आंबेजोगाई येथील भारतीय शिक्षण प्रसारक संस्था संचालित खोलेश्वर महाविद्यालयात शुक्रवार, ८ एप्रिल २०२२ रोजी एक दिवसीय साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. या संमेलनाचे अध्यक्ष लोकप्रिय कवी इंद्रजित भालेराव यांचे हे भाषण...
..................................................................................................................................................................
या साहित्य संमेलनाचे उद्घाटक, स्वागताध्यक्ष, या उद्घाटनाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि समोर बसलेल्या कलावंत रसिक मित्रांनो...
आपण सगळी एका शिक्षण संस्थेत काम करणारी म्हणजेच शिक्षणक्षेत्राशी संबंधित माणसं आहोत. इतर कोणत्याही क्षेत्रात काम करणाऱ्यापेक्षा आपण साहित्याशी अधिक जवळ आहोत. लेखन करणाऱ्यांसाठी हे क्षेत्र सगळ्यात जास्त उपयुक्त आहे. म्हणूनच मीदेखील हेच शेत्र जाणीवपूर्वक निवडलेलं होतं. आयुष्यात मला त्याचा खूप खूप उपयोगही झाला. त्यातल्या त्यात भाषा विषयाचं अध्यापन करायला मिळणं, ही आणखीच भाग्याची गोष्ट. या भाग्याचा मी धनी झालेलो आहे.
मित्रहो, ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त मराठीतल्या चार लेखकांपैकी आपल्या व्यवसायाशी संबंधित तिघेजण होते. कुसुमाग्रज याला अपवाद होते. पण त्यांनी ज्या पत्रकारिता या क्षेत्रात काम केलं, तेही शिक्षणापाठोपाठ साहित्याला जवळ असलेलं आणखी एक क्षेत्र. खांडेकर मराठी शिकवत, तर करंदीकर आणि नेमाडे हे इंग्रजीचे प्राध्यापक होते. आपलं क्षेत्र लेखन करणाऱ्यांसाठी किती उपयुक्त आहे, हे सांगण्यासाठी मी हे ज्ञानपीठाचं उदाहरण मुद्दाम इथं दिलेलं आहे.
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
मित्रहो, या आधी रयत शिक्षण संस्था आणि मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थांनी त्यांच्या संस्थेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची काही संमेलने घेतलेली होती. आता तुमचीही संस्था असा चांगला उपक्रम सुरू करते आहे, याचा मला आनंद वाटला.
मित्रहो, इथं माझ्या सोबत व्यासपीठावर संस्थाचालक बसलेले आहेत आणि समोर तुम्ही कलावंत-कर्मचारीही बसलेले आहात. तेव्हा सुरुवातीला संस्थाचालकांनी लेखक-कलावंतांशी कसं वागावं आणि लेखकानं संस्थाचालकांशी कसं वागावं, याविषयी आपण विचार करूयात. आपल्या विचारांसह संस्थाचालकांना सामोरं जाण्याची धमक कलावंताजवळ असली पाहिजे आणि आपल्या विरोधी विचारांच्या कलावंताला समजून घेण्याची उदारता संस्थाचालकाजवळ असली पाहिजे. कलावंतानं आपल्या कलावंत असण्याचा संस्थेला तोटा होणार नाही, म्हणजे आपल्यामुळे संस्थेचा शैक्षणिक स्तर घसरणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे आणि संस्थाचालकांनी आपल्या संस्थेतल्या कलावंताचा शैक्षणिक स्तर उंचावण्यासाठी जास्तीत जास्त फायदा करून घेतला पाहिजे. संस्थाचालकांनी कधीही आपल्या संस्थेच्या कलावंतांचे जास्तीचे लाड करू नयेत. म्हणजे कलावंत शोभेसाठी सांभाळू नयेत. कलावंत संस्थाचालकांशी, प्राचार्यांशी गप्पा मारत बसला असेल आणि तासिकेचं घड्याळ वाजलं असेल, तर त्याला तासावर जायला सांगितलं पाहिजे. मुळात कलावंतानंच घड्याळ वाजताच आधी उठलं पाहिजे. याउलट संस्थाचालकांनी कलावंताचा जाणीवपूर्वक छळही करू नये.
आपल्या वर्तनानं संस्थेची बदनामी होणार नाही, याची काळजी कलावंतानं कायम घेतली पाहिजे. चांगल्या कलावंतामुळे संस्थेचा नावलौकिक होतच असतो. त्या अर्थानं इतर कर्मचाऱ्यांच्या तुलनेत कलावंत संस्थेचे भूषण असतात, हे संस्थेनं समजून घ्यावं. पण कलावंतानं स्वतः होऊन या भूषणात जाऊ नये. त्यानं प्रामाणिकपणे आपण कर्मचारी आहोत, या जाणीवेनं सतत काम केलं पाहिजे. मी महाविद्यालयात शिकत असताना बासरीवादक दत्ता चौगुले मला शिकवायला होते. त्यांच्या आयुष्यातल्या निरीक्षणावरून मी माझ्याही आयुष्यात काही धडे घेतले, त्याची ही काही उदाहरणं.
मित्रहो, आपले पगार आपल्या आवश्यक गरजा भागवण्यापेक्षा जास्त आहेत. त्यामुळे विद्येच्या क्षेत्रात राहणाऱ्या लोकांना इतर धंदा, व्यवसाय, प्लॉटिंग, ट्यूशन करण्याची गरज नाही. हवं तर विद्यार्थ्यांना मोफत शिकवायला हरकत नाही. प्रत्येक शिक्षक आणि प्राध्यापकाच्या घरी ग्रंथालय असलंच पाहिजे. आपण जो विषय शिकवतो, त्या विषयावरचे मूलभूत ग्रंथ आपल्याकडे असायलाच हवेत. वाङ्मयीन ग्रंथही असावेत. सर्व धर्माचे धर्मग्रंथ आणि काही अभिजात वाङ्मयीन ग्रंथही आपल्या संग्रही असायलाच हवेत.
वर्गाबाहेरचं आपलं वागणं समाजासाठी आदर्श असायला हवं. आपण शिकवतो, त्यापेक्षा आपल्या वर्तनातून विद्यार्थी जास्त शिकत असतात. त्यामुळे आपलं वर्तन आदर्श असायला हवं. आपली वेशभूषा, आपली केशभूषा, आपली भाषा, आपली देहबोली ही सर्वार्थानं आदर्श असायला हवी. विद्यार्थ्यांसाठी थोडीफार पदरमोड करण्याचीही आपली तयारी असायला हवी. अडल्यानडल्या विद्यार्थ्यांना आवश्यक ती मदत आपण नेहमीच करायला हवी. ती प्रचंड व्याजासह आपणाला परत मिळत असते, याची खात्री ठेवा. वेळोवेळी वेगवेगळ्या निमित्तानं विद्यार्थ्यांना आपण सतत पुस्तकं भेट द्यायला हवीत.
आपल्या विषयाव्यतिरिक्त एखाद्या कलेचा छंदही आपणाला असायला हवा. आपल्यामध्ये उत्तम रसिकता असायला हवी. कलांचा आस्वाद घ्यायची सवय असायला हवी. शिक्षकांमध्ये आपापसात मतभेद असतात. ते टिळक आणि आगरकर यांच्यातही होते. पण विद्यार्थ्यांसमोर आपला एकोपा जायला हवा. आपण आपापसात भांडत असू, तर विद्यार्थ्यांनी काय आदर्श घ्यावा? विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक एकोप्याचा संदेश जाईल, असंच आपलं वर्तन असलं पाहिजे.
इतरांपेक्षा भाषेच्या शिक्षकांवर जरा जास्त जबाबदारी असते. त्यांचं वाचन चौफेर असायला हवं. त्यांना श्लोक, आर्या, ओवी, अभंग आणि नव्या-जुन्या कवितांचं भरपूर पाठांतर असायला पाहिजे. विद्यार्थ्यांच्या मनावर भाषाप्रेम रुजवून त्यांना नेमकी भाषाभीव्यक्ती शिकवणं, हे काम भाषा शिक्षकांचं आहे.
..................................................................................................................................................................
उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...
हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal
...............................................................................................................................................................
आपण ज्या गावात राहतो, ते गाव आणि गावातलं वातावरण सुसंस्कृत असेल, तर त्यात आपण अधिकची भर घालायला हवी. तसं वातावरण नसेल तर ते आपण तयार करायला हवं. त्यासाठी गाववाल्यांच्या मदतीनं सांस्कृतिक उपक्रमांचं आयोजन करायला हवं. त्यासाठी पुढाकार घ्यायला हवा. आपल्यासारखे वाचणारे, लिहिणारे, ऐकणारे, रसिकजन आपल्याभोवती निर्माण करणं, ही आपली जबाबदारी असते. आपल्या भोवतालाची उंची वाढवली नाही, तर आपली उंची कोसळू शकते. म्हणूनच निदान आपल्या स्वार्थासाठी का होईना, आपला भोवताल आपण घडवायला हवा.
हे जे सगळं मी सांगतो आहे, ते मी स्वतः केलेलं आहे. असं करणारे महाराष्ट्रात अनेक शिक्षक मी पाहिलेले आहेत. त्यांच्याकडे पाहून मी काही गोष्टी शिकलो आहे. सततच कोण, कुठं, काय चांगलं करतो, त्याच्या आपण शोधात असलं पाहिजे. त्याचं अनुकरण केलं पाहिजे. त्यातूनच आपला भोवताल घडत असतो. आपला भोवताल आपल्या मनासारखा करणं, हे शेवटी आपलंच काम असतं.
आपल्यासमोर वर्गात बसलेले विद्यार्थी सर्व जाती-धर्माचे असतात. त्यांच्या मनात कसलाही अपराधभाव निर्माण होणार नाही, असंच आपलं वर्तन असायला हवं. आपण वर्गात उभे असतो, तेव्हा कुठल्याही जाती, धर्माचे, पंथाचे, विचारांचे, पक्षांचे, संघटनांचे नसतो. वर्गाबाहेर या सगळ्या गोष्टी तुम्हाला चिकटतात. आवश्यकही वाटतात. ते ठीकही आहे. पण आपण वर्गात उभे असतो, तेव्हा पूर्णपणे निरपेक्ष असलो पाहिजे. तेव्हा कुठलंही सापेक्ष वर्तन तिथं आपल्याकडून घडायला नको. मुलांची मनं फार कोवळी असतात. त्यांना हळुवारपणे हाताळायला हवं. विद्यार्थी खोडकर असतातच, पण त्यांना मारल्यामुळे त्यांच्या खोड्या कमी होतात, हा गैरसमज आहे. त्या वाढतच असतात, हे कायम लक्षात ठेवायला हवं. आपल्या हातून एखादा एकलव्य घडणार नाही, याची आपण सतत काळजी घेतली पाहिजे.
मित्रहो, आपण शिक्षणक्षेत्रात काम करतो. प्रत्येकाच्या लेखनाचं एक भावविश्व असतं. तसंच शिक्षणक्षेत्राचंही एक भावविश्व आहे. ते आपल्या लेखनात आलं पाहिजे. थोर लेखक आणि ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त भालचंद्र नेमाडे यांचं सगळं लेखन याच भावविश्वावर आधारित आहे. त्यांच्या सगळ्या कादंबऱ्या शिक्षणाच्या भावविश्वाला साकार करणाऱ्या आहेत. अगदी ‘कोसला’पासून ‘हिंदू’पर्यंत सगळे नायक विद्यार्थी, अध्यापक किंवा संशोधक या नात्यानं शिक्षण व्यवसायाशी संबंधित आहेत. आपल्या भावविश्वाचे इतके बारकावे नेमाडे यांनी टिपले आहेत की, व्यासाच्या ‘महाभारता’सारखं नेमाडे यांच्या साहित्याचं झालेलं आहे. पुढच्या लेखकांसाठी त्यांनी काही शिल्लक ठेवलय का, असा प्रश्न पडावा इतकं आपल्या व्यवसायाचं सर्वांगीण दर्शन त्यांनी घडवलेलं आहे.
रंगनाथ पठारे यांच्याही बहुतेक कादंबऱ्या याच विश्वासावर आधारित आहेत. ‘दिवे गेलेले दिवस’, ‘दुःखाचे श्वापद’, ‘चक्रव्यूह’ या कादंबर्यांतून पठारे सरांनी हे भावविश्व फार चांगल्या पद्धतीनं आणलेलं आहे. अर्थातच नेमाडे असो की पठारे, यांनी यानिमित्तानं अख्खा समाजच कवेत घेतलेला पाहायला मिळतो. राजन गवस, सदानंद देशमुख यांनीही या विषयाला आपल्या लेखनातून स्पर्श केलेला आहे. रमेश इंगळे उत्रादकर यांनी तिरकसपणे या विषयाकडे पाहून धमाल उडवून दिलेली आहे. ‘निशाणी डावा अंगठा’ आणि ‘सर्व प्रश्न अनिवार्य’ या त्यांच्या दोन्ही कादंबऱ्यांतून त्यांनी शिक्षण या विषयातले बारकावे दाखवले आहेत. प्रामुख्यानं तिथले भयाण प्रश्न हाच त्यांनी आपल्या लेखनाचा मुख्य विषय बनवला आहे. ‘सर्व शिक्षा अभियाना’तील थोतांड असो की, परीक्षा पद्धतीतला अविचार असो, हे त्यांनी तिरकस नजरेनं पण फार निर्मळपणे दाखवलेलं आहे.
नागनाथ पाटलांची ‘कोंडनातलं जिनं’, संजय कळमकर यांची ‘सारांश’, बालाजी मदन इंगळे यांची ‘झिम पोरी झिम’ आणि मिलिंद बोकील यांची ‘शाळा’ या आणखी काही महत्त्वाच्या कादंबऱ्यांचीही इथं नोंद घ्यायला हवीच. त्यातल्या ‘शाळा’ने तर सगळ्यांनाच पुन्हा एकदा शाळेत नेऊन बसवलं. या कादंबरीला खूप लोकप्रियता मिळाली आणि तिच्यावर चित्रपटही निघाला.
कथा आणि कवितेतही हे भावविश्व मोठ्या प्रमाणावर आलेलं आहे. त्याचा आढावा घेत बसलं, तर हे भाषण फारच लांबेल. थोडं आधीच पाहायचं झालं, तर व्यंकटेश माडगूळकर यांची ‘बनगरवाडी’ आणि श्री.ना. पेंडसे यांची ‘राजे मास्तर’ या दोन कादंबऱ्यांचा उल्लेख करायलाच हवा. गावाशी एकरूप होणाऱ्या शिक्षकांच्या जीवनावरच्या या कादंबऱ्या मराठी वाचकांना खूप भावून गेल्या. साठ-सत्तर वर्षांपूर्वीच्या या कादंबऱ्या अजूनही मोठ्या प्रमाणात वाचल्या जातात. असे ध्येयवादानं झपाटलेले शिक्षक आजही आपल्या अवतीभोवती वावरत आहेत. ते आपल्या लेखनाचा विषय व्हायला हवेत. त्यांच्यावरही ‘राजे मास्तर’ आणि ‘बनगरवाडी’सारख्या कादंबऱ्या आपण लिहायला हव्यात. गो.ना. मुनघाटे यांची ‘माझी काटेमुंढरीची शाळा’ ही खूप महत्त्वाची कादंबरी आहे. अजूनही असे कितीतरी शिक्षक आहेत की, त्यांच्या आदर्श कथा कुणीतरी कादंबरीत लिहिण्याची वाट पाहत आहेत.
..................................................................................................................................................................
अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5312/Checkmate
..................................................................................................................................................................
शिक्षकांनी लिहिलेल्या साहित्यात शिक्षण क्षेत्रातलंच भावविश्व आलं पाहिजे, असं काही नाही. सर्वच व्यवसायातलं भावविश्व यायला हरकत नाही. पण इतर व्यावसायिकांचं भावविश्व आपणाला अभ्यास केल्याशिवाय साकारता येत नाही, पण आपल्या आपल्या व्यवसायाचं भावविश्व हे आपल्या अनुभवाचा भाग असल्यामुळे ते साकारणं त्यामानानं सहज-स्वाभाविक आणि सोपं असतं. सगळेच संत विठ्ठलाचे भक्त होते, पण प्रत्येकाचा व्यवसाय वेगवेगळा होता. कोणी ब्राह्मण होता, तर कुणी कुणबी, कुणी महार होता, तर कुणी माळी, कुणी चांभार होता, तर कुणी कुंभार, कुणी न्हावी होता, तर कुणी सोनार. म्हणून त्या त्या संतांच्या अभंगात त्यांच्या त्यांच्या व्यवसायातल्या प्रतिमा, प्रतीकं, रूपकं, उपमा, दृष्टान्त आलेले आहेत. आणि हे अगदी स्वाभाविक आहे. तसा आपला व्यवसाय आपल्या साहित्यात डोकावणं अगदी स्वाभाविक आहे.
सरकार, शिक्षणमंत्री, कुलगुरू, शिक्षणाधिकारी, संस्थाचालक, प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, प्राध्यापक, युवक, विद्यार्थी, पालक, समाज हे प्रामुख्यानं आपल्या व्यवसायाचे घटक आहेत. त्यांच्यात निर्माण होणारे ताणतणाव आपल्या लेखनावर प्रभाव टाकणारच. त्यातले बारकावे टिपत जाणं, त्यासाठी सतत सजग राहणं आवश्यक असतं. आपण या व्यवसायात वयाच्या विशीच्या आसपास येतो. त्याआधी आपलं भावविश्व आपल्या कुटुंबव्यवसायाशीच जोडलेलं असतं. ते तर आपल्या अनुभवविश्वाचं नंदनवन असतं. तेही आपल्या लेखनात येणं अगदी स्वाभाविक आहे. तो आपला भूतकाळ असतो आणि भूतकाळ वर्तमानापेक्षा जास्त साहित्याचा विषय होत असतो.
या सगळ्यांचा सुंदर मिलाफ म्हणजे साने गुरुजींचे कादंबरी चतुष्ट्य. ‘श्यामची आई’, ‘शाम’, ‘धडपडणारा श्याम’, ‘श्यामचा जीवनविकास’ या चार कादंबऱ्या लिहून साने गुरुजींनी शिक्षक साहित्यिकांच्या समोर एक आदर्शच निर्माण करून ठेवलाय. शिक्षण व्यवसायावर कसं लिहावं आणि ते लिहिताना समकालीन समग्र समाज कसा कवेत घ्यावा, याचं उत्तम उदाहरण म्हणजे साने गुरुजींच्या या चार कादंबर्या आहेत. जवळजवळ ऐंशी-नव्वद वर्षांपूर्वी लिहिलेल्या या कादंबऱ्या वाचताना आजही त्या ताज्या वाटायला लागतात. वाचायला सुरुवात केली तर संपेपर्यंत त्या खाली ठेवाव्या वाटत नाहीत, इतक्या त्या उत्कट आहेत. पुढं शरच्चंद्र मुक्तिबोध, भालचंद्र नेमाडे, आनंद यादव यांनी जी कादंबऱ्यांची मालिका लिहायला सुरुवात केली, त्याचा उगम या साने गुरुजींच्या कादंबर्यात आहे.
त्यातली‘ श्यामची आई’ सर्वांनाच माहीत असते, पण इतर कादंबऱ्या फारशा कुणी वाचलेल्या नसतात. मला तर उलट पुढच्याच कादंबऱ्या जास्त प्रगल्भ वाटतात. ‘श्यामची आई’ थोडीशी भाबडी वाटते. पुढच्या कादंबऱ्या लिहिताना साने गुरुजींची लेखनदृष्टी परिपक्व झालेली आहे. जागोजागी आलेलं चिंतन भावूकतेला फारसा वाव देत नाही. या चारही कादंबऱ्यांमधून साने गुरुजींनी आपल्या वयाच्या बावीस वर्षापर्यंतचा शैक्षणिक काळ चित्रित केलेला आहे. त्यात तेव्हाच्या शाळा, तेव्हाचे शिक्षक, तेव्हाचे अभ्यासक्रम आणि एकूणच शैक्षणिक वातावरण आलेलं आहे.
शंभर वर्षांपूर्वीचा शैक्षणिक महाराष्ट्र साने गुरुजींनी या कादंबर्यांतून जिवंतपणे साठवून ठेवलेला आहे. सोबतच समग्र समाजही कवेत घेतलेला आहे. जागोजाग समाजचिंतन आणि शिक्षणचिंतनही साने गुरुजींनी यात इरवाडासारखं पेरून ठेवलेलं आहे. त्यामुळे या पिकाला परिपूर्णता लाभलेली आहे. त्यातले शिक्षण चिंतनाचे काही नमुने आपण पाहूयात.
“गुरूच्या उत्तेजनपर एका शब्दानेही मुलांच्या अंगावर मूठभर मांस चढते. परंतु त्याचा किती दुष्काळ असतो! विद्यार्थ्यांची मने आपल्या शब्दांनी मारली जात आहेत की, फुलवली जात आहेत ह्या गोष्टीकडे शिक्षकांचे लक्ष नसते. वांद्र्याच्या कत्तलखान्यात लाखो गुरं मारली जात असतात. शाळाशाळांतून लाखो मुलांची मने मारली जात असतात. शाळा म्हणजे सुद्धा भयंकर कत्तलखाने असतात. ज्या प्रमाणे डोंबारी आपल्या चिमुकल्या मुलांच्या शरीराचे लहानपणापासून हाल करतो, स्वतःच्या इच्छेप्रमाणे त्या शरीरांच्या वाटेल तशा घड्या घालू बघतो, तसेच शिक्षकांचे असते. मुलांच्या मनांना एका ठराविक साच्यात ते घालू पाहत असतात. आदळ आपट करतील, पण त्या साच्यात त्यांना बसवतिलच. परमेश्वराचा हा सर्वांत घोर अपराध आहे.”
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
असाच आणखी एक महत्त्वाचा परिच्छेद.
“मी उभा राहिलो. मला रडू आले. मास्तरांनी मला शिक्षा करण्यापूर्वी विचार करायला हवा होता. आपल्या तासाला मुले का झोपतात? एक तर आपले शिकवणे मुलांना समजत नसेल किंवा त्यांना ते आवडत नसेल, अथवा मुलांना घरी खूप काम असल्यामुळे ती दमली असतील, अथवा रात्री त्यांना झोप आली नसेल, अथवा जेवली नसल्यामुळे त्यांना थकवा आला असेल, अथवा पुष्कळ व्यायाम केल्यामुळे त्यांना झोप लागली असेल, या निर्जीव बौद्धिक शिक्षणाकडे त्यांच्या मनाचा कल नसेल, अथवा या उष्ण देशांत दुपारी थोडी वामकुक्षी निसर्गतःच आवश्यक असेल. परंतु या बहुविध कारणांचा कोण शोध बोध घेणार? मुलांच्या घरच्या परिस्थितीचे ज्ञान किती मास्तरांना असते? ते इतिहास शिकवतात, परंतु समोरच्या जिवंत मुलांचा इतिहास त्यांना अज्ञात असतो. ते अर्थशास्त्र शिकवतात, परंतु समोरच्या मुलांची आर्थिक स्थिती त्यांना माहीत नसते. आपण एकमेकांच्या जीवनात उरतच नाहीत. मुलांच्या जीवनात शिरल्याशिवाय काय माती शिकवता येणार?”
“खरे तर कमी बुद्धिमान मुलास अधिक लायक शिक्षक हवेत. मृदू काळ्याभोर जमिनीला थोडा पाऊस पूरतो. दगडाळ भुमीला मुसळधार पावसाची गरज असते. परंतु जगात सारे उलटेच. बुद्धी बुद्धीकडे जाते, पैसा पैशाकडे जातो. अशाने जग कसे सुधारणार? प्रकाशाने अंधाराकडे जावे. बुद्धीने बुद्धीमंदाकडे जावे. धनाने दरिद्राकडे जावे. जिथे प्रकाश आहे, तिथेच प्रकाश घेऊन नका जाऊ. जेवलेल्याला जेवण देण्याने अजीर्ण मात्र व्हायचे.”
“परीक्षेच्या आधी पत्ते खेळणारे आमच्यासारखे वीर जगात फार थोडे असतील. शेवटच्या क्षणापर्यंत टिप्पणी, वह्या वाचणारे फार. परंतु रात्रंदिवस डोक्यात परीक्षा कोंबणारे, हे विद्यार्थी प्रश्नपत्रिका हातात पडताच गांगरून जातात. त्यांच्या डोक्यात गोंधळ उडतो. त्यांना अर्धा तास काही सुचत नाही. परीक्षा ज्याच्या मानगुटीवर बसली त्याची कीव येते. परीक्षेचा दिवसही नेहमीच्या दिवसासारखा वाटावा. जीवनातील सहजता कधी नष्ट होऊ नये. आनंद व शांती नष्ट होऊ नये. पुस्तकातील पानाला ज्याप्रमाणे चोहोबाजूला कोरी जागा सोडलेली असते, चोह बाजूस समास सोडलेला असतो तसे जीवनातही हवे. पुस्तकाचे पान जर काठोकाठ छापलेले असेल तर बरे वाटणार नाही. जीवनात मोकळेपणाचा समास सोडलेला असावा. थोडा रिकामपणा असावा. थोडा रिकामपणा ही महत्त्वाची वस्तू आहे.”
असे कितीतरी परिच्छेद या पुस्तकांमधून विखुरलेले आहेत. शंभर वर्षांपूर्वीचा आपला समाज आणि आजचा आपला समाज याची सतत तुलना आपल्या मनात होत जाते, ही साने गुरुजींची पुस्तकं वाचताना.
मित्रहो, ज्या जागेवर आपण हे संमेलन घेत आहोत, ती भूमी प्रखर मराठी भाषाप्रेमी दासोपंतांची आहे. चक्रधर, ज्ञानदेव, एकनाथ यांचे मराठीप्रेमही भाबडं वाटावं, असं मराठीचं मोठेपण तर्कशुद्धपणे पटवून देणारे दासोपंत संस्कृत भाषाभिमान्यांना तर्कानेच हरवतात. संस्कृत घट या शब्दाला मराठीत अठ्ठावीस पर्यायी शब्द देऊन मराठी भाषेची श्रीमंती साधार पटवून देतात. त्यांचाच हा भाषाप्रेमाचा वसा आपण पुढे नेऊयात आणि पिढ्याच्यापिढ्या बरबाद करणार्या छाछु इंग्रजी शाळांना अठ्ठावीसपट गुणवत्तेने मराठी शाळांचे पर्याय देऊन हरवूयात. यातच या संमेलनाचं यश सामावलेलं आहे, असं मला वाटतं.
मित्रहो, मला या संमेलनाचा अध्यक्ष केलं आणि आपण माझं हे अध्यक्षीय भाषण ऐकून घेतलं, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा खूप खूप ऋणी आहे. धन्यवाद!
.................................................................................................................................................................
लेखक इंद्रजित भालेराव प्रसिद्ध कवी आहेत.
ibhalerao@yahoo.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment