या पुस्तकात वैचारिक शिस्तीचा अभाव आहेच, त्याचबरोबर सातत्याने पुराव्याशिवायच्या शेलक्या विधानांची फवारणी केल्याने लेखकाचा अंत:स्थ हेतू वेगळा असल्याचे जाणवू लागते (उत्तरार्ध)
ग्रंथनामा - बुक ऑफ द वीक
विजय तांबे
  • ‘गांधी : पराभूत राजकारणी आणि विजयी महात्मा’ या ग्रंथाचे मुखपृष्ठ
  • Mon , 25 April 2022
  • ग्रंथनामा बुक ऑफ द वीक गांधी : पराभूत राजकारणी आणि विजयी महात्मा Gandhi - Parabhut Rajkarni aani Vijayi Mahatma रावसाहेब कसबे Raosaheb Kasabe

आता या भागात डॉ.आंबेडकरांचा प्रवेश होतो. पुढील जवळजवळ तीनशे पाने गांधी आणि डॉ. आंबेडकर संबंधावर आहेत. डॉ.आंबेडकर भारतात आल्यापासून त्यांच्या सविस्तर कार्याची माहिती डॉ. कसबे देतात आणि त्यांचे विचार पुढील काही पाने जसेच्या तसे मांडतात. सत्याग्रहासाठी अहिंसा हे साधन आहे, जेथे हिंसा आहे तेथे सत्याग्रह नसतो, असे गांधींचे म्हणणे होते. साध्य आणि साधनाच्या शुद्धतेबाबत गांधी स्पष्ट होते. तर एखाद्या माणसाचा सत्याग्रह आहे की, दुराग्रह हे साधनांवर अवलंबून नसून सर्वस्वी त्या कार्याच्या नैतिक स्वरूपावर अवलंबून असते, असे डॉ.आंबेडकर लिहितात आणि गांधींची सत्याग्रहाची भूमिका अव्यवहार्य ठरवतात. हे सर्व डॉ.आंबेडकरांचे लेखन डॉ. कसबे सविस्तर मांडतात, मात्र गांधींची सत्याग्रहाची भूमिका काय होती, तिची व्याप्ती खोली किती होती, त्याचे नियम आणि पथ्ये काय होती, याबाबत कुठलीही माहिती देत नाहीत किवा गांधींचे लिखाण उदधृत करत नाहीत. ते पुढे लिहितात- ‘आंबेडकरांनी केलेला महाडचा आणि नाशिकचा सत्याग्रह हे बार्डोलीच्या आणि चौरीचौर्याच्या सत्याग्रहाच्या तुलनेत आदर्श होते असे मानण्यास हरकत नाही.’ (पान ३२१). प्रथम म्हणजे चौरीचौरा येथे सत्याग्रह झाला नव्हता. बार्डोलीचा प्रश्न हा शेतकऱ्यांच्या साराबंदीचा कायदेभंगाचा सत्याग्रह होता. महाड, नाशिक आणि बार्डोली या सत्याग्रहांचे परस्परांचे विषय वेगळे होते. पानोपानी अशी सैल विधाने आढळतात.

यापुढे कोणत्या वर्षी किती संप झाले ही, कॉ. नंबुद्रीपाद यांनी मांडलेली आकडेवारी देत भारतातील ग्रामीण आणि शहरी भागात मोठ्या प्रमाणावर उठाव होत होते, त्याचे नेतृत्व साम्यवादी करत होते, असे डॉ.कसबे सांगतात. ‘१९३० साली गांधी आंबेडकरांचे मार्ग भिन्न बनले. आंबेडकर हिंदू धर्म शुद्ध करण्यासाठी नाशिकच्या रस्त्याने गेले तर गांधीजींनी सर्वसामान्यांना आवश्यक असलेल्या मिठासाठी दांडीचा रस्ता धरला.’ (पान ३३५). यापुढे मिठाच्या सत्याग्रहावर पाच पाने माहिती आहे. गांधीनी मीठच का निवडले? या प्रश्नाचा आर्थिक कणा काय होता? ब्रिटिशांच्या उत्पन्नात त्यामुळे किती भर होणार होती? सत्याग्रहाच्या तंत्राची निवड, सत्याग्रहाचे नियम, सत्याग्रहींवर अमानुष हल्ले केल्याने उघड पडलेली पाश्चात्य सभ्यता या बद्दल डॉ.कसबे काहीच मतप्रदर्शन करत नाहीत.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

पुढे गांधींजी आणि आंबेडकर यांच्यातील प्रत्यक्ष संघर्ष म्हणजे येरवडा करारासंबंधी डॉ.कसबे सविस्तर विवेचन करतात. या सर्व घटनेचा कालक्रम सविस्तरपणे मांडतात. या प्रश्नाची सुरुवात १९२८ साली सायमन कमिशन समोर डॉ.आंबेडकरांनी दिलेल्या साक्षीने होते. स्वतंत्र मतदार संघाला विरोध करताना डॉ.आंबेडकर पुढील कारणे देतात-

१)  यातून अस्मितांचा उदय होतो. त्या वाढत जातात.

२) जातीय विभागणी झाली की, एका जमातीच्या नेत्याला दुसऱ्या जमातीबद्दल कोणतीच जबाबदारी शिल्लक नसते.

३) आपली जमात एकसंघ ठेवण्यासाठी, अधिकाधिक मते मिळविण्यासाठी नेते लोकांच्या तात्कालिक भावना भडकवण्याचे काम करतात.

४) त्यातून दंग्यांची व्याप्ती वाढते. (पान ३४७).

१९२८ साली अशी बिनतोड मांडणी करणारे डॉ.आंबेडकर १९३०मध्ये पहिल्या गोलमेज परिषदेत प्रौढ मताधिकारासोबत पहिली दहा वर्षे स्वतंत्र मतदारसंघ आणि तिथून पुढे  संयुक्त मतदारसंघ आणि राखीव जागांची मागणी करतात. (पान ३५९). डॉ आंबेडकरांमध्ये हे परिवर्तन कसे होते, याबद्दल डॉ.कसबे लिहीत नाहीत. गांधी-आंबेडकरांच्या पहिल्या भेटीतील डॉ.आंबेडकरांचे निवेदन हे हृदयस्पर्शी आणि चटका लावणारे आहे. हा प्रसंग मुळातून वाचण्यासारखा आहे.

दुसऱ्या गोलमेज परिषदेत अल्पसंख्यांकासोबत अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघ मिळावेत, याच्या बाजूने डॉ.आंबेडकरांनी प्रखर युक्तिवाद केला. या वेळी यातील तांत्रिक बाबी त्यांनी मांडल्या. त्यावर गांधीजींचा प्रश्न होता की, स्वतंत्र मतदारसंघामुळे शीख हे शीखच राहतील. मुसलमान मुसलमान राहतील. अस्पृश्यांना कायमचे अस्पृश्य ठेवायचे आहे का? कदाचित हिंदू धर्म मरून जाईल, परंतू अस्पृश्यता जिंवत राहील याची मला भीती वाटते. (पान ३९७). डॉ.आंबेडकरांनी या विधानावर ‘जनता’ पत्रातून लिहिले. गांधीजींवर टीकाही केली. तो लेख डॉ.कसबे यांनी दिला आहे. मात्र आजपर्यंत गांधीजीच्या या प्रश्नाचे उत्तर कोणीच देऊ शकलेले नाही. १७ ऑगस्ट १९३२ रोजी ब्रिटिश सरकारने जातीय निवाडा जाहीर केला. त्याच्या विरोधात २० सप्टेंबर १९३२ला गांधीनी उपोषण सुरू केले आणि २५ सप्टेंबर १९३२ रोजी गांधी-आंबेडकरांमध्ये ‘पुणे करार’ संपन्न झाला. या सर्व घटनेचे सविस्तर वर्णन डॉ.कसबे यांनी केले असून त्यामुळे समाजात परिवर्तनाला कशी गती मिळाली याचे वर्णन करून प्रकरणाचा शेवट करताना ते लिहितात- ‘गांधीजींनी स्पृश्य वर्गात अस्पृश्यतेविरोधी भावना निर्माण केली. त्यामुळे हा प्रश्न कायमचा मिटण्याचा मार्ग मोकळा झाला. त्यासाठी आंबेडकरांची विद्वत्ता पणाला लागली आणि गांधींचे अध्यात्म.’ (पान ४८४).

डॉ.आंबेडकरांनी आपली बुद्धिमत्ता वापरून स्वतंत्र मतदारसंघाचे समर्थन करून मागणी लावून धरली. गांधीच्या प्रश्नाला बगल दिली. गांधीजी आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. त्यांनी विचारलेला प्रश्न हीच त्यांची भूमिका होती. ती भविष्याचा वेध घेणारी होती. यात डॉ.कसबे यांना अध्यात्म कसे आढळले? डॉ. आंबेडकरांना अधिक जागा मिळाल्या आणि स्वतंत्र मतदारसंघ ही भूमिका तात्त्विक पातळीवर टिकणारी नाही, हे सिद्ध झाले. समाजपरिवर्तन हे प्रबोधन आणि हृदयपरिवर्तनाच्या मार्गाने होते आणि कायदे त्याला सहाय्यभूत होतात, हे गांधींच्या उपोषणाने सिद्ध केले. ज्यांनी जातपात निर्माण केली, त्यातून सत्तासंपत्तीच्या चाव्या स्वत:जवळ ठेवल्या, जे जातीप्रथेचे समर्थन करत होते, त्यांना गांधीजींचे आवाहन होते. गांधीजींच्या उपोषणाने आणि त्यानंतरच्या कार्यक्रमाने सवर्णांच्या मनात परिवर्तनाची ज्योत पेटवली. गांधी आणि आंबेडकर या दोघांच्याही समाज परिवर्तनाच्या भूमिकांपर्यंत जाऊन डॉ कसबे यांनी मांडणी केली असती तर ते आजच्या जातीप्रथा विरोधी कार्यक्रमांना मार्गदर्शक ठरले असते. पण तसे काही करण्याचा प्रयत्न या पुस्तकात झालेला नाही.

यानंतर डॉ.कसबे परत एकदा ईश्वर, ‘भगवतगीते’ची चर्चा सुरू करतात. गांधींना ते आत्मपीडक म्हणतात. गांधी भारतीयांना का प्रभावित करू शकले याची कारणे देताना ते लिहितात- ‘गांधीजींना स्वत:ची अशी काही मते नव्हती आणि तत्त्वज्ञानही नव्हते. त्यांच्याकडे जे काही होते ते ईश्वरदत्त. त्यांच्यातील या ईश्वरदत्त शक्तीमुळेच भारतीयांसारख्या अंधश्रद्ध परंतू धार्मिक समूहांना ते प्रभावित करू शकले.’ (पान ५१६). ईश्वरदत्त म्हणजे ते ईश्वराचा विस्तार मानत असत असे डॉ.कसबे यांचे म्हणणे आहे. या आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही. अद्वैती माणूस हे मानणारच. मी आणि ईश्वर किंवा मी आणि तू असे द्वैत नाहीच. यात आत्मपीडक वृत्ती कुठून येते. मात्र वरील वाक्यातून काही प्रश्न निर्माण झाले. आजही भारतात धार्मिक आणि अंधश्रद्ध नसलेले कोणते समूह आहेत? भारतीय संसदेत निवडून येणाऱ्या डाव्या मंडळीना धार्मिक, अंधश्रद्ध मतदान का करतात? स्वत:ची मते आणि तत्वज्ञान नसलेल्या गांधींकडे त्या काळातले  प्रखर बुद्धिवादी, सुशिक्षित, नास्तिक, अर्थतज्ज्ञ, कायदेतज्ज्ञ, शिक्षणतज्ज्ञ, वैज्ञानिक का आकर्षित झाले? या प्रश्नांवर डॉ.कसबे यांच्या हातून काही काम झाले असते, तर भारतीय समाज आणि गांधी या दोघांच्या खोलात शिरण्याचा प्रयत्न झाला असता.  

मला अपेक्षित असलेले मत आणि तत्त्वज्ञान नसेल तरी हरकत नाही. त्या व्यक्तीकडे मत आणि तत्त्वज्ञान नाहीच, असा शेरा न मारता मी त्यांच्या विचारांचे आणि मतांचे मूल्यमापन करेन,  ही अभ्यासकांची वैचारिक शिस्त असते. ज्याचा अभाव डॉ.कसबे यांच्याकडे प्रकर्षाने जाणवतो.

आंबेडकरांची धर्मांतराची घोषणा, त्यावरून उठलेला गदारोळ, त्यांचे ‘जातपात तोडक मंडळा’त न झालेले भाषण या सर्वांचे तपशील सविस्तरपणे येतात. त्यावरील गांधी-आंबेडकरांची चर्चा  येते. या चर्चेच्या ओघात डॉ. कसबे लिहितात- ‘बाबासाहेब आंबेडकर स्वत:ला समाजवादी म्हणवून घेत होते.’ त्यापुढे ते लिहितात- ‘अनेक मोठ्या मोठ्या समाजवाद्यांना आंबेडकर समाजवादी होते, हे माहीत नव्हते. त्यांना ते एका जातीचे नेते आणि गांधी विरोधक एवढेच वाटत होते, याची कबुली समाजवादी नेते आणि विचारवंत साथी मधू लिमये यांनी त्यांच्या ‘प्राईम मुव्हर्स’ या ग्रंथात देउन आंबेडकरांवर सर्वांत मोठा लेख लिहिला आहे.’ (पान ५५७). अतिशय खेदाने हे लिहावे लागत आहे की, मधू लिमयेंच्या ‘प्राईम मुव्हर्स’ पुस्तकातील डॉ. आंबेडकरांवरील लेखात असा कबुलीजबाब आढळत नाही. उदधृत केलेली वचने पुस्तकात असणार हे गृहीत धरून वाचकाकडून चर्चा केली जाते. पण येथे असे गृहीत धरणेही चुकीचे ठरले आहे.

त्यानंतर मार्क्स आणि गांधी या विषयाला डॉ.कसबे सुरुवात करतात. त्यातच एक विधान येते. ‘ते स्वत:ला कोणतीही बिरुदे लावायला तयार असत.’ (पान ५५८). यानंतर डॉ.कसबे लिहितात- ‘गांधीजींना समाजवाद एक चेष्टेचा विषय वाटत होता आणि काँग्रेसमधील समाजवादी  मंडळी त्यांच्या उपहासाचा विषय होती.’ (पान ५५९). नेहमीप्रमाणे या वाक्यांना पूरक पुरावे दिले नाहीत. काँग्रेसमधील समाजवादी गटातील नरेद्र देव, लोहिया, जयप्रकाश ही मंडळी गांधींच्या जवळची होती. लोहिया आणि जयप्रकाश तर पुत्रवत होते. असो. मात्र हे वाक्य लक्षात ठेवू. याचा संदर्भ पुढे येईल. मार्क्सची तुलना करण्याच्या ओघात डॉ. कसबे लिहितात- ‘गांधीजींची पाश्चात्य संस्कृतीवरील टीका मुळात भांडवलशाही अर्थव्यवस्थेवरची आहे. ती पाश्चिमात्य संस्कृतीला भिडविल्याने हास्यास्पद झाली आहे.’ परत एकदा सत्याग्रहाची कल्पना पाश्चिमात्य कल्पनेतून विकसित पावली, यावर ते लिहितात. या पुढे अशा विधानांची माळच रचली आहे. आता आपण ती विधाने बघू

‘गांधीजींनी देश जागृत केला, परंतू कशासाठी? हा प्रश्न शेवटपर्यंत अनुत्तरीत राहिला. तो जागृत होउनही भारतीय व्यवस्थेवर साधा ओरखडाही उमटला नाही.’ (पान ५६४).

‘गांधींजींच्या अतिरेकी अहिंसेमुळे जमीनदार आणि भांडवलदार भयमुक्त झाले.’ (पान ५६४).

‘गांधीजींनी फक्त १९२० साली सुरू केलेली असहकाराची चळवळ चौरीचौर्याचे निमित्त करून थांबविली नसती आणि तिला तिच्या नैसर्गिक पद्धतीने पुढे जाऊ दिले असते तर क्रांती होऊ शकली असती.’ (पान ५६४) हे विधान म्हणजे ‘आत्याबाईला मिशा असत्या तर...’सारखे आहे.

लढाईसाठी किंवा सशस्त्र क्रांती करायला कोणाकडे हत्यारे होती? वस्तुस्थिती अशी आहे की, १८७८च्या आर्म्स अ‍ॅक्ट नुसार संपूर्ण देश निशस्त्र केला गेला होता. १८५७ची लढाई इस्ट इंडिया कंपनीची फौज आणि बंडवाल्यांत होती. १९२०मध्ये ब्रिटिश फौजा होत्या. अशा प्रकारची वाक्ये लिहिण्याच्या भरात डॉ.कसबे गोंधळ करतात. क्रांती ही कधीच नैसर्गिक घटना नसते. निसर्गनियमात उत्क्रांती असते. क्रांती ही क्रांतिकारक मंडळी नियोजनपूर्वक घडवून आणतात. चौरीचौर्याच्या वेळी क्रांती करण्याचे कोणी नियोजन केले होते का? दंगल-जाळपोळ करून क्रांती होते का? सामान्य जनतेला भडकावून दंगल जाळपोळ करता येईल, पण क्रांती न होता सामान्य जनता होरपळून निघेल.

भारतीय परिस्थितीत अहिंसा हे तत्त्व म्हणून बाजूला ठेवले, तरी सामान्य माणसाच्या सहभागातून ब्रिटिश सत्तेला आव्हान देण्याचे ते उपयुक्त आणि योग्य प्रतिकाराचे साधन होते, याचे भान त्या काळातील भारतीय नेत्यांना होते. अजून एक लक्षात घेण्यासारखा मुद्दा असा आहे की, चौरीचौरानंतर दहा वर्षांनी मिठाचा सत्याग्रह झाला. ब्रिटिशांनी पाशवी अत्याचार केले, मात्र चौरीचौरासारखा प्रसंग पुन्हा घडला नाही. म्हणजे त्या दहा वर्षांत भारतीय जनता शिकली, हे किती महत्त्वाचे आहे. तसेच शांततामय मार्गाने लढलेला स्वातंत्र्याचा लढा हे भारतीय लोकशाही इतकी वर्षे टिकण्याचे प्रमुख कारण आहे हे विसरून चालणार नाही.

जनतेला खऱ्या अर्थाने हृदयपरिवर्तनाचा मार्ग शिकवल्यावर, त्याची सवय लावल्यावर लोकशाही अधिक सशक्त आणि व्यवस्था संवेदनाक्षम बनते, याची अनुभूती स्वातंत्र्यानंतर आली. मात्र एखाद्या कृतीच्या  दूरगामी परिणामांबाबत डॉ.कसबे या पुस्तकात मांडणी करत नाहीत.  तसेच ‘व्यवस्थेवर साधा ओरखडा उमटला नाही...’ हे वाक्य सुचण्यापर्यंत डॉ.कसबे काय विचार करतात हे मांडले असते तर त्यांची नक्की भूमिका कळली असती. मात्र भूमिकेशिवायचे विधान हे वैचारिक शिस्तीला धरून नसते. त्यास विधान म्हणण्यापेक्षा शेरेबाजी म्हणणे अधिक योग्य होईल. 

भारतात गांधीजींमुळे क्रांतीकारी चळवळ अवरुद्ध झाली, या निष्कर्षाला येताना, जर असे केले असते तर असे झाले असते, अशा प्रकारची खूप मांडणी करतात, पण मुळात डॉ.कसबे यांना अभिप्रेत असलेली क्रांती गांधींना अभिप्रेत होती का? जर ती नसेल तर गांधी डॉ. कसबे सांगतात तसे कसे वागतील? डॉ.कसबे म्हणतात- ‘समाजवादी क्रांती ही त्या वेळी हिंदू आणि मुस्लीम शेतकऱ्यांची आणि कामगारांची गरज होती. ती गरज जर गांधींच्या नेतृत्वाखाली पूर्ण झाली असती, तर संपूर्ण जगाला एका नवीन धडा मिळाला असता. आणि कॉ. लेनिनच्या अगोदर जगाने गांधींचे नाव उच्चारले असते.’ (पान ५६५). त्या काळात ही गरज होती, हे कशावरून? ठीक आहे. गांधींनी नाही केली क्रांती, पण त्या वेळी भारतात साम्यवादी मंडळी होती. शेतकरी कामगारांची समाजवादी क्रांती ही गरज होती, तर ती गरज साम्यवाद्यांना का कळली नाही? त्यांनी का केली नाही क्रांती? त्यांना कोणी रोखले होती? शेतकरी आणि कामगारांची क्रांती ही गरज असताना काहीच का घडलं नाही, यावर डॉ.कसबे यांनी लिहिलं असतं, तर त्याला भारतीय परिस्थितीचे विश्लेषण म्हणता आलं असतं.

..................................................................................................................................................................

उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअ‍ॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...

हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal

................................................................................................................................................................

गांधी-आंबेडकर संबंध पुढे कसे होत गेले याबद्दल डॉ.कसबे लिहितात - ‘१९३७ साली डॉ.आंबेडकरांच्या स्वतंत्र मजूर पक्षाला बऱ्यापैकी जागा मिळाल्या. मात्र १९४६ साली त्यांच्या शेड्यूल कास्ट फेडरेशन या राजकीय पक्षाला पूर्ण अपयश आले. म्हणून त्यांनी स्वतंत्र मतदार संघाची मागणी सुरू केली.’ (पान ५६५). आपल्या पक्षाला अपयश आल्यावर १९४६ साली डॉ.आंबेडकरांना स्वतंत्र मतदारसंघाच्या मागणीचा दबावतंत्र म्हणून वापर करून कोणती मागणी  पदरात पाडून घ्यायची होती? स्वतंत्र मजूर पक्ष विसर्जित करून त्यांनी शेड्यूल कास्ट फेडरेशन नावाचा विशिष्ट जातींनाच सामावणारा पक्ष का निर्माण केला? याबाबत डॉ.कसबे काहीच लिहीत नाहीत.

क्रिप्स मिशनने डॉ.आंबेडकरांची मागणी मान्य केली नाही. नाकारण्याच्या कारणांमध्ये एक महत्त्वाचे कारण होते की डॉ.आंबेडकरांचा पक्ष मुंबई आणि मध्य प्रांतात आहे. ब्रिटिश सरकारशी कायम सहकार्य करणाऱ्या आंबेडकरांना सत्तांतराच्या वाटाघाटीच्या वेळी त्यांनीच खड्यासारखे दूर केले. आपण समाजवादी आहोत, हे जाहीर करणाऱ्या आंबेडकरांना भारतीयांचा तिरस्कार करणाऱ्या हुजूर पक्षीय चर्चिल यांच्याकडे मदत मागावी  लागली. चर्चिलने त्यांचे कौतुक केले मात्र मदत मिळाली नाही. ‘डॉ.आंबेडकरांनी १५ जुलै १९४६ रोजी पुण्यातील विधिमंडळावर मोर्चा नेला. या वेळी आंबेडकरांनी एक पत्रक काढले की, काँग्रेसने जर अस्पृश्यांच्या हिताच्या योजना जाहीर केल्या नाहीत तर अस्पृश्य लोकही ‘डायरेक्ट अ‍ॅक्शन’चा अवलंब करतील.’ (पान ५७४).

भारतात १९४६च्या स्फोटक परिस्थितीत दलितांनी डायरेक्ट अ‍ॅक्शनची धमकी देणे म्हणजे सवर्ण विरुद्ध दलित हे खऱ्या अर्थाने युद्ध सुरू झालं असतं, तर सवर्णांना नमवून विजयी होण्याची दलितांची खेडोपाडी ताकद होती का? याबद्दल डॉ. कसबे मत व्यक्त करत नाहीत. आणि लगेच दहा दिवसांनी २५ जुलैला पत्रकार परिषदेत डॉ.आंबेडकर मांडतात की, ‘घटना समितीत मला जायची इच्छा आहे... माझी गेल्या २५ वर्षातली कामगिरी ओळखून मला घेतले जावे.’ (पान ५७५). डॉ.आंबेडकरांच्या या घटनाक्रमावर डॉ.कसबे भाष्य करत नाहीत. नंतर लेस्टरबाई भारतात येतात, बोलणी होतात. गांधी-आंबेडकरांचे नाव सुचवतात. डॉ.आंबेडकर कायदामंत्री होतात, याची सविस्तर माहिती देऊन हा भाग येथे संपतो.

तिसरा भाग हा गांधींच्या खुनापर्यंत आहे. सत्तांतराच्या वाटाघाटी, कलकत्ता, बिहार, दिल्ली येथील दंगली शमवणे, नोआखलीतील प्रसंग, सत्तांतर असे अनेक विषय आहेत. या सर्वाआधी ‘स्त्रियांच्या सहवासात’ हे ७३ पानांचे प्रकरण आहे. यामध्ये गांधींजींच्या जीवनात आलेल्या स्त्रियांवर सविस्तर माहिती दिली आहे. तत्पूर्वी माणसाच्या नैसर्गिक प्रेरणा कोणत्या, समाज निर्माण होताना कामवासनेवरील नियंत्रण पद्धतीत झालेले बदल, कामवासनेच्या स्वरूपावर कार्ल मार्क्स काय म्हणतो, फ्रॉईड, युंग, एरिक फ्रॉम, एलीस, ओशो काय म्हणतात, भारतातील तंत्राविधी कधी सुरू झाला, मार्क्सने त्याच्या पत्नीला जेनीला लिहिलेले पत्र, पुन्हा एकदा गांधींचे अध्यात्म, मोक्ष, त्यांचा ईश्वर अशा अनेक तपशिलाने अवकाशभरणी झाली आहे.

त्यानंतर गांधींच्या जीवनात आलेल्या स्त्रियांबद्दल स्त्रियांवर सविस्तर लिहिले असून मनुबेन सोबतच्या नोआखलीतील प्रसंगावर भाष्य केले आहे. एखाच्या व्यक्तीच्या स्त्रियांच्या सहवासाबद्दल लिहिताना काही मुद्दे ध्यानात घ्यायला हवेत. प्रथम हे स्पष्ट मांडायला हवे होते की, गांधी असे एकच नेते होते ज्यांनी आपल्या खाजगी जीवनाबद्दल, सहवासातील स्त्रियांबद्दल स्वत:च लिहून ठेवले आहे. सहकाऱ्यांना लिहून कळवले आहे. इतर कोणत्याही नेत्याने लिहिलेले नाही. आपण एक लक्षात ठेवायला हवे की, नेत्याला करिष्मा असतोच, त्याच्याकडे सर्वालिंगी माणसे आकर्षित होत असतात. त्यातील काहींना त्या नेत्याबद्दल अधिक तीव्र आकर्षण वाटत असते. त्यामुळे ज्यांनी लिहिले नाही त्यांच्या सहवासात स्त्रिया आल्याच नाहीत, असे म्हणता येणार नाहीत.

पुढचा मुद्दा असा आहे की, त्या काळात देशकार्यासाठी महिला प्रथम घराबाहेर पडत होत्या. त्या काळात स्त्री-पुरुष संबंधांवर, भिन्नलिंगी मैत्रीबाबत भारतात चर्चाही सुरू झालेल्या नाहीत, हे लक्षात घेऊन विश्लेषण करताना काळाचा संदर्भ सोडून चालणार नाही. सर्वांत महत्त्वाचा मुद्दा हा आहे की, गांधींच्या सहवासात स्त्रियांमुळे त्यांच्या सामाजिक किंवा राजकीय जीवनातील निर्णयावर काही परिणाम झाला का? ते बदलले का? गांधींनी आपले आंदोलनाचे निर्णय या सहवासातील स्त्रियांमुळे किंवा त्यांच्या प्रभावामुळे  बदलले किंवा घेतले गेले, अशी स्थिती आहे का? याची चर्चा या प्रकरणात नाही. जर महिलांचे प्रभाव गांधींच्या निर्णयशक्तीवर सिद्ध होऊ शकत नसतील, तर गांधींच्या व्यक्तिगत जीवनात आपण किती ढवळाढवळ करावी, याचा निर्णय विवेकाने घ्यायला हवा, कारण यातून निष्कर्ष काहीच निघत नसतो  आणि  ती चर्चा गॉसिप पातळीवर राहते.   

डॉ.कसबे आता पुस्तकाच्या शेवटाकडे येत आहेत. ते लिहितात- ‘गांधीजींना हे जाणवत होते की, काँग्रेसमध्ये विविध विचारांच्या आणि विविध हितसंबंध जोपासणाऱ्या लोकांची भाऊगर्दी झालेली होती.’ ते पुढे लिहितात- ‘त्या दृष्टीने काँग्रेसचे ‘लोकसेवा संघा’त रूपांतर करावे किंवा काँग्रेसचे अध्यक्ष जयप्रकाश नारायण किंवा नरेंद्र देव यांना करावे असा गांधींनी सल्ला दिला. या दोघांची समाजवादी विचारासरणीवर निष्ठा होती.’ (पान ७३७). आपल्याला आठवत असेल की, पान नंबर ५५९वर डॉ. कसबे म्हणतात- ‘गांधींना समाजवाद हा चेष्टेचा विषय वाटत होता आणि काँग्रेसमधील समाजवादी मंडळी त्यांच्या उपहासाचा विषय होती.’ गांधीजींना जी मंडळी उपहास करण्याच्या लायकीची वाटत होती, त्यांना गांधी काँग्रेसचे अध्यक्ष कसे करतील? या परस्परविरोधी विधानांमधील सुसंगती दाखवण्यासाठी मधली दीडशे पाने असतील तर हे पुस्तक वैचारिक शिस्तीला धरून आहे, असे म्हणता येते. या शेवटच्या भागात देशात घडत राहिलेल्या दंगली, गांधींचे उपोषण, नेहरू पटेलांमधील मतभेद इत्यादी गांधींच्या खुनाच्या क्षणापर्यंतची माहिती इथे दिली आहे.

आता आपण पुस्तकाच्या अगदी पहिल्या भागाकडे म्हणजे प्रस्तावानेकडे वळू. सहसा लेखक आपण हे पुस्तक का लिहीत आहोत, हा उद्देश मांडून एकंदर पुस्तकाची रचना आणि त्यासंबंधीच्या अभ्यासाबद्दल लिहितात. तसेच आजच्या काळाच्या संदर्भात या पुस्तकाचे काय मोल आहे, हे लेखक मांडतोच. डॉ.कसबे यांनी जाहीर केले आहे की, हे त्यांचे शेवटचे पुस्तक आहे. प्रस्तावनेत अनेक लेखक, शास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ काय म्हणतात ही वचने उदधृत करून त्यांना आजच्या काळाशी जोडत ते कृत्रिम बुद्धिमत्ता, हरारे यांनी केलेली भाकिते वगैरे सर्व विषय डॉ.कसबे मांडतात. मार्क्सवाद काय सांगतो, याची मांडणी त्यांनी चार पानात केली आहे. नव्या दर्शनाची गरज मांडून जागतिक पातळीवर विचारवंतांमध्ये संवाद सुरू होण्याची गरज मांडली आहे. भावी काळात सामान्य माणूस लढेल तेव्हा तो गांधींचे सत्याग्रहाचे हत्यार वापरेल की, आंबेडकरांना अभिप्रेत असलेले सत्याग्रहाचे हत्यार वापरेल ते आज सांगता येणार नाही. पण सामान्य माणूस आपल्या मानवी हक्कासाठी लढणारच आणि गोडसेच्या गोळ्यांनी सांडलेले रक्त वाया जाणार नाही, असा आशावाद व्यक्त करून डॉ. कसबे प्रस्तावना संपवतात. डॉ.कसबे यांनी पुस्तकातील मजकुरात गांधींबद्दल सैलसर विधाने कशी केली आहेत ते आपण परीक्षणात पाहिले. याची सुरुवात या प्रस्तावनेतून कशी झाली आहे ते बघू.

‘राष्ट्रप्रेमासाठी पहिल्यांदा भारताला राष्ट्र बनवावे लागेल, याची जाणीव आंबेडकरांनी गांधींना करून दिली.’ (पान २३)

‘आंबेडकरांच्या घणाघाती टीकेमुळे काँग्रेसमधील पहिल्या पिढीचे नेतृत्व खुजे बनण्याबदली विकसित होत गेले.’ (पान २४)

‘गांधी-आंबेडकर संघर्षात आंबेडकर बदलले. त्यांनी समाजातील एका गटाचे राजकारण करण्याऐवजी ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रश्नांवर विचार करू लागले.’ (पान २४)

‘गांधीजी ज्या प्रस्थापित समाजशक्तींच्या वाघावर १९२० सालापासून स्वार झाले होते, तो वाघ नरभक्षक होता. त्याला श्रमिकांच्या घामाची आणि माणसांच्या रक्ताची चटक लागली होती. गांधींना नव्या भारतासाठी नव्या समाजशक्तीवर स्वार व्हायचे होते. ते त्याच्या पाठीवरून उतरण्याच्या प्रयत्नात खाली कोसळताच त्या वाघाने त्यांना गिळंकृत केले.’ (पान ३७)

काय सांगते हे वाक्य? स्वातंत्र्यप्राप्तीसाठी गांधींनी श्रमिकांना लुबाडणाऱ्या आणि दंगली करून रक्तपात करणाऱ्यांना हाताशी धरले होते? का त्यांच्यावर स्वार होऊन लुबाडणूक आणि रक्तपात करायला गांधी मार्गदर्शक होते? एखाद्या गुंडाच्या टोळीतील एक गुंड बाहेर पडला की, त्याला खतम करतात, तसे त्या शक्तींनी गांधींना मारून टाकले? उपमा, अलंकारांची वाक्य रचना करताना अतिशय जपून आणि विचार करून करावी लागते, कारण रूपाकांमधून अनेक अर्थ निघू शकतात.

अशा रक्ताला चटावलेल्या माणसांची मदत घेणाऱ्या माणसाला डॉ.कसबे ‘महामानव’ का म्हणतात हे समजत नाही. नेहमीप्रमाणे अशा विधानांना पुराव्याची पूरक विधाने नाहीतच. जसे पहिल्या विधानात, राष्ट्र ही संकल्पना गांधींना आंबेडकरांमुळे कळली असे डॉ.कसबे म्हणतात. १९१९ साली काँग्रेसची पूर्ण नवीन घटना गांधींनी लिहिली. काँग्रेस त्या घटनेद्वारेच खेड्यापाड्यात पोचवली. राष्ट्र या संकल्पनेच्या स्पष्टतेशिवाय ही कृती होऊ शकत नाही, हे आपण मान्य करायला हरकत नसावी आणि त्या वेळी डॉ.आंबेडकरांचा भारतीय राजकारणात प्रवेश झालेला नव्हता.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

डॉ.कसबे यांना अशी वाक्ये लिहिताना तपशील तपासून घ्यावा असं वाटलं नाही का? कारण काँग्रेसची घटना लिहिण्याचा प्रसंग त्यांनीच पुढे पुस्तकात मांडला  आहे. आपण पुढे काय लिहितो, आधी काय लिहून ठेवले आहे, याचे तारतम्य हरवलेले दिसते. असो.

मात्र प्रस्तावनेत असेच एक स्फोटक वाक्य सापडले. डॉ.कसबे लिहितात- ‘१४ ऑक्टोबर १९५६ रोजी धर्मांतराच्या वेळी आंबेडकरांच्या मनात गांधी होते. आपण गांधींना दिलेला शब्द पाळला याबाबत पत्रकार परिषदेत आंबेडकर धन्यता मानत होते.’ (पान २६). इतक्या संवेदनाक्षम घटनेबाबतची ही स्फोटक पण अतिशय मोघम वाक्ये आहेत. आंबेडकरांच्या मनात गांधी होते, असं आंबेडकरांबांनी कुठं लिहून ठेवले आहे का? का, असं डॉ.कसबे यांना वाटतंय. समजा असं वाटत असेल, तर या वाक्यापर्यंत आपण कसे येऊन ठेपलो, हे पुरेशा आशयाने मांडायला हवे होते.   

पुढच्या वाक्यात ते लिहितात की, गांधींना दिलेला शब्द पाळला, याबाबत आंबेडकर धन्यता मानत होते. याचा संदर्भ काय? आंबेडकरांनी गांधींना कोणता शब्द दिला? शब्द देण्यासाठी एकमत होण्यापर्यंत दोघांनी आपापसात काय चर्चा केली? धर्मांतराच्या विषयावर केली का? आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारण्यात गांधींची काही भूमिका होती का? असे प्रश्न ही वाक्ये वाचल्यावर उमटतात. एका बाजूने पाहिल्यास धर्मांतराच्या क्षणी आंबेडकरांच्या मनात गांधी असणे, त्यांनी संध्याकाळी जाहीर करणे की, गांधींना दिलेला शब्द पाळला म्हणून मी धन्य आहे. किती ग्रेट क्षण आहे हा! भगवान बुद्धाशी लीन होताना गांधी मनात असणे ही खरंच अपार काव्यमय घटना आहे. संवेदनाक्षम वाचकाला आनंदाने अद्वैताची अनुभूती येईल.

आणि दुसऱ्या बाजूने असं म्हणता येईल की, आंबेडकरांनी धर्मांतर करण्याचे जाहीर केले, ते वचन पाळले म्हणून ते धन्यता मानत होते का? शब्द दिला आणि करून दाखवला या पातळीवर धर्मांतर ही घटना असू शकते की, त्यापेक्षा उच्च पातळीवरील घटना आहे? धर्मांतर हे जसे व्यवहारातले असते, तसे ती एक श्रेष्ठ पातळीवरील मानसिक बदलाची घटना असते. वरील दोन वाक्यांतून गांधी, आंबेडकर आणि धर्मांतर याबद्दल डॉ कसबे नक्की काय सांगू पहात आहे हे पूर्ण संदिग्ध आहे. कारण डॉ.कसबे आपणच लिहिलेल्या वाक्याचे महत्त्व ओळखून घटनेच्या मुळापर्यंत जात नाहीत, तसेच संपूर्ण पुस्तकात या विषयावर काहीच लिहीत नाहीत. अशामुळे आपण काय लिहितोय? त्याचे महत्त्व काय? हे लेखकाला समजतंय का, अशी शंका वाटू लागते.

महाराष्ट्रात फुले, मार्क्स, गांधी, आंबेडकर यांच्या विचारांवर आणि त्यांच्या काळातील ताणेबाण्यांवर वैचारिक लिखाणाची सशक्त परंपरा आहे. वस्तुनिष्ठ विश्लेषण हे वैचारिक लिखाणाची प्राथमिक शिस्त मानली जाते. आपल्यापेक्षा वेगळ्या विचारांच्या व्यक्तीवर लिहिताना कोणत्याही मार्गाने त्याचे खंडन करणे, हा मार्ग वैचारिक परंपरेत बसत नाही. समोरच्या व्यक्तीच्या हेतूंवर शंका न घेता, त्या व्यक्तीच्या विचारांच्या धाग्यांची उकल करत, त्यातील अंतर्विरोध उलगडून दाखवत विरोधाचे मुद्दे व्यवस्थित मांडून विश्लेषण करता येते, हे महाराष्ट्रातील या परंपरेने सिद्ध केले आहे.

इतिहासाच्या पटाकडे तटस्थतेने बघून त्यातील घटनांचा निचोड काढून त्यातील आजच्या काळाला किती मार्गदर्शक आहे, हे सांगण्याचे काम अभ्यासकाचे असते. मात्र हे आठशे पानी पुस्तक आंबेडकरांना केंद्रस्थानी ठेवून गांधींवर लिहिले आहे. आंबेडकरांना तुम्ही प्रश्न विचारू शकत नाही, कारण पुस्तक गांधींवर असा एकंदर पुस्तकाचा रोख आहे. पुस्तकाची रचना अशी रचल्याने कहाणी छोटी पण पाने भरपूर अशी स्थिती झाली आहे. गांधीपूर्व काळावर प्रदीर्घ लिहिणे, मार्क्स-फ्रॉईड यांच्यावर सविस्तर लिहिणे, हिंदू धर्मातील ईश्वर, मोक्ष कल्पना यावर वारंवार गांधींची भूमिका म्हणून मांडून लिहिणे, या सगळ्याला मुरड घातली असती तर पुस्तक आटोपशीर करता आले असते.

गांधीजींच्या जीवनात किंबहुना आंबेडकर भारतीय राजकारणात येण्यापूर्वीपासून गांधींसाठी अस्पृश्यतेचा प्रश्न महत्त्वाचा होता. दक्षिण आफ्रिकेत गांधी ज्या मजुरांसाठी काम करत होते, ते सवर्ण होते का? साबरमती आश्रमातील प्रसंग तर सर्वश्रुत आहे. डॉ आंबेडकरांच्या टीकेमुळे, त्यांच्याशी झालेल्या संवादामुळे गांधीजींचा दृष्टीकोन बदलत गेला. मात्र गांधींचे जीवन आंबेडकरकेंद्री नव्हते. गांधींसमोर अनेक प्रश्न होते. ते एकाच वेळी अनेक प्रश्नांवर काम करत असत. स्वातंत्र्य चळवळीच्या नेतृत्वापासून ग्रामीण पुनर्रचनेच्या कामापर्यंत त्यांची अनेक कामे चालत असत. या पुस्तकात गांधींच्या सर्व चळवळींची धावती दखल घेतली आहे आणि रचनात्मक कामाबद्दल काहीच लिहिलेले नाही.   

गांधीजींचे सम्यकपणे आकलन करून आजच्या काळाला त्यातील काही मार्गदर्शक आहे का, याचा शोध घेण्याचे कामही हे पुस्तक करत नाही. तसेच भावी काळातील प्रश्नाबाबत विचार करण्याला येथे दिशा मिळू शकेल, अशी अपेक्षा ठेवल्यास ती फोल ठरते, याचे कारण विषयाची विशिष्ट रचना हे होय.

गांधी-आंबेडकरांच्या संबंधांचा विचार करताना या दोन बिंदूसोबत एक तिसराही महत्त्वाचा ताण बिंदू विसरला जातो. तो म्हणजे भारतातील ब्रिटिश सत्ता. भारतातील विविधता ही फूट पाडण्याची उत्तम संधी आहे, हे त्यांनी नेमके ओळखले. धर्म, भाषा, जाती, साक्षर निरक्षर असे अनेक विभाजन प्रकार त्यांनी तयार केले. समाजात विविधता होती, समाजात वाईट प्रथा आणि चालीरीती होत्या, मात्र या सगळ्याची समाजाला सवय झाली होती. त्यामुळे समाज स्थिर किंवा सुस्त होता. ब्रिटिश आल्यावर वैविध्यातील रेषा ठळक केल्या गेल्या. अरुंद फटी ठसठशीत केल्या गेल्या. सगळे मिळून एकत्र येउन काहीही होऊ शकत नाही. एकजुटीने प्रगती होऊ शकत नाही. ही हतबलता १८५७नंतर रुजवली गेली. प्रगती हवी असेल तर प्रत्येक जातीने, धर्माने आपल्यापुरते मागून घेण्यास प्रोत्साहन देण्यात आले. हा ब्रिटिश नावाचा ताणबिंदू स्वातंत्र्य चळवळीच्या विरोधात, काँग्रेसच्या विरोधात अल्पसंख्याकांना हाताशी धरून राहिला. हिंदू-मुस्लिमातील फरकाच्या रेषेचे तर त्यांनी भगदाड पाडले. तीच खेळी दलितांच्या विभक्त मतदारसंघाबाबत ब्रिटिश खेळले. अस्पृश्य समाजाचे हीत साधणे, त्यांचे पुनरुत्थान करणे, हा डॉ.आंबेडकरांचा प्रमुख प्राधान्याचा कार्यक्रम होता. त्यामुळे सत्ताधारी वर्गाशी सहकार्य करून ते आपला कार्यक्रम पुढे रेटत होते. ब्रिटिश नावाचा तणाव बिंदू काय काम करत होता, त्याचे परिणाम कसे होत गेले, याची दखल या पुस्तकात घेतलेली नाही. त्यामुळे त्या काळाच्या संदर्भातील विश्लेषण परिपूर्ण होत नाही, किंबहुना ते पांगळे होते.

स्वातंत्र्यानंतर गांधी-आंबेडकरांचा विचार करताना त्यांच्या स्वातंत्र्यपूर्व काळातील त्यांचे नाते पूर्ण पुसून वेगळा विचार करावा लागतो. पुस्तकाच्या विषयाची विशिष्ट रचना आणि गांधींच्या मृत्युपर्यंत पुस्तक मर्यादित केल्याने स्वातंत्र्योत्तर काळातील गांधी-आंबेडकर विचारावर विधान केलेले नाही. गेल्या दशकात दिवंगत डॉ.यशवंत सुमंत यांनी आपल्या लिखाण आणि कृतीतून हे काम लक्षणीयरीत्या केले आहे. 

भारतात ब्रिटिशांनी राज्य स्थापन केल्यावर पाश्चात्य सभ्यतेला विरोध करणारे एकटे गांधी होते. याचा अर्थ ते हिंदू संस्कृतीचे, जातपातीचे, अस्पृश्यतेचे कट्टर पुरस्कर्ते होते, असा अर्थ होत नाही. सहसा त्यांचे टीकाकार असा अर्थ घेतात. गांधींनी सलग ग्रंथरचना केली नाही. वेळोवेळी त्यांची मते अधिक विकसित होत गेली. त्यामुळे त्यांची कोणती मते घ्यावीत, हा गोंधळ होतो. बहुदा आपापल्या सोयीनुसार हव्या त्या काळातली मते निवडली जातात. उदाहरणार्थ गांधींची मोक्षाची कल्पना. डॉ.कसबे यांनी हिंदू धर्मातील मोक्षाची कल्पना गांधींना चिकटवून टाकली. त्यांनी मोक्ष शब्द जरूर वापरला, पण त्यांची कल्पना पूर्ण वेगळी होती. माझ्या आसपास वेदना, अन्याय असेल तर मी व्यक्तिगत पातळीवर मोक्ष मिळवू शकत नाही. आसपासच्या वेदनेचे, अन्यायाचे निराकरण करण्याचे काम करणे, हा मोक्षाचा मार्ग आहे ही त्यांची भूमिका होती. व्यक्तिगत मोक्ष त्यांनी सामाजिक केला. असो.

..................................................................................................................................................................

हेही पाहा\वाचा : प्रा. कसबे यांनी संशोधनपद्धतीच्या नियमांकडे दुर्लक्ष केले आहे. त्यांचे अनेक निष्कर्ष निराधार आहेत. या पुस्तकात परस्परविरोधी विधानांची उधळण आहे - श्याम पाखरे

..................................................................................................................................................................

गांधींच्या बाबतीत दोन मुद्दे मांडून विषय आवरता घेतो. गांधी समजून घ्यायला कठीण का पडतात? किंवा ते आपल्याला फसवत आहेत असे का वाटते? याचे कारण गांधी नसून त्यांचे विश्लेषक आहेत. भारतातील सर्व डाव्या चळवळी म्हणजे साम्यवादी, समाजवादी, आंबेडकरवादी आणि इतर डाव्या समजणाऱ्या चळवळींची वैचारिक मांडणी ही शत्रूलक्षी मांडणी आहे. भांडवलदार, जमीनदार, ब्राह्मण्य किंवा असाच कोणी याच्या विरोधात किंवा या वृत्तीच्या विरोधात वैचारिक रचना उभी केलेली आहे. शत्रूलक्षी मांडणी ही रूढ पद्धत आहे. या मांडणीची सर्व विषयांना कवेत घेणारी एक चौकट असते आणि वादप्रतिवाद या चौकटीच्या आत राहून होतात. या वेगवेगळ्या विचारधारांचा आकृतीबंध शत्रूलक्षी रचना असतो. या चळवळी परिवर्तनाचे आवाहन समाजाला करतात. सामान्य माणसाच्या हितासाठी कायद्यात बदल करण्यासाठी आग्रही असतात. वेळप्रसंगी सामान्य माणसाचे हक्क संपादन करण्यासाठी संघर्ष करतात.

गांधी या सगळ्यापासून वेगळे आहेत. त्यांनी कधीही शत्रूलक्षी मांडणी केली नाही. तरीही ते आपल्या मतांवर त्या त्या वेळी स्पष्ट राहिले. त्यांच्या कार्यक्रमात त्यांनी सर्वांना सामावले. तसेच गांधीजींचे परिवर्तनाचे आवाहन व्यक्तीला होते. त्या व्यक्तींचा मिळून समाज बनतो म्हणून आपण सर्वानी मिळून एक कृती करायची आहे ही भावना निर्माण होई. तू मिठाचा कर देऊ नकोस, तू खादी वापर, तू अस्पृश्यता पाळू नकोस, तू स्वतंत्र माणसासारखा वाग, या सर्व तूंचे मिळून एक आंदोलन तयार होत असे. गांधींजींची विचारपद्धती आणि कार्यपद्धती या वेगळ्या आहेत. तसेच साध्य आणि साधनांच्या शुद्धतेबद्दल ते आग्रही आहेत. या सगळ्यांच्या सुसंगत मेळातून गांधीविचार तयार होतो जो अतिशय लवचिक आहे, तसाच काटेकोरही आहे. म्हणून आजचे भयाण प्रदूषण, पराकोटीचा उपभोग, ऑटोमेशन आणि एआयच्या वातावरणात दिलासा देणारा आणि सामान्य माणसाचे आत्मभान जागृत करणारा गांधीविचार आहे, असे मांडणारी जगभरातली अनेक मंडळी आहेत. म्हणूनच आजच्या काळाच्या संदर्भात या पुस्तकाचे महत्व काय हा प्रश्न अनुत्तरीत राहतो.

लोकवाङ्मय गृह ही जुनी आणि प्रतिष्ठित संस्था आहे. अनेक महत्त्वाच्या पुस्तकांचे प्रकाशन या संस्थेने केले आहे. डॉ. कसबे यांच्या या पुस्तकाचे संपादन करणे गरजेचे असल्याचे पानोपानी जाणवते. या संस्थेकडे साक्षेपी जाणकार आणि अभ्यासू मंडळींची वानवा नाही. या मंडळींनी हे पुस्तक नजरे खालून घातले असते, तर आटोपशीर पुस्तक निर्मितीचे श्रेय संस्थेला मिळाले असते. आता मुखपृष्ठाबद्दल. एखादे  चित्र आपण बघतो म्हणजे काय करतो, याचे प्राथमिक ज्ञान चित्रकारांना आणि कलाशाळांमध्ये शिकलेल्यांना असते. संपूर्ण चित्र म्हणजे एक एकसंध कलाकृती आहे. तिच्यातील आकृत्या, रेखाटने, रंग यासर्वांचा मिळून एक मेळ आहे. ते सर्व मिळून एक चित्र आहे आणि त्या सर्व मिळून असलेल्या चित्राला मी बघत असतो. अगदी पिकासोचे ‘गर्निका’ हे चित्र घेतले, तर त्याचा एकसंध परिणाम बघताना होतो. त्यातील आकृती वेगळी काढून तिला वेगळे अस्तित्व देता येत नाही, कारण ती आकृती इतर आकृत्या, रंग, रेषा, रचना यांच्या संदर्भात असते.

या पुस्तकात गुलाम महंमद शेख याच्या ‘गांधी आणि गामा’ या तीन पॅनलवर पसरलेल्या भव्य चित्रातील काही भाग मुखपृष्ठावर घेतला आहे. मुखपृष्ठाच्या मध्यभागी एका विशिष्ट दिशेने बघणारे गांधीजी आहेत. ते तसे बघत आहेत, म्हणून त्यांची बसायची ठेवण तशी झाली आहे. पण ते कोणाकडे बघत आहेत, ते मूळ चित्रात असणार पण इथे तर तुकडा कापून ठेवल्याने मुखपृष्ठाबद्दल लिहिलेले वाचूनही मुखपृष्ठ अधांतरी आणि संदर्भहीन वाटते. मात्र गांधी या शब्दात चालणाऱ्या गांधींची बसवलेली आकृती खूपच आकर्षक झाली आहे, हे नमूद करायलाच हवे. बाकी आतील फोटोत तपशिलाच्या चुका आहेत त्या वेगळ्या. 

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

डॉ.कसबे हे महाराष्ट्रातील ख्यातनाम वक्ते आहेत हे प्रारंभीच मांडले आहे. वक्त्याचे श्रेष्ठत्व त्याच्या श्रोत्यांना मंत्रमुग्ध करण्याच्या हातोटीवर तपासले जाते. डॉ. कसबे यामध्ये खरंच अव्वल दर्जाचे आहेत, हे मान्य करायलाच हवे. श्रोत्याला मंत्रमुग्ध करण्यासाठी प्रथम श्रोता कोण आहे, हे ओळखून त्याला मंत्रमुग्ध करण्यासाठी काय आणि कधी बोलावे, याचे टायमिंग अचूक जमावे लागते. अशा वेळी आपल्या बोलण्याचा अर्थ काय निघतोय? त्याला पुरावे आहेत का? आपण परस्परविरोधी विधाने तर करत नाही ना? आपण विषयाला धरून बोलत आहोत ना? श्रोत्यांना आवडण्यासाठी विशेषणे वापरत आहोत, शेलकी भाषा वापरतोय ते कितपत बरोबर आहे? असे सगळे प्रश्न श्रोत्यांना मंत्रमुग्ध करण्यामध्ये दुय्यम असतात. वक्ता जेव्हा बोलत असतो, तेव्हा त्याच्या विचारासोबत त्याच्या  व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव मिसळून वाक्यरचना तयार होत असते.

या पुस्तकातील डॉ.कसबे यांची लेखनशैली मंत्रमुग्ध करणाऱ्या वक्तृत्वाच्या शैलीतील वाटते. वक्तृत्व आणि लिखाण ही भिन्न माध्यमे आहेत. त्यांची मांडण्याची शैलीही भिन्न असते. लिखाण अधिक शिस्तबद्ध, सुसंगत, स्पष्ट वस्तूनिष्ठ विश्लेषण करणारे असते. या पुस्तकात वैचारिक शिस्तीचा अभाव आहेच, त्याचबरोबर सातत्याने गांधींवर पुराव्याशिवायच्या शेलक्या विधानांची फवारणी केल्याने लेखकाचा लिखाणाचा अंत:स्थ हेतू वेगळा असल्याचे जागरूक वाचकाला जाणवू लागते. उत्तम वक्तृत्वाचा संदर्भ आलाच आहे, तर वक्तृत्वाच्या  संदर्भात गांधीजींच्या बाबतीत घडलेला प्रसंग सांगून लेख संपवतो.

गांधीजींचे खूपसे दात पडलेले होते. त्यामुळे त्यांचे उच्चार पटकन समजत नसत. तोंडाचे जवळजवळ बोळके होते. त्यांचे बोलणे पटकन कळत नसे. त्या वेळी माईक सिस्टीम आजच्यासारखी नव्हती. काही शे माणसांपुढे ते माईकशिवाय बोलतानाचे फोटो आहेत. एका मित्राने त्यांना विचारले, ‘तुझ्या बोलण्यात आवेश नाही, भडकावणारी भाषा नाही, चढउतार नाही, तुझं बोलणंही खूपदा समजत नाही. तुझं बोलणं ऐकायला लोकं का थांबतात?’ गांधी हसून म्हणाले, ‘तुझं म्हणणं सगळं बरोबर आहे. मात्र त्या लोकांना हे नक्की माहीत आहे की, हा बोलणारा माणूस जेवढं करू शकतो, तेवढंच बोलतो. म्हणून ते माझ्यावर विश्वास ठेवतात.’

‘गांधी : पराभूत राजकारणी आणि विजयी महात्मा’ - रावसाहेब कसबे

लोकवाङ्मय गृह, मुंबई, 

पाने - ८१०, मूल्य - १००० रुपये.

(‘सर्वंकष’ या त्रैमासिकाच्या जानेवारी-मार्च २०२२च्या अंकातून साभार)

..................................................................................................................................................................

लेखक विजय तांबे सामाजिक कार्यकर्ते आणि कथाकार आहेत.

vtambe@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ज्या तालिबानला हटवण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानात शिरकाव केला होता, अखेर त्यांच्याच हाती सत्ता सोपवून अमेरिकेला चालते व्हावे लागले…

अफगाण लोक पुराणमतवादी असले, तरी ते स्वातंत्र्याचे कट्टर भोक्ते आहेत. त्यांनी परकीयांची सत्ता कधीच सरळपणे मान्य केलेली नाही. जगज्जेत्या, सिकंदरालाही (अलेक्झांडर), अफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळवता आला नाही. तेथील पारंपरिक ‘जिरगा’ नावाच्या व्यवस्थेला त्याने जिथे विश्वासात घेतले, तिथेच सिकंदर शासन करू शकला. एकोणिसाव्या शतकात, संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेला अफगाणिस्तानात नामुष्की सहन करावी लागली.......

‘धर्म, जात, देश, राष्ट्र’ या शब्दांचा गोंधळ जनमानसात रुजवून संघ देश, सत्ता आणि समाजजीवन यांच्या कसा केंद्रस्थानी आला, त्याच्याविषयीचे हे पुस्तक आहे

या पुस्तकाच्या निमित्ताने संघाची आणि आपली शक्तिस्थाने आणि मर्मस्थाने नीटपणे अभ्यासून, समजावून घेण्याचा प्रयत्न परिवर्तनवादी चळवळीत सुरू व्हावा ही इच्छा आहे. संघ आज अगदी ठामपणे या देशात केंद्रस्थानी सत्तेत आहे आणि केवळ केंद्रीय सत्ता नव्हे, तर समाजजीवनाच्या आणि सत्तेच्या प्रत्येक क्षेत्रात संघ आज केंद्रस्थानी उभा आहे. आपल्या असंख्य पारंब्या जमिनीत खोलवर घट्ट रोवून एखादा विशाल वटवृक्ष दिमाखात उभा असतो, तसा आज.......

‘रशिया : युरेशियन भूमी आणि संस्कृती’ : सांस्कृतिक अंगानं रशियाची प्राथमिक माहिती देणारं पुस्तक असं या लेखनाचं स्वरूप आहे. त्यामध्ये विश्लेषणावर फारसा भर नाही

आजपर्यंत मला रशिया, रशियन लोक, त्यांचं दैनंदिन जीवन आणि मनोधारणा याबाबत जे काही समजलं, ते या पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावं, असा एक उद्देश आहे. पण त्यापलीकडे जाऊन हे पुस्तक रशिया समजून घेण्यात रस असलेल्या कोणाही मराठी वाचकास उपयुक्त व्हावा, अशीही इच्छा होती. यामध्ये रशियाचा संक्षिप्त इतिहास, वैशिष्ट्यं, समाजजीवन, धर्म, साहित्य व कला आणि पर्यटनस्थळे यांचा वेध घेतला आहे.......

‘हा देश आमचा आहे’ : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केलेल्या आणि प्रजासत्ताकाच्या अमृतमहोत्सवाच्या उंबरठ्यावर उभ्या भारतीय मतदारांनी धर्मग्रस्ततेचे राजकारण करणाऱ्या पक्षाला दिलेला संदेश

लोकसभेची अठरावी निवडणूक तिचे औचित्य, तसेच निकालामुळे बहुचर्चित ठरली. ती ऐतिहासिकदेखील आहे. तेव्हा तिच्या या पुस्तकात मांडलेल्या तपशिलांना यापुढच्या विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकांच्या वेळी वेगळे संदर्भमूल्य असेल. या निवडणुकीचा प्रवास, त्या प्रवासातील वळणे, निर्णायक ठरलेले किंवा जनतेने नाकरलेले मुद्दे व इतर मांडणी राजकीय वर्तुळातील नेते व कार्यकर्ते यांना साहाय्यभूत ठरेल, अशी आशा आहे.......

‘भिंतीआडचा चीन’ : श्रीराम कुंटे यांचं हे पुस्तक माहितीपूर्ण तर आहेच, पण त्यांनी इ. स. पूर्व काळापासून आजपर्यंतचा चीन या प्रवासावर उत्तम प्रकारे प्रकाशही टाकला आहे

‘भिंतीआडचा चीन’ हे श्रीराम कुंटे यांचे पुस्तक चीनविषयी मराठीत लिहिल्या गेलेल्या आजवरच्या पुस्तकात आशयपूर्ण आणि अनेक अर्थाने परिपूर्ण मानता येईल. चीनचे नाव घेताच सर्वसाधारण भारतीयाच्या मनात एक कटुता, शत्रुभाव आणि त्या देशाच्या ऐकीव प्रगतीविषयी असूया आहे. या सर्व भावना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आपल्या विचारांची दिशा ठरवतात. अशा प्रतिमा ठोकळ असतात. त्यांना वस्तुस्थितीच्या छटा असल्या तरी त्या वस्तुनिष्ठ नसतात.......

शेतकऱ्यांपासून धोरणकर्त्यांपर्यंत आणि सामान्य शेतकऱ्यांपासून अभ्यासकांपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा ‘ज्वारी’कडे वळवण्यासाठी...

शेती हा बहुआयामी विषय आहे. त्यातील एका विषयांवर विविधांगी अभ्यास करता आला आणि पुस्तकरूपाने वाचकांसमोर मांडता आला, याचं समाधान वाटतं. या पुस्तकात ज्वारीचे विविध पदर उलगडून दाखवले आहेत. त्यापुढील अभ्यासाची दिशा दर्शवणाऱ्या नोंदी करून ठेवल्या आहेत. त्यानुसार सुचवलेल्या विषयांवर संशोधन करता येईल. ज्वारीला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणकर्त्यांनी धोरणात्मक दिशेने पाऊल टाकलं, तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.......