पुण्यात रविवारी, २४ एप्रिल २०२२ रोजी शहीद भगतसिंग विचारमंच आयोजित ‘सातवा नास्तिक मेळावा’ मोठ्या उत्साहात पार पडला. २०१४पासून या मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे. दर वर्षी २३ मार्च या ‘शहीद दिवसा’चे औचित्य साधून नजीकच्या रविवारी हा मेळावा घेण्यात येतो. सभागृहाची उपलब्धता लक्षात घेता हा मेळावा या वर्षी १० एप्रिल रोजी नियोजित केला होता. मात्र या दिवशी रामनवमी आहे, असे सांगत काही प्रतिगामी संघटनांनी विरोध करत त्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यामुळे पोलिसांनी सदर दिवशी मेळावा घेण्यात येणार नाही, अशी भूमिका घेतली. आयोजकांनी पोलिसांना याबाबत लिखित निवेदन मागितले. त्यावर कार्यक्रमापूर्वी वक्त्यांची छापील भाषणे आम्हाला देण्यात यावीत, अशी मागणी पोलिसांनी केली. मात्र अशा प्रकारच्या सेन्सॉरशिपला बळी पडायचं नाही, हा निर्धार आयोजकांनी केला.
..................................................................................................................................................................
.................................................................................................................................................................
अखेर २४ एप्रिल रोजी हा मेळावा झाला. त्याला राज्यभरातून उदंड प्रतिसाद लाभला. यामध्ये तरुणांची संख्या मोठी होती. या वेळी प्रसिद्ध दिग्दर्शक सुनील सुकथनकर, विधीज्ञ असिम सरोदे, कार्यकर्ता व लेखक तुकाराम सोनवणे आदि मान्यवरांनी उपस्थित राहून अतिशय प्रभावी मांडणी केली.
…तर देवाच्या कल्पनेकडून आपण माणुसकीच्या विचारधारेकडे येऊ
कार्यकर्ता व लेखक तुकाराम सोनवणे म्हणाले, “जोतीबा-सावित्रीने १८४८ साली भिडे वाड्यात पहिली शाळा सुरू केली. त्या वेळी स्त्रियांना नरकाचे द्वार, गुलामगिरी, पायाची वहाण अशी वागणूक दिली जात होती. बऱ्याच वेळा धर्मनियमाने, रूढी- परंपरांनी महिलांना जिवंत जाळलं. मग महिलांना शिक्षणाचा अधिकार नाही, मुलींना मॅडम बनवायचं का? आणि तिने स्वयंपाक केला, तर किडे पडतील, अशी भीती घातली गेली. लोकांनी शेण फेकून मारल्यावर सावित्रीबाईंनी घरी परत जाऊन, लुगडं बदलून, परत शाळेत जाऊन स्त्री-शिक्षणाची सुरुवात केली. काळ बदलतो. इथं मुलींना ‘सावित्रीच्या लेकी’ म्हटलं जातं. त्या देशाच्या मुख्यमंत्री, पंतप्रधान बनल्या. आमच्या सासवडजवळ जोतीबा-सावित्रीचे गाव आहे. पण त्याच तालुक्यात गणपतीच्या वेळी शेकडो महिला जमा होतात, त्यांना ‘सावित्रीच्या लेकी’ म्हणायचं का?
आता आपण मूळ विषयाकडे वळू. आस्तिक म्हणजे जो धर्म, देव मानतो तो. जो वेद, पुराण, कुराण, बायबल यांना विज्ञानाची कसोटी लावून धिक्कार करतो तो नास्तिक. पण देव नेमका बनवला कुणी? आदिमानवाला देव नव्हता. भारतात इसवी सनाच्या दुसऱ्या शतकात देव नव्हता. देवही नाही, देऊळही नाही, मग हा देव आला कुठून? देव आपल्या डोक्यात आला की, काय? जेव्हा आदिमानव गुहेमध्ये, जंगलात राहायचा, तेव्हा निसर्गाच्या वातावरणात राहू लागला, शेती करू लागला. कपडे घालू लागला. मग पावसाळा आला, पूर येऊ लागला, ते सर्व माणसाला चमत्कार वाटू लागले. उन्हाळ्यात उष्णतेचा त्रास होऊ लागला. हिवाळ्यात थंडी वाजू लागली. या सर्वांमागे कर्ता करविता कोण आहे, यावर आदिमानव विचार करू लागला.
यातून देवाला कुणी ईश्वर, कुणी गॉड, कुणी अल्ला म्हणू लागलं. अशा प्रकारे जगामध्ये देव तयार झाले. काही चलाख माणसं यात घोळ घालू लागले. ते सतत भीती दाखवतात, देव तुझं वाटोळं करील वगैरे. या सर्वाला विरोध करणारे, विज्ञानाची कसोटी लावणारे म्हणजे नास्तिक. नास्तिक होणं खूप कठीण आहे. नास्तिक म्हणजे समाजाच्या विरोधी प्रवाहाने जाणं, विरुद्ध लढा देणं. आज विज्ञान आहे. नास्तिक सरळ विज्ञानाचा आधार घेऊन संवाद साधतात.
गॅलिलिओ, कोपर्निकस यांनी जेव्हा विज्ञानातील सत्य शोधले, तेव्हा विज्ञान प्रगत झाले. गॅलिलिओ, कोपर्निकस यांना त्यांच्या वैज्ञानिक शोधांसाठी शिक्षेला सामोरे जावे लागले. त्यामुळे जगाला समजून घ्या. ‘बायबल’मध्ये लिहिलेलं होतं की, सूर्य पृथ्वीभोवती फिरतो आणि पृथ्वी सपाट आहे. विज्ञानाने हे सिद्ध करून दाखवले की, सूर्य नाही तर पृथ्वी सूर्याभोवती फिरते आणि पृथ्वी सपाट नसून गोल आहे. पण त्या वेळच्या ख्रिश्चन धर्माविरोधात बोलतो, म्हणून तू गुन्हेगार आहेस, असं गॅलिलिओ, कोपर्निकस यांना सांगितलं. आजही आपल्या समाजाची हीच स्थिती आहे. हजारो वर्षे ज्यांनी तुम्हाला गुलाम बनवलं, त्या धर्माच्या विरोधात का बोलायचं नाही?
आपल्या देशाचा एक मोठा माणूस म्हणतो की, ‘गाय चारा खाती हैं, तो दूध देती हैं! बैल चारा खाता हैं, तो दूध क्यो नहीं देता?’ असे देशाचे मोठे नेते म्हणायला लागले, तर आपण ऐकायचं का?
जोतीबींनी या सगळ्याला विरोध केला. ते म्हणत,
‘सत्य निर्मिकास शोधल्यावाचून | थोतांड कल्पून || ग्रंथ केले ||
त्याचे जागेवर भुदेव बसती || शूद्र ठकविती नटापरी |’
फुल्यांनी सांगितलं हे सर्व थोतांड आहे. पण आपल्याला ‘यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत। अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्...’ ही गीतेची विचारधारा सांगून फसवलं जातं. यातून नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, एम.एम.कलबुर्गी, गौरी लंकेश यांना मारलं गेलं.
..................................................................................................................................................................
उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...
हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal
................................................................................................................................................................
आपण म्हणतो ‘राम नाम सत्य हैं’, पण आपणाला राम इंग्रजांनी उत्खनन केल्यावर सापडला. आपण मुस्लीम नाही, ख्रिश्चन नाही, आपण हिंदू आहोत आणि आपण आपलंच जळतं घर सांभाळायला पाहिजे. पण सगळे धर्मच तसेच आहेत, प्रत्येक धर्मात सुधारणा व्हायला पाहिजे.
काही वेळा मंदिरात महिलांवर अत्याचार होतात, तेव्हा त्या मंदिरातील देवाला देव कसं मानायचं? सोरटी सोमनाथ मंदिर जेव्हा गझनी महंमदने सतरा वेळा लुटलं, तेव्हा महादेवाचा तिसरा डोळा कुठं गेला? असं आपल्याला सांगितलं जातं की, देवाशिवाय झाडाचं पानसुद्धा हलत नाही. देव जर जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी असेल तर असे अत्याचार होतातच कसे? तेव्हा कुठे जातो तुमचा देव?
आपल्या संस्कृतीमध्ये शूद्रांना, महिलांना वेद, पुराणे वाचण्याची परवानगी नव्हती. बहुजनांना शिक्षणापासून वंचित केलं गेलं होतं. इंग्रजांपासून आपल्याला शिक्षण मिळायला सुरुवात झाली. बोलणं सोपं असतं, ऐकणं सोपं असतं. पण ‘बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले’, असं संत तुकाराम म्हणत त्याप्रमाणे वागायला पाहिजे. त्यामुळे देवाच्या कल्पनेकडून आपण माणुसकीच्या विचारधारेकडे येऊ.”
हिंसा करणारे, दुसऱ्याचं डोकं फोडणारेच आजकाल ‘धार्मिक’ मानले जातात
विधीज्ञ असीम सरोदे म्हणाले, “आजपर्यंत अनेकदा लोकांच्या भावना न दुखावता हे सांगण्याचा प्रयत्न झाला आहे की, देव जर सर्वसमावेशक असेल तर त्याला तुम्ही मंदिर आणि मस्जिदमध्ये का कोंबता? संत तुकडोजी महाराजांचे भजन या संदर्भात सांगता येईल- “मनी नाही भाव, म्हणे देवा मला पाव! देव अशाने मिळायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे!” पण याउलट सर्व जण देवाची दुकानं लावून बसली आहेत. त्यामुळे संविधानाचा प्रश्न महत्त्वाचा ठरतो.
आजकाल ‘हनुमान चालिसा’ आणि मस्जिदीसमोरील भोंग्याचा प्रश्न राजकीय झाला आहे. आपल्या घरात बसून ‘हनुमान चालिसा’ म्हणावी. दुसऱ्याच्या घरासमोर जाऊन म्हणण्याचा अट्टाहास का करावा? आजकाल देव या संकल्पनेचं राजकियीकरण झालं आहे. त्यामुळे प्रत्येक जण त्या दिशेनं व्यक्त होऊन एक प्रकारे सामाजिक-वैचारिक प्रदूषण करत आहे. कुणाच्या घरासमोर किंवा प्रार्थनास्थळासमोर ‘हनुमान चालिसा’ म्हणू न देणं हा अन्याय कसा काय होऊ शकतो? पण आपलं राजकारण इथपर्यंत घसरलं आहे. यामध्ये देव नाही. राजकारणालाच देव मानण्याची प्रथा सुरू झाल्यामुळे हे सर्व होत आहे.
देव ही संकल्पना मानसिक आधार म्हणून तयार केली गेली आहे. पण आजकाल जे राजकारण सुरू आहे, त्यातून देव या संकल्पनेतून काही आत्मिक उन्नती साध्य होईल असं वाटत नाही. या सर्वांमध्ये कायदेशीरतेचा प्रश्न निर्माण होतो. धर्माचे प्रश्न राजकीय अंगानं ताणून विकासाच्या प्रश्नांना कशी खीळ घातली जाते, हे भारतीय नागरिक म्हणून आपण समजावून घेतलं पाहिजे.
आस्तिक, नास्तिक आणि अग्नोस्टिक (अज्ञेयवादी) हे माणसांचे तीन प्रकार आहेत. मी अज्ञेयवादी आहे. अज्ञेयवादी म्हणजे जोपर्यंत मला देवशक्तीचा प्रत्यय येत नाही, तोपर्यंत मी देव मानणार नाही. पण तसं वागण्याची परवानगी नाही. एकतर तुम्ही या बाजूचे असलं पाहिजे किंवा त्या बाजूचं. विवेकनिष्ठता नसलीच पाहिजे, वेदांचंच अस्तित्व मान्य केलं पाहिजे. जे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध होऊ शकत नाही, अशाच गोष्टी मान्य करायचा आग्रह धरायचा, हे मला चुकीचं वाटतं.
कुराण, बायबल किंवा कोणताही धर्मग्रंथ तुम्ही वाचला तर तुम्हाला देव हा आत्मिक दर्शनासाठी आवश्यक आहे, असंच दिसतं. पण आजकाल देव या संकल्पनेवरून घमासान चालू आहे. त्याच्यातून गुंड-बदमाश यांचं राजकारण प्रस्थापित करण्याचं काम होत आहे. त्याला आपण विरोध करतो म्हणून काही झुंडींचा विरोध आहे. कारण देव नावाची भोळसट संकल्पना यांच्या राजकारणाचं भांडवल आहे. देव, अल्ला, गॉड या कल्पनेनं बिनडोक झालेले लोक यांच्या राजकारणाचं ‘कॅपिटल’ आहे. म्हणून मग देव, धर्म, मंदिर न मानणारे लोक समोर आले की, त्यांना झटका बसतो. हे सगळे आवश्यकच नाही म्हटल्यावर त्यांचं राजकारण उरत नाही.
सुरुवातीला आर्थिक चक्रासोबत जोडली गेलेली देव ही संकल्पना आता राजकारणाशी अधिक घट्ट झाली आहे. ते अधिक चिंताजनक, आव्हानात्मक बनलं आहे. हिंसा करणारे, दुसऱ्याचं डोकं फोडणारेच आजकाल ‘धार्मिक’ मानले जातात. बुद्धीशी फारकत घेतलेले हे लोक समाजातील मान्यवर व्यक्ती असतात. या सगळ्या संदर्भात भारतीय संविधान काय म्हणतं, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे.
२०१४मध्ये मुंबई उच्च न्यायालयात रणजित सूर्यकांत मोहिते विरुद्ध केंद्र सरकार असा खटला चालला होता. त्यात न्यायालयाने असं सांगितलं होतं की, सद्सद्विवेकबुद्धी, चूक-बरोबर पारखून घेण्याची कसोटी आपल्या स्वतःच्या कृतीला लावण्याचे स्वातंत्र्य, हे धर्मस्वातंत्र्याचे मूलभूत तत्त्व आहे. व्यक्तिगत स्वातंत्र्य मानताना मी कोणत्याच धर्माचा नाही, हेसुद्धा म्हणण्याचा प्रत्येकाला हक्क आहे. कलम २५ नुसार कोणताच देव न मानण्याचं प्रत्येक नागरिकाला स्वातंत्र्य आहे. देव-धर्म मानाच, असा कुणालाही आग्रह आपण धरू शकत नाही. त्यामुळे आता आपण जो आग्रह धरत आहोत, तो न्यायायालयाने मान्य केला आहे.
..................................................................................................................................................................
अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5312/Checkmate
..................................................................................................................................................................
आणखी एका खटल्यात पेरियार रामास्वामी यांचा पुतळा एका शाळेत लावण्यात आला होता. आक्षेप घेणाऱ्यांचं म्हणणं होतं की, शाळेत त्यांचा पुतळा लावला तर शाळेत नास्तिकता वाढेल, मुलांना चुकीचे प्रशिक्षण मिळेल आणि चुकीच्या प्रेरणा त्यांच्यामध्ये प्रसारित होतील. त्यावर मद्रास उच्च न्यायालयानं सांगितलं की, पेरियार यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन, माणुसकी आणि मानवता, चौकस बुद्धी विवेकवाद, धर्मसुधारणा हे सर्व मुलांना कळलंच पाहिजे. संविधानाच्या दृष्टीनं हे चांगलंच आहे. इथं भारतीय संविधानाच्या संदर्भात वैज्ञानिक दृष्टिकोनाचा संदर्भ येतो.
संविधानात दिलेले हक्क हा वेगळा सुटा भाग म्हणून आपण लक्षात घेऊ शकत नाही. आपल्याला नागरिकांची कर्तव्यंसुद्धा लक्षात घ्यावी लागतील. जोपर्यंत आपण हक्कांबरोबर कर्तव्यांची कदर करणारा समाज निर्माण करू शकणार नाही, तोपर्यंत कुणालाच हक्क मिळू शकणार नाहीत. त्यामुळे कलम ५१चा विचार आपल्याला करावा लागतो. संवैधानिकता (Constitutionalism) आणण्याचा प्रयत्न या देशात सतत झाला आहे. देव मानणं किंवा न मानणं याचा मानवी हक्क देणारं आपलं संविधान असल्यावर विषमता, भेदभाव असणारं जीवन जगण्याची वेळ आपल्यावर का येते? कलम १४-१५मध्ये अपेक्षित असलेली समानता का दिसत नाही? या सर्व हक्कांच्या प्रश्नांवर मोर्चे निघतात, परंतू मूलभूत कर्तव्यांच्या प्रश्नावर मोर्चे का निघत नाहीत? कारण, भारतीय समाजव्यवस्था व संस्कृतीनं कर्तव्यांना नेहमी दुय्यम स्थान दिलं आहे.
देव मानणाऱ्यांनी असावं, देव न मानणाऱ्यांनी असावं आणि कोणताच धर्म न मानणाऱ्यांनीही असावं. ही सहिष्णुता आपल्याला इतरांचं अभिव्यक्तीस्वातंत्र्य मान्य करण्यातूनच मिळते. भारतामध्ये १०० टक्के अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानण्याची पद्धत कुटुंबात नाही, समाजामध्येसुद्धा नाही. त्यामुळे लोकशाही कुटुंबापासून आणली गेली पाहिजे.
आजकाल धार्मिकतेचं प्रमाणपत्र एकमेकांना देण्याची स्पर्धा आणि त्यातून तयार झालेला दबदबा, हा आपल्या समाजासाठी चांगला नाही. त्याला आपल्याला विरोध करावाच लागेल. जोपर्यंत धार्मिक ओळख हीच प्रमुख ओळख म्हणून नागरिक मिरवतात, तोपर्यंत लोकशाही धोक्यात आहे. माजी न्यायमूर्ती रंगनाथ मिश्रा म्हणत, “राष्ट्रनिर्माण करायचं असेल तर लहान मुलांना वैज्ञानिक दृष्टीकोनाचं शिक्षण, तसंच मूलभूत कर्तव्याबद्दलचं शिक्षण देणं महत्त्वाचं आहे. यातून नागरिक बनण्याची प्रक्रिया सुरू होते. यामुळे हक्कांचं व कर्तव्यांचं संतुलन राखणारा समाज निर्माण होतो.” अनेक लोक स्वतःला विवेकवादी समजतात. खरं तर कायदा समजायला लागल्यावर विवेकवादी होणें अपेक्षित आहे. त्यामुळे संवैधानिकता जपणारा समाज आपण निर्माण करणं गरजेचं आहे.”
श्रद्धा थोडी हळूच कलल्याने भेटते ती अंधश्रद्धा
दिग्दर्शक-लेखक सुनील सुकथनकर म्हणाले, “शहिद भगतसिंग यांनी ‘मी नास्तिक का आहे?’ ही पुस्तिका लिहिली हे खरंच प्रेरणादायी आहे. मी स्वतः नास्तिक झालो. ती प्रक्रिया कशी झाली, ते समजून घ्यावे लागेल. माझा जन्म कऱ्हाड गावी झाला. लहानपणी दररोज कृष्णा काठी जायचं, तिथं आंघोळ करायची, असा दिनक्रम असायचा. सगळे कऱ्हाडचे लोक नदीला ‘कृष्णामाई’ म्हणतात. देऊळ नव्हतं पण कृष्णामाई म्हणायचे. मी आजीबरोबर जायचो. तिथं रामनवमीचा सोहळा असायचा. दोन आठवड्यांपूर्वी जो सोहळा झाला आणि माझ्या लहानपणी जो व्हायचा, त्यात जमीन-आसमानचा फरक आहे. आजकाल जे वातावरण आहे, त्यामध्ये रामाच्या दहशतीखाली सर्वांना दाबून टाकू या, असा काहीसा भाव आहे.
जेव्हा आपला जन्म सामान्य कुटुंबात होतो, तेव्हा आस्तिकता ठरलेली असते. आस्तिकता आणि नास्तिकता या दोन्ही गोष्टींवर बोलताना आपण हळूहळू खूप हळव्या अशा निसरड्या कोपऱ्यात जाऊन पोचतो आणि ते म्हणजे श्रद्धा. श्रद्धा थोडी हळूच कलल्यानं भेटते ती अंधश्रद्धा. या दोन्हीतील जी सूक्ष्म सीमारेषा आहे, ती बहुदा कुणाला उमजत नाही. अनेक सामान्य लोकांना हे उमजत नाही की, ज्याला ते श्रद्धा समजतात, ती मुळात अंधश्रद्धा आहे. आणि पुढे जाऊन माझा धर्म कसा चांगला आहे हे सांगायला लागतात. असं करता करता ते एका असहिष्णुतेच्या भावनेपर्यंत कधी पोचतात ते त्यांनासुद्धा कळत नाही.
मी नंतर सातवी-आठवीत असताना गोव्यात मंगेशीच्या मंदिरात जात असे. तिथंच मला माझ्यातील नास्तिकतेचा साक्षात्कार झाला. मंदिरात जेव्हा जेव्हा जात असे, तेव्हा मनात असा विचार येई की, या देवाशी बोलता येत नाही. मग मी माझ्या मनातील देव संकल्पनेला प्रश्न विचारू लागलो. देवासाठी देऊळ बांधणं आणि त्यात देवाला नेऊन बसवणं, यापलीकडे जाऊन देव काही तरी करतोय, याचा काही पुरावा सापडेना. म्हणून मी तुम्हा नास्तिकांशी जोडला जाऊ लागलो. दाभोलकर म्हणायचे, ‘चिकित्सा हा शब्द आयुष्यात आला तेव्हा जगणं अवघड होऊन बसतं’. आपल्याला वाटायला लागतं की, आपलं सगळं व्यवस्थित चाललं होतं, देव आहे तो सगळं पाहत आहे. पण देवच नाही म्हणल्यावर आता अवघड आहे, अशी भीती मनात तयार होते.
तेव्हा जगातल्या चांगुलपणावरसुद्धा विश्वास ठेवायला हरकत नाही, असा भोळा समज ठेवणारा मी मुलगा होतो. त्यानंतर चिकित्सेनं माझा ताबा घेतला आणि सर्व तपासणी सुरू झाली. असं वाटायला लागलं की, देवावर सर्व सोपवल्यानंतर एक विचित्र परावलंबन आपल्यावर येतं. आपण स्वतःला कमजोर आणि देवाला श्रेष्ठ समजत होतो. तोच सगळं काही करण्याची प्रेरणा देणारा आहे, असं समजत होतो. या सगळ्यावर विचार केल्यावर असं लक्षात आलं की, नाही, जे काही करणार आहे, ते मीच करणार आहे आणि जे काही करू शकणार नाही, त्याची जबाबदारीसुद्धा मीच घेईन. हे परालंबत्व झुगारून दिल्यावर मनातून खूप शांतसुद्धा वाटायला लागलं.
आस्तिक लोकांना जे परावलंबन वाटत असेल आणि त्यांना कुठल्या तरी गोष्टीचा आधार लागत असेल, तेसुद्धा समजायला लागलं. मी ज्या क्षेत्रात काम करतो, त्या चित्रपट-मालिकांबाबतीत एक गोष्ट नोंदवावीशी वाटते. आपल्या सगळ्यांना पु.ल. देशपांडे आदरणीय आहेत. एका नाटकाच्या प्रयोगाला आम्ही त्यांना बोलावलं होतं. ते आले. आमच्यापैकी काही जणांनी नाटकाच्या प्रयोगाच्या आधी नारळ फोडून पूजा करण्याचं ठरवलं. मी आणि माझी मैत्रीण म्हणालो की, आम्हाला हे पटत नाही. पण आमच्यातल्या बहुमतानं ठरलं की, पूजा करायची. ती झाली. त्यानंतर नाटक झालं. नाटक संपल्यावर पु.ल. देशपांडे स्टेजवर आले आणि नाटक कसं झालं वगैरे न विचारता म्हणाले, “मी चाळीस-पन्नास वर्षं रंगभूमीवर वावरतोय. आजपर्यंत कुणीही पूजा केली नाही. आणि आजकालची पोरं काय मूर्खपणा करत आहेत?” आमची तोंडं बघण्यासारखी झाली.
चित्रपटाच्या शूटिंगची सुरुवात करताना कॅमेरा, ट्रायपॉड आणि दिग्दर्शकाची खुर्ची याची पूजा केली जाते. पण या सगळ्यात भावना दुखावली जाते, म्हणजे नेमकं काय? आजकाल खोडसाळपणे हा प्रश्न विचारला जातो. खरंच लोकांच्या भावना दुखावतात का? आमच्याकडे एक कॅमेरामन होता. त्याची गणपतीवर इतकी श्रद्धा होती की, दर मंगळवारी सिद्धिविनायकला जायचा, उपवास करायचा. मला प्रश्न पडायचा की, याची भावना महत्त्वाची की, माझी भावना महत्त्वाची?
मी जरी नास्तिक असलो तरी संपूर्ण चित्रपट निर्मितीच्या टीमच्या वतीनं शूटिंगच्या वेळेस पूजा करा असं म्हणण्याचा एक सहिष्णू भाव बाळगावा लागतो, तो मी बाळगला आहे. पण या सगळ्यातला हास्यास्पदपणा मला जाणवायचा. सुरुवातीची काही रिल्स गणपतीला शूट करण्यासाठी वापरत. पण शेवटी विज्ञान, सोय यामुळेसुद्धा गोष्टी पुढे जातात. फक्त कॅमेराने गणपतीचा शॉट घेतला म्हणून कॅमेरा कधीही बंद पडत नाही, असं होत नाही. हे सगळं सगळ्यांच्या लक्षात येतं. तरी सुद्धा भावनेनं परावलंबी राहण्याची सवय लागलेली असते. ही कमजोरी दूर करणं हा खरं तर आस्तिकतेतून नास्तिकतेकडे जाणारा प्रवास आहे.
इतरांच्या श्रद्धेवर मी शंका घ्यायची नाही, अशी त्यांची अपेक्षा असते, पण माझ्या नास्तिकतेवर ते आक्षेप का घेतात? श्रद्धा असणाऱ्यांना असं वाटतं की, त्यांच्या मागे खूप मोठी संस्कृती व परंपरा आहे. पण त्या लोकांना हे समजलेलं नसतं की, ही विश्वाची रचना अजून आपण पूर्णपणे समजून घेऊ शकलेलो नाही. आकाशगंगांच्या पलीकडेसुद्धा विश्व आहे, हेसुद्धा आपल्याला कळतं. विश्व समजून घेताना बुद्धीची झेप कमी पडते. या सर्व विश्वाची उत्पत्ती करणारी शक्ती देव आहे, हा एक सोपा मार्ग आहे. दुसरा मार्ग आहे की, अजून आपल्याला बऱ्याच गोष्टी कळलेल्या नाहीत. एवढा सोपा मार्ग असताना आपण शरण का जातोय? मानवाला वेगवेगळ्या टप्प्यावर बऱ्याच गोष्टी कळल्या नव्हत्या आणि जशा कळल्या तसा माणूस जमात शिकत गेली.
वेगवेगळ्या ठिकाणांच्या मंदिरात गेलं की, तिथं पाऊल ठेवू वाटत नाही. तिथले पोलीस येणाऱ्या भक्ताला एखाद्या गिऱ्हाईकसारखे वागवतात. आपण देवाला धन-धान्य, दान देणं समजू शकतो, पण प्राचीन काळी जन्मलेल्या देवाला पैसे, चेक, क्रेडिट कार्ड हे सर्व कधीपासून समजायला लागलं? देव संकल्पनेचा व्यवसाय करणाऱ्यांना मात्र हे सगळे बरोबर समजतं. देवस्थानचे लोक देवाचं तिकीट लावतात. हे जर देवाला समजत नसेल, तर तो असहाय नाही का?
वर्षानुवर्षं एक संस्कृती निर्माण झाली आहे. आपण धर्म, संस्कार लगेच लोकांच्या आयुष्यातून काढून टाकू शकत नाही. माणसानं या सगळ्या गोष्टी आयुष्यात आनंद निर्माण करण्यासाठी केलेल्या आहेत. चिकित्सा करणं, प्रश्न विचारत राहणं आणि त्यातून स्वतःला ताकद देत राहणं, हे करत राहिलं पाहिजे.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
नास्तिक इतरांचा द्वेष करत नाही. कुठल्याही गोष्टीला उत्तरदायी राहण्याची ताकद नास्तिकतेमुळेच येते. नास्तिकता जास्त उदार होऊ शकते. आपण आस्तिक लोकांशी सहिष्णू सदभाव बाळगू शकतो. नास्तिक असं म्हणू शकतो की, आमचा तुमच्या धर्माला विरोध नाही. तुमच्या धर्मातील चांगली मूल्यं आम्ही स्वीकारायला तयार आहोत. आपला आक्षेप एवढाच असला पाहिजे की, जे कुणी धर्माचा वापर करून, ‘गर्व से कहो’ असं म्हणून आक्रमक-हिंसक होत असतील किंवा कर्मकांडाचा प्रचार करत असतील तर ते आम्हाला मान्य नाही.”
कार्यक्रमाचे अध्यक्ष य. ना.वालावलकर म्हणाले, “सर्व जगभरात निरिश्वरवादी, नास्तिकांची संख्या प्रचंड वेगानं वाढत असताना आपला देश मात्र अजूनही देव, धर्म, कर्मकांड, आहार, पेहराव, रंग, प्रतीक यातच म्हणजे सनातनी, प्रतिगामी विचारांकडे वाटचाल करत आहे.” ते पुढे म्हणाले की, “काळाप्रमाणे प्रत्येकानं बदललं पाहिजे. तेच विकसितपणाचं वैशिष्ट्य आहे. नास्तिक लोकांना जगण्यासाठी कोणत्याही देव, धर्म, ग्रंथ, कर्मकांडाची गरज नसते. काळानुसार प्रगत होत जाण्याची बुद्धी नसणं म्हणजे आस्तिकता. निरीश्वरवादी लोकांची संख्या वाढत आहे. मंगल-अमंगल, पवित्र-अपवित्र काही नसतं. तर, चांगलं किंवा वाईट असतं.”
या कार्यक्रमात य. ना. वालावलकर यांचे ‘विवेकी विचार’ हे पुस्तक सुनील सुकथनकर यांच्या हस्ते प्रकाशित झालं. त्यानंतर गेल्या तीन वर्षांत जगभरात मृत्यू पावलेल्या विचारवंतांचं स्मरण आणि त्यांना अभिवादन करण्यात आलं. बाबुराव बागुल यांच्या ‘वेदांच्या आधी तू होतास’ या सुप्रसिद्ध कवितेचं पियुष तोडकरने केलेल्या वाचनानं कार्यक्रमाची सुरुवात झाली. तर भानूदास दुसाने आणि सहकाऱ्यांनी सादर केलेल्या ‘हम होंगे कामयाब’ या गाण्यानं सांगता झाली.
.................................................................................................................................................................
लेखक राहुल माने पुण्यात अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये काम करतात.
nirvaanaindia@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment