त्या लोककथेप्रमाणेच, समाजातले अनेक तरुण पुंगीवाल्याच्या मागे मोहीत होऊन जातायत आणि हा पुंगीवाला त्यांना खाईच्या दिशेने घेऊन जातो आहे
पडघम - साहित्य संमेलन विशेष
भारत सासणे
  • संमेलनाध्यक्ष भारत सासणे आणि उदगीर संमेलनाचे बोधचिन्ह
  • Sat , 23 April 2022
  • पडघम साहित्य संमेलन विशेष ९५वे अ. भा. मराठी साहित्य संमेलन उदगीर 95th A. B. Marathi Sahitya Sammelan संमेलनाध्यक्ष Sammelanadhyaksha साहित्य संमेलन Sahitya Sammelan भारत सासणे Bharat Sasne

९५ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कालपासून उदगीर, जिल्हा लातूर इथं सुरू झालं आहे. उद्या या संमेलनाचा समारोप होईल. या संमेलनाचे अध्यक्ष प्रसिद्ध कथा-कादंबरीकार भारत सासणे यांच्या अध्यक्षीय भाषणाचा हा चौथा आणि शेवटचा संपादित अंश...

..................................................................................................................................................................

मित्रहो! अमृतकाळ सुरू झाला आहे असं सांगितलं जात आहे. लेखकाने अमृतकाळाबद्दल ऐकलं आणि तो थोडा चकित झाला. थोडं आठवू लागला. त्याने स्वतःला विचारलं,

“काय असावं हे? अमृतकाळ कसला?”

तेवढ्यात त्याने काही चाहूल ऐकली. कार्टूनच्या चित्रात दडलेला कॉमन मॅन त्याच वेळेला लपतछपत येऊन पोहोचला. तो उत्तेजित, थोडा भयभीत असा वाटला. त्याने फोन केला नव्हता. कारण मोबाइलमधून हेरगिरी केली जाते असं त्याने ऐकलं होतं. त्याने इकडेतिकडे पाहिलं आणि म्हटलं,

“तुम्हाला समजलं नाही? अमृतकाळाबद्दल?”

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

लेखकाला काही समजलं नाही असं लक्षात आल्यानंतर कॉमन मॅन दबल्या, भयभीत आवाजात पण उत्तेजित होऊन सांगू लागला..... अहोऽ!... त्या राहूला काय पाहिजे होतं? अमृताचे दोन थेंब? ते मिळवण्यासाठी त्याबिचाऱ्याने वेषांतर केलं. रूपांतर केलं. छद्मरूप धारण केलं. फसवण्याचा प्रयत्न केला. तो तुमच्या पंक्तीत जाऊन बसला. तेही पुढे, पुढच्या रांगेत, अग्रभागी. द्यायचे होते दोन थेंब अमृताचे. पण तुम्ही तसं केलं नाही. तुम्ही त्याला ओळखलंत. तुम्ही त्याला भर पंक्तीतून उठवलंत. तुम्ही त्याचा अपमान केला. उपहास केला. निर्भत्सना केली. तुम्ही त्याला हसलात. पण इतकंच नाही. तुम्ही त्याचा शिरच्छेददेखील केला. नसता केला तर, एकटा एकांडा पण उपद्रवी म्हणून राहिला असता तो! पण शिरच्छेद केल्यामुळे एकाचे दोन झाले-राहू आणि केतू. एकाकडे कुटील विचार, तर दुसऱ्याकडे अमानुष शक्ती. एकाकडे डोकं, दुसऱ्याकडे निर्बुद्ध शरीर आणि उपद्रवी शक्ती... राहूचे उपासक आता छद्मरूपाने तुम्हाला छळण्यासाठी वावरत आहेत. हे सगळे बहुरूपीउपासक आहेत. ते दुष्टबुद्धी, क्षुद्रबुद्धी आणि छद्मबुद्धी आहेत, आणि त्यांना सूड उगवायचा आहे. एक म्हणतो आहे, मी काशी. दुसरा म्हणतो, मी मथुरा. तिसरा म्हणतो आहे, मी द्वारका, मी अयोध्या, मी... मी... मी! हे राहूचे उपासक विविध रूपाने वावरतायत. कधी ते संस्कृतीरक्षक होतात. कधी ते अभिमानी राष्ट्रभक्त होतात. कधी ते ज्योतिषी होतात. कधी ते भाष्यकार होतात. राजकीय विश्लेक्षक होतात, टोप्या बदलतात. त्यातला एक पुंगीवाला झालेला आहे किंवा बासरीवादक. त्यांनी तुम्हाला आश्वासन दिलंय, की तुमच्या चिंता दूर करू, तुमच्या घरातले उंदीर पुंगी वाजवून आणि मोहीत करून दूर घेऊन जाऊ, आणि तुम्ही विश्वास ठेवला आहे. आता मात्र त्या लोककथेप्रमाणेच, समाजातले अनेक तरुण पुंगीवाल्याच्या मागे मोहीत होऊन जातायत आणि हा पुंगीवाला त्यांना खाईच्या दिशेने घेऊन जातो आहे.

कॉमन मॅन पुढे सांगू लागला, हळुवार आवाजात... नसता केला शिरच्छेद, दिले असते चार थेंब तर ही वेळ आली नसती. आता ‘राहू-केतू’चा उच्छाद सहन करणं इतकंच आपल्या नशीबी आहे. ज्योतिषाचार्यांना जाऊन विचारण्याची सोय नाही, कारण ते आधीच विकले गेलेले आहेत. ही तर नियतीचीच इच्छा आहे असं ते तुम्हा नियतीवाल्यांना सांगत आहेत. अमृतकाळ सुरू आहे आणि अमृताच्या चार थेंबासाठी लढाई सुरू आहे. श्रेयासाठी लढाई सुरू आहे. राहूचे उपासक सूड घेण्याच्या प्रयत्नात आहेत.

कॉमन मॅनचं सांगून झालं असावं. लेखकाने विचारलं,

“मग? एकूण बरं चाललेलं नाही?”

या प्रश्नावर तो थबकला. मग सांगू लागला... उद्याची पहाट सुंदर असेल या त्यांच्या आश्वासनावर खरं तर मी विश्वास ठेवायला नको होता, कारण उद्याची पहाट उजाडणारी नसते, उद्याचा दिवस येतच नसतो. कॉमन मॅनला शेरोशायरीची आवड नाही. ज्ञान पण नाही. पण तो स्टाईलने कपाळाला हात लावतो. मतितार्थ काव्यमय. दाग़ नावाच्या कवीच्या कवितेसारखा. तो सुचवतो-

गज़ब किया, तेरे वादे पर ऐतबार किया

तमाम रात क़यामत का इंतज़ार किया

लेखक सामान्य माणसाच्या- कॉमन मॅनच्या या हताशेकडे पाहतो आहे.

..................................................................................................................................................................

उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअ‍ॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...

हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal

................................................................................................................................................................

खरं आणि खोटं

लेखकाला ‘आंदोलन-जीवी बुद्धिवाद्यां’कडून एक गुप्त वार्ता समजली आहे आणि त्याची छाती धडधडायला लागली आहे. त्याने ऐकलं आहे की, Through the looking glass या पुस्तकाला राष्ट्रीय ग्रंथ म्हणून मान्यता देण्याचं चाललं आहे. लेखक बुचकळ्यात पडतो आहे आणि या मागचं कारण बुद्धिवाद्द्याला विचारतो आहे. बुद्धिवादी दबल्या आवाजात सांगतो की, चार्ल्स लुटविज् याने ‘लेविज् कॅरॉल’ या नावाने १८७१मध्ये ही कादंबरी लिहिली. लेखकाला ते थोडं माहीत असतं. तो म्हणतो की, ही तर बालांसाठी लिहिलेली कादंबरी आहे. दबल्या आवाजात पुन्हा उत्तर मिळतं की, नाहीतरी सध्या समाज बालबुद्धी होत चाललेला आहे. या कादंबरीतली अॅलिस नावाची बालनायिका आरशाच्या आतमध्ये प्रवेश करते. आरशाचं जग उलटं असतं. जे डावे ते उजवे दिसतात, जे उजवे ते डावे दिसतात. आंदोलनकारी राष्ट्रद्रोही दिसतात. सत्याचं असत्य होतं. असत्याचं सत्य होतं. भ्रमाला वास्तव मानलं जातं. वास्तवाला स्वप्न मानलं जातं. जे काही दाखवलं जातं आहे ते खरं, असं मानणाऱ्या आणि संमोहित झालेल्या जनतेसाठी हाच ग्रंथ मराष्ट्रीय ग्रंथङ्क! बुद्धिवादी असं सांगतो की, या कादंबरीचं सार Play with the relationship between something and nothing तसेच Unreal world of illogical behaviour' असं आहे. म्हणजेच फॅन्टसीच्या जागी वास्तव आणि वास्तवाच्या जागी फॅन्टसी. त्यातून सामान्य जनतेच्या मनाशी केलेला, जनतेच्या बुद्धिशी केलेला हा खेळच. ते ऐकून लेखक आणखीनच खचून जातो आहे. हताश होतो आहे. स्वतःशीच, कुजबुजत्या स्वरात म्हणतो आहे, ‘म्हणजे ही भ्रमयुगाची सुरुवात तर नाही?’

लेखक पाहतो

लेखक बघतो आहे. पाहतो आहे. समजून घेतो आहे. त्याला जाणवतं आहे. तो सहकंपित होतो आहे. भोवताल त्याला अस्वस्थ करतं आहे. लेखक चिंता वाहतो. तो सामान्य माणसाच्या एकूण फसवणुकीकडे पाहतो.

बुद्धिवाद्यांची आणि बुद्धिजीवींची आणि परिणामतः बुद्धिवादाची होणारी टिंगल लेखक पाहतो आहे. ‘हॉवर्ड युनिर्व्हसिटी’ आणि ‘हार्डवर्क’ यावर केलेली निर्बुद्ध कोटीदेखील त्यांनी ऐकली-पाहिली आहे. सरस्वतीचा अपमान आणि लक्ष्मीचं पूजन तो पाहतो आहे. पैसे मोजून मोजून हाताला घट्टे पडतात आणि त्यामुळे हळुवार स्पर्श समजेनासा होतो, तसं काहीसं तुमचं, माझं, समाजाचं आणि राज्यकर्त्यांचं झालं आहे का, असं लेखक स्वतःला विचारतो आहे. हताश बुद्धिवाद्यांची स्थलांतरं आणि त्यांचं मौनात जाणं तो पाहतो आहे.

एक देश, एक भाषा, एक पुस्तक, एक संस्कृती असं काहीसं कोणीतरी म्हणतं आहे. लेखकाला यात ‘मेथड इन मॅडनेस’चा वास येतो आहे. पण हा केवळ मॅडनेस नाहीए. विचारपूर्वक केलेलं चिथावणीखोर विधानदेखील आहे. मुस्लीम आणि ख्रिश्चन संस्कृती अस्तित्वात नाही, ते धर्मही नाहीत, असलेच तर पंथ आहेत असंही हा कोणीतरी म्हणतो आहे. ऐकून चकित होणारे लोक संस्कृतीची व्याख्या वगैरे शोधू लागले आहेत. लेखक व्याख्या इत्यादीच्या घोटाळ्यात पडत नाही. त्याला बगलेमध्ये लपवलेली सुरी नेमकी दिसते आहे.

लेखक बुचकळ्यात पडून समाजाकडे पाहतो आहे. समाजात विभाजनवादी निरर्थक, पण अनर्थकारी, उत्तेजना वाढवणारा खेळ मांडला जातोय. आता, त्या पाठोपाठ कुठल्याशा सिनेमाचं समर्थनसुद्धा करण्यात येतं आहे. आता त्यामुळे, सिनेमाही तुमचा आणि आमचा झाला. कला विभाजित झाली. उपद्रव आणि उपद्रव. उन्माद आणि उन्माद. जनतेच्या भोळ्या मनाशी चालवलेला हा खेळ लेखक पाहतो आहे. माणसांचं विभाजन होताना पाहतो आहे आणि विद्वेषाचं गणितही मांडलेलं पाहतो आहे. कोणीतरी म्हणतं आहे की, स्वातंत्र्य भीकेत मिळालंय. भिकेत मिळालं? म्हणजे स्वातंत्र्यसेनानी काय भीक मागत होते? पण निर्बुद्ध, दोन कवडीचीही किंमत नसलेल्या लोकांकडून स्वातंत्र्याचा अपमान होतो आहे, हे आपण उघड्या डोळ्याने पाहतो आहोत. काही कथ{त साधू मुसलमानांचं शिरकाण करायचं म्हणतायत. ते असंही म्हणतायत की भारतीय संविधानावर विश्वास ठेवणाèयांचा आणि त्यांच्या मुलांचाही मृत्यू होणार आहे. असा हास्यास्पद शाप देणारे हे साधू आहेत?

लेखक एकदा गावी गेला होता. एका बड्या घराच्या अंगणात बांधलेली कुत्री त्याच्यावर अकारण भुंकू लागली. लेखकाने घरमालकाकडे तक्रार केली. त्याला म्हटलं की, तुमचे कुत्रे आमच्यावर भुंकत आहेत. घराचा मालक म्हणाला, आम्ही काही त्या कुत्र्यांना भुंकायला सांगितलेलं नाही. लेखक म्हणाला, पण तुम्ही त्यांना भुंकू नका असंदेखील सांगितलेलं नाही.

लेखक पाहतो की, सरस्वतीचे उपासक दुःखी होतायत आणि लक्ष्मीची उद्धट उपासना चाललीय. अपवाद वगळता सर्वत्र शांतता आहे. सर्वत्र दडे बसवणारी शांतता. कोणीच बोलत नाही. कोणीच हरकत घेत नाही. सर्वत्र आणि सर्वत्र ‘चतुर मौन’ पसरलेलं आहे. या मौनात स्वार्थदेखील आहे. तुच्छतादेखील आहे. हिशोब आणि व्यवहारदेखील आहे. सामान्य जनतेच्या दुःखाला चिरडणंदेखील आहे. भीती आणि दहशतदेखील आहे. प्रलोभनंदेखील आहेत. विनाशदेखील आहे.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

आत्महत्या!

लेखकाने असं ऐकलं आहे की, कवी शंकर वैद्यांच्या कवितेतल्या पुस्तकांनी कपाटामध्येच आत्महत्या केल्या आहेत. उरलेल्या पुस्तकांना दिनांक २३ एप्रिलच्या जागतिक पुस्तकदिनाच्या दिवशी आत्महत्या करायच्यात म्हणे! त्याने असंही ऐकलं आहे की, याच कपाटात भारतीय संविधानानेदेखील आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे. लेखक ऐकतो, लेखक पाहतो, लेखक चिंतित होतो. क्वचित कोणी बोलतं आहे, नाही असं नाही. काही कवी बोलतायत. अशोक बागवे नावाचा कवी ‘मौनाचा निःशब्द कोलाहल’ ऐकतो आहे. तो म्हणतो,

मौनाचा निःशब्द कोलाहल

नंग्या तलवारी परजत निघून गेलेला

थेट रक्ताच्या पल्याड

आणि पुढे हा कवी सद्यःपरिस्थितीबद्दल बोलताना लिहितो,

आकाश ठणकतंय

धरती सुन्न

भरवसा उडून गेलाय

एकमेकांवरचा.....

भरवसा उडून गेलाय? माणसाचा माणसांवरचा? राज्यांचा केंद्रावरचा? केंद्राचा राज्यांवरचा? मित्राचा मित्रांवरचा? समाजाचा समाजांवरचा? म्हणजे मग जगण्याचा आधार तरी काय आहे, लेखकाचा प्रश्न स्वतःला.

तिकडे, परकीय नसलेला पण परकीय प्रदेशात राहिलेला एक कवी आश्वासनपूर्ततेची वाट पाहतो आहे. तो म्हणतो की, नियतीशी करार करून स्वातंत्र्य मिळालं. मग विधीच्या विधानात लिहिल्याप्रमाणे आश्वासनपूर्ती तर झालीच पाहिजे ना? जगण्याचे अधिकार तुम्हालाही आहेत मलाही आहेत. एक दिवस या दुःस्वप्नाचा अंत होईल आणि जनताजनार्दनचं राज्य येईल- ‘और राज़ करेगी ख़ुल्क-ए-ख़ुदा’ असं स्वप्नं तो कवी पाहतो आहे. ख़ुल्क-ए-ख़ुदा म्हणजे जनताजनार्दन-आम जनता. लेखक त्यामुळे आशावादी आहे. समाजदेखील आशावादी असतो. ‘इडापिडा टळो आणि बळीचं राज्य येवो’ असा उद्घोष समाजाने पूर्वीच केलेला आहे. कालपर्यंत लेखक ऐकत होता. आज लेखक हे सगळे पाहतो आहे. उद्या कदाचित तो बोलेल. पण मग त्याने बोललं पाहिजे. त्याने बोललंच पाहिजे. तो न बोलला तर प्रमाद होईल. तो न बोलला तर तो ‘चतुर मौनाचा’ बळी ठरेल. लेखक आशावादी आहे. लेखक सत्याग्राही आहे, तो सत्यान्वेषी आहे. तो सत्याभिलाषी आहे. सत्याचा उच्चार करणं, उच्चरवाने सत्याचा उद्घोष करणं ही लेखकाची भूमिका असते, धर्मही असतो, कर्तव्यदेखील असतं. तो बोलेल, कदाचित उद्या. कदाचित सांगेल तो सर्वांना की, मरणासन्न आणि अंधारात लपून राहिलेला कोंबडा दिवस उगवताना सत्यसूर्याला सलाम करतो आणि आपल्या लखलखीत आरवण्याने अंधाराची झिरझिरीत चादर फाडून टाकतो.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

त्याचं आरवणं निर्भय आहे. आणि सत्यदेखील शपथेवर साक्ष देतं आहे, पण सत्याची साक्ष विवेकाची साक्ष आहे. ही साक्षदेखील उच्चरवाने दिली जाते आहे. आणि सत्य बोलण्याचा धमर् स्वीकारणारे आरसेदेखील तडजोड न करता सत्यच सांगत आहेत. आणि म्हणून इथे लेखकाला जोतिबा फुले यांची कविता आठवते आहे. जोतिबांनी सत्याचा उद्घोष केला आहे. सत्य सर्व धर्माचे माहेर आहे, सत्य सुखाचा आधार आहे, त्या व्यतिरिक्त सर्वत्र अंधःकार आहे आणि सत्याचं बळ पाहून बहुरूपी भयभीत होत आहेत, असं जोतिराव फुले म्हणतायत. राहूचे छद्मरूपी उपासक सत्याच्या प्रकाशामुळे भयभीत होतील, अशी आशा त्यामुळे लेखकाला वाटते आहे. लेखक असं बरंच काही आठवतो आहे. आणि होऽ! करोनाने आपल्याला सोशल डिस्टन्सिंग शिकवलं. म्हणजे माणसाने माणसापासून दूर जाणं. ते आपण करत राहिलो. करोनाने आपल्याला हात धुवायला शिकवलं. पण ज्यांच्या हाताला रक्त लागलं आहे, किंवा पापाचा स्पर्श झाला आहे ती मंडळी शेक्सपिअरच्या त्या नाटकातल्या प्रमाणे ‘वॉश माय हँड’ असं म्हणतदेखील नाहीएत.

- लेखक हे सगळं पाहतो आहे. सगळं आठवतो आहे. पण हे आठवलेलं त्याने सांगितलं मात्र पाहिजे. सत्यवदन हा लेखकाचा धर्म. निर्भयता हा त्याचा धर्म. त्या धर्माला तो जागला पाहिजे. सर्जनबळाचं विस्मरण त्याला, आणि समाजाला परवडणार नाही. तेव्हा, लेखकाची भूमिका काय असते, तुमची भूमिका काय आहे असे प्रश्न तुम्ही मला विचारता म्हणून तुम्हाला मी हे विस्तारने सांगितलं. तुमच्या आणि माझ्या मनात-मेंदूत दडलेला सामान्य माणूस निर्भयतेने जगायला लागेल तेव्हा ‘अच्छे दिवस’ येतील, असा मला विश्वास वाटतो. लेखकाने आशावादी असणं त्याला क्रमप्राप्त आहे आणि त्याला दुसरा कोणता तरणोपायदेखील नाही. आशावादी असणं ही त्याची अपरिहार्यतादेखील आहे. आशावादी असणं या व्यतिरिक्त तो दुसरं काय करू शकतो?

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

अभिनेते दादा कोंडके यांच्या शब्दांत सांगायचे, तर महाराष्ट्राचे राजकारण, समाजकारण, संस्कृतीकारण ‘फोकनाडांची फालमफोक’ बनले आहे

भर व्यासपीठावरून आईमाईवरून शिव्या देणे, नेत्यांचे आजारपण, शारीरिक व्यंग यांवरून शेरेबाजी करणे, महिलांविषयीच्या आपल्या मनातील गदळघाण भावनांचे मंचीय प्रदर्शन करणे, ही या योगदानाची काही ठळक उदाहरणे. हे सारे प्रचंड हिंस्त्र आहे, पण त्याहून हिंस्र, त्याहून किळसवाणी आहे- ती या सर्व विकृतीला लोकांतून मिळणारी दाद. भाषणाच्या अखेरीस ‘भारत ‘माता’ की जय’ म्हणणारा एक नेता विरोधकांच्या मातेचा उद्धार करतो. लोक टाळ्या वाजतात. .......

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ मराठी भाषेला राजकारणामुळे का होईना मिळाला, याचा आनंद व्यक्त करताना, वस्तुस्थिती नजरेआड राहू नये...

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ लावून मराठीत किती घोडदौड करता येणार आहे? मोठी गुंतवणूक कोण करणार? आणि भाषेला उर्जितावस्था कशी आणता येणार? अर्थात, ही परिस्थिती पूर्वीपासून कमी-अधिक फरकाने अशीच आहे. तरीही वाखाणण्यासारखे झालेले काम बरेच जास्त आहे, पण ते लहान लहान बेटांवर झालेले काम आहे. व्यक्तिगत व सार्वजनिक स्तरावरही तशी उदाहरणे निश्चितच आहेत. पण तुकड्या-तुकड्यांमध्ये पाहिले, तर ‘हिरवळ’ आणि समग्रतेने पाहिले (aerial view) तर ‘वाळवंट.......

धोरणाचा ‘फोकस’ बदलून लहान शेतकरी, अगदी लहान उद्योग आणि ग्रामीण रस्ते, सांडपाणी व्यवस्था, शाळा, आरोग्य सुविधा, वीज, स्थानिक बाजारपेठा वगैरे केंद्रस्थानी आल्या पाहिजेत...

महाराष्ट्रात १५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांपैकी ६० टक्के लोक रोजगारात आहेत. बिहारमध्ये हे प्रमाण ४५ टक्के आहे. यातील महत्त्वाचा फरक महिलांबाबत आहे. बिहारमध्ये महिला रोजगारात मोठ्या प्रमाणात नाहीत. परंतु महाराष्ट्रात जे लोक रोजगारात आहेत आणि बिहारमधील जे लोक रोजगारात आहेत, त्यांच्या रोजगाराच्या स्वरूपात महत्त्वाचे फरक आहेत. ग्रामीण बिहारमधील दारिद्र्य ग्रामीण महाराष्ट्रापेक्षा कमी आहे.......