अजूनकाही
यंदाच्या संमेलनात अमूकअमूक कोटींची ग्रंथविक्री...अशी गेल्या वर्षीच्या नाशिक येथे पार पडलेल्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचा लेखाजोखा मांडणारी बातमी प्रकाशित झाली. खरे तर अशी बातमी नित्याचीच. त्यातले आकडेही इतर भाषिक व्यवहाराच्या तुलनेत मामुलीच. तरीही अशी बातमी वाचकांचे लक्ष वेधून घेते. तसेच याही बातमीने मराठी साहित्य व्यवहाराकडे संशयाने पाहणाऱ्या आमच्या एका व्यासंगी मित्राचे लक्ष वेधून घेतले. बातमी वाचल्यानंतर त्याने प्रश्न केला. दोन-पाच कोटींची ग्रंथ विक्री झाली म्हणतात, ते चांगलेच, पण इतर वेळी कुठे असतात हे वाचक? कुठे जातात एवढी पुस्तके? आणि वाचणारे तरी कोण असतात? लोक वाचतात तरी का, विकत घेतलेली पुस्तके? की ग्राहक पेठेत जाऊन वस्तू विकत घेण्याऐवजी संमेलनात येऊन पुस्तके घेतात आणि वस्तूंप्रमाणेच डम्प करतात घरात?
प्रश्न महत्त्वाचाच आहे. या प्रश्नाचे उत्तर प्रकाशकापासून लेखक-विक्रेत्यांपर्यंतच्या प्रत्येकाचे वेगळे असणार हे उघड आहे, पण त्या प्रश्नात दडून राहिलेल्या उपप्रश्नांना सहसा कोणी हात घालणार नाही. ते दडून राहिलेले प्रश्न आहेत, एक- वाचकांना पुस्तकांची मोठी भूक आहे म्हणता, मग संमेलनवगळता ही समृद्धी प्रकाशक-लेखक या पातळीवर मराठी ग्रंथ व्यवहारांत प्रतिबिंबित होताना का दिसत नाही? दोन- मराठी वाचक अभिरुचीसंपन्न आहे म्हणता, मग हजार-पाचशेची आवृत्ती संपवायला प्रकाशक-लेखकाला हरघडी कुंथावे का लागते? आणि तीन- ज्यांच्या बळावर हा सगळा डोलारा उभा केलेला असतो, तो ग्राहकरूपी वाचक ग्रंथव्यवहाराला चालना मिळावी, इतका प्रगल्भ झालेला आहे का? किंवा ग्रंथवाचन, आस्वादन, रसग्रहण, चर्चा, वाद-संवाद आदी वाचन-चिंतन-मननकेंद्री बौद्धिक प्रक्रियांत सहभागी होऊन ग्रंथव्यवहाराला पूर्णत्व देण्याची पात्रता तो खरोखरच राखून आहे का?
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
................................................................................................................................................................
हवेतली तलवारबाजी
आता हे बरीक उत्तमच झाले म्हणायचे. मराठी साहित्याला नोबेल पुरस्कार कधी मिळणार, हा बाष्कळ प्रश्न वेळीच मागे पडला, नाहीतर हे खूळ फार काळ टिकते, तर भलतेच संकट ओढवायचे मराठी साहित्यविश्वावर. पण वाद आणि प्रश्न ओढवून घेतल्याशिवाय चैन पडणे नाही, या स्वभावधर्मानुसार मराठी साहित्य विश्वाने बराचकाळ राजकारणी, सत्ताधाऱ्यांना व्यासपीठावर स्थान द्यावे की, न द्यावे, यावरून बरीच तलवारीबाजी केली आहे. आपल्यात डोलारा पेलण्याची क्षमता आलेली नाही. जे टेकू देतात, ते दांडगाई करून केंद्रस्थान बळकावून बसतात. त्यांना विरोध करायचा तर अर्थशक्ती आटायची भीती आणि त्यांना मांडीला मांडी लावून बसण्याची जागा दिली, तर आपण बेदखल होण्याची धास्ती या कात्रीतून मराठी साहित्यविश्व सुटताना काही दिसत नाही.
‘धरले तर चावते आणि सोडले तर पळून जाते’ अशी ही अवस्था. पण यावरही किती काथ्याकूट करावा, यालाही काही मर्यादा मराठी साहित्यविश्वाने ठेवायला हव्यात. याचे कारण, नोबेल पुरस्कार कधी मिळणार, राजकारण्यांना संमेलनात स्थान द्यावे की न द्यावे, याहीपेक्षा मोठा किंबहुना अस्तित्वालाच हात घालणारा प्रश्न गेली काही वर्षे मराठी साहित्यविश्वाभोवती घिरट्या घालताना दिसतो आहे. तो प्रश्न आहे, आहे ते वाचक टिकवण्याचा आणि जमल्यास नव्या पिढीत नवे वाचक तयार करण्याचा. हे प्रश्न समाधानकारकरित्या सोडवण्यावरच मराठी साहित्यविश्वाचे पर्यायाने प्रकाशक-लेखक-विक्रेते आदींचे भवितव्य अवलंबून असणार आहे. पण ते सोडून भलतेच उत्सव आणि भलतेच कलगीतुरे अलीकडच्या काळात संमेलनाचे नियंत्रक-आयोजक, साहित्यिक आणि राजकारणी यांच्याच रंगल्याचे दिसले आहे.
मराठी वाचन-लेखनाची आटती गंगा
हे तर सर्वविदित आहे की, सरासरी शंभरातल्या निदान ८५ ते ९० टक्के मराठी कुटुंबातली मुले-मुली अमराठी शाळांमध्ये शिक्षण घेत आहेत. या मुलांसाठी मराठी हा केवळ गुण मिळवण्यापुरता एक विषय आहे. अलीकडे तर विद्यार्थ्याला काय म्हणायचे आहे, तेवढे सांगता आले तरीही पैकीच्या पैकी गुण देण्याची पद्धत रूढ झालेली आहे. तिथे शुद्धलेखन वगैरे भानगडीत कोणी शिक्षक पडताना दिसत नाही. त्यामुळे जेमतेम मराठी वाचता येणाऱ्या मुला-मुलींना भरमसाट गुण मिळत राहतात. एकदा का मराठीचा विषय शालेय शिक्षणातून मागे पडला की, ही कौतुकास्पद गुण मिळवणारी पिढी मराठीकडे ढुंकूनही पाहात नाही. लेखन-वाचन तर फारच दूरची गोष्ट होऊन बसते.
हे चित्र विशेषतः मुंबईसारख्या महानगरात प्रकर्षाने जाणवते. पुणे-नाशिक-कोल्हापूर-नागपूर-सोलापूर इथे कदाचित अजूनही नव्या पिढीचा शैक्षणिक कल मराठी भाषेकडे असला तरीही, जाणिवा समृद्धीची, अभिव्यक्तीची भाषा म्हणून ही पिढी मराठीचा कितीसा अवलंब करेल हे छातीठोकपणे कुणालाही सांगता येत नाही. नाही म्हणायला, ग्रंथ प्रदर्शनाला बाळगोपाळ तुफान गर्दी करत असल्याचे चित्र सर्रास दिसते. वर्तमानपत्रवाले जणू काही हीच मराठीच्या भवितव्याची ग्वाही आहे, असे सुचवून निरागस मुले पुस्तके हाताळतानाची छायाचित्रे प्रकाशित करतात. पण ही ग्वाही बोटांच्या चिमटीत कणभर मीठ यावे, इतकीच माफक स्वरूपाची असते. अशा प्रसंगी नव्या पिढीला मराठी ग्रंथवाचनाकडे वळवणे आणि एकाच वेळी त्यांच्यात चौफेर वाचनासाठी आवश्यक अभिरुचीसंपन्नता रुजवण्याचा प्रयत्न करणे, हे मराठी साहित्यविश्वासाठी तातडीचे विषय ठरायला हवेत.
..................................................................................................................................................................
उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...
हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal
................................................................................................................................................................
मागे, कधीतरी कादंबरी याविषयावरचे चिंतन मांडताना ज्येष्ठ लेखक श्याम मनोहर यांनी कादंबरी वाचनासाठी आवश्यक अभिरुची-संपन्नता मराठी वाचकांत अद्याप आली नसल्याचे निरीक्षण नोंदवले होते. त्यालाही फार वर्षे उलटलेली नाहीत. पण या त्यांच्या गांभीर्य ठासून भरलेल्या म्हणण्याकडे किती प्रकाशक-लेखक-समीक्षक-आस्वादकांचे लक्ष गेले, हाही प्रश्नच आहे. सरकारचे काम मिरवणे, दातृत्त्वाचा उदार भाव मनी बाळगणे आणि याचकाला त्याच्या पात्रतेची हरघडी जाणीव करून देत राहणे, हे असते. हे सरकार भले मराठी शाळा उपलब्ध करून देतील. साहित्य संमेलनांना पन्नास एक लाख मदतनिधी देतील, पण अंतिमतः मराठी वाचक मिळवणे, टिकवणे आणि घडवणे हे काम प्रकाशक-लेखक-समीक्षक-आस्वादक अशा सगळ्यांना मिळूनच करावे लागेल. अमक्याची कादंबरी आमच्या बुवा डोक्यावरून जाते, तमक्याच्या कविता काही केल्या आमच्या डोक्यात शिरत नाहीत, मराठीत वैचारिक ग्रंथ म्हणजे झोपेच्या गोळ्या असतात हो, ही अशी चेष्टेत उच्चारली गेलेली वाक्ये ऐकायला मनोरंजक वाटत असली तरीही, याच चेष्टेच्या सुरांत साहित्यविश्वाची घटिका सूचित होते आहे, याचे भान आता संबंधित घटकांना येणे आवश्यक आहे.
नवी इमारत
शेवटी, ग्राहक (पक्षी : वाचक) नाही, तर मागणी कशी वाढणार. मागणी वाढली नाही, तर प्रकाशनविश्वाला अर्थबळ कुठून येणार हे अस्तित्वाच्या मुळांवर येऊ पाहणारे व्यावहारिक प्रश्नही महत्त्वाचे आहेतच आणि यालाच जोडून वाचनसमृद्धीचा मुद्दा वारंवार डोके वर काढत राहणार आहे. खरे तर कोविड-१९च्या अनपेक्षित संकटानंतर लेखन-प्रकाशनविश्वात जी उलथापालथ झालीय, किंवा जी पडझड झालीय, त्यानंतर पुन्हा एकदा नव्याने डाव मांडण्याची सुवर्णसंधी मराठी साहित्यविश्वाकडे चालून आली आहे. यात जुनाट कोळिष्टके साफसूफ करून तेवढे भागणारे नाही. जुनेपुराणे फर्निचर, गंज लागलेल्या वस्तू हे सारे बाजूला सारून प्रसंगी जुनी इमारत पाडून नवे बांधकाम करावे लागणार आहे. हे करताना प्रकाशनविश्वात संस्था उभारणीस भर द्यावा लागणार आहे. यात प्रकाशकापासून लेखक-टंकलेखक-मुद्रितशोधक-मांडणीकार-संपादक-उपसंपादक ही आस्थापनेच्या पातळीवरची फळी पुन्हा एकदा एका छताखाली आणावी लागणार आहे. अलीकडच्या काळात अनेकदा एकटा प्रकाशकच अर्ध्याहून अधिक जबाबदाऱ्या पार पाडतो वा बाहेर कोणाकोणाला कंत्राटी पद्धतीवर पुस्तकानुरूप कामे देतो. अशाने वाद-संवादाच्या आणि सृजनसौहार्दाच्या पातळीवर अडथळे येत राहतात. सर्व घटकांत एकतानेतच्या असलेल्या अभावामुळे अंतिमतः पुस्तकाच्या दर्जावर अनिष्ट परिणाम होत राहतो.
वाचकाला बळ देता यावे
अर्थातच, यासाठी पैशांचे भरपूर पाठबळ हवे. याविनाच मराठीतले सारे गाडे अडताना दिसते. पण, पैसा सरकारकडून वा इतर धनिकांकडून येण्याची वाट बघत बसण्यापेक्षा जो या व्यवहारातला सर्वात महत्त्वाचा धागा आहे, त्या वाचकालाच बळ देता आले तर बरेचसे प्रश्न सुटायला मदत होईल. मग कालांतराने हिंदी-इंग्लिशमध्ये असतात, तशी लिटररी एजंट नामक फळीही मराठीत उदयास येईल कोणी सांगावे. आणि त्यातून त्यांना बरी आमदनीदेखील होत राहील. आता, प्रस्थापित मंडळी वगळता, कोणीतरी कोणाच्या तरी ओळखीवरून प्रकाशकाला एखाद्या लेखकाचे वा कवीचे नाव सुचवतो. ‘जमले तर जमले, नाही जमले तर हरीहरी’ असा हा मामला असतो. यात शब्द खर्ची होतात, शब्द तेवढे दिले-घेतले जातात. पण, ११ कोटींच्या म्हणजेच लोकसंख्येच्या तुलनेत इंग्लंडच्या दुप्पट मोठा असलेल्या महाराष्ट्रात जर हे घडणार नसेल, तर आणखी कुठे घडणार हाही प्रश्नच आहे.
..................................................................................................................................................................
अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5312/Checkmate
..................................................................................................................................................................
सेवाभाव अडचणीचा
आपल्याकडे वृत्तपत्रसृष्टी आणि आधुनिक साहित्यसृष्टी यांच्या उदयाची बिजे स्वातंत्र्यसंग्रामात रुजलेली आहे. त्या काळात वृत्तपत्र काय किंवा प्रकाशन व्यवसाय काय याकडे बघण्याचा समाजाचा आणि संबंधितांचा दृष्टिकोन समाजसेवा असा राहिला आहे. त्या काळी तो योग्यही होता. परंतु, काळानुरूप गरजा बदलल्या, मात्र संबंधित घटकांचे दृष्टीकोन नाही बदलले. त्याचाच परिणाम, मराठी प्रकाशनविश्व आत्मवंचनेच्या भोवर्यात सापडण्यात झाला आहे. यातून बाहेर पडण्यासाठी पुस्तकांवरच्या १०-२० टक्के सवलती तेवढ्या उपयोगी ठरणाऱ्या नाहीत, वा मीडिया-सोशल मीडियातून सततचा माराही उपयोगाचा नाही. कारण, ‘अंधों के शहर में आइना बेचनेवाली’ ही अवस्था आहे, हे आधी समजून घ्यावे लागणार आहे. जे आधीच वाचक आहेत, ज्यांचे प्रकाशन-लेखन-विक्री आदींत हितसंबंध आहेत, तेच या साऱ्यचा ऑडियन्स आहे. तिथे नवा ‘ऑडियन्स’ नाही. आहे, ते ‘इको चेंबर’ आहे. अशा वेळी नवा वाचक मिळवणे, टिकवणे आणि त्याला वाचनसमृद्ध करणे, हाच मराठी प्रकाशनविश्वाचा यापुढील काळातला सर्वोच्च प्राधान्य असलेला अजेंडा असायला हवा आहे.
संमेलनाध्यक्षावर सारे काही सोपवून आपण मोकळे राहण्यात आतातरी हशील नाही. हे सारे प्रत्यक्षात कसे साधायचे, कधी करायचे त्यासाठी कोणत्या साहित्य प्रांतातले प्रारूप अवलंबायचे, अभिवाचन-लेखनाच्या उपक्रमासोबतच इतरही कार्यक्रमपत्रिका कशी आखायची, सरकार ग्रंथांना जीवनावश्यक यादीत स्थान देत नसेल तर आपण ते कसे निर्माण करायचे, हा मराठी प्रकाशक-लेखक-समीक्षक-आस्वादकांमधल्या परस्पर समन्वय, संवाद आणि सौहार्दाचा भाग असणार आहे. एवढी स्वभाववैशिष्ट्ये मराठी जनांत अजूनही नक्कीच कायम आहेत, या आशेसह यंदाचे उद्गीर येथील अ. भा. मराठी साहित्य संमेलन नुसतेच यशस्वी नव्हे, तर सर्वार्थाने पथदर्शक ठरो, यासाठी शुभेच्छा!
(‘मुक्त-संवाद’ या पाक्षिकाच्या १५ एप्रिल २०२२च्या अंकातून साभार)
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment