अजूनकाही
हे मान्यच की, अर्ध जग महिलांचं आहे. अर्धा अवकाश मुलींनी व्यापलाय. पण उरलेल्या अर्ध्या जगात पुरुष आणि मुलं आहेत. त्यांच्या जगासोबत समजूत आणि सहमती ठेवतच महिलांना या जगात राहावं लागणार आहे. अशा वेळी ‘जागतिक महिला दिन’ साजरा होत असताना आजचा अर्ध्या जगातला तरुण काय विचार करतो उरलेल्या अर्ध्या जगातल्या मुली, स्त्रियांबाबत, हे जाणून घेण्याचा हा छोटासा प्रयत्न.
औरंगाबाद शहरातला केनॉट प्लेस हा इलाका रात्री उशिरापर्यंत तरुण मुला-मुलींनी गजबजलेला असतो. तिथल्या काही तरुण मुलांशी बोलून त्यांची मनोगतं समजून घेतली. त्यातले हे काही प्रातिनिधिक संवाद...
तुमच्या महाविद्यालयात मुला-मुलींच्या मैत्रीसाठी योग्य वातावरण आहे का? तुमचा तुमच्या मैत्रिणींशी काय संवाद होतो?
– आमच्या कॉलेजात आम्ही मुलं-मुली एकत्र शिकतो. एकमेकांशी बोलतो. सोबत डबा खातो. पण एकदा कॉलेजात एका मुलीची एका मुलानं छेड काढली. त्यानंतर मुला-मुलींमधलं वातावरण जरा बिघडलं. तेव्हापासून मुली आमच्याशी नीट बोलत नाहीत. जरा अंतर ठेवून वागतात.
- मग आम्हाला खूप अपराध्यासारखं वाटलं. मुलींनी सावध असलंच पाहिजे. पण सगळीच मुलं सारखी नसतात ना!
- आमच्या कॉलेजात तर सगळीकडं सीसीटीव्ही बसवलेत. त्यामुळं मुलं मुलींशी चांगलंच वागतात!
- मी तर माझ्या मैत्रिणींना, बहिणींना एकटं फिरू देत नाही. दिवस खराब आहेत. आणि मुलं कशी असतात ते आम्हाला माहिताय. त्यांना नाही.
दिवस का बरं खराब व्हायलेत? पूर्वी चांगले होते का खरंच?
– सोशल मीडियामुळे मुलं बिघडतात. आजकालच्या चित्रपटातही हिरॉइन कशाही कपड्यात असतात. ते पाहून मुलं मुलीकडं वाईट नजरेनं पाहतात.
– नाही, नाही. आपण आपली संस्कृती विसरलो, त्यामुळे मुलींवरचे अत्याचार वाढलेत.
हे चित्र बदलण्यासाठी काय केलं पाहिजे बरं?
– बलात्कार करणाऱ्याला फाशीची शिक्षा द्यायला पाहिजे. म्हणजे इतरांना तसं काही करण्याची भीती वाटेल.
- कॉलेजेसमध्ये सेमिनार घेतले पाहिजेत.
- मुला-मुलींमध्ये चांगली मैत्रीपण होऊ शकते हे शिक्षकांनी सांगितलं पाहिजे.
- सेक्स एज्युकेशन द्यायलाच पाहिजे. तेसुद्धा मुला-मुलींना एकत्र बसवून द्यायला पाहिजे.
- आपल्या समाजात एकीकड मुलींना सांगतात असं रहा, तसं राहू नका. पण मुलांना जास्त काही कुणी सांगत नाही.
आपण बऱ्याचदा ऐकतो, आजकालच्या मुली बिघडल्यात. त्या नीट कपडे घालत नाहीत म्हणून त्यांच्यावर अत्याचार होतात. तुम्हाला काय वाटतं?
- हो, आपला समाज थोडा मागासलेला आहे. त्यामुळे मुलींनी नीट कपडे घातले पाहिजेत. सावधगिरी बाळगली पाहिजे.
- असं काही नाही. मी ‘पिंक’ सिनेमा पाहिलाय. मुलींना त्यांचं स्वातंत्र्य आहे. मुलांनी थोडं बदललं पाहिजे.
- सध्या वातावरण खूप बिघडलेलं आहे. दोघे भाऊ-बहीण जरी बोलत उभे असले तरी पोलीस संशय घेत त्यांना हटकतात.
- पण यात फक्त मुलींची चूक नाही, मुलांचीही आहे.
- मुलांशी बोलणाऱ्या मुलींकडे त्यांच्यासोबतच्या इतर मुलीपण वाईट नजरेनं पाहतात. मुली खूप इनसिक्युअर असतात.
गावाकडच्या मुली आणि शहरातल्या मुली यांच्यात काय फरक दिसतो?
- गावाकडं मुलींना दबून राहावं लागतं. काय घालायचं, कसं बोलायचं, हसायचं याच्यावर बंधनं असतात. शहरात मोकळीक मिळते.
- शहरातल्या मुलींना समता पाहिजे असते. पण त्यांना मुलगी म्हणून विशेष सुविधाही लागतात. असं का?
- गावाकडच्या मुली अनोळखी माणसानं पत्ता विचारला तरी घाबरतात. शहरातल्या मुली धीट असतात.
- गावाकडच्या मुलींचं लग्न लवकर होतं. कधीकधी आई-वडिलांच्या मनात नसतानाही ते समाजाच्या दबावापायी मुलीचं लग्न करून देतात. शहरात शिक्षणाला महत्त्व असतं.
पण शहरात तरी मुलींना लग्न केव्हा करायचं, कुणाशी करायचं याचं स्वातंत्र्य मिळतं का?
- खरं तर नाही...
- मुलींना इतकी दुनिया माहीत नसते. मुलं बाहेर फिरतात, जग पाहतात. त्यामुळे भावाला, वडिलांना विचारूनच मुलींनी लग्न केलेलं चांगलं.
- समाज मुलांच्या हातून झालेली चूक मान्य करतो. मुलींची चूक मात्र अजूनही मान्य होत नाही.
- पण आजकाल तर मुलीच मुलांपेक्षा पुढे असतात. त्या आमच्यापेक्षा चांगले मार्क मिळवतात.
असं कसं काय बरं होत असेल?
- नीट अभ्यास नाही केला तर घरचे लग्न लावून देतील असं दडपण असतं ना मुलींवर! मुलांना असं काही नसतं.
मुलींशी वागता बोलताना मुलांच्या चुका होतात का? होत असतील तर काय?
- अनेकदा मुलं नुसतं फ्लर्ट करण्यासाठी मुलींशी बोलतात.
- मुलगा त्याच्या वडिलांकडे पाहत मोठा होतो. वडील जर महिलांचा आदर करत नसतील तर त्याच्यावर चुकीचे संस्कार होतात.
- मुलांना खूप लवकर राग येतो. मग तोडफोड, मारहाण करावी वाटते.
- मुलींनी नाही म्हणलेलं मुलांना खूपदा आवडत नाही.
तुम्हाला जोडीदार म्हणून कशी मुलगी पाहिजे?
- माझ्या आई-वडिलांना नीट सांभाळणारी असावी.
- नोकरी करावी, पण घरकामही नीट आलं पाहिजे.
- आम्ही दोघं नोकरी करू. पण मीसुद्धा तिला घरकामात मदत करेन. सध्या आईलापण मदत करतोच ना!
- घरी बायकांची कामं केली की, लोक मुलांवर हसतात.
- माझ्याच क्षेत्रात काम करणारी पत्नी पाहिजे.
- माझ्याशी मित्राप्रमाणे वागणारी असावी.
तुमच्या वयाच्या मुलींना काय सांगाल?
- सेल्फ डिफेन्स आणि सेल्फ रिस्पेक्ट शिका.
- सावध रहा, पण अतिसावधपणा सोडा. सगळीच मुलं अगदी वाईट नसतात.
- स्वातंत्र्यासोबत येणाऱ्या जबाबदाऱ्यापण ओळखा.
- महिला म्हणून कायदा तुमच्या बाजूनं असतो. त्याचा गैरवापर करू नका.
------------------------------------------------------------------------------------
(या संवादामध्ये कृष्णा काळे, निलेश शिंदे, राधेश्याम काळे, भारत चंदर, बाळकृष्ण नालेगावकर, कृष्णा निकम, कुणाल ठाकूर आणि दीपक शिंदे यांसह इतरही काही १६ ते २८ वयोगटातल्या तरुणांनी सहभाग घेतला.)
------------------------------------------------------------------------------------
लेखिका मुक्त पत्रकार आहेत.
sharmishtha.2011@gmail.com
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment