रसाळ सर एखाद्या कवीवर लिहिताना स्वच्छ कापूस पिंजावा, तसा तो कवी आपल्या समोर पिंजून ठेवतात. परिणामी तो कवी स्वच्छपणे कळत जातो...
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
इंद्रजित भालेराव
  • ‘काव्यालोचना’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Mon , 28 March 2022
  • ग्रंथनामा शिफारस काव्यालोचना Kavyalochana सुधीर रसाळ Sudheer Rasal गोविंदाग्रज Govindragraj बालकवी Baalkavi पु.शि. रेगे P.S. Rege मंगेश पाडगावकर Mangesh Padgaonkar द.भा. धामणस्कर D. B. Dhamanskar अरुण कोलटकर Arun Kolatkar चंद्रकांत पाटील Chandrakant Patil अनुराधा पाटील Anuradha Patil

‘काव्यालोचना’ हा कवितेचे स्वरूप आणि मर्म उलगडून दाखवणारा आणि प्रत्येक कवीनं आणि काव्यरसिकानं वाचावाच असा हा ग्रंथ आहे.

गुरुवर्य सुधीर रसाळ यांचं वय आता नव्वदीच्या घरात आहे. आयुष्यभर त्यांनी पुष्कळ समीक्षालेखन केलं. ते सगळंच लेखन मूलभूत स्वरूपाचं आहे. त्या लेखनाची कितीतरी पुस्तकं प्रकाशित होऊ शकली असती. पण सरांनी पुस्तक प्रकाशित करण्याकडे सुरुवातीपासून दुर्लक्ष केलं. आम्हाला म्हणजे त्यांच्या काही जुन्या-नव्या विद्यार्थ्यांना खूप वाटायचं की, या सगळ्या समीक्षालेखनाची संकलनं होण्यासाठी काहीतरी करायला हवं. पण आम्हाला काही करायला जमलं नाही. इतक्यात नागनाथ कोतापल्ले यांनी लक्ष घालून त्यांची दोन पुस्तकं प्रकाशित केली आहेत. कोतापल्लेही रसाळ सरांचे विद्यार्थीच आहेत.

निवृत्तीनंतर हळूहळू सरांनीही या गोष्टीत लक्ष घालायला सुरुवात केली आणि त्यांचा एकेक ग्रंथ प्रकाशित व्हायला सुरुवातही झाली. पुष्कळ दिवसांपासून लांबलेले मर्ढेकरांवरचे त्यांचे तिन्ही ग्रंथ प्रकाशित झाले. ‘कविता निरुपणे’ आणि ‘भालचंद्र नेमाडे यांची समीक्षा’ हे दोन ग्रंथही पाठोपाठ आले. पु.शि. रेगे यांच्या कवितेवरचा ग्रंथही आला. आणि करंदीकरांच्या कवितेवरील ग्रंथही तयार झालाय. शिवाय पु. शि. रेगे यांच्या समग्र कवितेचं संपादनही सरांनी केलं. निवृत्तीनंतर संगणकाचे शिक्षण घेऊन आता नव्वदीतही सर स्वतःच्या पुस्तकांच्या अक्षरजुळण्या स्वतःच करून मुद्रणप्रतही तयार करतात. त्यात काही चूक राहू नये म्हणून.

अगदी अलीकडं नितीन कोत्तापल्ले यांनी नागनाथ कोतापल्ले सरांच्या मार्गदर्शनाखाली रसाळ सरांची दोन पुस्तक अत्यंत देखण्या स्वरूपात सायन पब्लिकेशन्सच्या वतीनं प्रकाशित केलेली आहेत. ‘काव्यालोचना’ आणि ‘समीक्षा आणि समीक्षक’ अशी या दोन पुस्तकांची नावं आहेत. एक कवितेवर, तर एक समीक्षेवर केंद्रित आहे. मी कवितेवर केंद्रित असलेल्या ‘काव्यालोचना’ या ग्रंथाविषयी लिहिणार आहे.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

या ग्रंथांतला पहिलाच लेख ‘कविता म्हणजे काय?’ या तुमच्या-आमच्या सगळ्यांच्याच मनातल्या प्रश्नाचे उत्तर शोधणारा आहे. कवितेची कुठलीही समाधानकारक आणि परिपूर्ण व्याख्या आतापर्यंत कोणालाही करता आली नाही, हे मान्य करत कवितेविषयीची शुद्ध तर्कावर आधारित काही मतं सर मांडत जातात.

‘काव्यात कल्पित गद्यापेक्षा रूपक प्रक्रिया अधिक प्रभावी असते. किंबहुना तो काव्याचा प्राणच असतो, असे म्हणता येईल. म्हणूनच काव्याला रूपकांची किंवा प्रतिमांची संघटना म्हटले जाते. अनेकार्थता, व्यामिश्रता, उत्कटता, अल्पाक्षरत्व हे गुणधर्म काव्यात निर्माण झालेले असतात. काव्याला शब्दांची रचना म्हणता येईल. शब्दसंलग्न नादरचना व अर्थरचना काव्यात घडवून आणली जाते. सर्वसामान्य माणसाच्या बोलण्यात काव्य ही संज्ञा मधुर, सुखद, उत्कट भाव जागृत करणारे शब्द या अर्थाने वापरली जाते. व्यवहारात ज्या अर्थाने काव्य ओळखले जाते, त्या सीमित अर्थाने ते प्रत्यक्षात मात्र स्वीकारता येत नाही.’

कवितेविषयी असे सूत्ररूप विचार सर इथं मांडतात. या सूत्रांचा विस्तार लक्षात येण्यासाठी तुम्हाला मूळ लेखच वाचायला हवा.

‘कविता स्वरूप आणि मूल्य’ या दुसर्‍या लेखात सरांनी कविता इतर वाङ्मयप्रकारापेक्षा कशी वेगळी आहे, ते स्पष्ट करत मूल्यवान कविता कोणती तेही सांगितले आहे. सर म्हणतात- ‘ज्या कवितेतील शब्द अनेकार्थी आहेत, ती कविता मूल्यवान आहे, असे आपणास म्हणता येते. कवितेची भाषिक रचना, तिच्या शब्दांची अनेकार्थता, तिची अर्थवत्ता उलगडणारी शब्दानुक्रमांची रीत, शब्दांची लय आणि त्यांच्या उच्चारण चेहऱ्यांची रचना या सर्व घटकांच्या सुसंगत सार्थ रचनेत वाचकास कलानुभव देण्याची क्षमता असते. म्हणून कवितेच्या या वस्तुनिष्ठ घटकांच्या मूल्यमापनातून कुठल्याही कवितेचा दर्जा ठरवता येतो.’

कविता आणि दुर्बोधता यांचं नातं जुनंच आहे. सामान्य माणसं भाषेच्या एकाच शक्तीचा उपयोग करतात. कवी शब्दांच्या अनेक शक्ती उपयोगात आणतात. त्यामुळे कवी आणि सामान्य रसिक यांच्यात फरक पडतो. आणि म्हणूनच सामान्य रसिकांना चांगली कविता समजून सांगावी लागते. पूर्वी हे काम कीर्तनकार, पुराणीक करायचे. आता तेच काम प्राध्यापक आणि समीक्षक करतात. पण काही कवी  काही कविता अशा लिहितात की, त्या समजून घेताना समीक्षकांचीही दमछाक होते. खूप अभ्यास करून तर्काच्या अनेक शक्यता आजमावून त्यांना त्या कविता समजून घ्याव्या लागतात.

अशा कवितांना जुन्या काळात कुटकविता, मधल्या काळात गुढकविता आणि अलीकडच्या काळात दुर्बोध कविता असं म्हटलं जातं. कवितेतील दुर्बोधतेची चर्चा आतापर्यंत मराठीतही पुष्कळ झालेली आहे. व.लं. कुलकर्णी संपादित करत असलेल्या ‘समीक्षक’ या मासिकाने या विषयावर फार पूर्वीच एक स्वतंत्र अंकही काढला होता. माझ्या आठवणीप्रमाणे या अंकात स्वतः वा.ल. कुलकर्णी, विंदा करंदीकर आणि अशोक केळकर यांचे लेख असावेत.

मर्ढेकर, करंदीकर, दिलीप चित्रे, ग्रेस या कवींच्या कविता अशा दुर्बोध कविता समजल्या जातात. या कवींनी कविता लिहायला सुरुवात केल्यापासून मराठी काव्यातील दुर्बोधतेची चर्चा व्हायला सुरुवात झाली. रसाळ सरांच्या या पुस्तकातला तिसरा लेख याच विषयावरचा आहे.

सरांनी दुर्बोधतेची चर्चा इतकी तर्कशुद्ध केलेली आहे की, सामान्य वाचकांना हा लेखही दुर्बोध वाटण्याची शक्यता आहे. आजच्या कवितेतील दुर्बोधतेची कारणं सांगताना रसाळ सर म्हणतात- ‘आजची कविता ही व्याकरणनिष्ठ स्पष्टीकरणात्मक शब्दानुक्रम कटाक्षाने टाळल्या गेल्याने दुर्बोध बनते’. एकदा करंदीकर म्हणाले होते की, ‘कवितेच्या विकासाचा वेग व अभिरुची विकासाचा वेग यात मोठे अंतर पडले की, समीक्षकावरील जबाबदारी वाढते.’ रसाळ सरांनीही जबाबदारी आयुष्यभर फार गंभीरपणे पार पाडलेली आहे. मर्ढेकरांच्या दुर्बोध कवितांचे विश्लेषण करणारा त्यांचा ‘मर्ढेकरांची कविता : आकलन आणि विश्लेषण’ आणि ‘कविता निरुपणे’ हे दोन ग्रंथ त्याची साक्ष आहेत.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

या पुस्तकातले यानंतरचे ‘नव्याने गोविंदाग्रज’ आणि ‘नव्याने बालकवी’ हे दोन लेख पुनर्मूल्यांकन स्वरूपाचे आहेत. १०० वर्षांपूर्वी मराठीत होऊन गेलेले हे दोन अभिजात कवी आहेत. सतत येणाऱ्या नवनव्या वाङ्मयनिकषावर जी कविता टिकून राहते, तीच अभिजात असते. या दोन्ही लेखातून रसाळ सरांनी या दोन कवींचे आतापर्यंत अज्ञात असलेले काही पैलू आपल्यासमोर मांडून दाखवलेले आहेत.

प्रेमाचे शाहीर म्हणून ज्यांना ख्याती लाभली आणि ज्यांच्या कवितेतल्या त्याच एका अंगावर प्रामुख्याने चर्चा होत राहिली, ते गोविंदाग्रज आपल्या कवितेतून जीवनाचे अर्थपूर्ण दर्शन घडवतात, हे रसाळ सरांनी प्रथमच दाखवून दिलेले आहे. या लेखाच्या शेवटी सरांनी काढलेला निष्कर्ष अतिशय महत्त्वाचा आहे. सर लिहितात- ‘मानवाच्या क्षमतांना असलेल्या मर्यादा, त्याच्या भोवतीच्या काळोखातून आरपार पाहण्याचे त्याने स्वीकारलेले आव्हान आणि त्यात त्याला येणारे अपयश, इच्छातृप्तीसंबंधीची त्याची आंधळी आशा आणि नियतीनिश्चित जीवनाचा त्याला करावा लागणारा स्वीकार, या आणि यांच्याशी संलग्न असणाऱ्या जाणिवा गोविंदाग्रजांच्या समकालीन कवितेत गोविंदाग्रजांच्या कवितेशिवाय अन्यत्र आढळत नाहीत. विसाव्या शतकाच्या प्रारंभकाळातला हा एक असाधारण कवी आहे.’

‘दुसरे म्हणजे जाणिवांचा हाच व्यूह मर्ढेकरांच्या कवितेत प्रकट झाला आहे. मर्ढेकरांना बालकवीसारखी कविता लिहायची होती. बालकवींच्या शैलीत त्यांनी काही कविता लिहिल्याही. पण जाणिवांच्या संदर्भात मर्ढेकरांचे बालकवींशी नव्हे, तर गोविंदाग्रजांची रक्ताचे नाते आहे. बालकवी हे मर्ढेकरांचे स्वप्न आणि गोविंदाग्रज हे मर्ढेकरांचे वास्तव आहे,’ असेही रसाळ सर लिहितात.

‘नव्याने बालकवी’ या लेखात रसाळ सरांनी बालकवींच्या निसर्ग कवितांमागे असलेली ‘बायबल’ची प्रेरणा शोधली आहे. बालकवींच्या निसर्गकाव्यात येणारी स्वर्ग आणि भूमीच्या मीलनाची जाणीव ही मुळात ख्रिस्ती आहे, असे रसाळ सरांना वाटते. त्या दृष्टीने बालकवींच्या काही कल्पना आणि ‘बायबल’मधील काही वचने यांचा पडताळा रसाळ सरांनी या लेखात घेतलेला आहे. चार प्रकारे व्यक्त होणारी बालकवींची निसर्गकविता आणि हरपलेल्या श्रेयाच्या शोधात वणवणाऱ्या काही कविता, यांची एक संगती रसाळ सरांनी इथं लावून दाखवलेली आहे. निसर्गकविता आणि निसर्गाचा प्रत्येय येईनासा झाल्यावर त्यांनी लिहिलेली त्यांची कविता फक्त महत्त्वाची आहे. त्यांच्या इतर कविता सामान्य दर्जाच्या आहेत, असेही रसाळ स्पष्टपणे सांगतात.

आपल्या कवितांत भाष्य वाढवत नेऊन त्यांचा अकारण विस्तार करण्याची सवय बालकवी आणि गोविंदाग्रज यांना आहे. निदान बालकवींनी मोजक्या का होईना अल्पाक्षरी कविता लिहिल्या आहेत, असंही रसाळ सर लिहितात. बालकवी असंख्य वेळा निरर्थक प्रतिमा योजतात, त्या अत्यंत कृत्रिम असतात, हे रसाळ सरांनी साधार दाखवून दिलेलं आहे. शेवटी रसाळ सर लिहितात, ‘तरल संवेदना, प्रत्ययकारी अनुभव, मुलायम शब्दकळा आणि कवितेची कर्णमधुर मांडणी, या गुणांमुळे बालकवींची कविता वैणिक स्वरूपाची झाली आहे. आधुनिक मराठी काव्यात बालकवी, हे पहिले वैणिक कवी आहेत. स्वतःच्या अनुभवातून निष्पन्न झालेला आणि अंतर्गत सुसंगती लाभलेल्या जाणिवांचा व्यूह असलेला, ज्याने आपल्या काव्यनिर्मितीत आपल्या जाणीव व्यूहाला योग्य न्याय दिला आणि ज्याने मराठी काव्यात निसर्गकवितेचे एक नवे आणि संपन्न क्षेत्र निर्माण केले, असा हा मराठीतील ‘बाल’कवी नसलेला बालकवी.’

रसाळ यांच्या मते बालकवींसारखी कविता आधीही कोणी लिहिली नाही आणि नंतरही कुणाला लिहिता आलेली नाही.

यानंतरचा लेख पु.शि. रेगे यांच्या ‘स्वानंदबोध’ या कवितेवर आधारित आहे. रेगे यांनी ही कविता ज्ञानेश्वरीच्या वळणानं लिहिलेली आहे. त्यामुळे तशी ती एक आध्यात्मिक कविता आहे. या कवितेचे आकलन मांडताना रसाळ सरांना वाटतं की, रेग्यांनी ही कविता मर्ढेकरांच्या आध्यात्मिक भूमिकेला उत्तर म्हणून लिहिली असावी. रसाळ सर लिहितात, ‘मर्ढेकरादी नवकवीपेक्षा पूर्णतः वेगळा असलेला आपला जीवनविषयक दृष्टीकोन स्पष्ट करण्यासाठी, तसेच आजचे अर्थहीन आणि दुःखपूर्ण असलेले मानवी जीवन अर्थपूर्ण आणि जगण्यायोग्य बनवण्यासाठी आपण स्वीकारलेला जीवनविषयक दृष्टीकोन उपयुक्त असल्याचे सांगण्यासाठी आणि त्याबरोबरच हाच दृष्टिकोन आपल्या जाणीवव्यूहाचा पाया असल्याचे सूचित करण्यासाठी स्वानंदबोधाची निर्मिती झाली आहे.’

पण सगळ्या कवितेचे विवेचन करून झाल्यावर रसाळ सरांना अशी शंकाही येते की, मर्ढेकरांच्या काव्यातील भूमिकेला उत्तर देण्याच्या सुप्त इच्छेतून रेगे यांनी आपल्या वाङ्मयाचे रूप काही प्रमाणात बिघडून तर घेतले नाही ना?

..................................................................................................................................................................

उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअ‍ॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...

हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal

................................................................................................................................................................

या पुस्तकातले दोन लेख मंगेश पाडगावकर आणि द.भा. धामणस्कर या दोन कवींवरचे आहेत. ‘पाडगावकरांची शहाणपणाची कविता’ हा या पुस्तकातला सर्वांत दीर्घ असा ३४ पानांचा लेख आहे. तो प्रामुख्याने ‘बोलगाणी’ या एकाच पुस्तकावरचा आहे. पाडगावकर लोकप्रिय कवी पण त्यांच्यावर समीक्षकांनी खूप कमी लिहिलं. कारण ते रोमँटिक प्रकृतीचे कवी आणि या प्रकाराकडे मराठी समीक्षक तुच्छतेनं पाहतात, असं रसाळ सरांना वाटतं. शिवाय पाडगावकरावर ते नुसते रोमँटिक नव्हे, तर व्याजरोमँटिक आहेत, असा जो आरोप केला जातो, तोही रसाळ यांना चुकीचा वाटतो. ‘व्यक्तिकेंद्रित जीवनपद्धती प्रस्थापनेच्या आग्रह, मानव आणि निसर्ग यांच्यातील शेंद्रीय नात्याच्या आणि मानवामानवामधील प्रेमपूर्ण नात्याच्या अस्तित्वाचे भान, मानवी जीवनात स्त्री-पुरुषांमधील प्रेमसंबंधांना पायाभूत आणि प्राथमिक स्थान असण्यावरचा विश्वास, हे रोमँटिक जाणीव व्यूहाचे मूलभूत घटक पाडगावकरांच्या कवितेतून व्यक्त होतात’, असं रसाळ सरांना वाटतं.

तरी सर लिहितात- ‘पाडगावकरांचा रोमँटिक जाणीवव्यूह अस्सल असला तरी त्याच्या कक्षा त्यांच्या प्रारंभीच्या कवितांतच निश्चित झाल्या. नंतर त्या विस्तारल्या नाहीत आणि त्यांच्या जाणिवांच्या वेगळ्या अंगाने विस्तारही झाला नाही.’

पाडगावकरांच्या कवितेचा सविस्तर आढावा घेऊन शेवटी बोलगाणीविषयी निष्कर्ष काढताना सरांना वाटतं की, ‘ती केवळ रंजक आहेत म्हणून नव्हे, तर आजच्या तरुण पिढीला ज्या प्रकारचं जीवन जगावसं वाटतं, त्यासाठी त्याला आत्मविश्वास देतात, म्हणून ही कविता लोकप्रिय झालेली आहे. या कवितेनं आधुनिक मराठी संस्कृतीची गरज भागवली आहे आणि मराठी कविताही संपन्न केली आहे.’

समीक्षकांनी पाडगावकरांच्या कवितेकडे दुर्लक्ष केलं, असं रसाळ सर म्हणत असले तरी सरांनीही याआधी कधी पाडगावकरांवर लिहिलेलं नव्हतं. हा लेख प्रथम ‘अंतर्नाद’ मासिकात प्रकाशित झाला, तेव्हा अनेकांना आश्चर्य वाटलं होतं की, रसाळ सरांनी पाडगावकर यांच्यावर का लिहावं? हा लेख वाचला की, या प्रश्नाचं उत्तर मिळून जातं.

रसाळ सरांनी पुढच्या द.भा. धामणस्कर यांच्या कवितेवरच्या लेखात त्यांच्या समग्र कवितेचा विचार केलेला आहे. आयुष्यात तीनच कवितासंग्रह आणि एकूण अडीचशे कविता लिहिणारा हा कवी फारसा चर्चेत नसतो. पण रसाळ सरांना त्यांची कविता महत्त्वाची वाटते. म्हणूनच त्यांच्या समग्र कवितेचा विचार रसाळ सरांनी इथं केलेला आहे. ‘मानवाचे निसर्गाशी असलेले रक्ताचे नाते तोडून त्याने आपली स्वतंत्र, परंतु कृत्रिम संस्कृती घडवत आणली. त्याला जर का पुन्हा नैसर्गिक जीवन जगायचे असेल, तर त्याने मुळातल्या सजीवसृष्टीकडे गेले पाहिजे; ही धामणस्कर यांच्या कवितेची केंद्रीय जाणीव आहे’, असे रसाळ सरांना वाटते.

धामणस्कर यांच्या संपूर्ण कवितांचा तपशीलवार आढावा घेत त्यातल्या गुणदोषांची चर्चा केल्यानंतर रसाळ सर लिहितात- ‘निसर्ग आणि मानव यात निर्माण झालेल्या संघर्षाचा आणि निसर्गसंवादी जीवनपद्धतीच्या अपरिहार्यतेचा शोध घेणारी एक अनोखी कविता धामणस्कर यांनी लिहिली आहे.’

नंतरचं टिपण ‘अरुण कोलटकरांच्या चार कविता’ या छोटेखानी संग्रहावरचं आहे. तरी या टिपणाच्या सुरुवातीला रसाळ सरांनी कोलटकरांच्या एकूण कवितेवर काही विधानं केली आहेत. बहुतेक कवी प्रेम, निसर्ग, समाज, अशा सुट्या जाणिवांचेच कवी असतात. परंतु कवीच्या सर्व जाणिवांमध्ये एक सेंद्रिय स्वरूपाचे नाते प्रस्थापित होऊन त्यातूनच समग्र मानवी जीवन आकळणारा, मानवी जीवनाचे भूत, वर्तमान आणि भविष्य अर्थ पूर्ण करणारा कवी दुर्मीळ, असं रसाळ सरांना वाटतं. जुन्या कवींत ज्ञानदेव, तुकाराम आणि नव्या कवींत मर्ढेकरानंतर अरुण कोलटकर अशी चारच नावं रसाळ सरांनी या संदर्भात घेतली आहेत. आणि या दृष्टीनं त्यांनी कोलटकरांच्या समग्र कवितेवर थोडक्यात भाष्य केलं आहे.

ज्या कोलटकरांच्या संग्रहाची रसाळ सर इथं चर्चा करत आहेत, त्यात जेरुसलेम, पेरीस, परंपरा, अस्मिता या नावाच्या चार कविता आहेत. त्यातल्या पहिल्या दोन किती श्रेष्ठ दर्जाच्या कविता आहेत आणि अस्मिता व परंपरा या दोन कविता कशा सामान्य दर्जाच्या आहेत, हे सरांनी सकारण आणि सविस्तर सांगितलेलं आहे. कोलटकरांचा ‘चिरीमिरी’ हा संग्रहही सरांना सामान्य दर्जाचा वाटतो. उपहास-उपरोधपर कविता शेवटी मूलभूत, व्यापक, सनातन व सार्वकालीन मूल्यावर केंद्रित होत नसेल, तर ती केवळ टिंगल-टवाळी ठरते, असे रसाळ सरांना वाटते. कोलटकरांची ‘द्रोण’ ही दीर्घ कविता मात्र रसाळ सरांच्या नजरेतून सुटलेली दिसते.

या संग्रहातले शेवटचे दोन लेख हे चंद्रकांत पाटील आणि अनुराधा पाटील यांच्या कवितेवर लिहिलेले आहेत. चंद्रकांत पाटील यांच्या कवितेवरचा लेख हा त्यांच्या ‘बायका आणि इतर कविता’ या एका संग्रहाचे परीक्षण आहे. पण ते कुठं आणि कधी प्रकाशित झालेलं आहे, त्याचा संदर्भ इथं दिलेला नाही. संग्रहातल्या काही लेखांच्या शेवटी असे संदर्भ आहेत. खरं तर सर्व लेखांच्या शेवटी किंवा पुस्तकाच्या शेवटी एकत्रित सर्व लेखांच्या प्रथम प्रकाशनाचे संदर्भ असायला हवेत. पुस्तकाचे परीक्षण लिहिणाऱ्याला त्याचा उपयोग होतो.

चंद्रकांत पाटलांच्या एका संग्रहावर लिहितांना रसाळ सर त्यांच्या एकूण कवितेवर आणि मर्ढेकरोत्तर एकूण पिढीवरही काही भाष्य करतात. आधुनिक मानवाच्या युगभावनेचा पहिला आविष्कार मर्ढेकरांच्या कवितेत प्रकट झाला आणि पुढे वेगवेगळी वळणं घेत दिलीप चित्रे, अरुण कोलटकर, वसंत आबाजी डहाके, चंद्रकांत पाटील यांची कविता घडत गेली, असं म्हणतात.

मानवाच्या प्राकृतिक प्रेरणांचे आकार शोधणे आणि भोवतीच्या शत्रुवत वास्तवामुळे त्या आकारांचे भग्न होणारे रूप, यामुळे चंद्रकांत पाटलांची कविता उपहासाचे रूप धारण करते, असंही रसाळ सरांना वाटतं. विज्ञान सामग्रीतून घडवलेली प्रतिमासृष्टी हे चंद्रकांत पाटलांच्या कवितेचं अनन्यसाधारण वैशिष्ट्य असल्याचंही नोंदवतात. शेवटी म्हणतात- ‘चंद्रकांत पाटलांचा हा काव्यसंग्रह बायकावरील त्यांच्या वेगळ्या प्रकारच्या कवितांमुळे संस्मरणीय ठरणार आहे.’

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

या ग्रंथातला शेवटचा लेख पाडगावकरांच्या लेखापाठोपाठ ३० पानांइतका दीर्घ आहे. त्यात रसाळ सरांनी अनुराधाबाईंच्या कवितांचा सामग्र आणि सविस्तर विचार केलेला आहे. गेल्या ४० वर्षांपासून जाणिवांच्या एका मर्यादित पटाची कवितेतून अभिव्यक्ती केली जात असूनही त्यांच्या कवितेचा ताजेपणा मात्र बऱ्याच प्रमाणात टिकून राहिलेला आहे, असं निरीक्षण सर सुरुवातीलाच नोंदवतात. विपुल प्रमाणात प्रेमकविता लिहिली जात असताना स्त्री-पुरुष संबंधातील दूरत्व आणि एकत्व यासंबंधीचे भाव प्रकट करणारी कविता केवळ अनुराधा पाटील यांनीच लिहिली, असं एक निरीक्षण रसाळ सरांनी सुरुवातीलाच नोंदवलं आहे.

अनुराधा पाटलांच्या कवितेचा जाणीव्यूह हा विशिष्ट संस्कृतीशी निगडित आहे. ज्या संस्कृतीचा एक भाग निसर्गसबंद्ध कृषिसंस्कृतीचा असून दुसरा आधुनिक जीवन पद्धतीतून घडलेल्या नागर संस्कृतीचा आहे. या दोन्ही भागांत कसलेही नाते प्रस्थापित झालेले नाही, अशा संस्कृतीतून त्यांची कविता जन्मली आहे.

रसाळ सरांचं हे सगळं समीक्षालेखन वाचताना काही गोष्टी आपल्या लक्षात येतात. रसाळ सर कोणत्याही कवीचं किंवा त्याच्या सुट्या कवितेचं विश्लेषण करताना त्याच्या काळाच्या आणि त्याच्या एकूण साहित्याच्या परिप्रेक्ष्यातच करतात. रसाळ सर कोणत्याही कवीवर लिहिताना त्याच्या मोठेपणाचं दडपण आपल्यावर येऊ देत नाहीत. म्हणूनच ते एखाद्या कवीच्या सामर्थ्याबरोबरच त्याचे दोषही सहजपणे दाखवून देतात. एखाद्या कवीच्या त्याच त्या पैलूवर लिहीत बसण्यापेक्षा त्याच्या आतापर्यंत कुणाच्याच लक्षात न आलेल्या अलक्षित पैलूवर लिहितात. त्यासाठी त्यांना कितीतरी दिवस त्या लेखकाच्या वाचनात आणि चिंतनात घालवावे लागत असणार. त्यामुळेच त्यांच्या हातून भराभर आणि भाराभर लिहून होत नसावे. एखाद्या कवीचं समग्र आकलन झाल्याशिवाय आणि त्याच्या लेखनामागची नेमकी सूत्रं लक्षात आल्याशिवाय, त्याचा जाणीवव्यूह लक्षात आल्याशिवाय सर त्यावर लिहायला सुरुवात करत नसावेत. त्यामुळे एखाद्या कवीवर लिहिताना स्वच्छ कापूस पिंजावा, तसा तो कवी आपल्या समोर पिंजून ठेवतात. म्हणूनच रसाळ सरांची कवीसमीक्षा वाचताना वाचकालाही तो कवी स्वच्छपणे कळत जातो.

‘काव्यालोचना’ - सुधीर रसाळ

सायन पब्लिकेशन, पुणे

पाने - २०४

मूल्य - ३२० रुपये.

.................................................................................................................................................................

लेखक इंद्रजित भालेराव प्रसिद्ध कवी आहेत.

ibhalerao@yahoo.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ज्या तालिबानला हटवण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानात शिरकाव केला होता, अखेर त्यांच्याच हाती सत्ता सोपवून अमेरिकेला चालते व्हावे लागले…

अफगाण लोक पुराणमतवादी असले, तरी ते स्वातंत्र्याचे कट्टर भोक्ते आहेत. त्यांनी परकीयांची सत्ता कधीच सरळपणे मान्य केलेली नाही. जगज्जेत्या, सिकंदरालाही (अलेक्झांडर), अफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळवता आला नाही. तेथील पारंपरिक ‘जिरगा’ नावाच्या व्यवस्थेला त्याने जिथे विश्वासात घेतले, तिथेच सिकंदर शासन करू शकला. एकोणिसाव्या शतकात, संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेला अफगाणिस्तानात नामुष्की सहन करावी लागली.......

‘धर्म, जात, देश, राष्ट्र’ या शब्दांचा गोंधळ जनमानसात रुजवून संघ देश, सत्ता आणि समाजजीवन यांच्या कसा केंद्रस्थानी आला, त्याच्याविषयीचे हे पुस्तक आहे

या पुस्तकाच्या निमित्ताने संघाची आणि आपली शक्तिस्थाने आणि मर्मस्थाने नीटपणे अभ्यासून, समजावून घेण्याचा प्रयत्न परिवर्तनवादी चळवळीत सुरू व्हावा ही इच्छा आहे. संघ आज अगदी ठामपणे या देशात केंद्रस्थानी सत्तेत आहे आणि केवळ केंद्रीय सत्ता नव्हे, तर समाजजीवनाच्या आणि सत्तेच्या प्रत्येक क्षेत्रात संघ आज केंद्रस्थानी उभा आहे. आपल्या असंख्य पारंब्या जमिनीत खोलवर घट्ट रोवून एखादा विशाल वटवृक्ष दिमाखात उभा असतो, तसा आज.......

‘रशिया : युरेशियन भूमी आणि संस्कृती’ : सांस्कृतिक अंगानं रशियाची प्राथमिक माहिती देणारं पुस्तक असं या लेखनाचं स्वरूप आहे. त्यामध्ये विश्लेषणावर फारसा भर नाही

आजपर्यंत मला रशिया, रशियन लोक, त्यांचं दैनंदिन जीवन आणि मनोधारणा याबाबत जे काही समजलं, ते या पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावं, असा एक उद्देश आहे. पण त्यापलीकडे जाऊन हे पुस्तक रशिया समजून घेण्यात रस असलेल्या कोणाही मराठी वाचकास उपयुक्त व्हावा, अशीही इच्छा होती. यामध्ये रशियाचा संक्षिप्त इतिहास, वैशिष्ट्यं, समाजजीवन, धर्म, साहित्य व कला आणि पर्यटनस्थळे यांचा वेध घेतला आहे.......

‘हा देश आमचा आहे’ : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केलेल्या आणि प्रजासत्ताकाच्या अमृतमहोत्सवाच्या उंबरठ्यावर उभ्या भारतीय मतदारांनी धर्मग्रस्ततेचे राजकारण करणाऱ्या पक्षाला दिलेला संदेश

लोकसभेची अठरावी निवडणूक तिचे औचित्य, तसेच निकालामुळे बहुचर्चित ठरली. ती ऐतिहासिकदेखील आहे. तेव्हा तिच्या या पुस्तकात मांडलेल्या तपशिलांना यापुढच्या विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकांच्या वेळी वेगळे संदर्भमूल्य असेल. या निवडणुकीचा प्रवास, त्या प्रवासातील वळणे, निर्णायक ठरलेले किंवा जनतेने नाकरलेले मुद्दे व इतर मांडणी राजकीय वर्तुळातील नेते व कार्यकर्ते यांना साहाय्यभूत ठरेल, अशी आशा आहे.......

‘भिंतीआडचा चीन’ : श्रीराम कुंटे यांचं हे पुस्तक माहितीपूर्ण तर आहेच, पण त्यांनी इ. स. पूर्व काळापासून आजपर्यंतचा चीन या प्रवासावर उत्तम प्रकारे प्रकाशही टाकला आहे

‘भिंतीआडचा चीन’ हे श्रीराम कुंटे यांचे पुस्तक चीनविषयी मराठीत लिहिल्या गेलेल्या आजवरच्या पुस्तकात आशयपूर्ण आणि अनेक अर्थाने परिपूर्ण मानता येईल. चीनचे नाव घेताच सर्वसाधारण भारतीयाच्या मनात एक कटुता, शत्रुभाव आणि त्या देशाच्या ऐकीव प्रगतीविषयी असूया आहे. या सर्व भावना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आपल्या विचारांची दिशा ठरवतात. अशा प्रतिमा ठोकळ असतात. त्यांना वस्तुस्थितीच्या छटा असल्या तरी त्या वस्तुनिष्ठ नसतात.......

शेतकऱ्यांपासून धोरणकर्त्यांपर्यंत आणि सामान्य शेतकऱ्यांपासून अभ्यासकांपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा ‘ज्वारी’कडे वळवण्यासाठी...

शेती हा बहुआयामी विषय आहे. त्यातील एका विषयांवर विविधांगी अभ्यास करता आला आणि पुस्तकरूपाने वाचकांसमोर मांडता आला, याचं समाधान वाटतं. या पुस्तकात ज्वारीचे विविध पदर उलगडून दाखवले आहेत. त्यापुढील अभ्यासाची दिशा दर्शवणाऱ्या नोंदी करून ठेवल्या आहेत. त्यानुसार सुचवलेल्या विषयांवर संशोधन करता येईल. ज्वारीला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणकर्त्यांनी धोरणात्मक दिशेने पाऊल टाकलं, तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.......