मार्क्सच्या धर्माच्या विचारांकडे वळण्याआधी ‘धर्म ही लोकांची अफूची गोळी आहे’ या विधानाबद्दल तीन गोष्टी सांगू इच्छितो. एक- त्या काळात आधुनिक काळासारखी वेदनाशामक औषधे नव्हती. अफू ही वेदनाशामक औषध म्हणून वापरली जायची. त्यामुळे या संदर्भात अफू या शब्दाचे योग्य भाषांतर (इंग्रजीतसुद्धा) ‘वेदनाशामक’ असे पाहिजे. म्हणजे, नशा हा प्रकार इथे येत नाही. दोन- हे सुप्रसिद्ध वाक्य असलेला संपूर्ण परिच्छेद खोल आणि जास्त बारकावे असलेला आहे. तो पुढे आपण बघणार आहोतच. तीन- जर उद्धृत करायला फक्त एकच विधान निवडायचे असेल तर मी त्या परिच्छेदातील एक जास्त योग्य, काव्यात्मक उपमा निवडेन. तो म्हणतो, ‘धर्म हा हृदयहीन जगाचे हृदय आहे’. इथे त्याचा रोख धर्मापेक्षा अन्यायी हृदयहीन समाजाकडे आहे, असे दिसते. अर्थात, या विधानानेसुद्धा मार्क्सच्या धर्माविषयीच्या विचारांचे संपूर्ण आकलन होत नाही.
मार्क्सच्या विश्लेषणाची पद्धत
मार्क्सवाद कोणत्याही विषयावर नेहमी मानव आणि समाज यांचा एकत्र अभ्यास करतो. त्यांचा एकमेकांशी असलेला संबंध सामाजिक बदलांच्या ऐतिहासिक संदर्भात बघतो. धर्माबाबत बोलायचे झाल्यास ही अमूर्त कल्पना नाही. ती समाजाशी घट्ट बांधली गेली आहे. मार्क्सची सर्वसाधारण (general) पद्धत किंवा मार्गदर्शक तत्त्वे (गाइडिंग प्रिन्सिपल) थोडक्यात खालीलप्रमाणे अशी सांगता येतील - कोणतीही व्यक्ती समाजापासून दूर राहू शकत नाही. ती समाजाशी घट्टपणे बांधलेली असते. वरवर पाहता त्याचे समाजाशी संबंध एका पातळीवर जात, धर्म, कुटुंब; तर दुसऱ्या पातळीवर व्यवसाय, वर्ग इत्यादी गोष्टींतून दिसतात. मात्र मार्क्स फार खोलात जातो. त्याच्या म्हणण्यानुसार समाजाशी व्यक्ती ही शारीरिक किंवा बौद्धिक श्रमातून जोडलेली असते. इथे जोडले जाण्याची प्रक्रिया दोन तऱ्हेने होते.
..................................................................................................................................................................
.................................................................................................................................................................
पहिली गोष्ट, वैयक्तिक श्रम. दुसरी गोष्ट, स्वतःच्या किंवा दुसऱ्याच्या श्रमाचे संचित. हे श्रम हे उत्पादन पद्धतीचा भाग असतात. उत्पादन पद्धतीची दोन अंगे आहेत. एक- उत्पादनाची साधने. यात उत्पादन प्रक्रिया, व्यापार, सेवा व्यवसाय कशा प्रकारचे आहे, ते कसे होतात, तंत्रज्ञान इत्यादी गोष्टी येतात. दोन- उत्पादन संबंध. कोण कुणाचे श्रम वापरतो, कोण उत्पादनाचे संचय करून त्याचा पुढे वापर करतो, इत्यादी गोष्टी येतात.
मार्क्सच्या मांडणीनुसार या उत्पादन पद्धतीवर संस्कृती उभी राहते. उत्पादन पद्धतीत सर्व मानवी विश्व साकारते. (उदाहरणार्थ, भांडवलशाही ही फक्त आर्थिक व्यवस्था नाही, तर ती समाजाच्या सर्व अंगांना स्पर्श करणारी, सर्व विचार ठरवणारी व्यवस्था आहे). तिच्याशी सुसंगत सामाजिक जाणीवा निर्माण होतात. किंवा या विश्वाशी सुसंगत अशा कुटुंब, मालमत्ता, कायदे, अर्थशास्त्र, राजसत्ता, धर्म, तत्त्वज्ञान, इतिहास, साहित्य इत्यादींच्या विचारधारा निर्माण होतात. यावर मार्क्स मांडणी करतो, “मानव जातीची जाणीव तिचे अस्तित्व ठरवत नाही, तर उलटपक्षी तिचे सामाजिक अस्तित्व तिची जाणीव ठरवते.”
पण परिस्थिती स्थिर नसते. ही उत्पादन पद्धत समाजाच्या विकासाचा विशिष्ट टप्पा असते. मानवाच्या बुद्धीमुळे तंत्रज्ञानाचा विकास किंवा नवीन शोध, यामुळे उत्पादनाची साधने विकसित होत असतात. त्याच वेळी विविध वर्गात आणि विशेषतः प्रमुख मालकी हक्क असलेल्या अनेक वर्गाशी संघर्ष चालू असतो. मार्क्स पुढे जाऊन म्हणतो की, उत्पादन साधनांच्या विकासाला जेव्हा उत्पादन संबंध अडथळा आणतात, तेव्हा क्रांती होऊन विकसित उत्पादन साधनांशी सुसंगत असे नवे उत्पादन संबंध निर्माण होतात. क्रांतीच्या बाजूने आणि विरुद्धचे लढे हे विविध विचारधारांनी लढले जातात. (अगदी धर्माचे राजकारण होऊन धर्माचा उपयोग आणि दुरुपयोग होतो.). मार्क्सच्या शब्दांत समाज आणि त्यातील बदलांचे हे एक मार्गदर्शक तत्त्व आहे. यालाच पुढे मार्क्सवाद्यांनी ‘ऐतिहासिक जडवाद’ (हिस्टॉरिकल मटेरिआलिझम) म्हटले. हे मार्क्सच्या विचारांचे सार आहे. मार्क्स जगाचे केवळ विश्लेषण करून थांबत नाही. तो पुढे म्हणतो की, “तत्त्वज्ञानींनी विविध प्रकारे जगाचे विश्लेषण केले आहे, परंतु मुद्दा जग बदलण्याचा आहे.”
..................................................................................................................................................................
अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5312/Checkmate
..................................................................................................................................................................
ही स्वतःची पद्धत वापरून मार्क्सने विपुल लिखाण केले आहे. ही पद्धत म्हणजे मार्क्सने दिलेले फक्त वैचारिक हत्यार आहे. परीक्षांच्या गाइडसारखी रेडिमेड उत्तरे नव्हेत. केवळ संदर्भ तोडून काढलेली मार्क्सची विधाने कमीत कमी वापरत त्याच्या विचारांचा विकास आणि पद्धतीचे उपयोजन करावे लागते. त्यामुळे मार्क्सवाद्यांचे एकमेकांनी केलेल्या विश्लेषणांवर आणि निष्कर्षांवर एकमत असतेच असे नाही, विवाद असू शकतो. या विवादातून मार्क्सने केलेले विश्लेषण आणि निष्कर्ष यांचीपण सुटका नाही! मी मार्क्सवाद आणि मार्क्सचे विचार यात सहेतुक फरक करतोय, याची वाचकांनी दखल घ्यावी.
मार्क्सचे आणि मार्क्सवादाचे धर्मावरील लिखाण
मार्क्सवाद धर्माचा अभ्याससुद्धा त्याच पद्धतीने करतो. मार्क्सने (आणि एंगल्सने) धर्माविषयी स्वतंत्र असे फार लिहिलेले नाहीये. त्याच्या मार्गदर्शक तत्त्वाच्या आधारित विविध विषयांच्या संदर्भात धर्मावरचे विचार विखुरलेले आहेत. अर्थातच, मी मार्क्सचे धर्मविषयीचे सर्व विचार इथे मांडू शकत नाहीत. या लेखाच्या मर्यादेत एक उत्तम उदाहरण म्हणजे ‘धर्म ही लोकांची अफूची गोळी आहे’ आणि ‘धर्म हा हृदयहीन जगाचे हृदय आहे’ ही सुप्रसिद्ध विधाने असलेल्या लेखाचा अंश बघू यात. माझ्या मते, या लिखाणात मार्क्सच्या मार्गदर्शक तत्त्वाची, ऐतिहासिक जडवादाची आणि धर्मावरील विचारांची मुळे दिसतात.
तो म्हणतो, “धर्म हा मानवाची स्वतःची जाणीव आणि स्वाभिमान आहे. या मानवाने अजून स्वतःला हशील केलेले नाही किंवा स्वतःला पुन्हा हरवले आहे. परंतु मानव ही काही जगाबाहेर बसलेली एक अमूर्त संकल्पना नाही. मानव हा मानवाने बनवलेले जग आहे. ते जग म्हणजे शासन आणि समाज. हे शासन आणि हा समाज धर्म निर्माण करतात. हा धर्म या जगाचे उरफाटे भान असते. याचे कारण शासन आणि हा समाज हीच मुळी उरफाटी जगं आहेत. धर्म हा या जगाचा एकंदरीत सर्वसाधारण सिद्धांत, धर्म हा जगाचा सर्वसमावेशक सारसंग्रह, धर्म हे जगाचे लोकप्रिय असलेले तर्कशास्त्र, धर्म हा जगाचा आध्यात्मिक शान (point d’honneur) आहे, धर्म हा जगाचा उत्साह, धर्म ही जगाची नैतिक मंजुरी, धर्म ही जगाची गंभीर पूरकता (complement), धर्म हा जगाचे समर्थन करणारा पाया आहे. धर्म हा माणुसकीचा गाभा, स्वप्नरंजित जाणीव आहे. स्वप्नरंजित जाणीव आहे. याचे कारण खरा माणुसकीचा गाभा अजून अस्तित्वात यायचा आहे. म्हणूनच धर्माविरुद्धचा लढा हा अप्रत्यक्षपणे धर्माची आध्यात्मिक दरवळ असलेल्या जगाविरुद्धचा लढा आहे.”
या ठिकाणी मार्क्सची खास आयडिऑलॉजीची किंवा सामाजिक जाणिवेमुळे आलेली विचारधारेची संकल्पना बघावी लागेल. धर्म हा काही केवळ फुटकळ अंधश्रद्धा किंवा मिथ्या विश्वासांचा संच नसतो, तर धर्म एक प्रकारची आयडिऑलॉजी आहे. तसेच हा दुरावलेल्या जगाचा एकंदरीत सर्वसाधारण सिद्धांत (general theory) असतो. मानवाने स्वतःला गमावले आहे. या मानवाच्या जगापासून झालेल्या दुराव्याची प्रतिक्रिया म्हणजे, धर्म.
इथे alienation म्हणजे परकेपणाची किंवा दुरावल्याची भावना ही संकल्पना खास मार्क्सवादाने विकसित केली. ही धर्माच्या संदर्भात महत्त्वाची आहे. समाज धर्म निर्माण करतो. धर्म हा समाजाकडे बघण्याचा ‘उरफाटा’ दृष्टीकोन असतो. या उरफाट्या जगात मानवतेपेक्षा लोकांनी बनवलेल्या गोष्टींचे प्राबल्य असते. या दुरावलेल्या जगात दुरावलेली माणसे आपला दुरावलेला समाज आणि दुरावलेल्या आयुष्याचा अर्थ लावायचा प्रयत्न करतात. म्हणूनच ‘धर्म हे जगाचे लोकप्रिय असलेले तर्कशास्त्र आहे’. या तर्कशास्त्रामुळे कित्येक जहाल, पुरोगामी, अगदी क्रांतिकारक लढे हे धार्मिक रूपे घेतात. लढ्यांना धार्मिक रंग मिळतो. धार्मिक लोक चळवळीत सामील होतात.
धर्म हा वेगवेगळ्या समृद्ध भूमिका निभावतो. उदाहणार्थ, सर्वसमावेशक सारसंग्रह (encyclopedic compendium), धर्म ही जगाची आध्यात्मिक शान, धर्म हा जगाचा उत्साह इत्यादी. धर्म नाहीसा झाल्याशिवाय खरा माणुसकीचा गाभा अस्तित्वात येऊ शकत नाही, असं मार्क्सचे म्हणणे आहे. म्हणूनच ‘धर्माविरुद्धचा लढा हा अप्रत्यक्षपणे धर्माची आध्यात्मिक दरवळ असलेल्या जगाविरुद्धचा लढा आहे.’ या दुरावलेल्या जगात लोकांना धर्माची गरज असते. मार्क्स त्याच्या निष्कर्षावर एवढा उत्साही आहे की, तो त्याचे म्हणणे उपमा, सुभाषिते वापरून परत परत सांगतो. म्हणून तो पुढे म्हणतो- ‘‘धार्मिक दुःख हे एकाच वेळेस वास्तवातील दुःख व्यक्त करते आणि त्याच बरोबर वास्तवातील दुःखाचा निषेध पण करते. धर्म हा पददलितांनी सोडलेला निःश्वास आहे. धर्म म्हणजे हृदयहीन जगाचे हृदय आहे आणि आत्माहीन परिस्थितीचा आत्मा आहे. धर्म ही लोकांची अफूची गोळी आहे.”
आधी म्हटल्याप्रमाणे नुसते विश्लेषण नव्हे, तर जग बदलणेदेखील महत्त्वाचे असते. म्हणून तो धर्माच्या विनाशाचा विचार सांगतो. धर्मविरोधी लढा म्हणजे ज्या सामाजिक परिस्थितीने धर्माला निर्माण केले, त्या परिस्थितीच्या विरुद्धचा लढा आहे.
..................................................................................................................................................................
उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...
हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal
................................................................................................................................................................
धर्म हे माणसाचे भ्रामक सुख आहे. लोकांच्या आभासी किंवा भ्रामक सुख असलेल्या धर्माचा नाश करणे म्हणजे त्यांच्या खऱ्या सुखाची मागणी करणे. लोकांना त्यांच्या परिस्थितीचा आभास किंवा सोडायचे आवाहन करणे म्हणजेच आभास असण्याची गरज असलेली परिस्थिती सोडायचे आवाहन करणे. त्यामुळेच धर्मचिकित्सा ही मूलतः या दुःखाश्रूंच्या दरीची ‘vale of tears’ चिकित्सा आहे. धर्म हा दुःखाश्रूंच्या दरीतून दिसणारे तेजोवलय आहे.
मार्क्स धर्माला पारलौकिक जगाला न जोडता त्याच्या जडवादी भूमिकेशी सुसंगत अशा लौकिक जगाला जोडतो. ख्रिश्चन धर्मात दुःखमय आशा या लौकिक जगाला ‘vale of tears’ म्हटले आहे. ‘Marx (and Engels) on Religion’ या नावाचे काही संग्रह पुस्तकरूपाने उपलब्ध आहेत. लिखाण मार्क्स आणि एंगल्स यांचे असले तरी संपादकांच्या नोंदी आणि त्यांचे लिखाण हे त्यांनी त्यांच्या शब्दात मार्क्सचा अर्थ सांगितला आहे. इंटरनेटवरसुद्धा एक पुस्तक मोफत उपलब्ध आहे. त्या सर्व लिखाणात एक गोष्ट सामायिक आहे. ती म्हणजे हे लिखाण धर्मांची शिकवण, पंथ, धार्मिक चळवळी आणि संघर्ष अशा गोष्टी जशा दिसतात तशा स्वीकारत नाही. त्याच बरोबर त्यांना मूर्खपणा किंवा धर्मगुरूंनी केलेली फसवणूक समजत नाही. तर ते लिखाण त्या गोष्टींना विचारधारांप्रमाणे होणाऱ्या सामाजिक जाणिवांची अभिव्यक्ती समजते.
वरील लिखाणातून दिसते की मार्क्स आणि एंगल्स हे धर्माचे समाजातील, लोकांच्या जाणिवेतील धर्माचे स्थान तटस्थपणे दाखवतात. त्याचबरोबर धर्माचे क्रांतिकारी आणि प्रतिक्रांतिकारी स्वरूप दाखवतात. त्यांना धर्माबद्दल सहानभूती नक्कीच आहे. म्हणूनच मार्क्स म्हणतो- ‘धर्म हा हृदयहीन जगाचे हृदय आहे.’
धर्मावरील मार्क्सवादी लिखाण
मार्क्सवादी समाजशास्त्रीय विचार हे सूक्ष्म (macro) पातळीवर आहेत. काही व्यक्तींचे विचार, त्यांचे मानसशास्त्रीय विश्लेषण म्हणजे सूक्ष्म पातळीवर मार्क्सवाद काहीही बोलत नाही. एखादी व्यक्ती धार्मिक का बनते किंवा धर्माचा त्याग का करते, याचे विश्लेषण मार्क्सवाद करत नाही. तो मार्क्सवादाचा प्रांत नव्हे. धर्म ही ज्याची-त्याची प्रचिती असते. मात्र समाजातील वाढता निधर्मीपणा (उदाहरणार्थ : स्कँडेनेव्हियन देशांमधील वाढता नास्तिकपणा) किंवा समाजातील वाढता धार्मिक उन्माद (उदा. भारत, अमेरिका), अशा अनेक गोष्टींवर मार्क्सवादी परिप्रेक्ष्यातून विश्लेषण करता येऊ शकते.
सुप्रसिद्ध इतिहासकार डी. डी. कोसंबी यांनी प्राचीन भारताच्या इतिहासातील निरीक्षणांवरून मार्क्सवादी पद्धतीने निष्कर्ष काढले. प्राचीन इतिसावरील लेखनात विशेषतः पुराणकथा आणि वास्तवता या पुस्तकात, हिंदुधर्मावरील लिखाण आणि नोंदी लक्षणीय आहेत. हिंदुधर्माच्या अभ्यासकांनी कोसंबींची पुस्तके आणि लेख वाचले पाहिजेत. या विषयावर वेगळा लेख होऊ शकतो. एम. एन. रॉय यांचे ‘हिस्टॉरिकल रोल ऑफ इस्लाम’ यात मार्क्सवादी दृष्टिकोनातून इस्लामच्या घडणीच्या इतिहासाचे विश्लेषण केले आहे. पॉल एन. सिगेल यांचे ‘दी मिक अँड दी मिलिटंट : रिलिजन अँड पॉवर अक्रॉस दी वर्ल्ड’ हे पुस्तक मार्क्सवादी धर्मविचार, ख्रिश्चन, इस्लाम, हिंदुधर्म, बुद्धधर्म, डाव्या पक्षांचे धार्मिक राजकारण आदींची विस्तृत चर्चा करते. मात्र या पुस्तकात हिंदू आणि बुद्ध धर्मावरचे विवेचन त्रोटक आहे आणि त्यात त्रुटी आहेत.
धर्माच्या संबंधातील मार्क्सवादी राजकारण
धर्म ही फक्त प्रार्थनास्थळी किंवा घरी आचरणाची पद्धत किंवा वैयक्तिक अनुभूती नसते. आतापर्यंत तो समाजाचा महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे धर्म आणि सामाजिक आणि राजकीय चळवळी, या दोन गोष्टी कित्येक वेळा वेगळ्या करता येत नाहीत. मार्क्सवादी स्वतः अधार्मिक आणि नास्तिक असले तरी चळवळीतील सहभागी जनता अधार्मिक आणि नास्तिक असावी, अशी अपेक्षा अजिबात नसते. किंबहुना, मार्क्सवादी व्यक्ती आणि पक्ष काही वेळेस समाजात मोठ्या प्रमाणात साजरे होणाऱ्या धार्मिक उत्सवात सहभागी होतात. यात धर्माची समाजातील घटक एकत्र आणण्याची भूमिका असते, त्या वास्तवाचा स्वीकार असतो आणि समाजाप्रती बंधुभाव (आणि भगिनीभाव) असतो. पण त्याचबरोबर पक्षाचा प्रचार हासुद्धा एक भाग आहे, असे माझे मत आहे. मी कोणत्याही डाव्या पक्षाशी संबंधित नाही. त्यामुळे त्यांच्या राजकारणावर मी अधिकृत काहीच बोलू शकत नाही. असो.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
धर्माचा उपयोग हा पुरोगामी लढ्यासाठी होतो, तसाच प्रतिगामी लढ्यासाठी होतो. प्रतिगामी शक्ती धार्मिक संस्थांना ताब्यात घेऊ शकतात. भारतात हे आपण पाहत आहोत. धर्मगुरू हे प्रतिगामी राजकारण रेटू शकतात. म्हणून सोव्हिएत युनियनने धर्मसंस्थांचे राजकीय पंख कापले होते. त्यामुळे कम्युनिस्ट धर्मविरोधी समजले गेले. खरे तर रशियन क्रांतीच्या वेळी लेनिनने धर्मगुरूंनासुद्धा बरोबर घेतले होते! सोव्हिएत युनियनमध्ये धार्मिक अनुयायींची संख्या रोडावली होती, तरी धार्मिक संस्थांचा कारभार चालू होता.
मार्क्सचे धर्माचे आकलन, आशावाद, धर्मविरोधी लढ्याविषयीचे विचार हे मला जसे आकळले, ते माझ्या शब्दांत मांडण्याचा हा प्रयत्न वाचकांना भावेल, ही आशा आहे.
(‘मुक्त-संवाद’ या पाक्षिकाच्या १ एप्रिल २०२२च्या अंकातून साभार)
..................................................................................................................................................................
लेखक डॉ. प्रमोद चाफळकर अमेरिकास्थित अभ्यासक आहेत. समाज, संस्कृती, तत्त्वज्ञान हे त्यांच्या चिंतनाचे विषय आहेत.
independent.free.thinker@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment