अजूनकाही
अल-कायदाचा प्रमुख अयमान अल जवाहिरी याने हिजाबवादात उडी घेतली. ही एक गंभीर घटना आहे. भारतात मुस्लिमांना दुय्यमत्वाकडे लोटण्याचे काहींचे जोरदार प्रयत्न सध्या सुरू आहेत. स्वतःस ‘संत’ म्हणवून घेणारे काही अतिरेकी मुस्लिमांच्या शिरकाणाची आवाहने करत आहेत. यास अर्थातच ‘खऱ्या’ हिंदूंचा, सच्च्या भारतीयांचा पाठिंबा असूच शकत नाही. मात्र कधी हिजाब, कधी हलाल यावरून कुरापती करत भारताची मानसिक फाळणी करण्याचे कारस्थान सध्या सुरू आहे. या पार्श्वभूमीवर जवाहिरीचे अनर्थकारी वक्तव्य आले असून, त्याचा अर्थ समजून घेणे आवश्यक आहे.
२०११मध्ये झालेल्या लादेनवधानंतर त्याची जागा अयमान अल जवाहिरी याने घेतली. सुरुवातीची काही वर्षे अल-कायदाच्या वाताहतीची मानली जातात. मात्र त्यानंतर जवाहिरी याने पुन्हा एकदा या संघटनेला जिहादी दहशतवादाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे प्रयत्न सुरू केले. पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानातील जिहादी गटांना एकत्र आणणे, हा त्याचाच एक भाग. त्यातूनच त्याने २०१४च्या सप्टेंबरमध्ये ‘अल-कायदा इन इंडियन सबकॉन्टिनन्ट’ (आयक्यूआयएस) या संघटनेच्या स्थापनेची घोषणा केली. भारतीय उपखंड हे अर्थातच तिचे कार्यक्षेत्र. तिच्या प्रमुखपदी नेमण्यात आले असीम उमर या भारतीय दहशतवाद्यास. हा मूळचा उत्तर प्रदेशातला. दारुल उलूम देवबंदमध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर तो पाकिस्तानात गेला. तेथून तो दहशतवादी गटांस सामील झाला. तो मेला आहे असाच त्याच्या कुटुंबीयांचा समज होता. २००९मध्ये त्याचा पत्ता भारतीय गुप्तचरांना लागला. तो जिवंत असल्याचे त्यांनी त्याच्या कुटुंबियांना कळवले. त्यावर त्याच्या कुटुंबियांनी वर्तमानपत्रांत जाहिरात देऊन, त्याला बेदखल केले. तर अशा एका भारतीय व्यक्तीची अल-कायदाच्या भारतीय शाखेवर नियुक्ती करण्याचा अर्थ एकच होता. अल-कायदाचे पुढचे लक्ष्य भारत होता. त्यात त्यांना कितपत यश मिळाले?
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
२०१४ मध्येच एका ध्वनिचित्रफितीद्वारे अल जवाहिरीने आयक्यूआयएसच्या स्थापनेची घोषणा केली. सुमारे तासाभराची ती ध्वनिचित्रफीत. भारतीय मुस्लिमांची अन्याय आणि अत्याचारांतून मुक्तता करण्यासाठी ही संघटना बांधण्यात आली आहे. ती भारत, बांगलादेश आणि म्यानमारमध्ये जिहाद पुकारत आहे, असे त्यात त्याने म्हटले होते. आसाम, गुजरात आणि काश्मीरमधील मुस्लिमांच्या स्थितीचा त्यात त्याने विशेषत्वाने उल्लेख केला होता. ‘मुस्लिमांनो, एक व्हा’ ही त्याची हाक होती. यानंतर महिनाभरात, ऑक्टोबर २०१४मध्ये काश्मीरमधील ‘अन्सार उत्तौहिद वल जिहाद इन काश्मीर’ नामक एका फुटकळ दहशतवादी गटाने अल-कायदाला पाठिंबा जाहीर केला. पण बाकी भारतीय मुस्लिमांचे काय?
अल जवाहिरीची ती ध्वनिचित्रफीत प्रसिद्ध झाल्याबरोबर भारतातील अनेक मुस्लिम संघटनांनी त्याचा जाहीर निषेध केला. अल-कायदा ही निरपराध नागरिकांची हत्या करणारी, शांततेस घातक अशी दहशतवादी संघटना आहे. ती भारतीय मुस्लिमांच्या हितास बाधक आहे. तेव्हा तिच्याकडे मुळीच लक्ष देऊ नका, असे आवाहन अनेक प्रतिष्ठित मुस्लिमांनी केले. त्यात अखिल भारतीय मुस्लिम मजलिस-ए-मुशावरत या मुस्लीम संघटनांच्या महासंघाचे प्रमुख, ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डचे सदस्य, दक्षिण आशियायी उलेमा कौन्सिलचे राष्ट्रीय सचिव आदींचा समावेश होता. एकंदर भारतातील मुस्लिमांनी अल-कायदाला, तिच्या विचारसरणीला नाकारलेच. आणि ते स्वाभाविकच होते. ते का, याचे एक महत्त्वाचे कारण दिले आहे सय्यद असीफ इब्राहिम यांनी.
हे इंटेलिजन्स ब्युरोचे माजी प्रमुख. जून २०१५मध्ये मोदी सरकारने त्यांची पंतप्रधानांचे ‘काऊंटरिंग टेररिझम अँड एक्स्ट्रिमिझम’बाबतचे खास दूत म्हणून नियुक्ती केली. अफगाणिस्तान, पाकिस्तान. तसेच दक्षिण आशियातील देशांशी याबाबत संपर्क ठेवण्याची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवण्यात आली. तर त्यांनी पंतप्रधानांच्या कार्यालयासाठी एक खास अभ्यास-अहवाल तयार केला होता. आयसिस, अल-कायदा आदींची जी अतिरेकी इस्लामी विचारधारा आहे, तिच्यापासून भारतास किती धोका आहे, असा त्याचा साधारण विषय होता. भारतीय मुस्लिमांत लोकप्रिय असलेल्या हनाफी शाखेचा, देवबंदमधून सुरू झालेल्या पुनरुज्जीवनवादी चळवळीचा आलेख मांडून त्यांनी त्यात असा निष्कर्ष मांडला आहे, की भारताला अल-कायदापेक्षा खरा धोका आहे तो पाकिस्तानपासून.
..................................................................................................................................................................
उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...
हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal
................................................................................................................................................................
आणि इब्राहिमी यांचे हे मत खरे ठरतानाही दिसत आहे. भारतात अल-कायदा आपले पाय रोवू शकलेली नाही. आयक्यूआयएसने पाकिस्तान आणि बांगलादेशात काही दहशतवादी हल्ले केले. बांगलादेशातील ब्लॉगर, एलजीबीटी कार्यकर्त्याची हत्या केली. पण भारतात त्यांना काहीही करता आलेले नाही, येथील मुस्लिमांचे समर्थन मिळवता आलेले नाही. पण म्हणून त्यांनी त्यांचे प्रयत्न सोडलेले नाहीत.
अल जवाहिरीचे ही ताजी ध्वनिचित्रफीत आली आहे, ती या पार्श्वभूमीवर. खास करून उत्तर प्रदेशातील निवडणुकीच्या निमित्ताने देशात जे मुस्लिमविरोधी राजकारण तापवण्यात आले, हिजाबवरून येथे जो वाद निर्माण करण्यात आला, त्याचा यास संदर्भ आहे. कोणतेही धार्मिक वा जातीय राजकारण हे परधर्माच्या/परजातीच्या द्वेषावरच आधारलेले असते. तो त्यांचा जीवनरस असतो.
येथील अतिरेकी हिंदुत्ववादी आणि जिहादी अतिरेकी दोघेही या एकाच जीवनरसावर वाढत आहेत. हिंदुत्ववाद्यांनी सामान्य जनतेसमोर मुसलमानांचा बागुलबुवा उभा करावा. फोकनाड मुद्दे उकरून काढत मुस्लिमांना डिवचत राहावे. आणि हिंदुत्ववाद्यांच्या त्या कृत्यांचा आधार घेऊन इस्लामी अतिरेक्यांनी आपले स्थान बळकट करावे. ते वर तोंड काढू लागले की, हिंदुत्त्ववादी अतिरेक्यांनी लोकांना सांगावे, पाहा, ते कसे माजलेत. हेच पुन्हा उलट दिशेने चाललेले असते. यातून हानी होते ती राष्ट्रीय एकात्मतेची.
तसाही मानसिक पातळीवर हा देश आता दुभंगलेलाच आहे. फाळणीपूर्व परिस्थितीकडे आपण चाललो आहोत की काय अशी भयशंका निर्माण व्हावी, अशी ही परिस्थिती. अल जवाहिरीसारख्या मानवतेच्या शत्रूंसाठी हा चालून आलेला मोकाच.
..................................................................................................................................................................
अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5312/Checkmate
..................................................................................................................................................................
वाईट बाब हीच की, या जवाहिरीसारख्यांना या संधीचे सोने करता यावे, यासाठी आपण सारे जणू तयारीतच बसलो आहोत. आपल्या द्वेषभक्त वृत्तवाहिन्यांनी जवाहिरीच्या या ताज्या ध्वनिचित्रफितीची बातमी ज्या पद्धतीने रंगवली ते पाहिले की वाटावे, त्या जणू अल-कायदाला सुयशच चिंतीत आहेत. या वाहिन्यांवरून सामान्य जनतेच्या मनात अहोरात्र विद्वेषाचे विष ओतले जात आहे.
आपल्याकडे विषकन्यांची एक दंतकथा आहे की, लहानपणापासून त्यांना रोज थोडे थोडे विष खाऊ घातले जात असे. आपल्या मनांचेही तसेच करण्यात येत आहे. या अशा विखारी मनांना मग कुणावरील अन्याय, अत्याचार दिसतच नाही. नाझी जर्मनीत हेच झाले होते. तेथील ज्यूंवर अनन्वित अत्याचार होत असताना सामान्य कुटुंबवत्सल, धार्मिक, मध्यमवर्गीय जर्मन कुटुंबांना त्याचे काहीच वाटत नव्हते. तो जणू जीवनाचा भाग म्हणून त्यांनी स्वीकारला होता.
आपणांसही असेच दगड बनवण्यात येत आहे. या दगडांवरच त्यांच्या सत्तेचे इमले उभे करण्यात येत आहेत. जवाहिरीने येथील मुस्लिमांना हिजाबबंदीविरोधात आवाज उठवण्याचे आवाहन केले आहे. यातून जे घडणार आहे ते स्पष्टच दिसत आहे. आता अल-कायदाकडे बोट दाखवत अतिरेकी हिंदुत्ववादी संघटना पुन्हा एकदा सामान्य हिंदूंसमोर इस्लामी दहशतवादाची भोकाडी उभी करतील. इस्लामी अतिरेकी नेते आणि संघटना त्याकडे बोट दाखवून मुस्लीम जनतेला घाबरवून सोडून आपला प्रभाव वाढवतील. यातून जवाहिरीसारख्यांचे इरादे मात्र सफल होत जातील. राष्ट्रहीत सर्वोपरी वगैरेचा जप करत राष्ट्राच्या पायावरच कुऱ्हाडी चालवण्याचे हे धंदे. त्यात आपण भागीदार असणार का, हाच खरा ‘राष्ट्रीय प्रश्न’ आहे.
................................................................................................................................................................
लेखक रवि आमले ज्येष्ठ पत्रकार असून, त्यांचे ‘प्रोपगंडा’ हे पुस्तक प्रसिद्ध आहे.
ravi.amale@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment