‘मी वसंतराव’ : बेसूर होत चाललेल्या समाजात हा सिनेमा आत्मीयभावाचा आनंद शेअर करतो, ही कृती दिलासा देणारी वाटते
कला-संस्कृती - मराठी सिनेमा
आशुतोष पोतदार
  • ‘मी वसंतराव’ या सिनेमाचे पोस्टर व त्यातील एक प्रसंग
  • Fri , 08 April 2022
  • कला-संस्कृती मराठी सिनेमा मी वसंतराव Me Vasantrao राहुल देशपांडे Rahul Deshpande निपुण धर्माधिकारी Nipun Dharmadhikari

‘सिंधू, सुधाकर, रम आणि इतर’ हे नाटक लिहिण्याची प्रक्रिया माझ्यासाठी नवे शिकवणारी होती.  या नाटकात पात्रे एका ऐतिहासिक काळातील नाटकावर संशोधन करत आहेत आणि जसजसे संशोधन पुढे सरकू लागते, तसतसे नवनवीन मुद्दे आणि त्या अनुषंगाने नाटकाचे रूप विकसित होत जाते. नाटकातला प्रत्येक जण आपापल्या परीने जुन्या काळातील नाटकांकडे, विशेषतः संगीत नाटकांकडे, पाहण्याचा प्रयत्न करतो. कुणी त्या काळातील भाषा अभ्यासतो, कुणी संगीत आणि गाणी समजून घेण्याचा प्रयत्न करतो, तर कुणी कॉस्च्युम्स. बहुतांश दृश्ये कॉस्च्युम डिझाईनरच्या स्टुडिओत घडतात. तिथे कपडे, काही बॅगा, शिलाई मशीन आणि इतर सामान पडले आहे. अधे-मध्ये नाटकातील गाण्यांच्या रेकॉर्डस् वाजत राहतात. सुरुवातीच्या खर्ड्यात नाटकाचे लेखन बरेच पसरट झाले होते. जे मनात येत होते, ते लिहीत होतो. त्यातल्या एका दृश्यात कॉस्च्युम डिझाईनर आणि तिचा मित्र काम करता करता बोलत असतात. दोघेही, पूर्णतः नव्या काळातले- १९८०च्या दशकात जन्मलेले. त्यांची बोलण्याची भाषाही अगदी नव्या जमान्यातील- 

ती : I am fond of him..

तो : Who?

ती : (गुणगुणत) वसंतराव देशपांडे

(जोरात हसत सुटतो)

तो : Are you gone nuts?

ती : (स्वतःच्या विश्वात) I wish I was grown up when he was young.

तो : Baby, he passed away in 1983

ती : ---passed on

(विराम)

तो : Okay whatever– passed on.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

नाटकाच्या निमित्ताने कॉस्चुम डिझाईनर जे काही शिकत होती, त्यातून तिला पं. वसंतराव देशपांडे यांची ओळख झाली होती. त्यांच्याबद्दल जी काही माहिती उपलब्ध होती, ती गोळा करत राहते. तिचा जन्म झाला होता, त्या काळात पं. देशपांडेंचे निधन झाले होते. पण, तिच्यासाठी, त्यांच्या आवाजातून- गाण्यातून- मुलाखतीतून ते जिवंत होते. तिच्या बोलण्यात सतत संगीत नाटक आणि वसंतराव देशपांडे यायचे, म्हणून तिच्या मैत्रिणी तिला ‘म्हातारीसारखे कसलं काय करतेस?’ असेही ऐकवतात. ती मात्र त्यांच्यातल्या लाघवी आवाजावर आणि मांडणीवर फिदा असते.

निपुण धर्माधिकारी दिग्दर्शित ‘मी वसंतराव’ हा सिनेमा प्रदर्शित झाला आणि लगेचच मी तो बघून आलो. आल्यावर वहीत लिहून ठेवलेले ‘सिंधू, सुधाकर, रम आणि इतर’ नाटकाच्या सुरुवातीच्या खर्ड्यातील काही पाने परत वाचून काढली. त्यामध्ये लिहून ठेवलेली कॉस्च्युम डिझाईनरच्या स्वगतामधील काही वाक्ये :

“...जमिनीवर रेंगाळत पडलेल्या कापडाला उचलायचं म्हणजे नुकतंच दमून पडलेल्या आपल्या अंगाला उठवून आंघोळीला पाठवण्यासारखं असतं. मनाचा हिय्या करून मी रंगीत कापडाला उचलते, अलगद मांडीवर ठेवते. एकवार हळुवार हात फिरवते. आईचे शिलाई मशीन याद करत राहते आणि बोटात कात्री पकडते. वाटतं, काहीच करून नये या कापडाशी. आकाशगंगेला दाखवावं- बघ कशी नक्षत्रं पसरलीयेत माझ्या मांडीवर. (‘बिंदिया ले गयी’ सुरू आहे. ती वर पाहत-) माझ्या मांडीवरचे हे नक्षत्र म्हणतंय, ‘अहो, वसंतराव तुम्ही गायला लागलाय, पण ही बया आमच्यावर कात्री लावायला निघालीय. मला ऐकू देत नाही तुमचं गाणं.’ (स्वतःशी. कापडावर हळुवार हात फिरवत) माझी कापडंही ऐकतात वसंतरावांचं गाणं. (वर पाहत) तुम्हाला माहितीय व्ही, परवा मी मैत्रिणीला सांगत होते, तुम्ही किती लाघवीपणे बोलता. ती फिसदीशी माझ्या अंगावर आली - ‘हे काय म्हाताऱ्या बाईसारखं बोलत असतीस सारखं?’ गाणं कशाशी खातात माहितीय काय! it's not a donut. (कापडाकडं पाहत) आपण ठरवून टाकलंय कुणी कसं करायचं आणि कुठल्या काळात काय बोलायचं. सरळ सोट रस्ता आयुष्याचा आखून ठेवलाय आधीच. (उपहासानं) चाला इथेच-- अशीच पावलं टाका. (अंगावर कापड घेते. हळुवार हात फिरवते. डोळे मिटते. कपड्याचा फील घेते. संगीत नाटकातल्या पात्रासारखी पोज घेते) सखे, तुला कळायची नाही या आकाशाची उंची. या नक्षत्रांनाच माहीत त्या तिथे काय असते ते. जाऊ दे, तुला सांगून काहीच उपयोग नाही. काय माझ्या वेडाला म्हणावे बरे. विचारच मनातून जात नाही...इश्श. (‘बिंदिया ले गयी’ ऐकू येत राहते.)...”

हे नाटक लिहूनही पाच-एक वर्षे झाली. वसंतराव देशपांडेंचे संदर्भ असणारी दृश्ये नाटक लिहीत गेलो तशी बाजूला गेली, कारण गोष्ट वेगळ्याच दिशेने उलगडत गेली. आलोक राजवाडे याने ते नाटक दिग्दर्शित केले आणि नाटक कंपनीने त्याचे प्रयोग केले. ‘सिंधू, सुधाकर, रम आणि इतर’च्या प्रकाशित संहितेमध्ये पं. देशपांडेंबद्दल काही नाही, पण डॉ. वसंतराव देशपांडे मात्र आहेत. ती दृश्ये लिहिण्याचा आनंद आठवून आजही छान वाटते.

..................................................................................................................................................................

उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअ‍ॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...

हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal

................................................................................................................................................................

माझ्या आजोबांना भजनाचा नाद होता. आमचे भजनी मंडळ होते. कोल्हापूरजवळच्या खेड्यात राहणाऱ्या आमच्या कुटुंबाकडे रेडिओ नसता, तर पं. देशपांडेंचे संगीत माहिती असण्याचे कारण नव्हते. माझ्या आईच्या आईलाही गाण्याची खूप आवड होती. पण गेले काही वर्षे, मराठी नाटकांचा अभ्यास करण्यातून जे ऐकले, त्यातून पं. वसंतराव देशपांडे माझ्या विश्वाचा भाग बनले आहेत. आता ‘मी वसंतराव’ या निपुण धर्माधिकारी दिग्दर्शित सिनेमामुळे पं. देशपांडेंच्या महत्त्वाच्या सांगीतिक कार्यकर्तृत्वाची पुन्हा एकदा उजळणी झाली.

मोठ्या पं. वसंतराव देशपांडेंचे गाणे मी ऐकतो, तसेच (आपुलकीने) धाकट्या राहुल देशपांडेंचेही गाणे ऐकतो. राहुले यांचे गाणे प्रगल्भ होत चाललेले जाणवत राहते. ते गाण्याच्या विविध रूपांबरोबर वेगवेगळ्या अंगांनी सुरांशी खेळत जातात, हे मला आवडते. बैठकीच्या गाण्यापासून ते इंटरनेटवरच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर राहुल सहज वावरत असतात. तेही, नजाकतीने. ते मोहून टाकणारे असते. बदलत्या समाज-संस्कृतीत असे वावर महत्त्वाचे असतात. एका अवकाशातून दुसऱ्या अवकाशात कसा लीलया संचार करावा, याची त्यांना खूप चांगली समज आहे आणि त्यासाठीचे त्यांच्याकडे असणारे सांगीतिक भान आणि कौशल्य मला महत्त्वाचे वाटते.  

साहजिकच ‘मी वसंतराव’ हा सिनेमा पाहताना मी ‘बायस्ड’ होतो. पं. वसंतराव देशपांडे मला आवडतात आणि अलीकडे राहुल देशपांडे मला त्यांच्या लीलया संचार वृत्तीकडे खेचत राहतात. आता लिहितानाही, माझ्या आतल्या ‘critical understanding’ घेऊन वावरणाऱ्या अभ्यासकाला मी मागच्या सीटवर बसवले आहे, असे वाटते.

काही वर्षांपूर्वी बंगलोरमध्ये कलाकारांना अनुदान देणाऱ्या संस्थेत मी नोकरी करायचो, तेव्हा अनुदान मागायला येणाऱ्यांना “तुम्हाला कलाक्षेत्रात जे काही करायचे आहे, ते का करायचे आहे?” असा प्रश्न आम्ही विचारायचो. त्यावर तो कलाकार म्हणायचा- “मला हे जे करायचे आहे, ते करायचे आहे. करायचेच आहे. आवडते म्हणून करायचे आहे.” मग मी स्वतःला प्रश्न विचारायचो - “मला नाटक का लिहावेसे वाटते किंवा कविता का करावीशी वाटते?” उत्तर मिळायचे : “वाटते- सुचते- विचार येतो- म्हणावेसे वाटते- शेअर करावेसे वाटते- गप्पा माराव्याशा वाटतात- आवडते”. ‘मी वसंतराव’ पाहताना माझं असं काहीसं झालं. वसंतराव देशपांडे या अवलियाशी जोडून घेण्याची आयती संधी म्हणून, त्यांना समजून घ्यायचे आहे म्हणून, मी हा सिनेमा पाहायला गेलो.

पं. देशपांडेंच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू त्यांच्या गाण्यातून जसे\जेवढे समोर येतात, तसे या सिनेमातून येत नाहीत, किंवा त्यांच्या गाण्यात जसं गारुड आहे, तसा सिनेमा गारुडी नाही. तरीही यात काहीतरी आहे, जे मला धरून ठेवत गेले. मध्यंतरापर्यंत दाखवलेला वसंतराव देशपांडेंचा प्रवास सहज येतो. पण पु. ल. देशपांडे आल्यावर जरा कंटाळवाणं झालं. पुलंना नको तितका अवकाश दिल्यानं कातावल्यासारखे झाले. तरीही वसंतरावांच्या अस्तित्वाचे गुंते समजून घेत मी सिनेमा एन्जॉय करत राहिलो. या सिनेमात अजून काहीतरी तरल आणि सहज असायला पाहिजे होते किंवा सिनेमाची संहिता अधिक संशोधनातून सिद्ध व्हायला हवी होती, असेही वाटत राहिले. तरीही एक गायक-नट (मोठे देशपांडे) आणि दुसरा गायक नट (छोटे देशपांडे), यांचे संयुग वाटावे, अशा प्रक्रियेतून दोघांमध्ये संवाद होत राहतो किंवा पं. देशपांडेंची आई-बायको-मुले पडद्यावर जो प्रतिसाद त्यांना देत राहतात, ते मला आकर्षित करत राहिले.

पं. वसंतराव देशपांडेंची संगीत नाटकाकडे पाहण्याची संशोधन वृत्ती, त्यांचे बाहेरच्या देशात तबल्याच्या साथीला जाणे किंवा ‘कट्यार काळजात घुसली’ या नाटकाचा लेखक दिसतो, पण दिग्दर्शक का दिसत नाही, असे विचार येत राहिले, पण देशपांडेंचे लाहोरमधले त्यांच्या गायकीची खोली गाठण्याचा प्रयत्न करणारे आयुष्य, समकालीन राजकीय बदलाच्या पार्श्वभूमीवर दाखवले आहे, त्यातून मी सिनेमाच्या आत राहिलो.

पं. देशपांडेंच्या समकालीनांचे गाणे वा समकालीन संगीत निर्मिती आणि मांडणी काय होती, हे या सिनेमातून नीट पोहोचत नाही. त्याच वेळेला कौमुदी वलोकर आणि अनिता दाते किती सहजतेने आपापल्या व्यक्तिरेखा निभावतात, याचे कौतुक वाटते. विशेषकरून अनिताला पडद्यावर (मुलाबरोबर टांग्यातून जाताना) पाहताना खास वाटत होते.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

निपुणकडे जी आयुधे आहेत, त्यांचा त्याने दिग्दर्शक म्हणून प्रयोग करून पाहिला आहे. गरज पडेल तिथे स्वातंत्र्य घेऊन- दोन वेगवेगळ्या वयातल्या वसंतरावांना समोरासमोर ठेवून त्याने काही मांडू पाहिलेय. अर्थात ही क्लृप्ती सिनेमात, नाटकात किंवा साहित्यात रुळलेली आहे. कलाकाराचा भूतकाळ बदलत्या काळाच्या भिंगातून मांडण्याचा प्रयत्न करणारा निपुण मध्यमवर्गीय प्रेक्षकांपर्यंत आणि विशेषकरून, पं. वसंतराव आणि राहुल देशपांडे यांच्या चाहत्यांकडे पोहोचण्यासाठी प्रयत्न करतो, हे लक्षात येते.

कलेच्या रूपातून स्वतःचा किंवा भवतालाचा गतकाळ दाखवणं, ही गुंतागुंतीची प्रक्रिया असते. स्मरणरंजनाचा धोका असतो. भावनिक उत्कटता आणि वैचारिक चिंतन, यामध्ये द्वंद्वाला भिडण्याचे सामर्थ्य कलाकाराला दाखवावे लागते. कलात्म अभिव्यक्ती कशासाठी आणि कुणासाठी, असे प्रश्न विचारत ती कशी मांडायची, याबद्दलचे निर्णय कलाकाराला घ्यावे लागतात. मला खात्री आहे, निपुण धर्माधिकारी आणि राहुल देशपांडे या प्रक्रियेला सामोरे गेले असणार. याआधी, त्या दोघांनी एकत्र काम केले आहे. संगीत नाटकांना उजाळा देण्याचे काम केले आहे. स्वर-तालात रमणारे राहुल देशपांडे आहेत, त्यामध्ये रमण्याचा प्रवास ते एन्जॉय करतात, हे लॉकडाऊनच्या काळातील त्यांच्या इंटरनेटवरील सादरीकरणात जाणवले आहे.

‘मी वसंतराव’ हा सिनेमा राहुल देशपांडेंच्या प्रवासातील एक टप्पा हे जाणवते. नाटक आणि सिनेमा या दोन्ही माध्यमात असणाऱ्या निपुणसाठी या सिनेमातून नवे काय शिकायला मिळाले, त्याची सिनेमाची भाषा कशी प्रगल्भ झाली, सिनेमा करण्यातून त्याच्या नाट्यमाध्यमाची जाण कशी अधिक समृद्ध झाली, हे समजून घ्यायला अभ्यासकांना नक्कीच आवडेल.

समजा, पं. वसंतराव देशपांडेंसारख्या कलाकाराची - ज्याने परंपरेला प्रश्न विचारला, कलेला नवे परिमाण मिळवून दिले - भूमिका राहुल देशपांडेंनी केली नसती तर? अर्थातच, तो प्रयत्न वेगळा ठरला असता. एक तर, तो एखाद्या कलाकाराचा तटस्थ शोध झाला असता. दुसरे म्हणजे, त्यात कोरडेपणाही आला असता. ‘मी वसंतराव’ या सिनेमात नातू आणि कलाकार अशा दोन, एकमेकांला पाठबळ देणाऱ्या, भूमिकांतून राहुल जेव्हा भूमिका निभावतात, तेव्हा ते आजोबा आणि कलाकार, अशा दोन जगण्यांना सामोरे जात असतात.

मला वाटते, इथे नट म्हणून जे काही त्यांना गवसले असेल, तो त्यांचा बोनस असेल. पण, त्यांच्यासाठी तो सांगीतिक पारमार्थिकाचा प्रवास असेल. यात त्यांनी स्वतःकडेही कलाकार म्हणून निरखून पाहिले असेल, स्वतःलाही तपासले असेल. मला वाटते, आपल्याला आवडणाऱ्या व्यक्ती-घटना यांच्याशी आपण जोडून घेऊ पाहतो, ही भावना सुंदर आणि जगणे समृद्ध करणारी, शिकवणारी असते. कलाकार ते कसे जोडून घेतो आणि त्याचे मार्ग कोणते आहेत, यातून त्याच्या कलेचा घाट आकाराला येत जातो.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

अजून एक, आपल्या आजोबांना स्वतःच्या काळात आणून ठेवणे, त्यांच्याशी संवाद साधणे आणि वेगवेगळ्या काळातील दुवे साधणे यातून ‘अर्काईव्ह’ची शक्यताही या सिनेमाने निर्माण केली आहे. मला हा ज्ञानसंवर्धनाचा मार्ग वाटतो. एखाद्या गायकाला-कलाकाराला रेकॉर्डिंगमध्ये ‘बंदिस्त’ करण्यापलीकडे त्याला सिनेमासारख्या- डॉक्यु-फिक्शनसारख्या अभिव्यक्तीच्या रूपातून मांडणे, हे व्यक्तिगत स्तरावरचे दस्तऐवजीकरण आहे, असे वाटते. आजच्या तसेच येणाऱ्या काळात या सिनेमातून संगीत आणि तत्कालीन समाज-अभ्यासाच्या दिशाही प्राप्त होऊ शकतील.

‘मी वसंतराव’ उभारण्याची प्रक्रिया लोभस आहे, आत्मीय-भावाची आहे हे जाणवते. पं. वसंतरावांची चिकित्सा करून त्यांच्या सांगीतिक कार्याचे विश्लेषण करण्यापेक्षा, त्यांच्याकडे आपण जगतो त्या काळाच्या नजरेतून प्रेमाने पाहणे आणि ‘तुम्ही कसे आहात?’ असे विचारण्याइतका वात्सल्य भाव व्यक्त करणे, हा या सिनेमाचा एक उद्देश आहे असे वाटते. आता हा उद्देश सफल करताना, पडद्यावरच्या राहुल देशपांडेंचे वसंतरावांशी वेगवेगळ्या स्तरांवर जोडून घेण्यातून आणि तो समाजासमोर मांडण्यातून आत्मीयभावाची व्याप्ती वाढते. बेसूर होत चाललेल्या समाजात हा सिनेमा आत्मीयभावाचा आनंद शेअर करतो, ही कृती दिलासा देणारी वाटते.

.................................................................................................................................................................

लेखक आशुतोष पोतदार नाटककार, कवी, कथालेखक आणि साहित्य–संस्कृतीचे अभ्यासक आहेत. ते फ्लेम युनिव्हर्सिटी, पुणे येथे साहित्य आणि नाटकाचे अध्यापन करतात.

potdar.ashutosh@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख