गांधींवर आणि त्यांच्या कार्यावर टीका करण्याला विरोध नाही, प्रश्न आहे- डॉ. रावसाहेब कसबे वस्तुनिष्ठ विश्लेषण करतात किंवा वैचारिक लिखाणाची शिस्त पाळतात का? (पूर्वार्ध)
ग्रंथनामा - बुक ऑफ द वीक
विजय तांबे
  • ‘गांधी : पराभूत राजकारणी आणि विजयी महात्मा’ या ग्रंथाचे मुखपृष्ठ
  • Mon , 25 April 2022
  • ग्रंथनामा बुक ऑफ द वीक गांधी : पराभूत राजकारणी आणि विजयी महात्मा Gandhi - Parabhut Rajkarni aani Vijayi Mahatma रावसाहेब कसबे Raosaheb Kasabe

डॉ. रावसाहेब कसबे यांनी गांधीजींवर लिहिलेले ‘गांधी - पराभूत राजकारणी आणि विजयी महात्मा’ हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले. गेली काही वर्षे महाराष्ट्रात ‘मार्क्स, गांधी आणि आंबेडकर’ या विषयावर विविध ठिकाणी चर्चासत्रे, परिसंवाद झाले. यामध्ये डॉ. कसबे यांचा लक्षणीय सहभाग होता. त्यांचे ‘गांधी आणि आंबेडकर’ विषयावरील व्याख्यान अतिशय आकर्षक होत असे. श्रोत्यांना मंत्रमुग्ध करून टाकण्याची वक्तृत्व शैली डॉ. कसबे यांच्याकडे आहे. या विषयावर बोलताना ते अनेक प्रसंग, छोट्या छोट्या घटनांच्या पेरणीतून श्रोत्यांना भारावून टाकत. त्यामुळे त्यांच्या या पुस्तकाबद्द्ल वाचकांमध्ये चांगलीच उत्सुकता निर्माण झाली होती.

‘गांधी - पराभूत राजकारणी आणि विजयी महात्मा’ या पुस्तकाची एकंदर ७४१ पाने आहेत. त्यानंतर सविस्तर तळटीपा ४९ पानांच्या आहेत आणि प्रस्तावना ४२ पानांची आहे. एखाद्या विषयावर पुस्तक लिहिले जाते, तेव्हा विषयाला समग्रतेने कवेत घेऊन त्या विषयाचे अधिकाधिक सखोल आकलन मांडण्याचा प्रयत्न करण्यात येतो. त्याच वेळी पुस्तकाची दिशा ठरवणारा, लिहिण्याचा एक विशिष्ट उद्देश असतो. डॉ. कसबे यांनी तर पुस्तकाच्या शीर्षकातच उद्देश सांगून टाकलाय- ‘पराभूत राजकारणी आणि विजयी महात्मा’.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

मानवजातीच्या पुनरुत्थानाची आणि समाजपरिवर्तनाची विशाल उद्दिष्ट्ये घेऊन जेव्हा राजकारण केले जाते, तेव्हा ते सकृतदर्शनी पराभूत वाटणे स्वाभाविकच आहे. या पराभूतांची मांदियाळी आपल्याकडे कमी नाही. तथागत गौतम बुद्धांपासून सुरुवात केली, तर आताच्या काळात आपल्या आसपास समाजपरिवर्तनाचे निष्ठेने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांपर्यंत सगळे वरकरणी पराभूतच आहेत. आपण पराभूत होणार आहोत, आपल्या जीवनाच्या कालमर्यादेपेक्षा आपले ध्येय अतिशय विशाल आहे. आपल्या हयातीत ते काही टप्प्यापर्यंत जास्तीत जास्त पुढे जाऊ शकेल, आपण कायम पायाचे दगडच राहणार आहोत, याची पूर्ण जाणीव या काम करणाऱ्या व्यक्तींना असते. ही मंडळी आपल्या विचारांवर श्रद्धा ठेवून परिवर्तनाचे राजकारण करून आपले जीवन समृद्ध करत असतात. मग राजकारणात यशस्वी कोण आहेत, असा प्रश्न निर्माण होतोच. सत्ताप्राप्ती हेच उद्दिष्ट्य असलेले राजकारणी हे यशस्वी किंवा अयशस्वी असतात, पराभूत कधीच नसतात.

‘विजयी महात्मा’ हा शब्दप्रयोगही तसा खटकणारा आहे. विजयी होण्यासाठी स्पर्धा करावी लागते. त्यासाठी इतरांवर मात करावी लागते. हे सर्व करणे त्या व्यक्तीच्या करिअरचा भाग असते. ‘महात्मा’ व्हायचे म्हणून कोणी करिअर करत नसतो किंवा ही काही स्पर्धा परीक्षा नव्हे! ‘महान आत्मा’ म्हणजे ‘महात्मा’ हा शब्द असेल तर तो विजय आणि पराजयाच्या पलीकडील असतो. आणि एक नक्की, करिअर म्हणून कोणी महात्मा होऊ शकत नाही. असो.

पुस्तकाच्या ७४१ पानांचे डॉ. कसबे यांनी तीन भाग केले आहेत. पहिला भाग हा १९२० पर्यंतचा आहे. त्यामध्ये प्रामुख्याने दोन भाग आहेत- ‘गांधीपूर्व भारत’ (पाने १४७) आणि १९२० पर्यंतच्या गांधीजींच्या कामाचा आढावा १३२ पानांमध्ये घेतला आहे. भाग दोन ‘गांधी आणि आंबेडकर’ या शीर्षकाचा असून त्याची ३०८ पाने आहेत. डॉ. आंबेडकरांचे १९२३ला झालेले आगमन या भागात सामावून घेऊन या प्रदीर्घ भागाची मांडणी ‘अंतर्विरोधाच्या भोवऱ्यात महात्मा’, ‘डॉ. आंबेडकरांची राजकीय भूमिका’ आणि ‘आंबेडकरांशी केलेल्या संघर्षातून गांधींत आरपार बदल’ या तीन प्रकरणात झाला आहे. शेवटच्या म्हणजे तिसऱ्या भागाचे नाव आहे- ‘रक्तज्वालात अंतहीन प्रवास’. यातील तीन प्रकरणे आहेत- ‘स्त्रियांच्या सहवासात’, ‘अखंड वेदनादायी स्वातंत्र्य’ आणि ‘वन मॅन आर्मी’.

या पुस्तकातील पहिल्या भागात गांधीपूर्व भारताचा प्रदीर्घ इतिहास सिंधू संस्कृतीच्या उदयापासून सुरू केला आहे. उत्तरेतून येणारी आक्रमणे, वेगवेगळ्या राजांच्या लढाया, लुटालूट, धार्मिक पंथांचा उदय, अनेक विषयांवर भाष्य, अशा अनेक देश-विदेशातील घटनांचा आढावा घेऊन गांधीजींच्या आगमनापर्यंत हे प्रकरण आहे. यात मुस्लीम राजांनी बौद्ध मठांची आणि हिंदू मंदिरांची तोडफोड केल्याचे उल्लेख आहेत. मात्र या देशात सशक्त अशी ‘गंगाजमनी परंपरा’ होती, याचा उल्लेख आढळला नाही.

या प्रकरणाचा उद्देश मांडताना डॉ. कसबे लिहितात की, ‘भारतात येताना हिंदू-मुस्लीम ऐक्य, अस्पृश्यता निवारण आणि खादीचा प्रसार ही तीन ध्येये सोबत घेऊन गांधी आले. गांधीजींचे पहिली दोन ध्येये पूर्ण झाली असती, तरी भारताच्या आधुनिक कालखंडाने उपस्थित केलेली आव्हाने त्यांना सोडवता आली नसती. या आव्हानांची निर्मिती कशी झाली, हे समजून घेण्यासाठी भारतीय इतिहासाचा आढावा घेणे आवश्यक आहे.’ मात्र या भरपूर माहितीने भरलेल्या प्रकरणात विविध विषय येतात. तरीही भारताच्या आधुनिक कालखंडात हिंदू-मुस्लीम प्रश्न आणि अस्पृश्यता सोडून कोणती आव्हाने होती, याची नेमकेपणाने मांडणी येत नाही.

इतिहासाचा आढावा घेऊन डॉ. कसबे गांधी चरित्र आणि त्यांच्या दक्षिण आफ्रिकेतील काळाकडे वळतात. तेथे सुरुवातीच्या पानांमध्ये ते विधान करतात ‘गांधीजींच्या वयाच्या चाळीस वर्षांपर्यंत आयुष्याची विशेष दखल घ्यावी असे त्यात फारसे काही घडले नाही.’ (१२२) आणि पुढे पान १२८ वर कसबे लिहितात- गांधीजींनी दक्षिण आफ्रिकेतील भारतीय जनतेची सेवा सुरू केली. १९०४ साली फिनिक्स आश्रम स्थापन केला. पोल टॅक्स बिलाच्या विरोधात लढा पुकारला (म्हणजे वयाच्या ३५ व्या वर्षी). १९०६ सालच्या झुलू युद्धात ब्रिटिशांना मदत केली. अनेक जाहीर सभा घेतल्या. हरताळाचा पहिला प्रयोग यशस्वी केला (म्हणजे वयाच्या ३७व्या वर्षी). पान १३० वर डॉ. कसबे लिहितात- ‘त्यांनी १८९४मध्ये नाताळ इंडियन काँग्रेसची स्थापना केली.’ (म्हणजे वयाच्या २५व्या वर्षी). पान १२२ वर केलेल्या विधानाशी हे सगळं विसंगत वाटतं.

एखादा साधा माणूस वयाच्या २५व्या वर्षी संस्था स्थापन करत नाही, वयाच्या ३५व्या वर्षी अचानक आश्रम स्थापन करू शकत नाही किंवा हरताळाचा निर्णय अचानक होत नसतो. हे आपण समजू शकतो. गांधींनी आश्रम स्थापन केला म्हणजे काय केले? त्यामागे काय विचार केला? स्वत:च्या जीवनात काय संघर्ष आणि बदल केले? हरताळाचा निर्णय कसा घेतला? त्या कार्यक्रमाची आचारसंहिता काय होती? त्यामागे त्यांचा कोणता विचार होता? याच्या खोलात जाऊन डॉ. कसबे सलग भाष्य करत नाहीत.

‘गांधींनी सत्याग्रह आणि ‘पॅसिव्ह रेझिस्टन्स’ या दोन शब्दांतला फरक स्पष्ट करून ‘सत्याग्रह’ शब्द त्यांनी अधोरेखित केला, असे डॉ, कसबे मांडतात (पान १३२), मात्र हा नक्की फरक काय होता, याचे गांधींनी दिलेले स्पष्टीकरण उदधृत करत नाहीत. ते पुढे लिहितात- ‘या आठ वर्षाच्या काळात दक्षिण आफ्रिकेतील भारतीयांना गांधींनी कसे घडविले त्यापेक्षा गांधींना दक्षिण आफ्रिकेनेच अधिक घडविले असे दिसते.’ परंतू या ‘घडण्या’च्या आणि ‘घडविण्या’च्या प्रक्रियेचा वस्तूनिष्ठ तपशील त्यांच्या स्वत:च्या लिखाणात कुठेच विस्ताराने सापडत नाही. (१२३) गांधींना रेल्वेतून उतरवल्यावर त्यांनी केलेले चिंतन. घोडागाडीने प्रवास करताना कोचमन शेजारी बसण्याच्या हट्टाने गोऱ्या व्यक्तीने केलेली मारहाण आणि गांधींनी शांतपणे केलेला प्रतिकार. काळ्यांचे केस कापण्यास सलूनमध्ये नकार मिळाल्यावर त्याच्याशी न भांडता स्वत:चे केस स्वत: कापणे आणि त्याच स्थितीत कोर्टात जाणे. हे आणि यासारखे अनेक ‘घडण्या’चे प्रसंग त्यांच्या आत्मकथेत आहेत.

यासारख्या अनेक प्रसंगातून त्यांच्यामधील सत्याग्रहीची बीजे दिसतात. सत्याग्रही वृत्ती गांधींमध्ये पहिल्यापासून होती, हे आपल्याला आत्मकथा वाचताना जाणवते. त्यामुळे ‘पॅसिव्ह रेझिस्टन्स’ आणि ‘सत्याग्रहा’तला फरक हा स्थितीची अगतिकता आणि सत्याग्रहीचे आत्मबळ असा आहे, हे गांधी आपल्या वर्तनातून अतिशय स्वच्छपणे स्पष्ट करतात.

..................................................................................................................................................................

उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअ‍ॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...

हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal

................................................................................................................................................................

गांधीजींच्या ‘हिंद स्वराज्य’चा आढावा घेऊन डॉ. कसबे असे मांडतात की, ‘त्यांना कधीच चिकित्सक बनता आले नाही.’ (१३४). गांधीजींच्या काळात आणि नंतरही सर्व राष्ट्रीय नेते पाश्चात्य सभ्यतेने दिपून गेले होते. त्यांनी ‘हिंद स्वराज्य’मध्ये पाश्चात्य सभ्यतेची चिकित्सा केली आहे. गोखल्यांपासून नेहरूंपर्यंत सर्वांनी या पुस्तकावर टीका केली, मात्र गांधी आपल्या भूमिकेवर ठाम होते. पंचवीस वर्षांनंतरही त्यांनी आपल्या भूमिकेचे समर्थन केले. गांधीजींच्या चिकित्सक वृत्तीचे एक उदाहरण येथे मांडण्याचा मोह अनावर होत आहे. ख्रिस्ती धर्मोपदेशक गांधींना सांगतात की, तुम्ही ख्रिस्ती व्हा. येशू तुम्हाला पापांपासून मुक्ती देईल. त्या वेळी तरुण गांधी उत्तर देतात, ‘मला पापापासून मुक्ती नकोय. पाप निर्माण करणाऱ्या वृत्तीपासून मुक्ती हवी आहे.’ असो. इतकी नेमकी सखोल चिकित्सक वृत्ती असलेली ही व्यक्ती होती.

‘आधुनिक पाश्चात्य संस्कृतेने जागतिक स्तरावर मनुष्यजातीच्या विकासात नेमके काय योगदान दिले हे त्यांना समजून घेता आले नाही.’ (पान१३८) असे मत डॉ.कसबे मांडतात. महात्मा गांधी यांनी पाश्चात्य सभ्यतेवर अक्षरश: कोरडे ओढले आहेत, मात्र त्यांच्या अगदी प्रारंभीपासूनच्या सर्व सार्वजनिक जीवनाचा आढावा घेतल्यास त्यांना पाश्चिमात्य संस्कृतीचे आकलन स्पष्ट होते, असे आढळून येईल. न्याय, स्वातंत्र्य, बंधुता, समता ही त्यांची जीवन मूल्ये होती. गांधीजींनी धर्मग्रंथांचे शब्दप्रामाण्य नाकारले आणि आपल्या विचाराला जे पटेल त्याचा त्यांनी स्वीकार केला. भारतातील काँग्रेस पक्षाच्या उभारणीच्या काळात तळागाळातल्या, खेड्यातल्या माणसाला कमिटी बनवणे, मतदानातून माणसे निवडणे, सहमतीने कारभार चालवणे, हे प्रथम गांधींनी शिकवले. लोकशाहीची मूल्ये तळागाळापर्यंत पोचवण्याचे काम गांधींनी केले. अर्थात ते पाश्चात्य संस्कृतीचे अंधभक्त नव्हते, हे सर्वश्रुतच आहे, मात्र आधुनिकतेची मूल्ये त्यांनी नेमकी अंगिकारली होती.  

१९०६ ते १९१५ पर्यंतच्या घटनांचा आढावा डॉ. कसबे घेतात. स्त्रियांचा चळवळीतील सहभाग, सत्याग्रही वृत्ती, त्यांचे वाचन, मोठ्या संख्येतील सत्याग्रहींना घेऊन १८० मैल चालत जाणे, रस्त्यातील कोळसा खाणी बंद होणे, या सर्व प्रसंगांची डॉ. कसबे नोंद घेतात. गांधीजींचे वय वर्षे ३७ ते वय वर्षे ४६मधील हे झपाट्याने होणारे परिवर्तन त्यांच्यातील आंतरिक दृढता, वैचारिक स्पष्टता आणि विषयाशी असलेल्या गाढ बांधीलकीमुळेच होऊ शकले. मात्र डॉ. कसबे गांधींच्या या परिवर्तानाबाबत आपले मत नोंदवत नाहीत किंवा त्याची दखलही घेत नाहीत.

रेव्ह. डोक यांच्याशी केलेल्या ‘सत्याग्रह’ आणि ‘पॅसिव्ह रेझिस्टन्स’ यावर केलेली चर्चा नोंदवून डॉ. कसबे लिहितात- ‘गांधी हे फार अभ्यासू नेते नसले तरी त्यांचे चळवळींसंबंधीचे नियोजन, डावपेच इत्यादी गोष्टी गांधी अतिशय विचारपूर्वक ठरवत असत. एखाद्या प्रसंगाचा ‘इव्हेंट’ कसा बनवायचा आणि तिचा पद्धतशीर प्रचार कसा करायचा, याचे नियोजन गांधी उत्तम प्रकारे करत असत. आताच्या भाषेत बोलायचे तर गांधींएवढा ‘इव्हेंट मॅनेजर’ भारतीय राजकारणात कोणताही नेता होऊ शकला नाही.’ (पान १५३). गांधी फार अभ्यासू नव्हते म्हणजे नेमके किती होते आणि किती नव्हते, हे पुढे डॉ. कसबे यांच्या लिहिण्यात आलेले नाही. मात्र आंदोलनाचा विषय ठरवणे, आंदोलनाचा हेतू निश्चित करणे, त्याचा कार्यक्रम आखणे, नियमावली ठरवणे, या सर्वासाठी स्वच्छ दृष्टीने अभ्यास, विचारांची पक्की बैठक, चिंतन, अनुभव आणि जिंवत संवाद असावा लागतो, याबद्दल दुमत व्हायचे कारण नसावे. त्यामुळे डॉ. कसबेंना अपेक्षित असलेला अभ्यास गांधींकडून करायचा राहून गेला असे म्हणता येईल. इथे वाचकाच्या मनावर बिंबवले जात आहे की, फारसे अभ्यासू नसलेला हा ‘इव्हेंट मॅनेजर’ आहे. 

दक्षिण आफ्रिकेतील आंदोलनाबाबत टॉलस्टॉय यांना लिहिलेल्या पत्रातील उतारा डॉ.कसबे देऊन पुढे लिहितात- ‘गांधीजींचे टॉलस्टॉय यांना लिहिलेले पत्र ‘स्वत:ची जाहिरात, self-promotion करणारे होते, हे खरे.’ (पान १५६). गांधींनी टॉलस्टॉयला लिहिलेल्या पत्रात कुठेही माझी जाहिरात करा, माझं कौतुक करा असं परोक्ष किंवा अपरोक्ष कुठंच लिहिलेलं नाही. गांधीजींनी या पत्रात या लढ्याची जितकी जाहिरात करायची होती; तितकी मी करू शकलो नाही असे लिहून या लढ्याला जगात प्रसिद्धी देण्याचे आवाहन केले आहे. जगातल्या कुठल्याही लढ्याला, लढ्याच्या स्थानाच्या बाहेरून, जमल्यास जगभरातून पाठिंबा मिळवणे आणि आंदोलनाची ताकद वाढवणे हे आंदोलनाच्या नेत्याचे कर्तव्यच असते. म्हणजे आता डॉ.कसबे यांनी काय काय बिंबविले.. ‘फारसा अभ्यासू नसलेला, इव्हेंट मॅनेजर आणि स्वत:ची जाहिरात करणारा.’ डॉ. कसबे एकीकडे गांधीजींच्या कामाचा आढावा घेतात, त्याच वेळी अतिशय सैलसर वाक्यांतून वाचकांच्या मनावर काही वेगळेच बिंबवत राहतात.

पुढील प्रकरणातही हे कार्य ते चालू ठेवतात. ‘भारतीय जनतेच्या मनात स्वत:ची खास ओळख बिंबविण्यासाठी गांधींनी भारतात दोन महत्त्वाचे प्रयोग सुरु केले.’ (पान १८५). ‘गांधीजींचा डोळा या राष्ट्रसभेच्या परिघाबाहेर असलेल्या शेतकरी आणि कामगार वर्गावर स्थिरावला.’ (पान १८५) या दोन वाक्यांच्या मधले वाक्य आहे- ‘त्यातून त्यांच्या विलक्षण बुद्धिमत्तेची आणि सामान्य जनतेप्रती असलेल्या बांधिलकीची साक्ष मिळते.’ याचा अर्थ असा निघतो की, स्वत:चे नेतृत्व सिद्ध करण्यासाठी त्यांनी कामगार आणि शेतकरी वर्गाला वापरले. डॉ. कसबेंच्या मते आपले नेतृत्व सिद्ध करण्यासाठी कोणत्या फायदेशीर मार्गांचा वापर करायचा याचे ज्ञान असल्यास त्या व्यक्तीस विलक्षण बुद्धीमान म्हणावे.  

येथून पुढे महात्मा फुले आणि नारायणराव लोखंडे यांच्या कार्याचा विस्तृत आढावा घेऊन ‘सार्वजनिक सत्यधर्म’ आणि गांधींच्या ‘सत्याचे प्रयोग’ची तुलना करतात. एक वैचारिक पुस्तक आणि दुसरे आत्मचरित्र यांची तुलना मांडून झाल्यावर डॉ. कसबे लिहितात- ‘गांधी त्यांच्या आयुष्यात कधीही मानवी हक्कांबाबत भरभरून बोलले नाहीत. ते आपल्या अनुयायांना सतत कर्तव्याची जाणीव करून देत होते.’ (पान १९८). दक्षिण आफ्रिकेतील वीस वर्षे ते स्वातंत्र्य मिळेपर्यंतची लढाई गांधी कशासाठी लढत होते? ब्रिटिश साम्राज्याचा मी सन्माननीय नागरिक आहे, इथपासून मी स्वतंत्र नागरिक आहे, इथपर्यंत सगळी आंदोलने ही आत्मसन्मानाच्या हक्काचीच होती. गांधीजींच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून या हक्कांसाठी सामान्य माणूस - मग तो दक्षिण आफ्रिकेतील खाणीतला मजूर असो की, चंपारणमधील दरिद्री शेतकरी - जीव पणाला लावून उभा राहिला. त्यांना गांधीजींचा हक्काचा संदेश नेमका पोचला होता. त्याच वेळी आपण एक राष्ट्र आहोत, ही संकल्पना मूळ धरू लागली होती. ही कल्पना जोपासून घट्ट रुजवायची असेल तर त्या राष्ट्रातील नागरिकांना कर्तव्याची जाणीव करून देणे अगत्याचे असते, याचे भान गांधींना होते. ब्रिटिश साम्राज्याशी लढतानाच राष्ट्र उभारणीचे ते प्रशिक्षण देत होते.

गांधीजींचे उपोषण आणि ब्रह्मचर्य व्रत हे दोन्ही निसर्ग नियमांच्या विरोधी होते, असे मत डॉ. कसबे मांडतात. पण निसर्ग नियम काय आहेत हे मांडत नाहीत. मुळात उपोषण कोणत्या कारणांसाठी, कोणत्या परिस्थितीत करावे याबाबत गांधींनी सविस्तर लिहून ठेवले आहे. तसेच ब्रह्मचर्याबाबतही सविस्तर लिहून ठेवले आहे. गांधीजींच्या मतांची येथे नोंद न घेता त्यांच्या उपोषण आणि ब्रह्मचर्य व्रताबद्दल शेरेबाजी करतात. गांधीजींचे बनारस विद्यापीठातील ४ फेब्रुवारी १९१६चे भाषण कसे ऐतिहासिक होते आणि त्याचे परिणाम काय झाले, याचे विवेचन डॉ. कसबे करतात.

गांधीजी शेतकऱ्यांचे नेते बनले ते चंपारणमधील लढाईने. या आंदोलनाची नोंद डॉ.कसबे पाच ते सहा पानांत उरकतात. गांधीजींचे हे भारतातील पहिलेच आंदोलन. त्यावेळी ते महात्मा नव्हते. डॉ राजेंद्रप्रसाद आणि आचार्य कृपलानी हे नंतरचे राष्ट्रीय नेते तरुण युवक होते. अहिंसात्मक संघर्ष आणि रचनात्मक कार्याचा भारतातील तो पहिला प्रयोग होता. गांधींना अटक केल्यावरचे त्यांचे कोर्टापुढील भाषण हे कायदेभंगाच्या चळवळीचे पहिले आदर्श उदाहरण आहे. त्यातील काही वाक्ये पुस्तकात नोंदवली आहेत. मात्र ज्या आंदोलनाने स्वातंत्र्यलढ्याची पायाभरणी केली त्याचे विवेचन येथे आढळत नाही. पुढे कामगार नेता म्हणून अहमदाबादच्या गिरणी संपाची कहाणी देऊन डॉ. कसबे लिहितात- ‘कोणत्याही महापुरुषाला त्याच्या स्वत:च्या कामासोबत त्याला काळही अनुकूल असावा लागतो, तसा अनुकूल काळ गांधींना मिळत गेला आणि त्यांची प्रतिमा अधिकाधिक मोठी होत गेली.’ (पान २१९). गांधींच्या श्रेयाचे निम्मे माप काळाच्या पदरात टाकून डॉ.कसबे मोकळे झाले आहेत.

रौलेक्ट कायद्याच्या विरुद्धचा पहिला हरताळ, जालियानवाला बाग हत्याकांड, त्याची चौकशी याची माहिती देऊन डॉ.कसबे खिलाफत आंदोलनाकडे वळतात. त्यामध्ये ते मांडतात- ‘बॅ जिना  हे मनाने आणि कृतीने सर्वस्वी धर्मनिरपेक्ष होते आणि त्यांचा संविधानिक मार्गांने लढा करण्यावर विश्वास होता. भारतीय स्वातंत्र्याचा तोच सर्व समावेशक अहिंसक मार्ग होता यावर ते ठाम होते.’ (पान २३१). यातील संविधानिक  हे भाषांतर  ‘constitutional’ शब्दाचे आहे. मवाळ पंथीय मंडळी ‘सनदशीर राजकारण’ करत होती किंवा ज्या मार्गांना अर्ज-विनंत्यांचे राजकारण म्हटले गेले, त्याला डॉ. कसबे ‘संविधानिक’ शब्द वापरतात. जे राजकारण मूठभर सुशिक्षितांच्या हाती राहणे स्वाभाविक होते, त्यास डॉ. कसबे ‘सर्वसमावेशक’ कसे म्हणतात?

अर्ज-निवेदने हा ज्या कृतीचा पाया आहे आणि जेथे आंदोलनच करायचे नाही, तेथे हिंसा आणि अहिंसेचा प्रश्नच कसा निर्माण होईल, हा प्रश्न डॉ. कसबेंना का पडत नाही? वस्तुस्थिती अशी आहे की, १९१९मध्ये काँग्रेसची घटना तयार करण्याचे काम गांधींवर सोपवले गेले. गांधींनी काँग्रेसला प्रथमच व्यापक पाया दिला. शहरात, प्रत्येक मोहल्ल्यात, जिल्यातील प्रत्येक तालुक्यात काँग्रेस कमिट्या स्थापन करण्याचे ठरवले. काँग्रेस खऱ्या अर्थाने भारतभर पसरली. डॉ.कसबे नोंदवतात- ‘नागपूर अधिवेशनात कॉंग्रेसच्या घटनेच्या स्वीकृतीसाठी गांधींजी बोलले. जीनांनी त्यातील काही मुद्द्यांना विरोध केला. त्यातील एका मुद्दा होता. 'स्वराज्यप्राप्ती साठी शांततापूर्ण (peaceful) आणि कायदेशीर (legitimate) मार्गांनी विरोध करावा.' या दोन्ही साधनांना जीनांसह अनेकांनी विरोध केला.’ (पान २४४). म्हणजे जीनांसह अनेकांना शांततामय मार्गाने चालणारे जनतेचे आंदोलनही करायचे नव्हते का? नागपूर काँग्रेसमध्ये मांडलेल्या घटनेचे वैशिष्ट्य काय होते? काँग्रेस खेड्यापाड्यात कशी पोचली? याबद्दल डॉ. कसबे काहीही लिहीत नाहीत.

स्वातंत्र्यप्राप्तीची लढाई जनतेमधून लढवणे, जनतेला हक्क आणि कर्तव्याची जाणीव करून देणे, सामान्य आणि गरिबातल्या गरीब माणसात स्वातंत्र्याची भावना निर्माण करणे, लढाईसाठी शांततामय आणि अहिंसक मार्गांचा वापर करणे आणि त्यातूनच राष्ट्रानिर्मितीची प्रकिया वेगाने सुरू करणे, हे गांधींचे देशाला मोठे योगदान आहे, याची दखल डॉ. कसबे इथे घेत नाहीत.   

देशभर असहकार आंदोलन पेटले आणि चौरीचौराच्या घटनेनंतर गांधीजी आंदोलन मागे घेतात. इथे पहिला भाग समाप्त होतो. या काळात काही घटना भारतात प्रथमच घडल्या. त्याचे भारतीय मनावर खोलवर परिणाम झाले. तसेच त्यातूनच गांधीजींचे नेतृत्व उभे राहिले. या सगळ्याच्या खोलात न जाता धावता आढावा घेउन गांधी म्हणजे फारसे वाचन नसलेला, स्वत:ची जाहिरात करू इच्छिणारा, इव्हेंट मॅनेजर अशी गांधींची प्रतिमा बिंबवण्याचा डॉ. कसबेंचा प्रयत्न दिसून येतो.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

विभाग दोनचे नाव ‘गांधी आणि आंबेडकर’ आहे. १९२०पासून हा भाग सुरू होतो. प्रारंभापासून गांधीजींच्या स्वभावाचे विश्लेषण करायला डॉ. कसबे सुरुवात करतात. गांधीजींच्या आध्यात्मिकतेबद्दल विश्लेषण करतात, पण गांधीजींची मोक्षाची नेमकी काय कल्पना होती, पारंपरिक मोक्षाच्या कल्पनेपेक्षा ती किती वेगळी होती, याबद्दल काहीच मांडत नाहीत. हिंदूधर्मातील मोक्षाची कल्पना गांधीजींना चिकटवून ते मोकळे होतात. जॅड अ‍ॅडम्स यांच्या ‘गांधी : नेकेड अँबिशन’ या पुस्तकामधील गांधींच्या महत्त्वाकांक्षेचे वर्णन करणारा एका उतारा डॉ. कसबे मांडतात. तो उतारा असा- “उदाहरणार्थ गांधी अळणी आहार घेत, पण आंदोलन मिठासाठी केले. कपडे पांढरे घालत, पण रंगीत निळीसाठी लढले. खादीचा आग्रह धरत, पण गिरणी कामगारांसाठी लढले.” (२५९). आता एवढा विरोधाभास दाखवून अ‍ॅडम्स लिहितात- “त्यांची महत्त्वाकांक्षा केवळ मजुरांची स्थिती सुधारण्याची नव्हती. ना भारतीय स्वातंत्र्यप्राप्तीची. या सर्व गोष्टी त्यांच्यासाठी क्षणभंगुर होत्या. गांधींचे आयुष्याचे धेय्य फक्त आध्यात्मिक पूर्णत्व होते.”

गांधींची आध्यात्मिक पूर्णत्वाची काय कल्पना होती, याबद्दल डॉ.कसबे लिहीत नाहीत. उलट पुढे लिहितात- ‘गांधीजींचे जीवन हे एकीकडून इतरांना खुरटे करून स्वत: राजकीय चळवळीचे नेतृत्व करण्याची प्रबळ इच्छा, तर दुसरीकडे आध्यात्मिक क्षेत्रातून स्वर्गाचे राज्य, मोक्ष मिळविण्याची महत्त्वाकांक्षा यात गुंतले होते. त्यांची ही अवस्था १९४६च्या अंतापर्यंत होती.’ (पान २५९). जॅड अ‍ॅडम्स यांनी मांडलेली मते ही अतिशय उथळ आणि विनोदी असल्याने त्यावर मतप्रदर्शन करून वेळ फुकट घालवावा, असे वाटत नाही. कारण विसंगतीचा हा नियम जगातील कोणत्याही थोर माणसाला लावला, तर त्याचे हनन करून त्यास मानसिक रुग्ण ठरवणे सहज शक्य होईल, हे डॉ.कसबेंना कसे कळत नाही, याचे आश्चर्य वाटते.

इतरांना खुरटे करणारे गांधींचे जीवन होते, हे विधान करताना भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेतृत्वाची फळी तरी किमान डॉ.कसबे यांनी लक्षात घ्यायला हवी होती. नेहरू, पटेल, आझाद, गफारखान, बोस यांसारखी मंडळी गांधींची अनुयायी होती. नरेद्र देव, जयप्रकाश, लोहिया समाजवादाकडे झुकलेले होते. गोपराजू रामचंद्र राव हे कट्टर नास्तिक होते. नेहरू पट्टशिष्य पण वैचारिक विरोधक होते. त्या शिवाय गांधींची रचनात्मक कार्यकर्त्यांची फळी वेगळीच होती. यापैकी कोणालाही गांधींनी आपल्या कोंदणात ठोकून बसवले नाही. डॉ.कसबे लिहितात -‘आध्यात्मिक क्षेत्रातून स्वर्गाचे राज्य, मोक्ष मिळविण्याची महत्त्वाकांक्षा यात गुंतले होते.’ स्वर्गाचे राज्य मिळविणे म्हणजे नक्की काय? मुळात उच्च दर्जाचे आध्यात्मिक जीवन जगण्याची इच्छा असू शकते, महत्त्वाकांक्षा असूच शकत नाही. ज्यास महत्त्वाकांक्षा आहे, त्यास मोक्षप्राप्ती शक्य नाही, ही साधी संकल्पना शेरेबाजीच्या आवेशात डॉ. कसबे विसरतात.

ते पुढे लिहितात- ‘गांधीजींनी त्यांच्या आयुष्यात शेतकरी कामगारांच्या दु:खाच्या कारणांचा शोध घेतला. पण तो फसवा होता. त्यांनी त्यामागील वरवरची कारणे शोधली आणि त्यावर मलमपट्टी केल्यासारख्या चळवळी करून ती सोडविली. परंतू त्यांच्या मूळ कारणापर्यंत ते कधीच पोहोचू शकले नाहीत. त्यांचा राजकारणाचा अभ्यास नसावा आणि अर्थशास्त्राच्या दृष्टीने त्यांची पाटी कोरी असावी.’ (पान २५९-६०) डॉ. कसबे आपल्या पुस्तकातील २६०व्या पानावर लिहितात - त्यांचा राजकारणाचा अभ्यास नसावा. मग या आधीची २५९ पाने आपण गांधींच्या राजकारण सोडून कोणत्या बाजूवर लिहिली हा प्रश्न डॉ. कसबेंना का पडत नाही?

दक्षिण आफ्रिकेची चळवळ, रौलेट कायद्याविरोधातील आंदोलन, असहकार चळवळ हे स्पष्ट राजकीय जाण असल्याशिवाय कसे करता येईल. वरील लिखाणापूर्वी मिठाच्या सत्याग्रहाचे आणि खादीचे अर्थशास्त्र डॉ. कसबे यांनी समजून घ्यायला हवे होते. मीठावर कर बसवण्यासाठी १८६९मध्ये सीमाशुल्क रेषा निर्माण झाली. या रेषेवर भलेमोठे कुंपण निर्माण करण्यात आले. या कुंपण योजनेचे सूत्रधार ए. ओ. ह्यूम होते. (जे पुढे काँग्रेसचे संस्थापक बनले). १८६९-७० साली मिठाच्या शुल्करेषेवर जमा झालेला कर सव्वा कोटी रुपये होता. १९३० सालपर्यंत ब्रिटिशांनी किती कर गोळा केला आणि गांधींच्या सत्याग्रहाने ब्रिटनची आर्थिक कोंडी कशी झाली, यावर साहित्य उपलब्ध आहे. खादीच्या चळवळीचे परिणाम मँचेस्टरच्या कापड गिरण्यांवर झाले. ब्रिटिश सूतीमालाच्या भारतातील आयातीवर परिणाम झाल्याचे डॉ. कसबे मान्य करतात. त्याची आकडेवारी अशी आहे. १९२९मध्ये आयातीत १४ टक्के घट झाली, तर बहिष्काराच्या सर्वोच्च बिंदूवर ही घट ८४ टक्के होती. खादीमुळे अनेकांना रोजगार मिळाला. ऑल इंडिया स्पिनर्स असोशिएशनच्या १९४०च्या आकडेवारीनुसार २७५१४६ गावकऱ्यांना रोजगार मिळाला. त्यामध्ये १९६४५ दलित होते आणि ५७३७८ मुस्लीम होते. हे कमीत कमी १३४५१ गावांमध्ये विखुरलेले होते. मुळात ‘राजकारणाचा अभ्यास नसावा.. अर्थशास्त्राची पाटी कोरी असावी’ अशा पद्धतीचे विधान हे वैचारिक शिस्तीला साजेसे वाटत नाही. हे विधान वाचल्यावर महाभारतातील ‘नरो वा कुंजरो वा’ या विधानाची आठवण येते.

उपलब्ध माहिती न वापरता, कुठल्याही पुराव्याशिवाय सरसकट विधाने करून गौणत्व देण्याचे सातत्य डॉ. कसबे टिकवून ठेवतात. गांधी गौण होते की अजून काही, याबद्दल विरोध करण्याचे कारण नाही, आक्षेप आहे तो न पाळल्या गेलेल्या वैचारिक शिस्तीला!

..................................................................................................................................................................

हेही पाहा\वाचा : गांधी हा काहींच्या टवाळीचा विषय असतो. आपण सर्वज्ञ आहोत अशी समजूत करून घेतली की, हे ओघाने येतेच - रावसाहेब कसबे

..................................................................................................................................................................

डॉ. सिग्मंड फ्राईड यांचे विचार डॉ.कसबे मांडतात. गांधीजींचे आपल्या पत्नीशी, हरीलाल नावाच्या मुलाशी असलेल्या वर्तनाचे ते वर्णन करतात. बॅ जीनांनी गुजराथीत बोलावे, टिळकांनी हिंदीत बोलावे असा आग्रह धरून गांधी त्यांची सार्वजनिकरीत्या कोंडी करतात. हे मांडून गांधीजींचे वागणे ही परपीडन वृत्ती आहे (पान २७०) असे डॉ. कसबे मांडतात. कोणत्याही राष्ट्रीय नेत्याने लोकभाषेतून बोलावे असा आग्रह धरणारे गांधीजी होते. १९१३च्या आसपास दक्षिण आफ्रिकेत नामदार गोखल्यांना ‘तुम्ही मराठीत बोला मी हिंदीतून अनुवाद करेन’ असे गांधीजींनी आग्रहपूर्वक सांगितले होते. यात परपीडन नसून देशी भाषांचा आग्रह दिसतो.

आपल्या पत्नीशी आपण कसे वागलो, मुलांच्या संगोपनात काय चुका झाल्या, याची माहिती स्वत: गांधीजीच देतात. यापुढे डॉ. कसबे लिहितात ते वाचून धक्का बसतो- ‘आपल्यापेक्षा श्रेष्ठ सत्ताधारी ब्रिटिश साम्राज्यशाही पुढे गुडघे टेकायचे आणि आपल्या अनुयायांना त्यांच्या मनाविरुद्ध फरफटत न्यायचे याची किती उदाहरणे आहेत. १९४२चा ‘चले जाव’ आंदोलनास अनेक काँग्रेसजनांचा विरोध होता. त्यापैकी अनेकांना काही वर्षे तुरुंगात सडावे लागले. शेवटी त्याची फलनिष्पत्ती काहीही नव्हती. जे घडले ते चर्चेने आणि संविधानिक मार्गानेच.’ (पान २७०). गुडघे टेकायच्या... या सनसनाटी वाक्याला एकही पूरक उदाहरण किंवा पुरावा दिलेले नाही.

इथे स्पष्टपणे मांडायला हवे की, डॉ. कसबे वैचारिक शिस्तीसोबत सभ्यतासुद्धा सोडून वागत आहेत. खरे तर पुरावा नसेल तर डॉ. कसबे यांनी स्वत:हून हे वाक्य मागे घ्यायला हवे. मात्र डॉ. कसबे असभ्य वागत असतील तरी मी माझी सभ्यता सोडू शकत नाही. यात सुज्ञ वाचक काय ते समजून जातील.

१९४२च्या ‘चले जाव’ आंदोलनाला दुसऱ्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर साम्यवाद्यांनी विरोध केला होता. त्यांची धोरणे रशियाच्या युद्धनीतीवर ठरत होती. हिंदुत्ववादी कायम काँग्रेसच्या विरोधात आणि ब्रिटिशांच्या बाजूचे होते. डॉ. आंबेडकर आणि त्यांच्या पक्षाने स्वातंत्र्यप्राप्तीच्या लढाईत कधीच भाग घेतलेला नव्हता. १९४२च्या चळवळीला त्यांनी विरोध केला होता आणि ते कौन्सिलमध्ये मजूरमंत्री होते. काँग्रेसचे जेष्ठ नेते राजाजी यांनी ४२च्या चळवळीला विरोध केला होता. त्यांना सरकारने जेलमध्ये टाकले नव्हते. ४२च्या चळवळीला विरोध म्हणजे ब्रिटिशांशी मैत्री हे ब्रिटिश शासनाचे त्या वेळचे धोरण होते. त्यावेळी ब्रिटिश सरकारला पाठिंबा देणाऱ्या आणि ४२च्या आंदोलनाला विरोध करणाऱ्या पक्षांना आणि त्यांच्या प्रमुख नेत्यांना ब्रिटिश सरकार मानधन देत होती. १९४२च्या ठरावाला सर्व काँग्रेस आणि समाजवादी नेत्यांनी पाठिंबा दिला होता. ठरावाला विरोध करणारे होते- कॉ. एस. जी. सरदेसाई. साम्यवाद्यांची ती भूमिकाच होती. या आंदोलनाने ब्रिटिश साम्राज्य कसे खिळखिळे झाले, याचा तपशील इथून ब्रिटनला जाणाऱ्या दैनंदिन अहवालातून कळतो. स्वत: व्हॉइसरॉय अशा आशयाचे कळवत आहे की, ‘मी कोणाला सांगू शकत नाही, मात्र स्थिती १८५७प्रमाणे झाली आहे.’ हा दैनंदिन अहवाल पुस्तकरूपात उपलब्ध आहे.

गांधीजींनी ब्रिटिशांना ‘चले जाव’ सांगितले आणि प्रत्येक भारतीयाला आवाहन केले की, तू आजपासून स्वत:ला स्वतंत्र नागरिक समजून वागायला लाग. सत्तांतर हे चर्चेनेच होणार हे स्पष्ट होते. या चर्चेला येण्यासाठी ४२च्या चळवळीचा मोठा वाटा आहे. १९४२च्या चळवळीबद्दल लिहिण्यापूर्वी काही प्राथमिक माहिती गोळा केली असती, तर बरे झाले असते!

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

पुढे अशाच धर्तीचे वाक्य येते- ‘संतांची भूमिका ही कोणालाही त्रासदायक नसते. अस्पृश्यता निवारण आणि खादीचा प्रचार हे निरुपद्रवी कार्यक्रम होते.’ (पान २७०). संतांची भूमिका कोणालाच त्रासदायक नसेल तर महाराष्ट्रात संतांचा छळ झालाच नसता. खादीचे आर्थिक आणि सामाजिक महत्त्व किती होते, ते यापूर्वीच मांडले आहे. इथे अधिक सविस्तर मांडणे अप्रस्तुत होईल. गरिबातला गरीब माणूस सूत कातताना मजुरी मिळवत होता आणि दुसऱ्या बाजूने स्वातंत्र्य आंदोलनाशी जोडला गेला होता. अस्पृश्यता निवारण हा निरुपद्रवी कार्यक्रम कसा असेल? या कार्यक्रमाने सनातन्यांना किती त्रास झाला आणि ते कसे गांधींच्या कार्यक्रमांना अडथळा आणू लागले, हे डॉ.कसबेच पुढे मांडतात आणि परस्परविरोधी विधानांची मालिका कायम ठेवतात.

यानंतर परत एकदा गांधीजींची ईश्वरश्रद्धा हा विषय डोके वर काढतो. ‘मी’पणा म्हणजे काय? कबीर काय म्हणतो? गौतम बुद्ध काय म्हणतात? त्यांनी दु:खाचा शोध कसा घेतला, यावर बरीच पाने खर्च होतात. डॉ. कसबे म्हणतात- ‘गांधींना आपल्या अंतर्विरोधातून बाहेर पडण्यासाठी तीन मार्ग होते- भक्तीचा, ध्यानाचा. तेथे ते गेले नाहीत. त्यांनी पूर्णवेळ राजकारणाचा तिसरा पर्याय निवडला.’ थोडक्यात डॉ. कसबे यांच्या शेरेबाजीचे सार पुढील प्रमाणे - ‘गांधी चिकित्सक बनू शकले नाहीत, ते फार अभ्यासू नव्हते, ते इव्हेंट मॅनेजर होते, त्यांना स्वत:ची जाहिरात करायची होती, आपले नेतृत्व बिंबवण्यासाठी त्यांने वेगवेगळे प्रयोग केले, शेतकरी कामगारांच्या दु:खाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला तो फसवा होता, त्यांचा राजकारणाचा अभ्यास नसावा, अर्थशास्त्राची पाटी कोरी असावी, परपीडनात आनंद मानणारे, ब्रिटिशांच्या पुढे गुडघे टेकणारे, अनुयायांना फरफटत नेणारे होते.’

गांधी या व्यक्तीवर आणि त्यांच्या कार्यावर टीका करण्याला विरोध नाही (आज भारतात ज्याचा पुतळा तोडल्यावर किंवा ज्यांच्या फोटोला गोळ्या मारल्यावर कोणीही आंदोलन करत नाही, असं एकच दिवंगत नेता भारतात उरलेला आहे.), प्रश्न आहे- डॉ.कसबे वस्तुनिष्ठ विश्लेषण करतात किंवा वैचारिक लिखाणाची शिस्त पाळतात का?  

‘गांधी : पराभूत राजकारणी आणि विजयी महात्मा’ - रावसाहेब कसबे

लोकवाङ्मय गृह, मुंबई, 

पाने - ८१०, मूल्य - १००० रुपये.

(‘सर्वंकष’ या त्रैमासिकाच्या जानेवारी-मार्च २०२२च्या अंकातून साभार)

..................................................................................................................................................................

लेखक विजय तांबे सामाजिक कार्यकर्ते आणि कथाकार आहेत.

vtambe@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

म. फुले-आंबेडकरी साहित्याकडे मी ‘समाज-संस्कृतीचे प्रबोधन’ म्हणून पाहतो. ते समजून घेण्यासाठी ‘फुले-आंबेडकरी वाङ्मयकोश’ उपयुक्त ठरणार आहे, यात शंका नाही

‘आंबेडकरवादी साहित्य’ हे तळागाळातील समाजाचे साहित्य आहे. तळागाळातील समाजाचे साहित्य हे अस्मितेचे साहित्य असते. अस्मिता ही प्रथमतः व्यक्त होत असते ती नावातून. प्रथमतः नावातून त्या समाजाचा ‘स्वाभिमान’ व्यक्त झाला पाहिजे. पण तळागाळातील दलित, शोषित व वंचित समाजाला स्वाभिमान व्यक्त करणारे नावदेखील धारण करता येत नाही. नव्हे, ते करू दिले जात नाही. जगभरातील सामाजिक गुलामगिरीत खितपत पडलेल्या समाजघटकांचा हाच अनुभव आहे.......

माझ्या हृदयात कायमस्वरूपी स्थान मिळवलेला हा सीमारेषाविहिन कवी तुमच्याही हृदयात घरोबा करो. माझ्याइतकंच तुमचंही भावविश्व तो समृद्ध करो

आताचा काळ भारत-पाकिस्तानातल्या अधिकारशाही वृत्तीच्या राज्यकर्त्यांनी डोकं वर काढण्याचा आहे. अशा या काळात, देशोदेशींच्या सीमारेषा पुसून टाकण्याची क्षमता असलेल्या वैश्विक कवितांचा धनी ठरलेल्या फ़ैज़चं चरित्र प्रकाशित व्हावं, ही घटना अनेक अर्थांनी प्रतीकात्मकही आहे. कधी नव्हे ती फ़ैज़सारख्या कवींची या घटकेला खरी गरज आहे, असं भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतल्या विवेकवादी मंडळींना वाटणंही स्वाभाविक आहे.......