राष्ट्रवाद जेव्हा टोकाचं जहाल रूप दाखवतो, तेव्हा त्याचे परिणाम अत्यंत हिंसक आणि धोकादायक असतात...
पडघम - साहित्य संमेलन विशेष
गणेश विसपुते
  • १६व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष गणेश विसपुते आणि संमेलनाचे बोधचिन्ह
  • Sat , 23 April 2022
  • पडघम साहित्य संमेलन विशेष १६वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन 16th Vidrohi Marathi Sahitya Sammelan गणेश विसपुते Ganesh Visputay

उदगीर, जि. लातूर इथं आजपासून १६वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन सुरू झाले आहे. या संमेलनाचे अध्यक्ष मराठीतील प्रसिद्ध कवी गणेश विसपुते आहेत. त्यांच्या भाषणाचा हा दुसरा भाग...

..................................................................................................................................................................

प्रतिमांचं नवंच युग आहे. सगळीकडे प्रतिमांचे आरसे तुम्हाला टिपायलाही टपलेले आहेत. आरोग्यासाठीचं अ‍ॅप, स्विगीसाठीचं, झोमॅटोसाठीचं, अमुकसाठीचं अ‍ॅप, तमुकसाठीचं अ‍ॅप, तुमचं क्रेडिट कार्ड, तुमचा फोन या सगळ्यांतून एक अदृश्य डोळा पाहतोय तुमच्या इतिहास-वर्तमानाचा, तुमचं जन्म-मरणाचा एक्स-रे विनासायास. सामाजिक माध्यमांतलं व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य वगैरे ऐकून सत्ताविसाव्या मजल्यावर राहणारा गबदूल माणूस हसतो आणि ती माध्यमं विकत घेतल्याचा कागद लॉकरमध्ये ठेवून देतो. ज्यां बॉद्रिला नावाचा एक फ्रेंच समाजशास्त्रज्ञ आणि तत्त्वज्ञ होता, त्यानं आजच्या या मायावी जगाबद्दल लिहिताना असं म्हटलं आहे- “जे अदृश्य आहे त्याच्या अनिवार आकर्षणाशिवाय आपल्याकडे काहीही उरलेलं नाही. आणि यामुळे आपल्या नजरेसमोर एक खोटी, काल्पनिक स्वायत्तता उभी राहाते. मासमिडिया मालकांनी समाजावर ताबा मिळवला आहे. माध्यमातून जे आभासी वास्तवाचं चित्र आपल्याला दिसतं, खोटे घडवून आणलेले लष्करी हल्ले असतील, धादांत असत्याची चित्रणं असतील, ह्या सगळ्याला विरोध करण्याची शक्यता नष्ट करण्यात येत आहेत. अतिप्रगत तंत्रज्ञानाच्या वास्तवातल्या वापरानं वास्तवाचा अर्थच बदलून जातोय. अनेक गोष्टींमधले अर्थच हरवून टाकण्याची कारस्थानं रोज अंमलात येत आहेत. त्यातून येणाऱ्या अशा विषादानं आपण आज भिजलेलो आहोत.”

‘वन हन्ड्रेड इअर्स ऑव्ह सॉलिट्यूड’ अर्थात् ‘एकांतवासाची शंभर वर्षं’ ही गॅब्रिअल गार्सिया मार्क्वेझ यांची नोबेल पुरस्कारप्राप्त कादंबरी आहे. त्यातल्या चौदाव्या प्रकरणातला एक भाग अलीकडे मला पुन्हा पुन्हा आठवतो. जुझे अर्काडिओ सेगुन्दो या नावाच्या कामगारानं केळीच्या बागांमध्ये काम करणाऱ्या कामगारांना संघटित करून संप करण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. सगळ्या म्हणजे तीन हजार कामगारांना वाटाघाटींसाठी मैदानावर बोलावलं जातं. मैदानावरच्या त्या जाहीर सभेत लेफ्टनंट इसाका हा सगळा संपच अवैध असल्याचं सांगून कामगारांनी तो पाच मिनिटात मागं घ्यावा असं सांगितलं जातं. काही मिनिटांतच कामगारांवर मशिनगन्सच्या गोळ्यांचा वर्षाव होतो. तिथं म्हातारी माणसं असतात, लहानगी बाळं असतात, स्त्रिया असतात. लष्करी मशिनगन्स या जित्याजागत्या तीन हजार माणसांची चाळण करून त्यांना निर्जीव प्रेतांमध्ये बदलून टाकतात. अर्थातच मकॅन्डोत मार्शल लॉ जाहीर होतो. या नरसंहारानंतर काही काळानं सेगुन्दो डोळे उघडून पाहतो, तेव्हा त्याला कळतं की, आपण प्रेतांनी खचाखच भरलेल्या लांबलचक आगगाडीत प्रेतांच्या ढिगाऱ्यावर अस्ताव्यस्त पडलेलो आहोत. त्याच्या लक्षात येतं, सडकी केळी जशी फेकली जातात तशीच आगगाडीतली ही हजारो प्रेतं थोडाच वेळात समुद्रात फेकली जाणार आहेत. जुझे अर्काडिओ कसाबसा ट्रेनवरून अंधारात उडी मारून निसटतो आणि जखमी अवस्थेत तिथून उलटा प्रवास करत पहाटे फटफटतांना मकॅन्डोला पोहोचतो.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

एक स्त्री त्याला भेटते. तिच्याशी तो झालेल्या नरसंहाराबद्दल तो बोलू पाहातो. तर असं काही इथं झालेलंच नाही असं ती त्याला ऐकवते. तो लोकांशी बोलतो. प्रत्येक जण तेच सांगतो. मकॅन्डोत प्रत्येकाची स्मृती आणि मती हरवली आहे हे पाहून तो भयभीत होतो. सरकारी निवेदनातूनही हेच सांगितलं जातं की इथं कुणीही मृत्यू पावलेलं नाहीय. सरकारी अधिकारी त्याला वेड्यात काढतात. तू नक्कीच स्वप्न पाहिलं असेल. मकॅन्डोत असं कधी झालेलं नाही आणि कधीही होणार नाही. इथं सगळे आनंदी आहेत. चांगले दिवस आलेले आहेत. मकॅन्डोवर सतत एक कंटाळवाणा पाऊस चिकचिकत पडत असतो. त्या पावसात नरसंहारात वाहिलेलं रक्त धुतलं जातं. मरून पडलेली बायामाणसं जणू अदृश्यच होतात आणि त्यांच्याबद्दल कुणीही काही बोलत नाही.

हे ऐकून तुम्हाला काही ओळखीचं आठवतंय?

मार्केझच्या कादंबरीतला हा भाग अलीकडे मला दुःस्वप्नासारखा सतत आठवतो. नव्हे, ती दुःस्वप्नं प्रत्यक्ष वास्तवात दिसू लागलेली आहेत. आपल्याकडेही, एवढं सगळं होऊन मराठीतल्या एक प्रस्थापित लेखिका खुलेआम विचारतात, कुठे आहे या देशात हुकूमशाही? अभिव्यक्ती-स्वातंत्र्याची कुठे आहे दडपशाही? तेव्हा माझ्यासारखा माणूस स्तब्ध होतो. लेखकपणाच्या प्राथमिक शर्तीचाच असा भंग झाल्याचं पाहून क्षोभ होतो. माझ्यासारखीच अवस्था सदैव जागा असलेल्या जयंत पवार या लेखक मित्राची झाली होती. मग ही कोणती शाही आहे ते तरी सांगा, असं उद्विग्न होऊन त्यानं विचारलं होतं.

अन्यत्व, असहमती आणि सहिष्णुता

आपण इतका चिरफाळलेला, इतका असहिष्णू झालेला समाज नव्हतो. अलीकडेच रोमिला थापर यांच्या निबंधांचं एक पुस्तक प्रकाशित झालेलं आहे- ‘व्हॉईसेस ऑफ डिसेंट’. त्याचं मिलिंद चंपानेरकरांनी केलेलं ‘असहमतीचे आवाज’ या शीर्षकाचं मराठी भाषांतरही आता उपलब्ध आहे. त्यात थापर असं म्हणतात - “असहमती ही काही आधुनिक काळातली संकल्पना नाहीये, परंतु, असहमतीचे विविध आकृतीबंध ओळखणं ही गोष्ट मात्र या काळासाठी नवी आहे. प्राचीन काळापासून असहमतीचं तत्त्व उपस्थित राहात आलेलं आहे. ज्या देशात उदारमतवादी, लोकशाहीवादी समाज असतो, तिथं असहमती व्यक्त करणारे प्रश्न विचारले जातात, तेव्हा भुवया उंचावल्या जात नाहीत. तर चर्चेद्वारे अशा प्रश्नांची तड लावण्यासाठी प्रोत्साहन दिलं जातं. प्रश्न उपस्थित करण्याचा अधिकार आता सार्वजनिक आहे आणि कुणीही नागरिक तो अधिकार बजावू शकतो. पूर्वी हा अधिकार केवळ सामर्थ्यवानांना होता. आता तो सर्व नागरिकांना आहे... लोकशाहीत प्रत्येक नागरिकाला समान दर्जा अभिप्रेत असल्याने लोकशाही ही धर्मनिरपेक्ष असू शकते. असहमतीचा अधिकार आणि सामाजिक न्यायाची मागणी या खऱ्या लोकशाही संकल्पनेच्या गाभ्याशी असलेल्या गोष्टी आहेत. कारण त्यात सर्व नागरिकांचा समावेश असतो आणि कायदेशीरदृष्ट्या समान दर्जा प्राप्त झाल्यानं लोकशाही ही धर्मनिरपेक्ष असण्याव्यतिरिक्त अन्य काही असूच शकत नाही.”

इथं नागरिक हा केंद्रस्थानी आहे. त्याचं हित, त्याचे अधिकार आणि कर्तव्यं ही सर्वोपरी आहेत. एकाच समाजात विविध विचार आणि मतं असलेले लोक एकत्र राहात आलेले आहेत. त्याच्यात घर्षणंही झाली असतील, पण परस्परांबद्दलचा आदर मनुष्यत्वाच्या कसोटीवर केला गेलेला आहे. एकाच समाजात आस्तिक, नास्तिक, शाकाहारी-मिश्राहारी, विविध श्रद्धा बाळगणारे असे लोक एकाच वेळी राहात असतात. हा समाजाचा सामूहिक अवकाश असतो. समतेच्या मूल्यात कुणा एकाचं वर्चस्व मान्य केलं जाऊ शकत नाही. आज धार्मिक भावना किंवा अस्मिता दुखावण्याचे बहाणे किंवा निमित्तं करून विरोधी मतांच्या विचारांचे कार्यक्रम बंद पाडले जातात. नाटकं, चित्रपट, पुस्तकं यांच्यावर अवैध सेन्सॉरशिप लादली जाते. उदारमतवादी, लोकशाहीवादी विचारांची दडपणूक होते. राज्यसंस्थेच्या व्यवस्था यात बटीक झालेल्या गुलामांसारख्या कणाहीन वर्तन करतांना दिसतात. आम्ही नागरीक आहोत. आजच्या काळात त्या सर्वसाधारण नागरिकानं काय करायला हवं याचं सुरेख दर्शन मुंबईचे हिंदी कवी फ़रीद खान यांनी केलं आहे. ते म्हणतात-

मैं नागरिक हूँ

सर्वोच्च पद पर आसीन हूं

मेरा फ़र्ज़ बनता है

कि अपने मातहत काम करनेवाले

राष्ट्रपति, प्रधानमंत्री और

सर्वोच्च न्यायालय की

आलोचना करूं।

हम भारत के लोग

यह वचन लें।

मित्रहो, भारतात पहिल्या शतकातच ख्रिश्चन धर्म पोहचला होता. त्यानंतर जगातल्या बहुतेक धर्मांचे लोक अनेक शतकं इथं राहत आलेले आहेत. इतकं वैविध्य इतरत्र कुठेही सापडत नाही. यातले बरेचसे लोक शतकानुशतकं इथंच राहून इथल्या हवा-पाणी-मातीशी जोडले गेले. त्यांनीही भारत नावाच्या कल्पनेला प्रत्यक्षात मूर्त करण्यात मदत केली. या सगळ्यांसह आपली जी संस्कृती तयार झाली तिची समृद्धी अभिमान वाटावा अशीच आहे. परंतु गेल्या काही वर्षांत मोठ्या योजनेंतर्गत अशा अनेक अल्पसंख्य समूहांना ठरवून अन्यत्वाची (प्रस्थापित ‘स्व’पासून अदरिंगची) वागणूक देण्याचे प्रयत्न होत आहेत. फाशिस्ट राज्यात ज्याप्रमाणे आर्य आणि ज्यू अशी विभागणी करून ज्युंचं शिरकाण झालं होतं, तीच मानसिकता इथं स्पष्टपणे दिसते. त्यामुळे एक अन्य हा शत्रू म्हणून चित्र रंगवून उभा केला की मग त्यांना अलग करून कोपऱ्यात ढकलता येतं, त्यांना हुसकावून लावण्यासाठी, हद्दपार करण्यासाठी एक कृतक कारण निर्माण करता येतं. रोमिला थापर असं म्हणतात की, आज जगभरात असे अनेकविध लोक-समूह नागरिकत्व नाकारले गेल्यानं किंवा हद्दपार केले गेल्यानं निराश्रित झालेले आहेत. मित्रहो, अशा निर्वासितांच्या करूण कहाण्या अलीकडे गेली काही वर्षं आपण वाचत आहोत. तुर्कस्तानच्या समुद्रकाठावर वाळूत तोंड खुपसून पडलेल्या तीन वर्षांच्या मृत अॅलनचं चित्र आपल्या मनात थिजून बसलेलं आहे.

महामारीच्या लाटेआधी आपण नागरिकत्व कायदा (एनआरसी) आणि नागरिकत्व दुरुस्ती विधेयक (सीएए) विषयीच्या बातम्या, त्याविरोधातली देशभरातली आंदोलनं, शाहीन बागेतलं ऐतिहासिक आंदोलन आणि त्याविषयी गोंधळ निर्माण होईल अशा सत्यालाप करणाऱ्या बातम्या असं पाहिलं. असममध्ये निर्वासित होऊन तीन पिढ्या इथं राहिलेल्या लोकांपुढे नागरिकत्वाचा प्रश्न उभा ठाकल्यावर ते सैरभैर झाले. त्याआधीपासूनच त्यांना मियां म्हणून कशा प्रकारे हिणवलं जात होतं, त्यातून सत्तरच्या दशकात असमी कवितेत सशक्त असं मिया पोएट्रीचं आंदोलन कसं उभं राहिलं हे आपल्याला माहीत असेल. असममधल्या बंगाली मुसलमानांनी आपल्या अस्मितेवर स्वतः पुन्हा या कवितेच्या आंदोलनाद्वारे दावा केला.

..................................................................................................................................................................

उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअ‍ॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...

हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal

................................................................................................................................................................

‘मियां’ हा उर्दूमधला ‘सभ्यगृहस्थ’ या शब्दासाठी वापरला जाणारा आदरार्थी प्रतिशब्द आहे. पण तो हिणवण्यासाठी आणि अपमान करण्यासाठी वापरला जाऊ लागला तेव्हा तिथल्या कवींनी ‘होय, आम्ही मिया आहोत’, असं म्हणत ठामपणे कवितेतून उत्तरं देत त्या शब्दाच्या अर्थाला पुन्हा सार्थ केलं. दमन आणि दडपशाहीविरुद्ध आवाज उठवणारं कवितेचं हे आंदोलन होतं. मिया कवितेत या समूहाला एनआरसीतून वगळले जाण्याचे, आणि त्यातल्या भयाचे प्रतिध्वनी ऐकू येतात. या कवींवर खटले भरले गेले. मिया कविता आंदोलनानं अनेक प्रश्न उभे केलेले आहेत. ते विस्थापनाचे आहेत, भाषिकतेचे आहेत, भौगोलिकतेचे, राष्ट्रीयत्त्वाचे, मानवीयतेचे आहेत. नागरिक आहोत की नाही आहोत या संभ्रमाचे ते प्रश्न आहेत. या आंदोलनानं राष्ट्रवादाच्या रेट्यात दाबल्या गेलेल्या भाषेचा प्रश्न पुढे आणला. त्या भाषेच्या दुःखाचा उद्गार उच्चारित केला. जोरकसपणे ते म्हणू लागले की- ‘लिहा. लिहून घ्या/ मी एक मिया आहे / लोकशाहीवादी, धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताकाचा नागरिक/ ज्याच्याजवळ कोणताही अधिकार उरलेला नाही.’

त्यातल्या अलीकडच्या काही कवितांचे मासले मी आपल्यापुढे वाचून दाखवतो.

रिजवान हुसेन नावाचा कवी (हिंदी भाषांतर) आपल्या कवितेत म्हणतो-

तुम्ही आम्हाला शिव्या द्या

हातातून नांगर ओढून काठ्यांनी मारा

पण आम्ही शांतपणे तुमच्यासाठी

महाल, रस्ते, घरं बनवत राहू

तुमच्या अस्वस्थ, घामानं भिजलेल्या चरबीयुक्त शरीरांना

रिक्षावर ओढतच राहू.

हा सगळा तळातला, श्रमिक वर्ग आहे. त्याच्या अस्तित्वावरच सवाल उभा राहिलेला असल्यानं तो हतबल झालेला आहे. त्याच दरम्यान ठिकठिकाणी डिटेन्शन कॅम्प्स उभारले गेल्याच्या बातम्या आलेल्या होत्या. तिथं गेल्यावर त्यांचं पुढे काय होणार कोणालाच कळणार नाही अशी फाशिस्ट काळातल्या कॅम्प्सची आठवण करून देणाऱ्या या गोष्टी आहेत. सान मियां नावाच्या कवीनं याबाबतीत आपली व्यथा व्यक्त करताना म्हटलं आहे की,

यावेळी डिटेन्शन कॅम्पमध्ये बसल्या बसल्या आठवलं

अरे देवा, आपणच तर ही इमारत बांधली होती

आता आमच्याकडे काहीही नाही

केवळ एक जोडी जुनाट लुंगी, अर्धवट पिकलेली दाढी

आणि आमच्या आजोबांच्या नावासोबत

शेवटच्या मतदार सूचीच्या अफेडिविटची प्रत.

बस्स.

त्यांच्या मागण्या काहीही नाहीत. ते फक्त माणूस म्हणून आम्हाला जगू द्या, ज्या मातीत त्यांच्या पिढ्या श्रमल्या आणि मिसळल्या त्या मातीत काम करू द्या एवढंच मागताहेत. आज दुर्दैवानं हे घटित जगभरातल्या बहुतांश भागातलं वास्तव बनलं आहे. मरम अल-मसरी, नाजवान दरविश यांच्यासारखे आपला देशच न उरलेले कितीतरी पॅलेस्टिनी, अरबी, सीरिअन कवी हीच व्यथा मांडतांना आपल्याला दिसताहेत. सध्या फ्रान्समध्ये आसरा घेतलेली अनेक पुरस्कारप्राप्त सिरिअन कवयित्री मरम-अल-मसरीचे अनुभव वाचतांना आपण हादरून जातो-

मिल्ट्रीतल्या दोन सैनिकांनी / आणि पुरुषांच्या जत्थ्यानं लॉराला मारून टाकलं

आधी तिच्यावर अत्याचार करून / कुणी तरी तिला पाहिलं

तेव्हा ती जिवंत होती अद्याप / ज्यानं व्हिडिओ रेकॉर्ड केला

आणि पोस्ट केला तो युट्युबवर / दिङ्मूढ झालेल्या लॉराचा

आणि दिसत नाही / तिच्या तोंडातून रक्त ओघळतांना

आणि तिच्या ड्रेसवर मागच्या बाजूनंही.

 

लॉराचा होता एक देह / आणि एक नाव होतं तिचं / लॉरा द व्हरमॉन्ट

वय वर्षं १८ / जिचा खून / पुरुषांनी / राज्यसत्तेनं

आणि आमच्या उदासिनतेनं-दुर्लक्षानं केला / शनिवारी.

कल्याणकारी राज्याचा ध्वंस

जगभर सध्या हे असं प्रखर राष्ट्रवादाचं आणि अमानुष विस्तारवादाच्या लालसेचं फलित दिसत आहे. राष्ट्रवाद जेव्हा त्याचं टोकाचं जहाल रूप दाखवतो, तेव्हा त्याचे परिणाम अत्यंत हिंसक आणि धोकादायक असतात. त्यातील अमानुष शोषणाच्या खातरीमुळे तो अनेक विचारवंतांनी नाकारला आहे. रवींद्रनाथ टागोरांनी त्यातले धोके ओळखले होते. स्वातंत्र्य मिळण्याअगोदर पंचवीस वर्षं आधीच १९२१साली टागोरांनी मित्राला लिहिलेल्या पत्रात ‘भारताची कल्पना’ किंवा ‘आयडिया ऑफ इंडिया’ असा शब्दप्रयोग केला होता. आपल्याच लोकांपासून वेगळेपणाची जाणीव ही संघर्षाला निमंत्रण देणारी असते, त्या भावनेला भारताच्या कल्पनेत थारा नाही. वैविध्य असेल म्हणूनच त्यात सौंदर्य आहे, ते जिवंत आणि सळसळतं आहे, असं टागोर म्हणाले होते. म्हणूनच त्यांनी राष्ट्रवादावर प्रखर हल्ले करणारी ती तीन प्रसिद्ध व्याख्यानं दिली होती. त्यात त्यांनी युरोपीय, जपानी राष्ट्रवादाची प्रारूपं आमच्यासाठी उपयोगाची नाहीत आणि भारताच्या संदर्भात लिहितांनाही ते म्हणतात की आपल्याला आपल्या कल्पनेतल्या भारताची प्राप्ती करायची असेल तर आपल्याला मानवतेच्या मूल्यांपेक्षाही राष्ट्र मोठं असतं या शिकवणुकीविरुद्ध लढावं लागेल. भारतातल्या अनेक समस्यांच्या मुळाशी असलेला मोठा धोका म्हणजे राष्ट्रवाद असं त्यांनी स्पष्टपणे लिहून ठेवलेलं आहे. त्यांची ही तीनही भाषणं वाचतांना लक्षात येतं की टागोर हे राष्ट्रवाद म्हणून जी काही सर्वसाधारण समजूत आहे तीपासून स्वतःला अलग करून शांतता, सुसंवाद आणि लोककल्याण या तत्त्वांशी स्वतःला जोडू पाहात होते.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

पंडित नेहरूंनी १४ डिसेंबर १९३२साली आपल्या मुलीला लिहिलेल्या पत्रात स्पष्टपणे लिहिलं होतं- “राष्ट्रवादाचा विचार किंवा भावना केवळ त्या विषयापुरती ठीक आहे, पण ती अविश्वसनीय आणि इतिहासलेखनात विक्षेप आणणारी आहे. अनेक घटनांकडे ती डोळेझाक करायला लावते आणि जेव्हा आपल्या स्वतःच्या इतिहासाचा संबंध येतो, तेव्हा या भावनेच्या तीव्रतेमुळे सत्याचाही अपलाप होतो. म्हणूनच भारताचा अलीकडचा इतिहास विचारात घेतांना आपण अत्यंत सावध असले पाहिजे.”

आजच्या काळात राष्ट्रवाद आणि भांडवलवाद हे परस्परांशी घट्टपणे संबंधित आहेत. भांडवलशाहीसाठी राष्ट्रवाद हे साधन आहे आणि ते त्याचं फलितदेखील आहे. बाजारी भांडवलशाही आणि राष्ट्रवाद ही हातात हात घातलेलीच भावंडं आहेत.

जगभरात आधी उल्लेख केला त्याप्रमाणे आज भांडवलशाही व्यवस्थांचा वाढत चाललेला जोर आहे त्यात उदारमतवाद आणि खुनशी फाशिस्टवाद बेमालूमपणे मिसळलेला आहे. भांडवली लोकशाहीतल्या संस्था आहेत, पण त्या सर्वंकषवादी सत्तांच्या हातातल्या कळसुत्री बाहुल्या बनल्या आहेत. न्यायालयं, केंद्रीय संस्था, विविध आयोग, पोलीस- सगळ्या संस्थांचं हे झालेलं आहे. लोकशाहीतल्या उदारमतवादाला नष्ट केलं गेलं आहे. कल्याणकारी राज्याची व्यवस्था संपवली गेली आहे.

प्रत्येकाकडे मोबाईल फोन आला आहे तेव्हा तंत्रज्ञान घरोघरी पोहचलं आहे असं आपल्याला वाटतं. पण त्याच साधनांनी व्यवस्था, बाजार आणि कंपन्या तुमच्या प्रत्येक कृतीवर पाळतही ठेऊ शकतात हेही सत्य आहे. तंत्रज्ञानासोबतच विषमता, अस्थिरता आणि असुरक्षितताही निर्माण होते. असुरक्षिततेचा फायदा मूलतत्ववाद्यांना होतो. कारण मग 'आपण' आणि 'ते' अशी उभी विभागणी करता येते. माहिती, माहितीवरची मक्तेदारी जशी संपते त्याचप्रमाणे माहितीला तर्क आणि तथ्याचा पाया असेलच अशी शाश्वती देता येत नाही.

असहमती दर्शवली किंवा अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या बाजूनं बोललं तर तुम्ही देशद्रोही असा दंडेलशाहीतला संदेश तिन्ही त्रिकाळ ऐकून लोक भयभीत झाले आहेत. विरोधातल्या कोणत्याही मुद्याला राष्ट्रभक्ती आणि देशाच्या सुरक्षेशी जोडलं जात आहे. शेतकरी मरताहेत, लोक रांगांमध्ये मरताहेत, महागाईनं हैराण होताहेत-सगळ्यांवर एकच उत्तर दिलं जातं. देशासाठी, देशभक्तीसाठी एवढं कराच. प्रत्येक गोष्टीचा असा राष्ट्रवादाशी बादरायण संबंध जोडला की सगळ्या अत्याचारांवर पांघरुण घालता येतं.

एक मोठा वर्ग आहे जो दिसत नाही. जो बहुसंख्य आहे आणि त्याची मतं विचारली जात नाहीत आणि ती माध्यमांपर्यंत पोहोचतही नाहीत. तो शहरी झगमगाटापासून दूर आहे. पण तो प्रत्यक्ष या बदललेल्या झगमगाटी खोट्या 'विकासा'ची झळ पोहोचलेला आहे. तो प्रत्यक्ष पीडित आहे. त्याच्या घरात आत्महत्या झालेल्या आहेत. मुलांना रोजगार नाहीत. त्याच्या गावात वीज, रस्ते नाहीत. त्याच्या जमिनी भांडवलदारांच्या खाणींसाठी, उद्योगांसाठी गिळल्या जात आहेत. बँकेसाठी त्याला तालुक्याच्या गावी जावं लागतंय आणि तिथं पोहोचूनही त्याच्या हातात काहीच पडत नाही. बेगडी घोषणांना-जुमलेबाजीला तो ओळखू लागला आहे.

आमचे ज्येष्ठ कवीमित्र विजय कुमार यांनी हाना आरेन्ट या विदुषीवर लिहिलेली नोंद वाचण्यात आली. त्यांच्यामुळे चिकित्सक विचारवंतांविषयी नव्या गोष्टी कळत असतात. हाना आरेन्ट या तत्त्वज्ञ विदुषीनं साठ वर्षांपूर्वी अ‍ॅडॉल्फ आईख्मन या नाझी अधिकाऱ्यावर जेरुसलेममध्ये झालेल्या खटल्यावर एक ग्रंथच लिहिला होता. त्याचं उपशीर्षक होतं- ‘दुष्कृत्यांच्या सामान्यीकरणाचा अहवाल’. दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान या आईख्मननं चार लाख ज्यूंना गॅस चेंबर्समध्ये पाठवलं होतं. आणि तरीही खटल्यादरम्यान त्याला काहीही पश्चाताप झालेला दिसत नव्हता. उलट ते कृत्य केवळ आदेशापोटी केलेली एक सामान्य घटना आहे हेच तो सांगत राहिला. त्यावर हाना आरेन्टनं जे म्हटलं आहे ते आजच्या काळालाही लागू होतं. ती म्हणते- “सर्वंकषवादानं जाणिवेचं बधिरीकरण अशा हद्दीपर्यंत पोहचलं की घोर अपराध आणि विकृत हिंसेनं केलेली कृतीही एरवीच्या सामान्य क्रियांएवढीच साधारण वाटू लागली.”पराकोटीच्या दुष्कृत्यांच्या अशा दैनंदिन कृतीसारखं होत जाण्याला हॅना आरेन्ट यांनी दुष्कृत्याचं सामान्यीकरण (बेनलिटी ऑफ इव्हिल) असं म्हटलं होतं.

आधुनिक हुकूमशाहीचा प्रारंभ या ग्रंथात त्यांनी निरिक्षण मांडलेलं आहे - “प्रगत होत जाणाऱ्या तंत्रज्ञानाबरोबरच माणसं एकेकटी होत जातात. एकेकट्या माणसांचा एकमेकांना अनोळखी असा समाज झालेला असतो. आपल्याच समुदायापासून असं वेगळं पडणं पुन्हा एका बधिरपणाला आणि संवेदनाहीनतेला जन्म देतं. अशा वेळी हुकूमशाही सत्ता आपल्या यंत्रणेद्वारा दररोज होणारे अन्याय अत्याचार योग्य ठरवत असते. त्यासाठी नवनव्या कल्पना लढवणारे कारखाने काढून सगळीकडे आपला अंमल बसवणं हेच त्यांचं उद्दिष्ट बनतं. अशा सैतानी सत्ता निश्चित अजेंडा घेऊन आणि नवी चलनी रूपकं वापरून अंकूश ठेवतात. अशा प्रकारच्या यंत्रणा या आधुनिक काळातल्या भयानक दहशतीची नवी रूपं आहेत.”

आज आपण हेच चित्र प्रत्यक्षात पाहात आहोत.

तुम्ही निगराणीखाली आहात

रस्त्या-रस्त्यावर, ऑफिसेसमध्ये, दुकानांमध्ये-मॉल्समध्ये, बसस्थानकांवर, रेल्वे स्थानकांवर किंवा विमानतळांवर छुपे सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले असतात. काही वेळेला ते ‘यु आर अंडर सर्व्हेलन्स’ असं उघडपणे सांगतही असतात. सरकारी-खाजगी कार्यालयांमध्ये-कॉलेजा-विद्यापीठांमध्ये-कंपन्या-फॅक्टऱ्यांमध्ये येता-जाता आता बायोमेट्रिक यंत्रात बोटांचा ठसा उमटवावा लागतो. या गोष्टी वरवर साध्या आणि दैनंदिन गोष्टींमध्ये सूसुत्रता आणणाऱ्या आहेत असं वाटतं. बऱ्याच अंशी ते खरंही आहे. पण तुमच्यावर सतत नजर आहे, तुम्ही कुठे आहात, काय करता आहात, किती वाजता आला-गेला, काय लिहीत आहात हे नोंदवलं जातंय अशी एके काळी केवळ फिक्शनमध्ये आढळणारी गोष्ट आता प्रत्यक्षात सगळीकडे दिसत आहे.

आजच्या समाजाचं हे रूप सत्तेचं विश्लेषण करताना मिशेल फुकोनं आधीच सांगितलं होतं. सत्ता-विशेषतः हुकूमशाही-भांडवलशाही सत्ता प्रत्येक नागरिकावर सतत दरक्षणी नजर ठेवून असते. आपण ते आता स्वीकारत चाललो आहोत. कारण लोकशाहीवरचे आपले विश्वास आपणच घालवून हे संकट स्वीकारायला सज्ज झालो आहोत.

या दृश्य वास्तवापलीकडे जे तंत्रज्ञानानं वास्तव निर्माण केलेलं आहे ते अधिक भयानक आहे. व्यावसायिक कंपन्या, सरकारी संस्था यांच्याकडे सर्वसामान्य नागरिकांची माहिती ज्या प्रमाणावर साठवली जाते, त्या प्रमाणात माहितीच्या आधारे सुपरपॉवर बनताहेत. एक मोबाईल फोनधारक म्हणजेच एक क्रयवस्तू झालेला आहे. त्याला त्याच्यासाठी एक बबल करून त्याच्यातच बंदिस्त केल्यामुळे त्याच्या विचाराबाहेरचं जग तर बेदखल होतंच, पण तो स्वतः मात्र नकळत विचाराबाहेरच्या मता-प्रचाराचा वाहक होतो. ते त्याला कळतही नाही. यालाच ‘डिजिटल हुकूमशाही’ असं म्हटलं गेलं आहे. आधारकार्डाचे उपयोग आणि आवश्यकता हा विषय निराळा आहे, पण त्यातली त्या व्यक्तीची माहिती- त्याचा वैचारिक कल, त्याची जात, धर्मविषयक मतं, त्याचे आजार, त्याचे नातेवाईक-आप्त, तो कुठे राहतो, काय वाचतो, पाहतो, कुठे काय जेवतो, किती पैसे कमावतो आणि खर्च करतो, किती पैसे करात भरतो ही सगळी माहिती यंत्रणेतल्या वापरकर्त्याच्या सोयीप्रमाणे त्याला सहज उपलब्ध असतेच. म्हणजे त्याच्यावर अंकूश ठेवायलाही ती वापरली जाऊ शकते.

मध्यंतरी स्पायवेअर वापरून पाळत ठेवली गेल्याच्या, संगणकांमध्ये माहिती घुसवून मग गुन्हेगारीचे आरोप ठेवले गेल्याच्या किती बातम्या आल्या. ते कशासाठी विकत घेतलं याचं स्पष्टीकरण सरकारनं नीट दिलेलं नाहीच. हे प्रकार जगभर वाढत आहेत. आता यात मेटाव्हर्सची भर पडली आहे. मेटाव्हर्समध्ये आभासी चष्मा लावून गेल्यावर एका स्त्रीवर इंग्लंडमध्ये आभासी बलात्कार झाल्याची घटना नुकतीच समोर आली. मूलतत्त्ववादी संघटना याचा किती गैरवापर करतील याचा विचारच करवत नाही.

विज्ञान, तंत्रज्ञान आणि विवेक

ज्ञानप्रसाराच्या काळात विज्ञानच श्रेष्ठ होऊन बसलं. बुद्धी, विवेक आणि तर्कानं(च) जग जाणता येतं असं म्हटलं गेलं. तंत्र विकसित होऊ लागली. ज्ञानाची पुनर्व्याख्या झाली. नीतीशास्त्रीय कल्पनांचं महत्त्व कमी होत गेलं. ‘ज्ञानाच्या क्षेत्रात विज्ञान श्रेष्ठ, विश्वात मानव श्रेष्ठ, तोच विश्वाचा अधिपती` हा विचार बळावला. सृष्टीत जे-जे काही आहे, प्राणी-पशू-हवा-पाणी-खनिजं, ते-ते सगळं  आपल्या उपभोगासाठीच आहे, अशी आक्रमक मग्रुरी यातून आली. कारण विवेक, बुद्धी आणि तर्क असलेला मानवच मालक मानला गेला. नंतर पुढच्या दोन शतकात ही मग्रुरी उजागरच झाली होती. त्यातही उतरंड होती. युरोपीय मानव ग्रेट. बाकी पौर्वात्य ज्ञान असेल किंवा मेसापोटेमिया, इजिप्त आणि आफ्रिकेतल्या टोळ्याचं जे ज्ञान असेल ते त्यांच्या लेखी बिनमहत्त्वाचं होतं. बेमुर्वतखोरपणानं असंही म्हटलं गेलं की, ‘हे सगळं चार-दोन ओळीत मावेल किंवा फार तर अख्ख्या पौर्वात्त्य संस्कृतीचं एकत्रित ज्ञान युरोपातल्या एखाद्या प्रचंड ग्रंथालयातल्या एका कपाटातल्या एका शेल्फवर फार तर मावेल.’ ही खरं तर साम्राज्यशाहीची अरेरावी होती. पौर्वात्त्य ज्ञानाविषयीचं औद्धत्त्य होतं. साम्राज्यशाहीचं समर्थन करण्यातला माज होता.

विज्ञान हे तंत्रज्ञानाचं साधन मात्र बनून राहिलं. त्याची परिणती पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात आपण पाहिली. संहारक शस्त्रं, ज्यातून खंडांतर करून बॉम्ब टाकून परत येता येईल अशी वेगवान बॉम्बर विमानं, युद्धनौका, विषारी तोफा यातून संहारासाठीचं तंत्रज्ञान वापरलं गेलं. नकाशाशास्त्रातली प्रगती, भूगोलाचा अभ्यास याचा वापर नवनवे प्रदेश जिंकण्यासाठी केला गेला. त्यातून युरोपात वाढलेली लोकसंख्या जिरू शकली, युरोपातल्या गरिबीवर उत्तर शोधता आलं. साम्राज्यवादाच्या मुळाशी मरिनर्स कंपास या यंत्राचा शोध आहे. नकाशाशास्त्राचा शोध आहे. छपाईचा शोध आहे. या तंत्रज्ञानानं साम्राज्यविस्ताराची नशा वाढवत नेली. हिटलरसाठी फेबर कंपनीनं झायक्लोन-बी नावाचं केमिकल मोठ्या प्रमाणावर तयार केलं. ते फवारलं आणि त्यातून तात्काळ ज्यूंना मारण्याची तजवीज केली. हीसुद्धा तंत्रज्ञानाची किमया होती हे आपल्याला विसरता येणार नाही. आजच्या काळात झायक्लोन-बीची गरज नाही ते काम ओटीटीवरची अव्याहत चालणारी चॅनल्स, चार-चार लेन्सचे कॅमेरा फोन्स आणि खिशाला परवडणारा डेटापॅक एवढ्या विषात भागतंय.

विवेकाच्या कौतुकाच्या नादात, तत्त्वज्ञानाचं महत्त्व कमी करून नफाकेंद्री, लढाईकेंद्री राक्षसी महत्त्वाकांक्षेसाठीचं तंत्रज्ञान निर्माण झालं. ज्ञानप्रसारानंतर आलेल्या विज्ञानाची जागा पहिल्या महायुद्धापर्यंत तंत्रज्ञानानं घेतली. यालाच टेक्नॉलॉजिकल रॅशनॅलिटी असं म्हटलं गेलं. विवेकाचं रूपांतर पिग्मी रूपात केलं गेलं. जो वड म्हणून वाढू शकत होता, त्याचं या टेक्नॉलॉजिकल रॅशनॅलिटीनं विषारी झुडुपात रूपांतर केलं.

तंत्रज्ञानाला सपाटीकरण पाहिजे असतं. जगभर जागतिकीकरणाच्या सोयीसाठी एकच भाषा असणं आवश्यक ठरतं. व्यापार, उद्योग, नफ्यासाठी ते सोयीचं असतं. म्हणून हजारो भाषा संपवण्याचं पद्धतशीर कारस्थान यातून रचलं जातं. सुरुवातीला अंक इंग्रजीत शिकण्याचा आग्रह धरला जातो. मग स्थानिक भाषेत इंग्रजी शब्द वापरात वाढवत नेण्याच्या पद्धती अंमलात येतात. तशा जाहिराती लिहिल्या जातात. अख्ख्या वाक्यात एखाद-दुसराच स्थानिक शब्द वापरण्याची सवय लावली जाते. मग जगण्याची शैलीपण तशीच होऊन जाते. भाषेचं हे क्रिओलायझेशन-हळूहळू ती भाषा नष्ट करत नेतं. स्वैपाकघरातले, शेतीतले, ग्रामीण संस्कृतीतले स्थानिक भाषेतले शब्द कमी-कमी होत जातात. संवादातले स्थानिक भाषांमधले शब्द कमी होत जातात. संवादाचा अवकाशही कमी कमी होत जातो. कारण भोगलोलुप व्यक्तिवादी समाजात टीव्ही-इलेक्ट्रॉनिक माध्यमं-चंगळीचे विविध मार्ग यांमुळे त्याचा संकोच होत गेलेलाच असतो. यात आज, सत्य-असत्य, न्याय-अन्याय, वाटा चुकीच्या लोकांकडे जाईल की समान वाटपाचा आग्रह करावा हा मूल्यविवेक ओळखणं गरजेचं आहे.

हे सगळं दुःस्वप्नकारक चित्र मी मांडत आहे असं वाटेल. पण आजचा काळ आणि त्यातले पेच समजून घेण्यासाठी ते ओळखणंही गरजेचं आहे कारण अंतिमतः तळातला माणूस त्यानं भरडला जाणार आहे. भांडवली बाजार यंत्रणा, सांस्कृतिक राष्ट्रवाद, तंत्रज्ञानाचं प्रस्थ यांमुळे निर्माण झालेल्या विषमतेच्या, दुजेपणाच्या खाईत सामान्य माणूस वंचित, वर्जित आणि विकल होत चाललेला आहे. 

विद्रोहाची गरज

यासाठी आपल्याला विद्रोह करावा लागेल. प्रस्थापित किंवा प्रतिष्ठापना केल्या गेलेल्या असत्याला सत्यानं ललकारणं, आव्हान देणं, प्रश्न विचारणं म्हणजे विद्रोह. असा विद्रोह ज्ञानेश्वरांनी केला होता, तुकोबांनी, बसवेश्वरांनी, जनाबाईंनी, कोपर्निकसनं, गॅलिलिओनं आणि अनेकांनी केला होता. सॉक्रेटिसनं केलेला विद्रोह आणि त्याच्या संघर्षाचं आज अगत्यानं स्मरण करावं असा काळ आलेला आहे. ज्ञानदेवांनी देशी लोकांच्या भाषेत लिहिणं हे एक बंडच होतं. आणि मराठीची थोरवी मांडताना ते अभिमानानं म्हटले होते-

दावूं वेल्हाळ देशी नवी। जे साहित्यांत बोजावी।

अमृतातें चुकी ठेवी। गोंडसपणे ।। ११-९

तरुणांना प्रश्न विचारायला शिकवतो, रूढी-प्रथा कशा चुकीच्या आहेत ते सांगतो आणि विवेक आणि तर्काच्या बाता मारत असतो असा ठपका ठेऊन सॉक्रेटिसला विषाचा पेला देऊन मारलं होतं. संत बसवेश्वरांनी परंपरेशी संघर्ष करीत नवी परंपरा निर्माण करतांना तिला ऊर्जा दिली. सामाजिक किंवा लिंगभात्मक भेदभावांना, रूढी-प्रथांना-अंधश्रद्धांना त्यांनी थारा दिला नाही.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

विद्रोहाचं नातं सत्याशी असतं. सत्तेद्वारे जेव्हा असत्याची प्रतिष्ठापना होते, ते प्रस्थापित होतं, त्यावेळी सत्य त्याला आव्हान देतं. असत्य हे दमनासाठी वापरलं जाणारं विखारी साधन आहे. सत्यानं असत्याला ललकारणं, आव्हान देणं म्हणजे विद्रोह.

अविनाश मिश्र या तरुण हिंदी कवीनं विद्रोहाविषयी अगदी थोडक्या ओळींमध्ये जे मांडलं आहे ते पटण्यासारखं आहे. त्याच्या ओळींचा मराठी तर्जुमा असा आहे-

या दुनियेत माणसाला जर

विद्रोहाशिवायच जगता आलं असतं

तर शक्य आहे हे साक्षात वर्तमान

आणखी सार्थ आणि सुंदर होऊ शकलं असतं

विद्रोह या संकल्पनेचा जन्मच

मुळात दमनाच्या पीडेतून झाला असावा.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......