अजूनकाही
नुकताच मंगेशकर कुटुंबियांच्या वतीनं दिला जाणारा पहिला ‘भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार’ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर झाला आहे. या पुरस्काराची घोषणा करताना उषा मंगेशकर यांनी सांगितलं की, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी लतादीदींना बहीण मानायचे. मोदी जे काम करत आहेत, ते पाहूनच त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे.’ हा पुरस्कारप्रदान सोहळा २४ एप्रिल २०२२ रोजी मुंबईत षण्मुखानंद हॉलमध्ये होणार आहे. त्यानिमित्ताने ‘दीदी आणि मोदी’ यांच्याविषयीचा हा प्रसिद्ध विनोदी लेखक मुकुंद टाकसाळे यांचा जुना लेख... हा लेख ‘मुका म्हणे’ (साधना प्रकाशन, पुणे, २०१५) या पुस्तकातून संपादित स्वरूपात घेतला आहे...
.................................................................................................................................................................
लतादीदींच्या गाण्यांवर गेल्या चार पिढा पोसल्या आहेत. मी जन्मल्यापासून हवेत लताचे सूर गुंजत होते. जन्माला आल्या-आल्या हॉस्पिटलशेजारच्या लग्नाच्या मांडवावर लावलेल्या लाउडस्पीकरवरचे लताच्या गाण्याचे सूर कानांवर पडले, अशी आठवण माझ्यासारखेच खूप जण सांगू शकतील. पण इतक्या बालपणीचं कुणालाच काही आठवत नसल्यानं ही आठवण सांगण्याच्या भानगडीत कुणी पडत नाही. त्या काळात रेडिओचा कान कधीही पिरगळला, तरी लताचं कुठलं ना कुठलं गाणं त्या रेडिओतून बाहेर पडायचं. लताच्या गाण्यानं कधीही भेदभाव केला नाही. जे गाणं अमीर-उमरावांच्या खानदानी रेडिओवर ऐकवलं जायचं, तेच गाणं ‘भारत भुवन’च्या फक्त कटिंगच्या चहावर तासभर बसणाऱ्या गिऱ्हाइकांनाही ऐकायला मिळायचं. जे गाणं पुण्या-मुंबईत ऐकायला मिळायचं, तेच चंद्रपूरला ऐकायला मिळायचं. जे गाणं महाराष्ट्रात ऐकायला मिळायचं, तेच गाणं मणिपूर-इंफाळलाही ऐकायला मिळायचं. भारताच्या कोणत्याही दिशेच्या कोणत्याही कोनाकोपऱ्यात ते गाणं निनादत असायचं.
भौगोलिक सीमा पार करून हे गाणं कुठल्या कुठं पोहोचलेलं होतं. त्या काळात लताचे सूर कानावर पडले नाहीत, असा एकही दिवस नसायचा. तो सूर कानावर पडला की, कृतज्ञतेनं उर भरून यायचा. लताला सांगावं वाटायचं, ‘दीदी, यू मेड माय डे!’. तसाही राष्ट्रीय एकात्मता साधण्यात बॉलिवुडचा फार मोठा वाटा आहे. त्यातला सिंहाचा वाटा हिंदी सिनेमातल्या गाण्यांचा आहे. गाण्याचं श्रेय गीतकार, संगीतकार यांच्याबरोबरच ते सूर लोकांपर्यंत वाहून नेणाऱ्या गायक-गायिकांचंही असतं. मिर्झा गालिब, अमीर खुस्रो यांच्यापासून ते साहिर लुधियानवी, गुलजारपर्यंत साऱ्या गीतकारांचे शब्द हिंदी चित्रपट संगीताने आपल्यापर्यंत पोचवले आहेत. त्याचप्रमाणे भारतातल्या विविध भागांतील संगीतही रोशन, नौशाद, सलील चौधरी, मदन मोहन, एस.डी. बर्मन, जयदेव, शंकर-जयकिशन, लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांसारख्या संगीतकारांनी गेल्या शतकातील पन्नासच्या दशकापासून (किंवा त्याही अगोदरपासून) आपल्यापर्यंत आणून आपल्या परिचयाचं करून दिलेलं आहे. या साऱ्या मंतरलेल्या माहोलाचा कुणी एक प्रतिनिधी निवडायचा झाला तर बहुसंख्य भारतीय लतादीदींची (किंवा आशाबार्इंची) निवड करतील, याविषयी माझ्या मनात शंका नाही.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
................................................................................................................................................................
लतादीदींनी फक्त हिंदी भाषेतच नव्हे, तर साऱ्याच भारतीय भाषांमध्ये गाणी गायलेली आहेत. उर्दूमिश्रित हिंदुस्तानी शब्दांचा लहेजा आपल्या जिभेवर चढवण्यासाठी लता-आशा यांना किती कष्ट घ्यावे लागले असतील! त्याच पद्धतीने दक्षिणेकडल्या तमिळ, मल्याळम, कन्नड, तेलुगू भाषांतील गाणी लीलया गाणं ही सोपी गोष्ट नव्हती. पण हा चमत्कार फक्त लता-आशा यांनीच करून दाखवला आहे. मध्यंतरी ‘ऐ मेरे वतन के लोगो’ या गाण्याला पन्नास वर्षं पूर्ण झाली म्हणून मोदींनी मोठा समारंभ मुंबईत घडवून आणला. त्या समारंभाला दाखवायचं निमित्त तरी ‘शहीद दिना’चं होतं; प्रत्यक्षात तो ‘भाजप-प्रचारदिन’ होता.
पण दीदींच्या ‘पंछी बनूं उडती फिरू’, ‘वो चाँद खिला, वो तारे हंसी’, ‘ओ सजना, बरखा बहार आई’, ‘माई रे’, ‘प्यार किया तो डरना क्या’, ‘आप की नजरों ने समझा’, ‘सुनो सजना... आये दिन बहार के’, ‘आजा रे परदेसी’, ‘रैना बीती जाये’ अशा किती तरी गाण्यांचा असा सुवर्णमहोत्सव, हीरकमहोत्सव साजरा करावा लागेल. म्हणजे मोदींचं सरकार भविष्यात जर आलंच तर पहिली दोन वर्षं रोज हाच कार्यक्रम मोदींना पुरून उरेल. दीदींचं प्रत्येक गाणं म्हणजे भारतीय चाहत्यांसाठी ‘उत्सव’च आहे आणि साऱ्या भारतीयांचा उत्सव एकत्र आला की, आपोआपच प्रत्येक गाणं ‘महोत्सव’ ठरणार.
समजा, पुढे काही कारणांनी जर भारताच्या भौगोलिक सीमा पुसल्या गेल्या, तर एक साधा सांस्कृतिक निकष लावून त्या परत मिळवता येतील. ‘जिथपर्यंत लतादीदींचं गाणं पोहोचलेलं आहे, जिथल्या माणसांना लता मंगेशकर हे नाव ठाऊक आहे; तो भूभाग भारताचा’- असं ठरवायचं. या निकषामुळे हिंदुत्ववाद्यांचं अखंड भारताचं स्वप्नही जाता-जाता पूर्ण होऊ शकेल. कारण हा निकष लावला तर पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान यांचा समावेशही भारतात करावा लागेल. एवढंच काय, कॅलिफोर्नियाचासुद्धा काही भाग भारतात समाविष्ट करावा लागेल. त्यामुळे पाकिस्तान हा देश लतादीदींऐवजी मेहंदी हसन किंवा गुलाम अली किंवा अबिदा परवीन घ्या- आणि सीमा ठरवा, असा आग्रह धरण्याची शक्यता नाकारता येत नाही.
यातला गमतीचा भाग सोडला तर हे खरंच आहे की, संगीताच्या प्रांतात कोणत्याच सीमा आडव्या येत नाहीत. युद्धखोर वृत्तीला इथं मुळातच थारा नाही. गुलजार यांनी मेहंदी हसन आजारी असताना काव्य केलं होतं, ‘बंद आँखो से रोज मैं सरहद पार चला जाता हूँ / मिलने मेहंदी हसन से।’ तेव्हा सुवर्णमहोत्सव, हीरकमहोत्सव साजरा करण्यासाठी लतादीदींचंच गाणं जर निवडायचं असेल, तर ते ‘ऐ मेरे वतन के लोगों’पेक्षाही ‘हम दोनों’मधील ‘अल्ला तेरो नाम / ईश्वर तेरो नाम/ सब को सन्मती दे भगवान...’ हे निवडलं असतं तर अधिक योग्य ठरलं असतं.
..................................................................................................................................................................
अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5312/Checkmate
..................................................................................................................................................................
या गीतात ‘कोई सिख कोई ईसाई, कोई जाट कोई मराठा / कोई गुरखा कोई मदरासी’ अशा यादीत कवी प्रदीपजींनी ‘गुजराती’ हा उल्लेख टाळलेला आहे. आणि मोदींनी ‘नेहरूंनी मुद्दाम माझ्या गुजराती बांधवांविरुद्ध कट करून गाण्यातल्या ‘गुजराती’ शब्द प्रदीपजींना वगळायला लावला’ असा आरोप अजून तरी केलेला नाही.
थोडक्यात म्हणजे, मरणार मराठे व इतर भारतीय आणि लतादीदींच्या सांगण्यानुसार ‘जरा आँखों में पानी’ भरून गहीवर काढणार मोदी आणि मंडळी- असा हा मामला आहे. लतादीदींचं आपल्याला काही समजतच नाही. सर्व धर्मांतल्या लोकांना त्यांचं ‘अपील’ आहे, पण त्यांची उठबस आहे संकुचित विचारांच्या हिंदुत्ववाद्यांच्यात. दीदींना पंतप्रधान हवेत मोदी! सर्व भाषांतल्या भारतीयांना त्यांच्या गाण्याने वेड लावलेलं आहे. पण त्या मात्र रमतात ‘मराठी- मराठी’ खेळणाऱ्या बाळासाहेब ठाकरे किंवा राज-उद्धव यांच्यासारख्या नेत्यांच्यात.
वास्तविक, अशा साऱ्या गोष्टींच्या वर जाणारं त्यांचं गानकर्तृत्व आहे. पूर्वी दिलीपकुमारला राखी बांधतानाचे त्यांचे फोटो दैनिकाच्या पहिल्या पानावर पाहिल्याचं मला आठवतं आहे. पण त्यांना हे मोठेपण नकोच आहे. ‘मी छोटी’, ‘मी छोटी’, ‘मी आपली छोटीच बरी’ असं जणू त्या एका चमत्कारिक अट्टहासाने म्हणत आहेत, असं सारखं वाटत राहतं. लतादीदींना आवडो-नावडो, त्यांची इच्छा असो-नसो; त्या त्यांच्या गाण्यानं भारतीय एकात्मतेचं प्रतीक बनलेल्या आहेत; त्याला त्यांचा नाइलाज आहे आणि आपलाही!
.................................................................................................................................................................
मुकुंद टाकसाळे यांच्या ‘मुका म्हणे’ या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
http://www.booksnama.com/client/book_detailed_view/3459
.............................................................................................................................................
लेखक मुकुंद टाकसाळे प्रसिद्ध विनोदी लेखक आहेत.
mukund.taksale@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment