ओप्रा विन्फ्री : असं काय आहे या बाईमध्ये? असं काय भोगलंय तिने की, तिच्या शोमध्ये येणाऱ्या सगळ्यांना ती आपल्या बोलण्याने मोकळं करू शकते?
ग्रंथनामा - झलक
मीना कर्णिक
  • ‘असामान्य’ या पुस्तकाचं मुखपृष्ठ आणि ओप्रा विन्फ्री
  • Wed , 20 April 2022
  • ग्रंथनामा झलक असामान्य Asamanya मीना कर्णिक Meena Karnik ओप्रा विन्फ्री Oprah Winfrey

वयाच्या आठव्या वर्षी बलात्कार झालेली एक कृष्णवर्णीय मुलगी आपल्या भीषण भोवतालावर मात करून ओप्रा विन्फ्री बनते. एखादी डॅफने गलिझिया पत्रकार म्हणून राजकारण्यांच्या भ्रष्टाचाराविषयी लिहिताना आपले प्राण गमावते. कुणी डेव्हिड ओगिल्वी वयाच्या ३८व्या वर्षी एका वेगळ्याच क्षेत्रात अ, ब, क शिकण्यापासून सुरुवात करतो आणि जाहिरात क्षेत्राचा आद्य गुरू म्हणून ओळखला जाऊ लागतो. ट्रेव्हर नोहा दक्षिण आफ्रिकेतल्या वर्णद्वेषाचे चटके खाऊनही कडवट होत नाही. इराणसारख्या देशातली गळचेपी सहन न करणारी मानिया अकबरी दिग्दर्शक म्हणून आपली लढाई चालू ठेवते. छायाचित्रकार शहा मराई तालिबान्यांच्या ताब्यात गेलेला आपला देश सोडून पळून न जाता काबुलमध्ये फोटोग्राफी करत राहतो आणि एक दिवस दहशतवाद्यांच्या स्फोटात बळी पडतो.

या आणि अशा काही असामान्य माणसांची व्यक्तिचित्रं ज्येष्ठ पत्रकार मीना कर्णिक यांच्या ‘असामान्य’ या पुस्तकात आहेत. नुकत्याच अक्षर प्रकाशनातर्फे प्रकाशित झालेल्या या पुस्तकातील एक व्यक्तिचित्र संपादित स्वरूपात...

..................................................................................................................................................................

‘ओप्रा विन्फ्री शो’. अमेरिकन टेलिव्हिजनवर गेली कित्येक वर्षं चाललेल्या या कार्यक्रमाची लोकप्रियता एवढ्या वर्षांतही कमी झालेली नाही. त्यात येणाऱ्या विषयांमधलं वैविध्य कमी झालेलं नाही. आणि ओप्रा विन्फ्री या बाईभोवती असलेलं वलय जराही कमी झालेलं नाही.

असं काय आहे या बाईमध्ये? असं काय भोगलंय तिने की, तिच्या शोमध्ये येणाऱ्या सगळ्यांना ती आपल्या बोलण्याने मोकळं करू शकते? ती त्यांच्याबरोबर हसते, त्यांच्याबरोबर अश्रू ढाळते, त्यांचा हात पकडून त्यांचं सांत्वन करते, त्यांच्यातलीच एक बनून त्यांचं दु:ख काही काळ आपलं समजते. आपलं आणि प्रेक्षकांचंही.

आज ओप्रा टेलिव्हिजनवरील होस्ट शोची अनभिषिक्त सम्राज्ञी आहे. तिची श्रीमंती मोठमोठ्या हॉलिवुड सुपरस्टार्सच्या तोडीची आहे. पण तिचा इथपर्यंतचा प्रवास हा तिच्या शोमध्ये सहभागी होणाऱ्या अनेकांइतकाच भयानक, अंगावर शहारा आणणारा आणि प्रचंड जिद्दीचा आहे.

ओप्रा गेल विन्फ्रीचा जन्म १ फेब्रुवारी १९५४चा. व्हेर्निटा ली, म्हणजे ओप्राची आई ही मिसिसिपीमधील कोसक्युस्कोमधल्या एका अत्यंत गरीब शेतकऱ्याची मुलगी. व्हेरनॉन विन्फ्री सैन्यात नोकरीला होता. एका उन्हाळ्याच्या सुट्टीत घरी आलेला असताना त्याची आणि व्हेर्निटाची गाठ पडली. दोघेही टीनएजर्स. एका रात्रीची मजा करायला दोघे एकत्र आले एवढंच. त्या एकत्र येण्यात ना प्रेम होतं, ना जबाबदारीची जाणीव. सुटी संपली आणि व्हेरनॉन आपल्या नोकरीसाठी निघूनही गेला. त्या रात्रीच्या आपल्या संबंधांमुळे व्हेर्निटाला दिवस गेले आहेत, याची त्याला साधी कल्पनाही नव्हती. व्हेर्निटा तरी वयाने कुठे मोठी होती? जेमतेम १७ वर्षाची. अचानक लादलं गेलेलं हे मातृत्व काही वेळा तिला नकोसंही वाटलं असेल. त्यातून आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची. व्हेर्निटाने नऊ महिन्यानंतर एका मुलीला जन्म दिला आणि त्या वेळी अलाबामामध्ये असलेल्या व्हेरनॉनला मुलीच्या जन्माची बातमी पत्रातून लिहिलेल्या ‘सेंड क्लोथ्स’ म्हणून कळवली.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

गरोदरपणामुळे घरात अडकलेल्या व्हेर्निटाला आता नवीन कामाच्या शोधात मिलवावकीला जाण्याचे वेध लागले होते. तिथे अधिक काम होतं, अधिक पैसे मिळवण्याची संधी होती. या दळभद्री घरात नाहीतरी काय ठेवलं होतं? मात्र मोठ्या शहरात कामाला जायचं तर गळ्यात लहान बाळाचं लोढणं तिला नको होतं. तिने आपल्या मुलीला सरळ व्हेरनॉन विन्फ्रीच्या आईच्या हवाली केलं आणि ती निघून गेली. दरम्यान छोट्या बाळाचं बारसं झालं होतं. ‘बुक ऑफ रुथ’मध्ये उल्लेख असलेल्या ओरपाह् या नावावरून व्हेर्निटाने आपल्या मुलीचं नाव ठेवलं.

छोटी ओप्रा आजीकडे वाढत होती. घरात ना आई, ना वडील. आजी फेथ युनायटेड मिसिसीपी बॅप्टिस्ट चर्चची कडवी सभासद. एकदा तिच्या तोंडून ऑर्डर सुटली की, मुलांनी ती पाळायलाच हवी. ओप्रा तीन वर्षांची असताना आजीने आदेश दिला, चर्चमध्ये भाषण कर. इस्टरची वेळ होती. ओप्राचा विषय होता- ‘जीझस रोज ऑन इस्टर डे.’

भाषण देण्यामधला तिचा आत्मविश्वास, बोलण्यातली तिची सहजता पाहून मोठ्यांना जरी तिचं कौतुक वाटलं तरी तिच्याबरोबरीची मुलं तिला ‘द प्रीचर’ म्हणून हिणवू लागली. रविवारच्या माससाठी जमल्यानंतर ‘ही पहा आली मिस जीझस,’ म्हणून तिची हेटाळणी करू लागली, तिच्या अंगावर थुंकू लागली. खेळायला कोणी नाही. बोलायला कोणी नाही. अगदी लहान वयातच ओप्रा एकटी पडली होती. तिला राग यायचा, आपली चूक काय हे कळायचं नाही. तो उफाळून येणारा संताप ती पोटातच ठेवायची. आणि आपला मोहरा पुस्तकांकडे वळवायची. वाचन, लेखन आणि सगळ्यात आवडती गोष्ट म्हणजे बोलणं. ओप्राने या तीन गोष्टींचा आसरा घेतला.

ओप्रा किंडरगार्टनमध्ये जायला लागली. भोवतालची सगळी लहान मुलं दोऱ्यामध्ये मणी ओवणं, कागदावर रंगीबेरंगी रेघोट्या ओढणं यात मग्न होती. हा काय पोरकटपणा, तिच्या मनात विचार आला. आपल्याला हे करायला कंटाळा येणार, हे पहिल्या काही दिवसांमध्येच तिच्या लक्षात आलं आणि त्यातून तिने मार्गही काढला. तिने चक्क आपल्या शिक्षिकेला पत्र लिहिलं. आपल्याला या वर्गात आवडत नाही, असं स्वच्छपणे सांगितलं. आणि गंमत म्हणजे शिक्षिकेलाही ते पटलं. पाच वर्षांची मुलगी पत्र लिहून आपलं मत मांडते, यातूनच ती या छोट्या मुलांपेक्षा वरच्या वर्गात असायला हवी हे सिद्ध होतंय, असं त्या शिक्षिकेचं मत पडलं आणि ओप्राची रवानगी पहिलीत झाली. तिची हुशारी बघून पहिलीतून तिला थेट तिसरीत प्रमोशन मिळालं.

ओप्राच्या दुर्दैवाने ती सहा वर्षांची झाली आणि तिच्या आजीला तिची जबाबदारी पेलवेनाशी झाली. आजी मदतीसाठी वळली ओप्राच्या आईकडे. व्हेर्निटा तेव्हा मिलवावकीमध्ये एका घरात मोलकरणीचं काम करून पैसे मिळवत होती. अशा प्रकारे वयाच्या सहाव्या वर्षी बोटीत बसवून ओप्रा विन्फ्रीची रवानगी मिलवावकीला झाली. आई असलेल्या एका बाईबरोबर पुढचं आयुष्य काढण्यासाठी.

ओप्राच्या आयुष्यातल्या एका नवीन प्रकरणाची ही सुरुवात होती. खरं तर सहा वर्षांचं वय हे काही आयुष्याला वळण वगैरे लागण्याचं किंवा काहीतरी घडण्याचं वय नाही. वाईट तर नाहीच नाही. पण इतकी वर्षं आजीच्या कडक शिस्तीत काढलेली ओप्रा एका नवीनच वातावरणात चालली होती. काय विचार मनात आले असतील, त्या वेळी त्या लहानग्या मुलीच्या? जी आई जन्मानंतर आपल्याला टाकून गेली, तिच्यारोबर आता आपण राहायचंय, या कल्पनेने काय वाटत असेल तिला? मुळात आई या नावाभोवती कोणती प्रतिमा गुंफली असेल तिने?

व्हेर्निटालीचं वयही तेव्हा फार नव्हतं. जेमेतम २२ वर्षांची मुलगी होती ती. सहा वर्षाच्या एका जिवाची काळजी घेण्याएवढी प्रगल्भता तर तिच्यात नव्हतीच, पण आर्थिकदृष्ट्याही तिच्यापाशी ती ताकद नव्हती. घर अगदीच छोटं, एका खोलीचं. जिथे तिथे झुरळं फिरताहेत. ओप्राकडे ना लक्ष द्यायला तिच्याकडे वेळ होता, ना तिच्यावर प्रेम करायला. अनेक वाईट सवयी या काळात ओप्राला लागल्या. आईच्या पर्समधून पैसे चोरणं, खोट बोलणं, कारणं देणं...

ओप्रा आठ वर्षांची होईपर्यत तिची आई तिचं संगोपन करता करता थकून गेली होती. १९६२ साली ओप्राला तिच्या वडिलांकडे आणि सावत्र आईकडे पाठवायची संधी आली आणि व्हेर्निटाने ती दवडली नाही. आठ वर्षांची ओप्रा नॅशव्हिलला गेली.

पुन्हा एकदा वेगळं आयुष्य.

बेबंदपणाकडून कडक शिस्तीकडे.

ओप्रा म्हणते, ‘माझे वडील म्हणजे एकदम कडक माणूस, पण त्याहीपेक्षा कडक माझी सावत्र आई, झेल्मा होती. तिथं राहणं म्हणजे एखाद्या मिलिटरी स्कूलमध्ये राहण्यासारखं होतं. अभ्यास फक्त शाळेतच करून चालायचं नाही, घरीही करावा लागे. आठवड्याला अमुक इतके नवीन शब्द शिकावेच लागत. मला तिथं रहायला आवडू लागलं होतं. आईच्या घरापेक्षा हे घर खूपच सुसंस्कृत होतं. पण माझं हे सुख फार दिवस टिकलं नाही.’

व्हेर्निटाने दरम्यान लग्न केलं आणि आपण एक संपूर्ण कुटुंब म्हणून जगायला हवं असं वाटून तिने ओप्राला पुन्हा आपल्याकडे बोलावलं. वडिलांनी लगेच परवानगी दिली आणि ओप्राच्या मनात वेगळेच विचार यायला लागले. आईला नको होतो म्हणून तिने वडिलांकडे धाडलं, आता वडिलांना आपण हवे आहोत असं नाही, त्याविषयी ते आग्रही नाहीत म्हणून ते पुन्हा आपल्याला आईकडे पाठवायला तयार झाले. आपण कोणालाच नको आहोत का? आपण एकटे आहोत का?

आईकडे परत येणं म्हणजे गरिबीकडे परत येणं होतं. आणि त्याहून अधिक एका भयानक अनुभवाला सामोरं जाणं होतं. नऊ वर्षांच्या त्या छोट्याशा मुलीला आपल्यासमोर काय वाढून ठेवलंय, याची जराही जाणीव नव्हती.

इथे ओप्राकडे कुणी फारसं लक्ष द्यायचं नाही. आणि मग ते वेधून घेण्यासाठी ती काहीबाही करायची. कोणाच्याही खोड्या काढायच्या, मग वय बघायचं नाही की हुद्दा. घरातून पळून जायचं. वाटेल तेव्हा परत यायचं. बेबंदपणे जगायचं. ना दुनिया की फिकीर ना लोगों का डर. कोवळ्या वयातल्या या बंडखोरीची खूप मोठी किंमत ओप्राला चुकवावी लागली.

१९ वर्षाच्या तिच्या एका भावाने तिच्यावर बलात्कार केला.

आणि मग एकामागून एक बलात्कार होतच राहिले.

कधी सावत्र वडिलांचा कुणी मित्र.

कधी दूरचा एखादा भाऊ.

कधी आणखी कोणी.

सगळे अगदी घरातले, कुटुंबातले, विश्वासाचे.

सतत पाच वर्षं हे चालू होतं.

मुकाटपणे ओप्रा ते सहन करत होती. बलात्कारित बायका अनेकदा सगळा दोष आपलाच आहे असं मानतात. ओप्रानेही तेच केलं. ती स्वत:लाच दोषी मानू लागली. कुणी आपल्यावर प्रेम करावं, या लायकीचेच आपण नाही, आपली लायकी ही आपल्याशी वाईट वागण्याचीच आहे, असं तिला वाटू लागलं. आणि त्याचाच परिणाम म्हणून हे पुरुष आपल्याशी असं वागताहेत, असं तिने ठरवून टाकलं.

ओप्रा तो काळ आठवताना अंगावर शहारे आणत म्हणते, ‘म्हणूनच मी स्वत:ला पुस्तकांच्या जगात झोकून दिलं. आयुष्यात खूप झगडावं लागणाऱ्या बायकांच्या गोष्टी मी वाचू लागले. वाचन करणं आणि स्मार्ट मुलगी बनणं हीच माझी मूल्यं बनली होती. पुस्तकाचं ते असं एकमात्र जग होतं, जिथं मला माझ्यावर कोणी प्रेम करतंय असं वाटे.’ ओप्राच्या आईला घरात जे चाललंय ते कळतच नव्हतं, असं कसं म्हणता येईल? पण तिने त्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलं इतकं मात्र खरं. हे कमी होतं म्हणून की काय, १४व्या वर्षी ओप्राला दिवस गेले. त्या विषयी मात्र ओप्रा फारसं बोलू इच्छित नाही. ‘एखाद-दोन आठवडे ते मूल जगलं असेल,’ इतकंच बोलून ती थांबते.

हे सगळं वाचलं, ऐकलं की थबकायला होतं. जे घडलं ते सगळं भयानक तर खरंच, पण ओप्राबाबत तेवढंच म्हणता येत नाही. हे सगळं भोगून ती आज तिथं पोहोचली, तिने जे करून दाखवलं किंवा ती आजही जे करतेय ते क्वचितच कोणाला जमत असेल. तिने आपल्या अनुभवाचं कधी भाडवलं केलं नाही, पण म्हणून ते लपवूनही ठेवलं नाही. आपल्या कार्यक्रमात येणाऱ्यांनी मोकळेपणानं बोलावं अशी अपेक्षा तिने केली, तेव्हा आपला अनुभव जाहीरपणे शेअर करण्याची ताकदही तिने दाखवली. ही ताकद तिला पुस्तकांनी दिली. वाचनाच्या या वेडामुळे तिच्या आयुष्यानं परत एकदा नवीन वळणही घेतलं.

..................................................................................................................................................................

उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअ‍ॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...

हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal

................................................................................................................................................................

सातवीमध्ये असताना जेवणाच्या सुटीत ओप्रा आपल्या बाकावर बसून पुस्तक वाचत असताना तिच्या एका शिक्षिकाने पाहिलं. तिच्याशी बोलल्यानंतर ही मुलगी कुशाग्र बुद्धिमतेची आहे, हे त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी तिला एका प्रतिष्ठित हायस्कूलमध्ये स्कॉलरशिप मिळवून दिली. हायस्कूलचं शिक्षण अमेरिकेमध्ये महाग असतं. त्यातून ती शाळा गोऱ्या मुलांची. एकात्मतेचा प्रयोग शाळेनं नुकताच सुरू केला होता आणि ओप्रा त्यांच्या झोळीत पडली. अख्ख्या शाळेत ती एकटीच ब्लॅक. अख्ख्या शाळेत ती एकटीच गरीब. आधीच स्वत:विषयी मनात अढी. त्यात आणखी भर पडली. आपण किती गरीब आहोत, याची जाणीव पहिल्यांदा तिला त्या शाळेत गेल्यावर झाली. नैराश्य, असहाय्यता, राग, संताप या सगळ्या भावना मनात कोंडलेल्या राहत. ओप्रा शाळेत जायची खरी, पण तिथं शिक्षणापेक्षा शिक्षकांचं म्हणणं धुडकावण्याकडेच तिचा अधिक कल असे. तिच्या तक्रारी ऐकून ओप्राची आई वैतागली आणि ओप्राला ज्युवेनाईल डिटेन्शन होममध्ये दाखल करायला घेऊन गेली. सुर्दैवाने तिथं जागा रिकामी नसल्यानं ओप्राला परत यावं लागलं. हताश झालेल्या आईने शेवटचा प्रयत्न म्हणून ओप्राला पुन्हा एकदा तिच्या वडिलांकडे पाठवायचा निर्णय घेतला. आपोआप घेतलेला हा निर्णय ओप्राच्या आयुष्यातला सगळ्यात चांगला निर्णय ठरला.

१४-१५ वर्षांची पिसाटल्यासारखी वागणारी ओप्रा सांभाळणं खरोखरच कठीण होतं. व्हेर्निटासाठी अशक्यच होतं. पण व्हेरनॉन आणि झेल्माने मात्र हे आव्हान स्वीकारलं. या घरात वाईट मार्क घेऊन आलेलं चालणार नाही, याची जाणीव त्यांनी तिला दिली. कधी रागानं, कधी समजावणीच्या सुरात. एखाद्या दिवशी वडील तिला जवळ घेऊन सांगत, ‘तू सी ग्रेड घेऊन या घरात येऊ शकत नाहीस. याचं सगळ्यात महत्त्वाचं कारणं म्हणजे तुझी बुद्धी सी ग्रेड आणणाऱ्या मुलांसारखी नाही. तशी ती असती तर माझी काहीच हरकत नव्हती. मी काही तुला अशक्य असं करायला सांगत नाही. तुझी जी लायकी आहे, तेवढेच मार्क मिळवायला सांगतोय. आणि तुझी लायकी ही ए ग्रेड मिळवण्याचीच आहे. तुझ्यात ती क्षमता आहे,’ वडिलांच्या कडक स्वरापेक्षा त्यांचा आपल्यावर असलेला विश्वास ओप्राला अधिक जाणवत असे. त्यांच्या रागवण्यामागे आपलं भलं आहे, याची खात्री पटवून देत असे. आपल्या सावत्र आईला आपण मोठे व्हायला हवे आहोत, हे लक्षात येत असे.

हळूहळू ओप्रामध्ये बदल व्हायला लागला. ती शाळेमध्ये अभ्यासातच नव्हे, तर इतरही गोष्टींमध्ये सहभागी होऊ लागली. राजकारणात रस घेऊ लागली. १९७० साल हे त्या दृष्टीनं ओप्रासाठी महत्त्वाचं ठरलं. ती १६ वर्षाची होती, शाळेच्या विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष होती, वर्गातली सर्वांत लोकप्रिय मुलगी म्हणून निवडून आली होती आणि सर्वांत मोठी गोष्ट म्हणजे शाळेने वॉशिंग्टन डीसी येथे होणाऱ्या तरुणांच्या व्हाईट हाऊस परिषदेसाठी तिची निवड केली होती. तिच्याबरोबर संपूर्ण शाळेमधून आणखी एकच विद्यार्थी निवडला गेला होता.

हा दौरा तिच्यासाठी खूप फलदायी ठरला. स्थानिक रेडिओ स्टेशनने तिथल्या अनुभवांवर आधारित तिची एक मुलाखत घेतली. तिचं बोलणं ऐकून त्यांनी ओप्राला ‘मिस फायर प्रिव्हेन्शन कॉन्टेस्ट’साठी स्वत:च्या रेडिओ स्टेशनचं प्रतिनिधित्व करायला सांगितलं. आणि प्रश्नोत्तराच्या विभागात तिने दिलेल्या चटकदार उत्तरांमुळे ती चक्क विजेती ठरली! दुसऱ्या दिवशी ओप्रा आपलं बक्षीस घेण्यासाठी रेडिओ स्टेशनवर आली. तिथं भेटलेल्या एका निर्मात्याशी तिने खूप गप्पाही मारल्या. या निर्मात्याला तिचा आवाज आवडला आणि झटक्यात तिला बातम्या वाचण्याची नोकरीही मिळाली. हायस्कूलचं शिक्षण अजूनही चालू होतं. शाळा संपली की, ती धावत रेडिओ स्टेशनवर जायची. दुपारी साडेतीन, साडेचार अशा दर अर्ध्या तासानं तिला बातम्या वाचाव्या लागत. अगदी रात्री आठ वाजेपर्यंत. ओप्राला हे नवीन आयुष्य खूपच भावलं.

टेनिसी स्टेट युनिव्हर्सिटीच्या कॉलेजमध्ये ओप्राने प्रवेश मिळवला, तेव्हा आपण अभिनेत्री व्हायचं, असं तिच्या मनाने पक्कं ठरवलेलं होतं. वडिलांचा त्याला फारसा पाठिंबा नव्हता. पण त्यांचा विरोध झुगारून तिने नाटक आणि वक्तृत्व यांचा अभ्यास चालू ठेवला. त्यातून लहान असल्यापासूनच आपल्यापाशी सर्व गुण आहेत, याची तिला खात्री होती. पण या मार्गातला सर्वांत मोठा अडथळा तिच्या वडिलांचा नव्हे, तर तिच्या त्वचेच्या रंगाचा होता. ओप्राचा रंग कृष्णवर्णीयांमध्येही अधिक गडद असा होता. पण तिची भाषा मात्र कित्येक गोऱ्यांहून अधिक प्रगल्भ आणि मृदू होती. १९७०चं हे दशक होतं.

कॉलेजच्या दुसऱ्या वर्षाला असताना ओप्राला नॅशव्हिलमधल्या डब्ल्यूटीव्हीएफ-टीव्हीने नोकरीची ऑफर दिली. तिने ती अर्थातच धुडकावून लावली. एकदा, दोनदा नव्हे तर तीन वेळा. आपल्या अभ्यासात या नोकरीचा व्यत्यय येईल, असं तिचं मत होतं. तेव्हा कॉलेजमधल्या एका प्राध्यापकाने तिला म्हटलं, ‘अगं, अशी नोकरी मिळावी म्हणून मुलं या कॉलेजात अभ्यास करायला येतात!’ ओप्राने निमूटपणे नोकरी स्वीकारली. १९ वर्षांची ओप्रा त्या वेळी नॅशव्हिलची पहिली कृष्णवर्णीय को-अँकर म्हणून टेलिव्हिजनवर दिसू लागली. कोणताही अनुभव नसताना तिला हे काम मिळालं होतं. ओप्रा म्हणते, ‘तिथे जाऊन काय करायचं याची मला जराही कल्पना नव्हती. म्हणून मग तिनं स्वत:शी आपण बार्बरा वॉल्टर्स (बार्बराही टेलिव्हिजनवर अँकरचं काम करत असे) असल्याचं नाटक करायचं ठरवलं. माझी ती एकमेव गुरू असं म्हणता येईल. पण तुम्ही फार काळ दुसऱ्या कोणीतरी असल्याचं नाटक करू शकत नाही. कधीतरी तुम्हाला स्वत:ची स्टाईल निर्माण करावी लागते. मी मग मधूनमधून बार्बरा बनायचं सोडून ओप्रा बनू लागले आणि माझ्या लक्षात आलं की, ओप्रा बनून वावरणं अधिक सोपं आहे.’

१९७६ साली ओप्राने टेनिसी स्टेटमधून आपली पदवी घेतली आणि ती नॅशव्हिलमध्ये पूर्ण वेळ न्यूज अँकर म्हणून काम करू लागली. वर्षाला १५ हजार डॉलर्स कमावू लागली. पैसे चांगले मिळत असले तरी तिला आता नॅशव्हिलपासून दूर जायचं होतं. अजूनही असलेली वडिलांची शिस्त, रात्री वेळेवर घरी यायची ताकीद यापासून सुटका मिळवणं, हेही त्यामागचं एक कारण होतंच.

बाल्टीमोअरच्या डब्ल्यूजेझेड-टीव्हीवर सहा वाजताच्या बातम्यांसाठी को-अँकर म्हणून तिचा विचार होत होता. पण ओप्राला आपण या कामासाठी लायक आहोत असं वाटेना. या बातम्यांचा निर्माताही तिच्याशी सहमत होता. बातमी द्यायची तर ती वस्तुनिष्ठपणे द्यायला हवी, त्यात आपल्या भावना येता कामा नयेत, ही सर्वसाधारण पद्धत. जगभरचीच. आणि त्यात वावगंही काही नाही. ओप्राला ते जमायचंच नाही. अनेकदा एखादी दु:खी बातमी सांगताना ती भावनावश होऊन कॅमेऱ्यासमोरच रडायची. त्या निर्मात्याने मग ओप्राची नेमणूक सोडपाच वाजताच्या एका र्काक्रमावर केली. हा एक टॉक शो होता. नाव होतं- ‘पीपल आर टॉकिंग’. हार्डन्यूज देण्यापेक्षा अशा प्रकारच्या बातम्यांशीच संबंधित, पण जरा वेगळा कार्यक्रम करणं ओप्राला खूप आवडलं. ती म्हणते, ‘हेच, हेच माझं काम आहे. मी कशासाठी जन्माला आले, ते मला हा शो करताना जाणवलं. हे काम म्हणजे माझ्यासाठी मोकळ्या हवेत श्वास घेणं होतं.’

आठ वर्षं तिने हा कार्यक्रम केला. व्यावसायिकदृष्ट्या ओप्रासाठी हा अत्यंत भरभराटीचा काळ असला, तरी तिचं वैयक्तिक आयुष्य काही फार बरं चाललं नव्हतं. चार वर्षं ती एका पुरुषाबरोबर होती. त्याच्याशिवाय आपण कोणीच नाही, असं तिच्या मनानं घेतलं होतं. त्यामुळे तो आयुष्यातून निघून गेल्यानंतर ती सैरभैर झाली. जगण्यात काही अर्थ नाही, असं तिच्या मनानं घेतलं आणि एका क्षणी तर तिने आत्महत्येचा निर्णय घेऊन तशी चिठ्ठीही लिहून ठेवली होती.

पण आत्महत्या करण्याएवढी कमकुवत ओप्रा नव्हती. आजीने अगदी बालवयात केलेले संस्कार, वडिलांचा आधार, आजवर भोगलेल्या आयुष्याने दिलेला कणखरपणा, हे सगळं सगळं तिच्या बाजूने उभं राहिलं असणार. तिला या मानसिक कमकुवतपणातून बाहेर काढायला कारणीभूत ठरलं असणार. नाहीतर इतकं आयुष्य पाहिल्यानंतर ओप्रा विन्फ्रीसारख्या बाईने एखादा पुरुष आयुष्यातून निघून गेला म्हणून हार मानायची हे कसं शक्य होतं? या नातेसंबंधातून बाहेर येणं हा आपल्यासाठी टर्निंग पॉईंट होता आणि तसा तो आहे, याची जाणीव होणं, हा आणखी एक टर्निंग पॉईंट होता, असं ओप्राला वाटतं. आत्मसन्मानाचं महत्त्व पटलं आणि मार्ग दिसला. हा आत्मशोध चालू असताना ओप्राचा कार्यक्रमही सुरू होताच. दोघांची आपोआप सांगड घातली जात होती. आपल्याला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्याची धडपड चालली होती आणि तो कार्यक्रम हे नकळत त्या धडपडीचं व्यासपीठ बनत होतं. आपण जसे आहोत, तसं असणं हीच आपली स्टाईल आहे, याचं भान ओप्राला आलं होतं. त्यातून एका नवीन ओप्रा विन्फ्रीचा उदय होत होता. एक असं व्यक्तिमत्त्व जे आजवर कधी अस्तित्वातच नव्हतं.

पण या मानसिक आंदोलनाला तोंड देत असताना ओप्रा नकळत खाण्याकडे वळत होती. डिप्रेशन आलं की, काहीतरी खायला घे. हुरहुर वाटू लागली की, काढ वेफर्स. त्याचा परिणाम तिच्या शरीरावर यशस्वी ठरत होता की, तिचं वाढतं वजन तिच्या प्रगतीच्या आड येऊ शकत नव्हतं.

दरम्यान ओप्राला पुन्हा एक प्रमोशन मिळालं. शिकागो टीव्हीवर ‘ए.एम. शिकागो’ नावाचा सकाळचा टॉक शो तिला मिळाला. ओप्राला आता अशा कार्यक्रमांची नेमकी नस सापडली होती. इतर ‘टॉक शो’पेक्षा आपला कार्यक्रम वेगळा कसा करायचा, हे समजू लागलं होतं. मस्कारा कसा लावावा किंवा शुफले कसं बनवावं यासारख्या उथळ किंवा रटाळ विषयांना तिने कधी स्पर्शही केला नाही. त्याऐवजी लोकांच्या मनाला भिडणारे प्रश्न तिने हाताळले. आपल्याकडे आलेल्या पाहुण्यांपुरताच तिने आपला कार्यक्रम मर्यादित न ठेवता समोर बसलेल्या प्रेक्षकांमध्ये जाऊन ती त्यांनाही चर्चेत सहभागी करून घेऊ लागली. कु क्लक्स क्लॅनच्या लोकांना बोलवायला जशी ती कचरत नव्हती, तशी ती भावाने बहिणीवर किंवा वडिलांनी मुलीवर केलेल्या लैंगिक बळजबरीला बळी पडलेल्या मुलींना बोलवायलाही घाबरत नव्हती.

अशा कार्यक्रमामधला ओप्राचा तेव्हाचा प्रतिस्पर्धी होता फिल डोनाह्यू. (याच डोनाह्यूने ओप्राला ‘लाईफ टाईम अचिव्हमेंट’चा एमी पुरस्कार मिळाला, तेव्हा म्हटलं होतं, ‘तू एक मोठी स्टार तर आहेसच, पण त्याहीपेक्षा विसाव्या शतकातली तू एक राजकीय व्यक्ती आहेस. तुझ्या चांगल्या कामांनी आम्हा सगळ्यांना स्पर्श केलेला आहे.’) या दोघांच्याही कार्यक्रमामध्ये थोडाफार सारखेपणा होता. दोघेही वेगळे विषय निवडत, अनेकदा समोरचा वक्ता रागवेल असे प्रश्न विचारत. पण ओप्राचा मोकळेपणा, विषयातलं गुंतून जाणं, या सगळ्यामुळे लवकरच तिचा कार्यक्रम पहिल्या स्थानावर आला.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

आपल्या वैयक्तिक आयुष्याविषयी, आपल्या अनुभवांविषयी ती बेधडक बोलायची. अगदी जाणीवपूर्वक केललं असलं तरी असं करणं कठीण होतं, यात शंकाच नाही. कारण ती काही खोटं बोलत नव्हती. आपल्यावर बलात्कार झाला, असं लाखो प्रेक्षकांपर्यंत पोहोचणाऱ्या कार्यक्रमामध्ये सांगण्यासाठी लागणारं धैर्य तिच्यापाशी होतं, हे मान्य करायलाच हवं. आपल्या अमली पदार्थाच्या सेवनाविषयी जसं ती सांगे, तसंच नंतर आपल्या जाडेपणाविषयी आणि बारीक होण्यासाठी केलेल्या झगड्याविषयीही बोले.

सुरुवातीच्या ओप्राच्या कार्यक्रमांमध्ये ती अनेकदा आपल्या जाडेपणावर विनोद करत असे. इतरांनी या वाढत्या वजनावर केलेली टीकाही ती हसून सहन करायची खरी, पण कुठेतरी ते बोलणं तिला टोचत असावं. पुढच्या कारकिर्दीत तिने स्वत:साठी रोझी डेली नावाची एक न्युट्रिशनिस्ट ठेवली, एक बॉब ग्रीन नावाचा वैयक्तिक ट्रेनर ठेवला आणि प्रयत्नपूर्वक ती बारीक झाली. (या दोघांनाही नंतर ओप्राबरोबरच्या आपल्या अनुभवांवर आधारित पुस्तकं लिहिली, जी तुफान खपली) सर्वांत महत्त्वाचं म्हणजे ९० पौंड घटवल्यानंतर आजही ओप्राने ते टिकवलेलं आहे. सांगायचा मुद्दा हा की, ८५ साली फिल डोनाह्यूला मागे टाकून ओप्राचा कार्यक्रम अधिक प्रेक्षक बघू लागले होते.

दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या लोकप्रियतेचा परिणाम असाही झाला की, चक्क स्टीव्हन स्पिलबर्गने तिला आपल्या ‘द कलर पर्पल’ नावाच्या सिनेमामध्ये भूमिका दिली. ओप्राने अर्थातच ती केली आणि या पहिल्याच सिनेमासाठी तिला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या अॅकडमी पुरस्कारासाठी नामांकनही मिळालं.

१९८५-८६मध्ये तिच्या कार्यक्रमाची तुफान लोकप्रियता लक्षात घेऊन तो देशभर सिंडिकेट व्हायला लागला. १२० चॅनेल्सवरून तो दिसू लागला. त्याचं नावही बदलण्यात आलं. आता हा टॉक शो ‘दी ओप्रा विन्फ्री शो’ म्हणून प्रसारित होऊ लागला. पहिल्याच वर्षी या कार्यक्रमाने १२५ दशलक्ष डॉलर्स एवढं उत्पन्न मिळवलं होतं. आणि त्यातले तीन कोटी डॉलर्स ओप्राचे होते. त्याहून अधिक कोटी चाहते तिला लाभले होते. ओप्राचं वय तेव्हा ३० होतं. पाचेक वर्षापूर्वी याच काळात तिच्या डोक्यात आत्महत्येचे विचार घोळत होते. केवढा बदल झाला होता या पाच वर्षांमध्ये!

पैसा वाहू लागला आणि ओप्राने टेलिव्हिजन कार्यक्रमाच्या निर्मितीसाठी लागणारी यंत्रसामग्री विकत घेतली. जागा घेतली आणि आपल्या स्वत:चा स्टुडिओ स्थापन केला. या स्टुडिओचं नाव तिने ठेवलं- हार्पो. ओप्राचं स्पेलिंग उलट लावलं की, त्याचं होतं हार्पो. अमेरिकेच्या एंटररटेनट इंडस्ट्रीमध्ये स्वत:चा स्टुडिओ बांधणारी ओप्रा ही केवळ तिसरी बाई. मेरी पिकफोर्ड आणि ल्युसिल बॉल या आधीच्या दोघी. ओप्रामध्ये व्यवसाय करण्याचीही हुशारी होती, हे लवकरच सिद्ध झालं. आपल्या कार्यक्रमाची लोकप्रियता वापरून तिने त्या कार्यक्रमालाच व्यावसायिक रूप दिलं आणि त्यातून कोट्यवधी डॉलर्स ती आज मिळवतेय. अमेरिकेतली सर्वांत श्रीमंत कृष्णवर्णीय बाई म्हणून तिचं नाव घेतलं जातंय. १९८९मध्ये तिने एका लघुमालिकेची निर्मिती केली. त्यात तिने कामही केलं होतं. मालिकेचं नाव होतं- ‘द वमुन ऑफ ब्रुस्टर प्लेस’. त्यानंतर १० वर्षांनी तिने आणखी एका मालिकेची निर्मिती केली- ‘द वेडिंग’.

१९९१ साली ओप्राने यु. एस. सेनेट ज्युडिशिअरी कमिटीसमोर आपल्या बालपणी झालेल्या लैंगिक शोषणाची साक्ष दिली आणि अशा शोषणाविरुद्ध मोहीम सुरू केली. परिणामी त्याच वर्षी नॅशनल चाईल्ड प्रोटेक्शन अॅक्ट बनला, ज्याच्या अंतर्गत अमेरिकेतल्या बाल लैंगिक शोषण केल्याच्या गुन्ह्याखाली शिक्षा झालेल्यांच्या नावांची एक यादी बनली. दोन वर्षांनी डिसेंबर महिन्यात तेव्हाचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिन्टन यांनी ‘ओप्राज बिल’चं रूपांतर कायद्यामध्ये केलं. लैंगिक शोषण झालेल्या मुलांसाठी ओप्राने जे काम सुरू केलं, ते अजूनही थांबलेलं नाही. केवळ पैसाच नव्हे तर अशा कामासाठी ती आपला वेळही द्यायला तयार असते. नव्हे तो देतेही.

याचा अर्थ ‘द ओप्रा विन्फ्री’ शो सुरू झाल्यापासून त्याची सतत चढती कमान राहिलेली आहे असंही नाही. १९९४ नंतर काही काळ ओप्राच्या या कार्यक्रमाच्या लोकप्रियतेला आहोटी लागू लागली. डोनाह्यू काय किंवा ओप्रा काय, सनसनाटी निर्माण होईल, असे विषय निवडतात आणि आपला कार्यक्रम लोकप्रिय करू पाहतात, अशी सज्जड टीका त्यांच्यावर याच काळात होऊ लागली. वयाची चाळिशी येत होती. आपली कारकिर्द संपली का, असाही विचार ओप्राच्या मनात येत होता. पण हे हार मानणं तिच्या मनाला कसं पटावं? त्यातून बाहेर पडण्यासाठीही तिने एक युक्ती केली. आपल्याच टॉक शोमध्ये तिने ‘आर टॉक शोज बॅड’ असा विषय घेतला आणि त्यावर चर्चा घडवून आणली.

ज्या विषयांना टीआरपी जास्त मिळतो, ते विषय टॉक शोजमध्ये हाताळले जातात, असं चर्चेला आलेल्या पाहुण्यांचं आणि प्रेक्षकांचं मत पडलं. चांगले, गुणवत्ता असलेले विषय कोणी सहसा हाताळू मागत नाही, अशी टीकाही झाली. लोकप्रिय टॉन शोजमधून समाजोपयोगी विषय घेतले, तर त्याची खूप चांगले परिणाम पाहायला मिळतील, असा सूर लागला आणि ओप्राने तिथल्या तिथे जाहीर करून टाकलं की, यापुढे ती असेच विषय तिच्या कार्यक्रमात घेईल. यापुढे आपला कार्यक्रम हा लोकांच्या भल्याचा विचार करूनच आखण्यात येईल, त्यांच्या आयुष्यात काहीतरी बदल घडवण्याच्या उद्देशानेच करण्यात येईल अशी प्रतिज्ञा तिने केली.

‘न्यूज यू कॅन यूज’ ही संकल्पना ती वापरू लागली. मुलांचं अपहरण करणं कसं सोपं झालंय आणि त्यापासून आपण कशी सावधगिरी बाळगायला हवी किंवा आरोग्याच्या दृष्टीनं कधी काळजी घेणं गरजेचं आहे किंवा कोणत्या रोगांपासून कसं सावध राहावं, यासारखे विषय तिच्या कार्यक्रमातून घेतले जाऊ लागल. परिणामी सुरुवातीला काही काळ तिच्या कार्यक्रमाचं रेटिंग पडलं. पण म्हणून लगेच डगमूगन न जाता तिने अशाच प्रकारचे विषय अधिक सोपे आणि रंजक करून कसे सादर करता येतील, यासाठी प्रयत्न सुरू केले. हळूहळू ओप्राच्या कार्यक्रमांचे प्रेक्षक पुन्हा तिच्याकडे परतू लागले. कर्मा, आत्मिक समाधान अशा विषयांची गर्दी वाढू लागली आणि ओप्रावर धार्मिक असल्याचा आरोप व्हायला लागला. ओप्रा आता प्रयोग करण्याएवढी धाडसी झाली होती.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

१९९७ साल उजाडलं, तेव्हा ओप्राचा कार्यक्रम फक्त अमेरिकेमध्ये रोज दीड ते दोन कोटी प्रेक्षक पाहत होते, तर १३२ हून अधिक देशांमध्ये तो प्रसारित व्हायला लागला होता. १९९६ साली ‘टाइम’ नियतकालिकाने जगातील प्रभाव पाडणाऱ्या २५ व्यक्तींमध्ये ओप्राचा समावेश केलेला होता. ‘दी ओप्रा विन्फ्री शो’ला आतापर्यंत २५ एमी पुरस्कार मिळालेले आहेत. आणि त्यापैकी सात सर्वोत्कृष्ट होस्ट म्हणून केवळ ओप्राला मिळालेले आहेत. अमेरिकेतले अनेक प्रतिष्ठित पुरस्कार ओप्राने मिळवलेले आहेत.

याच सुमारला ओप्राने आणखी एक वेगळेपणा आपल्या कार्यक्रमात आणला. तिने एका बुक क्लबची सुरुवात केली. महिन्यातून एकदा ती आपल्या शोमध्ये एका पुस्तकाची चर्चा घडवून आणू लागली. ताबडतोब हे पुस्तक बेस्ट सेलर्सच्या यादीत स्थान मिळवू लागलं, हे वेगळं सांगायलाच नको. अमेरिकन लायब्ररी असोसिएशनने तेव्हा ओप्राने एकहाती अमेरिकेतील वाचक वाढवले, असं म्हणून ओप्राची पाठ थोपटली होती. आता, या क्लबसाठी निवडण्यात आलेले बहुतेक लेखक हे लहान असताना एकलकोंडे होते आणि त्यांनी पुस्तकांमध्ये आपला मित्र शोधला होता, हा योगायोग म्हणायचा की आणखी काही?

ओप्राला आता आपल्या कार्यक्रमाच्याही पलीकडे जाऊन काहीतरी करायची ओढ लागली असावी. आपल्या लोकप्रियतेचा जास्तीत जास्त उपयोग करण्याचा विचार तिच्या मनात तरळू लागला आणि तिने ‘ओप्राज एन्जल नेटवर्क’ची स्थापना केली. या संस्थेद्वारे ती लोकांना काही वेळा स्वत:पलीकडे पाहा आणि गरजूंना मदत करा, असं आवाहन करते. गेल्या आठ वर्षांत या संस्थेने २५ लाख डॉलर्स जमवलेले आहेत. त्यातून गरजू विद्यार्थ्यांच्या कॉलेजच्या स्कॉलरशिप्सची सोय झालीय, सुमारे २०० ह्यूमॅनिटी होम्स उभी राहिली आहेत. 

ओप्राचा कार्यक्रम आजसुद्धा तितकाच लोकप्रिय आहे. ओप्रा नावाचं वादळ अजूनही शांत झालेलं नाही. चित्रपट, टीव्ही, मासिक, सामाजिक काम करणाऱ्या संस्था, वेबसाईट... विविध माध्यमांमधून तिचा संचार अव्याहतपणे चालू आहे.

‘असामान्य’ - मीना कर्णिक

अक्षर प्रकाशन, मुंबई

मूल्य - २०० रुपये.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शेतकऱ्यांपासून धोरणकर्त्यांपर्यंत आणि सामान्य शेतकऱ्यांपासून अभ्यासकांपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा ‘ज्वारी’कडे वळवण्यासाठी...

शेती हा बहुआयामी विषय आहे. त्यातील एका विषयांवर विविधांगी अभ्यास करता आला आणि पुस्तकरूपाने वाचकांसमोर मांडता आला, याचं समाधान वाटतं. या पुस्तकात ज्वारीचे विविध पदर उलगडून दाखवले आहेत. त्यापुढील अभ्यासाची दिशा दर्शवणाऱ्या नोंदी करून ठेवल्या आहेत. त्यानुसार सुचवलेल्या विषयांवर संशोधन करता येईल. ज्वारीला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणकर्त्यांनी धोरणात्मक दिशेने पाऊल टाकलं, तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.......

म. फुले-आंबेडकरी साहित्याकडे मी ‘समाज-संस्कृतीचे प्रबोधन’ म्हणून पाहतो. ते समजून घेण्यासाठी ‘फुले-आंबेडकरी वाङ्मयकोश’ उपयुक्त ठरणार आहे, यात शंका नाही

‘आंबेडकरवादी साहित्य’ हे तळागाळातील समाजाचे साहित्य आहे. तळागाळातील समाजाचे साहित्य हे अस्मितेचे साहित्य असते. अस्मिता ही प्रथमतः व्यक्त होत असते ती नावातून. प्रथमतः नावातून त्या समाजाचा ‘स्वाभिमान’ व्यक्त झाला पाहिजे. पण तळागाळातील दलित, शोषित व वंचित समाजाला स्वाभिमान व्यक्त करणारे नावदेखील धारण करता येत नाही. नव्हे, ते करू दिले जात नाही. जगभरातील सामाजिक गुलामगिरीत खितपत पडलेल्या समाजघटकांचा हाच अनुभव आहे.......

माझ्या हृदयात कायमस्वरूपी स्थान मिळवलेला हा सीमारेषाविहिन कवी तुमच्याही हृदयात घरोबा करो. माझ्याइतकंच तुमचंही भावविश्व तो समृद्ध करो

आताचा काळ भारत-पाकिस्तानातल्या अधिकारशाही वृत्तीच्या राज्यकर्त्यांनी डोकं वर काढण्याचा आहे. अशा या काळात, देशोदेशींच्या सीमारेषा पुसून टाकण्याची क्षमता असलेल्या वैश्विक कवितांचा धनी ठरलेल्या फ़ैज़चं चरित्र प्रकाशित व्हावं, ही घटना अनेक अर्थांनी प्रतीकात्मकही आहे. कधी नव्हे ती फ़ैज़सारख्या कवींची या घटकेला खरी गरज आहे, असं भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतल्या विवेकवादी मंडळींना वाटणंही स्वाभाविक आहे.......