१० मार्चला उत्तर प्रदेशातील निवडणुकांचे निकाल लागले. भाजप हरणार, असा उदरामतवाद्यांचा होरा होता, तो खोटा निघाला. भाजपचा कारभार १३० ते १४० जागांवर आटपेल, असे उदारमतवाद्यांना वाटत होते, तसे काही झाले नाही. उलट ४०३ पैकी २५५ जागा जिंकल्या. कित्येक उदरामतवादी निराश झाले. कित्येकांनी चार-पाच दिवसांसाठी व्हॉट्सअॅप निवृत्ती घेतली.
महागाई, वाढती बेरोजगारी, कोविडच्या साथीमधली मिस-मॅनेजमेंट, कोसळता जीडीपी, मोकाट गुरांनी मांडलेला उच्छाद आणि किसान आंदोलन, यांमुळे भाजप ही निवडणूक सणकून हरेल, असा मोदी-विरोधकांचा होरा होता.
भाजपच्या कार्यकर्त्यांनाच नव्हे, तर उमेदवारांनादेखील अनेक गावांमधून हाकलून देण्यात आले होते. भाजपबद्दलचा सामान्य लोकांमधला राग ठिकठिकाणी व्यक्त होत होता. मोदींसह अनेक मोठ्या नेत्यांच्या सभांना अजिबात गर्दी होत नव्हती. परिवर्तनाचे वारे उत्तर प्रदेशात खेळत आहेत, असा बहुतांश विचारवंतांचा सूर होता.
पण अखेरीस झाले वेगळेच!
परिणामी मोदीभक्तांमध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणावर उन्माद तयार झाला. आता या शतकातील उरलेली सगळी वर्षे आमचीच अशा वल्गना सुरू झाल्या. मोठे मनोरम दृश्य होते ते! एका राज्यातील निवडणूक काय ती! आणि निष्कर्ष मात्र युगप्रवर्तनाचे!!!
शिरोजीच्या बखरीच्या गेल्या प्रकरणात उदारमतवादी आणि मोदीभक्त यांच्यात भज्यांची पैज लागली होती. भास्कर, समर आणि दुर्गाप्रशाद पांडेजी यांचे म्हणणे होते की, भाजप हरणार आहे. नाना, अविनाश आणि अच्युत यांचे म्हणणे होते की, भाजप जिंकणार आहे. भाजप जिंकला तर पांडेजी दोन भज्यांच्या प्लेट्स देणार होते. भाजप हरला तर नाना आणि अविनाश एक प्लेट भजी देणार होते. शिरोजी बखरीचे हे प्रकरण लिहायला बसला, तेव्हा तो गालातल्या गालात हसत असणार. उत्साहात रत झालेले मोदीभक्त म्हणजे एक विलोभनीय दृश्य असे. अशा भक्तांचा उन्माद बघून शिरोजीची भरपूर करमणूक झाली असणार. शिरोजी आपल्या खुशखुशीत शैलीत ही बखर लिहायला बसला असणार.
शिरोजी स्वतः उदारमतवादी होता आणि त्याची भास्कर, समर आणि दुर्गाप्रशाद प्रमुख पात्रेदेखील उदारमतवादी होती. या पात्रांना वाटत होते की, उत्तर प्रदेशात भाजप हरणार आहे. त्यामुळे आपल्या उदारमतवादी पात्रांबरोबर शिरोजीसुद्धा फसला, असा गैरसमज अनेक वाचकांचा होऊ शकतो. पण तसा निष्कर्ष अजिबात काढता येणार नाही.
भारतामधली, धर्मावर आधारित राजकारणाची लाट २०४० ते २०५० या काळात पूर्णपणे ओसरेल, असे शिरोजीचे भाकित होते. आज २१२२मध्ये बसून मागे वळून बघताना शिरोजीचे भाकीत तंतोतंत खरे ठरल्याचे आपल्याला दिसून येते आहे. मग प्रश्न असा येतो की, उत्तर प्रदेशातील निवडणुकीविषयी आपली मते वेगळी असताना शिरोजीने आपल्या उदारमतवादी पात्रांना तोंडघशी का पाडले?
याची दोन उत्तरे आहेत. एक म्हणजे उदारमतवादी आणि मोदीभक्त ही दोन्हीही शिरोजीचीच पात्रे आहेत. या दोन विचारधारांमधील वैचारिक संघर्ष शिरोजी रंगवत होता. त्या काळातील उदारमतवाद्यांमधील आशा-निराशेचे खेळ दाखवणे, हे एक इतिहासकार म्हणून शिरोजीचे कामच होते.
येथे एक इतिहासकार म्हणून शिरोजीची दृष्टी काय होती, हे आपल्याला समजून घ्यायचे असेल तर आपल्याला जॉर्ज हेगेल या फिलॉसॉफरची इतिहासाबद्दलची मते समजून घ्यावी लागतील. हेगेलने सांगितल्याप्रमाणे इतिहास तीन प्रकारात विभागलेला असतो. एक म्हणजे ‘ओरिजिनल हिस्ट्री’, दुसरी म्हणजे ‘रिफ्लेक्टिव्ह हिस्ट्री’ आणि तिसरी म्हणजे ‘फिलॉसॉफिकल हिस्ट्री’.
‘ओरिजिनल हिस्ट्री’ला आपण ‘नवनिर्मित इतिहास’ म्हणूयात. जशा जशा घटना घडत जातात, तसा तसा हा इतिहास लिहिला जातो. शिरोजीची पात्रेदेखील घटना जशा जशा घडत होत्या, तशी तशी चर्चा करत चालली होती. घटनांचा ताजा ताजा हाल वाचकाला समजत होता. हा नवनिर्मित इतिहास!
यानंतर आपल्याला बघावी लागेल ‘फिलॉसॉफिकल हिस्ट्री’ (‘तत्त्वज्ञानात्मक इतिहास’). शिरोजी जेव्हा २०२२मध्ये आपल्याला सांगत असतो की, २०४० ते २०५०च्या दरम्यान धर्मावर आधारित राजकारणाची लाट ओसरलेली असेल, तेव्हा तो फिलॉसॉफिकल हिस्ट्री लिहीत असतो. फिलॉसॉफिकल हिस्ट्री लिहिणे आणि भविष्य वर्तवणे यात साम्य दिसत असले, तरी या दोन गोष्टींमध्ये फरक आहे. भविष्य वर्तवण्याला तत्त्वज्ञानाचा पाया असत नाही.
शिरोजीने इतिहासाचे हे दोन्ही प्रकार लीलया लिहिले आहेत. त्याने ‘रिफ्लेक्टिव्ह हिस्ट्री’ (म्हणजे ‘चिंतनात्मक इतिहास’) लिहायला हवी होती. हा इतिहास घटना घडून गेल्यावर लिहितात. घडून गेलेल्या घटनांवर चिंतन करून हा इतिहास लिहिला जातो. शिरोजीने असे काही केलेले नाही. निदान त्याने शंभर वर्षांनंतरचे एखादे पात्र लिहून त्याच्या तोंडून २०२१ ते २०४०मधील घटनांवरचे चिंतनशील भाष्य करवून घ्यायला हवे होते. शिरोजीची एक इतिहासकार म्हणून प्रतिभा बघता, त्याला हे अशक्य नव्हते. त्याने हे केले असते, तर आज २१२२मध्ये एक संपादक म्हणून शिरोजीने लिहिलेल्या इतिहासावर चिंतन करण्याचे आमचे काम खूप सोपे झाले असते!
शिरोजीने भविष्यातून इतिहासाकडे मागे वळून बघणारे एखादे पात्र तयार केले असते, तर शिरोजी तिन्ही प्रकारचा इतिहास एका बैठकीत लिहीत असे, आम्ही अत्यंत अभिमानाने म्हणू शकलो असतो. अर्थात शिरोजीने ‘रिफ्लेक्टिव्ह हिस्ट्री’ लिहिली नाही, हेच बरे झाले. नाहीतर, आम्हाला स्वतःला आमच्या संपादन-कलेचा कस लावायची संधी कशी मिळाली असती? असो.
वाचकांना एक मौजेची गोष्ट इथे सांगायची आहे. आमचे शिरोजीबद्दलचे प्रेम हा पुण्यामध्ये एक चेष्टेचा विषय झाला आहे. सदाशिव पेठेमधून चालत जात असताना आम्हाला काही चावट कार्टी ‘ए शिरोजी जोशी’ अशा हाका मारू लागली आहेत. एका व्रात्य कार्ट्याने तर आमच्या दारावरील ‘श्रीमान जोशी’ या नावाच्या दोन पदांच्या मध्ये आमच्या वडिलांच्या नावाच्या जागी ‘शिरोजी’ असे नाव खडूने लिहिले आहे. गेल्या १०० वर्षांत सदाशिव पेठेचे बाह्य रंग खूप बदलले आहेत. डांबरी रस्ते जाऊन हार्डन्ड काचेचे रस्ते आलेले आहेत. टिळक रस्त्यावरील ‘बादशाही बोर्डिंग’मध्ये १०० वर्षांपूर्वी तांदळाच्या पिठाची धिरडी छान मिळत असत. आता बादशाही बोर्डिंगचे सहस्त्रबुद्धे ‘मेमिल गुक्सू’ या कोरियन नूडल्स विकण्यासाठी प्रसिद्ध झाले आहेत. या ऑथेंटिक कोरियन नूडल्स खाण्यासाठी खुद्द कोरियाहून कोरियन लोक बादशाहीमध्ये येतात! कारण सहस्रबुद्धे यांनी कुठेही शाखा काढलेली नाही. धंदा कितीही बेफाम चालला तरीसुद्धा शाखा काढायची नाही, हे अस्सल पुणेरी तत्त्व श्री सहस्रबुद्धे यांनी २२व्या शतकातही पाळल्याचे आपल्याला दिसून येते. त्याबद्दल त्यांना गेल्याच वर्षी ‘पुण्यभूषण’ हा पुरस्कारसुद्धा दिला गेला आहे.
सांगायचे तात्पर्य काय? सदाशिव पेठेचे बाह्यरंग कितीही बदलले असले तरी तिचे व्रात्य अंतरंग अजिबात बदललेले नाहीत. कार्ट्यांनी केलेल्या या चेष्टेमुळे आम्हाला अजिबात वाईट वाटत नाही. कारण या चेष्टेमधून शिरोजी पोराटोरांमध्येसुद्धा प्रसिद्ध झाला आहे, हे सिद्ध होते आहे. हा आनंद आमच्या होणाऱ्या चेष्टेपेक्षा फार फार फार मोठा आहे. असो.
आता जास्त उशीर न करता आपण शिरोजीच्या बखरीच्या दहाव्या प्रकरणाकडे जाऊ.
उत्तर प्रदेशातील निवडणुकांच्या निकालांच्या संदर्भात शिरोजी एक इतिहासकार म्हणून अजिबात फसला नव्हता, हे सिद्ध करण्यासाठी आम्ही हे संपादकीय लिहिण्याचा उपद्व्याप केला आहे.
- श्रीमान जोशी, संपादक, ‘शिरोजीची बखर’
..................................................................................................................................................................
शिरोजीची बखर : प्रकरण दहावे
उत्तर प्रदेशातील निवडणूक भाजपने जिंकली आणि पैजेची दोन प्लेट भजी वसूल करण्यासाठी पांडेजींच्या ठेल्यावर अविनाश, नाना आणि अच्युत चाल करून गेले. पण, पोहोचल्यावर पांडेजी जौनपूरला गेल्याचे कळले. त्यांचा विश्वासू नौकर रविशंकरप्रशाद चौरसिया ठेल्यावर होता. तो अत्यंत खडूस माणूस होता. त्याच्याकडून परस्पर पैजेची भजी मिळणे शक्यच नव्हते. एवढा खडूस माणूस पुण्यात इतकी वर्षे राहूनही आपल्याला बघायला मिळाला नव्हता, याचे खोल शल्य नानांच्या मनात होते. साक्षात पुण्यात इतके तालेवार खडूस असताना त्या सगळ्यांच्या नाकावर टिच्चून खडूसपणाचा ‘विजय-चषक’ एका उत्तर प्रदेशी बांधवाने दिवसाढवळ्या जिंकून न्यावा, याला काय म्हणावे! त्यात आता दोन प्लेट भजी पांडेजी येतील, तेव्हाच्या दिवसावर गेलेली. नाना खट्टू झाले.
तेवढ्यात अविनाशने दोन प्लेट भजी सांगितली. गेला तर गेला पैसा! योगी आदित्यनाथ निवडून आले होते. हिंदुत्वाचा दुसरा सूर्य उगवला होता. एकाच वेळी हिंदुत्वाच्या आकाशात दोन दोन सूर्य तळपू लागले होते. एक मोदीजी आणि दुसरे योगीजी. अमित शहांना सूर्य म्हणावे की, चंद्र हे अविनाशला सुचत नव्हते.
या सगळ्या आनंदापुढे पैजेची भजी पुढे गेल्याचे दुःख काहीच नव्हते. भजी आली. तिघेही आनंदाने भजी खात राहिले. पण मजा आली नाही. भास्कर, समर आणि पांडेजी यांची पडलेली तोंडे बघत भजी खाण्याची मजा पैसे देऊन भजी खाण्यात नक्कीच नव्हती. चर्चा सुरू झाली. नाना भज्यांचा घास तोंडात सरकवत म्हणाले - ‘आता २०० वर्षे भाजपची सत्ता जात नाही’. नाना इतके एक्साइट झाले होते की, भज्यातील मिरची दाताखाली कचकन चावली गेल्याचे त्यांना दोन सेकंद कळलेदेखील नाही. त्यानंतर ठसक्याचा स्फोट झाला. नाना कासावीस झाले. त्यांना श्वास लागला. त्यांच्या तुळतुळीत मस्तिष्कावर घाम साठला. बैठक आणि आनंदाचा माहौल तिथेच संपला. वर भज्यांचे पैसे गेले ते वेगळेच!
..................................................................................................................................................................
.................................................................................................................................................................
निकाल लागल्यावर उदारमतवाद्यांचे चार दिवस अत्यंत वाईट गेले. समरच्या तोंडाची तर चवच गेली होती. निराशेचा काळा ढग त्याच्या मनात दाटून आला होता. उत्तर प्रदेशाच्या निवडणुकीपासून सगळे फासे उदारमतवादी पक्षांच्या बाजूने पडू लागतील, असे त्याला वाटत होते. पण कसले काय अन् कसले काय! भास्कर मात्र शांत होता. लोकशाही म्हटल्यावर जनता-जनार्दन जे काही ठरवेल ते होणार. भास्करची मतदारांवर श्रद्धा होती. शिवाय लोकशाहीचा मार्ग असाच असतो, हे भास्करला माहीत होते. आपण आपल्या मनात आखलेल्या मार्गावरून इतिहास चालणार नाही, हे त्याला माहीत होते आणि मान्यही होते. पण इतिहासाची एकूण दिशा काय असणार आहे, या विषयी तो निश्चिन्त होता.
पांडेजी १० दिवसांनी आले. आल्या आल्या त्यांनी सगळ्यांना ठेल्यावर बोलावून घेतले. या १० दिवसांच्या काळात समर सावरला होता. त्याचा मिश्किलपणा त्याच्याकडे परत आला होता. नाना, अविनाश आणि अच्युत आले, तेव्हा समर भास्कर आणि पांडेजी यांची मैफल रंगात आली होती. तिघेही मोठ्याने हसत होते. त्या तिघांना हसताना पाहून अविनाशचा मूड गेला. तिघे येताच पांडेजींनी उठून त्यांचे स्वागत केले.
अविनाश - मारी की नहीं हमने लढाई?
पांडेजी - (हसत) बिल्कुल! जीत गए आप लड़ाई! हार्दिक बधाई!!
सगळे बसल्यावर पांडेजींनी एक इमरतीचे मोठ्ठे पाकीट आणून समोर ठेवले. जौनपूर के महाप्रसिद्ध हलवाई बेनीराम की इमरती! भाजपा की जीत के नाम!
अच्युत - तुम्ही हसताय काय? हरला आहात तुम्ही?
पांडेजी - आप क्यूं नहीं हस रहें हो? भाजपा जीत गई हैं आपकी! बड़ी शानदार जीत हुई हैं आप की!
अविनाश - हम तो हसेंगे जोर जोर से! ऐतिहासिक जीत हुई हैं हमारी. अब हमारा युग आएगा. सब लिब्रान्डू लोग भाग जाएंगे अब.
समर - कुणी पळून नाही चाललेलं.
भास्कर - आम्ही सगळे इथेच आहोत.
नाना - इमरती बहुत अच्छी हैं.
पांडेजी - बहुत शानदार होती हैं बेनीराम की इमरती. शुद्ध-घीवाली.
नाना - (इमरती खात) वो दो प्लेट भजी लाइए ना पैज की!
पांडेजी - हम पैज की भजी नहीं बनातें हैं. प्याज या आलू इन दोनों की ही भजियां बनती हैं हमारे यहाँ.
भास्कर - पैज याने की शर्त. भूल गए क्या पांडेजी?
पांडेजी - (हसत) अरे, सॉरी मैं तो भूल गया था! सॉरी!
पांडेजींनी चार प्लेट भजी सांगितली.
..................................................................................................................................................................
अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5312/Checkmate
..................................................................................................................................................................
अविनाश - अब आप का क्या बोलना हैं? ईव्हीएम की वजह से भाजपा की जीत हुई नं?
(ईव्हीएम म्हणजे इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन. भाजप या ईव्हीएममध्ये गोलमाल करून निवडणुका जिंकते आहे, असे या काळात भल्याभल्यांचे म्हणणे होते. त्यात काही अर्थ नव्हता. अर्थात पुढे कागदावर मतदान घेण्याची पद्धत कायम झाली, हा वेगळा भाग. - संपादक.)
पांडेजी - बिल्कुल नहीं. भाजपा ने हम लोगों को कोई गड़बड़ी कर के हराया हैं, ऐसे तो हम कतई नहीं कहेंगे. कोई गड़बड़ी होती, तो विपक्षवाले पकड़ लेते. उल्लू नहीं हैं विपक्षवाले.
अविनाशला वाटले होते की, पांडेजी वगैरे रडीचा डाव खेळतील आणि खूप मजा येईल. पांडेजी म्हणाले की, भाजप न्याय्य पद्धतीने जिंकला आहे. आणि अविनाशचा हिरमोड झाला.
अविनाश - अब तो आपको मान्य करना पडेगा की, पूरा हिंदुस्तान मोदीजी के साथ हैं.
पांडेजी - उत्तर प्रदेश में भाजपा की शानदार जीत हुई हैं, ये हम कह सकते हैं. मोदीजी प्रधानमंत्री हैं और इसलिए सारे भारतीय उनके साथ हैं, ये भी हम कह सकते हैं. लेकिन उत्तर प्रदेश में भाजपा की जीत हुई हैं, इसलिए सारे भारतीय मोदीजी के साथ हैं, ये तो हम नहीं कह सकते हैं! कैसे कहेंगे?
अविनाश - हमने आपको गिराया हैं, फिर भी आपकी नाक उप्पर हैं.
भास्कर - एका निवडणुकीत हरलो म्हणून आम्ही काय माना खाली घालून फिरायचं की काय?
अविनाश - उत्तर प्रदेशातील सगळ्या जनतेने तुमच्या कानाखाली काढली आहे, तरी तुम्ही शहाणे नाही होत आहात.
भास्कर - (हसत) असं कसं म्हणता येईल? मग पंजाबमध्ये कुणी कुणाच्या कानाखाली काढली आहे, असं म्हणायचं आपण? ११७ पैकी दोन सीट्स आल्या आहेत भाजपच्या पंजाबमध्ये. ६७ जागांवर भाजपच्या उमेदवारांचं डिपॉझिट गेलं आहे. काय म्हणायचं आहे तुला यावर?
अविनाश - पंजाब काही महत्त्वाचं राज्य नाही.
समर - का? तुम्ही हरलात म्हणून?
अविनाश - जे लोक केजरीवालला निवडून देतात, त्यांच्याविषयी काय बोलायचं?
पांडेजी - उत्तर प्रदेश में जनता माईबाप हैं और वहीं जनता पंजाब में बेवकूफ हैं, ऐसे हम कैसे कह सकते हैं?
अविनाश - उपर से देखा तो आपका कहना बराबर दिखता हैं. लेकिन एकदम नीट देखोगे, तो पंजाब की जनता सही में बेवकूफ हैं.
समर - का?
अविनाश - सरळ आहे. जी जनता मोदीजींना मतं देत नाही, ती बेवकूफ आहे, असंच म्हणावं लागेल. एवढ्या चांगल्या हिंदुत्ववादी नेत्याला तुम्ही मतं देत नाही, म्हणजे तुम्ही बेवकूफच आहात.
भास्कर - पण याच जनतेने पूर्वी भाजप आणि अकाली दलाला निवडून दिलेलं आहे. आता पंजाबच्या जनतेला काय म्हणशील?
अविनाश - त्या वेळी बरोबर वागलेल्या जनतेचे आता डोके फिरले आहे, एवढंच मी म्हणेन. साले केजरीवालला निवडून देतात. मूर्ख लोक.
समर - दिल्ली विधानसभेला तर केजरीवाल तीनदा जिंकले आहेत.
अविनाश - हेच पंजाबी मूर्ख लोक दिल्लीत जाऊन बसले आहेत.
भास्कर - पण दिल्लीतल्या लोकांनी लोकसभेला सगळ्या सातच्या सात सीट्स भाजपला दिल्या होत्या. आता काय म्हणशील दिल्लीतल्या जनतेला?
अविनाश - विधानसभेच्या निवडणुकीला दारू पिऊन जातात दिल्लीतले लोक, एवढाच त्याचा अर्थ. मोदीजींना जो मत देत नाही, तो एकतर मूर्ख तरी असतो किंवा दारू तरी प्यायलेला असतो. बास आता. मला या विषयावर बोलायचे नाहीये!
अच्युत - तू फार चिडतोस अविनाश. मोदीजींनी किसान प्रकरणात माफी मागितली आणि पंजाबचे लोक शेफारले. त्यांना वाटले याची कसली ५६ इंचांची छाती?
अविनाश - तू गप बस रे! पंजाबच्या लोकांनी केजरीवालला निवडून दिलं आहे. त्याची काय ५६ इंचांची छाती आहे का? कसला किडकिडीत आहे तो!
अच्युत - केजरीवाल लुकडा आहे, पण तो शेर-ए-दिल आहे, असं वाटलं असणार पंजाबच्या जनतेला. नाहीतर कशाला मतं देतील त्याला?
अविनाश - तू कुणाच्या बाजूचा आहेस?
अच्युत - मी मोदींच्या बाजूचा आहे. मोदी मला प्राणापेक्षा प्रिय आहेत.
अविनाश - अरे, मग असं काय बोलतो आहेस?
अच्युत - मोदीजी चुकले तिथं चुकले. माफी नव्हती मागायला पाहिजे त्यांनी.
अविनाश - नाना तुमचं काय म्हणणं आहे यावर?
नाना - (इमरती खात.) मोदीजी इमरतीसारखे आहेत. केजरीवाल भज्यांसारखा आहे. पंजाबातील लोकांना आज भजी आवडली आहेत. नंतर त्यांना इमरती खावीशी वाटणार आहे.
अविनाश - (खुश होत) याला म्हणतात राजकारणातली दूरदृष्टी!
नाना - काही दिवस लागतील त्याला. पण पंजाबमध्ये जे लोक आज भजी खात आहेत, त्यांना आज ना उद्या इमरती खावीच लागणार आहे.
अच्युत - पण तोपर्यंत इतर राज्यातले जे लोक आज इमरती खात आहेत, त्यांना भजी खावीशी वाटायला लागली, तर काय करायचं?
अविनाश - ए अच्युत, तू त्यांच्या गटात जा बघू.
अच्युत - नाही! प्राण गेले तरी मी त्यांच्यात जाणार नाही. मोदीजी मला प्राणापेक्षा प्रिय आहेत. पण चूक म्हणजे चूक. आज उत्तर प्रदेशात आपल्या ५५ जागा कमी झाल्या. का झाल्या? मोदीजींनी माफी मागितली म्हणून कमी झाल्या जागा.
अविनाश - पण आपण निवडून आलो ना?
अच्युत - उपयोग काय? अशाच जागा कमी होत राहिल्या तर २४ सालापर्यंत परत एकदा विरोधी पक्षात बसायला लागायचं. आपल्या मोदीजींना विरोधी पक्षनेता व्हावं लागेल.
अविनाश - तू गप बस! आपल्या जागा मायवतींमुळे कमी झाल्या. ९१ जागांवर आपण थोडक्यात हरलो आहोत मायावतींमुळे. त्यांना मिळालेली मतं आपण ज्या फरकाने हरलो त्यापेक्षा जास्त आहेत.
अच्युत - काय म्हणतोस?
अविनाश - त्या ९१ जागा आपल्याला मिळाल्या असत्या तर आपण कुठे गेलो असतो? २४ साली मोदीजी मायावतींना असला चावटपणा करू देणार आहेत, असं वाटतं आहे का तुला?
अच्युत - अजिबात नाही.
..................................................................................................................................................................
उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...
हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal
................................................................................................................................................................
पांडेजी - अगर मायावतीजी की वजह से भाजपा ९१ सीट्स हारी हैं, तो समाजवादी पार्टी भी १३७ सीट्स हारी हैं.
अच्युत - काय म्हणता?
भास्कर - म्हणजे मायवती नसत्या तर भाजपला ९१ जागा मिळाल्या असत्या, पण सपालाही १३७ जागा मिळाल्या असत्या. म्हणजे सपा आणि भाजपामधलं अंतर ४६ जागांनी कमी झालं असतं.
अच्युत - काय म्हणतोस?
भास्कर - ओवैसीमुळे सपाच्या सहा जागा गेल्या. म्हणजे अंतर ४०चं उरलं.
समर - २०० ते १३००० हजारच्या स्लिम मार्जिनने सपाच्या ७७ जागा गेल्या. त्यातल्या वरच्या ५२ जागा गेल्या तरी २५ उरतात. म्हणजे आता भाजपा आणि सपामध्ये अंतर १५चं उरतं.
अच्युत - म्हणजे तशी कट्टाकट्टीच झाली आहे इलेक्शन.
पांडेजी - उत्तर प्रदेश के विद्वान और पत्रकार झूठ नहीं बोल रहें थे. भाजपा के प्रति बहुत गुस्सा था और वो रास्तोंपर व्यक्त भी हो रहा था.
नाना - लेकिन आप कह रहें थे की, मेनस्ट्रीम ओपिनियन पोलवाले झूठ बोल रहें हैं.
पांडेजी - हम खुद थोड़ेही बता रहें थे अपनी खुद की मन की बात? हम तो जो विद्वान और पत्रकार जो बोल रहें थे, वो बता रहें थे.
नाना - (इमरती खात) लेकिन वो लोग खोटे साबित हुए.
पांडेजी - मेनस्ट्रीम ओपिनियन पोल्स भी पश्चिम बंगाल में झूठ साबित हुए थे.
नाना - यू-ट्यूब चॅनेल भी खोटे साबित हुए.
पांडेजी - लेकिन वो बंगाल में सही साबित हुए थे. कौन किसको क्या कहे? आदमी चुकता नहीं हैं क्या?
नाना - (पुढची इमरती खात) इन यू-ट्यूब चॅनेल को सबक सिखाने की आवश्यकता हैं. बुलडोझर चलाएंगे उनपर.
भास्कर - म्हणजे कशावर बुलडोझर चालवणार?
समर - मोबाईल कॅमेऱ्यावर शूट करून व्हिडिओ यू-ट्यूबवर फुकटात अपलोड करतात हे लोक.
अच्युत - सगळ्यांना अटक करायला पाहिजे. जो जो विरोध करेल, त्याला अटक करायची. मोदीजींविरुद्ध जो जो बोलेल किंवा छापेल किंवा मेसेज पाठवेल, त्याला अटक करायची. ५६ इंच का सीना!
भास्कर - (जोरात हसत) म्हणजे परत एकदा माफी मागावी लागणार देशाची.
नाना - (एक भजे खात) या पांडेजींचा ठेलासुद्धा बंद करायचा. मजेने बोलतो आहे हं पांडेजी.
पांडेजी - (दुर्लक्ष करत) विरोधी पक्ष एकजूट नहीं रहें, इसलिए उन्हें ये हार झेलनी पड़ी.
अविनाश - मायवतीजी और ओवैसी हमारी ‘बी टीम’ हैं.
(मायावती या दलितांच्या नेत्या होत्या आणि ओवैसी हे मुसलमानांचे नेते होते - संपादक.)
अच्युत - म्हणजे तुम्हाला एकट्याने नाही जिंकता येत.
अविनाश - मोदीजी हृदयसम्राट आहेत. योगीजी कर्मसम्राट आहेत.
अच्युत - मग ‘बी टीम’ची मदत का घ्यावी लागते तुम्हाला जिंकायला?
अविनाश - मायावतींना म्हणे दम दिला होता अमित शहांनी. तुमची पैशाची सगळी लफडी बाहेर काढू म्हणून.
अच्युत - अरे काढा ना सगळी लफडी बाहेर. ज्यांनी ज्यांनी भ्रष्टाचार केला आहे, त्यांची लफडी बाहेर काढा आणि त्यांना तुरुंगात टाका. आपण निवडणुका हरलो तरी चालेल. भ्रष्टाचारी लोकांना वापरून निवडणुका जिंकण्यात काय मजा आहे?
पांडेजी - हमारे यूपी के एक पत्रकार हैं श्रवण गर्ग कर के. उन्होंने तो खुल्लम खुल्ला बोल दिया ‘सत्य हिंदी’ चॅनेल पर - “अपने एक लाख करोड़ बचाने के लिए मायावतीजीने वोट कटुए का काम किया”.
अच्युत - वोट क्या?
पांडेजी - वोट कटुआ! जो जीत रहा हैं, उसके वोट काटकर उसे हरानेवाला. ये खुद जीतने के लिए नहीं लड़ता हैं. ये किसी दुसरे को हराने के लिए लड़ता हैं.
अविनाश - अमित शाह साब म्हणजे एक ग्रेट चाणक्य आहेत.
अच्युत - तुम्हाला सरळ सरळ जिंकता यायला पाहिजेत निवडणुका.
अविनाश - तो केजरीवाल तिकडे सगळं फुकट देऊन निवडणुका जिंकतोय. वीज फुकट, डॉक्टर फुकट, औषधं फुकट आणि तू शिकव अक्कल आम्हाला!
पांडेजी - भाजपाने भी दुसरा क्या किया हैं? पाँच किलो राशन की वजह से महिलाओं के वोट पड़े भाजपा को. भाजपा के खिलाफ जो गोलबंदी की गई थी जाती की, वो महिलाओं के वोटोंने नाकाम कर दी. कारण था राशन!
भास्कर - केजरीवाल निदान वीज-बिलावर फोटो तरी छापत नाही स्वतःचा.
(तत्कालीन भारतात, सर्व भारतीय लोकांना मोदीजींचे फोटो सर्वत्र बघायला लागत होते. व्हॅक्सिनची सर्टिफिकेटस्, विविध सरकारी कार्डे, पेट्रोल पंप, अशा सर्व ठिकाणी सर्वत्र मोदीजी. इतकेच काय गरिबातील गरीब, अगदी दारिद्र्यरेषेखालील व्यक्तीला दिल्या जाणाऱ्या मोफत अन्नधान्याच्या पोत्यावरसुद्धा मोदीजींचा फोटो असत. तत्कालीन भारतात व्यक्तीपूजेचे भयंकर स्तोम माजवले गेले होते. दारिद्र्यात खितपत पडलेल्या असहाय्य नागरिकाला इतर नागरिकांनी भरलेल्या करातून मोफत अन्न दिले जात असे, आणि मोदीजी सभेत त्या गरिबाला सांगत- “आपने मोदी का नमक खाया हैं, तो अब आपको मोदी को वोट देनाही होगा”. आणि ती गरीब बिचारी अज्ञानी प्रजा ‘खाल्ल्या मिठा’ला जागून मोदीजींना मतं देतही होती. आजच्या २२व्या शतकातील नागरिकाच्या अंगावर हे सारे ऐकून काटा येईल. पण काय करणार? त्या काळातील राजकारण अत्यंत संवेदनाशून्य होते. गंमत म्हणजे त्या काळातील शिकल्या-सवरलेल्या लोकांनासुद्धा याचे काही वाटत नव्हते. - संपादक.)
भास्कर - आज २१व्या शतकात रेशनच्या अन्नावर आपला फोटो छापून मोदीजी वोट मागतात, एखाद्या गरीब आणि असहाय्य माऊलीला मिठाची शपथ घालतात. तिला सांगतात, ‘तू मोदीचे मीठ खाल्ले आहेस’.
समर - जणू काही त्या अन्नाचे पैसे मोदीजींनी स्वतःच्या खिशातूनच दिलेले आहेत.
पांडेजी - और फिर ये भाजपावाले लोग कहते फिरते हैं - हमारी बहनें और माताओं ने हमें जिताया हैं!
अविनाश - (थरथरत) हा विजय मोदीजींचा आहे. हा विजय योगीजींचा आहे.
नाना - हा योगीजींनी आणलेल्या ‘लॉ अँड ऑर्डर’चा विजय आहे.
अविनाश - म्हणताना म्हणायचं की, भाजपा न्याय्य तरीके से जीती हैं आणि अशा फुसकुल्या सोडत बसायचं!
भास्कर - रेशनच्या पोत्यांवर मोदीजींचे फोटो छापले नव्हते का?
समर - मोदीजींनी सभासभांतून मिठाची शपथ घातली नव्हती का?
अविनाश - तुम्हाला जे काही म्हणायचं आहे, ते म्हणा. ‘हिंदूराष्ट्र’ होण्यासाठी असं काही करावं लागलं, तरी ते न्याय्यच आहे.
नाना - (भजे खात) तुम्ही ‘कमंडल विरुद्ध मंडल’ उभं केलंत. काही फरक पडला का? मोदीजी आणि अमित शाह यांनी जातीची गोलबंदी करून आधीच्या तीन निवडणुका जिंकल्या. मग तुम्ही तेच करायला गेलात. तोपर्यंत मोदीजींनी स्त्रियांची ‘वोट बँक’ तयार केली. आता २४च्या लोकसभा इलेक्शनला तुम्ही स्त्रियांची मतं घ्यायला जाल, तेव्हा मोदीजी काहीतरी नवीन आयडिया करून तुम्हाला घरी पाठवतील.
पांडेजी - ‘मंडल और कमंडल’ का टकराव इतनी जल्दी खत्म नहीं होनेवाला हैं.
भास्कर - हळूहळू असर करत राहील हा विषय.
नाना - (इमरती खात) बघू आपण. मोदीजींनी जातीय राजकारणातली हवा काढून टाकली आहे.
अविनाश - २४च्या लोकसभेच्या इलेक्शनचा निकाल आत्ताच लागला आहे.
पांडेजी - हमें नहीं लगता. मध्यमवर्ग और अति-गरीब मोदीजी के साथ हैं. बाकी बीचवाला हिस्सा खफ़ा हैं मोदीजी से.
भास्कर - विरोधक एकत्र आले तर अवघड होणार आहे परिस्थिती.
समर - महागाई अशीच राहणार आहे. बेरोजगारी अशीच राहणार आहे. जीडीपी घसरत राहणार आहे. उत्तर प्रदेशात मोकाट गुरांचा त्रास असाच राहणार आहे.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
नाना - ‘कॉमन सिव्हिल कोड’ आणतील मोदीजी, राममंदिर बनेल. नवीन संसद बनेल. हिंदू अस्मिता चेतून उठेल!
पांडेजी - बिहार, बंगाल, ओरिसा, तेलंगणा, आंध्रा, तामिलनाडू और केरला इन राज्यो में २०० सीट्स हैं लोकसभा की. भाजपा ५० सीट्स भी नही जीत पाती हैं यहां. तो विपक्षियों के पास १५० सीट्स हो गई. कांग्रेस के पास पचास हैं. उसके नीचे जाएगी नहीं कांग्रेस हर हाल में. तो अब २०० हो गई सीटें. अब २४ में कांग्रेस, केजरीवाल, मायवती, और अखिलेशको सब मिला के ७५ सीट्स बढ़ानी हैं सिर्फ.
समर - विरोधकांना फक्त ७५ जागा मिळवायच्या आहेत जास्तीच्या. यूपीने दाखवले आहे भाजपाच्या जागा कमी होऊ लागल्या आहेत हळूहळू.
अविनाश - अरे सोड रे! मोदीजी पुढच्या वेळी ३७५ जागा जिंकणार! मग तुम्ही सगळे मेलात. सगळे तुरुंगात. एकजात सगळे विरोधक तुरुंगात.
अच्युत - पण पुढच्या वेळेला आपण प्रामाणिकपणाने निवडणूक लढवली पाहिजे. तत्त्व म्हणजे तत्त्व! ते वोट कटुआ का काय ते प्रकरण अजिबात करायचं नाही.
अविनाश - ए गप रे तू!
अच्युत - सगळी मतं आपली असली पाहिजेत. नाहीतर मग आपण हरलो तरी चालेल.
नाना - (एक किलो इमरतीमधील शेवटचा तुकडा खात) लोकसभा को हम चार प्लेट भजी की पैज लगाएंगे. भाजपा जीती तो आप हमें चार प्लेट भजी दोगे. और इमरती जरा ज्यादा लाइए अगली बार. बेहतरीन हैं ये इमरती!
पांडेजी - चलो, लगाते हैं शर्त!
भास्कर - पण त्या आधी गुजरातची इलेक्शन आहे ना!
समर - गुजरातमध्ये मोदीजी १०० टक्के मार खाणार. मागच्या वेळीच कसेबसे जिंकले होते, आठ-दहा जागांनी.
..................................................................................................................................................................
महत्त्वाचे विषय विनोदाच्या अंगाने मांडत जाणे, हा इतिहास लेखनाचा वेगळाच प्रकार! या प्रकरणात रामशंकर चौरसिया हे एक नवेच पात्र शिरोजीने आणल्याचे वाचकांच्या लक्षात आलेलेच असेल. हे पात्र शिरोजीने आज केवळ एक विनोद करण्यासाठी आणले आहे की, आता हे पात्र शिरोजी फुलवत नेणार आहे, या विचाराने आमच्या तर हृदयाची धडधड वाढायला लागली आहे. शिरोजीने दहा प्रकरणे झाली, तरी एकही स्त्री पात्र आणलेले नाही, या गोष्टीचेही आम्हाला आश्चर्य वाटते आहे. आम्हाला आमची हृदयदेवता सांगते आहे की, शिरोजी लवकरच एखाद्या ‘राजकारण-रणरागिणी’चे पात्र रंगवणार आहे. असो. एक गोष्ट मात्र निश्चित की, शिरोजीने उत्तर प्रदेशातील आणि एकंदर भारतातीलच तत्कालीन राजकारणावर एक तीक्ष्ण क्ष-किरण गेल्या दोन प्रकरणांमध्ये टाकला आहे. इतिहास त्याबद्दल शिरोजीचा कायम ऋणी राहील, याबाबत एकमत होण्यास काहीच प्रत्यवाय नसावा. - संपादक.
..................................................................................................................................................................
लेखक श्रीनिवास जोशी नाटककार आहेत. त्यांची ‘आमदार सौभाग्यवती’, ‘गाठीभेटी’, ‘दोष चांदण्याचा’ अशी काही नाटके रंगभूमीवर आलेली आहेत. ‘टॉलस्टॉयचे कन्फेशन’ आणि ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ अशी दोन पुस्तकेही आहेत.
sjshriniwasjoshi@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment