‘गांधारी’ : ही कादंबरी आवर्जून वाचावी आणि आपापली नवी ‘गांधारी’ उलगडावी... सो लेटस अनफोल्ड अवर ओन मिथ!
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
सुचिता खल्लाळ
  • ‘गांधारी’ या कादंबरीचं मुखपृष्ठ
  • Tue , 29 March 2022
  • ग्रंथनामा शिफारस गांधारी Gandhari महाभारत Mahabharat धृतराष्ट्र Dhrutrashtra द्रौपदी Drupadi स्नेहलता स्वामी Snehlata Swamy

‘डोन्ट गेट सॅटिसफाईड विथ स्टोरीज, हाऊ थिंग्ज हॅव गॉन विथ अदर्स, अनफोल्ड युवर ओन मिथ...’ सुफी कवी रुमीच्या या ओळी इतिहास, पुराण, परंपरा, लोककथा आणि एकूणच भूतकाळाकडे वर्तमानकालीन संदर्भातून पाहण्याचा नवाच दृष्टीकोन देतात. स्नेहलता स्वामी यांची ‘गांधारी’ ही कादंबरी वाचताना ‘अनफोल्ड युवर ओन मिथ’चा प्रत्यय पानोपानी येतो.

खरं तर महाभारत या विशाल आणि जटिल गुंतागुंतीच्या नाट्याला एक कादंबरी-विषय म्हणून हात घालणं, हेच मुळात मोठ्या जोखमीचं काम. त्यातूनही ‘गांधारी’ या पात्राला एका नव्या प्रकाशझोतात आणून आजवरच्या त्याबद्दलच्या कलुषित धारणांना छेद देत काळापलीकडे पाहणारी डोळस व अष्टावधानी बुद्धिवादी स्त्री म्हणून मांडणी करणे, हे त्याहून आव्हानात्मक! पण स्नेहलता स्वामी यांनी अवघ्या दीडेकशे पानात सबंध महाभारताला कवेत घेत, त्यातली गांधारी मोठ्या लक्षवेधीपणे अधोरेखित केली आहे.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

ही गांधारी मला व्यक्तिशः यासाठी विशेष भावली की, ती अतिशय परस्परविरोधी पद्धतीनं उभी केलीय. तिच्या डोळ्यावर पट्टी आहे, पण ती जास्त डोळस आहे. आंधळ्या नवऱ्यासाठी तिने आपली दृष्टी झाकून घेतलीय; पण खरं तर वेळोवेळी ती त्याला प्रकाशाचा, सत्याचा आणि न्यायाचा रस्ता दाखवताना दिसते. नजर गमावलेली असूनही ती गाफीलपणे ठेचाळत नाही, तर सतत सावध असणारी एक मूल्यविचारी प्रांजळ स्त्री तिच्यात वारंवार प्रत्ययाला येते.

या कादंबरीत गांधारी हे फक्त एक पौराणिक पात्र म्हणून येत नाही, तर तिचं भव्यत्व, दिव्यत्व गौण मानून एक सामान्य मानवी स्त्री म्हणून तिच्याकडे पाहताना स्नेहलता यांनी महाभारतातल्या अनेक रिक्त जागा अधिक मानवीय पातळीवर व वर्तमानकालीन अवकाशात उजागर करू पाहिल्या आहेत, हे अधिक महत्त्वाचं ठरतं.

कथानक फ्लॅशबॅक स्वरूपात उलगडत जातं. युद्धाच्या समारोपानंतर पांडवांचा विजय आणि युधिष्ठिराचं राज्य त्यागून वानप्रस्थाश्रम स्वीकारलेल्या कुंती, गांधारी व धृतराष्ट्र वनात वास्तव्य करत असताना जंगलाला वणवा लागला. त्या जळण्याच्या वासानं धृतराष्ट्र आपली पत्नी गांधारीला सावध होण्यास सांगतो आहे. जन्मांधळा पती धृतराष्ट्र आपल्या अर्धांगिनीला सावध होण्याचा आणि स्वतःचा बचाव करण्याचा इशारा देत असताना त्या आत्यंतिक मरणाच्या वेढ्यात डोळ्यावर पट्टी बांधलेल्या गांधारीला नवऱ्याचा तो इशारा अतिशय बाळबोध वाटतो. ती म्हणते, “कशासाठी सावध? मृत्यू टाळण्यासाठी? आणि तोही स्वतःचा? महाराजांनी हा सावधानतेचा इशारा आयुष्यात आवश्यकता असताना ऐकला असता व दुर्योधनादी पुत्रांना दिला असता तर? कितीतरी मृत्यू टळले असते. सुडाग्नीने पेटत, अहंकारानं चूर, मदमस्त झालेले, युद्धाच्या वणव्यात पेटलेले शेकडो मृत्यू टळले असते. प्रेतांच्या ढिगाऱ्यात रक्तमांसाने लालबुंद झालेले कुरुक्षेत्र टळले असते.” (पृष्ठ १५)

पश्चातबुद्धीतले सावधपण तिला बिनमहत्त्वाचे वाटते. साक्षात मृत्यूचा वणवा वेढून घेत असताना गतआयुष्यातील तिने सावध होण्याचा इशारा दिलेल्या अनेक जागा आठवतात. शतकाच्या अस्वस्थतेचा बेसावध काळाचा अख्खा पटच तिच्यासमोर उभा ठाकतो.

खरं तर डोळ्यावर पट्टी बांधलेल्या गांधारीने दुष्ट मुलगा, सत्तालोलुप नवरा, कपटी भाऊ, अन्यायी राजसभा, या साऱ्यांनाच वेळोवेळी सावध केले होते. दूरदर्शी, सदसद्विवेकी, संतुलित व पापभिरू, अशी गांधारी प्रत्येक प्रसंगात नैतिकतेची व न्यायोचित भूमिका घेताना दिसते.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

तिची खंत असते की, “माता म्हणून केलेल्या उपदेशाचा दुर्योधनाच्या अहंकारी मनावर तीळमात्र फरक नव्हता. याचे कारण म्हणजे, दुर्योधनाला मिळालेली कपटी शकुनी, महापराक्रमी परशुरामशिष्य कर्णाच्या सामर्थ्याची, दुःशासनाच्या अधमतेची व महाराजांच्या पुत्रमोहाची साथ! कोणतीच माता कधी ‘कुमाता’ होऊ शकत नाही, याची जाण मातृहृद्य नसणाऱ्या त्या भीमास तरी कशी कळेल म्हणा!” (पृष्ठ १९)

गांधारीची तक्रार इथं फक्त स्वतःच्या वतीनं नाही, तर मदांध पुरुषसत्तेनं पीडलेल्या प्रत्येक हतबल स्त्रीचे प्रतिनिधित्व करते. ती म्हणते- “काळालाही आमच्यावर दया येत नव्हती, म्हणूनच तर द्रौपदीचा कानठळ्या बसवणारा, हृदय हेलावणारा आवाज भर दरबारात कोणालाही ऐकू आला नाही. कुंतीच्या मातृहृदयाची न्यायोचित मागणी कोणाला कळली नाही; ना अंबेचा, ना अंबिका, अंबालिकेच्या आत्म्याचा दाह कोणाला कळत होता. तसाच माझाही...” (पृष्ठ १९) आपल्या वर्तमानातील तमाम अन्यायग्रस्त स्त्रियांचा आवाज होताना गांधारीचा स्त्रीवाद केवळ स्वतःचीच कैफियत मांडत नाही, तर ती तिच्यासारख्या प्रत्येकीच्या दमनाचा उच्चार होते.

जेव्हा भरसभेत द्रौपदीच्या वस्त्राला हात घातला जातो, त्याप्रसंगी कुरुकुलातील ज्येष्ठ, महाज्येष्ठ, जाणते लोक माना खाली घालून आंधळे, मुके, बहिरे होऊन निमूट बसतात, तिथे डोळ्यावर पट्टी बांधलेली गांधारी समस्त विद्वज्जनांना परखडपणे सुनावते- “थांबा. जर कोणी द्रौपदीला हात लावील तर आणि असेल धैर्य तर आधी मला ओलांडून जा. या कुळाने कुलवधूंचा अपमानच करण्याचे ठरवले असेल तर सर्वांत ज्येष्ठ कुलवधू आता मीच आहे, माझा मानसिक पहिला...” (पृष्ठ ८०) 

विटंबना होत असताना ती द्रौपदीची जाहीर माफी मागते, “मला क्षमा कर पांचाली. अशा नराधमांना जन्म देण्याऐवजी माझी कूस उजाड, वांझ राहिली असती, तरी चालले असते. मीच यासाठी दोषी आहे.” (पृष्ठ ८०)

कादंबरीत या प्रसंगातून मांडलेली गांधारी मला सर्वाधिक थोर वाटते. किंबहुना, इथं या कादंबरीत सहजपणे आलेला गांधारीचा ‘स्त्रीवाद’ तेवढा वेगळा काढून मुद्दामहून अधोरेखित करावासा वाटतो. ज्या काळात, ज्या प्रसंगात, ज्या स्थळात बाई बाईवरच्या अन्यायाची बाजू घेऊन बोलू लागते, तो काळ, तो प्रसंग आणि तो उच्चार सर्वाधिक ‘मानवी’ असतो, असं मला वाटतं. पुरुषांकडून स्त्रियांवर अन्याय, शोषण करण्याच्या गोष्टी ठळकपणे मांडल्या, लिहिल्या जातात. पण समस्त जाणते जण एका असहाय्य बाईची विटंबना करत असताना आणि ती होताना निमूट नाकर्ते पुतळे झालेले असताना एक स्त्री पुढे येऊन समस्त सत्ताश्रेष्ठींविरुद्ध स्त्रीच्या वतीनं बोलते, ही गोष्टच मानवी संवेदनेचा सर्वाधिक उत्क्रांत असा आविष्कार वाटते.

..................................................................................................................................................................

उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअ‍ॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...

हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal

................................................................................................................................................................

बाईनं बाईच्या अन्यायाचं छुपं कारण होणं, बाईनं बाईचा दुःस्वास करणं आणि बाईनंच बाईवरच्या अन्यायाची पडद्यामागची सूत्रधार होणं, हा आजवरचा सर्वश्रुत इतिहास असताना या कादंबरीतून येणारा बाईच्या बाईविषयीच्या सहसंवेदनेचा आवाज मोलाचा वाटतो! त्यामुळे कादंबरीतला गांधारीचा स्त्रीवाद हा एक स्वतंत्र विषय म्हणून पौराणिक समजुतींना छेद देत वर्तमानकालीन चिकित्सेच्या अंगानं समजून घेणं महत्त्वाचं ठरतं, ती आजच्या काळाची गरज वाटते.

बाई म्हणून स्वतः गांधारी खरं तर तिच्या आप्तजनांनी तिच्यावतीनं घेतल्या गेलेल्या निर्णयाची बळी झालेली दिसते. बळी दिलेलं आयुष्य ती जगते. ज्यात तिचं आतून आपसूक उमलून येणारं सुख कुठंच नसतं. केवळ राजकीय संबंध सुदृढ व्हावेत म्हणून आईबापांनी योजिलेला अपंग, आंधळा नवरा ती सहर्ष स्वीकारते. तेव्हाच खरं तर ती आतून अंधःकारमय झालेली असते. पण हे कोणालाच न जाणवणे, ही खरं तर गांधारीची बाई म्हणून खरी क्रूर चेष्टा आहे. ‘तू आंधळा आहेस म्हणून तुझी अर्धांगिनी या नात्यानं मलाही डोळ्यावर पट्टी बांधून घ्यायची आहे’ म्हटल्यानंतर नवरा तिच्या या निर्णयाला सहज तयार होत आतून सुखावतो. भल्यामोठ्या दार्शनिकाचे आव आणत, “माझ्या या भावविश्वात तुझेही स्वागत...” म्हणत तिचं अनैसर्गिक पंगूपण स्वागतशीलपणे स्वीकारतो. तेव्हा एक पुरुष म्हणून आणि एक नवरा म्हणून आपल्यासाठी स्वतःच्या नैसर्गिक उर्मी, प्रेरणा खुडून टाकणारी बायको त्याच्यातल्या ‘पुरुषी अहं’ला सुखावणारीच नसते का?

इथंही नवरा तिचं आयुष्य नियंत्रित करतो. मग गांधारीने आईबापाला त्यांच्या राजनयाच्या खेळीचा भाग होणार नाही, असं स्पष्ट सांगायला हवं होतं का? ‘एवढे सुंदर नीलवर्णी डोळे असणारी मी आंधळा नवरा करून घेणार नाही’ असं ठणकावायला हवं होतं का? आपल्या जन्मांध नवऱ्याला ‘तू आंधळा असलास तरी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी तुलाही हे सुंदर जग दाखवेन,’ असं सांगण्याऐवजी स्वतःच आपल्याही डोळ्यावर पट्टी बांधून घेऊन कोणतं डोळसपण, कोणतं समर्पण सिद्ध करायचं होतं तिला? की असं वागून स्वतःच स्वतःच्या कमनशिबावर सूड उगवायचा होता?

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

मनात अशा अनेक नव्या प्रश्नांची मालिका ही कादंबरी वाचल्यावर सुरू होते. स्नेहलता स्वामी यांनी आपल्या कथानकातून एक वेगळी गांधारी उलगडण्याचा चांगला प्रयत्न केला आहे. ती वाचून अशा अनेक नव्या प्रश्नांच्या उत्तरादाखल आणखी न उलगडलेली नवी गांधारी उकलायचा प्रयत्न करायला हवा.

इतिहास आणि पुराणकथा फक्त पौराणिक आणि ऐतिहासिक संदर्भात न बघता त्या वर्तमानकालीन संदर्भात बघणंच जाणिवा अधिक प्रशस्त करणारं ठरत असतं. म्हणून ही कादंबरी आवर्जून वाचावी आणि आपापली नवी गांधारी उलगडावी... सो लेटस अनफोल्ड अवर ओन मिथ!

‘गांधारी’ - स्नेहलता स्वामी

दिलीपराज प्रकाशन, पुणे

पाने - १५६

मूल्य - २२० रुपये.

.................................................................................................................................................................

सुचिता खल्लाळ, नांदेड

suchitakhallal@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

शेतकऱ्यांपासून धोरणकर्त्यांपर्यंत आणि सामान्य शेतकऱ्यांपासून अभ्यासकांपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा ‘ज्वारी’कडे वळवण्यासाठी...

शेती हा बहुआयामी विषय आहे. त्यातील एका विषयांवर विविधांगी अभ्यास करता आला आणि पुस्तकरूपाने वाचकांसमोर मांडता आला, याचं समाधान वाटतं. या पुस्तकात ज्वारीचे विविध पदर उलगडून दाखवले आहेत. त्यापुढील अभ्यासाची दिशा दर्शवणाऱ्या नोंदी करून ठेवल्या आहेत. त्यानुसार सुचवलेल्या विषयांवर संशोधन करता येईल. ज्वारीला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणकर्त्यांनी धोरणात्मक दिशेने पाऊल टाकलं, तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.......

म. फुले-आंबेडकरी साहित्याकडे मी ‘समाज-संस्कृतीचे प्रबोधन’ म्हणून पाहतो. ते समजून घेण्यासाठी ‘फुले-आंबेडकरी वाङ्मयकोश’ उपयुक्त ठरणार आहे, यात शंका नाही

‘आंबेडकरवादी साहित्य’ हे तळागाळातील समाजाचे साहित्य आहे. तळागाळातील समाजाचे साहित्य हे अस्मितेचे साहित्य असते. अस्मिता ही प्रथमतः व्यक्त होत असते ती नावातून. प्रथमतः नावातून त्या समाजाचा ‘स्वाभिमान’ व्यक्त झाला पाहिजे. पण तळागाळातील दलित, शोषित व वंचित समाजाला स्वाभिमान व्यक्त करणारे नावदेखील धारण करता येत नाही. नव्हे, ते करू दिले जात नाही. जगभरातील सामाजिक गुलामगिरीत खितपत पडलेल्या समाजघटकांचा हाच अनुभव आहे.......

माझ्या हृदयात कायमस्वरूपी स्थान मिळवलेला हा सीमारेषाविहिन कवी तुमच्याही हृदयात घरोबा करो. माझ्याइतकंच तुमचंही भावविश्व तो समृद्ध करो

आताचा काळ भारत-पाकिस्तानातल्या अधिकारशाही वृत्तीच्या राज्यकर्त्यांनी डोकं वर काढण्याचा आहे. अशा या काळात, देशोदेशींच्या सीमारेषा पुसून टाकण्याची क्षमता असलेल्या वैश्विक कवितांचा धनी ठरलेल्या फ़ैज़चं चरित्र प्रकाशित व्हावं, ही घटना अनेक अर्थांनी प्रतीकात्मकही आहे. कधी नव्हे ती फ़ैज़सारख्या कवींची या घटकेला खरी गरज आहे, असं भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतल्या विवेकवादी मंडळींना वाटणंही स्वाभाविक आहे.......