अजूनकाही
“I personally do not understand why religion should be given this vast, expansive jurisdiction, so as to cover the whole of life and to prevent the legislature from encroaching upon that field. After all, what are we having this liberty for? We are having this liberty in order to reform our social system, which is so full of inequities, discriminations and other things, which conflict with our fundamental rights.” - Dr. B. R. Ambedkar
सध्या राज्य आणि देशभरात भोंग्यांवरून ‘राज’कारण तापले असताना मुंबईच्या चेंबूर आणि राज्यातील अन्य काही भागांत मात्र १४ एप्रिल २०२२ रोजी, भीमजयंतीच्या रॅलीत मशिदीत अजान सुरू झाल्यावर आंबेडकरी समाजाने ‘मुस्लीम समाजसुद्धा आपलाच’ असल्याची घोषणा करत, ‘डीजे’ बंद करून आपली सहिष्णुता व्यक्त केली. भारतीय संविधान आणि त्यातील मूल्यांवर विश्वास ठेवणारा आंबेडकरी समाज नेहमीच आपल्या विवेकाचा परिचय देत आला आहे. केवळ हिंदू-मुस्लीम या ‘बायनरी’मध्ये विचार न करता आंबेडकरी समाज शोषित-वंचितांच्या लढ्यात संविधान आणि शांततेच्या मार्गाने सोबत राहिलेला आहे. समकालीन परिप्रेक्ष्यात असा विवेक अत्यंत महत्त्वाचा असून कोणताही धर्म-संदर्भ हा इतरांच्या अधिकारांवर बंधने घालणारा नसावा, याची काळजी एक नागरिक म्हणून आपण सर्वांनी घेणे महत्त्वाचे ठरते.
..................................................................................................................................................................
.................................................................................................................................................................
भारतीय समाज प्रस्थापित धर्म आणि त्याच्या संकुचित तत्त्वांनी बंदिस्त झाल्याचे दिसते. इथला जाती आणि लिंग भेदभावांचा प्रश्न हा केवळ भौतिक प्रश्न नसून त्याला प्रस्थापित धर्म आणि त्याच्या तत्त्वज्ञानाने जन्म दिला आणि शोषणावर आधारित अशी व्यवस्था पोषित व्हावी, यासाठी प्रयत्न केले. याच बृहद प्रयत्नांचा भाग म्हणून अनेक प्रथा-परंपरांची निर्मिती करण्यात आली. याच भूमिकेतून धर्माला सामूहिकतेचे रूप देऊन त्याचे पालन समाज-संगत करण्याचा प्रयत्न झाला आहे.
या देशातील दलित, बहुजन, आदिवासी या धर्मव्यवस्थेचे कधीही भाग नसले, तरी त्यांना या मूलभूत बंदिस्त व्यवस्थेत इच्छा नसतानाही बंदिस्त होण्यावाचून पर्याय उरला नाही. त्यातून नंतरच्या काळात ज्या सामाजिक सुधारणा चळवळी निर्माण झाल्या, त्यांचा आधार धर्म- सुधारणा चळवळी राहिल्याचे दिसते. त्यातून ज्या धर्मात आपणास स्थान नाही, साधे मानवाधिकार नाहीत, त्यामुळे वेगळ्या धर्माची वाट का चोखाळू नये, हा विचार एत्तदेशीय समाजाने केला. तेव्हा जे तत्कालीन पर्याय त्यांच्या समोर होते, त्यांची वाट धरण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यात संतांच्या धार्मि- सामाजिक क्रांतीचा प्रयत्न हा मूलगामी होता.
मध्ययुगीन काळात इस्लामसारख्या धर्मांचा जो काही प्रचार-प्रसार झाला, तो केवळ आणि केवळ सत्ताकारण आणि तलवारीच्या जोरावर झाला, असे म्हणता येणार नाही. सामाजिक-धार्मिक भेदभाव आणि हिंदू धर्मातील जातीप्रश्न आणि शोषणास कंटाळून येथील लोक व काही समाज घटक इस्लामच्या वाटेवर चालण्यास प्रवृत्त झाले. या आणि अन्य कारणांनी सनातनी प्रवृत्तीच्या लोकांना हे आपल्या धर्मावरील अतिक्रमण वाटणे स्वाभाविक होते. हे आणि सत्ताकारणाचे अनेक प्रश्न हिंदू-मुस्लीम द्वंद्वात्मकतेस जन्मास घालणारे ठरले.
..................................................................................................................................................................
उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...
हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal
................................................................................................................................................................
अर्थात भारतीय समाजाचा मूलभूत प्रश्न हिंदू-मुस्लीम हा नसून तो अधिक व्यापक आहे. थोडक्यात सांगायचे तर तो संविधानिक नैतिकतेचा प्रश्न आहे. जाती, वर्ण, वर्ग, धर्म, लिंग, भाषा या आणि अशा अनेक भेदभाव व शोषणाची बृहद परंपरा असलेल्या आपल्या देशाची मूलगामी धारणा भारतीय संविधानाशी विसंगत असल्याने मूलभूत प्रश्नांना हात न घालता, केवळ भावनिक आणि संकुचित प्रश्नांना पुढे करत आपल्या पोळ्या भाजणे हेच बहुसंख्य राजकीय पक्षांच्या अजेंड्यावर राहत आले आहे. आणि इथली प्रस्थापित माध्यमेही ब्राह्मण्यवादी, भांडवली व पुरुषसत्ताक व्यवस्थेचा हस्तक असून ती जनकेंद्रहीन मुद्द्यांनाच हवा घालण्याचा प्रयत्न करतात. त्यात सामान्य लोक मात्र भरडले जातात.
अलीकडच्या काळात मशिदींवरील भोंग्यांचा प्रश्न असाच पुढे आला असून एका राजकीय पक्षाच्या नेत्याने ‘जर हे भोंगे बंद झाले नाहीत, तर आम्ही स्पीकरवर हनुमान चालिसा वाजवू’ अशी भूमिका घेतली आहे. त्यातून पुन्हा एकदा हिंदू-मुस्लीम तेढ निर्माण होण्याजोगे वातावरण तयार होते आहे. त्यातून जर दंगे घडले, तर त्याची जबाबदारी सर्वस्वी हा नेता आणि त्याच्या पक्षाची असेल. मात्र तरीही एक जबाबदार भारतीय नागरिक आणि समाज म्हणून आपण नेमकी काय भूमिका घेणार आहोत, हे महत्त्वाचे आहे.
मुळात, या देशातील आंबेडकरी समाजाने नेहमीच व्यापक संविधानिक मूल्याधिष्ठित समाज निर्मितीची भूमिका घेतली आहे. त्यामागे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे तात्त्विक अधिष्ठान आहे. त्यामुळे कोणत्याही शोषणवादी धर्माचे समर्थन न करता ‘जो धर्म स्वातंत्र्य, समानता, बंधुता आणि न्याय जोपासतो, तोच खरा धर्म’ असल्याचे आंबेडकरी प्रतिपादन या समाजाने उपयोजनात्मक मानले आहे.
दलित बहुजन आणि उपेक्षित समुदायाच्या जीवनपद्धती आणि उपयोजानाचा गाभा हा नेहमीच स्वाभिमान, घटनात्मक हक्क, आपली कर्तव्ये आणि मूल्याधारित राहिला आहे. त्यातून केवळ धार्मिक तेढ निर्माण करण्याच्या राजकारणावर अडकून न राहता व्यापक भूमिका घेण्याचा प्रयत्न या समाजाने केला आहे. मुळात आंबेडकरांनी धर्म या संकल्पनेचा विचार अत्यंत गांभीर्याने केला असून त्यास महत्त्वाचे सामाजिक अंगही मानले आहे. धर्माशिवाय मानवी जीवन आणि सामाजिकतेची व्यापक कल्पना करणे शक्य नसल्याचे प्रतिपादनही त्यांनी केले आहे.
..................................................................................................................................................................
अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5312/Checkmate
..................................................................................................................................................................
मात्र, असे असले तरीही ‘धर्मनिरपेक्षता’ हा आपल्या जीवनाचा मूलाधार असावा, अशीच मांडणी त्यांनी वारंवार केली आहे. ‘धर्मनिरपेक्षता’ हा शब्द जरी सुरुवातीच्या काळात राज्यघटनेत नव्हता, तरीही त्याचा गाभा तोच असल्याचे परखड मत आंबेडकरांनी संविधानसभेत मांडले होते. मात्र, बहुसख्यांक संकुचित धर्मव्यवस्थेचे प्राबल्य असलेल्या देशात धर्मनिरपेक्ष समाज घडण्यासाठी अपेक्षित लोकप्रबोधन आणि त्यानुषंगिक वातावरण निर्माण होणे महत्त्वाचे आहे. आपली शिक्षण आणि अन्य व्यवस्था हा प्रयत्न कितपत करतात, याचे आकलनही या निमित्ताने होणे गरजेचे आहे.
मुळात, जगातील कोणताही विशिष्ट धर्म हा सर्वथा स्वीकारार्ह आणि अनुकरणीय आहे, असे कदापि म्हणता येणे शक्य नाही. त्यातून मूलतत्त्ववादी धर्म आणि त्यांचे अनुयायी आजही संकुचिततेस चिटकून राहिले आहेत. परिणामी आपले धर्मपालन इतरांच्या स्वातंत्र्यास आड तर येत नाही ना, याचा साधा विचारही हे लोक करताना दिसत नाहीत. मग मंदिरांतील घंटा, नऊ- नऊ, दहा-दहा दिवस चालणारे उत्सव, पूजा पाठ यातून होणाऱ्या सार्वत्रिक प्रदूषणापर्यंत आपणास विचार करावा लागेल.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
आंबेडकरांच्या मते असा ‘नॅरो-माइंडनेस’ हा केवळ हिंदू धर्मातच नसून इस्लाम आणि अन्य धर्मांच्या अनुयायांमध्येही कमी-अधिक प्रमाणात अस्तित्वात आहे. मात्र, ज्या वेळी प्रबोधनाची जागा हिंसा आणि विवेकाची जागा मूर्खपणा घ्यायला लागते, त्या वेळी निखळ सम्यक भूमिका घेणे अधिक महत्त्वाचे ठरते. या देशातील दलित-बहुजन-आदिवासी-भटके विमुक्त आणि अन्य शोषित वंचित समुदायाने संयम आणि शांततेची भूमिका घेत भारतीय राज्यघटनेला पूरक वर्तन करण्याचा निर्णय घेतला आहे. कोणतेही वाद घटनेच्या चौकटीत सोडवले जाण्याचा आग्रह, या निमित्ताने व्यक्त होतो आहे. आणि त्याही पुढे जात कोणतेही वाद वा हिंसा आणि संकुचितता यापेक्षा या समाजाने व्यक्त केलेली बंधुतेची भावना महत्त्वाची असून त्यातून आश्वासक वातावरण निर्माण होण्याची आशा आहे.
.................................................................................................................................................................
लेखक कुणाल रामटेके सामाजिक विकास क्षेत्रात कार्यरत आहेत.
kunalramteke.india@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment