‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट सत्याचा अपलाप आहे. त्याच्या निर्मितीमागील भावना शिव म्हणजे कल्याणकारक नाही. त्यामुळे एक कलाकृती म्हणून त्यात सौंदर्य नाही!
कला-संस्कृती - हिंदी सिनेमा
श्याम पाखरे
  • ‘द काश्मीर फाईल्स
  • Mon , 28 March 2022
  • कला-संस्कृती हिंदी सिनेमा द काश्मीर फाईल्स The Kashmir Files अनुपम खेर Anupam Kher काश्मिरी पंडित Kashmiri Pandit मुस्लीम Muslim काश्मीर Kashmir

११ मार्च २०२२ रोजी ‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी हा चित्रपट आपण प्रामाणिकपणे बनवल्याचा दावा केला. पंतप्रधान मोदींनी सार्वजनिक व्यासपीठावरून या चित्रपटाची पाठराखण केली. सार्वजनिकरित्या चित्रपट-परीक्षण करणारे ते पहिलेच पंतप्रधान ठरले! या चित्रपटाची महती सांगताना केवळ ‘गांधी’ या चित्रपटामुळेच गांधींना जागतिक प्रसिद्धी मिळाली. त्यापूर्वी गांधी जगाला अपरिचित होते, अशी मुक्ताफळेदेखील त्यांनी उधळली!!

भाजपशासित सात राज्यांमध्ये ‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट करमुक्त करण्यात आला. भाजपचे आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांनी हा चित्रपट पाहण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांना अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर केली. सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले की, प्रत्येक सत्यशोधकाने हा चित्रपट पाहावा. बघता बघता चित्रपटाने दोनशे कोटी रुपयांच्या कमाईकडे वाटचाल सुरू केली. सर्वच अभूतपूर्व!

हे प्रकरण नेमके काय आहे, याची कल्पना होती. तरीही मोदी आणि भागवत यांना या चित्रपटात कोणते सत्य सापडले, ते समजून घेण्यासाठी चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट पाहिला. चित्रपटगृह प्रेक्षकांनी नव्वद टक्के भरले होते, हे नमूद करायला हवे.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

काश्मिरी पंडितांनी जे दुःख भोगले, त्याबद्दल प्रत्येक संवेदनशील व्यक्तीच्या मनाला यातना होणे स्वाभाविक आहे. ते माणूसपणाचे लक्षण आहे. युगानूयुगे हिंदू धर्मातील उच्च जातींच्या अत्याचाराला बळी पडणारे अनुसूचित जातींतील लोक, ब्रिटिश वसाहतवाद आणि नंतर नक्षलवादी व सरकारी सशस्त्र बलांमध्ये चाललेल्या संघर्षाच्या कचाट्यात सापडलेले, विकासासाठी विस्थापित होणारे आदिवासी, राजीव गांधी पंतप्रधान असताना १९८४च्या दंगलींमध्ये बळी पडलेले शीख अल्पसंख्य आणि २००२ साली मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना उसळलेल्या गुजरात दंगलींमध्ये बळी पडलेले मुसलमान अल्पसंख्य आणि आता रशियाच्या आक्रमणाला बळी पडणारे निष्पाप युक्रेनियन अबालवृद्ध नागरिक आदि पीडित सर्वांचे आपले एक दुःख आहे.

हे दुःखच केवळ सर्वकालीन सत्य आहे. ते सोडले तर संपूर्ण चित्रपट असत्याने बरबटलेला आहे. अशोक कुमार पांडे यांनी याबाबतीत केलेले विश्लेषण युट्युबवर उपलब्ध आहे आणि ते हा चित्रपट पाहून प्रभावित झालेल्या व्यक्तींच्या डोळ्यांत अंजन घालण्यास पुरेसे आहे. ‘द काश्मीर फाईल्स’वर तो प्रदर्शित झाल्यापासून विपुल लिखाण झाले आहे. परंतु ते मुख्यतः ऐतिहासिक आणि राजकीय अंगाने झाले. चित्रपट ही एक कलाकृती असते. मला एक कलाकृती म्हणून या चित्रपटावर काही लिहावेसे वाटते.

१९९४ साली स्टीवन स्पीलबर्ग दिग्दर्शित ‘शिंडलर्स लिस्ट’ हा चित्रपट प्रसिद्ध झाला. दुसऱ्या महायुद्धादरम्यान नाझींनी ज्यूंवर केलेले अनन्वित अत्याचार आणि ज्यूंना भोगावे लागलेले प्रचंड दुःख, हा चित्रपटाचा विषय होता. हा चित्रपट ‘शिंडलर्स आर्क’ या थॉमस केनेली यांनी १९८२ साली लिहिलेल्या कादंबरीवर आधारित आहे. सत्यघटनेवर आधारित या पुस्तकाला त्या वर्षीचा बुकर पुरस्कारदेखील मिळाला होता. 

महायुद्धाच्या काळात नाझींनी साठ लाख ज्यू पुरुष, स्त्री आणि मुलांना छळ छावण्यांमध्ये नियोजनबद्ध पद्धतीने मारून टाकले. ‘द काश्मीर फाइल्स’प्रमाणेच ‘शिंडलर्स लिस्ट’मधील हिंसा अंगावर येणारी आहे. परंतु ‘शिंडलर्स लिस्ट’चा शेवट होतो, तेव्हा केवळ कारुण्य भाव प्रेक्षकांच्या मनात भरून राहतो. ‘द काश्मीर फाईल्स’ पाहून आल्यानंतर आपल्या मनात कोणती भावना भरून राहते, याचा विचार हा चित्रपट पाहिलेल्या प्रेक्षकांनी करावा.

या चित्रपटाची सुरुवात १९९०च्या जानेवारीमध्ये काश्मीर खोऱ्यात उसळलेल्या हिंसाचाराने होते. हिंसक जमाव हातात पेटत्या मशाली घेऊन रस्त्यावरील हिंदूंची घरे जाळत निघाला आहे, असे दृश्य दाखवले आहे. रस्त्याच्या कडेला महादेव शंकराचे एक चित्र लावले आहे आणि तो हिंसक जमाव त्या चित्राला आग लावतो. महादेव शंकराच्या जळणाऱ्या चित्रावर कॅमेरा एक क्षण स्थिरावतो. आजपर्यंत भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात हिंदूंच्या दैवताची अशी विटंबना होत असल्याचे दृश्य दाखवण्याची हिंमत कोणत्याही दिग्दर्शकाने केली नव्हती! ती विवेक अग्निहोत्रींनी दाखवली. हिंदूंच्या धार्मिक भावनांच्या बाबतीत पराकोटीचे संवेदनशील असणाऱ्या संघपरिवार आणि भाजपने यावर आक्षेप घेतला नाही आणि अग्निहोत्रींच्या कलात्मक स्वातंत्र्याचा सन्मान केला, हे पाहून आश्चर्य वाटले!

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

चित्रपटात अनुपम खेर यांची मध्यवर्ती भूमिका आहे. त्यांनी पुष्कर नाथ पंडित’ या काश्मिरी पंडिताचे पात्र रंगवले आहे. पुष्कर नाथ दरवर्षी महाशिवरात्रीच्या दिवशी महादेव शंकरावर आधारित एका नाटकाचे मंचन करत असतात. त्यात ते स्वतः शंकराची भूमिका करतात. जानेवारी १९९०च्या त्या संध्याकाळी ते आपल्या नाटक मंडळींसह त्या नाटकाची तालीम करत असतात. त्यांनी चेहऱ्यावर शंकरासारखा निळा रंग, कपाळावर तिसरे नेत्र चितारलेले असते. बाहेर रस्त्यावर परिस्थितीने गंभीर वळण घेतलेले असते आणि तेवढ्यात आपला बाहेर खेळायला गेलेला नातू अजून घरी परतला नाही, असे त्यांना समजते. म्हणून चेहऱ्यावरचा रंग न पुसता ते तडक बाहेर पडतात आणि स्कूटरवर बसून नातवाला शोधून काढतात आणि जीव मुठीत घेऊन घराकडे निघतात. शंकराप्रमाणे चेहऱ्यावर निळा रंग फासलेल्या अनुपम खेर यांच्या छायाचित्राचा उपयोग चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी मोठ्या प्रमाणात करण्यात आला.

ती कल्पना नक्कीच नावीन्यपूर्ण आहे. परंतु त्या प्रतिमेचा चित्रपटात कसा वापर केला गेला, यावर विचार केला पाहिजे. तर शिवाचा चेहरा रंगवलेले पुष्कर नाथ म्हणजे अनुपम खेर अत्यंत भेदरलेल्या स्थितीत श्रीनगरच्या गल्लीबोळांतून आपला आणि नातवाचा जीव वाचवत निघाले आहेत. रस्त्यावर हिंसक जमाव हिंदूंवर अत्याचार करत आहेत. पुष्कर नाथांच्या निळ्या चेहऱ्यावर प्रचंड दहशतीचे भाव दिसतात. अशा परिस्थितीत कसाबसा जीव वाचवत ते घरी पोहोचतात, तर तेथे अतिरेक्यांच्या म्होरक्याने त्यांच्या मुलाला गोळ्या घालून ठार केलेले. ते अतिरेकी शंकराचे रूप घेतलेल्या पुष्कर नाथांना लाथा बुक्क्यांनी तुडवतात. शंकराचे रूप घेतलेल्या पुष्कर नाथांच्या चेहऱ्यावर केविलवाणे भाव उमटतात. अतिरेकी शंकररूपी पुष्कर नाथांना ठणकावून सांगतात की, काश्मीरमध्ये राहायचे असेल तर केवळ ‘अल्ला’चे नाव घ्यावे लागेल आणि ते सामूहिकपणे ‘कलमा’ पढ़तात. शंकररूपी पुष्कर नाथ हताशपणे सर्व पाहत राहतात. अनुपम खेरला देण्यात आलेले ते निळ्या रंगाचे शंकर-रूप आणि हे सर्व प्रसंग पाहून, दिग्दर्शकाला नक्की काय सुचवायचे आहे, असा प्रश्न मनात आला.

जून २०२१मध्ये ‘प्यू रिसर्च सेंटर’ने भारतात केलेल्या धार्मिक सर्वेक्षणाचा अहवाल प्रसिद्ध झाला. सर्वेक्षणानंतर काढलेल्या निष्कर्षात शंकर हा हिंदूंचा सर्वांत लोकप्रिय देव असल्याचे लिहिले आहे. शिवामध्ये आपल्याला परस्परविरोधी गुण एकत्र वास करताना दिसतात. तो सर्वांत मोठा विरक्त आहे आणि सृजनाचा दैवतदेखील आहे. तो पार्वतीशी एकरूप होणारा अर्धनारीश्वर आहे. तो अत्यंत संयमी असा महायोगी आहे आणि क्रोधाग्नीने भस्म करणारादेखील आहे. प्रत्येक मनुष्यात असे परस्परविरोधी गुण एकत्र नांदत असतात. कोणताही मनुष्य पूर्णतः चांगला किंवा वाईट असत नाही (चित्रपटात मुसलमान पुरुष, बायका आणि मुले सर्व राक्षसी वृत्तीचे दाखवले आहेत.) त्यामुळे हिंदूंना शंकर जवळचा वाटतो. परंतु चित्रपटात दिग्दर्शकाने ही शिव प्रतिमा पुष्कर नाथाच्या माध्यमातून अशी भेदरलेली का दाखवावी? काश्मीरमधील हिंदूंविरुद्ध झालेल्या हिंसाचारासमोर देवदेखील हतबल ठरले होते, असा सूचक संदेश दिग्दर्शकाला द्यायचा आहे का? मग अन्यायग्रस्त काश्मिरी पंडितांचा तारणहार कोण आहे, असे दिग्दर्शकाला सुचवायचे आहे.

सर्वोच्च न्यायालयाने बाबरी मस्जिद प्रकरणावर अंतिम निर्णय दिला, तेव्हा समाजमाध्यमांवर पंतप्रधान मोदी बाल्यावस्थेतील रामाचे बोट धरून त्याला राममंदिराकडे घेऊन जात असल्याचे पाठमोरे चित्र फिरत होते. हा एक राजकीय चित्रपट आहे, असे विवेक अग्निहोत्रींनी स्पष्टपणे सांगितले आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून कोण कोणाचा प्रचार करत आहे, हे समजण्यासाठी बुद्धीवर अधिक जोर देण्याचीदेखील आवश्यकता नाही. मग राजकारणासाठी आपल्या देवतांचा असा वापर केल्याबद्दल तथाकथित संस्कृतीरक्षक आक्षेप का घेत नाहीत? यासंदर्भात खातीर गझनवी यांचा प्रसिद्ध शेर आठवल्याशिवाय राहत नाही-

कैसी चली हैं अब के हवा, तेरे शहर में

बन्दे भी हो गये हैं ख़ुदा, तेरे शहर में

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

भारतीय दर्शनात शिवाचा अर्थ कल्याणकारी असादेखील आहे. जेथे सत्य आणि शिव यांच्यात सुसंवाद असतो, तेथे सौंदर्य प्रकट होते. रवींद्रनाथ टागोरांच्या मते जोपर्यंत आपली इंद्रिये आपल्या सौंदर्याच्या आकलनाला नियंत्रित करतात, तोपर्यंत खरे सौंदर्य आणि आपल्याला जे सुंदर वाटते, त्यात मोठी तफावत राहते. क्रोध आणि स्वार्थामुळे कलाकाराची दृष्टी विकृत होते. त्यामुळे त्याला क्षुद्र आणि ऐहिक गोष्टी महान आणि शाश्वत भासू लागतात. त्यामुळे तो एक आभासी जग निर्माण करतो, जे वास्तवापासून दूर असते. अशा स्थितीत तो जी कलाकृती निर्माण करतो, त्यात सत्य, शिव आणि सुंदर नसते. जेव्हा इंद्रियांना संवेदनशीलतेची शक्ती मिळते तेव्हा ती तफावत दूर होते.

अशा वेळी कलाकृतीतून निर्माण होणारी कोणतीही मानवी भावना असो, ती आनंददायक असते. टागोरांचे सहकारी महान चित्रकार नंदलाल बोस यांच्या मते, जेव्हा कलेमध्ये स्थिरता, निरपेक्ष संतुलन आणि समतोल असतो, तेव्हा आनंद, दुःख, प्रेम किंवा तिरस्कार अशी कोणतीही भावना कलेचा विषय बनू शकते.

कोणताही सच्चा कलाकार सभोवतालच्या दुःखापासून अलिप्त राहू शकत नाही. कलाकाराच्या मनात दुःखातून प्रेरणा निर्माण होते. दुःख जितके तीव्र तितकी प्रेरणा गतिमान असते. परंतु ती प्रेरणा स्थिर झाल्यानंतरच त्यातून रसनिर्मिती होते आणि कलाविष्कार होतो, कारण नवरसांपैकी शांत रस हाच सर्व रसांचा आरंभ आणि शेवट असतो.

‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट सत्याचा अपलाप आहे. त्याच्या निर्मितीमागील भावना शिव म्हणजे कल्याणकारक नाही. त्यामुळे एक कलाकृती म्हणून त्यात सौंदर्य नाही. दिग्दर्शकाची दृष्टी स्वार्थामुळे विकृत झाली आहे. त्यामुळे त्याने एक आभासी विश्व निर्माण केले आहे जे वास्तवापासून दूर आहे. त्यामुळेच अगदी पहिल्या फ्रेमपासून ते अखेरच्या फ्रेमपर्यंत हा चित्रपट पाहणे म्हणजे एक प्रकारचा मानसिक आणि शारीरिक छळ आहे. एकदा पाहिल्यानंतर पुन्हा हा चित्रपट पाहण्याची हिंमत कोणी करणारदेखील नाही. ढिसाळ दिग्दर्शन आणि पटकथा, रटाळ संवाद, जवळजवळ सर्वच कलाकारांचा सुमार अभिनय, यामुळे एक कलाकृती म्हणून हा चित्रपट अत्यंत साधारण दर्जाचा झाला आहे. सध्या या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी जो गाजावाजा त्याचे प्रवर्तक करत आहेत, तो थांबल्यानंतर तो लवकरच विस्मृतीतदेखील जाणार आहे.

शिव कल्याणकारी आहे. समुद्रमंथनातून अमृतासोबत हलाहलदेखील निघाले. तेव्हा शिवाने सृष्टीच्या कल्याणासाठी हलाहल प्राशन केले आणि ते आपल्या कंठात साठवून ठेवले. त्यामुळे त्याच्या संयमात आणि योगसाधनेत कोणतीही बाधा निर्माण झाली नाही. म्हणूनदेखील तो नीलकंठ हिंदूंचा सर्वांत प्रिय देव आहे.

काश्मिरी शैव संप्रदाय अद्वैतवादी आहे. निराकार परमेश्वर म्हणजे शिव सृष्टीतून प्रकट होतो आणि प्रत्येक व्यक्तीने स्वतःमधील देवत्वाशी नाते जोडले पाहिजे, हा काश्मिरी शैव दर्शनाचा पाया आहे. परंतु दिग्दर्शकाने मात्र पुष्कर नाथ या पात्राच्या माध्यमातून या दर्शनाचे विकृतीकरण केले आहे. पुढे पुष्कर नाथ हे पात्र मानसिक तणावामुळे स्मृतिभ्रंशाने ग्रस्त होते, असे दाखवले आहे.

चित्रपट संपल्यानंतर चित्रपटगृहात पसरलेली स्मशान शांतता पाहून, हा चित्रपट म्हणजे भारतीय समाजातील हिंदू बहुसंख्याकांचा स्मृतिभ्रंश करण्याच्या दिशेने पडलेले आणखी एक पाऊल आहे, हे जाणवले. आपला सांस्कृतिक स्मृतिभ्रंश झाला, तर तो आत्मघाती ठरेल.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

काश्मीरमध्ये चौदाव्या शतकात शेख नुरुद्दीन नूरानी हे मोठे सुफी संत होऊन गेले. त्यांना नंद ऋषी असेही म्हटले जायचे. काश्मिरी हिंदू त्यांना ‘सहजानंद’ असेही म्हणतात. ते काश्मीरचे संरक्षक संत मानले जातात. नुरुद्दीन काश्मीरची एक महान शैव संत लल्लेश्वरी यांना आई मानायचे. ही आहे आपली संस्कृती. शेख नुरुद्दीन यांच्या उदार विचारांच्या प्रभावामुळे मोठ्या प्रमाणात काश्मिरी हिंदूंनी इस्लाम स्वीकारला. परंतु चित्रपटात मुसलमानांनी केवळ तलवारीच्या जोरावर हिंदूंचे धर्मांतर केले, अशी खोटी माहिती दिली आहे. हा इतिहास सर्वश्रुत असताना चित्रपटाच्या दिग्दर्शकाने त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष का केले? असे अनेक प्रश्न हा चित्रपट पाहिल्यानंतर मनात निर्माण व्हायला हवेत आणि ते आपण विचारले पाहिजेत.

‘द काश्मीर फाईल’ हा चित्रपट मुळात एक कलाकृती आहे किंवा नाही, असा प्रश्न निर्माण होतो. कारण तो कलेच्या प्रत्येक मानदंडासमोर अपयशी ठरतो. टॉल्स्टॉय यांनी ‘कला म्हणजे काय?’ या पुस्तकात कलेसंदर्भात मूलगामी विचार मांडले आहेत. ते लिहितात की, कला हे माणसाला माणसाशी जोडणारे एक माध्यम आहे. इतरांनी व्यक्त केलेल्या भावना समजून घेणे आणि त्यांचा अनुभव घेणे, या मानवी क्षमतेवर कलेचे विश्व उभे असते. कला मानवी जीवनाचा विकास आणि कल्याण करते.

..................................................................................................................................................................

हेही पाहा\वाचा : नुपम अंकल, तुम्ही संवेदनाहीन झाला असाल, तर ईश्वर तुमचे भले करो. माझं तुमच्यावरील निखळ प्रेम तसूभरही कमी होणार नाही!

..................................................................................................................................................................

‘कलेसाठी कला’ की ‘जगण्यासाठी कला’ या वादात टॉल्स्टॉय यांचे विचार जगण्यासाठी कलेचे पक्षधर वाटू शकतात. परंतु त्यांचेच एक समकालीन रोमाँ रोलाँ जे या वादात कधी पडले नाहीत. त्यांच्या मते नैतिक मूल्यांशी संबंध नसला तरी खरी कला मनुष्याला उन्नत करते. ‘द काश्मीर फाईल्स’ हा एक विध्वंसक चित्रपट आहे. तो माणसामाणसांमध्ये दुरावा निर्माण करतो.

असे चित्रपट भविष्यातदेखील येत राहतील. कलेद्वारे मनुष्य भावनांची अभिव्यक्ती करतो. परंतु टागोर म्हणतात, त्याप्रमाणे भावनेला तर्क, बुद्धी आणि नैतिकतेचीदेखील जोड मिळायला हवी. तेव्हाच आपली दृष्टी व्यापक होते. अशा व्यापक दृष्टीने आपण कोणत्याही कलाकृतीकडे पाहायला हवे.

.................................................................................................................................................................

लेखक डॉ. श्याम पाखरे मुंबई येथील किशीनचंद चेल्लराम महाविद्यालयात इतिहासाचे प्राध्यापक आहेत.

shyam.pakhare111@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......