अजूनकाही
चित्रामागे विचार असतो. पण विचारांचा कोलाहल मागे टाकून विचारविरहित म्हणजेच संस्कारांची पुटे सारून कोऱ्या करकरीत मनःस्थितीत चित्र काढता आले तर...? नव्हे, ते तसे काढण्याचा प्रयत्न हवा... मुंबईतल्या जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सच्या सभागृहात २७ फेब्रुवारी २०२२ रोजी सायंकाळी ६:०० वाजता ख्यातकीर्त चित्रकार-लेखक प्रभाकर कोलते यांच्या ‘दृक-चिंतन’ या पुस्तकाचा ज्येष्ठ नाटककार-लेखक महेश एलकुंचवार यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रकाशन सोहळा पार पडला. त्यावरील हे छोटेखानी टिपण...
..................................................................................................................................................................
बाहेर प्रचंड कोलाहल माजलेला आहे. शब्दाला शब्द आणि हिसेंला प्रतिहिंसा. रोजच शाब्दिक दंगली घडताहेत, आभासी जगात. व्यक्त होण्यातल्या सक्तीने लोप पावत चाललीय प्रत्येकाची आतली शांती. उत्तमाचा शोध संपून भुकेने पछाडलेय, सगळ्यांना. भूक तरी कशाची? रोज नवा शत्रू, रोज नवा खलनायक जन्माला घालून त्याला झुंडीच्या तोंडी देण्याची. झुंडीचीही भूक वाढलीय म्हणतात काही. तेही काही खोटे नाही. झुंड म्हणजे विवेक गमावलेला भला मोठा राक्षस. शेकडो- हजारो तोंडांचा. तितक्याच हाता-पायांचाही. कोणता विचार नाही. कशाचा शोध नाही. बोध घेण्याचा तर प्रश्नच नाही. आपण कळसूत्री बाहुल्या आहोत, आणि कोणी तरी, कुठे तरी बसून त्यावर नियंत्रण राखून आहेत, याची पक्की होत चाललीय, कित्येकांची.
..................................................................................................................................................................
.................................................................................................................................................................
एक संध्याकाळ उगवते. निमित्त ‘दृक-चिंतन’चे. उत्सवमूर्ती चित्रकार- लेखक प्रभाकर कोलते. त्यांच्या सृजनाला दाद द्यायला नागपूरहून आलेले ज्येष्ठ नाटककार-लेखक महेश एलकुंचवार. सोबत, संतोष क्षीरसागरांसारख्या जे.जे.मधल्या कलासक्त शिक्षक-मार्गदर्शकांचा सुखद वावर. प्रेक्षकांत हाडाचे बंडखोर लेखक-प्रकाशक अशोक शहाणे, मनस्वी नट-लेखक-कवी किशोर कदम उर्फ सौमित्र, एलकुंचवारांचे गार्डियन एंजल होऊन नित्य सोबत करणारे छायाचित्रकार-मुखपृष्ठकार विवेक रानडे, नावाजलेल्या अनुवादिका उमा कुलकर्णी, पद्मश्रीप्राप्त छायाचित्रकार सुधारक ओलवे, कवी-लेखक गणेश विसपुते, प्रफुल्ल शिलेदार, समीक्षक-आस्वादक गणेश मतकरी आणि यांसारखे अनेक श्रोते एकवटलेले. या श्रोत्यांमध्ये काही कोवळे चेहरे नजरेत कुतूहल दाटलेल्या कलाविद्यार्थ्यांचेही.
सगळ्यांनाच उत्सुकता कोलते-एलकुंचवारांच्या प्रकट चिंतनाची. या दोहोंतले मैत्र सर्वश्रुत. त्यामुळे औपचारिकता नावालाही नाही. म्हटला तर हा कलाप्रेमींचा उत्स्फूर्त मेळा होता. मेळ्यातल्या प्रत्येकाला विविध कलांमधले आंतरबंध आणि चित्रकार कोलतेंची सर्वव्यापी कलादृष्टी याची पुरेपूर जाण होती. याचीच झलक म्हणून जेव्हा राम पंडित आणि त्यांच्या सुरिल्या साथीदारांनी कोलतेंच्या चालबद्ध कविता उपस्थितांपुढ्यात सादर केल्या. त्याने एकाच वेळी मनशुद्धी आणि एकाग्रतेचा यशस्वी प्रयोग आपसूक घडून आला. वातावरणाला साजेशी बैठकही तयार झाली.
आपण आलोय, चित्रकाराने लिहिलेल्या पुस्तकाच्या प्रकाशनाला, त्यात लय आणि नाद आहे, सूर आणि तालही आहे, ही जाणीव उपस्थितांचे मन सुखावून गेली. सुरांची धुंदी उतरते न उतरते तोच, अतीव देखण्या ‘अनुनाद प्रकाशना’च्या रवींद्र जोशी संकलित-संपादित ‘दृक-चिंतन’ पुस्तकाचे प्रकाशन झाले. कोलते बोलायला उभे राहिले. किरण नगरकर, प्रभाकर बर्वे, चि.त्र्यं खानोलकर आणि महेश एलकुंचवार आदींच्या प्रभावातून अभिव्यक्तीची झालेली घडण उलगडते झाले. म्हणाले, “चित्रामागे विचार हवाच, पण विचारांच्या मर्यादा ओलांडूनही चित्र हवे. ते ठरवून काढले जाऊ नये. मनाच्या मुक्त अवस्थेत विचारांचा कल्लोळ मागे सारत ते आपसूक घडावे.” चित्रकाराच्या जगण्याचे आणि त्या जगण्याचे अपेक्षित अंतिम उद्दिष्ट कोलतेंच्या या चिंतनातून प्रकाशमान झाले.
..................................................................................................................................................................
उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...
हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal
................................................................................................................................................................
एलकुंचवारांनी शब्द आणि चित्र यातलं अद्वैत मांडताना, खऱ्याखुऱ्या कलावंतांना काळ, दिशा आणि अवकाशापलीकडच्या अनंताला स्पर्श करण्यातली असलेली असोशी अधोरेखित केली. म्हणाले, “लेखक असो, गायक असो वा चित्रकार त्याची झेप काळ आणि अवकाश ओलांडणारी विशालकाय हवी. प्रसिद्धी, लोकप्रियता आणि आत्ममग्नता नाकारणारी तपश्चर्या गाढ हवी. ती ‘स्व’च्या शोधाबरोबरच अमूर्ततेतल्या शुद्धतेच्या शोधासाठी हवी. इझमच्या पलीकडची.” जे.जे. स्कूलचे डीन असलेल्या संतोष क्षीरसागरांनी ‘आपल्या डोक्यावर छत्र धरणारे आकाश आहे, पण तेही कशाच्या तरी आधारावर तगून आहे,’ हा कलावंतांच्या जिज्ञासेला बळ देणारा विचार बोलून दाखवला.
चिंतनाचा लोभस त्रिबंधच हा. रोजच्या जगण्यातली क्षुद्रता आणि त्यातून वाट्याला येत चाललेल्या फोलपणावरचा उतारा म्हटला तरीही चालेल. चिंतनशील असतो, तो कलावंत. नव्हे, तोच खरा कलावंत. इतरांचे जगणे उन्नत करण्याची त्याच्यात खरी क्षमता. बाकी सगळेच भोंगे. काही लहान. काही मोठे. या भोंग्यांना टाळता आले. रोजचे भास-आभास मागे सारून शाश्वततेचा स्पर्श असलेल्या कलांमधले थोडे आशयगर्भ वेचता आले, याचे समाधान देऊन ही चिंतनात रमलेली सायंकाळ सरली...
(‘मुक्त-संवाद’ या पाक्षिकाच्या १ एप्रिल २०२२च्या अंकातून साभार)
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment