अजूनकाही
१. भारतीय जनता पक्ष पुरस्कृत आमदार प्रशांत परिचारक यांनी काही दिवसांपूर्वी एका जाहीर कार्यक्रमात सीमेवर लढणाऱ्या जवानांच्या पत्नींबाबत बेताल वक्तव्य करून वाढ ओढवून घेतला होता. विरोधकांनी विधानसभेत प्रशांत परिचारक यांना निलंबित करण्याची मागणी उचलून धरली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी आमदार प्रशांत परिचारक यांना फासावर लटकवले असते, असे शिवसेनेच्या प्रवक्त्या नीलम गोऱ्हे म्हणाल्या.
नीलमताई, नका इतक्या इमोशनल होऊ. बाळासाहेब ‘घटनाबाह्य सत्ताकेंद्र’ आणि ‘लार्जर दॅन लाइफ’ होते ते त्यांच्या पक्षाच्या बाबतीत. त्यांनी आदेश काढला आणि कोणी कोणाला फासावर लटकावलं असं काही होत नव्हतं. तसे राजनैतिक आणि नैतिक अधिकार छत्रपती शिवाजी महाराजांनाच होते. शिवाय बाळासाहेबांच्या दृष्टीने एखादा देशद्रोही रातोरात चक्रं फिरून उगवता ताराही बनलेला आढळायचा. तेव्हा, एकदम फासावर नका चढवू कोणाला लोकशाहीत, सत्तेतही आपण दुय्यम भागीदार आहात.
………………………….………………………….
२. भाजप आणि शिवसेना यांनी मिळून जनतेला मूर्ख बनवलं असून भाजपने त्यांना मत देणाऱ्या मतदारांचा घात केला आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे. सत्तेमुळे हे दोन्ही पक्ष कधीच वेगळे होणार नाही असेही ते म्हणाले.
उदाहरणार्थ, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस याच पक्षांचं पाहा. इटालियन अध्यक्ष नकोत, भारतीय अध्यक्ष असायला हव्यात, या राष्ट्रवादी भावनेतून फुटून निघालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने पुढच्याच निवडणुकीत सत्तेसाठी काँग्रेसचा पदर धरलाच. काँग्रेसलाही आपल्या अध्यक्षांचा, तोही गांधी-नेहरू घराण्याच्या वारसदाराचा असा अवमान करणाऱ्या राष्ट्रवादीशी संगत करताना काही गैर वाटलं नाही. शेवटी धर्मनिरपेक्ष शक्तींची एकी म्हणून काही असतं की नाही?
………………………….………………………….
३. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात दाखल केलेल्या दहा कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईच्या अवमान खटल्यात केजरीवाल यांचे वकील राम जेठमलानी यांनी अरुण जेटली यांना अनेक पेचात टाकणारे प्रश्न विचारले. तुमच्या सन्मानाला असा कोणता धक्का बसला आहे, ज्याचे नुकसान मोजता येणार नाही? तुमच्या सन्मानाला लागलेला धक्का हा तुम्ही स्वत:च गृहीत धरलेल्या महानतेशी संबंधित आहे का? तुम्ही स्वत:च्या महानतेबद्दल इतके सांगत आहेत, त्या महानतेचे कोणतेही तार्किक कारण दिसत नाही, अशी फैर जेठमलानी यांनी झाडली. अरुण जेटली म्हणाले, माझ्या सन्मानाचे जे नुकसान झाले आहे, ते पैशांच्या रूपात काही प्रमाणात भरून निघाले आहे. मात्र सन्मानाला धक्का लागल्याने मानसिक तणाव निर्माण झाला आहे. माझी पार्श्वभूमी आणि प्रतिष्ठा लक्षात घेतल्यास मला आणि माझ्या सन्मानाला इतका मोठा धक्का बसला आहे की, त्याची भरपाई केली जाऊ शकत नाही, असा युक्तिवाद जेटली यांनी केला.
बडे बडे लोग, बडी बडी बातें, म्हणतात ते काही खोटं नाही. बाकी आपण सुस्थापित पार्श्वभूमीतून आलेलो असल्याने आपला मोठा सन्मान आहे आणि प्रतिष्ठा आहे, असं जेटली यांनी मानणं आणि तिला एका राजकीय पक्षाचे नेते असल्याने किंवा एका बदनाम खेळातल्या बदनाम संघटनेचे पदाधिकारी असल्याने काही धक्का पोहोचत नाही, हे मानणंही मनोज्ञ व मनोरंजक आहे.
………………………….………………………….
४. ईव्हीएम मशीन हे पराभवाचं कारण असू शकत नाही. पराभव हा पराभवच असतो, असा उपदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या पक्षाला केला असून आपल्या चुका दुरुस्त करून आगामी निवडणुका लढण्यासाठी सज्ज व्हायला हवं, असं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे.
गंमत म्हणजे, पवारांचं बोलणं कधी थेट घ्यायचं नसतं, त्यात बरेच अर्थ असतात, असं आपल्या सोयीने ठरवणारे सोशल मीडियावरचे अस्वस्थ 'भक्त'गण 'बघा बघा, पवारही म्हणतायत की ईव्हीएममध्ये काही घोटाळा नाही,' असे दाखले देताहेत. खरं तर पवारांच्या बोलण्यात गुप्त अर्थ दडलेला असतो, असं मानलं तर या विधानाचे दोन अर्थ निघतात. लवकरच महाप्रचंड ईव्हीएम घोटाळा उघडकीला येईल, असा एक अर्थ असेल; किंवा ईव्हीएमचं विजयतंत्र राष्ट्रवादीलाही अवगत झालेलं आहे, असा दुसरा अर्थ काढता येईल.
………………………….………………………….
५. कानपूरमधील अन्न सुरक्षा आणि औषध प्रशासनाने (एफएसडीए) रेडबुल या एनर्जी ड्रिंकचा मोठा साठा जप्त केला आहे. 'एफएसडीए'ने ऑगस्ट २०१६ मध्ये केलेल्या रेडबुल एनर्जीच्या चाचणीत कॅफिनचे प्रमाण अधिक असल्याचे आढळून आले आहे.
कानपूरच्या या संस्थेने कोणावरही कारवाई केली की पहिला प्रश्न मनात येतो, आता पतंजलीचं काही नवं उत्पादन येतंय की काय? सहसा हा होरा खोटाही ठरत नाही. ही संस्था पतंजलीमध्ये विलीन वगैरे झाली आहे की काय? की सरकारी नोकरी आणि खासगी 'पगारा'चा आपला नेहमीचाच रिलायन्स पॅटर्न?
………………………….………………………….
editor@aksharnama.com
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment