प्रस्तावना
कर्नाटकातील उडुपी तालुक्यातील एका महाविद्यालयातील अकरावी-बारावीत शिकणाऱ्या काही मुलींनी डोक्यावर घेतल्या जाणाऱ्या हिजाबबाबत वर्गातही आग्रही राहिल्याने आणि तेथील शिक्षकवर्गाने डोक्यावर अजिबात हिजाब घालून वर्गात बसू नये, अशी भूमिका घेतल्याने निर्माण झालेल्या प्रश्नावरून अवघ्या देशभरात विद्यार्थिनी, मुस्लीम आणि गणवेश याची चर्चा झाली, होत आहे. यात मुस्लीम समुदाय, तसेच अन्य धर्मियांनीही आपापली मते मांडली आहेत. तसेच, त्याबाबत संबंधित मुलींच्या कुटुंबाने कर्नाटकच्या उच्च न्यायालयात दाद मागितली आणि ती प्रतिकूल आल्याने त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्याचा निकाल काय येतो, यानुसार विशेषत: उच्च माध्यमिक शाळांमध्ये गणवेशाबाबत नवीन पायंडे पडण्याची शक्यता आहे. दरम्यान काही शाळांनी अशा अनेक मुलींना शाळेतून काढूनही टाकले आहे आणि अनेक मुलींनी परीक्षेला हिजाबविना बसण्यास नकार देऊन परीक्षा टाळल्या आहेत.
मुलींना हिजाब घालून शाळेत येऊ द्यावे की देऊ नये, याभोवती हा प्रश्न घुटमळत असला, तरी त्यात राजकीय लाभ-स्वार्थाचे हिशोब असल्याचे आतापर्यंत स्थानिक राजकीय निकाल, मुस्लीम प्रतिगामी घटकांचा प्रभाव, हिंदुत्ववाद्यांकडून शाळेतील मुलांना भगवे उपरणे, फेटे पुरवणे यातून उघड झाले असल्याने तो राजकीय रंगात धुरकटला आहे. पालक आणि शाळा प्रशासन यांच्या संयुक्त बैठकांतून तो प्रश्न दोन्हीकडून घेतल्या गेलेल्या आडमुठ्या आणि अहंकारी भूमिकांमुळे सुटू शकला नसल्याने दोन्ही बाजूंनी कार्यरत असलेल्या प्रतिगामी शक्तींबद्दल बोलले गेले आहे.
..................................................................................................................................................................
.................................................................................................................................................................
प्रस्तुत लेखात या पलीकडे जाऊन मुळात हिजाबबद्दलचा आग्रह आला कुठून, तो जगभर चर्चेचा विषय का बनत आहे, त्याचा मुस्लिमांनी प्रतीक म्हणून का व कसा स्वीकार केला आणि त्यात प्रसारमाध्यमांनी कोणती भूमिका निभावत आहे, याकडे पाहण्याचा प्रयत्न आहे. शाळा, कॉलेजपासून ते कामाच्या ठिकाणापर्यंत हिजाब वापरण्यावरून केवळ भारतातच नाही तर जगभर वाद आणि चर्चा सुरू आहेत. गेली अनेक वर्षे सुरू आहेत. तो इस्लाममध्येही चर्चेचा विषय आहेच. तो तसा कळीचा आणि वादाचा मुद्दा असण्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे त्याबाबत इस्लाम धर्मात सुस्पष्ट सूचना अथवा निर्देश नाहीत. काही सामाजशास्त्रज्ञांच्या मते मुस्लीम महिलांचा हिजाब वापरण्याबाबतचा आग्रह, कल आणि त्याबाबतच्या भूमिका ही अलीकडच्या काळाची देणगी आहे. म्हणून हिजाबची गरज अलीकडच्या काळात का वाटत आहे आणि आधीच्या काळात, पिढीत ती कधी का नाही जाणवली, हाही प्रश्न या चर्चेत सामावून घेण्याचा प्रयत्न आहे.
हिजाबचा प्रश्न अमेरिकेपासून सगळ्या युरोपभर गेल्या दोन दशकांत अधिक चर्चेत असून त्याबद्दलचे आग्रह, दुराग्रह आणि कायदे नियमांमुळे त्यावर चर्चाही तितक्याच प्रमाणात घडत आहेत. त्यामुळे त्याबद्दल विविध अंगाने अभ्यासही होत आहे. या कर्नाटकातील प्रश्नाबाबत केवळ सोपे उत्तर मिळण्याचा आग्रह असला आणि केवळ ‘हो’ किंवा ‘नाही’ असा प्रश्न विचारला गेला, तर ‘शाळेत हिजाब वापरू नये’ असेच उत्तर आहे. मात्र असे सोपे उत्तर देण्याच्या आग्रहात मूळ प्रश्नाची कारणे आणि त्याचे दूरगामी परिणाम असे एकदिशात्मक किंवा अंतिम सत्याच्या रूपात असू शकत नाहीत. म्हणून हा प्रश्न कळीचा का बनत आहे आणि मुस्लीम महिलांना तो कोणत्या कारणास्तव धर्म-प्रतीक किंवा आत्मसन्मानाचा वाटतो, याची कारणे शोधणे महत्त्वाचे आहे. केवळ भारतापुरता विचार केला आणि सार्वजनिक ठिकाणी कोणत्याही धार्मिक पोशाखाला किंवा हिजाब किंवा बुरखा, यावर बंदी आणणारा कायदा आणला, तर तो न्याय्य नियम ठरणार नाही. कारण सगळे धर्म, त्यांचे आचरण सारखे नसते आणि सर्वांना धर्माच्या आचरणाची मुभा घटनेत दिलेली आहे. शिवाय बहुसंख्य असलेल्या हिंदूंची सार्वजनिक ठिकाणची धार्मिक प्रतीके किंवा पोशाख हटवता येणार नाहीत, इतकी ती जगण्यात मिसळलेली आहेत.
(या विषयी मी माझ्या कुटुंबातील काही मुलींशी बोललो. आता कॉलेजमध्ये शिकत असलेल्या आणि काही शिकून नोकरी करत असलेल्या मुलींशी या विषयावर चर्चा केली. त्यांनाही काही प्रश्नांची उत्तरे सुस्पष्टपणे माहिती नाहीत, असे दिसले. उदा. मी दोन वर्षांपूर्वी कॉलेज संपवलेल्या व आता नोकरी करणाऱ्या एका मुलीला विचारले की, तुझी आई कधी हिजाब वापरत नव्हती, तर तुला का वाटते की, तुझा तो अधिकार आहे? तिचे एकच मत होते की, हिजाबविना बाहेर जाणे म्हणजे उघड्याने बाहेर जाण्यासारखे आहे. आता ती नोकरी करते तेथे काही ती हिजाब घालून जात नाही. पण या आंदोलन करणाऱ्या मुलींबद्दल तसेच बाहेर पडताना हिजाब वापरण्याबद्दल मात्र तिची ही भूमिका ठाम आहे. तर हे कथन या पिढीत आले कुठून आणि कसे, हे तपासण्याचा हेतूही या लेखामागे आहे.)
विश्लेषण
आय. यु. सय्यद या अभ्यासकाच्या मते अब्राहमप्रणित[1] परंपरेतील सर्व धर्मात विनयशीलता हे समान तत्त्व आहे. यांच्या मते विनयशीलता ही प्रामुख्याने धार्मिक ग्रंथावर आधारित असली तरी त्यावर सामाजिक आणि सांस्कृतिक प्रभावाने त्याची रूपे बदलत जातात.[2] त्यांनी हा विनयशीलतेचा मुद्दा ख्रिस्ती तसेच ज्यू धर्मियांच्या विनयशीलतेशी ताडून, तसेच त्यांच्यातील समानता टाळण्यासाठी तसेच वेगळेपणा टिकवण्यासाठी अमेरिकेतील मुस्लिमांत ही वैशिष्ट्ये कशी आकार घेतात, यावर आपल्या अभ्यासातून प्रकाश टाकला आहे.
त्यांच्या मते, या महिलांचे विनयशीलतेचे निकष हे सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक स्तर, भू-राजकीय संदर्भ, वंश, तसेच धार्मिकतेचे प्रमाण यावर ठरत असते. तथापि, सध्या सुरू असलेली चर्चा असो की, अन्य धर्मियांच्या दृष्टीकोनातून पाहणे असो, यात विनयशीलतेचा मुद्दा कोणालाही जाणवत नाही. इतकेच नव्हे तर मुस्लिमांना जो हिजाब आपल्या संरक्षणाचा, ओळखीचा, सबलीकरणाचे प्रतीक वाटतो, तो इतरांना मात्र प्रतिगामी, महिलांना बंधनात अडकवणारा आणि तिच्या प्रगतीत अडथळा आणणारा वाटतो. एकाच प्रतीकाची ही दोन्ही प्रतिपादने आली कुठून आणि आताच ती जगभर कशी काय कळीचा ठरू लागली आहेत, हे पाहणे महत्त्वाचे आहे.
जगभरातील मुस्लिमांना एकाच रंगात किंवा गटात टाकणारी निर्णायक घटना म्हणून अमेरिकेतील ट्वीन टॉवरवर ११ सप्टेंबर २००१ रोजी झालेल्या हल्ल्याकडे पाहता येते. या संदर्भात ‘पाश्चात्य विरुद्ध इस्लाम देश’ अशी मांडणी - जशी ‘क्लॅश ऑफ सिव्हिलायझेशन’ या सिद्धांताच्या मांडणीतून झाली तशी - प्रसारमाध्यमांतूनही झाली. तोवर तालिबानचे सरकार अफगाणिस्तानात आले होते. या हल्ल्याच्या निमित्ताने ते जगभर प्रकाशात आले आणि मुस्लिमांसाठीचे जागतिक पातळीवरील प्रातिनिधिक उदाहरण बनले. युरोपीयन समुदायातील देशांत या टप्प्यावर सार्वजनिक बुरखाबंदीचे कायदे करण्यात आले. या कायद्यांचे परिणाम काय, यावरील एका अभ्यासात[3] ११ सप्टेंबरनंतरच्या जगाच्या भू-राजकीय मांडणीत मुक्त गणल्या जाणाऱ्या पाश्चात्य देशात स्त्रियांच्या पोशाखावर निर्बंध आणण्याचा प्रयत्न कसा होत आहे, त्यातून लोकानुनयी काल्पनिक प्रतिकांत बदल कसा होत आहे, तसेच राष्ट्रीय ओळख कशी प्रस्थापित केली जात आहे, आदींवर नवीन मांडणी होत असल्याचा हा ११ सप्टेंबर २००१चा टप्पा असल्याचे म्हटले आहे.
इस्लामची विशिष्ट रूपातील मांडणी, इस्लामची भीती केवळ अमेरिका, युरोपमध्येच का आणि कशी झाली आणि तुलनेत लॅटिन अमेरिकन देशात झाली नाही, अशी मांडणी एका ताज्या अभ्यासात करण्यात आली आहे.[4] यात ११ सप्टेंबरच्या हल्ल्यानंतरच्या १० वर्षांत युरोपमध्ये इस्लाम अधिकाधिक दानवी रूपात का साकारला गेला आणि डेन्मार्क वा अर्जेंटिना या देशांत तो तसा का झाला नाही, याचा अभ्यास यात करण्यात आला. युरोप हा मुस्लीम जगताशी युद्ध करत असल्याची मांडणी झाल्याने स्वत:ला युरोपचा भाग मानणाऱ्या डेन्मार्कला आणि युरोप, अमेरिकन मूल्यांच्या विरोधात असलेल्या अर्जेंटिना या दोन्ही देशांतील इस्लामची प्रतिमा, अशी भिन्न पद्धतीने सादर करण्यात आली. यावरून या इस्लाम जगत आणि पाश्चात्य जग अशी मांडणी झाल्याने त्याचे पडसाद समाजमनावर कसे उमटले, ते यातून सिद्ध होते. अर्जेंटिना देशाला इस्लामबद्दल कोणतीही भीती न वाटण्याचे कारण ते आहे.
..................................................................................................................................................................
अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5312/Checkmate
..................................................................................................................................................................
२००४ ते २००६ या तीन वर्षांत ‘द न्यूयॉर्क टाइम्स’ आणि ‘द वॉशिंग्टन पोस्ट’ या जगातील सर्वाधिक प्रतिष्ठित वृत्तपत्रांत प्रकाशित झालेल्या मुस्लीमविषयक, हिजाबविषयक वृत्ताचे विश्लेषण करणारा अभ्यासपूर्ण लेख प्रकाशित झाला होता.[5] त्याचा हेतू या वृत्तपत्रांतील बातम्यांमध्ये इस्लामला सार्वजनिकरित्या प्रतीकात्मक पद्धतीने सादर करताना केवळ पाश्चात्य जगाचे वैचारिक हित कसे जपण्याचा प्रयत्न झाला, याचा शोध घेतला होता. त्यात त्यांनी फ्रान्समध्ये हिजाबवर घातलेली बंदी, इंग्लंडमधील नकाबविषयक चर्चा आणि अमेरिकेतील मुस्लीम महिलांचा चेहरा झाकण्याच्या बातम्यांचा समावेश होता. या तिन्ही देशांतील धार्मिक स्वातंत्र्याच्या व्याख्या भिन्न असल्या तरी या वार्तांकनात या तिन्ही देशांना एकाच वैचारिक स्थानी ठेवण्यात आले होते.
तसेच या वृत्तात केवळ पाश्चात्य जगताचे हितसंबंध, मूल्ये आणि श्रेष्ठत्वाची बाजू घेतली गेली होती आणि मुस्लीम महिला सार्वजनिक ठिकाणी चेहरा झाकणार नाहीत, असाच निष्कर्ष निघेल, असा आभास वृत्तांकनातून निर्माण करण्यात आला होता. यात ‘जेत्यांचीच संस्कृती’ हा नियम लागू होतो का, की प्रसारमाध्यमांनी तटस्थतेची भूमिका सोडून विविध सोयीच्या भूमिका घेऊन मुस्लीम महिलांना एका विशिष्ट पद्धतीनेच दाखावण्याचा प्रयत्न केला?
इंग्लंड वा अनेक पाश्चात्य शहरांत राहणारे मुस्लीम अधिकाधिक प्रमाणात आपली धर्मिक ओळख व्यक्त करण्यासाठी पोशाखाचा अधिकाधिक वापर करतात. त्यात रंगबिरंगी हिजाब, साधा काळा बुरखा किंवा अन्य इस्लामिक फॅशननुसार कपड्यांचा समावेश होतो. मुस्लिमांसाठी पोशाख हा इतका महत्त्वाचा विषय का आहे, तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर आणि प्रसारमाध्यमांच्या दृष्टीकोनातून हा इतका मोठा विषय का आहे, याचा धांडोळा इंग्लंडमधील तरुण मुस्लिमांच्या दृष्टीकोनातून एका ग्रंथात घेण्यात आला आहे.[6] त्यातही हा दृष्टीकोनातील फरक दिसून येतो.
गेल्या काही दशकांत मुस्लीम महिला या आधीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात शिकायला लागल्या आणि अनेक जण नोकरीही करू लागल्या आहेत. त्या अशा पद्धतीने आधुनिक काळाशी जोडले जात असताना, त्यांना आपल्या धर्मातील वेशभूषेबाबत प्रामाणिक राहण्याची गरज वाटल्याने फॅशनयुक्त कपडे वापरण्याकडेही कल वाढला. जगभर पाहिले तर हिजाबची फॅशन सर्वत्र आहे. हिजाबच्या फॅशन ट्रेन्डबद्दल माहिती घेण्यासाठी केलेल्या एका अभ्यासात आपल्या कपड्यांना मॅचिंग पद्धतीचा हिजाब वापरणाऱ्या मुस्लीम महिलांचे प्रमाण वाढले आहे, असे दिसून आले.[7]
यासाठी मलेशियाची राजधानी कौलालंपूर येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय हिजाब फॅशन महोत्सवात २०१४ साली सहभागी ३४५ मुस्लीम महिलांकडून प्रश्नावलीच्या माध्यमांतून मिळालेल्या माहितीचा अभ्यास करण्यात आला. त्यातून असे दिसून आले की, कपड्यांची शैली, फॅशनप्रती असलेला कल, फॅशनमधील वेगळेपणा आणि या फॅशनबद्दलच्या माहितीची उपलब्धता, या गोष्टी मनावर फॅशनविषयी प्रभाव टाकत असून अप्रत्यक्षपणे हिजाब वापरण्याला प्रोत्साहन देतात.
एका अभ्यासात हिजाबचे चिन्ह अथवा प्रतीकांचे मीम्स आणि जिफ्स सोशल मीडियावर कोणत्या प्रकारे वापरले जाते, याचा अभ्यास करण्यात आला आहे. या आधीच्या २०१५ साली प्रकाशित एका अभ्यासात प्रसारमाध्यमातून हिजाबधारी मुस्लीम महिलांना एकाच एक सामान्यीकरणाच्या रूढीबद्ध रूपात (overgeneralized stereotype) सादर केले जात असून, त्यात ती एक तर शोषित आणि दुय्यम स्थान असलेली तसेच स्वत:चे कोणतेही मत नसलेली असते किंवा ती मुक्त, पुरोगामी आणि पाश्चात्य जगाचे वर्चस्व नाकारणारी अशी असते, असे दिसून आले होते.
२०१९मध्ये न्यूझीलंडमध्ये झालेल्या पहिल्यावहिल्या फेसबुक लाईव्ह हत्याकांडांनंतर लगेचच हिजाब मीम्स आणि जिफ्सचा अभ्यास करण्यात आला होता.[8] ख्राईस्ट चर्च येथे मशिदीवर झालेल्या दोन हल्ल्यात ५०हून अधिक जण ठार आणि अनेक जखमी झाले होते. त्यात पारंपरिक प्रसारमाध्यमांतून दाखवण्यात येत असलेल्या प्रतिमेच्या विरुद्ध अशी प्रतिमा, या मीम्स आणि जिफ्समधून व्यक्त होत असल्याचे दिसून आले. यात पडदाधारी मुस्लीम महिला या आदरणीय आणि आनंदी असल्याचे, तसेच हिजाबला पाठिंबा असल्याचे दिसून आले. त्यामुळे पारंपरिक माध्यमे आणि इंटरनेटवरील मीम्स आणि जिफ्स एकाच पद्धतीने अभ्यासली जाऊ नयेत, असे या अभ्यासात म्हटले आहे.
याचा अर्थ समाजमाध्यमांद्वारे हिजाब बद्दलचा प्रभाव सकारात्मक पद्धतीने तरुण मुलींच्या मनावर होतो. पारंपरिक वृत्तपत्र आणि दूरचित्रवाणीवरील शोषित प्रतिमेपेक्षा तो भिन्न आहे. त्याचा पुरावा पुढील उदाहरणातून मिळतो. स्पेनमधील विद्यापीठ पातळीवर शिक्षण घेतलेल्या मुस्लीम महिलांना हिजाबविषयी काय वाटते, याचाही एक अभ्यास २०१५ साली प्रकाशित करण्यात आला होता.[9] या अभ्यासात स्पेनमध्ये जन्मलेल्या किंवा लहापणापासून स्पेनमध्ये राहत असलेल्या महिलांचा समावेश होता. त्यांची मते आणि प्रसारमाध्यमांतून हिजाबला शोषणाचे प्रतीक म्हणून सादर केल्या जाणाऱ्या प्रतिमेशी ताडून पाहण्यात आली.
यातून निघालेल्या निष्कर्षात असे दिसून आले की, हिजाब ही आपली ओळख अधोरेखित करण्याचे साधन म्हणून वापरले जातेच, शिवाय ते पुरुषप्रधान पद्धती आणि पाश्चात्य स्त्रीवादी भूमिका यांना आव्हान म्हणूनही वापरण्याचा त्यांचा आग्रह असतो, असे दिसून आले.
मुंबई शहरातील १८ ते २५ या वयोगटातील हिजाब वापरणाऱ्या मुस्लीम महिलांचा अभ्यास गेल्या वर्षी (२०२१) प्रकाशित झाला आहे.[10] त्याचा हेतू मुस्लीम महिलांना हिजाब महत्त्वाचा का वाटतो, याची कारणे शोधणे हा होता. त्या अभ्यासात त्यांना असे आढळले की, घरी, आसपास आणि त्या ज्या सोशल मीडियावर आहेत, तेथे हिजाबसाठी प्रोत्साहक वातावरण असते, तर शैक्षणिक संस्था, कामकाजाच्या जागा या ठिकाणी त्यांना त्यासाठी मज्जाव केला जातो. त्यामुळे या महिलांनी ते निभावत असलेल्या विविध भूमिकेनुसार हिजाबचा वापर कसा करावा, यासाठी आपले स्वत:चे नियम बनवले आहेत.
विनयशीलतेच्या मुद्द्यानुसार हिजाब हा केवळ डोके झाकतो, शरीर नाही. शरीर झाकण्याच्या सक्तीसोबत हा आधी केवळ आदरार्थी आलेला कपड्याचा तुकडा अत्यावश्यक बनत गेला आहे. गमतीची गोष्ट अशी की, इस्लामची सकारात्मक प्रतिमा निर्माण करण्यासाठी महिलांनी तो परिधान करायला सुरुवात केली होती, पण तो अधिकाधिक मुस्लीम समुदायाशी जोडले जाण्याचे प्रतीक म्हणूनही प्रस्थापित झाला. याचे मुख्य कारण धार्मिक असले तरी मुस्लीम महिलांच्या मते हा हिजाब परिधान करून त्या सबलीकरणाचा कैवार घेत असून आपण सुरक्षित असल्याचे दर्शवण्यासाठी, तसेच मुस्लीम समुदायाच्या स्वयंसिद्धतेचे प्रतीक म्हणूनही वापरत आहेत, असेही दिसून आले. आता एकाच हिजाबचे हे विविध अर्थ अलीकडच्या काळात कसे निर्माण झाले, हे पाहणे आवश्यक आहे.
..................................................................................................................................................................
उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...
हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal
................................................................................................................................................................
हैदराबाद शहरात तपशीलवार मुलाखती आणि समूहचर्चा माध्यमांतून केल्या गेलेल्या एका अभ्यासात याबद्दलचे काही महत्त्वाचे पैलू दिसून आले आहेत.[11] ते सध्या सुरू असलेल्या चर्चा आणि वादाच्या संदर्भात काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर प्रकाश टाकू शकतात. मुस्लीम संस्कृतीत पडदा पद्धती ही परपुरुषांपासून अंतर राखण्याच्या हेतूने आहे. त्यातून तिला घराच्या चौकटीत बंद करण्यात आल्याची प्रतिमा तयार झाली, जी खरीही आहे. तथापि, गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात मुस्लीम महिला या शिक्षण घेऊ लागल्या आणि मर्यादित क्षेत्रात आणि प्रमाणात का होईना, नोकरीही करू लागल्या. ते करत असताना त्यांना आपल्या पारंपरिक परपुरुषांपासून अंतर राखण्याचा घरात असलेला पडदा सार्वजनिक ठिकाणी नेण्यात या हिजाबचा वापर करण्यात येत आहे, असा निष्कर्ष यात काढण्यात आला आहे.
मुंबई, हैदराबाद, न्यूझीलंड, स्पेन, इंग्लंड, डेन्मार्क, अर्जेंटिना या ठिकाणच्या अभ्यासातून हिजाबचा वापर करणाऱ्या महिला त्याकडे काय अर्थाने पाहतात आणि पाश्चात्य, हिंदू आदी बिगर मुस्लीम कसे त्याकडे पाहतात, यातील फरक अधोरेखित होतो.
समकालीन हैदराबादमध्ये पडदा पद्धतीचा अवलंब करणाऱ्या ५३ मुस्लीम महिलांच्या सखोल मुलाखती आणि समूह चर्चेद्वारे हिजाबचा मुद्दा धार्मिक, लैंगिक आणि वर्ग यांच्यातील छेदनबिंदू कसा आहे, याचा वेध घेण्यात आला. या अभ्यासाचे वैशिष्ट्य असे की, त्यांनी काळा बुरखा म्हणजे दमन आणि प्रतिगामक परिस्थिती या एकल (मोनोलिथ) दृष्टीकोनाच्या पलीकडे जाऊन पाहिले आहे. त्यात पडदा, धार्मिक ओळख, सत्ता यांचा लिंग आणि धार्मिकतेशी होणाऱ्या छेदनबिंदूंचा वेध घेतला आहे.
निष्कर्ष
अमेरिका, न्यूझीलंड, स्पेन, इंग्लंड येथील विविध माध्यमांच्या अभ्यासातून मुख्य प्रवाहातील प्रसारमाध्यमे हिजाबचे प्रतीक ज्या अर्थाने वापरतात किंवा त्याचा अर्थ लावतात, तो प्रत्यक्षात हिजाब वापरणाऱ्या आणि ज्यांच्याबद्दल हे अर्थ लावले जातात, त्यांच्यासाठी ते पूर्णत: वेगळे, भिन्न आणि काही वेळा पूर्ण विरोधीदेखील आहेत, हे स्पष्ट होते. तसेच, इस्लामची प्रतिमा विशिष्ट पद्धतीने पाश्चात्य आणि बिगर पाश्चात्य जगात कशी रचली गेली, तेही डेन्मार्क, अर्जेंटिना येथील अभ्यासावरून दिसते. मुस्लीम महिलांसाठी ती स्वतंत्र ओळख आहे, तसेच पारंपरिक पर्दा पद्धतीला पर्यायदेखील आहे. हिजाब हा, पारंपरिक दृष्टीकोनाच्या पूर्ण विरुद्ध, सबलीकरणाचेही प्रतीक आहे. २००१ साली अमेरिकेवर झालेला हल्ला आणि त्यानंतर ‘क्लॅश ऑफ सिव्हिलायझेशन’ सिद्धान्ताची मांडणी ही पाश्चात्य म्हणजे अमेरिका (अर्थात प्रगत) आणि इस्लाम म्हणजे अफगाणिस्तान (अर्थात अप्रगत) अशी मांडणी केली. त्यानंतर प्रसारमाध्यमांनी पक्षपातीपणाने कशी पाश्चात्य जग आणि मुस्लीम जग अशी ‘मोनोलिथिक’ मांडणी कशी केली ते ‘न्यूयॉर्क टाइम्स’ आणि ‘वॉशिंग्टन पोस्ट’च्या बातम्यांच्या विश्लेषणावरून दिसून येते. प्रसारमाध्यमांना सोपी प्रतीके लागतात. त्यानुसार छायाचित्रात बुरखा अथवा हिजाब हा मुस्लीम महिलांच्या दमनाचे प्रतीक म्हणून वापरला जाऊ लागला. इस्लामबद्दल दोन भिन्न प्रतिमा युरोपच्या बाजूचे जग आणि त्याच्या विरोधातील जग, यात कशा निर्माण झाल्या हे डेन्मार्क, अर्जेंटिनातील अभ्यासातून दिसते.
मुस्लीम महिलेचा हिजाब हा केवळ तिच्या ओळखीपुरता मर्यादित नाही, तर ती धर्माचीही ओळख आहे. म्हणून मुस्लीम महिला हिजाबच्या माध्यमातून केवळ आपली ओळख, मग ती सबलीकरणाची का होईना, सांगत नाही, तर कळत-नकळतपणे धार्मिक ओळखीचे वहनही करत असते.
मलेशियातील अभ्यासानुसार[12] नियतकालिकात हिजाब फॅशनचे वार्तांकन वाढत आहे. आज जग इंटरनेटच्या माध्यमातून जोडले गेल्याने हिजाब फॅशनचा प्रसार सर्वत्र होतो आणि सर्व मुस्लीम आपली ओळख आणि बाहेर पडल्यानंतरही पडदा पाळण्याची सक्ती, याचा छेदनबिंदू म्हणून त्याचा वापर करू लागली आहेत, असे म्हणता येईल.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
उच्च माध्यमिक शाळांत मुलींना हिजाब घालायला द्यायला हवा की नको, या मूळ प्रश्नाकडे या वरील निष्कर्षांच्या दृष्टीने पाहिले तर त्यांच्या शिक्षणाच्या आड ते येत असेल तर त्यांना डोक्यावर हिजाब घालू दिला पाहिजे. कारण, अन्यथा त्या दोन पिढ्यांच्या आधीच्या स्त्रियांप्रमाणे दाराआड बंद होतील आणि घराबाहेरचे जग त्यांना उपलब्ध होणार नाही. एरव्ही पदवीपर्यंत जाऊ शकणाऱ्या अनेक मुली पुढच्या वर्षीपर्यंत अल्पवयात विवाहबद्ध होतील आणि अजून एक पिढी अशिक्षितपणाच्या आडोशाखाली नाहीशी होईल. हिजाब घेऊन का होईना, त्या शिकल्या तर त्या नोकरी-उद्योग करतील आणि हिजाबबद्दलचे निर्णय स्वत: घेऊ शकतील.
हिजाब हा प्रतिगामी आहे, धार्मिक आहे असे ज्या पुरोगामी आणि आधुनिक शिक्षक, अधिकारी, आमदार, मंत्री यांना वाटते, त्यांनी इतरांना त्यांच्यासारखे प्रगत बनण्यासाठी त्यांना आधी हिजाब घेऊन शिकू द्यावे. दुसरे असे की मुस्लीम मुलींनी, तेही काही, डोक्यावर हिजाब घेतल्याने बहुसंख्य हिंदू शिक्षकांना त्यांचे कर्तव्य बजावता येणार नाही, अशी आव्हानात्मक परिस्थिती निर्माण होईल, असे वाटत नाही. तसेच, केवळ हिजाब आपली शालीनता ठरवू शकत नाही, हे शहाणपण त्यांना शाळेत घेतल्याने येईल, परत पाठवल्याने नाही.
संदर्भसूची -
[1] अब्राहमप्रणित धर्म तीन आहेत. अब्राहम जसा ज्यू धर्माचा संस्थापक आहे, तितकाच तो इस्लामचाही संस्थापक आहे. कुराणात इब्राहीम वाले सलाम तथा इब्राहीम खलिलुल्ला असा त्याचा उल्लेख आहे. आणि त्याने पहिली मशीद बांधली. बकरीद हा सण इस्लाममध्ये त्याच्याच बलिदानाची आठवण म्हणून साजरी केली जाते. ख्रिस्ती धर्मातही अब्राहम तितकाच आहे, कारण येशू ख्रिस्तापर्यंतची परंपरा ख्रिस्ती आणि इस्लाम धर्मासाठी समान आहे. त्यामुळे अब्राहम जितका ख्रिस्ती धर्माचा संस्थापक आहे, तितकाच तो इस्लामचा महत्त्वाचा प्रेषित आहे. हे तिन्ही धर्म जेरुसलेम या मूळ पवित्र भूमीतून निर्माण झाले. त्यामुळेच तिथे ख्रिस्ती, ज्यू आणि मुस्लीम यांच्यात दीर्घ काळापासून राजकीय संघर्ष सुरू आहे. तथापि, हिजाबसारख्या वस्त्राद्वारे स्त्रियांकडून विनयशीलतेचा आग्रह, हा बव्हंशी मुस्लीम धर्मातच धरला जातो.
[2] Syed, I. U. (2021). Hijab, niqab, and the religious symbol debates: Consequences for health and human rights. The International Journal of Human Rights, 25(9), 1420–1435. https://doi.org/10.1080/13642987.2020.1826451
[3] Franklin, M. I. (2013). Veil Dressing and the Gender Geopolitics of “What Not to Wear.” International Studies Perspectives, 14(4), 394–416. http://www.jstor.org/stable/44214624
[4] VANDENBELT, K. (2021). The Post-September 11 Rise of Islamophobia: Identity and the ‘Clash of Civilizations’ in Europe and Latin America. Insight Turkey, 23(2), 145–168. https://www.jstor.org/stable/27028544
[5] Byng, M. D. (2010). Symbolically Muslim : Media, Hijab, and the West. Critical Sociology, 36(1), 109–129. https://doi.org/10.1177/0896920509347143
[6] Tarlo, E. (2010). Visibly Muslim : Fashion, Politics, Faith. Berg. http://www.bloomsbury.com/uk/visibly-muslim-9781845204327/
[7] Hassan, S. H., & Harun, H. (2016). Factors influencing fashion consciousness in hijab fashion consumption among hijabistas. Journal of Islamic Marketing. https://doi.org/10.1108/JIMA-10-2014-0064
[8] Ibrahim, O. (2019).Textual and Visual Representation of Hijab in Internet Memes and GIFs [Master's Thesis, the American University in Cairo]. AUC Knowledge Fountain.
https://fount.aucegypt.edu/etds/768
[9] Adlbi Sibai, S. (2015). Narratives of Spanish Muslim Women on the Hijab as a Tool to Assert Identity. Identity and Migration in Europe : Multidisciplinary Perspectives, 251–268. https://doi.org/10.1007/978-3-319-10127-9_15
[10] Rumaney, H., & Sriram, S. (2021). Not Without My Hijab : Experiences of Veiled Muslim Women in India. Human Arenas, 1–24. https://doi.org/10.1007/s42087-021-00193-3
[11] EBSCOhost | 134411187 | The Voice behind the Veil: An Exploratory Study on the Identity Politics of Muslim Women and the Practice of Veiling (Hijab) in Hyderabad. (n.d.). Retrieved February 14, 2022, from https://web.p.ebscohost.com/abstract?
[12] Latiff, Z. Abd., & Alam, F. N. S. Z. (2013). The Roles of Media in Influencing Women Wearing Hijab : An Analysis. Journal of Image and Graphics, 1(1), 50–54. https://doi.org/10.12720/joig.1.1.50-54
.................................................................................................................................................................
लेखक इब्राहीम अफगाण लेखक, पत्रकार आहेत.
ibuscholar@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment