डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स’मध्ये प्रवेश घेतला, या घटनेला १६ जून २०१६ रोजी १०० वर्षं पूर्ण झाली. त्यानिमित्ताने झालेल्या ‘डॉ. आंबेडकरांची वर्तमान आणि भविष्यातील प्रासंगिकता’ या विषयावर आयोजित चर्चासत्रामध्ये आनंद तेलतुंबडे यांनी केलेल्या मूळ इंग्रजी भाषणाचा हा मराठी अनुवाद...
..................................................................................................................................................................
महात्मा गांधी यांनी एकदा म्हटलं होतं की, डॉ. आंबेडकर इतिहासाला त्यांच्याकडे कधीही दुर्लक्ष करू देणार नाहीत. त्यांच्या मृत्युनंतर जवळपास एक दशकानंतर इतिहासानं त्यांना दुर्लक्षित करण्याचा प्रयत्न केला. आंबेडकरांचे सुपुत्र यशवंतराव आंबेडकर यांनी मध्य प्रदेशातील महुआ ते मुंबई अशी पदयात्रा काढून मार्गावरील गरीब दलितांकडून थोडी थोडी रक्कम गोळा केली आणि त्यामधून डॉ.आंबेडकरांवर ज्या ठिकाणी अंतिम संस्कार करण्यात आले होते, त्या ठिकाणी स्तुपासारखी संरचना असलेले स्मारक बांधले. त्यालाच आज ‘चैत्यभूमी’ असं म्हणतात.
यशवंतराव यांनी असं स्मारक उभारण्यापूर्वी आंबेडकरांच्या नावानं कसलंही स्मारक उभारलं गेलं नव्हतं. आंबेडकरांच्या अनुयायांना १९६४-६५मध्ये देशभर जमीन सत्याग्रह करावा लागला. त्यामध्ये अनेक मागण्या दलितांनी सरकारसमोर ठेवल्या होत्या. भारतीय संसदेमध्ये आंबेडकरांचा पुतळा उभारला जावा, अशीही एक मागणी त्यांनी केली होती. दलितांच्या शक्तीशालित्वाचं ते पहिलं असं निदर्शन होतं. त्याने शासनव्यवस्थेला त्यांच्या मागण्या मान्य करण्यास भाग पाडलं. तथापि, एक प्रक्रिया म्हणून १९६०च्या दशकामध्ये जेव्हा मताचं राजकारण चढत्या क्रमानं स्पर्धात्मक झालं, तेव्हा वसाहतोत्तर शासनकर्त्यांनंतरच्या राजकीय आर्थिक धोरणांचं आनुषंगिक उत्पादन (बायप्रॉडक्ट) अशा स्वरूपात आंबेडकरांना ‘दलितांचे प्रेरणास्थान’ म्हणून महत्त्व मिळवण्यास सुरुवात केली. दलित जनसमूहाला आंबेडकरांच्या आठवणींनी व्याकूळ केलं. दलित नेत्यांनी दलितांचा विश्वासघात केला. या दोन्ही गोष्टींनी या प्रक्रियेला मोठ्या प्रमाणात योगदान दिलं. ही प्रक्रिया एवढी व्यापक झाली आहे की, आज भाजप सरकार आंबेडकरांची स्मारकं उभारण्यासाठी जागा ताब्यात घेण्यास उतावीळ झालं आहे.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
इतिहासानं आंबेडकरांना दुर्लक्षित करण्याबद्दल प्रश्नच नाही. आज आंबेडकर अभ्यासात्मक रितीनं इतिहासावर स्वार झाले आहेत. आज आपण या ठिकाणी ज्या पद्धतीनं ही घटना साजरी करतोय, ते आश्चर्यकारक आहे. इतिहासात अशी कोणती व्यक्ती आहे, ज्याच्या शाळेत किंवा महाविद्यालयात दाखल होण्याच्या घटनेचं, अशा पद्धतीनं स्मरण केलं गेलं होतं? आंबेडकरांशी संबंधित असलेल्या तारखांना व ठिकाणांना स्मारकांचं रूप देण्यासाठी इतिहास असहाय्यपणे अशा तारखा, ठिकाणांना खोदून काढत आहे.
ही एक अत्यंत विलक्षण अशी घटना आहे की, आंबेडकर आपल्यापासून दूर जात असताना त्यांचं श्रेष्ठत्व नवनवीन उंची गाठत आहे. खरोखरच ‘फिनॉमिनन’ हा शब्द आंबेडकरांचं उत्कृष्ट वर्णन करतो. ‘फिनॉमिनन’ म्हणजे विशेषत: नीट आकलन न झालेली निसर्गातील किंवा समाजातील एखादी घटना किंवा एखादं वास्तव. काही वेळेला असं वाटतं की, सगळ्या ऐतिहासिक आणि पर्यावरणीय शक्ती यांनी आंबेडकर नावाच्या या ‘फिनॉमिनन’ला रचण्यासाठी हातमिळवणी केली होती.
महार सैनिकी कुटुंबामधील त्यांच्या जन्मापासून ते त्यांना वेळेवर मिळालेले राजश्रय, वासाहतिक परिस्थिती, त्यांच्या संघर्षासाठीचं राजकीय पर्यावरण (या पर्यावरणास परिस्थितीनं बनवलं होतं), बुद्धिझममध्ये त्यांनी घेतलेला आश्रय आणि अगदी त्यानंतर लगेचच घेतलेला शेवटचा श्वास, हे सगळे घटक आंबेडकरांना रचण्यासाठी एका विशेष नक्षत्रासारखे भासतात.
‘लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स’ इथे जून १९१६मध्ये येण्यापूर्वी आंबेडकरांनी कोलंबिया विद्यापीठामधून एम.ए. आणि पीएच.डी. या पदव्या संपादित केल्या होत्या. आजच्या गुणवत्तेच्या तुलनेत त्यांच्या पदव्या चांगल्या होत्या. कल्पना करू या की, आंबेडकरांच्या ठिकाणी असलेल्या कोणत्याही व्यक्तीस या पदव्या मिळवण्यासाठी त्या परीक्षा व्यवस्थित उत्तीर्ण होण्याची खात्री करणं तार्किक राहिलं असतं. आंबेडकर शिष्यवृत्तीवर चार वर्षांसाठी कोलंबिया विद्यापीठात दाखल झाले होते. परंतु त्याऐवजी त्यांनी मानव्यविद्या विभागात घेतले जाऊ शकणारे जवळपास सगळे विषय घेतले आणि आवश्यक क्रेडिट्सपेक्षाही ५० टक्के अधिक क्रेडिट्स मिळवले. क्रेडिटस् म्हणजे विद्यार्थ्यांने यशस्वी रितीनं पूर्ण केलेला महाविद्यालय किंवा विद्यापीठाचा शिक्षणक्रमातला एखादा भाग. तरीही त्यांनी एम.ए. ही पदवी दोन वर्षांत पूर्ण केली. आणि त्यानंतर एका वर्षाच्या आत पीएच.डी. पूर्ण केली.
त्यांच्या संशोधनासाठीचा विषयदेखील त्यांच्या पार्श्वभूमीपेक्षा फार वेगळा घेतला जाण्याची शक्यता नव्हती. शिष्यवृत्तीसाठीच्या करारानं सर्वसामान्यपणे त्यांच्या अभ्यासाचे विषय निश्चित केले होते; परंतु त्यांनी निवडलेल्या ‘सार्वजनिक वित्ता’ (पब्लिक फायनान्स)चा विशिष्ट विषय एखाद्याला कोड्यात टाकेल. त्यांच्या संपूर्ण अकादमिक कारकिर्दीत देशाच्या हिताशी संबंधित अभ्यासविषय निवडण्याची त्यांची प्रेरणा कोणती होती? आंबेडकरांच्या जीवनातील अशा अनेक कोड्यांत पाडणाऱ्या घटना आहेत- ज्यांची उकल होणार नाही, त्या गूढच राहतील. आंबेडकरांचा अभ्यासातील रस एवढा प्रचंड असतानादेखील या घटना तशाच खुलाश्याशिवाय राहण्याची दाट शक्यता आहे. या अर्थानं ते एक ‘फिनॉमिनन’ म्हणूनच राहण्याची शक्यता आहे.
कोलंबिया विद्यापीठाकडून पीएच.डी. पदवी प्रदान होण्याची वाट पाहत असतानाच ते इंग्लंडला प्रयाण करतात आणि इथं पुन्हा एकदा पदव्युत्तर शिक्षण (एम.एस्सी.) प्राप्त करण्यासाठी विद्यार्थी म्हणून ‘लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स’ या संस्थेत स्वत:चं नाव नोंदवतात. पण कदाचित ते त्यांना पुरेसं न वाटल्यामुळे ते बॉन (Bonn, जर्मनीतील एक शहर )ला जातात आणि अर्थशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी प्रवेश घेतात. शिष्यवृत्तीचा कालावधी संपत आलेला आहे, हे त्यांना माहीत होतं. या सगळ्या गोष्टी एखाद्या परीकल्पनेपेक्षा कमी नाहीत.
अगदी त्यांच्या सार्वजनिक जीवनात त्यांच्या रणनीतीची खोली मोजणं हा मोठा प्रश्नच आहे. दरवेळेला एका नवीन तर्कशास्त्राचा त्यांनी वापर केला. वरवर पाहता त्यामध्ये अनियमितपणाचं प्रतिबिंब पाहायला मिळतं. सातत्य हा गाढवाचा गुण असतो, असं म्हणून त्यास त्यांनी धुडकावून लावलं. सर्वकाळ आंबेडकर शिकत होते, उत्क्रांत होत होते आणि स्वत:ची व्याप्ती वाढवत होते. म्हणूनच त्यांच्या वेगळ्या विधानांच्या किंवा कृतींच्या आधारे पारंपरिक दृष्टीकोनांनी त्यांच्याबद्दल केलेलं आकलन दोषास्पद आहे, असं मी मानतो.
हीच ती पद्धत आहे जी त्यांना कमकुवत बनवते, जेणेकरून शत्रूपक्षाकडून त्यांचं अपहरण केलं जाऊ शकतं किंवा त्यांना हा शत्रूपक्ष स्वत:चे हेतू साध्य करण्यासाठी वापरू शकतो. आंबेडकरांचे अनुयायी अनभिज्ञ आहेत आणि ते त्यांच्या सापळ्यात अत्यंत सहजपणे अडकतात. आपणाला हे समजून घेणं गरजेचं आहे की, आंबेडकरांचं कोणतंही छायाचित्र कितीही काळजीपूर्वक घेतलं तरी ते त्यांचं मर्म किंवा सार प्रक्षेपित करू शकेल असं वाटत नाही... असा प्रयत्न अपयशीच ठरेल.
..................................................................................................................................................................
उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...
हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal
................................................................................................................................................................
आपल्याला आणि भावी पिढ्यांसाठी आंबेडकर एका कल्पना म्हणून उभे आहेत. ते एक विचार म्हणून उभे आहेत. ते एक असा जबरदस्त विचार वा कल्पना आहेत, जी लोकांना मानवांच्या मुक्ततेसाठी काम करण्यास दीपस्तंभासारखी मार्गदर्शन करेल. नाही, ते असा दावा करतील की, सगळे मानव बुद्धिस्ट आहेत.
‘वर्तमान व भविष्यासाठी आंबेडकरांची प्रासंगिकता’ असा या चर्चासत्राचा आशयविषय आहे. मला असं वाटत नाही की, संयोजकांनी - जे स्वत:ला आंबेडकरवादी म्हणून घेतात - हा विषय प्रश्नामध्ये रूपांतरीत केला. मला तर तिथं कुठेही प्रश्नचिन्ह दिसत नाही. एखादा व्यक्ती ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वाच्या प्रासंगिकतेचं मूल्यमापन कसं करू शकेल? या व्यक्तिमत्त्वामधील लोकांच्या हितसंबंधांकडून ही प्रासंगिकता वापरली जाते. हे हितसंबंध या प्रासंगिकतेसाठी बदली म्हणून किंवा तिचे मुखत्यार म्हणून काम करतात. हे काही वस्तुनिष्ठ पुराव्याचा वा दाखल्याच्या संबंधानं लक्षात येईल.
जर एखाद्या व्यक्तीनं असं आकलन स्वीकारलं आणि आंबेडकरांकडे पाहिलं तर एखाद्याच्या हे सहज लक्षात येईल की, आंबेडकर वर्तमानात प्रासंगिक आहेत आणि कदाचित ते भविष्यातदेखील प्रासंगिक राहतील. कारण पुराव्यांची संख्या सातत्यानं वाढत आहे. पुतळ्यांची संख्या, त्यांची चित्रं आणि भित्तीचित्रं, धार्मिक प्रार्थना आणि गाणी, चर्चासत्रं आणि परिषदा, वाङ्मयीन लेखन आणि आंबेडकरांच्या स्मरणार्थ जमणाऱ्या मेळाव्यांचा आकार, या अनुषंगानं या पुराव्यांना लक्षात घेतलं, तर आधुनिक इतिहासात दुसरी अशा प्रकारची, आंबेडकरांच्या अधिक जवळ येऊ शकेल, अशी श्रेष्ठ व्यक्ती शोधणं अत्यंत कठीण होईल.
यामध्ये विरोधाभास असा आहे की, आंबेडकर दोन्ही बाजूनं, म्हणजे शासनकर्त्या वर्गाला, तसंच शासित वर्गाला प्रासंगिक आहेत. शासनकर्त्या वर्गाला या अस्मिता प्रकल्पास पुढे आणावयाचं आहे आणि शासित वर्गाला हा अस्मितेचा प्रकल्प एक मानसिक आनंद देण्याचं काम करतो, त्यांना बेहोष करतो. आता ही वेळ आलेली आहे की, आंबेडकरवादी विद्वानांनी स्वत:ला या सापळ्यात घसरण्यापासून वाचवलं पाहिजे. तसंच त्यांनी जनसमूहांना या अस्मितावादी गटारातून बाहेर काढलं पाहिजे.
आंबेडकरांचं स्मरण झालंच पाहिजे. ते गरजेचं आहे; परंतु आपणाला त्यांच्या अपूर्ण कामांचं स्मरणदेखील करून देणं गरजेचं आहे. आंबेडकरांचे कठीण परिश्रम, त्यांचा निर्धार, त्यांचा आत्मविश्वास, त्यांची श्रम करण्याची व वेळ देण्याची जबरदस्त इच्छा इत्यादी गुणांचा समुच्चय आपल्या तरुण पिढीसमोर आणणं गरजेचं आहे. आपल्या तरुण पिढीसमोर आंबेडकरांचा ‘आदर्श’ आणण्यासाठी त्यांचं स्मरण करणं गरजेचं आहे. हिंदू देवदेवतांच्या ठिकाणी त्यांना बदली म्हणून ठेवता कामा नये. त्यांना स्वत:ला देवतांचा प्रमुख म्हणून पुढे आणता कामा नये.
आपल्याला ही आठवण करून द्यावी लागेल की, आंबेडकर फार मोठे पुरोगामी विचारांचे समर्थक होते. त्यांनी प्रस्थापित समजुतींची चिकित्सा केली. त्यांच्या चिकित्सक वृत्तीला आपल्यामध्ये रुजवण्यासाठी आपल्या रणनीतीला आणि डावपेचांना आकार द्यावा लागेल. मला वाटतं, आंबेडकरांची प्रासंगिकता आंबेडकरांनी काय केलं आहे, यापेक्षा आंबेडकर काय करू शकले नाहीत, यामध्ये अधिक आहे. दुर्दैवानं भूतकाळ रंगवण्यामध्ये आपण आपली विद्वता प्रदर्शित करत असतो. आंबेडकरांनी काय केलं होतं, हे आपण सातत्यानं सांगत असतो, परंतु या प्रक्रियेत आपण हे विसरतो की, त्यांच्याबद्दलची आपली कर्तव्यं पूर्ण करण्यासाठी आम्ही काय करत आहोत?
आंबेडकरांनी दलित समुदायामधील बुद्धिजीवींकडून पुष्कळशा अपेक्षा केल्या होत्या. बुद्धिजीवी वर्गाचं सर्वांत महत्त्वाचं काम काय असेल, तर ते म्हणजे घटनांना समजून घेणं आणि इतरांनी या गोष्टी समजून घेण्यासाठी त्यांना मदत करणं. मानवतेच्या भल्यासाठी मार्ग तयार करण्यासाठी प्रचंड दृढनिष्ठेच्या धाडसासह हे काम बुद्धिजीवींनी करायला हवं. या अशा बुद्धिजीवींच्या चर्चासत्रामध्ये आम्ही हे काम करत आहोत का, हे आपण आपल्याला विचारलं पाहिजे.
..................................................................................................................................................................
अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5312/Checkmate
..................................................................................................................................................................
मला वाटतं, आंबेडकरांनी भविष्याचा वेध घेणारे जे इशारे वा सावधगिरी बाळगण्यासाठी ज्या सूचना दिल्या होत्या, त्यामध्ये त्यांची प्रासंगिकता आहे. त्यांनी दिलेल्या इशाऱ्यांनी भारताला भयभीत केलं आहे. हे इशारे भारताला भुतासारखे छळत आहेत. उदाहरणार्थ, संविधानसभेत त्यांनी दिलेल्या शेवटच्या भाषणांमध्ये हा इशारा दिला होता की, जर राज्यकर्त्यांनी लवकरात लवकर सामाजिक आणि आर्थिक लोकशाही स्थापित केली नाही, तर लोक संविधानसभेनं एवढ्या अथक परिश्रमानं तयार केलेल्या राजकीय लोकशाहीच्या संरचनेला उडवून देतील.
त्यांच्या या भाषणानंतरच्या सहा दशकांमध्ये शासनकर्त्या वर्गाच्या विषयपत्रिकेवरून सामाजिक आणि राजकीय लोकशाहीला पुसून टाकण्यात आलं आहे. आंबेडकरांच्या या भाषणातील द्रष्टेपणाच्या अगदी विरुद्ध गोष्ट अशी झाली आहे की, भारतीय लोकशाहीची भरभराटही झाली नाही व ती नष्टही झाली नाही. खरं सांगायचं तर, ती तिच्या मृतवत छातीसह शिल्लक राहिली आहे.
आंबेडकरांच्या जातीनिर्मूलनासाठी स्वयंघोषित आंबेडकरवाद्यांमध्ये कोणीही भूमिका घेणारं दिसत नाही. त्यांच्यापैकी अनेक जण असादेखील युक्तिवाद करतात की, जातींचं निर्मूलन केलं जाऊ शकणार नाही आणि म्हणून त्यांचं मजबुतीकरण केलं पाहिजे. आंबेडकरांनी अगदी क्रांतिकारकांनादेखील पोथीनिष्ठ दृष्टीकोनाच्या विरुद्ध इशारा दिला होता आणि त्यांना जातींकडे लक्ष देण्यास प्रोत्साहन दिलं होतं. बसगाडी अगोदर सुटते आणि मग कम्युनिष्ट पोहचतात, त्यांची ही नेहमीचीच सवय आहे. आज ते मार्क्सियन रूपक ‘पाया व इमला’ (बेस ॲन्ड सुपरस्ट्रक्चर) या विचारधारात्मक भावातिरेकाच्या पल्याड जाण्याच्या अधिक जवळ आले आहेत. ‘कोणतीच क्रांती जातींच्या निर्मूलनाशिवाय शक्य नाही आणि कोणतेही जातिनिर्मूलन क्रांतीशिवाय शक्य नाही’, या माझ्या एका पुस्तकामधील मताला कम्युनिष्टांनी स्वीकारलेलं आहे. जोपर्यंत भारतात जाती जिवंत आहेत आणि क्रांती भारताला हुलकावणी देईल, तोपर्यंत आंबेडकरांची प्रासंगिकता असणार आहे. दुर्दैवानं हे सर्व कित्येक प्रकाशवर्षं दूर दिसत आहे. वास्तव अत्यंत भयानक आहे.
आंबेडकर ज्या विकलांगपणाविरुद्ध लढले, त्याच्या प्रत्येक प्रकारानं बहुसंख्याक दलित पीडित आहेत. मागील सहा दशकांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पोहचलेल्या आपल्यापैकी दहा टक्के लोकांचा अपवाद वगळता ९० टक्के दलित हे मोठ्या प्रमाणात त्याच ठिकाणी आहेत, जेव्हा आंबेडकरांनी त्यांची चळवळ सुरू केली होती किंवा काही निश्चित निकषांचा विचार करता ते यापेक्षाही वाईट परिस्थितीत जीवन जगत आहेत. तेव्हा त्यांना एक आशेचा किरण होता. आज त्यांना कसलीच आशा नाहीय.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
राष्ट्रीय गुन्हे संशोधन मंडळाने प्रकाशित केलेल्या अलीकडील संख्याशास्त्रानुसार दलितांची दुर्दशा अधिक चांगल्या प्रकारे चित्रित झालेली आहे. दलितांवरील अत्याचाराच्या ४७,००० पेक्षाही जास्त घटनांची नोंद झाल्याचं दिसतं. हे आज एक गीत झालं आहे की, दररोज दोन दलितांची हत्या होतेय आणि पाच दलित स्त्रियांवर बलात्कार होतोय. हा अत्यंत दुर्दैवी विरोधाभास आहे की, ही आकडेवारी आमच्या भाषणांमध्ये जवळजवळ दिसत नाही. शेजारील शाळांमधून दिल्या जाणारं समान दर्जेदार शिक्षण, मूलभूत आरोग्य सुविधा, रोजगार आणि जमीन यांच्या माध्यमातून जीवनाच्या मूलभूत खात्रीबाबत आमच्या लोकांच्या सक्षमीकरणासाठी लागणाऱ्या मूलभूत गुंतवणुकीबद्दल आम्ही कधीही बोलत नाही आणि खरं तर आम्ही आरक्षणाच्या मृगजळापाठीमागे पळत राहतो. आम्ही असंच करावं, असं सत्ताधारी वर्गाला वाटत असतं.
खेड्यात राहणाऱ्या या दुर्दैवी लोकांनी आमच्या प्रगतीची किंमत दिलेली आहे आणि अजूनही ते त्यांच्या रक्त आणि मांसासह ही किंमत देत आहेत, या गोष्टीबद्दल आम्ही अनभिज्ञ आहोत, या भकास वास्तवाकडे पाहण्यासाठी आपणच आपल्याशी पुनर्परिचित होणं हीच आंबेडकरांना खऱ्या अर्थानं सर्वोत्तम आदरांजली आहे.
.................................................................................................................................................................
हा मूळ इंग्रजी लेख https://countercurrents.org या पोर्टलवर २२ जून २०१६ रोजी प्रकाशित झाला आहे. मूळ लेखासाठी पहा -
.................................................................................................................................................................
अनुवाद - प्रा. राजक्रांती वलसे (जालन्याच्या बद्रीनारायण बारवाले महाविद्यालयामध्ये सहयोगी प्राध्यापक)
rajkranti123@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment