प्रा.एन. डी.पाटील यांची प्रदीर्घ मुलाखत ज्येष्ठ अभ्यासक किशोर बेडकिहाळ यांनी २००८ साली सातारा आकाशवाणी केंद्रासाठी घेतली होती. ती आज, १९ एप्रिल २०२२ रोजी सातारा येथे पुस्तकरूपाने प्रकाशित होत आहे. लोकवाङ्मय गृहातर्फे प्रकाशित होत असलेल्या या पुस्तकातील हा एक संपादित अंश...
..................................................................................................................................................................
किशोर बेडकिहाळ : सर, तुमचा जवळपास ८० वर्षांचा जो प्रवास आहे, त्यातली ६० वर्षं जवळपास सार्वजनिक झालेली आहेत. म्हणजे तुमचं नाव आणि महाराष्ट्राची ६० वर्षं हे जवळपास एकाच मापानं मोजता यायला पाहिजे. अशा वेळेला तुम्ही लढाईमध्ये जास्त गुंतला आणि लेखणीकडे तुलनेनं कमी वळलात असं घडलंय?
एन.डी. : हो निश्चितच. कारण लिखाण करायचं तर तुम्हाला टेबलावर बसायला मिळालं पाहिजे. लिखाण काही प्रवासात करता येत नाही. तरीदेखील तरुण होतो, त्या काळात मी माझं ‘संग्राम’ नावाचं साप्ताहिक चालवत होतो. नंतर एकच तसला जोडीदार मला मिळाला तो पन्नालाल सुराणा. पण नंतरच्या कालखंडामध्ये असं झालं आहे की, माझं कार्यक्षेत्र जसं वाढत गेलं, तसं माझ्यावरच्या डिमाण्डसही वाढत गेल्या. त्या वाढत गेल्यानंतर, मी माझी डायरी दाखवली. तुम्हाला असं दिसेल की, माझी बऱ्याच वेळेला कबड्डी चालू असते. आज इकडे जातो, तर उद्या उलट्या दिशेला जावं लागतं. आता परवा मी २४ तारखेला कोल्हापुरातला मोर्चा केला आणि २५ तारखेला औरंगाबादला मोर्चाला गेलो. २६ तारखेला परत मी इथं मीटिंगला आलो. असा उलटासुलटा प्रवास माझा होतो. तो का होतो? तर मी त्या ठिकाणी यावं, अशी अपेक्षा असते कार्यकर्त्याची. एन. डी. आले तर कुणी नाही आलं तरी चालेल, प्रश्न मार्गी लागेल, असं त्याला वाटतं. त्याला निराश करणं मला जड जातं. मग मी शारीरिक कष्टांची पर्वा न करता काही ना काही करून प्रवास करत राहतो.
..................................................................................................................................................................
.................................................................................................................................................................
किशोर बेडकिहाळ : पण हे करत असताना तुमचं वाचन तुम्ही बरंच अपडेट ठेवलेलं आहे...
एन.डी. : वाचन प्रवासात चालतंय हो, लिहिता येत नाही. लिहायला टेबलावर बसावं लागतं. धावत्या गाडीत लिहिता येत नाही. वाचन माझं चालतं. वाचन केल्याशिवाय मला बेचैन वाटतं. त्यामुळे लिखाण मात्र रेंगाळलं आहे. पक्षासाठी म्हणून काही लिखाण केलं असेल तेवढंच.
किशोर बेडकिहाळ : प्रासंगिक त्या त्या वेळेला केलेलं लेखन आहे...
एन.डी. : शेतीमालाच्या प्रश्नावर माझ्या कार्यकर्त्यांचं प्रबोधन करावं म्हणून मी ‘शेतीमालाच्या किमती’ किंवा विठ्ठल रामजींवरची किंवा शिक्षणाच्या प्रश्नावरची पुस्तिका. शिक्षणाच्या प्रश्नावरसुद्धा असंच. १९६७ साली मधुकरराव चौधरींचा आणि माझा संघर्ष झाला. एसएससीची परीक्षा ते दोन स्तरांवर घ्यायला निघाले. एसएससी ऑर्डिनरी आणि एसएससी अॅडव्हान्स. तर अॅडव्हान्स म्हणजे काय तर हायर इंग्रजी, हायर मॅथेमॅटिक्स. ऑर्डिनरी म्हणजे लोअर इंग्लिश आणि लोअर मॅथ्स. पण लोअर इंग्रजी, लोअर मॅथ्स घेणाऱ्या पोरांचं भवितव्य काय, तर झिरो. त्यांना सगळे दरवाजे बंद. अशा परिस्थितीमध्ये अनेक लोकांनी त्याचं समर्थन केलं, मी नाही केलं. या प्रश्नावर मी ठामपणाने उभा राहिलो. अनेकांनी मला दोष दिले. म्हणाले की, आपल्या पोरांची कत्तल होते हो, आपल्या मुलांकरता ही सोपी परीक्षा आहे. मी म्हटलं कशाकरता? दुधाची गरज भागवण्यासाठी अश्वत्थाम्याची आई त्याला पाण्यात पीठ कालवून देत होती, तसं करायचं आहे का? काँग्रेस पक्षानं समाजवाद आणलेलाच आहे. समाजवादाऐवजी समाजवादी धर्तीची समाजरचना. तसं काहीतरी तुमचं. या धर्तीची परीक्षा द्यायची आहे का त्यांना? काय होणार यातून?
त्या वेळेला मी खूप मोठ्या प्रमाणावर आंदोलन केलं. सभा घेत होतो. एकेदिवशी दाजिबा देसाई म्हणाले की, ‘या तुझ्या सभा संपून जातील. काय उपयोग आहे त्याचा? एक दिवस बसून लिहून काढ.’ मग त्यांनी मला दोन दिवस पी. जी. पाटलांच्या घरात कोंडून ठेवलं कोल्हापुरात. त्या वेळेला पी. जी. कोल्हापुरात प्राचार्य होते. मग मी ‘श्वेतपत्रिकेचे कृष्णस्वरूप’ म्हणून पुस्तिका काढली. मी अॅकडेमिशीयन्स नाही, मुळात प्रचारकच आहे. मी याचं सोंग आणत नाही. त्यामुळे माझ्या पुस्तकाचे मथळेसुद्धा समोरच्या माणसाला कळतील असेच असतात.
शिक्षणाच्या प्रश्नावर समाजवादी प्रबोधिनीचे शांताराम गरुड, मधु देशपांडे, पानसरे हे सगळे माझ्या मानगुटीवर बसले आणि शिक्षणावर त्यांनी माझं एक टिपण लिहून घेतलं. ती ८०-९० पानांची पुस्तिका समाजवादी प्रबोधिनीनेच प्रसिद्ध केली. त्या पुस्तिकेचा मथळा आहे- ‘शेवटी हे शिक्षण आहे तरी कोणासाठी?’. माझं निम्मं काम मी मथळ्यातून करतो. त्यामुळे सामान्य माणसाला कळतं हे शिक्षणावरचं टिपण आहे. शिक्षण आहे तरी कोणासाठी, म्हणजे बऱ्याच लोकांसाठी नाही, असा त्याला अर्थ येतो.
..................................................................................................................................................................
उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...
हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal
................................................................................................................................................................
माझ्या ऑडियन्सला टायटलमधन निम्मंअधिक कळालं नाही, तर ते वाचणारच नाहीत. त्याला जेव्हा कळतंय की, हे शिक्षण आहे तरी कोणासाठी म्हणजे एन.डी.नं कोणावर तरी प्रहार केलाय. मग तो वाचतो. ‘आजची शिक्षणव्यवस्था’ असे टायटल असेल तर शिक्षणाविषयी काही तरी लिहिलंय वाटतं, निबंध आहे की प्रबंध आहे काय करायचं? कशाला तो वाचेल. म्हणून माझ्या पुस्तकांचे मथळेसुद्धा हे साधारणपणे असे.
मागे, मी १९६२च्या निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांसाठी पुस्तिका लिहिल्या. ‘समाजविकास योजनेचे वस्त्रहरण’ असा काहीतरी त्याचा मथळा होता. असा मथळा असला की, लोक वाचतात. माझ्या ऑडियन्सच्या मर्यादा, ज्या कार्यकर्त्यांचं मला प्रबोधन करायचं आहे, त्यांची आकलनशक्ती याचा विचार करून मी काही प्रकाशनदेखील काढतो. पण आता काही प्रकाशनांची मला निकड जाणवते.
किशोर बेडकिहाळ : आत्मचरित्राची निकड त्यात जास्त आहे महाराष्ट्रात...
एन.डी. : आत्मचरित्रं फार झाली हो, काय करायचं आत्मचरित्र!
किशोर बेडकिहाळ : ती ज्यांनी काही केलं नाही, त्यांची होती. तुमचा एवढा प्रचंड अनुभव, व्यासंग आणि लढे यांचं शब्दांकन होणं महत्त्वाचं आहे.
एन. डी. : माझं स्वप्न आहे की, या सगळ्या जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये राज्यकर्ते आज बेभान झालेले आहेत. राज्यकर्ते आज लोकांचा विरोध, लोकांची मानसिकता समजून घेण्याच्या मानसिकतेत नाहीत. याचं एकच कारण ते सरळसरळ विकले गेलेले आहेत. ते स्वत: विकले गेल्यानंतर आता ते देश विकायला निघालेले आहेत.
महाभारतामध्ये द्रौपदीनं जो प्रश्न निर्माण केला, तो मला निर्माण करावासा वाटतो. द्रौपदीला जेव्हा दुःशासन केसाला धरून आणतो दरबारामध्ये, त्या वेळेला ती प्रतिकार करते. त्या वेळेला दुःशासन म्हणतो, ‘तू माझी दासी आहेस’. त्या वेळी ती प्रश्न उपस्थित करते- ‘मी तुझी दासी कशी काय होते?’ तेव्हा तो म्हणतो, ‘मी तुला विकत घेतलेली आहे. तुला जिंकलेली आहे आम्ही.’ त्या वेळी ती विचारते, ‘कुणी मला विकलं?’. दुःशासन म्हणतो, ‘हे सगळे तुझे पती पाच बसलेले आहेत यांनी’. तेव्हा ती म्हणते- ‘हे पहिल्यांदा गुलाम झालेत ना, मग या गुलामांना मला विकण्याचं स्वातंत्र्य कुठे होतं? त्यांनी जर पहिल्यांदा मला विकलं असतं, पणाला लावलं असतं - त्यांनी जसं राज्य लावलं - तर त्याला काहीतरी अर्थ होता. ते स्वतः पहिले विकले गेल्यानंतर ते मला कसं काय विकू शकतात?’ ती भर दरबारात हा प्रश्न उपस्थित करते. त्या वेळेला भीष्माचार्य किंवा कुणी काही बोलत नाही. नंतर जेव्हा कुणीतरी भीष्माला जेव्हा विचारतं, तेव्हा भीष्मानं उत्तर दिलं, ‘अर्थस्य पुरुषो दासः’. सगळे पुरुष पैशाचे गुलाम असतात. त्यामुळे इथं सगळे गुलाम म्हणून बसलो आहोत. त्यामुळे आम्ही काही बोललो नाही.’
अशा तऱ्हेची अवस्था आज राज्यकर्त्यांची आहे. राज्यकर्तेसुद्धा आज विकले गेले आहेत आणि ते देश विकायला निघालेत. सगळ्या व्यवस्था, नगरपालिकांच्या हातातली उद्यानं कुणाला तरी द्यायची. नगरपालिकांच्या हातातील जनतेच्या उपयोगाची साधनं तुम्ही तिकडे द्यायला निघालात. हे सगळं आज सरसकट चालू झाले. नद्या विकल्या गेलेल्या आहेत. २३ कि.मी. लांबीची नदी छत्तीसगडमध्ये विकली गेली. सोनी रेल्वे एंटरप्राइझेसने ती विकत घेतली. तिथं त्यांनी आता एक यांत्रिक बोट ठेवली आहे. या यांत्रिक बोटीतून ते गस्त घालतात. दोन्ही बाजूला घाट आहेत, त्यावर आता माणसं पाणी भरायला, धुणी धुवायला येऊ शकत नाहीत. अशा तऱ्हेने समाजाच्या अस्तित्वासाठी, जीवनासाठी जी साधनं लागतात, ती आज राज्यकर्ते विकायला निघालेले आहेत.
..................................................................................................................................................................
अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5312/Checkmate
..................................................................................................................................................................
मच्छीमार आता उद्ध्वस्त होतो आहे. त्यांच्या लाकडी होड्या, त्यांनी होणारी मच्छीमारी आता कुणाच्या पासंगाला पुरणार? तिथं मोठमोठे ट्रॉलर्स येताहेत. ते माशांची अंडी उद्ध्वस्त करताहेत. त्यामुळे मच्छी पैदास कमी व्हायला लागलेली आहे. परिणामी मच्छीमारांची उपासमार सुरू आहे.
आदिवासी संघर्ष करतोय. त्यांच्या अंगावरही आज खूप मोठं संकट आलेलं आहे. ज्या जमिनी आदिवासींना मिळणार आहेत, म्हणून आम्ही संघर्ष करतोय, त्या त्यांना मिळायच्या वेळेलाच दुसऱ्या कंपन्या त्यावर अतिक्रमण करताहेत. आदिवासींच्या चळवळींमध्ये काम करणाऱ्यांवर सरकार दडपशाही करतेय. म्हणजे आज वंचितांच्या, उपेक्षितांच्या प्रश्नांना हात घालणाऱ्या कार्यकर्त्यांवर हात उगारण्यापर्यंत राज्यकर्त्यांची मजल गेली आहे.
अशा वातावरणामध्ये मला असं दिसतं की, जरी आमच्या चळवळी वेगवेगळ्या पक्षांच्या राहुट्यांमध्ये विभागलेल्या गेल्या असल्या, तरीदेखील याला एक झालर आहे. काळ्या ढगाला एक चंदेरी झालर असावी तशी. ती अशी आहे की, आता हे सारे आदिवासी एकत्र येताहेत. सारे मच्छीमार एकत्र येताहेत. गायरानावर आक्रमण केलेले दलित एकत्र येताहेत. शेतकरी-शेतमजूर एकत्र येताहेत. ते कमी संख्येनं एकत्र येत असतील, पण आता शेतमजूर-शेतकऱ्यांच्या मधली जागृती वाढायला लागली आहे.
या लढ्याला जर सर्व राजकीय पक्षांनी आपली थोडीशी ताकद लावली आणि विशेषत: मघाशी मी म्हटले, सर्वांत उपेक्षित जे वर्ग आहेत, त्यांचे भिजत पडलेले प्रश्न आम्ही टोकाला आणण्यासाठी ताकद लावली, तरी एक वातावरणनिर्मिती होईल. त्या वर्गांना एक मायेची ऊब, एक दिलासा मिळेल.
अरे, माझ्या प्रश्नासाठी मलाच लढलं पाहिजे असं नाही आहे. माझ्या प्रश्नासाठी लढणाऱ्या अजून दुसऱ्या काही शक्ती आहेत. ज्यांची मदत मला उपकारक ठरावी. त्यादेखील तो प्रश्न घेऊन लढू शकतात. तर या दृष्टीनं मला असं दिसतं की, हे सारे वर्ग जर एकत्र आले, तर एक चांगली शक्ती राज्यकर्त्यांच्या विरोधात उभी राहू शकेल. राज्यकर्त्यांनी जागतिकीकरणाच्या दिशेनं टाकलेली पावलं आत्मनाशाची, विनाशाकडे नेणारी आहेत.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
ज्या लोकांनी मधल्या काळामध्ये इतिहासाचा शेवट झाला, तत्त्वज्ञानाचा शेवट झालाय म्हणून सांगितलं, त्यांनादेखील आता दिसतंय की, सोव्हिएत रशियामध्येसुद्धा थोडंफार शहाणपण घेऊन तेच नेतृत्व उभे राहिल्यानंतर पुतिनला मेजॉरिटी मिळाली आहे. ज्या ठिकाणी मार्क्सवादी तत्त्वज्ञानाचा लोकांनी अव्हेर केला, तिथेच आता एक वर्ग त्याचा फेरविचार करतो आहे. ही चांगली लक्षणं आहेत.
म्हणून चळवळी करणाऱ्या माणसानं यशाची अपेक्षा न करता आपलं कर्तव्य म्हणून लढण्याची भूमिका घेतली, तर मला स्वत:ला असं वाटतं की, काही अवघड नाही.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment