अजूनकाही
डॉ.अविनाश निवृत्ती सुपे यांचे ‘ ‘सर्जन’शील’ असे अर्थगर्भ नाव असलेले हे आत्मकथन वाचनीय आहे.
आयआयटीला मिळणारा प्रवेश नाकारून एमबीबीएसनंतर मिळवलेल्या बारा-पंधरा पदव्या, तरुणवयातच मुंबई महापालिकेच्या आरोग्य शिक्षण संचालक पदापासून निभावलेल्या अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या, प्रतिष्ठित बी.सी. रॉय पुरस्कारासह अनेक पुरस्कार, अनेक राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये शोधनिबंध, अनेक जागतिक आणि भारतीय वैद्यकीय संघटनांमध्ये सक्रिय सहभाग, तरीही कायम जमिनीवर पाय ठेवून सामान्य रुग्णांसाठी धडपडणारा हा सुपरस्पेशालिस्ट सर्जन शिक्षकाच्या भूमिकेतही तितकाच एकरूप झालेला आहे.
या आत्मकथनाची मांडणी ‘रम्य ते बालपण’, ‘डॉक्टरकी शिकताना’, ‘नोबल प्रोफेशन’, ‘साथ-सोबत’ अशा छोट्या-छोट्या ४५ लेखांतून उलगडते. बुलढाणा जिल्ह्यातल्या दोन हजार लोकसंख्येच्या वाडीवरून थेट लक्षावधी लोकसंख्या सामावून घेणाऱ्या महानगर मुंबईतील अनुभवांचे तपशील यात आहेत.
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
या पुस्तकाचे ठळकपणे जाणवणारे एक वैशिष्ट्य म्हणजे पानोपानी जाणवणारी सकारात्मकता! वैद्यकीय पेशात, वैद्यकीय शिक्षणव्यवस्थेत- तेही सरकारी व्यवस्थेत, किती खडतर, असंख्य अडचणींच्या अडथळ्यांचे, पदोपदी होणाऱ्या भ्रमनिरासचे असते. ते या व्यवस्थेत काम करणारेच सांगू शकतील, पण त्याचा फारसा उल्लेख न करता घडणाऱ्या चांगल्या गोष्टी, आवश्यक गोष्टी आणि प्रगतिशील गोष्टी यांचे प्रवाही विवेचन वाचणाऱ्यांना उल्हासित करते.
वैद्यकीय पेशा आणि वैद्यकीय शिक्षण या त्यांच्या दोन्ही आवडत्या विषयांचा 3६० अंशातून घेतलेला वेध हे या पुस्तकाचे एक बलस्थान आहे. वैद्यकीय पेशातील शाश्वत मूल्ये, रुग्णसेवेचे मापदंड, रुग्णांच्या उपचारासाठी डॉक्टरांचे समर्पण, हे सगळे त्यांच्या रक्तातच भिनलेले विषय आहेत. त्यांनी स्वतः एकशे पंचवीस वेळा केलेले रक्तदान हा त्याचाच एक भाग.
कुठलेही आत्मचरित्र ‘मी’भोवती घोटाळते. या यशोगाथेतसुद्धा हा ‘मी’ आहे, असे सुरुवातीला वाटले, तरी पण पुढे जातो तसे तो एका त्रयस्थ भूमिकेतूनच शब्दांकित केला आहे, हे कळते. या ‘मी’ने जीवननिष्ठेची, व्यवसायनिष्ठेची, आनंद व्यवस्थापनाची, धाडस जोपासण्याची गुरुकिल्ली वाचकाला दिली आहे, असे वाटते.
रुग्णाच्या भूमिकेतून वैद्यकीय पेशाकडे पाहायचा दृष्टीकोन आणि विद्यार्थ्यांच्या सर्वोत्तम कामगिरीसाठी शिक्षकाची धडपड, या विवेचनात दिसते. आपल्या शिक्षकांच्या प्रती असलेला प्रचंड आदरभाव, मामा डॉ. प्रभाकर कोलते, डॉ.सम्सी, डॉ.रवी बापट, डॉ. भालेराव, डॉ. मनु कोठारी, डॉ. शरदिनी डहाणूकर यांच्या व्यक्तीचित्रणातून जाणवतो. हाच आदरभाव आपल्या कर्मस्थळांविषयीही (जीएस मेडिकल, केईएम, सायन) प्रकट होतो.
रुग्णालय सेवा व्यवस्थापन आणि वैद्यकीय शिक्षण व्यवस्थापन हा बहुतांश तज्ज्ञ डॉक्टरांचा नावडता विषय, पण डॉ. सुपे यांनी त्यात कमालीचा रस दाखवून नावीन्यपूर्ण बदल करण्यासाठी धडपड केली. त्यासाठी जागतिक दर्जाचे प्रशिक्षण आधी स्वतः घेतले व नंतर इतरांनाही दिले. शिक्षक हा निरंतर विद्यार्थी असतो, हे अनेक वेळा वाचलेले वाक्य त्यांचा व्यावसायिक प्रवास वाचल्यावर किती ‘वास्तव’ आहे, हे समजते.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
या आत्मकथनाचा एक भाग एक उत्तम प्रवासवर्णनाची सफरही घडवतो. त्यात सुरुवातीच्या किल्ले-गड चढाईपासून हिमालयातील गिर्यारोहण, जपान, अमेरिका, युरोप आणि अंटार्क्टिका यांची सफर घडवतो. एरियल फोटोग्राफी, म्युझिक थेरपी यात्राही आपल्याला घडते. आपल्या जीवन प्रवासातील आप्तस्वकीयांच्या योगदानाचा उल्लेख आवर्जून केला आहे.
एखाद्या शोधनिबंधाचा समारोप असावा तसे ‘मागे वळून पाहताना’ आणि ‘वैद्यकीय व्यवसाय - एक चिंतन’ हे दोन लेख आपल्यालाही विचार करायला भाग पाडतात. वैद्यकीय विद्यार्थी, वैद्यकीय शिक्षक, नोकरीत आणि खाजगी वैद्यकीय पेशात वापरणारे डॉक्टर्स, यांनी तर हे आवर्जून वाचायलाच हवे, पण स्वतःच्या पेशावर प्रेम करणाऱ्या इतर वाचकांनाही हे आत्मकथन खूप आवडेल.
मुखपृष्ठावरील मांडणीत चित्रकार शिरीष घाटे यांनी फुलपाखरू आणि स्कालपेल ही प्रतीके वापरून ‘सर्जन’ या शब्दाला आणि डॉ.सुपे या व्यक्तिमत्त्वाला अचूक प्रतिबिंबित केले आहे, हे जाणवते.
‘ ‘सर्जन’शील’ - डॉ. अविनाश सुपे
ग्रंथाली, मुंबई
पाने - ३६०
मूल्य - ३५० रुपये.
.................................................................................................................................................................
डॉ.श्रीकांत कामतकर
drkamatkar@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Pradeep Gadgil
Sat , 16 April 2022
उत्तम संतुलित परीक्षण