटावरचे जुने घड्याळ कसे वडिलांनी दिले होते इत्यादी बारीक तपशिलातून वातावरणनिर्मिती सरकत राहते व या सरकण्याला एक लयबद्ध संथपणा लेखकाने प्रदान केलेला आहे.
हा शैलीविशेष म्हणता येतो. डिटेलिंग देत देत कथा पुढे सरकवणे या पद्धतीची सुरुवात आधुनिक साहित्यकालखंडात झालेली असली तरी आधुनिकोत्तर कालखंडामध्ये या पद्धतीला तटस्थ थंडपणाची जोड मिळालेली आहे. देशपांडेमावशींनी दार उघडणे, त्यांचे रडत राहणे आणि नंतर काय घडले, याबाबत सांगणे इथपासून कथेची सुरुवात झाली असली, तरी पार्थ या त्याच्या ज्युनिअर असलेल्या मित्राची ही कथा नाही किंवा देशपांडेमावशींची ही कथा नाही. पार्थ त्याच्या मित्रांसोबत कुठेतरी जंगलामध्ये कॅम्पला गेला होता आणि गेलेल्यांपैकी एक मुलगा परतलाच नाही. कथानायक त्या मुलाच्या शोकसभेच्या दिवशीच पार्थच्या घरी गेला आहे. पण त्या मुलाचे काय झाले याबाबतचे रहस्य कथेमध्ये कायम राहते. पार्थ त्यानंतर प्रौढपणात कथानायकाला भेटलेला आहे. वर्तमानातील नैतिकतेमध्ये न अडकण्याची पार्थची सवय कथानायकाच्या मनात नैतिकतेबाबत प्रश्न निर्माण करतात.
‘युनिफॉर्मस्’ नावाच्या लघुकथेत सोसायटीच्या गेटवरल्या एका गार्डने कथानायकाला शंभर रुपये मागितले आहेत. ओळख नसताना कथानायकाने गार्डला शंभर रुपये तर दिले आहेत, पण हा गार्ड या पूर्वी कधीच का दिसला नाही, या प्रश्नामुळे शंकित झालेला कथानायक गार्डचा शोध घ्यायला लागतो. मात्र ‘परकाश’ नावाचा हा गार्ड कुणालाच माहीत नाही. एका लिफाफ्यातून शंभर रुपये मात्र दारात आणून टाकलेले असतात. म्हणजे पैसे तर परत मिळाले, पण गार्डची भेट कधीच होत नाही. या गार्डच्या शोधाची ही कथा नाही. बुचकळ्यात टाकणाऱ्या व्यर्थतेकडे ही कथा अंगुलीनिर्देश करते.
‘बटरफ्लाय इफेक्ट’ या लघुकथेची संरचना युक्तिपूर्ण आहे. वेगवेगळ्या पातळ्यांवर जीवन प्रवाहित होतच असते; असा या कथेतला निर्देश. मध्यमवर्गाचे अस्वस्थ असे जगणे एका पातळीवर, आणि गॅरेजमध्ये काम करणाऱ्या श्रमजीवी मुलांचे जगणे एका वेगळ्या पातळीवर आहे. या वेगवेगळ्या पातळ्यांवरच्या जगण्याचे एक सूत्र आहे. वेगवेगळ्या पातळ्यांवरच्या मनोज्ञ संमिश्रणातून एक ‘बटरफ्लाय इफेक्ट’ निर्माण होतो. या कथेतून गणेश मतकरी यांची प्रयोगशीलता आपल्याला दिसून येते.
लेखक का लिहितो असा प्रश्न लेखकाला विचारण्याची पद्धत आहे. असे विचारण्यामागे एक सर्वमान्य, मात्र अनुस्यूत असे औद्धत्य असते. लेखकसुद्धा आपण का लिहितो, या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करतात. गणेश मतकरींनादेखील हा प्रश्न विचारता येणे शक्य आहे. खरे तर आपल्या लेखनातूनच त्यांनी या प्रश्नाचे उत्तर दिलेले असते.
माझ्या मते मात्र, लेखक अनिवार्यतेतून लिहितो. सत्यान्वेष ही एक त्याची लेखनाची गरज असते. एक आंतरिक तहान लेखकाला धावते करते. याच अस्वस्थतेतून त्याच्या लेखनाचा जन्म होतो. माणसाला स्वतःची विस्मृती झालेली आहे, कारण त्याच्या बोधावस्थेवर मायेचे आच्छादन आहे, अशी भारतीय चिंतनाची एक भूमिका आहे. हे आच्छादन दूर करण्याची जबाबदारी नियतीने लेखकावर टाकलेली असते. अंतिमतः करुणेचे अधिष्ठान स्वीकारून मानवी जगण्यातल्या छोट्या-मोठ्या लढाया मांडणे, हेदेखील लेखकाचे कार्य असते. गणेश मतकरीसुद्धा आपण का लिहितो अशा प्रश्नाचे असेच काही उत्तर देतील. त्यांच्या कथा सामान्य अशा नायकाच्या असतात. त्या पारंपरिक घाटातून पुढे सरकत नाहीत. साधे-सोपे विषय कथेत मांडले असताना विशाल असा आशय प्रकटत राहतो.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
आधुनिकोत्तर कालखंडातील लेखनक्षेत्रात आढळून येणारी वैशिष्ट्ये गणेश मतकरी यांच्या लघुकथांमध्ये प्रकट होताना दिसतात. सामान्य माणसाच्या जीवनाबद्दल आस्था बाळगणाऱ्या या कथा क्वचित करुणाधिष्ठित होऊन श्रेष्ठत्वाच्या दिशेनेसुद्धा वाटचाल करताना दिसतात. गणेश मतकरी यांनी आपली चिंतनशीलता प्रगाढ केली, आकलनाचे वर्तुळ व्यापक केले, प्रयोगशीलता जपली आणि समृद्ध केली आणि अविरत साधना चालू ठेवली तर लवकरच ते मराठीतील सिद्धहस्त असे मोठे लेखक बनतील, याबाबत मला कोणतीही शंका नाही.
फुलपाखराच्या पंखविभ्रमाने हिमपात होतो, हा सिद्धान्त आपण मान्य केला पाहिजे. जागतिकीकरणाच्या आगमनानंतरचा टप्पा ओलांडणाऱ्या आणि आधुनिकोत्तर कालखंडाशी नाते सांगणाऱ्या गणेश मतकरी यांच्या या लघुकथांचे मी प्रेमाने स्वागत करतो.
‘बटरफ्लाय इफेक्ट’ या कथासंग्रहाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/5364/Butterfly-Effect
गणेश मतकरी यांच्या इतर पुस्तकांच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/client/search/?
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment