मनोवेधक प्रतिमा आणि प्रतीकसृष्टीसह आगळा रंग, गंध आणि रूप लेवून समोर येणारे बंगाली साहित्य आणि या बंगाली साहित्याला समृद्धी देणाऱ्या कथांचा हा मनोहारी कोलाज. अर्थात बंगाली भाषेतील सद्यकालीन वेधक कथा- ‘बंगरंग’. यातील प्रत्येक कथेचा रंग वेगळा, ढंग अनोखा... हा अनुवादित कथासंग्रह नुकताच उन्मेष प्रकाशनातर्फे प्रकाशित झाला आहे. या संग्रहाला ज्येष्ठ पत्रकार शेखर देशमुख यांनी लिहिलेली ही प्रस्तावना…
..................................................................................................................................................................
कथेने नेमके काय करावे? वा काय सुचवावे?
प्रस्तावनेच्या प्रारंभाला आलेले हे प्रश्न थोडे विचित्र भासू शकतात. कारण, एकच-एक निश्चित स्वरूपाचे विहित कर्तव्य घेऊन कोणतीही कथा जन्माला येत नाही, हे तर निर्विवाद. भौगोलिकता, भवताल, बोली, त्या भौगोलिकतेत आकार घेणारे माणूस आणि निसर्गातले परस्परव्यवहार, सांस्कृतिक-सामाजिक ताण-तणाव, रूढी-परंपरांची पकड, बंडाची उर्मी, टोकाची हतबलग्रस्तता, कल्लोळ-कलह-आक्रोश आणि प्रसंगी निःशब्दता यातून कथा आकार घेत जाते. त्यामुळे कथेने काय करावे, यापेक्षा कथेने काय सांगावे? काय सुचवावे आणि आपल्याकडच्या म्हणजे, भारतीय परिप्रेक्ष्यातल्या कथेने काय सांगितले, काय सुचवले हा प्रश्न आणि त्या प्रश्नाच्या अनुषंगाने भारतीय परिघात नांदणाऱ्या भाषांनी कथेच्या अंगाने पौराणिक आणि ऐतिहासिकदृष्ट्या आजवर काय सांगितले नि कसे सांगितले, हे महत्त्वाचे मानले जाते आणि ते योग्यच आहे.
..................................................................................................................................................................
.................................................................................................................................................................
मुळात, पुराणकथा असोत वा ऐतिहासिक कहाण्या, या मुख्यतः राज्यकर्त्यांच्या, जेत्यांच्या आणि सामाजिक उतरंडीत शिरोभागी असलेल्यांच्या राहिल्या आहेत. त्यातही त्या नायककेंद्री, काही प्रमाणात नायिकाकेंद्रीदेखील राहिल्या आहेत. परिस्थितीशरण माणसाला कायमच नायक आणि खलनायकाचे उघड-सुप्त आकर्षण असल्याने ग्लोरिफिकेशन म्हणजेच उदात्तीकरण हा पुराण वा ऐतिहासिक कथांचा अनेक हेतूंपैकी एक मुख्य हेतू राहिला आहे.
कथाकथनात व्यक्तींच्या बाह्य (दृश्य) गुणांवर भर दिला गेलेला आहे. म्हणजे, कथेतली व्यक्ती नायक असेल, तर तिच्यातली नायकपणाला उठाव देणारी गुणवैशिष्ट्ये वा खलनायक असेल तर खलनायकी वृत्ती-प्रवृत्तीचे दर्शन घडवणारी वर्णने कथानकात प्राधान्याने आलेली आहेत. हे एका पातळीवर एकरेषीय, एककल्लीसुद्धा राहिले आहे. यामुळेच अग्निपरीक्षा देताना सीतेच्या अंतर्मनात चाललेली खळबळ किंवा सीतेचा त्याग करताना रामाच्या मनात उभे राणारे द्वंद्व आणि त्यातून अधोरेखित होत जाणारे त्यांचे माणूसपण, आपल्याच भावंडांविरोधात, सग्यासोयऱ्यांविरोधात युद्धात उतरताना अर्जुनाच्या मनाच्या तळाशी सुरू असलेली चलबिचल, दक्षिणा म्हणून द्रोणाचार्यांना अंगठा दान करणाऱ्या एकलव्याची मनोवस्था किंवा भर मयसभेत वस्त्रहरण होत असताना द्रौपदीच्या मनात उसळणाऱ्या भावनांच्या लाटा याबद्दल पुराणात फारसे तपशील सापडत नाहीत. सापडले तरीही कथेच्या अंगाने त्यात फारसा ऐवज हाती लागत नाही. कारण, माणसाच्या अबोध मनाची दोलायमान अवस्था टिपण्यापेक्षा त्याच्यातल्या वा तिच्यातल्या धर्मव्यवस्थेला अपेक्षित आदर्शवादी वर्तणुकीवर भर हा कोणत्याही धर्मांतल्या पुराण वा ऐतिहासिक कथांचा उद्देश राहिला आहे. तीच त्या आकृतीबंधाची मर्यादाही आहे. त्या मर्यादा ओलांडून माणूसपणाचा शोध घेण्याच्या प्रयत्नांत मानवी मनाचा तळ गाठणे वा अंधाऱ्या कोपऱ्यांवर प्रकाश टाकणे म्हणजे, धर्म आणि समाज व्यवस्थेला नको असलेल्या माणसाच्या स्खलनशील वृत्तीला प्रोत्साहन देणेही ठरू शकते.
हेच काहीशा प्रमाणात ऐतिहासिक कथा-कहाण्यांतही घडताना दिसते. इतिहासाच्या परिघातले कथानक जेत्यांच्याभोवती घुटमळत असते. त्यांच्यातल्या बाह्यात्कारावर केंद्रीत असते. इतिहासपुरुषांचे श्रेष्ठत्व ठसवणे वा खलनायकी प्रवृत्तींचा पर्दाफाश करणे, एवढीच माफक उद्दिष्टे ऐतिहासिक कथनांमागेही बव्हंशी राहिली आहे. किंबहुना, त्यामुळे द्रौपदी-सीता, राम-कृष्ण-अर्जुन- कर्ण, ययाती आदी पुराणकालीन आणि तुघलक आदी ऐतिहासिक व्यक्तिरेखांच्या मनाचा ठाव घेणारी कथानके, त्यावर आधारलेल्या कादंबऱ्या, बहुभाषक नाटके सांगितिका या अगदी अलीकडच्या कलात्मक नोंदी आहेत, असे ढोबळ मानाने म्हणता येते. जे पुराणकालीन व्यक्तिरेखांचे तेच इतिहासपुरुषांचेही. या ऐतिहासिक व्यक्तिरेखांच्या अंतर्मनाचा कथा-कादंबऱ्यांतून ठाव घेण्याची रीत अगदी अलीकडच्या शतकांतील म्हणता येते.
परंतु, असे हे मानवी मनाचे कोपरे न् कोपरे शोधणे आले कुठून? कथा ही मानवी मनाचा तळ ढवळून काढू लागली कधीपासून? आधुनिकतेच्या संदर्भाने विचार करायचा झाल्यास, तर याचे एक मूळ आपल्याला १४व्या ते १७व्या शतकापर्यंत उमरावशाहीला शह देत झालेल्या युरोपीय पुनरुत्थानाच्या (Renaissance) प्रक्रियेत सापडते. या काळात जगण्यातल्या सर्वच क्षेत्रांची मोडतोड होत नव्याने पुनर्मांडणी झाली, सृजनाचे व्यक्तिकेंद्रीत आविष्कार दृग्गोचर होऊ लागले. समूहाइतकेच किंबहुना त्याहून अधिक व्यक्तीचे मनोव्यापार महत्त्वाचे ठरू लागले. तोवरचे जिणे समूहाने, समूहासाठीचे होते. त्यातही अमीर-उमराव, राजे-महाराजे आदींच्या गुणमहात्म्यावर भर देणारे होते, परंतु पुनरुत्थानाच्या प्रक्रियेने गोष्टीला, कहाणीला, कथनाला वैयक्तिकता दिली. समष्टीइतकेच व्यक्तीचे जगणे आणि मरणे, या दोन अवस्थांमधल्या क्षणांना महत्त्व आले. त्यातूनच माणूस नावाचा अनाकलनीय प्राणी अंशाअंशाने उलगडू लागला.
पुनरुत्थानाच्या राजमार्गावर चित्र-नाट्य-संगीत-शिल्पादी कला, तत्त्वज्ञान, विज्ञान, मनोविज्ञान जसजसे उत्क्रांत नि प्रगत होत गेले, कथा माणसाच्या मनाचा अधिक खोलात जाऊन शोध घेऊ लागली. पुनरुत्थानानंतरच्या काळाचे अपत्य मानल्या गेलेल्या भांडवलशाहीच्या पुढाकारातून घडून आणलेल्या औद्योगिक क्रांतीने वैयक्तिकतेला (Individuality) जगण्याच्या केंद्रस्थानी आणले. वैयक्तिकता केंद्रस्थानी येणे म्हणजे, पुन्हा व्यक्तीच्याच मनात डोकावणे आले, त्यात अव्याहत सुरू असलेले द्वंद्व टिपणे आले.
तोवर एतद्देशीय अभिव्यक्ती मुख्यतः समूहकेंद्री होती. विशेषतः कलेच्या संदर्भाने विचार करायचा झाल्यास व्यक्ती नव्हे समूह महत्त्वाचा होता. म्हणजे, खजुराहो मंदिरांवरच्या शृंगारशिल्पांचा किंवा मुगलकालीन ताजमहालादी वास्तूंचा कोणी एकच एक ज्ञात शिल्पकार-रचनाकार नव्हता. व्यक्तीपेक्षा समूहाचे मन केंद्रस्थानी होते. चित्र-शिल्प-नृत्यादी कला समूहातच बहरत-फुलत होत्या. परंतु आधुनिकतेचा, वैयक्तिकतेचा संस्कार घेऊन आलेल्या इंग्रजांनी सार्वजनिक कला वैयक्तिक पातळीवर आणल्या. त्या सरशी सार्वजनिक ठिकाणी फुलणारी चित्र-शिल्प कला स्टुडिओत येऊन विसावली. व्यक्ती केंद्रस्थानी आली, तसे व्यक्तीच्या मनाचा वेध घेणे अपरिहार्य होत गेले. म्हणजे, इतिहासलेखनाने जसे एका टप्प्यावर ‘सबआल्टर्न’ वळण घेत तळाच्या समाजसमूहांना केंद्रस्थानी आणले, तसेच कथेच्या अंगाने साहित्यातही बाह्यरूपाला भेदून परिस्थितीशी दोन हात करणाऱ्या माणसाचा अंत्यस्थ वेध घेण्याची प्रेरणा रुजत गेली.
..................................................................................................................................................................
उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...
हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal
................................................................................................................................................................
बंगालनंतर जवळपास अर्धशतकानंतर महाराष्ट्रात समाज-राजकारण, साहित्य, कला आदी क्षेत्रांत नव्या विचारांचे, नव्या आचारांचे वारे शिरले. वस्तुतः बंगालच्या पुनरुत्थानाच्या कितीतरी आधी महाराष्ट्रात संतांच्या कृपेने अध्यात्माच्या पातळीवर पुनरुत्थान घडून आले होते. ज्ञानेश्वर-तुकारामांनी मानवी सुख-दुःखाचे गर्भितार्थ मांडले होते. त्यातही तुकारामांनी मानवी वृत्ती-प्रवृत्तींवर बेधडक कोरडे ओढत माणसाचे बऱ्यापैकी नागडे रूप पुढे आणले होते. पण तरीही इतरांच्या कथनांतून उच्चजातीय त्रैवर्णियांपासून शूद्रातिशूद्रांपर्यंतच्या मनात वैयक्तिक-कौटुंबिक-सार्वजनिक पातळीवर चाललेय तरीही काय, याचा गोष्टींच्या अंगाने नीटसा बोध होत नव्हता.
एकूणच, असे म्हणता येते की, पुनरुत्थानातून साधलेला जीवनोत्कर्ष, हे त्या काळाचे वैशिष्ट्य ठरले होते. याच वैशिष्ट्यांसह ब्रिटिश भारतावर राज्य करण्यास आले होते. अर्थातच, त्या-त्या काळाचे म्हणून काही जुळून आलेले योग असतात, फसलेल्या जागाही असतात. त्याचप्रमाणे भारताच्याही संदर्भाने घडले होते. ईस्ट इंडिया कंपनीमार्फत व्यापाराच्या बहाण्याने भारतात सुरत आदी ठिकाणी वसाहत स्थापन केलेल्या ब्रिटिशांनी कलकत्ता हे राजधानीचे शहर बनवून रितसर राज्यकारभार सुरू केला होता. ब्रिटिशांसोबत आलेले प्रगत ज्ञान, प्रगत विज्ञान आणि प्रगत आचार-विचारांचा प्रभाव पडून आधुनिक काळातले भारतातले पहिले पुनरुत्थान कलकत्ता आणि परिसरात म्हणजे, बंगाली भवतालात घडून आले होते. हे पुनरुत्थान जसे सामाजिक-राजकीय होते, तसेच कला-साहित्य क्षेत्रातही घडत गेले होते. कालौघात बंगाली समाजकारण, साहित्य-कला समृद्ध होत गेले. त्याची पाळेमुळे ही त्या काळात रुजलेली आहेत. पुढे जाऊन जागतिक पातळीवर श्रेष्ठ साहित्याची पहिली मोहोर रवींद्रनाथ टागोरांच्या रूपाने बंगाली भाषेतून उमटली. जागतिक दर्जाचा सिनेमा सत्यजित रे यांच्या रूपाने बंगालमधूनच पुढे आला. एडवर्ड लिअरच्या प्रभावातून सुकुमार रे, उपेंद्रकिशोर रे, दक्षिणरंजन मित्रा-मुजुमदार यांसारखे बालसाहित्यिक बंगाली भाषेतूनच कथेला समृद्धी देत राहिले. रवींद्रनाथ टागोर, बंकिमचंद्र चट्टोपाध्याय आणि शरतचंद्र चट्टोपाध्याय या तीन खळाळत्या प्रवाहांनी बंगाली साहित्यप्रांत सुपीक केला. हा केवळ योगायोग नव्हता. ही बंगालच्या इतिहासक्रमात टप्प्याटप्प्याने घडत गेलेली साहित्यसृजनाच्या पातळीवरची जैविक प्रक्रिया होती.
थोडक्यात, जसे बंगाली साहित्यविश्व समृद्ध होत गेले, कथा, कविता, निबंध, समीक्षा या प्रकारांत स्वाभाविकपणे प्रतिबिंब उमटत गेले. याच्याच खाणाखुणा आपल्याला गेल्या शतकभराच्या बंगाली साहित्यात जागोजागी दिसतात. लेखन आणि वाचन संस्कृतीला येत गेलेल्या संपन्नतेमुळेच बंगाली साहित्य प्रसंगी इतर भाषांच्या तुलनेत कैक योजने पुढे गेल्याचेही जाणवते. ही संपन्नता कुठून आली आहे, समाजात लेखन-वाचन ऊर्मी कशी रुजत गेली आहे किंवा पुनरुत्थानाच्या प्रभावातून सामाजिक स्तरावरचे शिष्टाचार (etiquette) व्यक्तीच्या पातळीवर बंगालच्या अंगी कसे मुरत गेले आहेत, याचा एक मासला, प्रस्तुत कथासंग्रहाच्या अनुवादिकेने ‘संवादसेतू’ (२०२१) दिवाळी अंकासाठी बंगाली लेखिका बाणी बसू यांच्या घेतलेल्या मुलाखतीत आलेला आहे. यात लेखिका बसू म्हणतात की, त्यांनी तीन भावंडांनी मिळून घरच्या घरी एक मासिक चालवले होते. त्या घरगुती मासिकासाठी त्या नेमाने लेखनही करत आणि चित्रेही काढत.
या एकाच उदाहरणावरून बंगालमधला साहित्य व्यवहार लेखक-वाचक अशा दोन्ही पातळ्यांवर इतर भाषिक व्यवहारापेक्षा अधिक वजनदार का होत गेला, हे स्पष्ट होते. यात बंगाली कथा शैली, भाषा, आकृतीबंध आणि सौंदर्यशास्त्र अशा चहुअंगांनी बहरत गेल्याचे जाणवते. माणूस आणि निसर्गाच्या मनाचा तळ गाठून अप्रकाशित राहिलेले कोपरे या कथेने उजळवल्याचे दिसते. वैद्यकीय परिभाषेत बोलायचे झाल्यास, बंगाली कथा या मानवी मनाचा ‘एक्स-रे’ नव्हे, तर ‘एण्डोस्कोपिक व्ह्यू’देखील घेत आल्या आहेत. हीच पिढीजात संपन्नता सुमती जोशी अनुवादित प्रस्तुत कथांमध्ये ठसठशीतपणे प्रतिबिंबित झालेली आहे, हे इथे आवर्जून नमूद करणे आवश्यक आहे.
स्त्री-पुरुष, गरीब-गर्भश्रीमंत, सज्जन-दुर्जन, अशक्त-सशक्त असे भेद पाळून अभिव्यक्त होणे हे अस्सल साहित्याचे कामच नाही. साहित्याचा उद्देश स्त्रियांमध्ये दडलेला पुरुष आणि पुरुषामधल्या स्त्रीसुलभ भावनांना शब्द देण्याचा आहे, गरिबांमधल्या मनाच्या गर्भश्रीमंतीचे आणि गर्भश्रीमंतांमधल्या दरिद्री मनांचे दर्शन घडवण्याचा आहे, सज्जनांमधला दुर्जन आणि दुर्जनांमधला सहजी नजरेस न पडणारा सत्शीलपणा पुढे आणण्याचा आहे, अशक्तांमधला सशक्त आणि सशक्तांमधला अशक्तपणा जगापुढे उघड करण्याचा आहे. साहित्याचा हा पूर्वग्रहविरहित मूलभूत उद्देश डोक्यात ठेवून प्रस्तुत कथासंग्रहातल्या कथा वाचायला घेतल्यास वाचकांपुढ्यात नजरेपलीकडचे जग खुले होत जाईल, अशी साक्ष इथे मला आवर्जून नोंदवायची आहे.
..................................................................................................................................................................
अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5312/Checkmate
..................................................................................................................................................................
कोणी कितीही नाकारले तरीही, चांगुलपणा, सभ्यता, सज्जनपणा याचेही एक अदृश्य वजन माणसावर असते, ते अनेकांना पेलवतेच असे नाही. अनेक प्रसंगात ते वजन असह्य झाल्यामुळे माणसातल्या विकार-वासना उफाळून येतात. रोजच्या जगण्यातूनच, छोट्या-मोठ्या घटना-प्रसंगांतून ते सारे कधी ना कधी उसळी मारून वर येते. हाडाच्या कथाकारांना सामान्यांच्या नजरेस न येणाऱ्या अशा अडनिड्या जागा नेहमीच आकर्षून घेतात. अशा नेमक्या जागा हुडकून त्या-त्या जागी आकारास आलेले ताणे-बाणे शब्दांतून मांडणे हे कथाकाराचे खरे कसब-कौशल्य मानले जाते. त्या अर्थाने, अनुवादिकेने निवड केलेल्या कथाकारांच्या अंगी ते पुरेपूर आहे, याची ग्वाही प्रस्तुत संग्रहातील कथा देत आहेत, यात माझ्या मनात शंका नाहीत.
सुचित्रा भट्टाचार्य यांची ‘टाइमझोन’ ही यांत्रिक जगण्यातून आलेली भावनांची शुष्कता, थंडाळ अलिप्तता आणि ही अलिप्तता शालीसारखी अंगाभोवती गुंडाळलेल्या उच्चशिक्षित, उच्चकुलीन माणसांची कथा आहे. या कथेतले कुटुंब सुसंपन्न असले तरीही, आरशाच्या फुटलेल्या काचांगत इतस्ततः विखुरलेले आहे. म्हणजे आई-बाप ऑस्ट्रेलियामध्ये, मुलगा अमेरिकेत आणि आईकडचे वयोवृद्ध आई-वडील कोलकात्याला असा हा तीन दिशांचा, तीन काळांचा अमेळ आहे. हाताशी नोकर-चाकर, सुखसोयीची साधने असल्याने सगळ्यांमध्ये संवाद आहे, पण त्यात वेळेचे दडपण आहे. प्राधान्यक्रमातून निर्माण झालेले ताण आहेत. सगळी नाती, सगळे जगणे कृत्रिम झाले आहे, असे वाटत असताना ही कथा यंत्रवत झालेल्या नायिकेच्या मनातल्या ओलाव्याचे दर्शन घडवणारी आहे. अशीच आभासी जगात प्रेमाचा शोध घेऊ पाहणाऱ्या पात्रांची ‘व्हर्च्युअल रिअॅलिटी’ ही नंदिनी नाग यांची कथा आहे. या कथेत दोन टोकावर वावरणाऱ्या, पण एकमेकांच्या आकंठ प्रेमात असलेल्या विवाहांतर्गत जोडप्याची तगमग, त्रागा अस्वस्थ करणारा आहे. याच कथेत तत्त्वज्ञानाच्या अंगाने चिकित्सा करता यावा, असा प्रश्नही येतो आणि ‘प्रेम करू लागल्या की स्त्रिया नदीसारख्या होतात’, असे स्त्रीस्वभावातले सौंदर्य उलगडणारे नितांत मनस्पर्शी वाक्यही येते.
सारस्वत चक्रवर्ती यांची ‘स्पोर्ट्समन’ ही कथा नियतीने टाकलेला पेच सोडवताना वरवरच्या खिलाडूवृत्तीआड माणसाच्या मनात दडून राहिलेल्या अपराधगंडाचा-अहंगंडाचा उद्रेक आणि त्यागभावनेने ओथंबलेला थोरपणा पुढे आणते. नंदिता बागची यांच्या ‘शून्याकडून परत’ या कथेत परिस्थितीवर तोंडाला रंग फासून अभिनय करणारी आई आणि तिची मृत्युला कवटाळणारी बेदखल मुलगी आपल्याला भेटते. या मुलीला आईच्या प्रेमाने जवळ घेणारी शेजारीण भेटते. रक्ताच्या नात्यापलीकडे सापडलेल्या वात्सल्यप्रेमाची गोष्ट सांगणारी ही कथा, ‘हजारो वर्षांपासून या ग्रहाच्या छाताड्यावर माणसाचं आगमन होतं आणि निर्गमनही. माणूस या पृथ्वीतलावर येतो, त्याच्या संसारात, संपर्कात त्याने निर्माण केलेल्या स्वतःच्या जगात अकडतो मायेने जखडला जातो. महाकाश मात्र मोहमुक्त आणि निस्पृह असतं.’ या एक-दोन वाक्यांतून वैश्विक सत्याचा पुकारा करते. सुस्मिता नाथ यांची ‘मायाकानन’ ही कथा रूढी-परंपरांचा गुलाम बनलेल्या समाजात कुटुंबाच्या पातळीवर नात्यांमध्ये होणाऱ्या अन्यायाचे टोकदार चित्रण करते. यात नवऱ्यापासून दूर होऊन माहेरी परतलेल्या पोटच्या मुलीला आणि नातवाला खुद्द तिचे आई-वडील-भाऊ-भावजय परकेपणाची-दुराव्याची वागणूक देताना दिसतात. या अपमानित जगण्यातून सुटका करवून घेण्यासाठी ही टाकलेली मुलगी पुन्हा एकदा आपल्या स्खलनशील स्वभावाच्या बेभवरशी नवऱ्याकडे परतते. यातून जगण्यातली आगतिकता विलक्षण टोकदार होऊन बोचत राहते.
शाश्वती नंदी यांच्या ‘पुन्हा प्रकाश’ या कथेत वात्सल्याची आस, मातृत्वाची ओढ आणि नायिकेच्या यांत्रिक जगण्यातले भेसूर यश यातून निर्माण होणारा ताण वाचकांपर्यंत पोहोचताना दिसतो. ही कथा भूतकाळाचे ओझे घेऊन जगणाऱ्या माणसांची आगतिकता समोर आणते. अभिषेक सेनगुप्त यांची ‘तोच चेहरा’ ही असीम शून्यता अंगावर आणणारी कथा आहे. ही कथा निःशब्दतेचे नाना अर्थ सोबत घेऊन येते. कथेचा नायक अनाथ, परंतु जगभर ख्याती मिळवू पाहणारा निष्णात फोटोग्राफर आहे. अथांगतेचा त्याला ध्यास आहे. जागतिक पातळीवरचा सन्मान मिळवण्यासाठी त्याला जगण्यातल्या एका आर्त क्षणाची तेवढी प्रतीक्षा आहे. तो क्षण त्याचा वाट्याला येतो. म्हणजे, त्याच्या कॅमेरात कैद होतो. रस्त्यावरच्या बेघर-बेदखल पण डोळ्यांत आर्तता साठलेल्या जर्जर म्हातारीची छबी तो टिपतो. त्याला परदेशी सन्मानाची संधी चालून येते. या टप्प्यावर त्याच्या सोबतीला जशी त्याच्यावर जीव ओवाळून टाकणारी नायिका असते, तसेच अनाथालयात घालवलेला भूतकाळ आणि त्या भूतकाळातली जीव लावलेली माणसेही असतात. त्यात साथ देत आलेली उच्चकुलीन नायिका परदेशी सन्मान स्वीकारताना सोबत असावी, अशी भावना जपणारा नायक एका क्षणी आपण एका वेश्येने टाकून दिलेला मुलगा आहोत, हे जळजळीत सत्य तिच्यापुढ्यात मांडतो, तेव्हा नायिकेच्या बाजूकडून येणारी प्रदीर्घ निःशब्दता नायकाबरोबरच वाचकाचेही काळीज चिरत जाते. अरुंधती मुखोपाध्याय यांची ‘द्वितीय रिपू’ ही कथा स्त्रियांमधल्या समलिंगी त्यातही जबरी संबंधांचा पट उलगडत ‘आहे रे’ आणि ‘नाही रे’ वर्गातल्या परिस्थितीत अडकलेल्या स्त्रियांच्या संघर्षाचे अस्वस्थ करणारे चित्र मांडते. यात विशेषाधिकारसंपन्न वर्गातल्या तुलनेने कमी गुणवान खेळाडू नायिकेचा उद्दामपणा दिसतो, तशी वंचित समाजातून आलेल्या गुणसंपन्न खेळाडू नायिकेची आगतिकताही अंगावर येते.
तमल बंदोपाध्याय यांच्या ‘आश्रय’ या कथेतून जन्मजात बुटकेपणामुळे न्यूनगंडात आयुष्य गेलेला, परंतु याच बुटकेपणामुळे उर्वरित जगाचे कुतूहल बनलेला आणि त्यातून श्रीमंतीचे स्वप्न रंगवणारा मणिराम तामांग वाचकांना भेटतो. त्याच्याबद्दल कणव मनात दाटून येत असताना, लेखक मणिरामच्या, स्त्री स्पर्शासाठी आसुसलेल्या मनाचेही दर्शन घडवतो. तेव्हा ही कथा बुटबैंगण मणिरामची न राहता प्रेमस्पर्शाविना तडफडणाऱ्या माणसाची कथा होऊन जाते.
‘करारपत्र’ या कथेत नलिनाक्ष भट्टाचार्य परंपरेच्या रेट्यातून आकारास आलेल्या वैवाहिक नात्यांतला फोलपणा दाखवताना समलिंगी संबंधांकडे पाहण्याच्या समाजाचा बदलता दृष्टीकोन पुढे आणताना दिसतात. या कथेत, कॉर्पोरेट विश्वात मोठा हुद्दा असलेल्या समलिंगी पुरुषाशी लग्न करणे भाग पडलेल्या स्ट्रगलर नटीची गोष्ट लेखकाने सांगितली आहे. इथे आपण लग्न केलेला नवरा समलिंगी आहे, समजल्यावर नायिका मनाने उध्वस्त होत नाही वा विवाहाशी निगडित रुढी-परंपरेच्या संस्कारातून सहसा लादले जाणारे वैफल्यही तिच्या वाट्याला येत नाही. नपेक्षा जेव्हा नवरा आपले सत्य तिच्यापुढ्यात मांडतो, तेव्हा त्याच्या विनंतीखातर प्रत्यक्ष आयुष्यात ही नायिका पत्नी असल्याचा अभिनय करण्यास राजी होते. तेव्हा तिच्या मनात नवऱ्याविषयी राग-संताप वा कणव नव्हे, तर त्याच्या समलिंगी असण्याबद्दल आदरच असल्याचे दिसते. तेव्हा, दोहोंमधल्या भावना आणि व्यवहारातला ताणापेक्षा त्यांच्यातल्या तात्पुरत्या का होईना,नात्यांतला एक आगळा अनुबंध समोर येताना दिसतो. त्यावर बदलत्या काळाची पावले उमटलेली दिसतात.
शीर्ष बंदोपाध्याय यांची ‘टोळधाड’ शीर्षकाची कथा कोरोनापश्चात घरांकडे अनवाणी परतू पाहणाऱ्या उदध्वस्त माणसांच्या मनोविश्वाचा माग काढते. समकालीन वास्तवाचे दाहक वर्णन असलेली ही कथा केवळ शब्दांतून नव्हे, तर दृश्यांतून वाचकांना भेटते. भेटताना सामाजिक स्वरुपाचे टोकदार भाष्यही करीत जाते. उदाहरणार्थ ‘...सहा तरुण चेहरे रेल्वेलाइन आणि खडी यात मिसळून गेले होते. चांदणं अंगावर पांघरून गाढ झोपले होते. पण नक्कीच त्यांच्याही पोटात भूक असणार! चांदण्यांनं पोट भरत नाही!’
इंद्रनील सान्याल यांच्या ‘फ्रिज’ नावाच्या कथेत, एरवी निरागस-निष्पाप भासणाऱ्या माणसाच्या मनातला परिस्थितीने लादलेल्या अत्याचारातून आलेला विखार पुढे येत राहतो. तर सौरभ मुखोपाध्याय यांची ‘मातृस्वर’ ही कथा वरवर पापभीरू, सोज्वळ आणि निराग्रही भासणाऱ्या माणसाच्या खुनशी स्वभावाचे दर्शन घडवते. या कथेचा नायक न्यूनगंडाने पछाडलेला आहे. कॉर्पोरेट जगात वावरताना मातृभाषेच्या दुष्प्रभावामुळे त्याला अपमान सहन करावे लागताहेत. ही समस्या आपल्या मुलाच्या वाट्याला येऊ नये, म्हणून बायकोच्या नादी लागून कॅन्सरच्या आजारपणाचे निमित्त साधून वयोवृद्ध आईच्या गळ्यातले स्वरयंत्र काढून टाकण्याच्या शस्त्रक्रियेला राजीखुशी परवानगी देऊन एकप्रकारे जन्मदात्या आईच्या जगण्याचाच बळी देताना दिसतो.
‘पिचरप्लांट’ या विश्वदेव मुखोपाध्याय लिखित कथेचा नायक वासावरून भविष्यातली संकटे ओळखण्याची ख्याती असलेला आहे. लेखक ही कथा मॅजिक रिअलिझम शैलीत पेश करतो. पुढे काय घडणार अशी प्रत्येक वाक्यानंतर उत्कंठा ही कथा निर्माण करत राहते. ही कथा एका अलौकिक, अदभुत क्षमता असलेल्या माणसाची गोष्ट सांगत नाही, तर सहजपणे जगण्याचे सारही मांडू पाहते. तर प्रस्तुत संग्रहातली ‘नदीविज्ञान’ ही रंजन आणि ज्ञानाचा मेळ साधणारी कथा आहे. ही कथा आपापतः परंपरेचे बांध तोडून स्वच्छंदी होते. यातला नदीवैज्ञानिक असलेला नायक निसर्गतत्त्वांचा शोध घेऊ पाहणारा आहे. त्याच वेळी लेडी एस्कॉर्टसाठी पैसे मोजून आपल्या एकल्या मनाला सोबत मिळावी म्हणून शरीराबरोबरच मनही विकत घेऊ पाहतो आहे. ही कथा सभ्येतेचे साचे मोडत स्त्री-पुरुषाच्या शरीराच्या भुकेबरोबरच मनाच्या भुकेचाही वेध घेऊ पाहते.
ही कथा मध्यमवर्गीय सुशिक्षित जगण्यातले आगळे द्वंद्व धक्कादायक वळणे घेत आपल्यापुढ्यात मांडते. म्हणजे, एस्कॉर्ट म्हणून ज्या मुलीची सोबत या नायकाला मिळालेली आहे, ती मुलगी एकेकाळची गुणवान, सधन परंतु नदीच्या महापुरामुळे विपन्नावस्थेत गेलेल्या कुटुंबाचा एक भाग आहे. ज्या निसर्गाच्या विभ्रमाचा नायकाचा शोध आहे, त्याचीच ही मुलगी बळी आहे. या कथेत निसर्गाचे आणि माणसाचे गुंतागुंतीचे मन समोर येतेच, परंतु, विद्वत्तेच्या ठायी असलेल्या स्खलनशील स्वभावाचेही दर्शन घडते. म्हणजे, या कथेतला विद्यापीठीय वर्तुळात मानाचे स्थान असलेला वैज्ञानिक नायक शरीर-मनाच्या भुकेसाठी परस्त्रीच्या सहवासाची अभिलाषा बाळगतो. त्या अर्थाने, ही कथा रूढ नीतिमूल्यांच्या चौकटीही मोडताना दिसते. नायक वैज्ञानिक बुद्धिवादी नि अभिजन असला तरीही तो शेवटी, विकार-विकृतींसह जगणारा हाडामांसाचा माणूसच असतो, याचे भान ही कथा वाचकांस देते. या कथेत पर्यावरणाच्या ऱ्हासाबरोबर मानवी मूल्यांच्याही ऱ्हासाची एकसमांतर गोष्ट पुढे येत राहते आणि माणूस प्राण्याचे संकटाप्रसंगींचे अनाकलनीय-अनपेक्षित वर्तनाचेही दर्शन देऊन जाते.
तसे पाहता, या संग्रहातील बहुतांश कथा मध्यमवर्गीय-उच्चमध्यमवर्गीय सुस्थित (‘भद्रलोक’ अशी स्वतःची गणना करणाऱ्या) समाजात घडणाऱ्या आहेत. ‘मनाचे समाधान’ आणि ‘मनाचे असमाधान’ या दोन मनोवस्थांच्या गोंजारण्यातून रोजच्या निरस जगण्यात उभे राहणारे नाट्य हे या कथासंग्रहाचे वैशिष्ट्य आहे, असे मला वाटते. कथासंग्रहाचे हेच वैशिष्ट्य वाचकांच्या मनातल्या गृहितकांच्या, स्त्री-पुरुष संबंधाने वा आई-मुलगा, मुलगी-पिता, प्रियकर-प्रेयसी, नवरा-बायको या साचेबद्ध परंपरेने लादलेल्या प्रतीकांच्या ठिकऱ्या उडवण्यास पुरेसे आहे. या कथा माणसातल्या सौंदर्याबरोबरच विरूपतेचेही दर्शन घडवतात आणि विजिगीषेबरोबरच माणसाच्या आत्मनाश, आत्मघाती वृत्तीवरही बोट ठेवत जातात.
सिंग्मंड फ्रॉइड, कार्ल जुंग यांचे मानवी स्वभावाशी निगडित सिद्धांत, डेस्मंड मॉरिस आदींचे मानवी वर्तनासंबंधी, क्रिया-प्रतिक्रियांसंबंधी निरीक्षणे-सिद्धांत हे सारे ज्ञान कथा रूपात या संग्रहातून आपल्यापर्यंत सहजपणाने पोहोचत आहे, यात मला शंका वाटत नाही. अंतिमतः हे सारे ज्ञान आणि जीवनबोध या टप्प्यावर येऊन विसावते आहे. इतकेच नव्हे, तर हा वाचानुभव अंतःशोधास प्रवृत्त करील, इतकी परिणामकारकता या संग्रहातील अनुवादित कथांमध्ये भरलेली आहे. त्या अर्थाने, या संग्रहातल्या कथा जितक्या मन रिझवण्याची क्षमता असलेल्या आहेत, रंजक आहेत, तितक्याच त्या मानवी मनोव्यापाऱ्याच्या अंगाने पाहू जाता ज्ञानवर्धकही आहेत.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
एरवी, कथाकार हे केवळ साहित्यिक नसतात, तर ते माणसाच्या मनाचे अदृश्य राहणारे विभ्रम टिपणारे मनोवैज्ञानिकसम प्रज्ञावंतही असतात आणि प्रसंगी उत्तरकाळाचे यथायोग्य सूचन करणारे भविष्यवेत्तेही असतात, अशी भावना संग्रहातील कथा वाचल्यानंतर मनात सहज येऊन गेली, हेदेखील इथे नमूद करणे आवश्यक आहे.
मानवी स्वभाव वैशिष्ट्ये-वैगुण्याचा कोपरा नि कोपरा तपासत प्रिय-अप्रिय वैश्विक सत्यापाशी वाचकास आणून सोडते, ती अस्सल कथा किंवा ‘माणूस असा का वागतो?’ या प्रश्नाचे सोपे उत्तर देण्यापेक्षा ‘माणूस असाही वागतो’ असे सुचवते ती अस्सल कथा- या काही निकषांवरही प्रस्तुत संग्रहातल्या कथा उजव्या ठराव्यात, अशा आहेत. यातल्या काही कथांनी एक सामान्य वाचक म्हणून माझा पिच्छा पुरवला आहे, काही कथा माझ्या मानगुटीवर बसून आहेत, तर काही कथा माझी आनंददायी ठरेल, अशी सोबतही करणार आहेत. त्यामुळे खात्री ही आहे की, असेच काहीसे भाव प्रस्तुत संग्रहातल्या कथा वाचल्यानंतर वाचकांच्या मनातही जागे होतील. मनोवेधक प्रतिमा आणि प्रतीकसृष्टीसह आगळा रंग, गंध आणि रुप लेवून समोर येणारे हे बंगाली साहित्य त्यांच्यात असलेली वाचनभूक वाढवेल आणि चोखंदळ अनुवादिका या नात्याने सुमती जोशी येत्या काळातही असेच बहारदार बंगाली साहित्य मराठी वाचकांपुढ्यात सातत्याने आणत राहतील. जेणेकरून वाचक म्हणून आपणच आपल्याला अंशाअंशाने नव्याने सापडत राहू. समृद्ध होत राहू.
‘बंगरंग’ (बंगाली भाषेतील सद्यकालीन वेधक कथा)
अनुवाद - सुमती जोशी
उन्मेष प्रकाशन, पुणे
मूल्य - ३०० रुपये
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment