महाराष्ट्रातील एक मार्क्सवादी अभ्यासक आणि लेखक सुधीर बेडेकर यांचे २५ मार्च २०२२ रोजी पहाटे पुण्यात निधन झाले. ते ७६ वर्षांचे होते. ते आयआयटी, मुंबईचे बीटेक पदवीधर होते. काही काळ त्यांनी नोकरी केली, मात्र नंतर केवळ सामाजिक प्रबोधन व डावी चळवळ यासाठीच वाहून घेतले. काही काळ त्यांनी ‘समाज प्रबोधन पत्रिके’मध्येही काम केले. बेडेकर १९७० आणि १९८०च्या दशकात ‘मागोवा’ आणि ‘तात्पर्य’ या मासिकांचे संस्थापक-संपादक होते. सत्तरच्या दशकामध्ये साहित्यिक आणि सांस्कृतिक चळवळी, युक्रांद-दलित पॅंथर ते विविध डावे पक्ष आणि डाव्या चळवळी व कार्यकर्त्यांमध्ये त्यांचा वावर होता. ‘समाज विज्ञान अकादमी’, ‘लोकविज्ञान चळवळ’ आणि ‘अखिल भारतीय जनविज्ञान आंदोलन’ या संस्थांना त्यांनी मार्गदर्शन आणि सहकार्य केले.
बेडेकरांची ‘हजार हातांचा ऑक्टोपस’, ‘विज्ञान, कला आणि क्रांती’ ही दोन पुस्तके आणि समाज-प्रबोधन करणाऱ्या अनेक पुस्तिका प्रकाशित झालेल्या आहेत. ‘मागोवा प्रकाशना’च्या माध्यमातून त्यांनी अनेक महत्त्वाची पुस्तके व पुस्तिका प्रकाशित केल्या आहेत. प्रचलित सामाजिक-आर्थिक व्यवस्थेचे मार्क्सवादी दृष्टीकोनातून परखड विश्लेषण आणि क्रांतिकारी राजकीय वैचारिक मांडणी, ही त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्ये होती. त्यांचाच हा एक तब्बल ४८ वर्षांपूर्वीचा लेख... हा मूळ लेख ‘समाजवादी शिव्यांचा शोध’ या नावाने ‘मागोवा’ मासिकाच्या एप्रिल १९७४च्या अंकात प्रकाशित झाला आहे.
..................................................................................................................................................................
समाजवादी तत्त्वज्ञानावर श्रद्धा ठेवणान्यांनी ‘आयला!’ असे म्हणणे नैतिकतेच्या निकषावर बरोबर का चूक? या महत्त्वाच्या प्रश्नाचा विचार भारतातील डाव्या विचारसरणीच्या मंडळींनी आजवर मुळीच केलेला नाही! ही त्रुटी भरून काढण्याच्या दिशेने या लेखात काही विचार मांडायचे आहेत. समाजवाद्यांनी बोलण्यात शिव्या वापराव्या की नाहीत? वापरायच्याच तर त्या कोणत्या वापराव्या? याविषयी स्पष्ट सैद्धान्तिक भूमिका बाळगणे, क्रांतीच्या व नव्या संस्कृतीच्या घडणीत महत्त्वाचे ठरेल.
शिवीचा अर्थ
मला आलेला राग किंवा दुसऱ्याबद्दल वाटणारी तुच्छता व्यक्त करण्यासाठी मी शिवी देतो. शिवी खाणाऱ्याची अवहेलना करून त्याला लज्जित करणे, हा शिवी देण्यातला मुख्य उद्देश असतो.
शिवीगाळ करणे वाईट, अशी सर्वसाधारणपणे समजूत आहे. विशेषतः स्वतःला सभ्य समजणाऱ्या थरांमध्ये तर आहेच. पण बायकांच्या गैरहजेरीत उच्चशिक्षित, सुसंस्कृत, ब्राह्मण पुरुषसुद्धा अत्यंत घाणेरडे शब्द वापरताना दिसतात. स्वतःचा प्रौढपणा, पुरुषार्थ दाखवण्याकरता कुमारवयातून जाणारी तरुण मुले मुद्दाम शिव्या वापरतातच- मग ती कोणत्याही थरातली असोत. थोडक्यात समाजातील ९९हून जास्त टक्के लोक- बायकासुद्धा -शिव्या देतातच, गलिच्छ शिव्या देतात, हे सत्य आहे.
..................................................................................................................................................................
.................................................................................................................................................................
अर्थात ‘शिवी’ कशाला म्हणायचे याच्या कल्पना बदलत असतात. ‘साल्या’ व ‘च्यायला’ आता शिव्या उरल्या नाहीत, त्यातून दुसऱ्याची अवहेलना होतच नाही. इंग्रजीत ‘डॅम’ व ‘ब्लडी’ या शब्दांसारखाच हा प्रकार. पिढ्या, संस्कृती बदलत जात असताना, हे अपरिहार्यच आहे.
असे झाले की, शिवीचा वाच्यार्थ विरून जातो. ती एक फक्त तीळ होते- आणि त्याभोवती संताप व तुच्छतेच्या भावनांचा हलवा तयार होतो. फक्त तो गोड नसतो; निदान खाणाऱ्याला. अनेक वेळा शिवीचा वाच्यार्थ प्रस्तुत नसतो. तू अत्यंत खालच्या पातळीवरचा हीन आणि वाईट आहेस एवढे सांगता आले की, बस्स. मग ही भावना - भडव्या किंवा साल्या - कोणत्याही बाणाच्या दांडीवर गुंडाळली तरी चालते.
सांस्कृतिकदृष्ट्या एकजीव अशा एका समूहात हे जास्त प्रमाणात घडते, पण दुसऱ्या समूहातल्या नवख्या माणसाला शिवीचा वाच्यार्थ अधिक प्रत्यक्षपणे जाणवतो आणि त्याला धक्का वगैरे बसतो. आम्हाला आईबहिणीवरून कोणी शिवी दिली वा बास्टर्ड, ‘सन ऑफ ए बिच’ वगैरे म्हटलं तर काही वाटत नाही. ही आता फोलकटं आहेत. कधीकधी तर प्रेम व मैत्री सूचित करणारे शब्द म्हणून आमचे मित्र ते शब्द वापरतात. पण वेगळ्या पिढीच्या व वेगळ्या वातावरणातल्या माणसाला ते भयंकर वाटणं शक्य आहे.
यावर खूप विचार करता येण्यासारखा आहे. उदाहरणार्थ एकाच अर्थाचे नितंब, ढुंगण व गांड हे तीन शब्द घ्या. आजव्या मराठी समाजात कुठे, कोणत्या परिस्थितीत, कोण व कसा यातला अमुक शब्द वापरतो, अशा वापराला कोण सभ्य म्हणतो, कोण असभ्य इत्यादीची आकडेवारी काढा. त्यातून समाजाचे वर्गीय विश्लेषण व सांस्कृतिक स्तरीकरण यांचा खुलासा करणे सहज शक्य आहे.
मुख्य प्रश्न हा आहे की, शिव्या निघाल्या कुठून व त्या परिणामकारक कशामुळे होतात. भाषेतील सर्व शब्दांप्रमाणेच त्या समाजजीवनाच्या उकडहंडीतून निघतात. विशिष्ट जीवनपद्धती व तिच्याशी निगडीत सांस्कृतिक जाणीवांच्या क्षेत्रातील, विशिष्ट बिंदू वा उंचवटे (वा खड्डे म्हणा) म्हणजे अपशब्द. माणसामाणसातला व्यवहार व संवाद त्यांच्यातल्या वस्तुनिष्ठ परस्परसंबंधांच्या चौकटीत चालतो. शिव्यांना सामाजिक भावनिक आयुष्यात स्थान असते, आणि जणू या समाजव्यापी व सदाहजर भांडारातले एखादे रत्न ‘अ’ आणि ‘ब’ यांच्यातले भांडणाचे नाते समजवण्याकरता अमुक क्षणाला वापरले जाते.
..................................................................................................................................................................
अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5312/Checkmate
..................................................................................................................................................................
त्यामुळे सामाजिक जीवन जितके विविधता असलेले, गुंतागुंतीचे, तितक्या नाना प्रकारच्या शिष्या! शिव्यांच्या स्वरूपावरून त्या संस्कृतीविषयी बरेच सांगता येते. ते कसे ते आता पाहू.
वर्गीकरण व परिणामकारकता
‘तू काहीतरी कमी आहेस’ असे सांगणे म्हणजेच, ‘तुझे सामाजिक जीवनपद्धतीत स्थान कमी आहे, समाजाला जे गुण तुझ्याकडून अपेक्षित आहेत ते तुझ्यात नाहीत,’ असे सांगणे. हे अनेक प्रकारे व अनेक पातळ्यांवर होते. शिव्यांचे वर्गीकरण व त्यांना परिणामकारकता कशी येते, याचा विचार या पायावर केला पाहिजे. शिवी देणारा स्वतः समाज असल्याचा दावा करतो, सामाजिक नीतीमूल्यांचा गड्डा मी आहे असे म्हणतो, व दुसऱ्याला सांगतो- ‘समाज’ म्हणतो की, तू कमी आहेस.
१. खाणाऱ्याचे कमीपण दाखवणाऱ्या शिव्यांचा पहिला प्रकार, त्याचे व्यक्तीगत कमीपण दाखवणे. हे दोन प्रकारे होऊ शकते -
अ) सामाजिक जीवनासाठी आवश्यक मानल्या गेलेल्या गुणांचा अभाव- वेडा, मूर्ख वगैरे.
आ) वरीलच प्रकार, पण थोडासा पॉझिटिव्ह अवगुण आरोपित करणाऱ्या शिव्या. यात पुन्हा दोन प्रकार पडतील. एकतर पशूचे दाखले देणाऱ्या - गाढव, बैल, घुबड. दुसरा उपप्रकार म्हणजे समाजाने मान्य केलेल्या व्यवहारातील रीतीभाती व मूल्ये यांचा अभाव प्रत्यक्षपणे सांगणाऱ्या- नमकहराम, पाजी, हलकट, अधम, इत्यादी.
२. समाजातील व्यक्तीचे स्थान जसे तिच्या वागण्यावरून ठरते, तसेच परिस्थितीमुळे, जन्मामुळे ठरते. तिच्या नियंत्रणाबाहेरच्या गोष्टी दर्शवूनसुद्धा तिचे कनिष्ठ स्थान सिद्ध करता येते. जातीय शिव्या हे अर्थात याचे उत्तम उदाहण- महार, भंगी, डोंब, मांग, चांडाळ वगैरे. याविषयी लिहावे तितके कमीच आहे. कोणत्या जातीचे लोक कोणत्या जातीची नावे ‘शिव्या’ मानतात, याचा अभ्यास मनोरंजक होईल. भारतात हिंदू हा खऱ्या अर्थी ‘धर्म’ कधीच नव्हता. त्यामुळे ‘अ-हिंदू’ अशा अर्थाची शिवीच नाही, जशी ‘काफर’ किंवा ‘पाखंडी’ ही आहे. अलीकडे या मंडळींनी राष्ट्रद्रोही, लांडे वगैरे शब्द शोधले आहेत. ‘फ्रॉकातून पडलेला’, ‘माकापाव’, ‘लुंगीवाले’ इ. शिव्या नसल्या तरी राष्ट्रीयतेच्या आधारावर अवहेलना करणारे शब्द आहेत.
‘असली’ शिव्यांचे रहस्य
३. पण खऱ्या असली शिव्या वरीलपैकी कोणत्याच नाहीत. असली शिव्या म्हणजे लैंगिक विषयातल्या शिव्या. काही लैंगिक शिव्या वा शब्दही ‘सभ्य’ जगात नकळत रुळतात : जसे च्यायला, साल्या, भिकारचोट. (किंवा इंग्रजीत ‘आय अॅम कॉकश्युअर’, ‘ही डझंट हॅव स्पंक इन हिम’ असली वाक्ये अगदी सभ्य स्त्रियाही वापरतात.) समाज यातल्या शब्दांचा वाच्यार्थ विसरून गेला आहे. पण तरी बहुतेक सर्व लैंगिक शिव्यांचे शिवीपण अजून बऱ्याच प्रमाणात शाबूत आहे. या शिव्यांमध्ये साधारणपणे दोन गट पडतात :
अ) व्यक्तीच्या स्वत:च्या लैंगिक व्यवहारातील कमीपणा, विकृती दाखवून त्याला नामोहरम करणाऱ्या शिव्या. यामध्ये एकतर समाजाने त्याज्य व निषिद्ध मानलेले लैंगिक संबंध येतात : आई व बहीण यांच्याशी, समलिंगी व्यक्तीशी, मान्य प्रमाणाहून जास्त प्रमाणातले संबंध, संदर्भ म्हणून घेणाऱ्या शिव्या रोज हजार वेळा ऐकायला मिळतात. फार काय ‘तू अगदी क्षूद्र आहेस’ हे सांगण्याकरता ‘तू डोके सोडून इतर अंगावरच्या केसासारखा आहेस’ हे सांगितले जाते.
..................................................................................................................................................................
उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...
हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal
................................................................................................................................................................
हे असे का व्हावे, आणि याच शिव्या इतक्या परिणामकारक का होतात? समाजशास्त्रीय व मानसशास्त्रीय दृष्टीने या गोष्टीचा खुलासा कसा करायचा? इथे पुन्हा शिवी देणारा व खाणारा यांच्यातील द्वंद्वात्मक नात्याचा व त्यात सजीव होणाऱ्या व्यक्ती व समाज या व्यापक द्वंद्वाचा विचार करावा लागतो. एकतर आदी-मानवी टोळ्यांत वा सांस्कृतिकदृष्ट्या वेगळ्या समाजात त्याज्य लैंगिक संबंध आपल्यासारखे असतीलच, वा काही काळापूर्वी ते आजच्यासारखेच असतील असे नाही. म्हणून त्यांच्या शिव्या वेगळ्या, आपल्या वेगळ्या.
दुसरे, या ऐतिहासिकदृष्ट्या विशिष्ट समाजाच्या जीवनात उत्क्रांत झालेले नियम व माझ्या अनिर्बंध इच्छा, यात मी सदैव ताणला जात असतो. कोणत्याही स्त्रीबरोबर वा विकृत लैंगिक संबंध ठेवण्याच्या इच्छेची ओढ एकीकडे व विशिष्ट संबंध त्याज्य मानणाऱ्या नियमांचे दडपण दुसरीकडे. मी या संघर्षात विजयी झालो आहे, नैतिक वर्तन करतो आहे आणि तू मात्र त्यात अपयशी झाला आहेस व म्हणून कमी आहेस, हेच शिवी देणारा दुसऱ्याला सांगत असतो. प्रत्येकाच्या अंतर्मनात सुप्त इच्छांविरुद्धचा हा संघर्ष चालू असतो, म्हणूनच शिवी देणारा देतो व खाणाऱ्याला ती लागते.
व्यक्तीच्या लैंगिक वर्तनावर आधारलेल्या दुसऱ्या अनेक शिव्यांमध्ये हे स्पष्ट दिसते- रांड, रंडीबाज, शिंदळ वगैरे. ‘मी हे मोह टाळलेत, मी समाज आहे आणि तू कमी आहेस, समाजाच्या बाहेरचा, अनधिकृत आहेस!’ हे सांगणे म्हणजे ‘तू माणूस नाहीस’ असेच सांगणे आहे. हीच सर्वांत भयानक अवहेलना असते.
आ) लैंगिक शिव्यांमधील दुसऱ्या प्रकारच्या शिव्या व्यक्तीच्या नव्हे, तर तिच्या आई-वडिलांच्या (व विशेषत: आईच्या) बेकायदा लैंगिक वर्तनावर आधारलेल्या असतात. खाणाऱ्याची आई ही स्वैराचारी होती, तिचे लग्न झाले नव्हते, हे सांगण्याने या स्त्रीचा मुलगा कसा काय अपमानित होतो? येथेही पुन्हा पूर्वीचाच मुद्दा येतो. आई-वडील हे सामाजिक नीतिनियम मुलांमध्ये रुजवण्याचे समाजाचे हत्यार असतात व नियम शिकताना त्यांच्याशीच सर्वांत प्रखर संघर्ष मुलाच्या स्वैर इच्छांचा होत असतो, हे खरे आहे. त्यामुळे ज्या आईने व्यक्तीला नीती शिकवली, तिच्याशी अनैतिक वर्तन करण्याची बंडखोर सुप्त इच्छा व्यक्तीच्या मनात राहते, आईची विटंबना व्हावी अशी ती इच्छा असते. शिवी देणारा व खाणारा दोघे या त्याज्य मानलेल्या इच्छेच्या प्रक्षोभाने हादरतात. देणारा आपला क्रूर संताप व तुच्छता व्यक्त करतो, खाणारा यामुळे संतापतो. नैतिकतेच्या स्थिर व सुस्थित चौकटीतून- म्हणजे समाजातून, माणूस म्हणून त्याच्या अस्तित्वातून- खाणारा बाहेर फेकला जातो, अपमानित होतो. ‘भडवा’ ही शिवी अधिकच गुंतागुंतीची व उद्बोधक आहे. अर्थार्जन चांगल्या प्रकारे करण्याची असमर्थता, दुबळेपणा व एका त्याज्य, लैंगिक संबंधाचा पाया असलेल्या धंद्यावर अवलंबित्व, अशी दुहेरी धार या शब्दाला आहे.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
समाजवादी शिव्या!
हे सगळे झाले तरी समाजवाद्यांनी शिव्या द्याव्या की नाही, हा मूळ प्रश्न उरलाच. समाजवादी माणसेच आहेत, ती संतापणार व इतरांची (विशेषतः इतर समाजवाद्यांची!) अवहेलना करावीशी त्यांना वाटणारच. तेव्हा त्यांनी शिव्या जरूर द्याव्यात, नव्हे ते, इतर माणसांसारखे देतीलच!
पण वरील सात-आठ वर्गामधील कोणत्या शिव्या त्यांनी द्याव्यात? समाजात जबाबदारीने राहणाऱ्या मानवी व्यक्तीचे माणूस म्हणून महत्त्व हा समाजवादी तत्त्वज्ञानाचा व नैतिकतेचा पाया आहे. म्हणून एखादा कमी आहे, हे दाखवण्यासाठी त्याच्या वर्तनातला कमीपणा दाखवणे हीच फक्त समाजवाद्यांना परवानगी आहे. जात, धर्म, धंदा, राष्ट्रीयता, आई-वडलांचे वर्तन यांवर आधारलेल्या शिव्या सरंजामी व भांडवलशाही संस्कृतीच्या निदर्शक आहेत. मी या जातीत जन्मलो वा माझ्या आई-वडिलांचे लग्न झाले नव्हते, म्हणून मी कसा कमी ठरतो? अशा शिव्या समाजवाद्यांनी लावूनही घेऊ नयेत.
व्यक्तिगत अवगुण दर्शवून अवहेलना हीच शिव्या देण्याची योग्य पद्धत आहे. त्यातही सामाजिक-ऐतिहासिक दृष्टीकोनातून, शास्त्रीय समंजसपणे त्या व्यक्तीचे वर्तन समजून घेऊन, मग त्यातील वैगुण्यावर आघात करायला हवा. आपल्या भावना व आपली वैज्ञानिक बुद्धी यांची सतत एकात्मता राखणे, हे समाजवाद्याचे दुसरे लक्षण आहे.
म्हणजेच ‘आजच्या स्थितीत नैतिक, क्रांतिकारक वर्तन तू करत नाहीस, म्हणून तू कमी आहेस,’ हे सांगणाऱ्या शिव्याच समाजवादी देऊ शकतात. उदाहरणार्थ- लाचखाऊ, नमकहराम, पाजी, गाढव, बैल, लोकशाहीविरोधी, प्रतिकांतीकारक, मूर्ख, वेश्यागमनी वगैरे. पण शिवी जास्त परिणामकारक करायची, दुसऱ्याच्या हृदयाच्या गाभ्याला हात घालून त्याला दुखवायचे (व सुधारायचे, किंवा निष्प्रभ करायचे) तर अशा अवहेलनेला वास्तवाच्या पुराव्याचा आधार हवा. थोडक्यात, समाजवादी शिव्या देणारच. पण त्यांना शास्त्रीयतेचा व समंजस, जबाबदार द्वेषाचा व संतापाचा आधार असेल. संघर्षाचा एक भाग म्हणन आवश्यक असणाऱ्या मानसशास्त्रीय युद्धातील या शिव्या तीर असतील. समाजवाद्यांनाही अशा शिव्या देण्याचे समाधान लाभेल व त्या शिव्यांचा परिणामही चांगला होईल, खाणारा खरा समाजवादी असला वा होऊ इच्छित असला, तर तो आत्मटीका करून स्वतःचे वर्तन सुधारेल किंवा वाद घालेल व देणाऱ्याला सुधारेल. नसला तर संतापेल, त्याचा बुद्धीनाश होईल व समाजवाद्यांना ते बरेच होईल.
जर शब्द हे शस्त्र असेल तर शिवी हे महाअस्त्र आहे, ते बालिशपणे आडवे-तिडवे फिरवण्याकरता नाही, युद्धात विजय मिळण्याकरता वापरण्यासाठी आहे. शिवी देण्याचा इतका प्रगत प्रकार समाजवादी अनुसरतील, की ते देतील त्या शिव्याच नसतील! ते सत्य असेल : धारदार, बोचक.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment