आजच्या अतिशय थिजलेल्या आणि सर्वग्रासी संकटाच्या काळात सुधीरसारख्या विचारवंताचं अचानक जाणं चटका लावणारं आहे...
संकीर्ण - श्रद्धांजली
विनया मालती हरी
  • सुधीर बेडेकर आणि ‘मागोवा’, ‘तात्पर्य’ या मासिकांची आणि ‘लोक विज्ञान संघटना’ व ‘ब्रह्मे ग्रंथालय’ या संस्थांची लेटरिंग
  • Wed , 30 March 2022
  • संकीर्ण श्रद्धांजली सुधीर बेडेकर Sudhri Bedekar मागोवा Magova तात्पर्य Tatparya लोक विज्ञान संघटना Lokvidnyan Sanghantana ब्रह्मे ग्रंथालय Brahme Granthalaya

‘मागोवा’ आणि ‘तात्पर्य’ या मासिकांचे संपादक आणि सत्तरीच्या दशकामधील ‘मागोवा’ गटाचे प्रमुख मार्गदर्शक व प्रख्यात मार्क्सवादी विचारवंत आणि लेखक सुधीर बेडेकर यांचं २५ मार्च २०२२ रोजी पहाटे पुण्यात निधन झालं. ते ७६ वर्षांचे होते. त्यांना आदरांजली वाहण्यासाठी समाजविज्ञान अकादमीच्या वतीनं उद्या, ३१ मार्च २०२२ रोजी आदरांजली सभा आयोजित करण्यात आली आहे. ही सभा पुण्यात पत्रकार भवन, नवी पेठ इथं सायंकाळी ६.०० वाजता होणार आहे. त्यानिमित्तानं हा लेख...

..................................................................................................................................................................

सुधीर बेडेकरशी माझी पहिली भेट १९८०मध्ये डेक्कनवरील त्यांच्या भक्कम दगडी किल्ल्यात दत्ताबरोबर झाली आणि माझ्या- आमच्या जीवनाला एक कलाटणी मिळाली. तिथं ‘मागोवा’, ‘तात्पर्य’, ‘लोक विज्ञान संघटना’ व ‘ब्रह्मे ग्रंथालय’ एकाच जागेत असल्याने सुधीरबरोबरच सुलभाताई ब्रह्मे, अनंत-संध्या फडके, कुमार शिराळकर, सुहास-स्वातीजा परांजपे, मुक्ता-अशोक मनोहर, अशा अनेक डाव्या कार्यकर्त्यांची ओळख होत गेली. या साऱ्यांबरोबर, विशेषतः सुधीरशी वैयक्तिक व अभ्यासवर्गातील संवादाच्या आधारे मार्क्सवादाची ओळख होत गेली आणि अनेक अंगानं भुंग्यांसारख्या त्रास देणाऱ्या प्रश्नांचा विचार कसा करायचा, हे कळत गेलं.

विज्ञानाचं प्रचंड वेड असलेल्या मला ‘लोक विज्ञान संघटने’त अनेक वैज्ञानिक समूहानं काम करतात, याचं अप्रूप वाटलं. अगदी सुरुवातीलाच आरोग्य प्रदर्शन घेऊन मी नंदूरबारला गेले आणि तिथलं दारिद्र्य व आदिवासींचं जीवन बघून मुळातून बदलले. ज्या घरामध्ये एकसुद्धा धातूचं भांडं नाही, अशा अत्यंत निकृष्ट जीवन जगणाऱ्यांना ‘संडासहून आल्यावर राखेऐवजी साबणानं हात धुवा’, हे सांगणं विज्ञान व आर्थिक अशा दोन्ही अर्थानं किती गैर आहे, हे लक्षात आलं. त्यामुळे ‘आपल्या प्रदर्शनातील ही गोष्ट बदलली पाहिजे’, असं मी अनंता-सुधीर यांच्याशी बोलल्याचं आजही स्मरणात आहे. मग बैठकांमध्ये आमच्याशी सुधीर अतिशय सोप्या शब्दांत विज्ञान-समाजशास्त्र यांची सांगड घालून वैज्ञानिक दृष्टीविषयी चर्चा करत असे. परिणामी माझा सामाजिक-राजकीय बदलांकडे कल वाढला. समाजबदलासाठी मार्क्सवादाशिवाय पर्याय नाही, या विचारांप्रत आले. आणि अतिशय वेगानं राजकीय कामातही ओढले गेले.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

साधेपणानं जीवन जगतानाच त्यातील उत्फुल्लता टिकवता येते, स्वतःतील सर्जनशीलता, स्वत्व महत्त्वाचं, हे जास्त उलगडत गेलं. गर्भश्रीमंत असूनही सुधीर-चित्रा दोघंही अतिशय साधे, परंतु अतिशय टापटीप राहायचे. ‘लकी’तला खीमा-पाव आम्ही बऱ्याचदा खात असू, पण त्याला गोड मनापासून प्रिय होतं. त्यामुळे घरी जेवायला आला, तर मी काहीतरी गोड बनवायची. आत्ताइतका चंगळवाद त्या वेळी बोकाळलेला नसला, तरीसुद्धा व्यक्ती इतक्या साध्या राहतात, याचं कौतुकमिश्रीत दडपणही होतं. कदाचित त्याच्या नेमक्या बोलण्याचं वैचारिक दडपण असेल. त्या काळात ‘सुधीर काय म्हणतो?’ याकडे प्रा. राम बापट वा पुणे विद्यापीठातील राजशास्त्राचे प्राध्यापक सुमंत सर, तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक सदानंद मोरे सर असोत किंवा साहित्य क्षेत्रातील नामवंत असो, हे लक्ष ठेवून असायचे.

या साऱ्यामुळे माझ्यासारख्या साध्या कार्यकर्तीला त्याचं थोडं दडपण न आलं तरच नवल! परंतु ते येऊ नये म्हणून सुधीर राजकीय विनोदांबरोबरच शाब्दिक नर्मविनोदाची पखरण करत असे. त्यामुळे त्याची सहज कोणाशीही मैत्री होई. ‘मागोवा’च्या कार्यालयात लावलेल्या पिकासोच्या चित्रामुळे तोही तेव्हाच माहिती झाला. असं सहज सुंदर जीवन तो जगत होता!

मार्क्सवाद म्हणजे केवळ पठडीबाज वर्गसंघर्ष नव्हे किंवा खरं तर वर्गीय दृष्टीकोन आणि साहित्य-संगीत व विचार, अशी समग्र वैज्ञानिक विचारांची बैठक आहे, हे सुधीर-सुहास-अनंता या समविचारी मित्रांमुळे कळत गेलं. विज्ञानातील कठोर तार्किकतेबरोबर येणारी द्वंद्वात्मकता, इतिहासाच्या संदर्भात घटना-व्यक्तींची भूमिका-विश्लेषण असं काळाचं सतत भान, या साऱ्यातून ‘बर्ड व्ह्यू’चं भान येत गेलं. जीवन आपोआपच अनेक अंगानं फुलत गेले आणि आजही ‘निशासक्त की सूर्य गर्जने’च्या सादाचा लागलेला षड्ज सुधीर अस्ताला गेल्यावरही कानात घुमतो!

याचं एकमेव कारण म्हणजे सुधीरशी (आणि दत्ता, सुहास, अनंता) सातत्याने हिरिरीनं घातलेले वैचारिक राजकीय-सांस्कृतिक प्रेमळ वाद-कम-गप्पा! तसंच या चर्चांच्या परिणामी प्रत्यक्ष जनसमूहांबरोबर केलेली व्यापक, अशी राजकीय-सामाजिक-सांस्कृतिक बांधणी आणि त्यासाठीचा कम्युनिस्ट पक्षांतर्गत केलेला झगडा हेही होत राहिलं. तत्त्वाला तिलांजली न देता भारतीय संदर्भात मार्क्सवादी विचार करायच्या गरजेविषयी संवाद करत राहिलो. म्हणूनच असंघटित क्षेत्रात व खास करून महिलांमध्ये काम करताना त्यांच्या आर्थिक लढ्यासोबतच आरोग्य-शिक्षण हक्काची लढाई जोडता आली. लाल-बावट्याच्या स्वप्नांसाठी १ मेला केलेल्या झेंडावंदनातून बहुजन-दलित-कामगार वर्गातील समूहांबरोबर स्वतःलाही स्वत्वाचं भान येत गेलं. हा सारा प्रवास सुधीर-दत्ताबरोबरच्या व्यापक संवाद प्रक्रियेतून होत गेला, असं मला वाटतं.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

फुले-अण्णाभाऊंच्या साहित्यापासून ते दया पवार-नामदेव ढसाळांच्या सिंहगर्जनेची आणि अन्य समकालीन दलित साहित्य, वसंत आबाजी डहाके, हरिशंकर परसाई, याची ओळख ‘मागोवा’ व ‘तात्पर्य’ मासिकांमुळे वृद्धिंगत झाली. त्यामुळे वर्गासोबतच जातीअंताच्या लढ्याचं भान येत गेलं. मध्यमवर्गीय (उदा. पु. ल. देशपांडे) व ब्राह्मणी साहित्याच्या मर्यादाही कळत गेल्या. ‘मूर्ख म्हातार्‍याने डोंगर हलविले’सारख्या ढसाळांच्या कविता वा ‘माशी आणि कोळी’, ‘मध्यमवर्गीय कुत्रा’ या अतिशय छोट्या कथा आजही स्मरणात आहेत.

रशियन क्रांतीच्या मनावरील गारुडामुळे ‘गॉर्कीची आई’ ते मायकोवस्की-इवान तुर्गेनेव अशी रशियन व परदेशी परिवर्तनशील-पुरोगामी-डावे साहित्य, त्यातून होणारं जीवनदर्शनाचं डोळस वाचन घडायचं. डोळस यासाठी म्हणते की, स्टालिनने काही योग्य पावलं उचलली, तरी त्याने केलेल्या सांस्कृतिकसह वेगळा विचार मांडणाऱ्या सर्व थरांतील कार्यकर्त्यांचा नरसंहार, नोकरशाही पद्धतीची पक्षबांधणी, याबद्दल असलेली सुधीर व मित्रांची टीका ऐकत आमची समज जास्त सखोल होत गेली.

लेनिन फार काळ जगला नाही, अन्यथा वेगळंच घडलं असतं, याची सल सुधीरच्या मनात होती. त्याच्याविषयी तो भरभरून बोलायचा. ‘ग्रामीण गरिबांसाठी’, ‘पक्ष संघटना’, ‘एक पाऊल पुढे, दोन पावले मागे’ अशा लेनिनच्या सर्व मराठी छोट्या पुस्तिकांसोबतच लिऊ शाऊ ची या लेखकाच्या ‘खरा कम्युनिस्ट कोणाला म्हणावे’ यासारख्या पुस्तकांचा परिचय सुधीरमुळेच झाला.

थोडक्यात काय तर, मार्क्सवादाकडे किंवा एकूणच विज्ञानाकडेसुद्धा समीक्षात्मक दृष्टीनं पाहायला हवं. खरं तर सुधीर विज्ञानात आणि मार्क्सवादात ती ताकद आहे, ते सतत बदलत असतं, ही शिकवण त्याच्या संपर्कात येणाऱ्यांना देत राहिला.

गुरुदत्तचा ‘प्यासा’ असो वा ‘इप्टा’मध्ये सुरुवातीला कम्युन करून राहणारे कैफी आझमी-साहिर लुधियान्वी-बलराज सहानी अशा चर्चांच्या ओघानं सांस्कृतिक अंगानं जीवन बहरत गेलं. जन विज्ञान आंदोलन, विज्ञान-संस्कृती याविषयी आस्था आणि तशी प्रत्यक्ष जीवनात करत आणलेले बदल, ‘समाजवादी शिव्यां’वर त्याने केलेल्या मांडणीवर चर्चा करत चळवळीत काम करत गेले.

सुधीरबरोबरच्या वैचारिक चर्चा, तर दत्ता वैचारिक क्षेत्रात ‘समाज विज्ञान अकादमी’सोबत काम करू लागल्यानं दि. के. बेडेकरांचं ‘धर्मचिंतन’, गं. बा. सरदारांचं संतसाहित्य आणि नलिनी पंडितांचं ‘गांधी’, रावसाहेब कसबेंचं ‘मार्क्स आणि आंबेडकर’, असा खजिना आमच्यासमोर उघडा होत आला. एवढंच नव्हे तर, या दिग्गजांची जवळून ओळख व सोबत कामही करता आलं.

सुधीर ‘केरळ शास्त्र साहित्य परिषदे’च्या (केएसएसपी)बाबत अतिशय आपुलकीनं बोलायचा. डाव्यांनी केलेला एक वेगळा प्रयोग आणि ‘सायलेंट व्हॅली’ वाचवण्यासाठी, प्रसंगी सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाच्याही विरोधात घेतलेली भूमिका, याचं कौतुक त्याला होतं. विज्ञान चळवळ व केएसएसपीच्या आस्थेमुळे डॉ. एम. पी. परमेश्र्वरन यांनी ‘भारत ज्ञान विज्ञान समिती’च्या स्थापनेबाबत सुधीर-दत्ता-अजित अभ्यंकर, कुमार शिराळकर यांच्याबरोबर चर्चा केली. अलीकडील काही वर्षं दत्तासह विज्ञान-समाजशास्त्राची सांगड घालून जनवाचन आंदोलन, संसाधन साक्षरता, समता विज्ञान आंदोलन, असे अनेक उपक्रम विकसित करणं आणि शिक्षण हक्काचा संवाद हा असंघटितांपर्यंत, निरक्षरांपर्यंत जोडून समाजबदलाचं काम करता आलं.

..................................................................................................................................................................

उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअ‍ॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...

हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal

................................................................................................................................................................

‘पेडॅगॉगी ऑफ द ऑप्रेस्ड’ या पॉलो फ्रेअर यांनी मांडलेल्या भूमिकेचा, तसंच गुणवत्तापूर्ण कृतीआधारित शिक्षणाचा एक संपूर्ण नवा विचार महाराष्ट्रात रुजवण्याच्या प्रयत्नात विज्ञान अगदी तळागाळापर्यंत घेऊन जाण्याचे मार्ग दिसू लागले. हे सारं करताना सुधीरशी काही मतभेद होत राहिले. एकीकडे त्यानेच दिलेल्या शिकवणीतून आधुनिक विज्ञान-तंत्रज्ञानाच्याही मर्यादा समाजशास्त्राच्या निकषांवरच तपासून पाहायला हव्यात, हे कळत गेलं. मात्र याविषयी जेव्हा त्याच तत्त्वांचा जेव्हा ठोस, व्यावहारिक गोष्टीत आम्ही रूपांतर किंवा अंमल करत असू, तेव्हा त्यावर वाद व्हायचे. कोविडच्या निमित्तानं सुरू असलेल्या राजकारणाबाबत आम्ही फेसबुक पोस्ट टाकल्या, तेव्हाही सुधीर व समविचारी मित्रांमध्ये खटके उडालेच.

अर्थात हे सारं काम करताना सुधीरचं जाणवलेलं वैशिष्ट्य म्हणजे तो नेमकेपणानं वैचारिक फरक स्पष्ट करायचा. समाजवाद्यांमधील विविध विचारधारा, आंबेडकर विचारांच्या आधारे काम करणारे विविध गट किंवा डांगे-रणदिवे वाद व सीपीआय-सीपीएम् यांच्या भूमिकांमधील फरक, असे बारकावे तो सांगायचा, वाचायला उद्युक्त करायचा. डोळे झाकून कोणतीही गोष्ट स्वीकारू नका, एवढंच म्हणून तो थांबायचा नाही, तर कोणाचीही व्यक्तीपूजा त्याला अमान्यच होती. आणि म्हणूनच ही समतेची शिकवण देताना वयात इतकं अंतर, विचारानं इतकी प्रगल्भता असूनही, किंवा खरं तर होती म्हणूनच, अनंता-सुहासप्रमाणे सुधीरही आमचा मित्रच राहिला.

तत्त्व प्रत्यक्ष अंमलात आणूनच समाजात बदल घडतो, हे तो म्हणायचा, तेव्हा ‘कर्ते व बोलते सुधारक’ची आठवण आल्यावाचून राहत नसे. तसे दाखले देताना तो अनेक जमीनदार कम्युनिस्टांनी स्वतःच्या जमिनी रयतांना कशा आपणहून वाटल्या, हे सांगत असे. हैद्राबाद मुक्ती संग्रामातील व कम्युनिस्ट चळवळीतील ज्येष्ठ (वय ९४) नेते अ‍ॅड. भगवानराव देशपांडे यांना गेल्या महिन्यात औरंगाबादमध्ये आम्ही भेटलो, तेव्हा त्याचं पुनःप्रत्यंतर आलं.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

त्याचबरोबर आमदारांनी काही चुकीचा व्यवहार केला, तर त्यांच्यावर कम्युनिस्ट पक्षानं कारवाई करणं, अशा अनेक गोष्टींची चर्चा व्हायची. तसंच स्वतःच्या जीवनातील साधेपणा - डिक्लास होणं - याविषयीदेखील सुधीरसह सर्व ग्रुपशी झालेल्या चर्चांमधून आम्ही अधिकाधिक सजग होत राहिलो. मात्र जातीच्या संदर्भ काढून टाकण्यासाठी नावात बदल करण्याचा मुद्द्याबाबत माझी भूमिका सुधीरला का पटली नाही, हे मला न उलगडलेलं कोडं आहे. त्याची तुलना केवळ भूमिगत काम करताना असे बदल करण्याशी करणं आणि रोजच्या जीवनातल्या सांस्कृतिकतेकडे कानाडोळा करणं, हे मला पटलं नाही. अर्थातच कधी या वादाआड आमची मैत्री आली नाही. सुधीर-चित्रासह सर्व मित्र-मैत्रिणींशी आमच्या कुटुंबासारखं जवळचं नातं तयार होत गेलं. या साऱ्यांच्या सहवासातून महाराष्ट्रातील आणि देशभरातील कार्यकर्त्यांपर्यंत नाळ जुळली, निरपेक्षपणे विचार करण्याची सवय लागली आणि एक चांगलं समृद्ध जीवन जगू लागलो, असंच मी म्हणेन.

पाच वर्षांपूर्वी सुधीरला कॅन्सर झाला, तेव्हा आम्ही सर्व जण चिंतेत होतो. त्यातून तो व्यवस्थित बरा झाला, एवढंच काय कोविडलाही त्याने हुलकावणी दिली. आणि साध्या जुलाब-उलट्यांचं निमित्त होऊन एकाच दिवसात तो गेला, हे मनाला न पटणारं आहे. गेल्या दोन आठवड्यांत ‘मागोवा’ गटातील अनेकांना तो भेटला, नवीन काही तरी लिहिणार असंही म्हणत होता, ते ऐकून आम्ही अतिशय खूष होतो. मात्र आजच्या अतिशय थिजलेल्या आणि सर्वग्रासी संकटाच्या काळात युवा पिढीला मार्गदर्शनाची अपेक्षा असताना, सुधीरसारख्या विचारवंताचं अचानक जाणं सर्वांनाच चटका लावणारं आहे.

..................................................................................................................................................................

हेही पाहा\वाचा : ‘समाजवादी शिव्यांचा शोध’ : समाजवादी माणसेच आहेत, ती संतापणार व इतरांची अवहेलना करावीशी त्यांना वाटणारच. तेव्हा त्यांनी शिव्या जरूर द्याव्यात, पण... - सुधीर बेडेकर

..................................................................................................................................................................

लेखिका विनया मालती हरी सामाजिक कार्यकर्त्या आहेत.

vinayamh@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

शिरोजीची बखर : प्रकरण विसावे - गेल्या दहा वर्षांत ‘लिबरल’ लोकांना एक आणि संघाच्या लोकांना एक, असे दोन धडे मिळाले आहेत. काँग्रेसला धर्माची आणि संघाला लोकशाहीची ताकद कळून चुकली आहे!

धर्म आणि आर्थिक आकांक्षा यांचा मेळ घालून मोदीजी सत्तेवर आले होते. धर्माचे विषय राममंदिर झाल्यावर मागे पडत चालले होते. आर्थिक आकांक्षा मात्र पूर्ण झाल्या नव्हत्या. त्या पूर्ण होण्याची शक्यताही नव्हती. मुसलमान लोकांच्या घरांवर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश वगैरे राज्यात बुलडोझर चालवले जात होते. मुसलमान लोकांवर असे वर्चस्व गाजवायचे असेल, तर भाजपला मत द्या, असे संकेत द्यायचे प्रयत्न चालले होते. पण.......

तुम्ही दुसरा कॉम्रेड सीताराम येचुरी नाही बनवू शकत. मी त्यांना अत्यंत कठीण परिस्थितीतही कधी उमेद हरवून बसलेलं पाहिलं नाही. हे गुण आज दुर्लभ होत चालले आहेत

ज्याचा कामगार वर्गावरील विश्वास कधीही कमी झाला नाही, अशा नेत्याच्या रूपात त्यांचं स्मरण केलं जाईल. कष्टकरी मजुरांप्रती त्यांचं समर्पण अद्वितीय होतं. त्यांच्या राजकीय जीवनात खूप चढ-उतार आले, पण त्यांनी स्वतःची उमेद तर जागी ठेवलीच, पण सोबत आम्हा सर्वांनाही उभारी देत राहिले. त्यांनी त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या व्यापक समूहात त्यांची श्रद्धा असलेल्या विचारधारेप्रती असलेला विश्वास कायम जिवंत ठेवला.......

शिरोजीची बखर : प्रकरण अठरा - निकाल काहीही लागले, तरी या निवडणुकीच्या निमित्ताने दलितांमधील आत्मविश्वासामुळे ‘लोकशाही’ बळकट झाली, असे इतिहासकारांना म्हणता येणार होते...

...तीच गोष्ट आरक्षण रद्द केले जाईल की काय, या भीतीमुळे घडली होती. आरक्षण जाईल या भीतीने दलित पेटून उठले होते. या दुनियेत आर्थिक प्रगती करण्यासाठी तेवढी एकच गोष्ट दलितांपाशी होती. दलितांचे आंदोलन उभे राहण्याआधीच घटना बदलली जाणार नाही, असे आश्वासन मोदीजींनी दिले. राज्यघटनेविषयी दलित वर्ग अजून एका बाबतीत संवेदनशील होता. ती घटना बदलण्याचा विषय काढणे, हेदेखील दलित अस्मितेवर घाव घालण्यासारखे होते.......