दीर्घायुषी मराठी नियतकालिकांपैकी एक असलेले ‘निरोप्या’ हे मासिक या महिन्यात ११९व्या वर्षात पदार्पण करत आहे…
पडघम - सांस्कृतिक
कामिल पारखे
  • फादर हेन्री डोरिंग यांचे एक रेखाचित्र आणि त्यांच्या ‘निरोप्या’ या मासिकाचे बोधचिन्ह व एप्रिल २०२२च्या अंकाचे मुखपृष्ठ
  • Fri , 01 April 2022
  • पडघम सांस्कृतिक निरोप्या Niropya हेन्री डोरिंग Henry Doering ज्ञानोदय Gyanodaya

बाळशास्त्री जांभेकरांनी १८३२ साली ‘दर्पण’ मासिक सुरू करून मराठी पत्रकारितेचा पाया रोवला. त्यानंतर मराठीत अनेक नियतकालिके सुरू झाली. ४ जानेवारी १८८१ रोजी गोपाळ गणेश आगरकर यांच्या संपादकत्वाखाली ‘केसरी’ हे नियतकालिक सुरू झाले. यापैकी बहुतेक नियतकालिके आज काळाच्या ओघात गडप झाली आहेत. मात्र ‘ज्ञानोदय’ हे १८४२ साली सुरू झालेले नियतकालिक आजही पुण्यातून प्रसिद्ध होत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील केंदळ या खेडेगावी फादर हेन्री डोरिंग (Henry Doering) या येशूसंघीय जर्मन धर्मगुरूने ‘निरोप्या’ हे मासिक १९०३च्या एप्रिल महिन्यापासून सुरू केले. ते आजही पुण्यातून प्रकाशित होत आहे. दीर्घायुषी मराठी नियतकालिकांपैकी एक असलेले ‘निरोप्या’ हे मासिक या महिन्यात ११९व्या वर्षात पदार्पण करत आहे.

हिंदू मागासवर्गीय जातींतून ख्रिस्ती धर्मात आलेल्या अशिक्षित, आर्थिकदृष्ट्या मागास समाजासाठी २०व्या शतकाच्या सुरुवातीस नियतकालिक सुरू करणारे फादर डोरिंग हे धर्मगुरू द्रष्टे मिशनरी होते. मराठी भाषिक कॅथोलिक समाजाची आध्यात्मिक गरज भागवणाऱ्या, या समाजातील सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील वृत्त पुरवणाऱ्या या मासिकाची महाराष्ट्रातील विविध भागांतील मराठी भाषक ख्रिस्ती वाचक आतुरतेने प्रतीक्षा करत असतात, यावरून त्याची लोकप्रियता लक्षात येते.

‘ज्ञानोदय’ आणि ‘निरोप्या’ ही दोन्ही दीर्घायुषी मासिके मराठी भाषिक ख्रिस्ती समाजाची मुखपत्रे आहेत. ‘ज्ञानोदय’ हे रेव्ह. हेन्री बॅलन्टाईन या अमेरिकन धर्मगुरूने सुरू केलेले नियतकालिक प्रॉटेस्टंट समाजात, तर ‘निरोप्या’ हे कॅथोलिक समाजात प्रामुख्याने वाचले जाते. या मासिकांचा खप केवळ ख्रिस्ती समाजापुरताच मर्यादित असला तरी महाराष्ट्रातील सामाजिक स्थित्यंतराचे या नियतकालिकांत प्रतिबिंब उमटत असल्याने ही मासिके संपूर्ण मराठी समाजाचा एक महत्त्वाचा सांस्कृतिक ठेवा आहेत.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

हेन्री डोरिंग यांचा जन्म जर्मनीत बोकोल्ट येथे १३ सप्टेंबर १८५९ रोजी झाला. १८८२मध्ये त्यांना गुरुदीक्षा मिळाली. १८९५मध्ये त्यांचे अहमदनगर जिल्ह्यातील केंदळ या गावात आगमन झाले. मराठी भाषिक दलित ख्रिस्ती समाजाच्या इतिहासात केंदळला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. या खेडेगावातूनच कॅथोलिक मिशनरींनी महाराष्ट्रातील ग्रामीण भागात सर्वप्रथम धर्मप्रसार सुरू केला. आज अहमदनगर, औरंगाबाद, नाशिक, बीड, पुणे या जिल्ह्यांत मराठी भाषिक कॅथोलिक ख्रिस्ती समाजाची मोठी संख्या आहे. यापैकी बहुसंख्य लोकांनी पूर्वाश्रमीच्या हिंदू महार या अस्पृश्य जातीतून ख्रिस्ती धर्मात प्रवेश केला. काही वर्षांपूर्वी या जिल्ह्यातील कॅथोलिक समाजाने आपल्या धर्मांतराची शतकपूर्ती साजरी केली.

फादर डोरिंग केंदळ वळण येथे आले, तेव्हा अहमदनगर जिल्ह्यातील मिशनकार्य नुकतेच सुरू झाले होते. अस्पृश्य जातीतून अनेक जण ख्रिस्ती धर्मात येत होते, तरी केवळ धर्मांतरामुळे त्यांच्या सामाजिक वा शैक्षणिक परिस्थितीत एकदम मोठा बदल होत नव्हता. या नव-ख्रिस्ती समाजाला शिक्षित करण्यासाठी मिशनरींनी प्राथमिक शाळा सुरू केल्या. त्यांना ख्रिस्ती धर्माचे ज्ञान देण्यासाठी स्वतः मराठी भाषेचे ज्ञान प्राप्त करून घेतले आणि नंतर या भाषेत धर्मशिक्षणाची पुस्तकेही तयार केली.

फादर डोरिंग केंदळला येण्याआधीच काही मिशनरींनी मराठी भाषेत धर्मशिक्षणाची पुस्तके लिहिली होती, असे दिसते. अहमदनगर आणि नजीकच्या जिल्ह्यातील कॅथोलिक समाजातील पहिल्या पुस्तकाचा मान ‘लहान कॅथेखिसम’ या पुस्तकाला मिळतो. त्याच्या लेखकाच्या नावाची नोंद मिळत नसली तरी ते केंदळमध्येच काम करणारे फादर दालिंग असावेत, असे फादर डॉ. ख्रिस्तोफर शेळके यांनी म्हटले आहे. मूळचे अहमदनगर जिल्ह्यातले आणि रोम येथील विद्यापीठात तौलनिक धर्मशास्त्राचे प्राध्यापक असलेले फादर शेळके यांनी अहमदनगर जिल्ह्यातील ख्रिस्ती मिशनरींच्या कार्यावर संशोधन केलेले आहे. ते पुढे म्हणतात की, फादर डोरिंग केंदळ येथे स्थायिक झाले, तेव्हा त्यांना स्थानिक लोकांमध्ये ‘सुभक्तीसार’ या शीर्षकाचे धर्मशिक्षणाचे पुस्तक सर्वाधिक लोकप्रिय आहे, असे आढळले.

फादर डोरिंग यांच्या आधी म्हणजे १८९२च्या मध्यास केंदळ येथे आलेल्या फादर फ्रान्सिस ट्रेनकाम्प यांनी ‘सुभक्तीसार’ हे पुस्तक १८९५ पूर्वी लिहून प्रसिद्ध केले. त्यांनी मराठी भाषेचा चांगला अभ्यास केला होता. या पुस्तकासाठी त्यांनी पुण्या-मुंबईच्या पुस्तकांत आढळणाऱ्या भाषेऐवजी अहमदनगर जिल्ह्यात प्रचलित असलेल्या बोलीभाषेचा वापर केला. थोडेफार शिक्षण झालेले नव-ख्रिस्ती लोक आणि चर्चमध्ये मिस्साच्या वेळी प्रार्थना करण्यासाठी धर्मगुरू या पुस्तकाचा वापर करत.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

धर्मकार्यासाठी अहमदनगर जिल्ह्यात स्थायिक झालेल्या फादर डोरिंग यांना केवळ ‘लहान कॅथेखिसम’, ‘मोठे कॅथेखिसम’ या भाषांतरित आणि ‘सुभक्तीसार’ या पुस्तकांचाच उपयोग करावा लागत असे. त्या काळी मिशनरींना आपल्या घरापासून लांबवर असलेल्या खेडेगावात उपदेशासाठी, मिस्सासाठी जावे लागत असे. ग्रामीण भागातील अशिक्षित लोकांना ख्रिस्ती धर्माचे मराठीतून धर्मज्ञान देण्यासाठी पुस्तके नसल्याने या भाषेत धर्मविषयक साहित्याची निर्मिती करण्याची गरज फादर डोरिंग यांना भासू लागली.

या समस्येवर उपाय म्हणून त्यांनी मराठी भाषेतून धर्मविषयक माहिती देणारे मासिक सुरू करण्याचे ठरवले. येशूसंघाच्या अधिकाऱ्यांनी या मासिकासाठी आर्थिक मदत देण्याचे मान्य केले. १९०३च्या एप्रिल महिन्यात फादर डोरिंग यांनी ‘येशूच्या अतिपवित्र हृदयाचा निरोप्या’ या मासिकाचा पहिला अंक प्रसिद्ध केला. तेव्हापासून पहिल्या महायुद्धाच्या काळातील काही वर्षांचा अपवाद वगळता ‘निरोप्या’ आजपर्यंत नियमितपणे प्रकाशित होत आहे. केवळ एक अपवाद वगळता गेली १०० वर्षे येशूसंघीय धर्मगुरू या मासिकाच्या संपादनाची जबाबदारी सांभाळत आहेत.

फादर डोरिंग यांनी ‘निरोप्या’ सुरू केल्यानंतर स्वतःच्या मराठी भाषेच्या ज्ञानात अधिक भर घालण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील लोकांची बोलीभाषेतील शब्द, हिंदू धर्मसाहित्यात वापरले जाणारे शब्द, तसेच संकल्पना शिकले. या ज्ञानाचा वापर करून आपले मासिक नवसाक्षर नवख्रिस्ती लोकांसाठी अधिकाधिक उपयुक्त करण्याचा प्रयत्न करू लागले. सुरुवातीच्या काळात ‘निरोप्या’ मुंबईतील ‘एक्झामिनर’ प्रेसमध्ये छापले जात असे. पहिल्या अंकाची एकूण दहा पाने होती आणि त्यात पाच विषयांवर लेख होते- एप्रिल महिन्यासाठी प्रार्थनेचा विषय, पवित्र मिस्साचा चाकर होणे, लिओ तेरावे परमगुरुस्वामींचा (पोप) सण, तुझे राज्य येवो आणि एक रक्तसाक्षी (हुतात्मा).

संपादकांचे वास्तव्य केंदळला असले तरी मासिक मुंबईतून प्रसिद्ध होत होते. त्यामुळे अंक वेळेवर छापला जाईल, यासाठी संपादकांना खास प्रयत्न करावे लागत. या मासिकाचा चौथा अंक तर खुद्द संपादक महाशयांनीच स्वतःच्या हाताने लिहून काढला होता. तो त्या वेळी का छापला गेला नाही, हे आजही स्पष्ट होत नसले तरी त्यावरून आपले नियतकालिक वेळेवर प्रकाशित झाले पाहिजे, याबद्दल फादर डोरिंग विशेष आग्रही होते, हे दिसून येते. ‘निरोप्या’तून ख्रिस्ती संतांची चरित्रे आणि ख्रिस्ती जगातील विविध घडामोडींविषयी लेख असत. आजही ही सदरे प्रसिद्ध होतात. त्याशिवाय ख्रिस्ती अध्यात्मात अभिजात वाङ्मय समजल्या जाणाऱ्या ‘इमितोशियो  ख्रिस्ती’ या लॅटिन पुस्तकाचा अनुवादही त्यांनी या मासिकातून क्रमशः प्रसिद्ध केला. ‘ख्रिस्तानुवर्तन’ या नावाने या पुस्तकाच्या तिसऱ्या अध्यायापर्यंत हे पुस्तक प्रकाशित केले गेले.

..................................................................................................................................................................

उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअ‍ॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...

हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal

................................................................................................................................................................

१९०७मध्ये फादर डोरिंग यांची पुणे धर्मप्रांताचे बिशप म्हणून नेमणूक झाली. केंदळला असताना त्यांना केवळ आपल्या धर्मग्रामाची जबाबदारी सांभाळावी लागे. बिशप झाल्यानंतर त्यांना संपूर्ण पुणे धर्मप्रांतात येणाऱ्या जिल्ह्यांच्या धर्मग्रामांचे धर्माधिकारी म्हणून काम पाहावे लागत असे. त्या काळच्या पुणे धर्मप्रांतात पुणे, अहमदनगर, नाशिक, कोल्हापूर, सोलापूर, रत्नागिरी, सातारा, सांगली वगैरे जिल्ह्यांचा परिसर येत असे. बिशप म्हणून डोरिंग यांची जबाबदारी वाढली, पण त्यांनी ‘निरोप्या’चे संपादन आणि लेखन सोडले नाही. या मासिकाचे प्रकाशनस्थळही पुण्याला हलवण्यात आले.

पहिल्या महायुद्धाला तोंड फुटले, तेव्हा बिशप डोरिंग पोपमहाशयांना भेटण्यासाठी रोम येथे गेले होते. मूळचे जर्मन असलेल्या बिशपांना ब्रिटिशांची वसाहत असलेल्या भारतात परतणे अशक्य झाले, तेव्हा पोपनी १९२१ साली जपानमधील हिरोशिमा धर्मप्रांताचे ‘अपोस्तोलिक व्हिकर’ म्हणून त्यांची नेमणूक केली. पण आपल्या कर्मभूमीत परतण्याची डोरिंग यांची तीव्र इच्छा असावी, असे दिसते. कारण पहिले महायुद्ध संपल्यावर ब्रिटिश सरकारची परवानगी मिळताच, त्यांनी पुन्हा १९२७ साली पुणे धर्मप्रांतातील मराठी ख्रिस्ती समाजाचे मेंढपाळ म्हणून पुन्हा एकदा सूत्रे हाती घेतली. याच काळात आर्चबिशप हे ख्रिस्ती महामंडळातील आणखी एक उच्च पद त्यांना देण्यात आले. पुण्यात परतल्यानंतर केवळ सहाच महिन्यात म्हणजे जून १९२८मध्ये त्यांनी बंद पडलेल्या ‘निरोप्या’चे पुन्हा एकदा आधीच्याच उत्साहाने प्रकाशन सुरू केले.

‘निरोप्या’ हे मराठी भाषिक कॅथोलिक समाजाचे सर्वांत पहिले मुखपत्र. गेले एक शतक ते महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील कॅथोलिक कुटुंबांमध्ये नियमितपणे जात आहे. १९८१ साली या मासिकाची वार्षिक वर्गणी केवळ तीन रुपये हेाती आणि किरकोळ अंकाची किंमत तीस पैसे होती. आज २०२२ साली रंगीत मुखपृष्ठ असलेल्या आणि एकूण ३२ पाने असलेल्या या मासिकाची वार्षिक वर्गणी २०० रुपये आहे.

‘निरोप्या’ने मराठी भाषिक कॅथोलिक समाजात वाचनाची आवड निर्माण करण्याबरोबरच, या समाजात लेखकांच्या आणि कवींच्या पिढ्या निर्माण करण्यासाठीही मोठे योगदान दिले आहे. मराठी सारस्वतात पुढे मोठे नाव कमावणाऱ्या अनेक कॅथोलिक आणि प्रॉटेस्टंटपंथीय लेखकांना त्यांच्या उमेदवारीच्या काळात ‘निरोप्या’ने हक्काचे व्यासपीठ मिळवून दिले. आचार्य सत्यवान नामदेव सूर्यवंशी, फादर फ्रान्सिस दिब्रिटो, कवी विश्वासकुमार आदी नामवंत साहित्यिकांचा ‘निरोप्या’च्या लेखकांमध्ये समावेश होतो.

एखाद्या नियतकालिकाच्या प्रकाशनस्थळात अगदी क्वचितच बदल होतात. ‘निरोप्या’च्या १०० वर्षांच्या आयुष्यात मात्र असे प्रसंग अनेकदा घडून आलेले दिसतात. याचे कारण म्हणजे येशूसंघाचे धर्मप्रांताधिकारी यांच्यामार्फत ‘निरोप्या’च्या संपादकांची नेमणूक केली जाते. नव्या संपादकांच्या नियुक्तीनंतर हे मासिकही ते संपादक ज्या धर्मग्रामात कार्यरत असतात, तेथून प्रसिद्ध होत राहिले आहे. त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील केंदळ, श्रीरामपूर, पुणे, कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा, सातारा जिल्ह्यातील कराड, त्याचप्रमाणे नाशिक वगैरे ठिकाणी ‘निरोप्या’चे कार्यालय स्थलांतरित होत राहिले. पण त्यामुळे ख्रिस्ती धर्मियांनी ‘निरोप्या’ची साथ सोडली नाही.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

फादर डोरिंग यांनी मराठी साहित्याला आणखी एक मोठे योगदान दिले आहे. १७व्या शतकात गोमंतकात मराठी भाषेत लिहिले गेलेले ‘क्रिस्तपुराण’ हे अस्सल देशी महाकाव्य त्यांनी महाराष्ट्रात उजेडात आणले. ‘क्रिस्तपुराणा’ची रचना फादर थॉमस स्टीफन्स या मूळच्या इंग्रज येशूसंघीय धर्मगुरूंनी १६१६ साली केली. मात्र त्या काळात गोव्यात देवनागरी मुद्रणकला विकसित झाली नसल्याने त्यांना ते रोमन लिपीत छापावे लागले. परिणामी मराठी सारस्वताचे या अभिजात वाङ्मयाकडे तीन शतके लक्षच गेले नाही. फादर डोरिंग यांनी या महाकाव्याचा अभ्यास केला आणि त्याचे महत्त्व लक्षात घेऊन त्यांनी या पुराणातील येशू ख्रिस्ताच्या चरित्रावर आधारित काही भागांचे देवनागरीत लिप्यंतर करून तीन पुस्तिका प्रकाशित केल्या. हे संपूर्ण महाकाव्य १९५६ साली शांताराम बंडेलू यांनी देवनागरीत प्रकाशित केले.

१९४९मध्ये वृद्धत्वामुळे फादर डोरिंग यांनी निवृत्ती स्वीकारली. ‘निरोप्या’तून शेवटचे बोधपत्र लिहून या मेंढपाळाने आपल्या कळपाचा निरोप घेतला. १७ डिसेंबर १९५१ रोजी डोरिंग यांचे निधन झाले. पुण्यातील सेंट पॅट्रिक कॅथेड्रलमध्ये वेदीपाशी त्यांची समाधी आहे. जर्मनीतून महाराष्ट्रात येऊन मराठी भाषा शिकून, स्थानिक निरक्षर आणि अर्धशिक्षित ख्रिस्ती समाजाला ज्ञानार्जन करणारे फादर डोरिंग हे आज विस्मृतीत गेले असले, तरी ‘निरोप्या’च्या रूपाने त्यांचे स्मारक त्यांच्या कळपाच्या भेटीस आजही दर महिन्याला नियमाने येत आहे…

(‘ख्रिस्ती मिशनरींचे योगदान’ या कामिल पारखे लिखित पुस्तकातील लेखाचा संपादित भाग.)

..................................................................................................................................................................

लेखक कामिल पारखे ज्येष्ठ पत्रकार आहेत.

camilparkhe@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......