२०२२-२३ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी क्रिप्टोकरन्सीला कायदेशीर मान्यता देण्याची घोषणा केली नाही, पण या चलनाच्या खरेदी-विक्रीतून आणि इतर सर्व आभासी मालमत्तांच्या उत्पन्नावर ३० टक्के कर घोषणा करून त्यांनी अप्रत्यक्षपणे त्याला संमती दिली आहे. थोडक्यात त्यांनी या चलनाची निर्मिती, धारणक्षमता, विक्री आणि व्यवहार यांसारख्या सर्व प्रक्रियेला मान्यता दिली आहे. त्यांनी रिझर्व्ह बँकेकडून सीबीडीटी (सेंट्रल बँक डिजिटल करन्सी) म्हणजेच डिजिटल रुपया जारी करण्याची योजनाही जाहीर केली आहे. क्रिप्टोकरन्सी हे जरी पूर्णपणे वेगळे चलन असले तरी त्याची तुलना कोणत्याही डिजिटल चलनाशी होऊ शकत नाही.
आपल्या दैनंदिन व्यवहारातली देवाण-घेवाण फक्त डिजिटल पद्धतीने होते. त्यात आपल्या चलनाचे स्वरूप एकच म्हणजे रुपया वा डॉलर वगैरे असते. पण क्रिप्टोकरन्सी हे चलन वेगळे आहे. त्याच्या सुरक्षिततेसाठी गुप्त कोड असतात. ते सुरक्षित ठेवले जातात. तसेच हे चलन ज्यांचे आहे, त्या चलनधारकाची ओळख गुप्त ठेवली जाते. गुप्त कोडिंगच्या या प्रक्रियेला ‘क्रिप्टोग्राफी’, तर या चलनांना ‘क्रिप्टोकरन्सी’ म्हणतात. एका वेबसाइटच्या म्हणण्यानुसार, जगभरात अशी सुमारे १३,००० चलने व्यवहारात आहेत. त्यापैकी ‘बिटकॉईन’ची चर्चा सर्वाधिक आहे. आभासी चलनाच्या या बाजारात ‘इथेरियम’, ‘बिनन्स’, ‘कॉर्नाडो’, ‘टेथर’, ‘XRP’, ‘डोजीकॉइन’, ‘पोल्काडॉट’ यांसारखी चलनेही मोठ्या प्रमाणावर वापरली जातात.
..................................................................................................................................................................
.................................................................................................................................................................
हे चलन कोणत्याही टांकसाळीत छापलेले नसते. ते मोठ्या संगणकांद्वारे जटिल अल्गोरिदम (गणित समस्या सोडवण्यासाठी वापरली जाणारी नियमांची प्रणाली) सोडवून तयार केले जाते. त्याच्या निर्मितीच्या या प्रक्रियेला ‘मायनिंग’ म्हणतात. ‘मायनिंग’ करणारे हे ‘मायनर’ क्लिष्ट गणिती कोडी सोडवतात. या प्रक्रियेत ते पुढील संभाव्य अंदाज लावण्यासाठी संगणकाच्या नेटवर्कचे अल्गोरिदम वापरतात. अशा प्रत्येक हालचालीमुळे साखळीने बांधलेल्या व्यवहारांचा एक ब्लॉक तयार होतो. तो त्या गाठीच्या मागील ब्लॉकशी जोडलेला असतो. म्हणून त्याला ‘ब्लॉकचेन’ म्हणतात.
कोडे सोडवल्यावर ‘मायनर’ला ठराविक संख्येने आभासी नाणी (जसे की बिटकॉइन) बक्षीस दिली जातात. ही कोडी टप्प्याटप्प्याने अधिक क्लिष्ट होत जातात. या चलनांची उपलब्धता त्यांच्यासाठी बनवलेल्या नियमांनुसार कृत्रिमरित्या मर्यादित असल्याने, त्यामुळे ‘मायनिंग’ करणाऱ्या आणि खरेदी करणाऱ्यांचे डोळे त्यांच्या किमती वाढण्याकडे लागलेले असतात.
बिटकॉइन जारी करण्याची मर्यादा २१ दशलक्ष ठेवण्यात आली आहे. ती २०४०पर्यंत पूर्ण होणार आहे. त्यामुळे बाजारात या बीटकॉइनच्या अधिकाधिक चलनामुळे, त्याच्या किमतीतील वाढ त्याची मागणी वाढण्यावर अवलंबून असते. यामुळे त्याच्या किमतींमध्ये मोठ्या प्रमाणात चढ-उतार होत राहतात. मे २०१०मध्ये एका बिटकॉइनची किंमत सुमारे $२८,०००च्या तुलनेत फक्त १ सेंट (१०० सेंट = १ डॉलर) होती. मात्र १४ एप्रिल २०२१ रोजी एका बिटकॉइनची किंमत $६४,८००वर पोहोचली.
क्रिप्टोकरन्सीच्या समर्थकांचे म्हणणे आहे की, हे चलन पूर्णपणे प्रामाणिक, पारदर्शक आणि सुरक्षित आहे. केवळ एवढेच नव्हे तर सर्व व्यवहार कोणत्याही प्रमाणात, कोणत्याही संस्थात्मक नियमांपासून मुक्त ठेवणे हा याचा उद्देश आहे. या चलनाच्या धारकांनी वापरलेले तंत्रज्ञान त्यांचे संरक्षण करते. ब्लॉकचेन तंत्रज्ञान विश्वसनीय आहे. त्यामध्ये डेटा सुरक्षित राहतो आणि तो शोधण्यायोग्य आहे. समर्थकांच्या दृष्टीने, हे चलन केवळ पैशाच्या व्यवहाराचे विकेंद्रीकरण करत नाही, तर त्याचे ‘लोकशाहीकरण’ही करते.
खरं तर समर्थक ज्याला क्रिप्टोकरन्सीची शक्ती म्हणतात, त्याचे व्यवस्थापन विकेंद्रित आणि समुदायाद्वारे व्यवस्थितपणे केले जाते. त्यातून या चलनाच्या व्यवहारांची पडताळणी करून त्याचे प्रामाणिक ऑपरेशन सुनिश्चित केले जाऊ शकते. पण याच बाबीला त्याचे टीकाकार ‘कमजोरपणा’ मानतात. त्यांचे म्हणणे आहे की, मध्यवर्ती बँकेसारखी कोणतीही संस्था हे चलन जारी करत नाही किंवा इतर कोणत्याही संस्थेद्वारे त्याची मध्यस्थी केली जात नाही किंवा त्यात देशाचा हस्तक्षेपही नसतो. कोणताही देश, कोणतेही सरकार किंवा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियासारखी कोणतीही संस्था त्यावर नियंत्रण ठेवू शकत नाही. या चलनाने एकदा बाजारात प्रवेश केल्यानंतर ‘मागणी आणि पुरवठा’ या नियमानुसार त्याची किंमत वाढते किंवा कमी होते. याचे ऑनलाइन व्यवहार आणि हस्तांतरणे संगणक आणि मोबाइल ॲप्स आणि वॉलेटद्वारे होतात.
क्रिप्टोकरन्सीजचे एक बलस्थान हे आहे की, ते प्रेषक आणि प्राप्तकर्त्याची ओळख उघड न करता, जगाच्या एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात सहज स्थलांतरित केले जाऊ शकते. या कारणास्तव पैशाच्या व्यवहारासाठी जगभरातील विविध गुन्हेगारी जगतामध्ये हे चलन खूप लोकप्रिय आहे.
..................................................................................................................................................................
उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...
हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal
................................................................................................................................................................
बिटकॉइनची सुरुवातीची वाढ प्रामुख्याने जगभरातील औषध विक्रेत्यांनी ‘सिल्क रोड’ नावाच्या वेबसाइटद्वारे या चलनात व्यवहार केल्यामुळे झाली. बिटकॉइन आणि बेकायदेशीर व्यापार यांच्यातील संबंधाचे अहवाल वारंवार समोर येत असतात. या चलनाचा वापर जगात ‘मनी लाँडरिंग’साठी म्हणजे काळा पैसा पांढरा करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर होत आहे. व्यवहार जवळपास मोफत असल्याने कर टाळण्याचा हा एक पर्याय बनला आहे.
हे चलन सुरक्षित असल्याचा दावा वारंवार केला जातो, पण त्याची अनेकदा मोठ्या प्रमाणात चोरी झाली असून, धारकाच्या चुकीमुळे पाकिटे डिलीट होण्याच्या घटना रोजच्याच झाल्या आहेत. एकदा चोरी झाल्यानंतर चलन परत मिळवण्याचा कोणताही मार्ग उपलब्ध नाही.
दिवसेंदिवस त्याच्या विकेंद्रीकरणाचे आणि लोकशाहीकरणाचे दावेही अधिकाधिक पोकळ ठरत आहेत. या व्यवस्थेची संस्थात्मक रचना अशी आहे की, तिच्यामध्ये अनेक धारकांसह मोठ्या प्रमाणावर पैसा जमा होतो आणि भांडवलशाहीचा जन्मजात रोग, ‘मक्तेदारी’ आणि ‘गरिबीच्या महासागराच्या मध्यभागी समृद्धीची बेटे’ निर्माण करतो. एवढेच नाही, तर या आभासी चलनांचे विपरीत परिणाम पर्यावरणालाही भोगावे लागत आहेत.
जेव्हा प्रथम बिटकॉइन सादर केले गेले, तेव्हा ते सामान्य घरगुती संगणकांवरून काढले गेले आणि त्याचे मायनिंग करणाऱ्यांना $२चे बक्षीस मिळाले. पण आता त्याचे मायनिंग मोठमोठ्या संस्थांद्वारे केले जाते, ज्यात हजारो संगणक काम करतात. १५९ देशांच्या एकूण विजेच्या वापरापेक्षा एकट्या बिटकॉइनच्या मायनिंगसाठी जास्त वीज लागते.
हे चलन २००८च्या आसपास सुरू झाले. त्या वेळी भांडवलशाही ‘सबप्राइम’ संकटाचा सामना करत होती. २०००च्या दशकाच्या मध्यात गृहनिर्माण क्षेत्रातील तेजी, त्यामागील कारण म्हणजे व्याजदर खूपच कमी होते आणि बँकांनी मोठ्या प्रमाणात कर्जे दिली होती. गहाण ठेवलेल्या मालमत्तेचे मूल्य वसूल होण्यासाठी व्याज दर खूप कमी होते. म्हणून या गहाण मालमत्तेचा लिलाव करूनदेखील या कर्जाची वसुली शक्य नव्हती. त्यामुळे रिअल इस्टेटचा फुगा फुटला, जगातील काही मोठ्या बँका दिवाळखोर झाल्या. लाखो लोकांना आपली आयुष्यभराची कमाई गमवावी लागली आणि भांडवलशाही भयंकर मंदीच्या गर्तेत गेली.
एकापाठोपाठ एक मंदीच्या गर्तेत अडकत जाणे, हे भांडवलशाहीचे वैशिष्ट्यच आहे. पण ती प्रत्येक वेळी त्यातून सुटण्याचा मार्ग काढते. मात्र नवा मार्ग पूर्वीपेक्षा मोठ्या भोवऱ्यात घेऊन जातो आणि त्यात भांडवलशाही पुन्हा अडकते ही वेगळी गोष्ट. या वेळी सबप्राइम संकटामुळे नियामक आणि विश्वासार्ह संस्था म्हणून बँकांची विश्वासार्हता धोक्यात आली होती. बँकांसारख्या कोणत्याही नियामक संस्था आणि राज्यासारख्या नियंत्रक संस्थेपासून स्वतंत्र असलेल्या चलनाचा उदय एकाच देशाच्या सीमेपर्यंत मर्यादित नाही आणि ते अधिक विकेंद्रित, अधिक लोकशाही, अधिक पारदर्शक, अधिक गुप्त आणि पूर्णपणे सुरक्षित असल्याचा दावा कितपत खरा आहे, याबद्दल प्रश्न निर्माण होतात. कारण हे चलन दुसर्या नवीन भांडवलशाहीच्या कुबड्यांपेक्षा अधिक काही असू शकत नाही.
स्वतःवरचा एक विश्वास तुटला की, भांडवलशाही दुसर्या भरवशाचे नाव तयार करते आणि आपल्या बळीच्या बकऱ्याला त्या नव्या जाळ्यात अडकवते. पीडिताच्या गळ्यात नवीन फासा पूर्वीपेक्षा अधिक घट्ट होतो. ही प्रक्रिया शतकानुशतके सुरू आहे. पण क्रिप्टोकरन्सीने पुन्हा एकदा भांडवलशाहीचे बुडणारे जहाज २००८च्या मंदीतून वाचवले आणि त्यात नवसंजीवनी ओतली. पण या चलनांच्या वाढीसह भांडवलशाहीने एका नव्या टप्प्यात प्रवेश केला आहे. त्याला ‘अधीर भांडवलशाही’ म्हणता येईल. यामुळे एक नवीन श्रीमंत वर्ग पुढे आला आहे. तो त्यांच्या किमती सतत वाढण्याची अधीरतेने वाट पाहत आहे, जेणेकरून ते भविष्यात आपल्यापेक्षा मोठ्या मूर्खाला हे चलन विकू शकतील.
..................................................................................................................................................................
अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5312/Checkmate
..................................................................................................................................................................
बिटकॉइनची किंमत जसजशी वाढत आहे, तसतसे लोकांमध्ये ती विकत घेण्याचे वेडेपण वाढत आहे. याबाबत लोकांचा कल इतका वाढला आहे की, अमेरिकेमधील सर्वांत मोठ्या क्रिप्टोकरन्सी एक्स्चेंजपैकी एक ‘Coinbase’ने नोव्हेंबर २०२१मध्ये फक्त एका दिवसात एक लाख नवीन खाती उघडली. नवीन खाती उघडण्यास उत्सुक असलेल्या ग्राहकांच्या दबावाखाली एक्सचेंजची संपूर्ण यंत्रणा वारंवार कोलमडत होती. त्याचप्रमाणे डिसेंबरमध्ये ‘ॲपल’ ॲप-स्टोअरवरून बिटकॉइन हे सर्वाधिक डाउनलोड केलेले ॲप होते. काही जण बिटकॉइनबद्दल अत्यंत विश्वासनीय असणाऱ्या ‘हायपर बिटकॉइनायझेशन’च्या स्थितीची अपेक्षा करत आहेत. त्यांच्या मते बिटकॉइन संपूर्ण जागतिक वित्तीय प्रणाली ताब्यात घेईल आणि इतके शक्तिशाली होईल की, ते डॉलरसह जगातील सर्व चलने नष्ट करेल. मग सर्व व्यवहार बिटकॉइनवरच चालतील.
अशा प्रकारे, हे लोक पारंपरिक सरकारांना मागे टाकण्यासाठी बिटकॉइनची अपेक्षा करत आहेत आणि एका विकेंद्रित आर्थिक प्रणाली निर्माण होण्याची अपेक्षा करतात, जी कोणत्याही संस्थेद्वारे व्यवस्थापित केली जाणार नाही.
क्रिप्टोकरन्सीच्या टीकाकारांमध्ये वॉरेन बफे यांच्यासारख्यांचा समावेश आहे. ते त्याला ‘उंदराचे औषध’ म्हणतात. खरं तर, या चलनाचे कोणतेही आंतरिक मूल्य नाही. ही एक गैर-उत्पादक मालमत्ता आहे. त्याचा वास्तविक उत्पादनाशी काहीही संबंध नाही. फक्त त्याला मागणी असल्यानेच त्याचा व्यवसाय केला जात आहे. कॅसिनोसारखा एक प्रकारचा जुगारच आहे. शक्य तितका नफा मिळवण्यासाठी त्याचा मुक्तपणे आणि आनंदाने वापर केला जात आहे.
खरे तर एखाद्या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्यापूर्वी लोक त्या कंपनीचे आणि तिच्या उत्पादनांचे विश्लेषण करतात. स्टॉक ब्रोकर, शेअर गुंतवणूकदार, व्यापारी आणि तज्ज्ञ हे त्या कंपन्या, त्यांचे व्यवसाय मॉडेल, त्यांच्या मूल्यांकनाचा अभ्यास करत राहतात आणि अशा समभागांच्या याद्या तयार करतात. त्या अभ्यासाद्वारे त्या कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणुकीचा सल्ला दिला जाऊ शकतो. या कारणास्तव, कंपनीच्या शेअर्सचे मूल्य तिच्या आरोग्याशी निगडीत असते आणि त्यानुसारच त्यात चढ-उतार होत असतात. परंतु क्रिप्टोकरन्सीमध्ये असे काहीही नसते. मूल्यमापन तज्ज्ञ आणि व्यवसाय तज्ज्ञांची यामध्ये कोणतीही भूमिका नसते. त्यांच्या किमती जितक्या जास्त राहतील, तितकी त्यांची मागणी बाजारात वाढेल. नवीन लोक त्यांच्याकडे आकर्षित होत राहतात. त्यामुळे किमती आणखी वाढू लागतात. त्याचप्रमाणे कधी-कधी हे चक्रही उलटते आणि बघता बघता किमती झपाट्याने घसरतात. म्हणजेच मागणी कायम ठेवण्यासाठी किमती सतत उच्च राहणे आवश्यक आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी याबाबत सांगितले होते की, ‘यापैकी बहुतेक चलनांचे मूल्य टिकून राहते, कारण बरेच मूर्ख लोक ते खरेदी करण्यास तयार आहेत.’ ही किंमत कंपनीच्या वास्तविक मूल्यांकन आणि कामगिरीशी जुळते की नाही, याच्याशी त्यांना काहीही घेणेदेणे नसते. जेव्हा त्याचे मूल्यांकन वास्तविक मूल्यापेक्षा जास्त असते, तेव्हा त्याला ‘फुगा’ म्हणतात. परंतु आभासी चलनांना कोणतेही आंतरिक मूल्य नसल्यामुळे, त्यांच्या वास्तविक मूल्यमापन किंवा कार्यप्रदर्शनावर अशा कोणत्याही वादाला काही अर्थ नाही. म्हणूनच त्यांना ‘फुगा’ही म्हणता येणार नाही. त्यापैकी कशालाही चांगली किंवा वाईट किंमत म्हणता येणार नाही.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
शेअर मार्केट कोसळत राहते, अशा वेळी स्टॉक एक्सचेंज सर्किट ब्रेकरप्रमाणे काम करते आणि शेअर्सच्या खरेदी-विक्रीला पूर्णविराम देऊन आग पसरणे थांबवते. अनेक आर्थिक संकटांच्या आफ्टरशॉक्सचा प्रभाव अशाच प्रकारे बँका आणि सरकारांद्वारे कमी केला गेला आहे. आतापर्यंत या सर्कसमध्ये धोकादायक उड्या मारणाऱ्या खेळाडूंच्या खाली जाळी टाकली जात होती. परंतु क्रिप्टोकरन्सीचा भांडवलशाहीत वापर वाढत आहे. त्याचे खेळाडू जाळे काढून उडी मारण्यास तयार आहेत. भांडवलशाही आपल्या आजवरच्या प्रवासात सामान्य जनतेला एकातून दुसऱ्या लोभात अडकवून ठेवत आहे आणि त्यांच्या सर्व ठेवी अडकवून टाकत आहे. काठीला बांधलेल्या गाजराच्या मागे धावणाऱ्या गाढवाप्रमाणे मध्यमवर्गीय एक स्वप्न उद्ध्वस्त होताच, दुसऱ्या स्वप्नावर विश्वास ठेवून त्यामागोमाग वाटचाल करतात.
नफा ही भांडवलशाहीची प्रेरक शक्ती आहे आणि लोभ आणि लालसेची संस्कृती ही नफ्याचे अपरिहार्य उप-उत्पादन आहे. या बळावर तो आपला स्वप्नवत व्यवसाय सुरू ठेवतो. आजची कॉर्पोरेट भांडवलशाही देश, सरकार, सैन्य, बँक आपल्या नफ्यासाठी, हव्या त्या प्रमाणात आश्रय घेऊन आपली वासना शांत करत राहते. परंतु अशा परिस्थितीत ही रचना त्याच्या नफ्यात अडथळा ठरू शकते. त्या वेळी तो अनावश्यक असल्याबद्दल वाद घालू लागतो. क्रिप्टोकरन्सी अनुत्पादक आणि बेजबाबदार भांडवलशाहीची चरमसीमा आहे. मोठ्या नफ्याच्या लालसेपोटी सर्व प्रकारच्या आर्थिक नियंत्रणातून बाहेर पडण्याच्या हव्यासापोटी ती निर्माण झाली आहे.
मराठी अनुवाद - कॉम्रेड भीमराव बनसोड
.................................................................................................................................................................
हा मूळ हिंदी लेख ‘अनुत्पादक पूंजी की चरम अभिव्यक्ति’ या नावाने ‘समयांतर’ या हिंदी मासिकाच्या मार्च २०२२च्या अंकात प्रकाशित झाला आहे. मूळ लेखासाठी पहा -
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment