अजूनकाही
‘अंगापेक्षा बोंगा’ भक्षण केल्यावर अजगर अगदी किमान हालचाल वगळता प्रदीर्घ काळ निपचित पडून राहतो. २०१४च्या लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवापासून काँग्रेस पक्षाची अवस्था निपचित अजगरासारखी झाली आहे. देशाभिमानाची हिंस्र धार्मिकता निर्माण करणारी एकपक्षीय राजवट देशात येण्याचा धोका स्पष्ट दिसू लागलेला असताना काँग्रेसनं जागं होण्याची गरज आहे. सत्ताधारी भाजपचा प्रमुख विरोधक होण्याची शक्यता केवळ काँग्रेसमध्येच आहे, पण दिवसेंदिवस काँग्रेस पक्ष मोडून पडल्यातच जमा होत आहे. पण तरी त्याची काळजी बहुसंख्य काँग्रेस नेत्यांना नाही, असं स्पष्ट दिसत आहे. लोकशाहीविषयी संवेदनशील असणाऱ्या पत्रकारांना ती आहे. या संदर्भात मुद्रित, इलेक्ट्रॉनिक्स आणि डिजिटल अशा सर्व माध्यमांत अलीकडच्या काही वर्षांत प्रचंड मजकूर प्रकाशित झाला आहे. सर्वसामान्य काँग्रेस कार्यकर्त्यालाही तसंच वाटतं, पण काँग्रेस पक्ष काही जागा होताना दिसत नाही.
हे आठवण्याचं कारण म्हणजे उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल लागून आता महिना उलटलाय. या पाचपैकी पंजाब, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांमध्ये काँग्रेसची अवस्था अतिशय दारुण झाली. या तीन राज्यांत काँग्रेसनं जवळ जवळ शंभर जागा गमावल्या. पंजाब राज्यातली तर सत्ताही गमावली, तरी काँग्रेस पक्ष काही खडबडून जागा होत नाहीये...
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
निवडणुका म्हटल्या की, जय-पराजय होतच असतात, पण झालेल्या पराजयातून पुढच्या विजयाची बांधणी करायची असते, याचा काँग्रेसला २०१४नंतर विसरच पडला आहे. या पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल लागून महिना उलटायच्या आतच भाजप आणि आम आदमी पार्टी (आप) या पक्षांनी गुजरात विधानसभेच्या आगामी निवडणुकीची तयारीही सुरू केली आहे. गेल्याच आठवड्यात ‘आप’नं गुजरात राज्यात निवडणुकीचे रणशिंग फुंकताना अगदी तालुका स्तरापर्यंत मेळावे घेतले. या मेळाव्यांना अतिशय चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. अहमदाबादच्या कार्यक्रमात तर तुफान गर्दी झाली.
गुजरात विधानसभा निवडणुकीत लढाई भाजपविरुद्ध काँग्रेस अशी नसेल, तर भाजपविरुद्ध आप अशी असेल. या निवडणुकीनंतर गुजरात राज्यात प्रमुख विरोधी पक्ष म्हणून आप विधानसभेत दिसेल. दिल्ली आणि पंजाब विधानसभा निवडणुकात ‘आप’नं उल्लेखनीय यश मिळवताना काँगेसचं अस्तित्व अतिशय क्षीण केलं आहे, हे लक्षात घेता गुजरातमध्ये काँग्रेसच्याच जागा कमी होणार, असाच याचा अर्थ आहे.
गेल्या विधानसभा निवडणुकीत गुजरातेत काँग्रेसनं भाजपसमोर जबरदस्त आव्हान उभं केलं होतं. ते इतकं जबरदस्त होतं की, भाजपला कशीबशी सत्ता संपादन करता आली होती. या निवडणुकीत मात्र काँग्रेसच्या गोटात अजून तरी शांतताच आहे. सध्या जी काही माहिती विविध पाहण्यांतून हाती येते आहे, त्यानुसार गुजरातमध्ये ‘आप’ला ५० ते ७० जागा मिळतील. याचाच अर्थ काँग्रेसच्या तितक्या जागा कमी होतील असा होतो. मात्र काँग्रेसला त्याबाबत काही देणं-घेणं आहे किंवा त्याची काळजी आहे, हे काही अजून तरी जाणवलेलं नाही. गुजरात पाठोपाठ नागालँड, कर्नाटक, गुजरात, कर्नाटक, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश विधानसभांच्या निवडणुका लागतील. त्याची तर जाणीव तरी काँग्रेसला आहे की नाही, अशी परिस्थिती आहे.
..................................................................................................................................................................
उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...
हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal
...............................................................................................................................................................
काँग्रेस किती बेफिकीर पक्ष आहे, याच्या एकेक हकिकती अरबी सुरस कथांनाही लाजवणाऱ्या आणि काँग्रेसमध्ये गंभीर व समंजस नेतृत्व कसं उरलेलं नाही, हे सिद्ध करणाऱ्या आहेत. उत्तराखंड विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा हरिश रावत असतील, असं जाहीर करण्यात आलं. पण गलथानपणाचा कळस म्हणजे हरिश रावत यांना पंजाब विधानसभा निवडणुकीचं प्रमुख करण्यात आलं. एका राज्याचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार आपली निवडणूक सोडून दुसऱ्या राज्याच्या निवडणुकीत गुंतवून ठेवण्याची अशी राजकीय दिवाळखोरी काँग्रेसच नेतत्व करू जाणे. परिणामी हरिश रावत पंजाबला न्याय देऊ शकले नाहीत आणि उत्तराखंडला ते परत येईपर्यंत वेळ निघून गेली होती. दोन्ही मतदारसंघांत हरिश रावत यांना पराभवाला सामोर जावं लागलं. तिकडे काँग्रेसनं पंजाबातही सत्ता गमावली. कारण तिथे नवज्योतसिंग सिद्धूसारख्या मर्कटावर काँग्रेसनं विश्वास टाकला आणि पानिपत करून घेतलं.
गेल्या महिनाभरात काँग्रेसला या पाच राज्यातील निवडणुकांत झालेल्या पराभवाचं आत्मपरीक्षण करण्यासही अजून वेळ मिळालेला नाही. गेल्या सुमारे अडीच वर्षांपासून काँग्रेस पक्ष न-नायक अवस्थेत आहे. पाच राज्यातील निवडणुकांच्या निकालानंतर पक्षातले ज्येष्ठ २३ नेते आणि शीर्ष नेतृत्व म्हणजे सोनिया गांधी, प्रियंका गांधी व राहुल गांधी यांच्यातील धुसफूस पूर्वी होती, तशीच पुढे चालू आहे. ना सोनिया गांधी पक्षाचं नेतृत्व सोडायला तयार आहेत, ना या २३ नेत्यांपैकी कुणीतरी ठामपणे पुढं येऊन पक्षाचं नेतृत्व स्वीकारायला तयार आहे, अशी ही बेबंदशाही आहे.
महाराष्ट्रातले पक्षाची आमदार दिल्लीत ठाण मांडून हंगामी अध्यक्षांची भेट मागतात आणि ती मिळण्यासातही त्यांना १२ दिवस वाट पहावी लागते, हे पक्षात किती शैथिल्य आहे, याचंच लक्षण मानायला हवं. पक्षात आपल्या विरोधात असंतोष असेल(च) तर श्रीमती सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी बाजूला होण्याचा निर्णय घेण्याचं धाडस दाखवायला हवं. असं धाडस न दाखवून आणि हंगामी अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा केवळ आव आणून सोनिया गांधी फार मोठी चूक करत आहेत. त्याचे परिणाम काँग्रेसला आणखी भोगावेच लागतील. पक्षाचं कवच नसेल तर भाजप सरकार आपल्यावर काही कारवाई करेल, अशी तर धास्ती सोनिया गांधी यांना वाटत नाहीये ना, अशी कुजबूज मोहीम आता सुरू झाली आहे, ते त्यामुळेच.
..................................................................................................................................................................
अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5312/Checkmate
..................................................................................................................................................................
दुसरीकडे जी-२३ गटातील नेत्यांत देशव्यापी म्हणावा असा चेहरा कुणीच नाही. एखाद-दुसरा अपवाद वगळता, यापैकी एकही नेता स्वबळावर त्याच्या मतदारसंघात निवडून येऊ शकत नाही, तरी यातील काही नेत्यांचा राहुल गांधी यांच्याकडे पक्षाचं नेतृत्व सोपवण्याला विरोध आहे. मात्र नरेंद्र मोदी यांच्या विरोधात एकटे राहुल गांधीच ठामपणे उभे राहिलेले आहेत. म्हणूनच राहुल गांधी हेच पुढचं नेतृत्व असायला हवं, असं अनेक नेते आणि कार्यकर्त्यांना वाटतं. कारण गांधी नावाचा करिष्मा अजूनही जनमानसावर कायम आहे आणि तोच करिष्मा सत्तेच्या मार्गावर नेऊ शकतो असं बहुसंख्यांना वाटतं.
पुष्पा मुंजियाल या ७८ वर्षांच्या वृद्धेनं तिची सर्व संपत्ती पक्षकार्य करण्यासाठी राहुल गांधी यांच्या नावे केली असल्याची माहिती काँग्रेसच्या हॅंडलवर प्रकाशित झाली आहे; असा गांधी घराण्याचा करिष्मा आहे. तरी जर ‘गांधी नेतृत्व’ निवडणुकीत विजयी होण्यासाठी परिणामकारक ठरत नसेल, अशी भावना जी-२३ नेत्यांच्या मनात प्रबळ झालेली असेल, तर त्यांनी एक तर गांधी नावाचं जोखड काँग्रेसच्या मानेवरून फेकून द्यायला हवं. त्यासाठी अतिशय योग्य वेळ हीच आहे. ती हिंमत नसेल तर राहुल गांधी यांचं नेतृत्व मुकाटपणे स्वीकारावं आणि ते हाकतील त्या दिशेनं आजवर केलं, तसं मार्गक्रमण करावं.
पण तसंही घडताना दिसत नाही. हा पक्ष म्हणजे सगळा घोळात घोळ झालेला आहे. त्यामुळे प्रत्येक निवडणुकीत पक्ष अधिकाधिक विकलांग होत चाललेला आहे. या पक्षात चैतन्य आणायचं असेल, तर हे असं निपचित पडणं सोडून द्यावं लागेल आणि नव्या जोमानं कामाला लागावं लागेल, अन्यथा राजकीय अभ्यासकांवर, या देशात काँग्रेस नावाचा पक्ष कधी काळी होता, असे केवळ दाखले देण्याची वेळ नजीकच्या भविष्यात येऊ शकते.
भारतीय जनता पक्ष नेहमीच ‘इलेक्शन मोड’मध्ये असतो, असं नेहमीच म्हटलं जातं. यात जशी टीका आहे तसं कौतुकही. एक राजकीय पक्ष म्हणून भाजपनं असं ‘इलेक्शन मोड’मध्ये असणं, हे हा पक्ष जागरूक असण्याचं लक्षण आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्यास अजून काही महिन्यांचा अवधी असला तरी भारतीय जनता पक्षानं पत्ते पिसायला सुरुवात केलेली आहे. देशाच्या विविध भागातील कार्यकर्ते गुजरातेत डेरेदाखल व्हायला सुरुवात झालेली आहे; हिसाब-किताब ‘सेटल’ करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. कर्नाटकात ‘हिजाब’, विशिष्ट धर्माच्या लोकांच्या दुकानातूनच खरेदी वगैरे भावनिक मुद्द्यांची मोहीम राबवून वातावरण निर्मिती सुरू करण्यात आली आहे.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ बळकट होत जाणं म्हणजे संघाचा राजकीय मुखवटा असलेल्या भाजपचा विस्तार होणं आणि भाजपचा विस्तार होऊन सत्ताधारी होणं, म्हणजे संघाचा अजेंडा राबवलं जाणं, असं समीकरण असतं. असा परस्परसंबंध जोडल्याचं संघपरिवार आणि भाजपला आवडत नसलं तरी, हे सख्खं समीकरण आजवर अनेकदा स्पष्ट झालेलं आहे. अयोध्येचं राममंदिर किंवा काश्मीरचा स्वायत्त दर्जा काढून घेणं, असे अनेक दाखले त्या संदर्भात देता येतील. म्हणून एक आकडेवारी देतो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं नियंत्रण करणारी सर्वोच्च, अखिल भारतीय प्रतिनिधी सभेची वार्षिक बैठक नुकतीच कर्णावती येथे पार पडली. या बैठकीचा अहवाल आता माझ्यासमोर आहे. त्यानुसार मार्च २०२१ मध्ये संघाच्या देशभरात ५५ हजार ६५२ शाखा होत्या, त्या मार्च २०२२मध्ये ६० हजार ९२९वर पोहोचल्या आहेत. मार्च २१ ते २२ या काळात देशातील जवळजवळ ४ हजार नवीन गावात संघ पोहोचला आहे, असं ही आकडेवारी सांगते. याचा अर्थ गेल्या वर्षभरात संघाचा विस्तार झालेला आहे आणि तो भाजपच्या पथ्यावर पडणारा आहे, हे वेगळं सांगायला नको .
याच काळात काँग्रेस पक्ष देशात अधिकाधिक निष्क्रिय, निपचित होत गेला; साधा नेतृत्वाचा प्रश्न या पक्षाला सोडवता आलेला नाही; उलट धूसफूस वाढली आहे आणि त्यातून संघटनात्मक वीण उसवतच चाललेली आहे. आव्हानांच्या यादीत ‘आप’ची भर पडली आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीत ‘आप’ जर खरंच प्रमुख विरोधी पक्ष म्हणून उदयाला आला, तर काँग्रेसला पर्याय म्हणून लोक ‘आप’कडे पाहत आहेत, या समजावर शिक्कामोर्तब होणार आहे आणि ते तर काँग्रेसचं अस्तित्व देशात नाममात्र करणारी, काँग्रेसनं स्वत:च वाजवलेली ती मृत्यूघंटाच ठरेल!
..................................................................................................................................................................
लेखक प्रवीण बर्दापूरकर दै. लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीचे माजी संपादक आहेत.
praveen.bardapurkar@gmail.com
भेट द्या - www.praveenbardapurkar.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment