अजूनकाही
१. मुंबई महापालिकेत शिवसेनेच्या तोडीसतोड नगरसेवक निवडून आणणाऱ्या भाजपने महापौरपदाची निवडणूक लढविली जाणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर करून साऱ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला. महापालिकेच्या पारदर्शक कारभाराचे पहारेकरी म्हणून भाजपचे नगरसेवक काम करतील, असे सांगत पालिकेच्या कारभाराचा रिमोट कंट्रोल भाजपच्या हाती राहिल, असे संकेतही मुख्यमंत्र्यांनी दिले. त्याचबरोबर मुंबईसाठी स्वतंत्र उपलोकआयुक्त नेमण्याची घोषणा त्यांनी या वेळी केली.
आई भवानीच्या कृपेने, एकवीरा आईच्या चमत्काराने आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने मुंबईच्या रयतेवर घोंघावणारं अफझुलखानी संकट आता टळलं आहे. अस्मानात दाटलेले काळोखाचे मेघ पांगले आहेत. शाहिस्तेखानाने जेमतेम नखंच छाटलेल्या बोटांनी मर्दमावळ्यांच्या भव्य कपाळांवर सत्तेचा टिळा गोंदला आहे… आता आई जगदंबेच्या इच्छेनुसार मुंबापुरीत सुराज्याचा, सुसाशनाचा आणि कसल्या तरी सुसुचा (तिय्या जमत नाही ना ऐनवेळी) पाळणा हलल्याशिवाय राहणार नाही… (बाळ पंचवीसेक वर्षं पाळण्यातच आहे…) …थोडक्यात काय, नाटक कंपनीचा मुक्काम अजून थोडे दिवस वाढला आहे…
……………………………………………………………………
२. महानगरपालिका निवडणुकीआधी शिवसेनेचे मंत्री खिशात राजीनामे घेऊन फिरत असत असे म्हटले जात होते. आता ‘हे राजीनामे बाजूला ठेवण्यात आले आहेत’, असे शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी म्हटलं आहे. उद्धव ठाकरे यांचा आदेश आल्यानंतर आम्ही राजीनामा देण्यासाठी केव्हाही तयार आहोत, असं त्यांनी स्पष्ट केले.
कदमसाहेब, महत्त्वाचे कागद असे बाजूला ठेवून देऊ नका. ते उडून जातात. मग ऐनवेळी तुम्हाला ते मिळणार नाहीत आणि उधोजीराजे आदेश देतील तेव्हा ऐनवेळी ते सापडायचे नाहीत. राजीनामे देता यायचे नाहीत. मग उधोजीराजेंच्या शब्दाला, आदेशाला काय किंमत राहील… बाय द वे, राजीनाम्यांच्या कागदांवर काही मजकूर नाही, तुमच्या सह्याही नाहीत, नुसते कोरे कागदच आहेत, हे उधोजीराजांना माहिती नाही ना? की त्यांनीच ही ट्रिक सांगितली आहे?
……………………………………………………………………
३. भाजप आणि शिवसेना यांनी महापौरपदाची मॅच सुरू होण्याआधीच फिक्स केल्यानंतर काँग्रेसचा तीळपापड झाला असून या दोन पक्षांनी मार्चमध्येच जनतेला एप्रिल फूल केले आहे, अशी विखारी टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. शिवसेनेसाठी मुंबई महापालिका म्हणजे सोन्याचे अंडं देणारी कोंबडी आहे, असंही ते म्हणाले.
शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांची मुंबईबद्दलची समजूत काय आहे, हे मुंबईकरांना माहिती नसेल का? हे दोन्ही पक्ष निवडणुकीनंतर एकत्र येणार, हे मुंबईकरांना कळलं नसेल का? तरीही ते तुम्हाला अजिबात जवळ करत नाहीत, याच दोन नादानांच्या हाती सत्ता सोपवतात, याचा अर्थ आपण त्यांच्यापेक्षा अधिक नादान ठरलो आहोत, हे तुम्ही कधी ओळखणार? फूल्स पॅरॅडाइझमधून बाहेर कधी येणार? मुंबईत येणारा प्रत्येक माणूस आणि इथे राज्य करणारा प्रत्येक पक्ष मुंबईला सोन्याचं अंडं देणारी कोंबडीच मानतो, हेच तिचं दुर्भाग्य आहे; त्याला शिवसेनेचा अपवाद कसा असेल?
……………………………………………………………………
४. या देशामध्ये पंतप्रधानांना शिव्या दिल्या जातात, तरीही कारवाई केली जात नाही. यापेक्षा किती स्वातंत्र्य हवे, असा सवाल केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजीजू यांनी उपस्थित केला. ‘स्वातंत्र्याच्या घोषणा १९४७च्या आधी चांगल्या वाटायच्या. आता भारत स्वतंत्र आहे. मात्र आता तरीही काही लोकांना भारतापासून स्वातंत्र्य हवे आहे. अशा लोकांना त्यांच्या स्वातंत्र्याबद्दल विचारायला हवे,’ असे रिजीजू यांनी म्हटले.
किरणभाऊ, आपल्या विद्यमान पंतप्रधानांना आणि त्यांच्या मंत्र्यांना सगळ्या विश्वाची सुरुवात त्यांच्या सत्ताग्रहणापासूनच झाली आहे, असं वाटतं. पण, देश स्वतंत्र झाल्यापासून (म्हणजे १९४७पासून- २०१४ नव्हे) देशाच्या पंतप्रधानांना शिव्या घातल्या जात आहेत, त्यात कोणाचाही अपवाद झाला नसावा. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर तर अपशब्दांचा भडिमार झाला होता. तेव्हाही कोणावर कारवाई झाली नव्हती. शिवाय ही व्यवस्था भारतीय राज्यघटनेने करून ठेवलेली आहे, त्यात तुमचा काही मोठेपणाही नाही आणि कर्तबगारीही नाही.
……………………………………………………………………
५. बराक ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष होते, त्या काळात त्यांनी माझ्यावर पाळत ठेवली होती. ओबामांनी माझे फोन टॅप केले होते, असे ट्विट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले असून या आरोपांनी जगभर खळबळ उडवून दिली आहे.
ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनण्याच्या शक्यतेने अमेरिकेलाच नव्हे तर सगळ्या जगाला भविष्यात केवढा मोठा धोका निर्माण होऊ शकतो, हे ओबामा यांनी वेळीच ओळखलं होतं म्हणायचं. अमेरिकेचा शत्रू नंबर वन असलेल्या रशियाशी वेगवेगळ्या पातळ्यांवरचे नाजुक स्नेहसंबंध आणि हितसंबंध असलेल्या ट्रम्प यांच्यावर पाळत ठेवली नसती, तरच ओबामा यांच्या राजकीय आकलनाबद्दल शंका निर्माण झाली असती.
……………………………………………………………………
६. महाराष्ट्रात पालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसचा दारुण पराभव झाला आहे. त्याचा दाखला देतच भविष्यात पुरातत्व विभागाला काँग्रेस पक्ष शोधण्याचे काम करावे लागेल, असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशात प्रचारसभेत लगावला.
अहो, काँग्रेसच्या राहण्या-न राहण्याने कुणालाच फरक पडत नाही. पुरातत्त्व विभागही इतक्या मृतप्राय गोष्टींचा शोध घेत नाही. त्यांनी खरंतर तुम्ही मारलेल्या मगरीची हाडं, तुम्ही जिच्यातून चहा विकायचात ती किटली, तुमचा तो सुप्रसिद्ध झाडू, तुमची तेवढीच सुप्रसिद्ध पदवी आणि तिच्यासाठी केलेल्या अभ्यासाची पुस्तकं अशा नव्या पिढीला प्रेरणादायी ठरणाऱ्या वस्तूंचा शोध घ्यायला हवा, नाही का?
……………………………………………………………………
editor@aksharnama.com
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment