अजूनकाही
“If more of us valued food and cheer and song above hoarded gold, it would be a merrier world.” ― J.R.R. Tolkien
संयुक्त राष्ट्रसंघाच्या वार्षिक अहवालानुसार भारताचा आनंदी देशांच्या यादीत १३९वा क्रमांक आहे. २०१३मध्ये १११व्या स्थानावर असणाऱ्या भारताची घसरण चालूच असून, आता आपण अफगाणिस्तान, सोमालियासारख्या सगळ्यात दुःखी देशांच्या यादीत समाविष्ट झालो आहोत. पहिल्या १० सर्वांत आनंदी देशात आशिया खंडातील एकही देश नाही. जपान व चीनसारखी प्रगत राष्ट्रेसुद्धा मानसिक आरोग्य, आनंद यांसारख्या समस्यांशी झुंजत आहेत. वाढलेल्या आत्महत्या बघून २०२१मध्ये जपानने ‘एकटेपणाचा मंत्री’ नियुक्त केला आहे. चीनमध्ये अजूनही चांगले मानसशास्त्रज्ञ उपलब्ध नाहीत आणि चिनी राज्यकर्त्यांच्या राक्षसी महत्त्वाकांक्षा त्यांच्या नागरिकांसाठी डोकेदुखी होऊन बसलेली आहे. जी राष्ट्रे पहिल्या दहात आहेत, ती सर्व प्रगत तर आहेतच, पण निसर्गाची व मानवी हक्कांची जपणूक करणारीही आहेत. या सर्व देशांत स्त्रियांची प्रगती वाखणण्यासारखी आहे.
क्रमांक एकच्या आनंदी देशाची म्हणजे फिनलंडची पंतप्रधान ही ३७ वर्षांची स्त्री आहे. त्यांच्याकडे आता शिक्षण हे ‘युनिसेक्स’ झाले असून ‘जेन्डर पे गॅप’ जवळपास नाही. संयुक्त राष्ट्रसंघ आनंदी देशाची यादी ठरवताना जीडीपी, सामाजिक समर्थन, निरोगी आयुर्मान, निवड करण्याचे स्वातंत्र्य, उदारता आणि भ्रष्टाचाराची धारणा (Real GDP per capita, social support, healthy life expectancy, freedom to make life choices, generosity and perceptions of corruption) या गोष्टींचा विचार करते. सर्वांत आनंदी देशाची यादी बघितल्यास चटकन लक्षात येणार्या गोष्टी म्हणजे स्वछता, नीटनेटकेपणा व सार्वजनिक ठिकाणी असणार्या सुविधा.
या यादीत आपल्यासारखीच अवाढव्य लोकसंख्या असणारा चीन ८२व्या क्रमांकावर आहे. त्याची शहरे (अगदी चित्रात बघितली) भारतातल्या गलिच्छ शहरांपेक्षा नक्कीच बरी वाटतात. ज्या घरात स्वच्छता व टापटीप नाही, त्या घरात कोणाला राहायला आवडेल? राहिले तरी तेथील लोक आनंदी राहतील का? हेच उत्तर भारतीय आनंदी का नाही, या प्रश्नाला देता येईल. हवेच्या प्रदूषणाच्या बाबतीत जगातील पहिल्या दहा क्रमांकात उत्तर भारतातील चार शहरे आहेत. घरात पसारा असेल तर त्या व्यक्तीचे किंवा कुटुंबाचे आरोग्य ठीक नसावे, असा आपण निष्कर्ष काढतो, मात्र अख्ख्या देशातच जर बकालपणा वाढला असेल, तर त्याची मन:स्थिती ठीक नाही, असाच निष्कर्ष निघतो.
भारतीयांना आनंदी राहायला आवडते का, या प्रश्नाचे उत्तर शोधायला गेलो तर काय काय उत्तरे मिळू शकतात?
भारत मधुमेहाची जागतिक राजधानी आहे. लठ्ठपणा, हायपर टेन्शन यांसोबत मानसिक आजार - औदासीन्य (Depression) व चिंता (anxiety) इ. - भारतात सर्वांत मोठ्या प्रमाणावर आढळतात. व्यायामाच्या नावावर टाईमपास करणारे, मानसिक आरोग्य म्हणजे वेडेपणा असे मानणारे, नको त्या नात्यांचा भार (पालक, लग्न, ऑफिस) वाहणारे, स्वातंत्र्य व त्यानुसार येणारी जबाबदारी नाकारत रोजचा दिवस जुगाड करत ढकलणारे, आनंद म्हणजे नक्की काय, हे समजू शकतील काय? जाती-धर्म यांसारख्या गोष्टींना प्रमाण मानत व भावनांना नाकारत रोजचा दिवस काढणारे भारतीय सोशल मीडियावर प्रचंड वेळ घालवण्यासाठी प्रसिद्ध आहेत. प्रत्यक्ष नाती तुटून सोशल मीडियावर आभासी जगात रममाण होणारी भारतीय मंडळी जगात अव्वल क्रमांकावर आहेत.
एका पाहणीनुसार जगातील श्रीमंत देश सोशल मीडियावर कमी वेळ घालवतात. जे देश जास्त वेळ सोशल मीडियावर घालवतात, त्यात भारताचा क्रमांक वरचा आहे.
आनंदी आयुष्यासाठी मोकळी नाती, लैंगिक सुख, मन मोकळे करण्यासाठी मित्र-मैत्रिणी, छंद गरजेचे आहेत, मात्र भारत सर्वच प्रकारच्या नात्यांतील आनंद हिरावून घेण्यासाठी कुप्रसिद्ध आहे. लैंगिक शिक्षण अजूनही नीट नसल्याने व नको ती माहिती इंटरनेटवर उपलब्ध असल्याने स्त्री-पुरुष नाती घाणेरड्या पातळीवर आली आहेत. जाती-धर्माचा अतिरेक असल्याने वेगवेगळ्या प्रकारचे ग्रुप तयार होऊन संशय व भीतीचे साम्राज्य गेल्या काही वर्षांत वाढले आहे. त्या दरीचा वापर करत ‘फोडा व राज्य करा’ सगळीकडे चालू आहे.
रोज सकाळी उठल्यावर वर्तमानपत्रे, सिनेमा व मालिका यातून ज्या पद्धतीच्या नकारात्मक भावना दिसतात, त्या बघितल्यावर कोणाला आनंद होईल? पेन्शनर, निवृत्त मंडळी ज्यांची मुले-मुली परदेशी किंवा दूर आहेत, त्यांना सतावणारा एकटेपणा व त्यातून घडणारे विचित्र प्रकार, हे आजूबाजूच्यांनाही त्रासदायक होतात. जात-धर्म बघून इतरांना दूर ठेवत, मोबाइल/टीव्हीला जवळ करणारे लोक कोणत्याही वयाचे असले तरी एकटे पडतात. पुण्यात अशा घटना घडल्या आहेत, ज्यात काही एकटे वृद्ध मृतावस्थेत आढळून आले. कारण त्यांची मुले परदेशी होती. पैसा असूनही जिव्हाळ्याची माणसे जवळ नसणे यासारखे दु:ख नाही. जगात सर्वत्र एकटेपणाचे प्रमाण वाढले आहे, मात्र भारतात एवढी प्रचंड लोकसंख्या असताना जर आपल्याला मन मोकळे करण्यासाठी माणसे मिळत नसतील, तर नक्कीच आपण आनंदी नाही. अमेरिकेतही काहीशी अशीच स्थिती असून सोशल मीडियाचा अतिवापराने अमेरिकनांच्या आनंदात विरजण पडले आहे.
हे पहा -
गेल्या काही वर्षांत भारतातील आर्थिक विषमता ही वेगवेगळ्या कारणाने वाढली आहे. त्यात करोनाच्या गोंधळाची भर पडली. त्यामुळे कामगार वर्गाचे आर्थिक आरोग्य बिघडले. त्याचा थेट परिणाम सामाजिक, शारीरिक व आर्थिक आरोग्यावर झाला. करोना काळात भारतीय आरोग्य व्यवस्थेचे जे भयावह रूप जगासमोर आले, ते धडकी भरवणारे होते. या सर्व कारणांनी त्रस्त असलेले भारतीय आनंदापासून दूर गेले आहेत. आर्थिक कारणांनीसुद्धा आयुष्यातील समाधान व आनंद कमी झाला आहे.
भारतातील ७० टक्के जनता १५० रुपये रोजंदारीवर आयुष्य काढते आणि ३० टक्के जनता दिवसाला १०० रुपयात भागवते. अशा परिस्थितीत आनंद कुठे शोधावा? आर्थिक विवंचना, जाती धर्माच्या नावावर वाढलेली दरी, त्यातून आलेला संशयीपण व एकटेपणा, सोशल मीडियाचा आधार घेत जगणे, अशा वेगवेगळ्या कारणांनी भारतीयांचा आनंदापासूनचा दुरावा वाढला आहे. सोशल मीडियामुळे तुलना वाढून ईर्ष्या व असूया वाढत आहे.
लोक खूप आहेत, पण नाती नाहीत, ही भारतीयांची शोकांतिका आहे.
भारतात अजूनही पैसा असला की, आनंद येतो असा समज रूढ आहे. त्यामुळे सतत पैशाच्या मागे धावणे आणि त्याच्याशी संबंधित आयुष्याचे आराखडे बांधणे, यामुळे भारतीय छंद व मनोरंजन या दोन्ही गोष्टींमधला फरक समजू शकत नाहीत. क्रिकेट हा आपला राष्ट्रीय छंद आहे, कारण क्रिकेट खेळणे व बघणे, याशिवाय बहुतेक पुरुष मंडळींना दुसरा छंद माहीत नसतो.
भारतीय जर एवढे काम करतात, तर ते जर्मन किंवा जपान्यांच्या बरोबरीचे हवेत ना? कामाची संस्कृती नसलेला आपला देश ‘जुगाडूस्तान’ म्हणून प्रसिद्ध आहे. कामाच्या वेळा न पाळणे, कामाची गुणवत्ता विचारात न घेणे, वेळ मारून नेणे, अशा दुष्टचक्रात अडकलेलो आपण कामातून मिळणाऱ्या आनंदाच्या बाबतीतही कमनशिबीच आहोत. त्यामुळे कर्मचाऱ्यांची कदर न करणे, सरसकट लोकांना काढून टाकणे, कारण काम कोणाहीकडून व कशाही पद्धतीने करून घेता येते, ही भारतीयांची धारणा असते. त्यामुळे भारत कामगारांचे शोषण करण्याच्या बाबतीत कुप्रसिद्ध आहे.
हे पहा -
https://www.vice.com/en/article/k78bwm/india-toxic-work-hustle-office-culture-bosses-pandemic
‘बर्न आऊट’ या मानसिक आजारात अति काम केल्याने व्यक्तीची मानसिक आणि शारीरिक ऊर्जा अकाली संपते. त्याचे प्रमाण भारतीय कर्मचार्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळून आले आहे. हे प्रमाण करोना काळात आणखी वाढले, हे मायक्रोसॉफ्टच्या एका संशोधनानुसार सिद्ध झाले आहे.
मला स्वत:बद्दल काय वाटते, यावर आनंद बऱ्याच प्रमाणात अवलंबून असतो. जात, धर्म, त्वचेचा रंग, आर्थिक परिस्थिती, वैवाहिक स्थिती यावरून लोकांची किंमत ठरवणाऱ्या समाजात ‘स्व’ नेहमीच दुःखी असतो. हा ‘स्व’ लोकांच्या अपेक्षा पूर्ण करताना स्वत:चा आनंद हिरावून बसतो. व्यक्तीचे अस्तित्व काही गोष्टींच्या आधारे ठरवणाऱ्या समाजात बहुतेक जनता दुःखीच राहते. ‘गुण मिळाले तर तू माझा लाडका किंवा लाडकी’, ‘तुला छान नोकरी असेल तर मी तुझ्याशी लग्न करेन’, ‘तुझ्या आई-वडिलांकडून हुंडा आण म्हणजे मी तुला घरात राहू देईल’, अशा अटींवर चालणारी नाती कोणाला सुख देतात?
दारू, सेक्स, सोशल मीडिया, विकत घेतलेले अध्यात्म अशा मार्गांद्वारे भारतीय आनंदाचा कोपरा शोधण्याचा निष्फळ प्रयत्न करत असतात. अशा भावनिक गोंधळात शारीरिक व मानसिक हिंसा वाढली, तर नवल वाटायला नको. अगदी सुशिक्षित म्हणवणारी मंडळी, महाविद्यालयीन विद्यार्थी, वयस्कर लोक यांच्यात शारीरिक पातळीवर येऊन भांडण्याचे प्रमाण वाढले आहे. भांडायला कारण लागत नाही, अशा समाजात शांती, समाधान व त्या अनुषंगाने येणारा आनंद दुर्मीळच होईल.
हे पहा -
https://time.com/collection/guide-to-happiness/4856954/can-money-buy-you-happiness/
आनंदी भावना अनुभवताना मेंदूत बदल होतात. हॅप्पी होर्मोन्स जसे सेरोटोनिन, डोपामिन व ओक्सीटोसीन आपल्या मेंदूला आनंदी ठेवतात, पण ते मेंदूत स्त्रवण्यासाठी चांगल्या सुविधा, सुरक्षित वातावरण, शिक्षण तसेच आरोग्याच्या सोयी, छान नाती आणि समजून घेणारे, स्वीकारणारे लोक असायला हवेत. ते जर नसतील तर तुम्हाला लाखो-करोडो रुपये किंवा सोशल मीडियावरचे लाखो-करोडो अनुसारक (Followers) आनंद देऊ शकत नाहीत.
.................................................................................................................................................................
२०२२चा The World Happiness Report पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा -
.................................................................................................................................................................
लेखिका डॉ. वृषाली रामदास राऊत मानसशास्त्रज्ञ आहेत.
vrushali31@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment