हा शिमगा असाच ‘एंजॉय’ करत राहून आपण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारून घेणार आहोत काय?
पडघम - राज्यकारण
रवि आमले
  • उद्धव ठाकरे, संजय राऊत, देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे, अमोल मिटकरी, अमेय खोपकर, किरीट सोमय्या, नारायण राणे, धनंजय मुंढे आणि नवनीत राणा
  • Fri , 22 April 2022
  • पडघम राज्यकारण उद्धव ठाकरे Uddhav Thackeray संजय राऊत Sanjay Raut देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis राज ठाकरे Raj Thackeray अमोल मिटकरी Amol Mitkari अमेय खोपकर Ameya Khopkar किरीट सोमय्या Kirit Somaiya नारायण राणे Narayan Rane धनंजय मुंढे Dhananjay Munde नवनीत राणा Navneet Rana

महाराष्ट्रात ‘शिमगा’ हा राज्यसण म्हणून जाहीर झाला आहे काय? आपल्याकडे कलगीतुरा, नळावरचे भांडण याची अखिल भारतीय स्पर्धा सुरू आहे काय? तसेच वाटावे अशीच सध्याची स्थिती आहे. ‘एकदा ईडी घुसली आणि अर्धवटराव गप्प बसले’, ‘xxसाहेब तुमच्यासारख्या तात्या विंचूचा ओम फट स्वाहा करणार आहेत’, ‘xx हे बॉबी डार्लिंग आहेत’, या वाक्यांतून त्याची प्रचिती यावी. याशिवाय एका नेत्याने दुसऱ्यास ‘नागा’ची उपमा दिली आहे. दुसऱ्याने प्रत्युत्तरादाखल त्यास ‘कोंबडी’ म्हटले आहे. ही सभ्यता, शिष्टता यांची राजकीय हत्याच.

अर्थात ती काही आताच झाली आहे असे नाही. या आधीही राज्याच्या राजकारणात मैद्याचे पोते, तेल लावलेला पैलवान, वाकड्या तोंडाचा गांधी, कोंबडीचोर, टरबूज असे काही चाललेले होतेच. आता तर हेसुद्धा सभ्य वाटावे, असे असभ्य प्रकार समाजमाध्यमांतून चाललेले असतात. जल्पक म्हणजे ट्रोल ही काही कोणा एका राजकीय पक्षाची मक्तेदारी राहिलेली नाही. सगळ्यांकडेच या जल्पकांच्या झुंडी आहेत. त्यांत फरक फक्त प्रमाणाचा. दर्जा मात्र एकसमान. आपल्या विरोधकांना शिवीगाळ करणे हा त्यांचा एककलमी कार्यक्रम असतो. तर ही आपल्या सभ्य, सुसंस्कृत, सहिष्णु समाजाची राजकीय चर्चेची पातळी.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

असे म्हणतात की, जेथे मुद्दे संपतात तेथे गुद्दे येतात. तेही खरेच आहे. पण आपल्या हे लक्षातच येत नाही की, गेल्या काही वर्षांत गुद्दा हाच मुद्दा ठरलेला आहे. शाब्दिक आणि शारीरिक अशा दोन्ही अंगाने गुद्दा हा निवडणूक जिंकून देणारा भाग बनलेला आहे. या गुद्द्याचे लोकमानसास मोठे आकर्षण. आपणांस इजा करण्याची क्षमता ज्याच्यात आहे, त्याच्यापासून सावध राहावे, त्याला घाबरून राहावे आणि शक्यतो त्याच्या आश्रयास जावे, ही स्वरक्षणाची सहजप्रवृत्ती. ती सगळ्यांमध्येच असते. यातूनच ‘ज्याचा गुद्दा मोठा, तो आपला नेता’ हे आलेले आहे.

आता यात एक गोची अशी असते की, या बाहुबलींना प्रत्यक्ष हिंसा करण्याची आपली क्षमता नेहमीच काही मिरवता येत नसते. कायद्याचे भय असते. सभेत तलवार दाखवली म्हणूनही कधी कधी गुन्हा दाखल होऊ शकतो. शिवाय हिंसेचे अतिरेकी प्रदर्शन केल्यास समाजाचे तीस असलेले ‘सँक्शन’ नाहीसे होण्याचे भय असते. तेव्हा तो गुद्दा सहसा पडद्याआडूनच उगारला जातो किंवा मग त्यासाठी झुंडींचा वापर केला जातो. वाचिक हिंसाचारास अशी काही मर्यादा नसते. तो अगदी राजसोस करता येतो. शिवराळ भाषा हे त्याचे माध्यम.

या शिवराळ भाषेविषयी समाजात काही गैरसमज आहेत. अनेकांस वाटते की, शिवराळपणातच रांगडेपणा असतो. ती भाषा रोखठोक असते. त्यामुळे असा समज होतो की, शिवराळ बोलणारा एकदम रोखठोक असतो, त्याच्यात आत एक, बाहेर एक असा दुटप्पीपणा नसतो. कोणताही आडपडदा नसतो. वस्तुतः ते तसे नसते. काही लोकांच्या तोंडात नेहमी शिव्या असतात. पण शिव्या हा त्यांच्या भाषिक शैलीचाच भाग बनून गेलेला असतो. भाषिक सहजोद्‌गार म्हणून त्या येत असतात. या संदर्भात आपली मालवणी बोली पाहावी. तेवढेही दूर जाण्याची गरज नाही. आजच्या पौंगडावस्थेतील मुले एकमेकांशी ज्या ‘एफ’ आणि ‘भ’च्या बाराखडीत बोलतात, ते ऐकले तरी पुरे! त्यांच्यातील शिवीगाळ ही त्यांच्या आत्माविष्काराचीच शैली असते. राजकारणातील शिवराळपणा मात्र या रकान्यांत बसविता येणार नाही. मुळात तो उत्स्फूर्त नसतो.

..................................................................................................................................................................

उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअ‍ॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...

हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal

................................................................................................................................................................

शिव्या, निंदा, कुचाळकी, टवाळी हे या शिवराळ भाषेची रूपे. विरोधकांचे बद-नामकरण (नेम कॉलिंग), राक्षसीकरण (डेमनायझेशन), चारित्र्यहनन यांसाठी ती वापरली जातात. ही प्रोपगंडाचीच तंत्रे. प्रत्येक माणसात काही तरी चांगुलपणा असतोच. विरोधकांनीही काही तरी चांगले काम केलेले असतेच. पण त्याचा साधा उल्लेखही येथे करायचा नसतो. त्यांचे सतत राक्षसीकरण करायचे असते. त्यांची खिल्ली उडवायची असते. बदनाम करायचे असते. त्यांच्याबाबत विशिष्ट पर्सेप्शन - मानसचित्र - तयार करायचे असते. विरोधकांना नेस्तनाबूत करणे, हतवीर्य करणे हाच यामागील हेतू असतो.

या अशा शिवराळ भाषेच्या वापराविषयी थोर विचारवंत मे. पुं. रेगे यांनी बरोबर २५ वर्षांपूर्वी ‘नवभारत’मधून एक इशारा देऊन ठेवला होता. ते म्हणाले होते- ‘‘… यातून ते आपल्या अनुयायांना असे सांगतात की, आपले विरोधक, म्हणजे जे आपल्या मतांवर, धोरणांवर, कार्यपद्धतीवर टीका करतात, भिन्न मते मांडतात, ते सारे आपले शत्रू आहेत. त्यांना नेस्तनाबूत केले पाहिजे. निदान हतवीर्य केले पाहिजे. आणि हे करणे कठीण नाही. या लोकांत दम नाही. मोठ्या संख्येने तरुणांत ही वृत्ती फैलावणे सामाजिक स्वास्थ्याला तर घातक आहेच, पण ते विशेष करून लोकशाहीला घातक आहे. कारण यातून केवळ गुंडगिरी फैलावते, एवढेच नव्हे तर तिला राजकीय प्रामाण्य आणि प्रतिष्ठा लाभेल.’’ रेगे यांनी यापुढे हेही म्हटले होते, की ‘‘आजच ही गोष्ट लक्षणीय प्रमाणात घडून आलेली आहे.’’

या २५ वर्षांत पुलाखालून प्रचंड पाणी वाहून गेले आहे आणि परिस्थिती आणखीच बिघडली आहे. भाषिक हिंसाचारास राजकीय प्रतिष्ठाच मिळाली असे नव्हे, तर तो राजकारणाचा केंद्रीय पैलू बनलेला आहे. लेखाच्या प्रारंभी शिवराळपणाची जी उदाहरणे दिली, ती तुलनेने फारच सभ्य म्हणता येतील. त्याहून अत्यंत खालच्या पातळीवर ती भाषा पोचलेली आहे. अधिक हिंस्र झालेली आहे. समाजमाध्यमांतील राजकीय चर्चा आणि जल्पना यांतून ते स्पष्ट दिसत आहे. यात चिंतेची बाब ही की, सर्वसामान्य नागरिक हे सारे ‘एंजॉय’ करत आहेत. याचा दुसरा भाग असा की, लोकांवर त्याची मौज लुटण्याची सक्ती करण्यात येत आहे. यात आघाडीवर आहेत समाजमाध्यमे आणि खास करून वृत्तवाहिन्या.

ख्यातकीर्त राजकीय विश्लेषक डॅनिएल बूरस्टिन यांनी त्यांच्या ‘द इमेज’ या पुस्तकात स्यूडो इव्हेन्ट - छद्म कार्यक्रम - अशी संकल्पना मांडली आहे. स्वाभाविक नसलेले, घडवलेले असे कार्यक्रम हा त्याचा अर्थ. वृत्तवाहिन्यांवरून हल्ली सतत सुरू असतात ते वादचर्चेसारखे छद्म कार्यक्रमच. तेथेही शिवराळपणासच प्राधान्य असते. नेत्यांनी एकमेकांवर केलेली शिवराळ, असभ्य टीका हा तर वृत्तवाहिन्यांचा प्रेक्षकप्राप्तीसाठीचा हातखंडा कार्यक्रम. सतत तो शिवराळांचा शिमगा लोकांच्या मेंदूंवर आदळवण्यात येत असतो. यातून वाचिक हिंस्त्रवृत्तीलाच त्या प्रोत्साहन देत असतात. याहून देशविघातक, समाजविघातक कृत्य अन्य कोणते असू शकेल? परंतु आर्थिक स्वार्थापुढे हे पत्रकारिता नामक जे काही चाललेले आहे, तेही आंधळे झालेले आहे. 

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

वाचिक हिंसाचार हा नेहमीच पुढच्या शारीरिक हिंसाचाराची पायाभरणी करत असतो. शिवराळ राजकीय नेते, कार्यकर्ते, काही पत्रकार त्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत, हे दिसतेच आहे. संवाद, समंजसपणा हा लोकशाहीचा प्राणवायू घोटण्याचे हे उद्योग. ते असेच राजमान्यता मिळवत राहिले, तर लोकशाहीचे खरोखरच काही खरे राहिलेले नाही.

आता प्रश्न एवढाच आहे की, हा समस्त शिमगा असाच ‘एंजॉय’ करत राहून आपण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारून घेणार आहोत काय? तसे होऊ द्यायचे नसेल, तर या अशिष्टाचाऱ्यांपर्यंत, शिवराळांपर्यंत आणि त्यांना हवा देणाऱ्या वृ्तवाहिन्यांपर्यंत एक संदेश आता पोचवावाच लागेल की, आता बस्स.

................................................................................................................................................................

लेखक रवि आमले ज्येष्ठ पत्रकार असून, त्यांचे ‘प्रोपगंडा’ हे पुस्तक प्रसिद्ध आहे.

ravi.amale@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......