समाजसुधारक, विदुषी, ख्रिस्ती मिशनरी पंडिता रमाबाईंच्या स्मृतिशताब्दीची उद्या, ५ एप्रिल २०२२ रोजी सांगता होत आहे. त्यानिमित्ताने हा विशेष लेख…
..................................................................................................................................................................
पंडिता रमाबाई या चाकोरीबद्ध वाट सोडून स्वत:च्या नव्या वाटा निर्माण करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या. ज्या काळात महिलांना स्वत:चे स्वतंत्र व्यक्तिमत्त्व नसे, त्या काळात कुटुंबातील वा नातलगांमधील कुणाही कर्त्या पुरुषाचा आधार नसताना या एकाकी महिलेने प्रवाहाविरुद्ध पोहण्याचे धाडस दाखवले. त्यांच्या स्वत:च्या धर्मांतरामुळे, बालविधवांच्या पुनर्वसन कार्यामुळे आणि नंतर ख्रिस्ती मिशनरी या नात्याने समाजातील अनाथ-असाहाय्य घटकांचा सांभाळ करण्याच्या वृत्तीमुळे समाजात निर्माण झालेल्या अनेक वादळांना या विदुषीने खंबीरपणे तोंड दिले.
रमाबाईंचा जन्म कर्नाटकात मेंगलोरजवळील गंगामूळ या गावी २३ एप्रिल १८५८ रोजी झाला. त्यांचे वडील अनंतशास्त्री (अनंतपद्मनाभ) परमेश्वर डोंगरे हे संस्कृत पंडित होते. चित्पावन ब्राह्मण कुळातील अनंतशास्त्रींनी आपल्या पत्नीला, लक्ष्मीबाईला संस्कृत शिकवले. रमाबाई केवळ सहा महिन्यांच्या असताना अनंतशास्त्री आपल्या कुटुंबासह म्हणजे पत्नी, मुलगा आणि दोन मुलींसह तीर्थयात्रेसाठी घराबाहेर पडले. १५ वर्षे तीर्थाटन केल्यानंतर हे कुटुंब मद्रास इलाख्यात पोहोचले. त्या वेळी तेथे भीषण दुष्काळ पडला होता. त्याने अनंतशास्त्रींचा आणि त्यांच्या पत्नीचा बळी घेतला. रमाबाई, त्यांचा थोरला भाऊ श्रीनिवास आणि थोरली बहीण कृष्णाबाई पोरके झाले.
..................................................................................................................................................................
.................................................................................................................................................................
इथून रमाबाईंच्या संघर्षमय आयुष्याला सुरुवात झाली. आई-वडिलांच्या निधनानंतरही या तरुण भावंडांनी आपली तीर्थयात्रा चालू ठेवली. त्यानंतर काही महिन्यात रमाबाईंच्या थोरल्या बहिणीचे कृष्णाबाईचे निधन झाले. पित्याच्या मार्गदर्शनाखाली श्रीनिवासशास्त्री आणि रमाबाईंनी संस्कृतचे व हिंदू धर्मशास्त्राचे गाढे ज्ञान संपादन केले होते. पुराण सांगत आणि संस्कृतमधून व्याख्याने देत हे बहीण-भाऊ पुढे फिरत राहिले. १८७८ साली कलकत्त्यात पोहोचले. या शहरात त्यांच्या ज्ञानाची कदर करणारे लोक भेटले. ब्राह्मो समाजाच्या आणि कोलकातातील विद्यापीठाच्या पंडितांनी या तेजस्वी तरुणांना आदराची वागणूक दिली.
श्रीनिवासशास्त्री आणि रमाबाईंच्या संस्कृतवरील प्रभुत्वाने कलकत्त्यातील विद्वान मंडळी चकित झाली. ज्या काळात महिलांना शिक्षणाचा अधिकार नाकारला जात होता, त्या काळात या महिलेचे संस्कृतवरील प्रभुत्व ही निश्चितच कौतुकाची बाब होती. कलकत्ता विद्यापीठात झालेल्या विद्वानांच्या सभेत या वेळी रमाबाईंना ‘सरस्वती’ उपाधी सन्मानाने देण्यात आली. तेव्हापासून रमाबाई डोंगरे ही युवती ‘पंडिता रमाबाई सरस्वती’ या नावाने संपूर्ण हिंदुस्थानभर ओळखली जाऊ लागली.
रमाबाईंविषयी मुंबईच्या एका दैनिकात १८७८च्या जुलै महिन्यात पुढील बातमी प्रसिद्ध झाली - “हल्ली कलकत्त्यास रमाबाई नावाची कोणी मराठी स्त्री आली आहे. तिने कलकत्त्यात काही दिवस मुक्काम करून तेथील विद्वान मंडळीस चकित करून सोडले आहे. बाई संस्कृत भाषा बोलते, जागच्या जागी संस्कृत काव्य करते. तिचे वय बावीस वर्षांचे असून ती अविवाहित आहे. महाराष्ट्रीयन असली तरी कर्नाटक प्रांतातून आली आहे.” या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली. स्त्री असूनही ही संस्कृत भाषा कशी शिकली, २२ वर्षे ओलांडून अजून ती अविवाहित कशी, मराठी असूनही महाराष्ट्रात तिच्याविषयी कुणालाच काही कशी माहिती नाही, असे विविध प्रश्न रमाबाईंविषयी मुंबई-पुण्यात विचारले जाऊ लागले.
त्यानंतर रमाबाई आणि त्यांचे बंधू आसामात सिल्हट येथे आणि बंगालमधील ढाका येथे गेले. ढाक्यात असताना श्रीनिवासशास्त्री आजारी पडले. तेथे त्यांचे ८ मे १८८० रोजी निधन झाले. दरम्यानच्या काळात रमाबाईंची बिपीन बिहारीदास मेधावी या बंगाली व्यक्तीशी ओळख झाली होती. त्यांनी रमाबाईंना लग्नाची मागणी घातली. १३ जून १८८० रोजी बांकीपूर शहरात रजिस्ट्रारसमोर नोंदणी पद्धतीने या दोघांचा विवाह झाला. त्या काळात रमाबाईंनी नोंदणी पद्धतीने विवाह केला, या घटनेने समाजात मोठी खळबळ उडाली. लग्नानंतर सिल्हट येथे बिपीन बिहारीदास वकिली करू लागले. १६ एप्रिल १८८१ रोजी रमाबाईंच्या मनोरमा या मुलीचा जन्म झाला. मात्र रमाबाईंना वैवाहिक सुख फार काळ लाभले नाही. लग्नानंतर केवळ १९ महिन्यांनी म्हणजे ४ फेब्रुवारी १८८२ रोजी बिपीन बिहारींचा अल्पशा आजाराने मृत्यू झाला. आपल्या तान्ह्या मुलीला घेऊन पंडिता रमाबाईंनी महाराष्ट्राची वाट धरली.
..................................................................................................................................................................
अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5312/Checkmate
..................................................................................................................................................................
पुण्यात आल्यावर रमाबाईंचे न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या पत्नी रमाबाई रानडे यांच्याशी घनिष्ट संबंध जुळले. त्यांच्याविरुद्ध पुण्यात प्रतिकूल वातावरण निर्माण झाल्यानंतरही रमाबाई रानड्यांनी पंडिता रमाबाईंना भावनिक आधार दिला. याशिवाय पुण्यात त्यांच्या सभा आयोजित करण्यात रमाबाई रानड्यांनी आणि प्रसिद्ध मराठी कादंबरीकार हरी नारायण आपटे यांनी पुढाकार घेतला होता.
याच काळात ब्रिटिश सरकारने सर डब्ल्यू. हंटर या शिक्षणतज्ज्ञाच्या अध्यक्षतेखाली शिक्षण आयोगाची नेमणूक केली. या हंटर कमिशनसमोर पंडिता रमाबाईंनी दिलेली हिंदुस्थानातील महिलांच्या शिक्षणाबद्दलची साक्ष खूप गाजली. हिंदुस्थानातील प्रचलित सामाजिक व्यवस्थेमुळे या देशात महिला डॉक्टरांची खूप गरज आहे. त्यामुळे स्त्रियांसाठी वैद्यकीय शिक्षण व्यवस्था करावी, असे त्यांनी सुचवले होते. हंटर कमिशनच्या सदस्यांनी रमाबाईंची उलटतपासणीही घेतली. त्यांना त्या वेळी इंग्रजीचे फारसे ज्ञान नव्हते, त्यामुळे त्यांनी मराठीतून साक्ष दिली. त्यांच्या साक्षीने सर हंटर फारच प्रभावित झाले. त्यांनी रमाबाईंच्या साक्षीचे इंग्रजी रूपांतर करून छापून घेतले, इतकेच नव्हे तर इंग्लंडला परतल्यानंतर तेथे त्यांच्या कार्यासंबंधी व्याख्यानही दिले.
त्यानंतर थोड्याच काळात पंडिता रमाबाईंनी शिक्षण घेण्यासाठी इंग्लंडला प्रस्थान केले. मुलगी मनोरमासुद्धा त्यांच्याबरोबर होती. इंग्लंडमध्ये असतानाच वॉण्टेज शहरात त्यांनी आपल्या मुलीसह २९ सप्टेंबर १८८३ रोजी बाप्तिस्मा घेऊन ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला. या घटनेपासून या विदुषीच्या आयुष्याचे नवे पर्व सुरू झाले. रमाबाई इंग्लंडला गेल्या तर ख्रिस्ती होतील, ही महाराष्ट्रातील काही पुढाऱ्यांची भीती खरी ठरली. अपेक्षेप्रमाणे या घटनेने त्या काळात महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली होती.
इंग्लंडमध्ये १८८६पर्यंत म्हणजे तीन वर्षे राहून रमाबाईंनी आपला अभ्यासक्रम पूर्ण केला. याच दरम्यान महाराष्ट्रातून आनंदीबाई गोपाळराव जोशी अमेरिकेत वैद्यकीय शिक्षणासाठी गेल्या होत्या. वैद्यकीय शिक्षणासाठी अमेरिकेत जाणाऱ्या आनंदीबाई पहिल्या भारतीय महिला, तर उच्चशिक्षणासाठी इंग्लंडला जाणाऱ्या पंडिता रमाबाई या दुसऱ्या महाराष्ट्रीयन महिला. महाराष्ट्रातील सामाजिक कार्यकर्ते आणि प्रार्थना समाजाचे नेते डॉ. आत्माराम पांडुरंग तर्खडकर यांच्या कन्या अन्नपूर्णा किंवा ॲना तर्खडकर इंग्लंडला उच्चशिक्षणासाठी जाणाऱ्या पहिल्या महाराष्ट्रीयन महिला. आनंदीबाई जोशी आणि पंडिता रमाबाई सरस्वती यांची पूर्वी कधीही गाठभेट झाली नव्हती. मात्र आनंदीबाईंच्या वैद्यकीय पदवीदान समारंभास उपस्थित राहण्यासाठी पंडिता रमाबाई कन्येसह इंग्लंडहून अमेरिकेत गेल्या.
त्यानंतर रमाबाईंचे अमेरिकेत अडीच वर्षे वास्तव्य होते. या काळात त्यांनी अमेरिकेच्या विविध भागांत व्याख्याने दिली. तेथील महिलांच्या संस्था, तेथील शिक्षणपद्धतीचा त्यांनी अभ्यास केला. आपल्या व्याख्यानातून त्यांनी अमेरिकन जनतेत हिंदुस्थानातील महिलांच्या, विशेषत: बालविधवांच्या परिस्थितीबाबत जागृती निर्माण केली. या जागृतीमुळे हिंदुस्थानात पंडिता रमाबाईंच्या महिलांविषयक कार्यास मदत करणाऱ्या ‘रमाबाई असोसिएशन’ या संस्थेचा जन्म झाला. हिंदुस्थानात हे कार्य करण्यासाठी आर्थिक मदत करण्याची हमी या संस्थेने स्वीकारली.
हिंदुस्थानात उच्चवर्णीय बालविधवांसाठी शाळा चालवणे हे रमाबाई असोसिएशनचे प्रमुख उद्दिष्ट होते. या शाळेची शैक्षणिक पद्धती पूर्णत: पंथरहित असावी, असा या संस्थेच्या घटनेत महत्त्वाचा नियम होता. या संस्थेच्या सल्लागार मंडळात रावबहादूर रामकृष्ण गोपाळ भांडारकर, रावबहादूर महादेव गोविंद रानडे यांचा समावेश होता.
भारतात परतल्यानंतर पंडिता रमाबाईंनी रमाबाई असोसिएशनच्या वतीने मुंबईत चौपाटीजवळ ११ मार्च १८८९ रोजी ‘शारदा सदन’ या संस्थेची स्थापना केली. या सदनाच्या पहिल्या बालविधवा विद्यार्थिनी गोदूबाई. पुढे महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्याशी त्यांचा पुनर्विवाह होऊन त्या आनंदीबाई वा बाया कर्वे या नावाने सुपरिचित झाल्या.
या विवाहनंतर रमाबाईंनी शारदा सदनात मोठी जेवणावळ घातली. बाया कर्वे यांनी आपल्या ‘माझे पुराण’ आत्मचरित्रात म्हटले आहे- ‘बाईंनी मला दागिने व कपडे दिले. त्यांच्या जावयाला कर्व्यांना कपडे दिले.’ पंडिता रमाबाईंच्या या जावयाने पुढे शिक्षण क्षेत्रात महत्त्वाचे योगदान दिले आणि वयाची शंभरी गाठल्यानंतर त्यांचा पंडित नेहरूंच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तेव्हा त्यांनी आपल्या भाषणात पंडिता रमाबाई, डॉ. भांडारकर आणि गोपाळ कृष्ण गोखले आदी व्यक्तींच्या ऋणांचा आदरपूर्वक उल्लेख केला होता.
..................................................................................................................................................................
उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...
हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal
................................................................................................................................................................
१८९०च्या नोव्हेंबरात रमाबाईंनी शारदा सदनचे मुंबईतून पुण्यातील कॅम्पात स्थलांतर केले. ते ज्या संस्थेतर्फे चालवले जात होते, ती रमाबाई असोसिएशन ही मिशनरी संस्था नसल्याने तिचे काम सेक्युलर पद्धतीने चालवावे, असा स्पष्ट नियम होता. रमाबाई स्वत: ख्रिस्ती असल्या तरी सदनातील बालविधवांच्या धार्मिक बाबतीत त्यांनी ढवळाढवळ करू नये, असा सल्लागार मंडळींचा आग्रह होता. मात्र शारदा सदनच्या चालिका स्वत: हे कार्य येशू ख्रिस्ताच्या सेवेसाठी चालवत असल्याने त्यांच्या जीवनपद्धतीचा, विचारसरणीचा प्रभाव सदनातील मुलींवर पडणे साहजिकच होते. यातूनच रमाबाई सदनातील असाहाय्य मुलींवर धर्मांतराची सक्ती करतात, छुप्या पद्धतीने ख्रिस्ती धर्माचा प्रचार करत आहेत, असे आरोप केले जाऊ लागले.
शारदा सदनचे काम चालू असतानाच पंडिता रमाबाई हिंदुस्थानच्या राष्ट्रीय चळवळीतही सक्रियपणे भाग घेत. रमाबाईंच्या प्रयत्नांमुळे काँग्रेस संघटनेत स्त्री प्रतिनिधींचा समावेश करण्यात आला. मुंबईत भरलेल्या १८८९च्या काँग्रेस अधिवेशनात रमाबाई स्त्री-प्रतिनिधी म्हणून उपस्थित होत्या. काँग्रेस अधिवेशनानंतर पार पडलेल्या सामाजिक परिषदेच्या अधिवेशनाला उपस्थित असलेल्या केवळ दोन महिलांमध्ये रमाबाईंचा समावेश होता. या परिषदेतील रमाबाईंच्या भाषणाचे विस्तृत वृत्त ‘टाईम्स ऑफ इंडिया’ने ३० डिसेंबर १८८९च्या अंकात दिले. १८९५ साली पुण्यात काँग्रेसचे प्रथम अधिवेशन भरले, तेव्हा संपूर्ण हिंदुस्थानातून या शहरात जमलेल्या काही पुढाऱ्यांनी शारदा सदनला भेट दिली. तोपर्यंत या सदनातील १२ मुली रमाबाईंच्या कार्याने प्रभावित होऊन ख्रिस्ती झाल्या. या घटनेमुळे महाराष्ट्रात मोठे वादळ निर्माण झाले.
रमाबाईंना जातीपातीचे भेदभाव मान्य नव्हते. शारदा सदनात उच्चवर्णीय मुलींसाठी सोवळ्याओवळ्याचे कडकडीत नियम पाळावे लागत असत. असे सोवळ्याओवळ्याचे नियम तेथे पाळले नसते, तर अनेक उच्चवर्णीय लोकांनी आपल्या बालविधवा मुलींना वा बहिणींना शिक्षणासाठी येथे पाठवलेच नसते. आपल्या मुली बालविधवा असल्या, समाजात त्या कितीही उपेक्षित असल्या तरी त्यांनी सुखात राहावे, असे रमाबाईंना वाटे. मात्र त्यांच्याकडे लक्ष असणारे लोक ‘रमाबाई आपल्या मुलींना दुधातुपात नुसते लोळवते’ असे म्हणत. या खाण्यापिण्यावरून एकदा ‘केसरी’ आणि ‘सुधारक’ या वृत्तपत्रांत वादही झाला होता.
रमाबाई या शारदा सदनातील मुलींवर ख्रिस्ती धर्म स्वीकारण्याची बळजबरी करतात, हा त्यांच्यावर नेहमी केला जाणारा आरोप. या आरोपामुळे घाबरून काही पालकांनी आपल्या मुली सदनातून काढून घेतल्या. मात्र त्यामुळे या सदनात आश्रयासाठी येणाऱ्या अनाथ, समाजाने टाकून दिलेल्या बालविधवांची संख्या रोडावली नाही. समाजात त्यांच्याविरुद्ध निर्माण झालेल्या वादळास खंबीरपणे तोंड देऊन पंडिता रमाबाईंनी विधवांच्या पुनर्वसनाचे आपले काम चालूच ठेवले.
त्या काळात मुली पाच-सहा वर्षांच्या झाल्या की, त्यांची लग्ने उरकून टाकली जात असत. बैरामजी मलबारी या पारशी समाजसुधारकाने बालविवाह प्रथेविरुद्ध आवाज उठवला. या चळवळीचा परिणाम होऊन ब्रिटिश सरकारने हिंदुस्थानात संमतीवयाचे विधेयक आणले. या विधेयकास स्त्रियांच्या वतीने पाठिंबा देण्यासाठी पंडिता रमाबाईंनी पुढाकार घेतला. ब्रिटिश सरकारतर्फे सामाजिक सुधारणा लागू करण्यास लोकमान्य टिळकांचा प्रथमपासून विरोध होता. या विधेयकामुळे पुण्यात गोपाळ गणेश आगरकर, डॉ. रामकृष्ण गोपाळ भांडारकर, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे हे समाजसुधारक आणि या विधेयकास विरोध करणारी सनातनी मंडळी यांच्यामध्ये मोठा संघर्ष निर्माण झाला
संमतीवयाच्या विधेयकाविरुद्ध कितीही गदारोळ उठला तरी अखेरीस हे विधेयक मंजूर होऊन तसा कायदा अस्तित्वात आला. आज २०च्या आत मुलींची सहसा लग्ने होत नाहीत. १०० वर्षांपूवी मात्र १२ वर्षांखालील मुलींच्या विवाहास विरोध करण्यासाठी रमाबाईंना चळवळ करावी लागली आणि प्रतिकूल टीकेस तोंडही द्यावे लागले. मध्य भारतात १८९७ साली भीषण दुष्काळ पडला, तेव्हा भुकेने हाडाचे सापळे झालेल्या शेकडो मुलींना पंडिता रमाबाईंनी आश्रय दिला.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
रमाबाईंच्या भारतातील महिलांच्या कार्यासाठी अमेरिकेतील ‘रमाबाई असोसिएशन’ने १० वर्षे आर्थिक पाठबळ देण्याचे कबूल केले होते. १८९८मध्ये ही मुदत संपल्यानंतर पुन्हा एकदा रमाबाई अमेरिकेत गेल्या व ही संस्था विसर्जित करण्यात आली. त्यानंतर नव्याने स्थापन झालेल्या ‘अमेरिकन रमाबाई असोसिएशन’ या संस्थेच्या मदतीने रमाबाईंनी पुण्याजवळील केडगाव येथे ‘मुक्ती सदन’चे काम सुरू केले. त्यानंतर रमाबाईंनी आपल्या आयुष्याचा उर्वरित काळ केडगाव येथेच घालवला.
केडगावात पंडिता रमाबाईंनी समाजाच्या विविध उपेक्षित घटकांसाठी वेगवेगळी सदने काढली. एखाद्या स्त्रीचे पाऊल वाकडे पडले वा त्यांच्यावर एखाद्या अनुचित घटनेची आपत्ती कोसळली की, त्या स्त्रियांच्या कुटुंबाला आणि संपूर्ण समाजाला ती स्त्री नकोशी होई. अशा समाजबहिष्कृत स्त्रियांसाठी पंडिता रमाबाईंनी ‘कृपासदन’ उघडले. वृद्ध, अपंग आणि परावलंबी स्त्रियांसाठी रमाबाईंनी ‘प्रीती सदन’ सुरू केले. भारतातील पहिली अंधशाळा उघडण्याचे श्रेय रमाबार्इंच्या कन्या मनोरमाबाई यांना दिले जाते. अंधत्वामुळे परावलंबी बनलेल्या मुलींना आणि महिलांना केडगावातील ‘बर्तमय सदनात’ आश्रय देऊन रमाबाईंनी त्यांचे पुनर्वसन केले.
कर्नाटकात जन्मलेल्या रमाबाईंना कानडी भाषा येत होती. महाराष्ट्रात आल्यानंतर त्यांनी मराठीवरही प्रभुत्व मिळवले. इंग्रजी शिकून पुढे त्या इंग्लंड आणि अमेरिकेतही व्याख्याने देत फिरल्या.
‘बायबल’च्या मूळ भाषेतून म्हणजे हिब्रू आणि ग्रीक मधून या धर्मग्रंथाचे भाषांतर करणाऱ्या पंडिता रमाबाई सरस्वती या जगातील एकमेव महिला. हे भाषांतर केडगावातील छापखान्यातच छापले जात होते. ४ एप्रिल १९२२ रोजी पंडिता रमाबाईंनी भाषांतराचे शेवटचे प्रूफ वाचून हातावेगळे केले आणि छपाईसाठी छापखान्यात पाठवले. त्यानंतर त्याच रात्री या महान समाजसेविकेने या जगाचा निरोप घेतला.
(‘ख्रिस्ती मिशनरींचे योगदान’ या कामिल पारखे यांच्या पुस्तकातील प्रदीर्घ लेखाचा संपादित अंश.)
..................................................................................................................................................................
लेखक कामिल पारखे ज्येष्ठ पत्रकार आहेत.
camilparkhe@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment