ज्येष्ठ पर्यावरण-अभ्यासक अतुल देऊळगावकर यांचे ‘ग्रंथांचिया द्वारी - जग बदलू पाहणार्या विचारांची यात्रा!’ हे पुस्तक २३ एप्रिल २०२२ रोजी उदगीरमध्ये प्रसिद्ध चरित्रकार वीणा गवाणकर आणि प्रसिद्ध कथा-कादंबरीकार राजन गवस यांच्या हस्ते होत आहे. विश्वकर्मा पब्लिकेशन्सच्या वतीने हे पुस्तक प्रकाशित होत आहे. या पुस्तकातील एका लेखाचा हा संपादित अंश...
..................................................................................................................................................................
असंख्य गाण्यांनी वर्णिलेल्या महानगरी ‘ये है बंबई मेरी जान’ची काय व कशी वाट लागली, हे आपण अनुभवत आहोत. मुंबईचा खेळकर, उदार, सहिष्णू चेहरा कधीच निघून गेला आहे. आता असुरक्षित, बकाल, अमानवी अशी रूपे जाणवू लागली आहेत. वरचेवर प्रवासाला लागणारा वेळ आणि ताण वाढतच जात आहे. मुंबई सुधारण्यापलीकडे गेली आहे, असे रहिवासी, नेते, अधिकारी सर्वांनाच जाणवत आहे. दिल्ली, कोलकाता, चेन्नई, बंगळूर, हैदराबाद, पुणे यांचीही अगदी याच मार्गाने वाटचाल सुरू आहे. सध्या सर्वत्र ‘चटपटीत अथवा स्मार्ट शहरे’ ही सध्या खूपविकू संज्ञा झाली आहे. रस्ते रुंदीकरण, दुमजली उड्डाणपूल, वेगवान गाड्यांचे रस्ते अशा अतीव ऊर्जाग्राही संकल्पनांचा आणि अब्जावधींच्या प्रकल्पांचा सुकाळ आहे.
याच वेळी जगात हरित शहरे व हरित इमारतींचा सन्मान होत आहे. आपल्या देशातील एकाही शहराचा समावेश त्या यादीत नाही. अजून आपण हरित शहरांच्या दिशेने विचारच करीत नाही, तर तिकडे प्रवास सुरू होणार कधी? विख्यात वास्तुविशारद व शहरनियोजनकार श्रीमती सुलक्षणा महाजन यांच्या ‘असावी शहरे आपुली छान’ या पुस्तकामुळे भारतीय शहरांची विषण्णावस्था अधिकच भयानक भासू लागली आहे. सर्वसमावेशक आणि शाश्वत नगर विकास या क्षेत्रात जगभरात आदराचे स्थान असलेले विख्यात नगरनियोजनकार यान गेल यांच्या ‘सिटीज फॉर पीपल’ या पुस्तकाचा ‘असावी शहरे आपुली छान’ हा सहज व सुंदर अनुवाद आहे.
..................................................................................................................................................................
.................................................................................................................................................................
अलीकडे यांत्रिक व निरस अनुवादाचे अमाप पीक आले आहे. जागोजागी ठेच लागून वाचन थांबवणारी वाक्यरचना असते. त्या पार्श्वभूमीवर अतिशय प्रगल्भ व चपखल मराठीमुळे वाचनानंद मिळतो. पानोपानी सुयोग्य व समर्पक छायाचित्रांच्या आकर्षक मांडणीमुळे प्रस्तुत पुस्तक नयनमनोहर झाले आहे. जगात अनेक शहरे नवीन विचाराने घडवली जात आहेत, हे वाचून आपली आपल्याला लाज वाटते. इतर ठिकाणी दिसणारी आशेची कारंजी पाहून आपल्याकडील रखरखाट उदासी आणतो.
‘गेल्या ५० वर्षांत नगरनियोजनाची दिशा १८० अंशाने बदलली आहे. म्हणूनच पाश्चात्त्यांचे अंधानुकरण टाळून बिघडलेल्या शहरांना पुन्हा रास्त मार्गावर आणण्यासाठी या पुस्तकातील अनेक विचार, संशोधनपद्धती आणि संकल्पनांचा उपयोग होऊ शकेल,’ या आत्मविश्वासाने महाजन यांनी हा अनुवाद सादर केला आहे. ‘महाराष्ट्रातील आणि भारतातील शहरांच्या दयनीय स्थितीमागील कारणे समजली, तर सुधारणा कशा करायच्या हेही समजून घेता येईल. खरे तर हे पुस्तक नगरसेवकांनी वाचावे, ही माझी तीव्र इच्छा आहे. एखाद्या नेत्याने जरी हे पुस्तक मनापासून वाचले, तरी तो महाराष्ट्राच्या शहरांचा वेगळा विचार नक्की करेल,’ अशी खात्री अनुवादकर्त्यांना वाटते.
अनेक देशांतील महानगरे आणि शहरे यांचा कानाकोपरा स्वच्छ, सुंदर, आकर्षक आणि हरित करण्यासाठी सर्जनशील प्रयत्न सुरू आहेत. आपल्याकडे शहर म्हणजे अतोनात प्रदूषण, कर्कश भोंगे, गोंगाट आणि तुंबलेली वाहतूक हे समीकरणच झाले आहे. शहरातील प्रवास वरचेवर अधिक वेळखाऊ, महाग आणि असुरक्षित होत आहे. अनेक दशकांपासून शहरांनी मानवी बाजूची संपूर्ण उपेक्षा केली, त्याची विषारी फळं सर्वांना भोगावी लागत आहेत. शहरातील वाहतूक व्यवस्था म्हणजे निव्वळ अनागोंदी झाली आहे. वाहनांच्या संख्येमध्ये होणाऱ्या प्रचंड वाढीमुळे शहरी वाहतूक सुधारण्याचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरत आहेत. त्यामुळेच नगर नियोजनाचा पूर्णपणे वेगळा विचार करण्याची वेळ आली आहे. जगातील महत्त्वाच्या शहरांनी नियोजनाची वेळीच दिशा बदललेली आहे.
१९००मध्ये न्यूयॉर्कच्या रस्त्यावर सर्वदूर केवळ घोडागाड्या दिसत होत्या. क्वचित एखादी मोटार जात असे. त्यानंतर केवळ १३ वर्षं उलटली आणि सगळ्या घोडागाड्या गायब होऊन मोटारींची दाटी सुरू झाली. १९६१मध्ये पत्रकार आणि लेखिका जेन जेकब्स यांचे ‘द डेथ अँड लाइफ ऑफ ग्रेट अमेरिकन सिटीज’ हे पुस्तक प्रकाशित झाले. त्या काळी शहरनियोजनात इमारतींना आणि वाहनांना महत्त्व दिले होते. उपयोगिता हा एकमेव निकष असल्यामुळे शहरांची तुकड्या-तुकड्यांत विभागणी झाली. सुट्या सुट्या इमारतींमुळे शहरांमधील मोकळ्या जागा नाहीशा होत गेल्या आणि त्यामुळे त्याआधारे घडणारे नागरी समूहजीवन संपुष्टात येत गेले. आपण उभी करत असलेली शहरे निर्जीव, बकाल आणि भकास होत गेली. याचे सखोल व सविस्तर विवेचन जेन जेकब्स यांनी केले.
शहरनियोजनात आमूलाग्र बदल आवश्यक असल्याचे ठासून सांगणारी जेन जेकब्स ही पहिली व्यक्ती होती. त्यांच्या पुस्तकामुळे नगरनियोजनात लक्षणीय बदल झाले. गेल्या ५० वर्षांत अनेक संशोधकांनी आणि नगरनियोजनकार यांनी शहरांची भरभराट आणि ऱ्हास या विषयात मोलाची भर घातली आहे. (अगदी त्याच काळात अमेरिकेमध्ये जीवशास्त्रज्ञ रॅचेल कार्सन बाई, पर्यावरणवादाची गीता ठरलेल्या आणि विसाव्या शतकाचा इतिहास घडविणाऱ्या ग्रंथाच्या यादीत सन्मानाचे स्थान लाभलेल्या ‘सायलेंट स्प्रिंग’ या पुस्तकाचे लिखाण करत होत्या.)
..................................................................................................................................................................
उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...
हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal
................................................................................................................................................................
एकविसाव्या शतकात प्रवेश केल्यानंतर मानवी इतिहासात पहिल्यांदाच जगभर शहरातील रहिवाशांची संख्या ग्रामीण लोकसंख्येपेक्षा अधिक झाली. शहरे कमालीच्या वेगाने वाढू लागली आणि वाढीची गती अशीच वाढत जाणार आहे. त्यामुळे शहरनियोजनाचा नव्याने विचार करणे भाग पडू लागले. माणूस हा शहरनियोजनाचा केंद्रबिंदू झाला. शहरे चैतन्यशील, सुरक्षित, शाश्वत अणि आरोग्यपूर्ण हा नियोजनाचा गाभा झाला. शहरांची गुणवत्ता सुधारण्याकरिता पादचारी, दुचाकी आणि सामूहिकता यांना विशेष प्राधान्य आले आहे. मोटारींचे महत्त्व कमी करून शहररचनेत सुधारणा सुरू झाल्या आहेत.
शहरे म्हणजे माणसे भेटण्याचे, कल्पनांची देवाणघेवाण करण्याचे, व्यापार व मौजमजा करण्याचे ठिकाण आहे. त्याकरिता शहरांमधील रस्ते, चौक, बगिचे व मोकळ्या जागा या सार्वजनिक ठिकाणांचा रंगमंचासारखा उपयोग होतो. यातूनच शहराला एक तोंडवळा प्राप्त होतो. शहरांची रचना आणि नियोजन यांचा मानवी वर्तणुकीवर प्रभाव पडत असतो. मध्ययुगात शहरे अतिशय नेटकी होती. त्यात व्यापार व कारागिरीची केंद्रे म्हणून चौकाला महत्त्व होते. बाजारपेठा आणि निवास यामध्ये फारसे अंतर नसे. युद्धकाळात लष्कराला नियंत्रण सुलभ व्हावे, यासाठी प्रशस्त रस्ते आखून नगरांची पुनर्रचना करण्यात आली.
विसाव्या शतकात मोटार वाहतुकीच्या वाढत्या लोंढ्याला पुरे पडण्यासाठी रस्त्यांची संख्या वाढू लागली. ‘अधिक रस्ते म्हणजे अधिक गाड्यांना आमंत्रण’ हे लक्षात येऊ लागले. १९८९मध्ये सॅनफ्रान्सिस्कोला हादरवलेल्या ६.९ रिश्टरच्या भूकंपात दुमजली महामार्ग कोसळला. तरीही शहरातील व्यवहार पूर्ववत सुरू राहिले. लोकांनी अल्पकाळात आपले वाहतूक वर्तन बदलले. हे लक्षात आल्यावर महामार्गाचे बांधकाम टाळून तिथे रुंद किनारी मार्ग करण्यात आला. त्यावर ट्रॉली बस, पदपथ व झाडे दिसू लागली. या अनुभवामुळे सॅनफ्रान्सिस्कोने धडधडणाऱ्या द्रुतगती मार्गाचे रूपांतर शांत रस्त्यामध्ये करण्याचे काम अनेक वर्षे चालू ठेवले. पुढे अमेरिकेच्या व्हिस्कॉनसिन राज्यातील मिलवॉकी, ओरेगॉन राज्यातील पोर्टलंड, कोरियाची राजधानी सेऊल या शहरांनी उड्डाणपूल पाडून रस्त्यांची क्षमता कमी केली.
मानवी शरीर आणि हालचाली यांचा विचार करून लोकाभिमुख शहरांची रचना करणे आवश्यक आहे. आपल्या डोळ्यांच्या पातळीशी सुंसगत शहरे असली पाहिजेत. राल्फ एरस्किन या स्वीडिश-ब्रिटिश वास्तुशिल्पींनी मानवी प्रमाणांचा आदर करणाऱ्या इमारतींच्या रचना केल्या. मात्र, गेल्या ५० वर्षांत मानवी प्रमाणबद्धतेचा विसर पडत गेला. वेगवान वाहने, इमारतींचे अवाढव्य प्रकल्प यांमुळे मानवी चेहरा गायब झाला. इमारती व मोकळ्या जागांचा आकार वाढत असून, त्यांचा वापर करणारे कमी होत आहेत. मोठमोठ्या जागा आणि अवाढव्य इमारतींमुळे शहरे औपचारिक व परकी वाटतात. लोकांमधील उबदार संबंध लहान अंतरातच शक्य असतात. छोट्या अंतरांची शहरे प्रेमळ वाटतात. अशीच सळसळती शहरे अगत्याचा व मैत्रीचा संदेश देत असतात. त्यात सामाजिक अभिसरणाचे आश्वासन असते. तर निर्जीव, थंड व मृतप्राय शहरे वेगळाच संदेश देत असतात.
कोपनहेगनमध्ये गेली काही वर्षे रस्त्यांच्या जाळ्यांची नव्याने रचना करण्यात येत आहे. रस्त्यांमधील मोटारींच्या मार्गिका (लेन) आणि वाहनतळ काढून त्या जागा दुचाकीस्वारांना बहाल केल्या आहेत. दुचाकीसाठी वेगळी सिग्नल यंत्रणा असून, दुचाकीस्वार गेल्यानंतरच मोटारींना अनुमती मिळते. दुचाकीस्वारांच्या सुरक्षित प्रवासासाठी विशेष प्रयत्न करून प्रोत्साहन दिले जात आहे. लोकांनीही हा संदेश जाणून १९९५ ते २००५ या काळात दुचाकींची संख्या दुपटीने वाढवली. वैयक्तिक प्रवासासाठी, शाळा-कॉलेजात जाण्यासाठी व कामावर जाण्यासाठी सायकल वापरणाऱ्यांचे प्रमाण ४० टक्के झाले आहे. ते अजून वाढवण्याचे उद्दिष्ट आहे. मेलबर्न शहरात पादचाऱ्यांना खेचून घेण्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूंचे पदपथ रुंद करण्यात आले आहेत. त्यावर स्थानिक निळ्या रंगाच्या फरश्या बसवण्यात आल्या. पदपथावर सावलीसाठी दरवर्षी ५०० झाडे लावण्यात आली. कलावंत व नागरिकांकडून सूचना मागवून रस्त्याचे रूपांतर कलादालनात करण्यात आले. रोषणाई केल्यामुळे रात्रीच्या अंधारातही हा शहरी विभाग लोकांना आकर्षित करू लागला.
..................................................................................................................................................................
अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5312/Checkmate
..................................................................................................................................................................
१९००मध्ये जगाची लोकसंख्या १६५ कोटी होती. ती आता ७०० कोटी असून, २०५०पर्यंत ९०० कोटी होईल, असा अंदाज आहे. या लोकसंख्यावाढीपैकी जवळपास सर्व वाढ शहरी भागात झाली आहे. २००७मध्ये जागतिक नागरी लोकसंख्या ५० टक्के झाली होती. २०५०मध्ये हे प्रमाण ७५ टक्के झालेले असेल. झपाट्याने वाढणाऱ्या शहरांमध्ये असंख्य अडचणी व आव्हाने उभी ठाकली आहेत. वाढत जाणाऱ्या शहरात लोकांचे चालणे आणि जीवनव्यवहार अवघड व अशक्य होत आहेत. घरांचा तुटवडा असल्यामुळे अनधिकृत वस्त्यांची वाढ होत आहे. या सर्व अडचणींचा सामना करायचा असेल, तर त्याचा प्रारंभ माणूसकेंद्री नगरनियोजनापासून करणे आवश्यक आहे.
अलीकडच्या काळात अनेक शहरांत मेट्रो, रेल्वे आणि ट्राम व्यवस्थेची टूम निघाली आहे. खूप मोठी आर्थिक गुंतवणूक आणि प्रदीर्घ काळ लागणाऱ्या या योजनांना नाकारून काही शहरांनी ‘बस रॅपीड ट्रान्झीट’ (बी.आर.टी.) अथवा ‘रबरी चाकावरील मेट्रो’ हा पर्याय स्वीकारला आहे. सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य देणारा हा स्वस्त, आरामदायी पर्याय प्रभावी ठरत आहे. १९६५मध्ये सर्वप्रथम ब्राझीलमधील कुरीचिबा शहराचे महापौर जेमी लर्नर यांच्या कल्पनेतून ही सेवा शहरातील पाच मुख्य रस्त्यांवर राबवली गेली. ही रचना तळहात आणि पाच बोटांसारखी दिसते. या रस्त्यांवरील विशेष मार्गिकेमधून दोन-तीन डबे असलेल्या बसेस धावतात. बसेसना विशेष अग्रक्रम दिल्यामुळे त्या वाहतूक कोंडीत अथवा सिग्नलला अडकत नाहीत. बसथांब्यांची रचना वैशिष्ट्यपूर्ण असल्यामुळे बसमधून झटपट चढता-उतरता येते. बसथांब्यापर्यंत सहज पोहोचता यावे यासाठी काळजीपूर्वक नियोजन केले आहे. सायकलसाठी मार्गिका राखून ठेवली. सायकल लावून बस सहज पकडता येते. शहराच्या मध्यवर्ती भागात बगिचे आणि मैदाने उपलब्ध करून दिली. कुरीचिबा शहराची लोकसंख्या पाच लाखांवरून १५ लाख झाली, तरी वाहतुकीची समस्या तयार झाली नाही. कुरीचिबाच्या या यशस्वी प्रयोगाचे पडसाद जगभर उमटले. बगोटा (कोलंबिया), जकार्ता (इंडोनेशिया), ग्वाटेमाला सिटी (ग्वाटेमाला), ग्वानझू (चीन), इस्तंबुल (तुर्कस्तान), ब्रिस्बेन (ऑस्ट्रेलिया), लॉस एंजेलिस (अमेरिका), मेक्सिको सिटी (मेक्सिको) ह्या शहरांनी बी.आर.टी. स्वीकारली. (बी.आर.टी. धडपणे राबवली नाही, तर काय होते, याचे अनुभव पुण्यात येतात.)
बगोटा शहराने ‘ला सायक्लोव्हिया’ ही शनिवार-रविवारी मोटारींना बंदी घालून रस्ते केवळ सायकल चालवण्यासाठी वापरण्याची चळवळ चालू केली. लोकांना ताज्या हवेचा, व्यायामाचा आनंद घेता येऊ लागला. शहरभर सायकलने भटकता येऊ लागले. बगोटामधील १२० कि. मी. लांबीच्या रस्त्यांवर दर आठवड्याला दहा लाख लोक या उपक्रमात सहभागी होत असतात. जगातील अनेक शहरे त्याचे अनुकरण करीत आहेत.
२०००मध्ये दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन शहरात वास्तुविशारद बार्बरा साऊथवर्थ यांनी ‘आवडण्याजोग्या जागा’ विकसित करण्याची योजना राबवली. गरीब लोकांनी मोकळेपणाने व ताठ मानेने एकत्र जमावे, हा त्यामागचा मुख्य उद्देश होता. झोपडपट्टी, बस स्थानके, चौक, शाळा, मोकळ्या जागा यांची अस्वच्छतेमुळे परवड झाली होती. त्यांना सुधारणे आवश्यक होते. आत्मसन्मान, सौंदर्य आणि उपयुक्तता यांचे महत्त्व पटवून ४० स्थानिक कलाकारांच्या मदतीने सार्वजनिक जागांचा वापर वाढवण्याचे प्रयत्न सुरू झाले. प्रत्येक जागेचे वैशिष्ट्य लक्षात घेऊन रचना केल्या. पायवाटा, झाडे, वेली दिसू लागल्या. फर्निचर, चौथरे, रस्त्यावरील विक्रेत्यांसाठी विशेष जागा दिल्या. आपोआप या सार्वजनिक जागांभोवती माणसे दिसू लागली. आता अनेक शहरांनी ‘आवडण्याजोग्या जागा’ योजनेचा स्वीकार सुरू केला आहे.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
प्रस्तुत पुस्तकाच्या अखेरीस संपूर्ण पुस्तकाच्या मजकुरातील ठळक मुद्दे ठसविले आहेत. परिपूर्ण शहरनियोजनासाठी आवश्यक बारा गुणांचा तक्ता दिला आहे. लोकांना एकत्र जमवण्यामागची आणि परावृत्त करण्यामागील नियोजनाची मूलतत्त्वे सांगितली आहेत. प्राधान्यक्रमांची पुनर्रचना कशी करावी, हेदेखील स्पष्टपणे दाखवले आहे.
आपल्या शहरांची झालेली दशा आपण भोगत आहोत. या दुरवस्थेतून मार्ग निघेल तरी कसा, अशी भावना आपल्या प्रत्येकाच्या मनात घर करून आहे. या दुष्टचक्राला भेदून शहर सुंदर करण्यासाठी आपण कृतिआरखडा कसा करावा, याचे मार्गदर्शन या पुस्तकातून होते. श्रीमती महाजन यांनी अनेक शहर सुधारणांचे जनक यान गेल यांचे अतिशय महत्त्वाचे पुस्तक मराठीत अनुवादित करून मोलाचा ठेवा दिला आहे. त्याचा आपण उपयोग करून घेणे, हे अनिवार्य आहे.
पर्यावरण, स्वच्छता अशा क्षेत्रांत कार्य करणाऱ्या विविध संस्था व गटांनी, तसेच ज्येष्ठ नागरिकांपासून महिला बचत गटांनी, नगरसेवक, आमदार व अधिकारी यांना सहभागी करून ‘असावी शहरे आपुले छान’ या पुस्तकावर चर्चा घडवली पाहिजे. शहरनियोजनाची गरज शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. विविध चित्रवाहिन्यांनी उत्तम शहरनियोजन दाखवत भिकार नियोजन अधोरेखित केल्यास त्याची निकड थेट लक्षात येईल. असे काही झाले, तर लोकांमधून शहर सुधारण्याची मागणी होईल आणि महाजनबाईंनी कष्ट घेऊन सादर केलेल्या या पुस्तकाचे चीज होईल. आपले शहर सुंदर करण्यासाठी आपल्याला झटावेच लागणार आहे. अन्यथा वाढती दुर्दशा सहन करणे भाग आहे.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment