मुखवटा जरी राज ठाकरेंचा असला तरी त्यामागचा चेहरा भाजपचा आहे, हे आता लपून राहिलेले नाही
पडघम - राज्यकारण
विनोद शिरसाठ
  • राज ठाकरे पुण्यातील एका कार्यक्रमात
  • Mon , 02 May 2022
  • पडघम राज्यकारण भाजप BJP महाराष्ट्र नवनिर्माण सेना Maharashtra Navnirman Sena मनसे MNS भोंगे Loudspeaker हनुमान चालिसा Hanuman Chalisa राज ठाकरे Raj Thackeray

मार्च महिन्यात देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल लागले. त्यातील पंजाब वगळता अन्य चारही राज्यांत भाजपला सत्ता मिळवता आली. त्यापैकी गोवा, उत्तराखंड व मणिपूर ही तीन राज्ये लहान आहेत. पण उत्तर प्रदेश हे राज्य देशातील सर्वांत मोठे असून, लोकसभेचे सर्वाधिक मतदारसंघ तिथे असल्याने केंद्रीय सत्ता मिळवण्यासाठी ते सर्वांत महत्त्वाचे राज्य मानले जाते. त्या राज्यात पूर्ण बहुमत आणि सलग दुसऱ्यांदा सत्ता मिळाल्याने भाजपला आकाश ठेंगणे वाटू लागले आहे. विधानसभा निवडणुकीच्या आधी त्या राज्यात भाजपनेत्यांनी साम-दाम-दंड-भेद या कूटनीतीचा अवलंब तर केला होताच, पण धार्मिक विद्वेषाच्या वातावरणाला खतपाणी घातले होते.

आता पुढच्या विधानसभा निवडणुका अन्य काही राज्यांत होणार आहेत, त्याला साधारणत: वर्षभराचा अवकाश आहे. त्यात गुजरात हे प्रमुख राज्य आहे आणि पंतप्रधान व गृहमंत्री यांची प्रतिष्ठा तिथे पणाला लागणार आहे. कारण सलग २० वर्षे भाजपची सत्ता त्या राज्यात राहिली आहे. मागील विधानसभा निवडणुकीत तिथे भाजपची दमछाक काँग्रेसने केली होती. त्यामुळे या वेळी त्या राज्याबाबत अधिक सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता भाजपला, विशेषत: पंतप्रधान व गृहमंत्री यांना वाटणे साहजिक आहे. शिवाय त्या निवडणुकांनंतर वर्षभराने म्हणजे २०२४च्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुका होणार आहेत.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

अशा पार्श्वभूमीवर भाजपला पुढील रणनीती आखायची आहे. आणि त्याच प्रक्रियेचा भाग म्हणून अन्य राज्यांत व देशातही धार्मिक ध्रुवीकरणाला चालना देण्यासाठी भाजप प्रयत्न करतो आहे. भाजपनेते व सरकारमधील मंत्री व पंतप्रधान वा मुख्यमंत्री हे काम कधी उघडपणे, तर कधी शिताफीने करत आले आहेत. पण एका मर्यादपलीकडे त्यांना ते करता येत नाही. कारण त्यामुळे ते शस्त्र ‘बूमरँग’ होण्याची शक्यता असते. म्हणून अन्य घटकाना हाताशी धरून समाजमन कलुषित करणे व अन्य राजकीय पक्षांना अस्वस्थ करून सोडणे, ही रणनीती राबवावी लागते. आणि ही रणनीती राबवताना प्रत्येक राज्यात वेगवेगळे घटक हाताशी धरून वेगवेगळ्या मुद्द्यांवर ध्रुवीकरण करायचे असते. त्यामुळे केंद्र सरकारचे विविध आघाड्यांवरील अपयश तर झाकले जातेच; पण भाजपविरोधी पक्षांना वा भाजपची सत्ता नसलेल्या राज्यांना अस्थिर करता येते.

अर्थातच, यात व्यापक रणनीतीचाही भाग आहेच, तो म्हणजे मूळचा हिंदुत्ववादी अजेंडा पुढे रेटण्याचा. त्याचीच परिणती म्हणून पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका ऐन रंगात आलेल्या असताना कर्नाटक राज्यात हिजाबच्या मुद्द्यावरून वाद पेटवण्यात आला, चिघळवण्यात आला. आणि आता त्याच प्रक्रियेचे पुढचे पाऊल म्हणून महाराष्ट्रात मशिदीवरील भोंगे उतरवणे हा मुद्दा वादाचा बनवून, चांगलाच पेटवण्यात आला आहे. त्यासाठीचा मुखवटा जरी राज ठाकरेंचा असला तरी त्यामागचा चेहरा भाजपचा आहे, हे आता लपून राहिलेले नाही.

राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडले त्याला आता १६ वर्षे झाली आहेत. अगदी बालपणापासून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अंगाखांद्यावर खेळलेल्या राज यांच्याकडे बाळासाहेबांची हुबेहूब नक्कल म्हणूनच सुरुवातीपासून पाहिले गेले. दिसण्यापासून वागण्या-बोलण्यापर्यंत आणि व्यंगचित्रे कादण्यापासून विचार मांडण्यापर्यंत. पण अस्सल ही अस्सल असते आणि नक्कल ती शेवटी नकलच, हे राज यांच्याबाबत पुन्हा पुन्हा अधोरेखित झाले आहे.

आज जरी शिवसेना हा पक्ष सौम्य भासत असला तरी शिवसेनेचा वारसा आणि राज ठाकरे यांचा वारसा एकच आहे आणि तो स्पृहणीय नाही, याचे भान हरपून चालणार नाही. राज यांनी २००६मध्ये शिवसेना सोडली तेव्हा जाहीर केले होते की, बाळासाहेब हाच माझा आदर्श आहे आणि राहणार! खरेच होते ते, त्यापेक्षा वेगळे राजकारण त्यांना करताच येणार नव्हते. सेनेतून बाहेर पडल्यावर त्यांच्या कार्यकत्यांनी काही ठिकाणी केलेली तोडफोड तेच सांगत होती. मात्र त्या काळातही उदारमतवादी व पुरोगामी समजले जाणारे काही लोक राज यांच्याकडे मोठ्या आशेने बघत होते. त्यांनी ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना’ हे आपल्या पक्षाचे नाव धारण केले, ‘उद्याच्या महाराष्ट्राची ब्ल्यू प्रिंट तयार करणार’, अशी भूलथाप मारली आणि ‘मला महाराष्ट्रातील शेतकरी जीनची पँट घालून ट्रॅक्टर चालवताना पाहायचाय’ असे गुलाबी स्वप्न दाखवले होते. त्यांच्या त्या वेळच्या भाषणांना भुलणाऱ्या वर्गाला उद्देशून तेव्हा आम्ही ‘राज ठाकरे यांच्याविषयी सहानुभूती हा भाबडेपणाच ठरेल!’ या शीर्षकाखाली विवेचन केले होते, तेव्हा ‘साधना’च्या अनेक पुरोगामी हितचिंतकांना ‘ही अतिरिक्त शंका’ वाटत होती.

..................................................................................................................................................................

उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअ‍ॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...

हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal

................................................................................................................................................................

प्रत्यक्षात काय घडत आले? पुढील तीन वर्षांत मनसेच्या शाखा गावोगाव निघाल्या, बाळासाहेबांनी उद्धवच्या पारड्यात वजन टाकल्याची सहानुभूती राज यांच्या वाट्याला आली. त्याचा परिणाम २००९च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत दिसला. काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना-भाजप या दोन आघाड्यांच्यामध्ये असलेला थोडासा अवकाश राज यांच्या पक्षाने काबीज केला, तेव्हा मनसेला १३ जागा मिळाल्या. पदार्पणातच एवढे यश म्हटल्यावर राज यांचा स्वत:च्या ताकदीवरचा भ्रम बळावला. त्यांच्या आमदारांनी विधानसभेत पदार्पण करताना पहिल्याच दिवशी अबू आझमी या समाजवादी पक्षाच्या आमदाराला मारहाण केली. कशावरून, तर त्यांनी विधानसभा सदस्यत्वाची शपथ ही मराठीऐवजी हिंदीतून घेतली म्हणून! तेव्हा मनसेच्या चार आमदारांना निलंबित केले गेले होते.

महाराष्ट्राचे नवनिर्माण करायला निघालेल्या पक्षाने विधानसभेतील सुरुवात अशी केली होती. तेव्हा त्यांना हे कळले नाही, पण त्यांच्या सहानुभूतीला घरघर लागण्याचा तो प्रारंभबिंदू होता. त्या पाच वर्षांत त्या १३ आमदारांनी नेमकी किती पावले टाकली, हे काही पुढे कळले नाही. परिणामी २०१४च्या विधानसभा निवडणुकीत मनसेला एक जागा मिळाली आणि त्या वर्षीच्या लोकसभा निवडणुकीत एकही जागा मिळाली नाही. २०१९च्या विधानसभा व लोकसभा निवडणुकीतही मनसेची हीच स्थिती कायम राहिली. असाच प्रकार महानगरपालिका निवडणुकांच्या बाबतीत झाला. २०१२च्या महापालिका निवडणुकीत बृहन्मुंबई, नाशिक, पुणे, कल्याण-डोंबिवली इत्यादी पाच-सात महापालिकांमध्ये २० ते ३० या दरम्यान जागा मिळालेल्या मनसेला २०१७च्या महापालिका निवडणुकांमध्ये त्या सर्व ठिकाणी ५ पेक्षा कमी किंवा त्यादरम्यान जागा मिळाल्या. आणि ‘नवे’ काही करता आले नाही ते वेगळेच!

हे खरे आहे की, राज्यात चार मोठ्या बलाढ्य पक्षांच्या स्पर्धेतून मनसेला फार यश मिळणे अवघड होते, पण पदार्पणातील यश टिकवता आले नाही, ही नामुष्कीची बाब आहे. नेत्याचे व पक्षाचे आणि त्यांच्या तथाकथित भूमिकांचे हे अपयश आहे. खरे तर ‘भूमिका’ हा शब्द राज यांना व त्यांच्या पक्षाला वापरणे म्हणजे अतिशयोक्ती करण्यासारखी आहे. इतके हास्यास्पद वर्तन त्यांचे राहिले आहे.

दोन मोठी उदाहरणे तर इतिहासात नोंदवता येतील. २०१४च्या लोकसभा निवडणुकीत मनसेने काही उमेदवार राज्यात उभे केले आणि राज ठाकरे प्रचारात सांगत सुटले- ‘आमचा निवडून आलेला उमेदवार नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान होण्यासाठी पाठिंबा देणार!’ अशा प्रकारची भूमिका प्राचीन काळातील एखाद्या लहरी राजानेच घेतली असेल. कारण कोणीही सामान्य मतदार ते ऐकून असाच विचार करणार की, ‘मग मी नरेंद्र मोदींनी उभे केलेल्या उमेदवारांनाच मत देतो की! त्यांचा उमेदवार असताना तुमच्याकडे कशाला येऊ, मोदींच्या उमेदवाराची मते कमी करायला?’

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

त्यानंतरच्या म्हणजे २०१९च्या लोकसभा निवडणुकीत तर मनसेने दुसऱ्या टोकाची लहर दाखवली. ‘लाव रे तो व्हिडिओ’ ही कॅम्पेन आणि त्या वेळची राज यांची भाषणे एकाच मुद्द्याभोवती फिरत होती. तो म्हणजे ‘मोदी व शहा या जोडीला पराभूत करा, म्हणजे भाजप सोडून अन्य कोणालाही मते द्या’.

राज यांच्या त्या भाषणांमुळे व प्रचार पद्धतीमुळे तेव्हा समस्त भाजप विरोधकांना आणि त्यातही पुरोगामी उदारमतवादी वर्तुळाला राज यांच्याविषयी प्रेमाचे भरते आले होते. त्यातही गंमत अशी की, मनसेचा एकही उमेदवार उभा न करता राज यांचा हा सनसनाटी प्रचारदौरा चालू होता. त्यामुळे काहींना राज यांच्यात परोपकारी महापुरुषाने शिरकाव केल्याचा साक्षात्कार अनेक लहान-थोरांना झाला होता. तेव्हा काहींना असे वाटले होते की, त्यानंतर लगेच येणाऱ्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठीची ही धूर्त खेळी आहे. म्हणजे परोपकारी राजकीय नेता अशी प्रतिमा झाल्यावर महाराष्ट्र विधानसभेत मोठा वाटा राज यांना मिळेल, पण त्या विधानसभेत २८८ पैकी एक जागा मनसेला मिळाली. त्यानंतर राज यांना केंद्र सरकारच्या सक्तवसुली संचालनालयाने (इडी) जी नोटीस धाडली, त्यामुळे ते कोषात गेले. आणि आता त्या कोषातून बाहेर पडण्यासाठी भाजपनेच त्यांना पुढे केले आहे किंवा पाठबळ दिले आहे.

हा सारा प्रवास काय सूचित करतो आहे, काय निष्कर्षाप्रत घेऊन जातो आहे? राज यांना, त्यांच्या सल्लागारांना व पक्षातील नेत्यांना भूमिकाच निश्चित करता येत नाही, म्हणजे ते गोंधळातून बाहेर पडू शकलेले नाहीत. किंवा प्रत्येक निवडणुकीत ते अन्य पक्षांशी तडजोडी करून काही देवाण-घेवाण करत आहेत. ती देवाण-घेवाण कशा प्रकारची आहे, हे त्यांचे त्यांना माहीत. म्हणजे कोणत्या तरी पक्षाशी आतून संगनमत असल्याशिवाय राज व मनसे यांना वाटचाल करता आलेली नाही, हे आता उघड सत्य आहे.

आधी सेना-भाजप विरोधात लढण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादीचा छुपा व मूक पाठिंबा, नंतर अन्य पक्षांच्या विरोधात भाजपचा छुपा पाठिंबा, त्यानंतर भाजपच्या विरोधात काँग्रेस-राष्ट्रवादी यांचा छुपा पाठिंबा आणि आता महाविकास आघाडीच्या विरोधात लढण्यासाठी भाजपचा जवळजवळ उघड पाठिंबा, अशी वाटचाल मागील १६ वर्षे मनसेची राहिली आहे.

असे दुर्भाग्य वाट्याला येणे ही कोणत्याही जबाबदार व स्वाभिमानी राजकीय नेत्यासाठी लाजीरवाणी बाब आहे. मात्र त्यांचा आवेश नेमका उलटा आहे. पण जनता इतकीही दुधखुळी नसते, तिने तरी अधिक काळ व पुन्हा पुन्हा फसगत का करून घ्यावी? वस्तुत आता राज यांची व त्यांच्या पक्षसंघटनेची अवस्था निष्प्रभ व निस्तेज म्हणता येईल अशी आहे. विधानसभेत अस्तित्व नाही, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तुरळक काही ठिकाणी आहे. पक्षाच्या शाखा ओसाड आहेत, कार्यकत्यांमध्ये चैतन्य नाही, अधूनमधून काही भावनिक मुद्दे उकरून काढून व राज यांची सभा आयोजित करून गर्दी जमवून काहीशी धुगधुगी निर्माण केली जाते, पण काही काळानंतर ती पूर्ववत होते.

महाराष्ट्राची ‘ब्ल्यू प्रिंट’ करायला निघालेल्या पक्षाला स्वत:ची वेबसाईटसुद्धा नीट उभारता आलेली नाही, जी काही अर्धवट आहे तिच्यावर विविध स्वयंसेवी संस्थांच्या अहवालातील वा पत्रकांमधील मुद्दे उचलून मागण्यांची जंत्री सादर केलेली आहे. त्या जंत्रीला काहीएक सूत्र आहे, असे कुठेही दिसत नाही, आणि वाक्यरचना व प्रूफ तपासणी, हे प्राथमिक कामही नीट केलेले नाही. त्यामुळे मनसेची दखल घेत राहावे असे काही नाही. मात्र त्यांचे उपद्रवमूल्य आहे. ‘उपयुक्ततामूल्य नसेना, उपद्रवमूल्य हीच आमची ताकद’ असे त्यांना अभिमानाने मिरवायचे असेल, आणि त्यावर मिळणाऱ्या टाळ्यांवर खूष व्हायचे असेल तर ते त्यांचे समाधान मात्र कोणालाही हिरावून घेता येणार नाही. असो!

तर राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे उतरवणे हा मुद्दा मागील महिनाभर लावून धरला आहे. त्यामुळे राज्यातील शहरी भागांत काळजी, भीती, चिंता, तणावसदृश्य परिस्थिती जाणवत आहे. नवनीत राणा व रवी राणा या खासदार-आमदार पती-पत्नीने त्यांच्यात सूर मिसळला आहे. उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारने १० हजार मशिदीवरील भोंगे उतरवणे किंवा आवाज कमी करणे, अशी कारवाई केल्याची खरी/खोटी बातमी आली आहे. या सर्वांमागे भाजपचे नेतृत्व ठामपणे उभे आहे, हे लपवण्याचे कष्ट त्यांनी घेतलेले नाही. नारायण राणे पिता-पुत्र मागील काही महिने निरर्थक उद्योग करतच आहेत. गुणरत्न सदावर्ते या बाणेदार व धडाकेबाज वकिलानेही आता तुरुंगातून सुटल्याबरोबर ‘जय श्रीराम’ ही घोषणा आत्मसात केल्याची बातमी आली आहे.

एकूण या सर्व प्रक्रियेत भाजपला गमवायचे काही नाही. असे लहान-मोठे उद्रेक होत राहतील. मुळातच अनैसर्गिक असलेली राज्यातील महाविकास आघाडी कसाबसा गाडा चालवत आली आहे. स्वतःपलीकडे विचार त्यांना करता येत नाही. स्वत:ला बुडण्यापासून वाचवणे आणि उपलब्ध वेळेत शक्य तेवढे पदरात पाडून घेणे, यासाठी ते परस्परांचे हात धरून आहेत.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

या गदारोळात कायदा व सुव्यवस्था बिघडली असे कारण दाखवून राज्य सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लावता येईल का, याचा अंदाज केंद्र सरकार घेत आहे. ‘आधी देशाचे हित, मग पक्षाचे हित’ असे म्हणणारा भाजप आपल्या पक्षासाठी देशाची दीर्घकाळ जुळत आलेली लोकशाही संरचना मोडीत काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. कोणत्या प्रकारच्या राष्ट्रवादात हे बसते, त्यांचे त्यांनाच माहीत. पण राष्ट्रवाद ही जर सकारात्मक संज्ञा असेल, तर तिच्यात भाजपचा राष्ट्रवाद बसत नाही, हे निश्चित! त्यामुळे ‘स्यूडो सेक्युलॅरिझम’ ही संज्ञा भाजपने काँग्रेसला लावली, त्याचप्रमाणे ‘स्यूडो नॅशनॅलिझम’ ही संज्ञा भाजपला लावता येईल.

या सर्व प्रक्रियेत देशाचे नुकसान होणार आहे हे खरे, पण हा देश पूर्णत: भाजपच्या आहारी जाईल, हे कदापि शक्य नाही. आता सुजाण हिंदू समाजाने काय करावे हा प्रश्न आहे, पण मुस्लीम समाजाने काय करावे, हा अधिक गहन प्रश्न आहे. त्याचे उत्तर, त्यांनी प्रतिगामीत्वाच्या बाबतीत हिंदू समाजाशी स्पर्धा करू नये इतकेच देता येईल!

(‘साधना’ साप्ताहिकाच्या ७ मे २०२२च्या अंकातून)

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......