अजूनकाही
दीपक नारायण मोडक यांचा ‘रायमुनिया’ या कथासंग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे. त्यात एकंदर १६ कथा आहेत. आपण नेहमीच कुणाच्या तरी हातातले खेळणं असतो. हताश अवस्थेचा सामना करत राहणं, हेच भागधेय घेऊन माणसं जगतात. त्याच्या या कथा बऱ्याच अंतर्मुख करणाऱ्या, तपशील किंचित दमछाक करणारा वाटतो. पण त्याचमुळे आपण गुंतत जातो. यात कसली चमत्कृती नाही. मानवी मर्यादांच्या बाहेर घडणाऱ्या या कथा आहेत! त्याचा अन्वय कसा लावायचा, हे त्यानं त्यानं ठरवावं.
सगळे अनाकलनीय असूनसुद्धा विनाकारण अतर्क्य असं काही नाही, हे या कथांचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल. मला यातल्या प्रामुख्यानं ‘जखीणराई’ आणि ‘प्रतीक्षा’ या दोन कथांबद्दल लिहायचं आहे. एकाच सूत्रातल्या या दोन्ही कथा झपाटून टाकणाऱ्या आहेत. वास्तविक झपाटल्या अवस्थेत मूल्यांकन करू नये, असं म्हटलं जातं, पण मला हे झपाटलेपण आवश्यक वाटतं. माणसांच्या मनात दीर्घकाळ असलेल्या सुप्त इच्छांची एक ताकद असते. कधी ती स्वप्नपूर्तीचे क्षण देते, तर कधी सर्वनाश. या दोन्ही कथांमधून आपण अनुभवतो तो सर्वनाश आहे हे खरं, पण त्यातदेखील एक अपरिहार्य अशी ‘प्रवासाची’ झिंग आहे. कथेच्या प्रवासात आपण त्यात अगदी गुरफटून जातो. आयुष्याच्या कडेलोटाकडेच जाणारा हा प्रवास आहे, आणि तरीही त्यात वर्तमानाची अशी एक ऊर्जादेखील आहे.
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
अतर्क्य, गूढ आणि मानवी मर्यादेच्या बाहेरचं सगळं काही ‘प्रतीक्षा’ या कथेत आहे. आपल्या सगळ्या तीव्र इच्छांचे अर्थ कळत असतात, आणि तरीही आपण ते ओझं घेऊन जगत असतो. असंच काही ‘जखीणराई’ या कथेतही आहे! या कथांमधील गूढता वेगळ्या बाजाची आहे. कारण त्यात कुठेही भय डोकावत नाही. आहे ते एक अनिवार्य असं रहस्य. ते आपल्या मनातलं आहे, तसं ते निसर्गाच्या प्रतिक्रियेतलेसुद्धा. जगण्याच्या प्रेरणांचा उगम मला तिथं दिसला. प्रत्येक जीवनाचा शेवट ठरलेला असतोच. मृत्युच्या पार्श्वभूमीवरदेखील हे जगणं मोहक आणि हेतुबद्ध ठरतं. प्रवास-अनुभवांना आपण लेबल लावत उत्तरं शोधतो. मृत्यू मात्र या सगळ्याचे बरे-वाईट उत्तर देत सामोरा येतो. तो कसा आला, याला काहीच अर्थ नसतो.
‘जखीणराई’
वनस्पती आणि प्राणी यांच्या विशेष अभ्यासासाठी दोन मित्र एका जंगलात जातात. त्यांच्यासोबत वनरक्षक, वाटाडेसुद्धा असतात. सुभाष या अभ्यासकांचं कुतूहल, नवं काही शोधण्याची धडपड, स्थानिक अनुभवावर आधारित शहाणपण असलेला वनरक्षक दीना यांची ही कथा आहे. खोल जंगलात असलेल्या देवीच्या राईजवळ ही कथा येते, थांबते आणि संपतेसुद्धा. निसर्गातील अतर्क्य घटना बघत, अनुभवत त्यांचा प्रवास आहे. या परिसरातील एका दुर्मीळ वनस्पतीबद्दल त्यांना जाणून घ्यायचं आहे. मात्र दीना त्या भागात, ‘जखीणराई’त शिरायला तयार नाही. वनखात्याचीसुद्धा त्याला परवानगी नाही. मोठ्या मिनतवारीनं दीना तयार होतो. झाडाजवळ जायचे नाही, फक्त छायाचित्रं घ्यायची या अटीवर हे अभ्यासक मित्र आत शिरतात. दीना म्हणतो, “नमुन्यासाठी ज्या संशोधकांनी आजवर त्याची छाटणी केली किंवा ती उपटली, ते नाहीसे झाले आहेत…” दोघाही अभ्यासकांना त्यातलं खरं-खोटं समजत नाही, पण त्यांची ऊर्मी त्यांना गप्प बसू देत नाही. ते दोघं त्या झाडाची छायाचित्रं घेतात, पण लेन्स बदलूनदेखील मनासारखं छायाचित्र येत नाही. पण आहे त्यावर समाधान मानत अखेर ‘जखीणराई’ची पहिली भेट संपते.
या दुर्दम्य सफारीचा दुसरा टप्पा दुसऱ्या दिवशी सुरू होतो. भल्या सकाळी ते दोघंच निघतात. ‘जखीणराई’मधील ‘जखिणीची बोटे’ या नावानं असलेल्या वनस्पतीची छायाचित्रं आणि किंवा फांदीचा एखादा भाग त्यांना हवा असतो. पुढे काय घडतं, ते मी सांगणार नाही.
..................................................................................................................................................................
उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...
हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal
................................................................................................................................................................
शोधवृत्ती हीदेखील एक प्रवृत्तीच आहे. ती जशी माणसात आहे, तशी वनस्पतीतसुद्धा आहे काय? ‘जखीणराई’मधील हे रहस्य नेमकं काय आहे? शोध संपत नाही, तसे सूडदेखील संपत नाहीत. किती वर्षे हे असं चालत आहे? लेखकाला या गूढतेचा शोध घेताना एक अनादी युद्ध दिसलं आहे काय? सुभाष या संशोधकाटं भविष्य त्याच्या मनातील असीम ओढीत लपलं आहे. नाहीसं होणं आणि जखिणीला नवा अंकुर फुटणं... हे गूढ कायम राहतं, म्हणूनच कथा विसरली जात नाही.
‘प्रतीक्षा’
या कथेत जी प्रतीक्षा आहे, ती रॉबर्टची. या कथेचाही शेवट ‘जखीणराई’सारखाच विस्मयकारी आणि अनाकलनीय असतो. अमेरिकेत राहणाऱ्या आपल्या मुलाकडे निघालेली नंदा एका कौटुंबिक ट्रीपवर असते. विधिलिखित मात्र खूप वेगळं असतं. म्हटलं तर ती एक महाविद्यालयीन आठवण आहे. आज मात्र नंदा एकटी आहे. नवऱ्याचं हृदयविकारानं निधन झालं आहे. अमेरिकेत एका क्षुल्लक प्रसंगामुळे तिला रॉबर्टची आठवण येते. खरं तर ती त्याच्यात गुंतलेली वगैरे नाहीय. मात्र त्याच्या कला-जाणीणांबद्दल तिला एक असोशी आहे, आदर आहे. ललित कला केंद्रात ती भरतनाट्यमचं शिक्षण घेत होती, त्या वेळी रॉबर्ट तिला भेटला होता. दक्षिण भारतीय कला आणि संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी तो केंद्रात दाखल झाला होता. रॉबर्टला ही ओढ जन्मजात होती.
नंदाची व त्याची मैत्री होते. अनेकदा ही ओढ वैयक्तिक सूचन म्हणूनदेखील झाली, पण नंदाला तिच्या मनाचा थांग लागत नव्हता. पुढे प्रबंध संपवून रॉबर्ट अमेरिकेत जातो, पण त्याची पत्रं मात्र येत राहतात. त्यांचा गठ्ठा नंदाने जपून ठेवलेला असतो. अमेरिकेत गेल्यावर रॉबर्टची जीवनपद्धती, आवडी यात मोठे बदल होतात. त्याचा हा बदल एकलकोंड्या आयुष्याकडे झुकणारा होता, मुख्य प्रवाहापासून अगदी भिन्न. एका पत्रात त्यानं लिहिलं होतं, “पश्चिम किनाऱ्यावर कुठेतरी वस्ती करून मी एखादा फार्म घेईन, शेळ्या-मेंढ्या, गाई पाळेन. एखादा घोडादेखील घेईन.... रपेट मारत… एखाद्या काऊबॉयसारखे आयुष्य जगेन...”
नियमित येणारी त्याची पत्रं नंदाच्या लग्नानंतरसुद्धा येत राहिली. त्यातच त्याचा पत्ता नंदाला कळला होता- ‘गालीना एन.एम.’ एक दिवस निवेडा प्रांतातल्या आपल्या मित्राला भेटण्याचा प्रस्ताव ती आपल्या मुलापुढे ठेवते. आईच्या इच्छेसाठी तो तयार होतो, पण तिथं काही अद्भुत घडणार आहे, याचा कुणालाही अंदाज नसतो. रॉबर्टला एकदा तरी भेटावं, ही नंदाची इच्छा आता उचल खाते. मुलाला ती सर्व काही सांगते. “योगायोगाने मी अमेरिकेत आहे. आणि या पत्राने माझे कुतूहल जागृत केले आहे, तर जाऊ आपण.” असं ती मुलाला सांगते. प्रत्यक्षात त्या पत्त्यावर विलक्षण घडतं. मानवी संवेदना आणि सुप्त इच्छांची तीव्रता हे सगळंच विस्मयकारी.
..................................................................................................................................................................
अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5312/Checkmate
..................................................................................................................................................................
त्या पत्त्यावर रॉबर्ट प्रत्यक्ष होता की नाही? नंदाला काय भास होत होते? तिच्या नकळत ती रॉबर्टच्या हाका ऐकत होती की, तो प्रत्यक्षात तिथं नव्हताच? अशा प्रश्नांची उत्तरं हुडकण्यात अर्थ नाही. सत्य एकच असतं की, नंदाच्या मनात काहीही असो, रॉबर्टची हाक त्या उदध्वस्त परिसरात घुमत होती. कदाचित ती फक्त नंदालाच ऐकू येत होती. माणसाच्या मनातील सुप्त इच्छांना तो इतका बांधील असतो आणि त्याचा उद्रेक भयंकर असतो, हेच आपल्या मनात कायम राहतं. या उद्रेकाला बांधलेलं नंदाचं आयुष्य अनेक प्रश्न निर्माण करतं, हे मात्र खरं!
इतर कथा
‘अनिकेत’ या कथेतील वातावरण तसं साधं आहे, मात्र तिथंदेखील भय-शंकित मनाचं विश्व आहेच. एका घरासाठीचा हा शोध आहे. सदैव असलेल्या अस्थिरतेतून ‘अनिकेत’च्या नायकाला या शंका येत असतात. अटळ असं स्थलांतर आणि त्याची वेदनाही आहेच. पण त्याहीपेक्षा मनाचे खेळ अधिक आहेत. जुन्या घरातील प्रसंग, शेजार आणि एकंदरीत त्या अस्तित्वाची स्निग्धता डोकावतेच. सोडलेल्या घरातील आठवणी काही सामानासारख्या ट्रकवर चढवता येत नाहीत. वास्तव म्हणून तो वर्तमान स्वीकारायला बांधील आहे. त्याच्या मनाची खिन्न अवस्था आपण कुठेतरी अनुभवलेली असतेच!
‘अर्भक’ या कथेत आयुष्यात मोजके श्वास घेतलेलं अर्भक त्याच्या दुर्दैवी, अनाकलनीय जन्माची कथा सांगतं. शेवट धक्कादायक असला तरी दुसरं काहीच घडणं शक्यच नसतं.
इतर कथांमधील विषय, वातावरणदेखील नोंद घेण्याजोगं वाटतं. ‘बिकट वाट’, ‘कुरघोडी’, ‘एलियास’ या कथाही वेगळं वातावरण आपल्यासमोर आणतात.
‘रायमुनिया’ - दीपक नारायण मोडक
राजहंस प्रकाशन, पुणे
पाने - २४९
मूल्य - ३५० रुपये
..................................................................................................................................................................
लेखक जयंत राळेरासकर ध्वनिमुद्रिका संग्राहक आणि चित्रपट अभ्यासक आहेत.
jayantraleraskar@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment