अजूनकाही
संस्कृत-पालीच्या अभ्यासक-प्राध्यापक प्रा. लीला अर्जुनवाडकर यांचं ५ एप्रिल २०२२ रोजी पुण्यात वयाच्या ९०व्या वर्षी वार्द्धक्यानं निधन झालं. त्यांचा जन्म १० जून १९३२चा, पंढरपूरचा. काही वर्षं बारामतीत गेली आणि मग पुण्यात. विद्यार्थिप्रिय प्राध्यापिका असा लौकिक असलेल्या लीलाताईंनी १९५६ ते ९२ अशी जवळपास ३६ वर्षं पुण्याच्या स.प. महाविद्यालयात संस्कृत, पाली या विषयांचं अध्यापन केलं. ७३पासून त्यांनी संस्कृत विभागप्रमुख म्हणून काम केलं, तर १९८०-८३ दरम्यान ग्रंथालयप्रमुख म्हणून. देशविदेशात अनेक ठिकाणी त्यांनी चर्चासत्रं, परिसंवाद यांमध्ये सहभागी होऊन शोधनिबंध सादर केले. पुणे आकाशवाणीवर ४०-४५ वर्षं संस्कृत साहित्यावर भाषणं दिली. तसंच काही श्रुतिकाही सादर केल्या. संस्कृत साहित्याविषयी त्यांनी अनेक लेख लिहिले. त्यातील काही निवडक लेखांचा ‘लीलाकमलपत्राणि’ या त्यांच्यावरील गौरवग्रंथात समावेश आहे. लीलाताईंना त्यांचे जोडीदार प्रा. कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकर यांनी त्यांचं ‘गीतार्थदर्शन’ हे पुस्तक अर्पण केलं आहे. ही मराठीतील एक वैशिष्ट्यपूर्ण अर्पणपत्रिका आहे. तब्बल ४३ ओळींची ही अर्पणपत्रिका एक प्रकारे लीलाताईंचं व्यक्तिचित्रच आहे. त्या अर्पणपत्रिकेमागची आणि त्यानंतरची कहाणी सांगणारा हा विशेष लेख...
.................................................................................................................................................................
ही गोष्ट आहे माझे वडील कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकर (१९२६-२०१३) यांच्या ‘गीतार्थदर्शन’ (१९९४) या ग्रंथाच्या अर्पणपत्रिकेची. माझी आई लीला अर्जुनवाडकर (१९३२-२०२२) आणि वडील कृष्ण श्रीनिवास यांची त्यांच्या विद्यार्थिवर्गात ‘वागर्थाविव सम्पृक्तौ’ अशी प्रतिमा होती. गोष्टही त्यामुळे अपरिहार्यपणे दोघांची आहे.
कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकर १९८६ साली मुंबई विद्यापीठातून निवृत्त झाले. निवृत्तीनंतर विद्यापीठं-संस्था यांच्या भानगडीत (किंवा भानगडींमध्ये) न पडता त्यांनी जे अनेक विद्याविषयक उद्योग (उपद्व्याप?) केले, त्यांमध्ये ‘ज्ञानमुद्रा’ नावाचा माझा मित्र गौतम घाटे याच्याबरोबर १९९०च्या सुमाराला सुरू केलेला संगणक अक्षरजुळणी उद्योगही होता. सुरुवातीला ज्ञानप्रबोधिनीच्या वास्तूत, नंतर दातेवाडीत, आणि शेवटी आनंदाश्रमाच्या वास्तूत स्थित्यंतरं होत होत २०००च्या सुमाराला हा उद्योग बंद झाला. मंगरूळकर-केळकरांची ‘ज्ञानदेवी’ (१९९४), शं. गो. तुळपुळे आणि आन फेल्डहाऊस यांची ‘A Dictionary of Old Marathi’ (१९९९) ही त्यांनी ज्ञानमुद्रेत केलेली अक्षरजुळणीची दोन मोठी कामं. यांबरोबरच त्यांच्या स्वतःच्या ‘मराठी व्याकरणाचा इतिहास’ (१९९२), ‘काव्यप्रकाश’ १-२-३ (१९९२), ‘प्रीतगौरीगिरीशम्’ (१९९३), आणि ‘गीतार्थदर्शन’ (१९९४) या पुस्तकांची अक्षरजुळणीही ज्ञानमुद्रेत झाली.
गीतेचे मराठी अनुवाद पुष्कळ आहेत, पण जुन्या शास्त्रपरंपरेत वाढलेल्या आणि शांकरवेदान्ताचा जन्मभराचा व्यासंग असलेल्या माणसानं केलेला आधुनिक मराठीतला गद्यानुवाद ‘गीतार्थदर्शन’ हा एकमेव असावा. शास्त्राची काटेकोर शिस्त पाळून कुठलाही फापटपसारा-भोंगळपणा न आणता अद्वैत तत्त्वज्ञानाची ओळख करून देणारं त्यांनीच लिहिलेलं विस्तृत प्रास्ताविकही या ग्रंथात आहे.
कृष्ण श्रीनिवासांनी त्यांचं ‘गीतार्थदर्शन’ माझ्या आईला - लीला अर्जुनवाडकर - अर्पण केलं आहे. पण ते अर्पणपत्रिकेत तिचं नाव न घेता. आईनं १९७७च्या ‘ललित’च्या दिवाळी अंकात त्यांच्यावर ‘शांत-संयत-सुजन’ या नावाचा लेख लिहिला होता. तिच्या खास शैलीतला हा लेख आणि त्यांच्या खास शैलीतली ही अर्पणपत्रिका, हे गाण्यातल्या दोन बुजुर्गांच्या सवाल-जवाबांसारखे वाटतात. अर्पणपत्रिका खाली मूळ पानांची प्रतिमा म्हणून जोडली आहे :
पान एक
पान दोन
अर्पणपत्रिका परत अक्षरजुळणी न करता प्रतिमा म्हणून जोडली आहे, कारण कृष्ण श्रीनिवासांनी केलेली मजकुराची दृश्य मांडणीही अर्थपूर्ण आहे. अर्पणपत्रिकेत दिसणाऱ्या त्यांच्या एका लेखनविषयक प्रयोगाचा उल्लेख करणं भाग आहे. त्यांच्याच शब्दांत : “या ग्रंथातल्या मराठी मजकुरात सर्वत्र पदान्तीच्या दीर्घ अकाराचं चिह्न म्हणून त्या त्या अक्षराच्या डोक्यावर पोकळ टिंब - शून्य - दिलं आहे”. उद्धृत केलेल्या मजकुरातही त्यांनी ‘अकाराचं’ आणि ‘दिलं’ या शब्दांमध्ये पोकळ टिंबच वापरले आहे. यासाठीचा युनिकोडपूर्व टंक ज्ञानमुद्रेतच गौतम घाटे यांनी तयार केला होता.
हे सगळं १९९४ मधलं. पुढच्या दहा-बारा वर्षांमध्ये पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं, कृष्ण श्रीनिवासांचं एक मोठं आजारपणही होऊन गेलं.
२००८ साली कृष्ण श्रीनिवासांना कविवर्य मंगेश पाडगावकर यांचं पत्र आलं. हे पत्र ही त्या अर्पणपत्रिकेला मिळालेली अनपेक्षित दाद होती. कृष्ण श्रीनिवासांना जाणकाराची दाद मिळाल्याचा मोठाच आनंद झाला, आणि त्यांच्या तेव्हाच्या पद्धतीप्रमाणे त्यांनी या पत्राच्या दहा-बारा प्रती करून जवळच्या लोकांना देऊन कौतुकही करून घेतलं.
पाडगावकरांचं पत्र स्वयंस्पष्ट आहे. जमलेली मैफल संपली की, संयोजकांनी बोलून रसभंग करू नये, असा संकेत आहे. या पत्राचं किंवा त्या अर्पणपत्रिकेचं ‘रसग्रहण’ करायला गेल्यास रसभंगच होईल. म्हणून ही गोष्ट इथेच संपवतो आहे.
.............................................................................................................................................
mihir.arjunwadkar@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment