‘धूप आने दो’ : हे पुस्तक एक प्रकारे गुलज़ारांचे आत्मचरित्रच आहे. त्यांच्या अनुभूतीचा समृद्ध अवकाश हे पुस्तक उलगडून दाखवते
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
शंकर विभुते
  • ‘धूप आने दो’चे मुखपृष्ठ
  • Sat , 16 April 2022
  • ग्रंथनामा शिफारस धूप आने दो Dhoop Aane Do गुलज़ार Gulzar ऋतुरंग Ruturang अरुण शेवते Arun Shevte करोना Corona

संगीत, नृत्य, साहित्य, शिल्प या कलांना ‘ललितकला’ म्हटले जाते. ललित कलाकृतीला ‘अमर कलाकृती’ असेही म्हणतात. ही कलाकृती व्यक्ती, स्थळ, काळ निरपेक्ष असते. कितीही काळ लोटला तरी ती जुनी होत नाही. शिवाय ती कलाकृती निर्माण करणारा (जात, धर्म, लिंग) कोण आहे?, तो कुठे राहतो? याचा आणि त्याने निर्माण केलेली कलाकृतीचा काही संबंध नसतो. त्यामुळेच इंग्रजाविषयी आपल्या मनात कितीही चिड असली तरी तरी वर्डस्वर्थ, शेक्सपिअर हे आपल्या गळ्यातील ताईत असतात. पाकिस्तानचा आपण कितीही तिरस्कार करत असलो तरी महंमद इक्बाल यांनी लिहिलेले ‘सारे जहाँ से अच्छा...’ हे गीत आपण नेहमी गुणगुणत असतो.

हे सर्व आपणच करतो असे नाही, तर जगातील सर्वच रसिक अशा कलाकृतींना आणि तिचा कर्ता असलेल्या कलावंताला डोक्यावर घेतात. भारतातही अशा कलावंतांची मांदियाळी खूप मोठी आहे. समकाळातील आणि जगभरात लोकप्रिय झालेला एक गीतकार, कवी, कथाकार, पटकथाकार, चित्रकार म्हणजे कवी गुलज़ार.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

वयाच्या ८६व्या वर्षातही ते सातत्याने लेखन करतात. ‘Work is my first love’ हे त्यांच्या जीवनाचे ब्रीदवाक्य आहे. नातेसंबध जपणं हा त्यांचा स्थायीभाव आहे. ग्रेस, नामदेव ढसाळ, कुसुमाग्रज, कुलबर्गी, संजीवकुमार, ओम पुरी, सत्यजित राय, पंडित रविशंकर, भीमसेन जोशी, यांच्याशी असलेला त्यांचा ऋणानुबंध सर्वपरिचित आहे. यातील अजून एक महत्त्वाचे नाव म्हणजे ‘ऋतुरंग’ या दिवाळी अंकांचे संपादक व प्रकाशक अरुण शेवते.

‘ऋतुरंग’च्या पहिल्या (१९९३) दिवाळी अंकांपासून ते कालच्या अंकांपर्यंत (२०२१) गुलज़ार यांनी त्यात सातत्याने लेखन केले आहे. करोना महामारीच्या काळातल्या अनुभवावर त्यांनी लिहिलेला ‘धूप आने दो’ हा ‘ऋतुरंग’ दिवाळी अंकातील लेख खूप लोकप्रिय झाला होता. आता ‘ऋतुरंग’साठी गुलज़ारांनी लिहिलेल्या सर्व लेखनाचा (कविता, कथा, ललितलेख) साहित्यरसिकांना एकत्रित आस्वाद घेता यावा, यासाठी संपादक अरुण शेवते यांनी ‘धूप आने दो’ हे पुस्तक नुकतेच प्रकाशित केले आहे. हे पुस्तक एक प्रकारे गुलज़ारांचे आत्मचरित्रच आहे. त्यांच्या अनुभूतीचा समृद्ध अवकाश हे पुस्तक उलगडून दाखवते.

प्रस्तुत पुस्तकात गुलज़ारांच्या बालपणातील आठवणी, भारत-पाकिस्तान फाळणीच्या वेळी झालेली जातीय दंगल, मोटार गॅरेजमध्ये काम करताना आलेले अनुभव, चित्रपटाच्या निर्मितीत झालेल्या गमतीजमती, लॉकडॉउन काळात आलेले भीषण अनुभव, मुलींविषयी (बोस्की), नातवाविषयी (समय), पत्नीविषयी (राखी) भावनिक साद-प्रतिसाद, झाडाविषयी असलेले प्रेम, कुत्रा पाळताना आलेला अनुभव, स्वप्नात रमताना सुचलेले गीत, वडिलांच्या (अब्बू) आठवणी, मुलगी प्रसुती होताना घेतलेला वेदनेचा अनुभव... अशा विविधांगी अनुभवांचा आलेख वाचायला मिळतो.

त्याविषयी शेवते आपल्या मनोगतात म्हणतात- “ ‘ऋतुरंग’ दिवाळी अंकातल्या अनेक लेखांमधून तुम्ही तुमच्या अनुभवाचे पदर उलगडले आहेत. ते पदर उलगडताना तुम्हाला अनुभवण्याचे भाग्य मला लाभले. त्यामुळे माझाच मला हेवा वाटतो.” पुस्तक वाचताना ते खरे वाटायला लागते.

चांगले चित्रपट बनवणे ही गुलज़ारांची पहिल्यापासून महत्त्वाकांक्षा होती. त्याविषयी त्यांचे मत फार बोलके आहे. ते म्हणतात- “आयुष्याची आपल्याला आलेली समज अभिव्यक्त करणं मी महत्त्वाचं मानतो. भाषा जिथे मौन धारण करते, तिथेच कलेचा जन्म होतो. संगीत, फोटोग्राफी, अभिनय इत्यादी ज्या कला आहेत, त्या मौन धारण करूनच दुसऱ्यापर्यंत पोहचण्याची माध्यम आहेत.” (पृ.४५)

..................................................................................................................................................................

उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअ‍ॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...

हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal

................................................................................................................................................................

आयुष्यात आलेले अनुभव आणि समज यातूनच त्यांनी एकापेक्षा एक दर्जेदार आणि गुणात्मक गाणी दिली. त्यांचे गाणे पटकथेत ओढूनताणून आणलेले दिसत नाही. ‘इजाजत’ या चित्रपटातले -

‘मेरा कुछ सामान, तुम्हारे पास पडा हैं..

सावन के कुछ भीगे भीगे दिन रखे हैं,

और मेरे एक खत में लिपडी रात पडी हैं,

वो रात बुझा दो,मेरा कुछ...’

हे गाणे त्या पटकथेत अविभाज्य भाग बनतेच. शिवाय प्रेक्षकांच्या मनात घर करून बसते.

चित्रपट, गाणी, झाड, कुत्रा, मुलगी, नातू, याविषयी त्यांचे अनुभव जसे मूळातून वाचण्यासारखे आहेत, तसे ‘स्वप्नाविषयी’ असलेले त्यांचे मतही फार बोलके आहेत. त्यांच्या मते ‘स्वप्नातील कहाणी खोटी असेल; स्वप्नात घडलेल्या घटना भले खोट्या असतील, पण स्वप्न खोटं नसतं.’ ‘स्वप्नाविषयी’ त्यांची कविता आपल्या मनात घर करून जाते-

‘खिडकियां बंद हैं, दरवाजे पे भी ताले लगे हैं.

कैसे यह ख्वाब चले आते हैं फिर कमरे के अंदर?

नींद में कोई तो राजन हैं खुला रहता हैं!’

स्वप्न नेहमीच सुखकारक असे असेही नाही, ते कधीकधी खूप भीतीदायक असते. गुलज़ार आठ-दहा वर्षांचे असताना, त्या कोवळ्या वयात त्यांनी फाळणी अनुभवली, जो नरसंहार पाहिला ते कित्येक वर्षे त्यांचा पाठपुरावा करत होता.

गुलज़ार जसे पटकथालेखक आहेत, तसेच ते संवेदनशील मनाचे कवी आहेत. त्यांचे मूळ जन्मगाव दीना (पाकिस्तान)तल्या बालपणीच्या आठवणी, त्या प्रतिमा त्यांनी आपल्या मनाच्या एका कोपऱ्यात जपून ठेवल्या आहेत. त्या गावातून अनेकदा निमंत्रण येऊनही ते तेथे गेले नाहीत. कारण आज बदलेले त्यांचे गाव पाहून पूर्वीच्या त्यांच्या मनात तयार झालेल्या प्रतिमा त्यांना बदलायच्या नाहीत. हे फक्त कवीच करू शकतो.

याचा अर्थ ते कुठे प्रवास करत नाहीत असे नाही. उलट प्रवास करणे हा त्यांचा आवडीचा प्रांत आहे. त्याला ते जगण्याची सवय समजतात. त्यातूनच ‘परिचय’ चित्रपटातील गाणे खूप लोकप्रिय झाले-

‘मुसाफिर हूँ यारो

न घर है ना ठिकाणा

बस चलते जाना...’(पृ.१२८)

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

करोना महामारीच्या काळात संपूर्ण जग बंदिस्त झाले होते. या काळातील त्यांचे अनुभव वाचताना संवेदनशील रसिकांना अंगावर काटा उभा राहतो. करोना जावा म्हणून दिवे लावण्यापासून ते थाली वाजवण्यापर्यंत त्यांनी पाहिलेले क्षण, मजुरांची झालेली केविलवाणी अवस्था, डॉक्टर, पोलीस यांनी जीव धोक्यात घालून केलेली कामे... या सर्व बाबी त्यांनी आपल्या लेखनातून उजागर केल्या आहेत. या काळात त्यांनी केलेले लेखनही नवोदित लेखकांना प्रेरणादायी ठरणारे आहे. प्रस्तुत पुस्तकांत करोनावर आधारित तीन-चार कविता प्रसिद्ध आहेत.

‘शाम तक ये दिन

बासी होने लगता हैं

थोडा सा बचा हुआ,

शराब में उंडेल कर,

घूंट घूंट पीता रहता हूं!’ (पृ.२३२)

थोडक्यात, गुलज़ारांनी करोना महामारीच्या काळात दिलेली ‘धूप आने दो’ची आर्त हाक आपल्याला अस्वस्थ करून जाते.

‘धूप आने दो’ - गुलज़ार

ऋतुरंग प्रकाशन, मुंबई

मूल्य - ३५० रुपये.

..................................................................................................................................................................

लेखक शंकर विभुते मराठीचे प्राध्यापक आहेत.

shankarnvibhute@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

म. फुले-आंबेडकरी साहित्याकडे मी ‘समाज-संस्कृतीचे प्रबोधन’ म्हणून पाहतो. ते समजून घेण्यासाठी ‘फुले-आंबेडकरी वाङ्मयकोश’ उपयुक्त ठरणार आहे, यात शंका नाही

‘आंबेडकरवादी साहित्य’ हे तळागाळातील समाजाचे साहित्य आहे. तळागाळातील समाजाचे साहित्य हे अस्मितेचे साहित्य असते. अस्मिता ही प्रथमतः व्यक्त होत असते ती नावातून. प्रथमतः नावातून त्या समाजाचा ‘स्वाभिमान’ व्यक्त झाला पाहिजे. पण तळागाळातील दलित, शोषित व वंचित समाजाला स्वाभिमान व्यक्त करणारे नावदेखील धारण करता येत नाही. नव्हे, ते करू दिले जात नाही. जगभरातील सामाजिक गुलामगिरीत खितपत पडलेल्या समाजघटकांचा हाच अनुभव आहे.......

माझ्या हृदयात कायमस्वरूपी स्थान मिळवलेला हा सीमारेषाविहिन कवी तुमच्याही हृदयात घरोबा करो. माझ्याइतकंच तुमचंही भावविश्व तो समृद्ध करो

आताचा काळ भारत-पाकिस्तानातल्या अधिकारशाही वृत्तीच्या राज्यकर्त्यांनी डोकं वर काढण्याचा आहे. अशा या काळात, देशोदेशींच्या सीमारेषा पुसून टाकण्याची क्षमता असलेल्या वैश्विक कवितांचा धनी ठरलेल्या फ़ैज़चं चरित्र प्रकाशित व्हावं, ही घटना अनेक अर्थांनी प्रतीकात्मकही आहे. कधी नव्हे ती फ़ैज़सारख्या कवींची या घटकेला खरी गरज आहे, असं भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतल्या विवेकवादी मंडळींना वाटणंही स्वाभाविक आहे.......