हीरकमहोत्सवोत्तर महाराष्ट्राचे गुणगान करताना, शोषित-पीडित-वंचितांना विकासाच्या प्रवाहातील सन्मानाचे जगणे मिळवून द्यावे लागणार आहे!
ग्रंथनामा - वाचणारा लिहितो
अजय देशपांडे
  • लालजी पेंडसे, हुतात्मा स्मारक आणि ‘महाराष्ट्राचे महामंथन’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Sat , 30 April 2022
  • ग्रंथनामा वाचणारा लिहितो लालजी पेंडसे Lalji Pendse महाराष्ट्राचे महामंथन Maharashtrache Mahamanthan संयुक्त महाराष्ट्र Sanyukta Maharashtram १ मे 1 May

१ मे २०२० रोजी महाराष्ट्र राज्य साठ वर्षांचे झाले. उद्या, १ मे २०२२ रोजी हे राज्य ६२ वर्षांचे होईल. समाजकारण, राजकारण, अर्थकारण, साहित्य, संस्कृती, धर्मविचार, कला, संगीत, स्थापत्य, नाट्य, शिक्षण, प्रबोधन, चळवळ आदी अनेक क्षेत्रांत वैभवशाली इतिहासाची श्रीमंती महाराष्ट्राकडे आहे. २०२२मध्ये करोना नावाच्या जागतिक महामारीच्या संकटाचा सामना करत असताना महाराष्ट्र राज्याचा हीरक महोत्सव पारंपरिक उत्सवी पद्धतीने साजरा करणे शक्य झाले नाही. पण आता ६२व्या वर्षाकडे वाटचाल करणाऱ्या या राज्याच्या निर्मितीच्या इतिहासाचा आठव आणि जागर करता येणे शक्य आहे. इतिहासाचे स्मरण इतिहासनिर्मितीसाठी आवश्यक असते.

या राज्याच्या निर्मितीच्या इतिहासाचा जागर करताना लालजी पेंडसे यांच्या ‘महाराष्ट्राचे महामंथन’ या ग्रंथाचे स्मरण अपरिहार्य आहे. शेतकरी कामगार चळवळीचे नेतृत्व करणारे लालजी पेंडसे लेखक, समीक्षक आणि पत्रकार होते. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीशी अगदी प्रारंभापासूनच नाते असणारे लालजी पेंडसे संयुक्त महाराष्ट्र परिषदेचे एक संस्थापक होते. त्यामुळे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या प्रारंभापासून या राज्याच्या स्थापनेपर्यंतच्या चळवळीचे ते एक साक्षीदार होते. त्यांनी लिहिलेला या चळवळीचा इतिहास म्हणजे ‘महाराष्ट्राचे महामंथन’ हा ग्रंथ होय.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

१ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्य स्थापन झाल्यानंतर लगेचच म्हणजे १४ नोव्हेंबर १९६१ रोजी या ग्रंथाची हस्तलिखित प्रत लालजी पेंडसे यांनी लिहून पूर्ण केली. या वर्षी या ग्रंथाच्या लेखनाला पन्नास वर्षे पूर्ण झाली आहेत. पण अनेक कारणास्तव मुद्रणप्रत तयार व्हायला विलंब झाला. १९६५मध्ये या ग्रंथाची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली. त्यानंतर ०५ मे २०१० रोजी या ग्रंथाची दुसरी आवृत्ती आणि १० जून २०१० रोजी तिसरी आवृत्ती लोकवाङ्मय गृहाने प्रकाशित केली. या ग्रंथाची दुसरी आवृत्ती महाराष्ट्र राज्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून प्रकाशित झाली. यामध्ये प्रारंभी प्रकाशकाचे निवेदन आहे-

“लालजी पेंडसे यांनी १९६२च्या सुमारास ‘महाराष्ट्राचे महामंथन’ हा ग्रंथ लिहून पूर्ण केला, तेव्हा संयुक्त महाराष्ट्र चळवळ नुकतीच होऊन गेली होती. तिचे ‘अक्षर इतिहासा’त रूपांतर करण्याचे मोठे कार्य लालजी पेंडसे यांनी केले. प्रगतिशील विचारांचे पुरस्कर्ते व समीक्षक लालजी पेंडसे राजकीय कार्यकर्तेही होते आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीत प्रारंभापासून अखेरपर्यंत ते पहिल्या फळीतील नेते म्हणून सक्रिय होते. कार्यकर्त्याने आपल्या चळवळीचा इतिहास लिहावा याला एक वेगळे महत्त्व आहे. या इतिहासाचे कथन त्यांनी घटनांच्या वर्णन- विश्लेषणासोबतच संयुक्त महाराष्ट्र समितीच्या बैठकांचे वृत्तान्त, अहवाल, चर्चांचे तपशील वृत्तपत्रातील बातम्या यांच्या माध्यमातून केले आहे. यामुळे हा इतिहास पुरेसा नि:पक्षपाती तर ठरला आहेच, पण भविष्यात संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांना जिज्ञासू व्यक्तीला अत्यंत उपयुक्त असणारा दस्तएवज म्हणूनही त्याचे महत्त्व आहे.” (पृष्ठ पाच) प्रकाशकांच्या निवेदनातील हे भाष्य या ग्रंथाचे अनन्यसाधारण महत्त्व आणि संदर्भमूल्य अधोरेखित करणारे आहे.

या ग्रंथाच्या उपसंहारामध्ये लालजी पेंडसे लिहितात, “ग्रंथाचे प्रवृत्तिकारण हे आहे की, संयुक्त महाराष्ट्रासाठी झालेल्या एवढ्या प्रचंड आंदोलनासंबंधी महाराष्ट्र सारस्वताच्या पुष्ट भांडारात काहीच ग्रथित नसावे, ही एक विदारक पोकळी राहून गेली होती. ही पोकळी भरून काढली असा माझा दावा नाही. परंतु आता या इतिहासलेखनाला पाहिजे असलेली साधने नष्ट होत आहेत. उद्या एखाद्या अधिक समर्थ लेखकाने लेखणी हाती धरायचे म्हटले, तर त्याला काही सामग्री हा ग्रंथ पुरवेल आणि काही काळ तरी या उत्तुंग आंदोलनाची स्मृती तो टिकवून ठेवील, ही माझी अभिलाषा आहे. कारण लोकविचक्षण ग्रंथनिष्पत्तीच्या आजच्या काळात महाराष्ट्र राज्याचे जे इतिहास -भूगोल लिहिले जातील, त्यात या राज्याचे जन्मजातक यथातथ्य स्वरूपात मांडले जाण्याची आशा नाही. या राज्याच्या सीमारेषा रामगिरीला वेढून उदगीरपर्यंत पोचवण्यात केवढा भोग नि पराक्रम खर्ची पडले आहेत, याची शुद्धबुद्ध उद्याला शिल्लक राहण्याचा संभव फारच कमी आहे. अशा वेळी एखाद्या ग्रंथालयाच्या सांदीकोपऱ्यात पडून असलेला हा ग्रंथ उद्याच्या कुणा चौकस विद्यार्थ्याला त्या अभिमानास्पद इतिहासाची जाण खचित करून देईल. इतकेच नव्हे तर जे या मंथनात पुढाकाराने वावरले, त्यांच्या या प्रश्नासंबंधीच्या भावना काय होत्या, ते निरनिराळ्या प्रसंगातून कसे वागले, वावरले, अडचणींना तोंड देताना नि तड गाठताना त्यांनी काय योजना केल्या, महाराष्ट्र राज्य झाले तर त्यात काय काय घडावे अशी त्यांची व त्यांना साथ देणाऱ्या जनतेची अपेक्षा होती - तात्पर्य एकभाषी राज्य रचनेविषयी मूलभूत विचारसरणी काय होती नि अपेक्षा काय होत्या, याची माहिती हा ग्रंथ त्या विद्यार्थ्याला साक्षेपाने करून देईल. आणि त्यावरूनच तुलनेने मूळ कल्पना व प्राप्तव्य यांचा ताळमेळ त्याचा त्याला घालता येईल, अशी मला सबल आशा आहे. तीच माझी या उद्योगातली प्रेरणा आहे.” (पृष्ठ ५५६)

लेखकाचे हे निवेदन ग्रंथाच्या निर्मिती संदर्भात पुरेसे भाष्य करणारे आहे. आज या  ग्रंथामुळे  महाराष्ट्र राज्य निर्मितीच्या इतिहासाचे एक अस्सल साधन दस्तऐवजाच्या रूपाने उपलब्ध आहे. हा ग्रंथ महाराष्ट्र राज्याच्या चळवळीचा दस्तऐवज आहे. विविध वृत्तपत्रांतील बातम्या, चळवळीतील निवेदने, पुस्तिका, भाषणे, ठराव, विधानसभा व लोकसभेच्या कामकाजाची इतिवृत्ते, संयुक्त महाराष्ट्र समितीची विविध कागदपत्रे, पत्रके, इतिवृत्ते या आणि अशा स्वरूपाच्या तत्कालीन सत्य पुराव्यांच्या आधारे; अगदी कित्येक ठिकाणी दिवसभराच्या घडामोडींच्या साधार नोंदी घेत हा इतिहास लिहिला गेला आहे. त्यामुळे पत्रे, निवेदने, आकडेवारी, तपशील अशी कितीतरी माहिती या ग्रंथात ठिकाणी सापडते. ही माहिती, हे दस्तऐवज, नोंदी ठेवण्याच्या पद्धती, मर्यादित स्वरूपात असणारी प्रसारमाध्यमे आणि त्या काळी प्रत्यक्ष माणूस हाच विचार - माहिती प्रसाराचे माध्यम  झाला होता.

..................................................................................................................................................................

उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअ‍ॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...

हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal

................................................................................................................................................................

या साऱ्या बाबी आजच्या काळात फक्त समजून घ्याव्या लागतात.साठ वर्षांपूर्वीची चळवळ आणि आज इलेक्ट्रॉनिक माध्यमे आणि मीडिया उपलब्ध असतानाची चळवळ यांतील फरक समजून घेण्यासाठीदेखील हा ग्रंथ उपयुक्त आहे. या लोकचळवळीमध्ये व्यक्ती आणि वृत्तपत्रे यांचा फार मोठा सहभाग होता. लोकचळवळ आणि माध्यमे यांचे सामर्थ्य केवढे मोठे असते, ते संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीने  सिद्ध केले. संघटित लोकशक्ती आणि माध्यमशक्ती एकत्र येऊन ऐतिहासिक असे विधायक कार्य कसे करू शकते त्याचा प्रत्यय हा ग्रंथ वाचताना येतो.

१ ऑक्टोबर १९३८ ते १ऑगस्ट १९६३ या प्रदीर्घ काळातील संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीची  सविस्तर दैनंदिनी म्हणजे हा ग्रंथ होय. या संपूर्ण काळातील संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील विविध व्यक्ती, त्यांची विचारसरणी, त्यांचे कार्य, वेगवेगळी वृत्तपत्रे, त्यांच्या भूमिका या सार्‍या सामाजिक पर्यावरणाची माहिती या ग्रंथातून मिळते.

संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर श्रेय लाटण्याची स्पर्धा सुरू झाली. या श्रेय लाटण्याच्या स्पर्धेबाबत आचार्य अत्रे यांचे भाष्य य. दि. फडके यांनी ‘दृष्टादृष्ट’ या पुस्तकात दिले आहे. आचार्य अत्रे म्हणत, “महाराष्ट्र राज्य झाल्यापासून जो उठतो, तो मंगलकलश मीच आणला म्हणून ठणाणा करतो. चोर आहेत एक जात. मी सांगतो तुम्हाला, मंगलकलश लोकांनी आणला. जनतेने या सगळ्या पुढाऱ्यांना आपल्याबरोबर फरफटत नेलं. लोकमताचा हा दट्ट्या नसता तर ही पुढारी मंडळी केव्हा पांगली असती. संयुक्त महाराष्ट्राचा हा जगन्नाथाचा रथ खरा लोकांनी ओढला.” (पृष्ठ २२)

संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन खऱ्या अर्थाने जनआंदोलन होते. या जनआंदोलनातील अनेक व्यक्ती, लोकनेते, लेखक, शाहीर, विचारवंत अशा अनेक व्यक्तींची माहिती ‘महाराष्ट्राचे महामंथन’ या ग्रंथातून मिळते. संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन हे कोण्या एका राजकीय पक्षाचे अथवा कोण्या एका राजकीय पक्षाच्या पुढाऱ्याचे अथवा कोणत्या एका विशिष्ट विचारसरणीच्या लोकांचे नव्हते, तर ते महाराष्ट्रातल्या तमाम जनतेचे होते आणि जातीधर्मनिरपेक्ष पातळीवर महाराष्ट्राच्या जनतेच्या एकजुटीतून हा लढा लढल्या गेला.

या राज्याच्या निर्मितीसाठी जात, धर्म, पंथ, भेदभाव विसरून सर्व स्तरातील एकजुटीचे दर्शन घडले. हे सत्य हा ग्रंथ वाचताना स्वच्छपणे कळते. लेखकाच्या निःपक्षपाती दृष्टीचा प्रत्यय येतो. आता सुमारे सहा दशकांनंतरही या ग्रंथाचे संदर्भमूल्य कायम आहे. उलट समकालीन वास्तवाच्या पार्श्वभूमीवर ते अधिकच वाढले आहे.

या ग्रंथाच्या पहिल्या आवृत्तीला महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार यांची प्रस्तावना आहे, तर दुसर्‍या आवृत्तीला ज्येष्ठ विचारवंत प्रा.  एन. डी. पाटील यांची प्रस्तावना आहे. या दोन्ही प्रस्तावनांतील भाष्ये कालसुसंगत आहेत. पोतदार यांनी १९६५मध्ये प्रस्तावना लिहिली आहे. ते लिहितात, “अनेक घटनांच्या वर्णनांनी लालजी यांचे हे महामंथन ठासून भरले आहे. प्रत्येक महाराष्ट्रप्रेमी माणसाने हे लालजी प्रणित महामंथन अवश्य वाचावे. महाराष्ट्राला अभिमान वाटावा असे हे महाराष्ट्राच्या इतिहासाचे पर्व आहे. हे मंथन वाचणाऱ्याच्या हाती महाराष्ट्राची खरी नस लागेल. एवढा लढा करून मिळविलेली महनीय ‘वस्तू’ कशी राखावी आणि वाढवावी याची तळमळ लालजींनी आपल्या उपसंहारात व्यक्त केली आहे.” (पृष्ठ २६)

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

महाराष्ट्राचे हे राज्य महाराष्ट्रातील असंख्य माणसांनी उभारलेल्या निःपक्षपाती चळवळीतून निर्माण झाले आहे. हे राज्य टिकवावे आणि वाढावे ही तळमळ लालजी पेंडसे यांच्याप्रमाणेच दत्तो वामन पोतदार यांनीदेखील व्यक्त केली आहे. त्यानंतर २०१०मध्ये प्रा. एन. डी. पाटील यांनी संयुक्त महाराष्ट्राचा इतिहास हा जसा मराठी जनतेच्या बलिदानाचा आणि स्वाभिमानाचा आहे, तसाच राज्यकर्त्यांच्या लोकशाहीविरोधी, हुकूमशाहीप्रधान आणि विश्वासघातकी धोरणांचाही इतिहास कसा आहे, त्याचा साधार परामर्श घेत महाराष्ट्रापुढील आव्हानांचा सोदाहरण वेध घेतला आहे. मराठी जनतेने पाहिलेल्या संयुक्त महाराष्ट्राच्या स्वप्नांचा कसा चक्काचूर झाला त्याची साधार चिकित्सा प्रा. एन.डी.पाटील यांनी आपल्या प्रस्तावनेतून केली आहे. सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त या राज्यासमोर असणाऱ्या अनेक समस्यांची प्रा. पाटील यांनी केली आहे. ही प्रस्तावना अनेक दृष्टींनी महत्त्वाची, संदर्भमूल्य असलेली आणि अनेक अलक्षित ऐतिहासिक बाबी प्रकाशात आणणारी आहे.

या ग्रंथांची दुसरी आवृत्ती प्रकाशित करण्यामागचा हेतू कथन करताना प्रकाशक लिहितात, “१९६५ साली प्रकाशित झालेल्या या ग्रंथाची दुसरी आवृत्ती आता प्रकाशित करण्यामागचा हेतू महाराष्ट्राच्या गौरवशाली लढ्याचे स्मरणरंजन करणे असा मुळीच नाही. स्मरणरंजनात रमणे महाराष्ट्राला आता परवडणारही नाही. अजूनही काही मराठी भाषक प्रदेश महाराष्ट्र बाहेर आहेत. महाराष्ट्राच्या आचार - विचारांतून पुरोगामित्व हे वैशिष्ट्य नाहीसे होत चालले आहे. आर्थिक आणि सामाजिक विकासाला खीळ बसली आहे. परप्रांतीयांविषयी विद्वेष पसरतो आहे. सर्वसामान्य बहुजन समाजाच्या हातून मुंबई महानगर निसटत चालले आहे… या प्रश्‍नांना सामोरा जाताना आजचा महाराष्ट्रीय समाज चाचपडतो आहे, गोंधळलेला दिसतो आहे, याच्या अनेक कारणांपैकी एक महत्त्वाचे कारण म्हणजे संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती कोणत्या परिस्थितीत व कोणत्या उद्देशाने झाली होती, महाराष्ट्रासाठी आपल्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांनी भावी महाराष्ट्राविषयीचे नेमके कोणते स्वप्न पाहिले होते, याचा विसर आजच्या महाराष्ट्राला पडला आहे. या ‘स्मृतिभ्रंशा’तून महाराष्ट्राने जागे व्हावे, आपल्या इतिहासाचे त्याला भान यावे, म्हणजे तो भविष्यासाठी योग्य मार्ग निश्चित करू शकेल, या अपेक्षेने आम्ही हा ग्रंथ प्रकाशित करत आहोत.” (पृष्ठ पाच)

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

खरे तर आजच्या महाराष्ट्राचे प्रश्न समजून घ्यायचे असतील तर संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा हा इतिहास बऱ्याच गोष्टींसाठी दिशादर्शक ठरू शकेल. शेतकऱ्यांच्या न सुटणाऱ्या प्रश्नांपासून स्त्रियांच्या सुरक्षेच्या समस्येपर्यंत, प्रादेशिक वादांपासून भाषांच्या वादांपर्यंत आणि सीमाप्रश्नापासून नद्यांच्या पाण्याच्या वादांपर्यंत अनेक वाद-समस्या महाराष्ट्रासमोर आहेत. साठ वर्षांच्या महाराष्‍ट्राच्या देदीप्यमान यशाचे गौरवगाणे गाताना शेतकऱ्याच्या अश्रूंचा विसर पडू देता येणार नाही, तसेच महाराष्ट्रासमोरील अनेक समस्यांकडे कानाडोळा करता येणार नाही.

आता हीरकमहोत्सवोत्तर महाराष्ट्राचे गुणगान करताना १०५ हुतात्म्यांच्या स्वप्नांना न्याय देण्याचाही प्रयत्न करावा लागणार आहे आणि शोषित-पीडित-वंचितांना विकासाच्या प्रवाहातील सन्मानाचे जगणे मिळवून द्यावे लागणार आहे. या साऱ्या प्रयत्नांची सुरुवात करताना ‘महाराष्ट्राचे महामंथन’ हा ग्रंथ दिशादर्शक ठरणार आहे. नव्या अभ्यासकांनी, ग्रंथालयांनी  जतन करून ठेवावा असा हा ग्रंथ आहे.

.................................................................................................................................................................

लेखक डॉ.अजय देशपांडे समीक्षक असून ‘सर्वधारा’ या नियतकालिकाचे कार्यकारी संपादक आहेत.

deshpandeajay15@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ज्या तालिबानला हटवण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानात शिरकाव केला होता, अखेर त्यांच्याच हाती सत्ता सोपवून अमेरिकेला चालते व्हावे लागले…

अफगाण लोक पुराणमतवादी असले, तरी ते स्वातंत्र्याचे कट्टर भोक्ते आहेत. त्यांनी परकीयांची सत्ता कधीच सरळपणे मान्य केलेली नाही. जगज्जेत्या, सिकंदरालाही (अलेक्झांडर), अफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळवता आला नाही. तेथील पारंपरिक ‘जिरगा’ नावाच्या व्यवस्थेला त्याने जिथे विश्वासात घेतले, तिथेच सिकंदर शासन करू शकला. एकोणिसाव्या शतकात, संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेला अफगाणिस्तानात नामुष्की सहन करावी लागली.......

‘धर्म, जात, देश, राष्ट्र’ या शब्दांचा गोंधळ जनमानसात रुजवून संघ देश, सत्ता आणि समाजजीवन यांच्या कसा केंद्रस्थानी आला, त्याच्याविषयीचे हे पुस्तक आहे

या पुस्तकाच्या निमित्ताने संघाची आणि आपली शक्तिस्थाने आणि मर्मस्थाने नीटपणे अभ्यासून, समजावून घेण्याचा प्रयत्न परिवर्तनवादी चळवळीत सुरू व्हावा ही इच्छा आहे. संघ आज अगदी ठामपणे या देशात केंद्रस्थानी सत्तेत आहे आणि केवळ केंद्रीय सत्ता नव्हे, तर समाजजीवनाच्या आणि सत्तेच्या प्रत्येक क्षेत्रात संघ आज केंद्रस्थानी उभा आहे. आपल्या असंख्य पारंब्या जमिनीत खोलवर घट्ट रोवून एखादा विशाल वटवृक्ष दिमाखात उभा असतो, तसा आज.......

‘रशिया : युरेशियन भूमी आणि संस्कृती’ : सांस्कृतिक अंगानं रशियाची प्राथमिक माहिती देणारं पुस्तक असं या लेखनाचं स्वरूप आहे. त्यामध्ये विश्लेषणावर फारसा भर नाही

आजपर्यंत मला रशिया, रशियन लोक, त्यांचं दैनंदिन जीवन आणि मनोधारणा याबाबत जे काही समजलं, ते या पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावं, असा एक उद्देश आहे. पण त्यापलीकडे जाऊन हे पुस्तक रशिया समजून घेण्यात रस असलेल्या कोणाही मराठी वाचकास उपयुक्त व्हावा, अशीही इच्छा होती. यामध्ये रशियाचा संक्षिप्त इतिहास, वैशिष्ट्यं, समाजजीवन, धर्म, साहित्य व कला आणि पर्यटनस्थळे यांचा वेध घेतला आहे.......

‘हा देश आमचा आहे’ : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केलेल्या आणि प्रजासत्ताकाच्या अमृतमहोत्सवाच्या उंबरठ्यावर उभ्या भारतीय मतदारांनी धर्मग्रस्ततेचे राजकारण करणाऱ्या पक्षाला दिलेला संदेश

लोकसभेची अठरावी निवडणूक तिचे औचित्य, तसेच निकालामुळे बहुचर्चित ठरली. ती ऐतिहासिकदेखील आहे. तेव्हा तिच्या या पुस्तकात मांडलेल्या तपशिलांना यापुढच्या विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकांच्या वेळी वेगळे संदर्भमूल्य असेल. या निवडणुकीचा प्रवास, त्या प्रवासातील वळणे, निर्णायक ठरलेले किंवा जनतेने नाकरलेले मुद्दे व इतर मांडणी राजकीय वर्तुळातील नेते व कार्यकर्ते यांना साहाय्यभूत ठरेल, अशी आशा आहे.......

‘भिंतीआडचा चीन’ : श्रीराम कुंटे यांचं हे पुस्तक माहितीपूर्ण तर आहेच, पण त्यांनी इ. स. पूर्व काळापासून आजपर्यंतचा चीन या प्रवासावर उत्तम प्रकारे प्रकाशही टाकला आहे

‘भिंतीआडचा चीन’ हे श्रीराम कुंटे यांचे पुस्तक चीनविषयी मराठीत लिहिल्या गेलेल्या आजवरच्या पुस्तकात आशयपूर्ण आणि अनेक अर्थाने परिपूर्ण मानता येईल. चीनचे नाव घेताच सर्वसाधारण भारतीयाच्या मनात एक कटुता, शत्रुभाव आणि त्या देशाच्या ऐकीव प्रगतीविषयी असूया आहे. या सर्व भावना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आपल्या विचारांची दिशा ठरवतात. अशा प्रतिमा ठोकळ असतात. त्यांना वस्तुस्थितीच्या छटा असल्या तरी त्या वस्तुनिष्ठ नसतात.......

शेतकऱ्यांपासून धोरणकर्त्यांपर्यंत आणि सामान्य शेतकऱ्यांपासून अभ्यासकांपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा ‘ज्वारी’कडे वळवण्यासाठी...

शेती हा बहुआयामी विषय आहे. त्यातील एका विषयांवर विविधांगी अभ्यास करता आला आणि पुस्तकरूपाने वाचकांसमोर मांडता आला, याचं समाधान वाटतं. या पुस्तकात ज्वारीचे विविध पदर उलगडून दाखवले आहेत. त्यापुढील अभ्यासाची दिशा दर्शवणाऱ्या नोंदी करून ठेवल्या आहेत. त्यानुसार सुचवलेल्या विषयांवर संशोधन करता येईल. ज्वारीला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणकर्त्यांनी धोरणात्मक दिशेने पाऊल टाकलं, तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.......