‘फाजल’ सुलभाताई!
ग्रंथनामा - आगामी
प्रवीण बर्दापूरकर
  • ज्येष्ठ संगीत समीक्षक सुलभा पंडित आणि ‘सुरावरी हा जीव तरंगे’ या त्यांच्याविषयीच्या कॉफी टेबलबुकचं मुखपृष्ठ
  • Sat , 26 March 2022
  • ग्रंथनामा आगामी सुलभा पंडित Sulbha Pandit संगीत Music सुरावरी हा जीव तरंगे Suravari Ha Jeev Tarange

ज्येष्ठ संगीत समीक्षक सुलभा पंडित मूळच्या सोलापूरच्या. त्यांचं शिक्षण औरंगाबादला झालं आणि विवाहोत्तर वास्तव्य विदर्भात. सुलभाताईंच्या निधनाला नुकतंच एक वर्ष पूर्ण झालं. त्यानिमित्तानं सुलभाताईंनी संगीतविषयक लिहिलेले काही लेख, परीक्षणं आणि व्यक्तिचित्राचं ‘सुरावरी हा जीव तरंगे’ हे कॉफी टेबलबुक त्यांच्या कुटुंबियांच्या वतीनं प्रकाशित होत आहे. या पुस्तकासाठी लिहिलेला हा लेख...

..................................................................................................................................................................

सुलभा पंडित यांना मी ‘सुलभाताई’ म्हणून संबोधत असे.

सुलभाताईंशी असलेला परिचय सुरुवातीची अनेक वर्षं औपचारिकच होता. ‘सप्तक’ या संस्थेच्या संगीतविषयक विविध कार्यक्रमांनी नागपूरवर गारुड केलेले ते दिवस होते. संगीतातले आंतरराष्ट्रीय स्तरावरचे अनेक दिग्गज ‘सप्तक’च्या व्यासपीठावर त्या काळात हजेरी लावून गेले. कार्यक्रमांना साहजिकच तुडूंब गर्दी असे. तो काळच असा होता की, सप्तकचं सदस्यत्व फार प्रतिष्ठेचं समजलं जाई. सप्तकच्या कार्यक्रमाला हजेरी लावणं ‘स्टेटस सिंबॉल’ झालेलं होतं. सदस्यत्व मिळवण्यासाठी लोक गर्दी करत, रांगा लावत असत.

माझ्यावर मात्र सप्तकचा काय व्यक्तिगत लोभ होता माहिती नाही. विलास मानेकर किंवा विकास लिमये या दोघांपैकी कुणीतरी कार्यक्रमाचे पासेस माझ्याकडे निगुतीनं पोहोचते करत. अनायसे पासेस आहेत आणि काहीतरी चांगलं ऐकायला मिळतं आहे, म्हणून मग मी आणि माझी बेगम- मंगलानं, सप्तकच्या कार्यक्रमात सहभागी होणं सुरू केलं. कुठल्या तरी एका कार्यक्रमात सुलभा पंडित यांची ओळख झाली. तेव्हा बहुधा दैनिक ‘तरुण भारत’मध्ये त्यांचा संगीतविषयक स्तंभ सुरू होता. तो मजकूर वाचताना त्याचं नाव रजिस्टर झालेलं होतं. सुलभा पंडित यांच्याशी पुढे कधीतरी आपण प्रदीर्घ काळ काम करणार आहोत, याचे पुसटसेही संकेत आम्हा दोघांनाही, तेव्हा पहिल्या भेटीत मिळालेले नव्हते.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

मध्यम उंची, किंचित स्थूल शरीरयष्टी, केसांची एक वेणी घातलेली, चेहऱ्यावर कायम गांभीर्य, किंचित काजळ घातलेले टपोरे काळेशार डोळे आणि अत्यंत शालीनपणे नेसलेली साडी, असं सुलभा पंडित यांचं व्यक्तिमत्त्व होतं. त्या फार लोकांत मिसळत होत्या, असंही दिसत नसे, पण परिचितांशी हसतमुखानं संवाद साधण्याची त्यांची शैली लक्षात आलेली होती. त्यांचा आवाज किंचित किनरा होता. मध्यम पट्टीत त्या बोलत. एक छानशी रसाळ लय त्यांच्या बोलण्याला होती. शांतपणे बसून आणि चेहऱ्यावर गांभीर्य पांघरून त्या कार्यक्रमाचा आस्वाद घेत असत. संगीतातली त्यांची डोहखोल जाणकारी त्यांच्या साप्ताहिक सदरात उमटत असे. संगीताचं किमान सखोलही ज्ञान नसल्यानं, अशा सर्वच ज्ञानी माणसांपासून दूरच राहण्याचा शिरस्ता मी तेव्हा पाळलेला होता. मात्र समोरासमोर आलो तर ‘नमस्कार’ किंवा ‘काय, कसं?’ अशा शब्दांची देवाणघेवाण न चुकता होत असे. हा सिलसिला आणखी काही वर्षं असाच सुरू राहिला.

‘लोकसत्ता’ची विदर्भ आवृत्ती नागपुरातून प्रकाशित होणं सुरू झालं. तत्कालीन निवासी संपादक सुरेश द्वादशीवार यांच्या आग्रहानंतर सुलभा पंडित ‘लोकसत्ता’साठी संगीतविषयक लेखन करू लागल्या आणि आमच्यातला संपर्क वाढला. ‘लोकसत्ता’चा तेव्हा मी मुख्य वार्ताहर होतो. कुठल्याही कार्यक्रमाच्या प्रवेशिका मुख्य वार्ताहर म्हणून माझ्याकडे येत असत. संगीत-समीक्षक, स्तंभलेखिका म्हणून प्रवेशिका सुलभा पंडित यांच्याकडे पाठवण्याची जबाबदारी अर्थातच माझ्याकडे आली. मग त्या निमित्तानं प्रवेशिका मिळाल्या आहेत किंवा नाही, छायाचित्रकार आणि मजकुराचं नियोजन अशा विषयांवर आमच्यात नियमित संपर्क सुरू झाला.

एखाद्या कार्यक्रमात भेट झाल्यावर थोडासा निवांतपणा असेल तर गप्पाही होऊ लागल्या.  त्या गप्पातून सुलभा पंडित संथ लयीत उलगडत गेल्या. पंडित हे त्यांचं लग्नानंतरचं आडनाव. मूळच्या त्या देवधर आणि हे कुटुंबीय सोलापूरचं. तेव्हाच्या मराठवाडा विद्यापीठातून सुलभा देवधर यांनी संगीत हा विषय घेऊन बी.ए. आणि विवाहानंतर नागपूर विद्यापीठातून एम.ए. केलेलं. आमचा हा परिचय वाढत होता, तेव्हा संगीतात पीएच.डी.साठी पुढचं संशोधन त्या करत होत्या. याच अशा गप्पातून कधीतरी लक्षात आलं की, सुलभा पंडित माझ्यापेक्षा वयानं सहा-सात वर्षांनी मोठ्या आहेत... आणि मी त्यांना ‘सुलभाताई’ म्हणू लागलो.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

सुलभाताईंचा स्वभाव अतिशय मृदू. त्यांनी आवाज चढवून कधी कुणाशी संवाद साधला आहे, असं कधीच अनुभवायला मिळालं नाही, किंबहुना बोलण्याबाबत वरची पट्टी सुलभाताईंना कधी मानवलीच नसावी, असं त्यांचं व्यक्तिमत्त्व होतं. पदवी, पदव्युत्तर आणि पुढचं संशोधनही संगीतात केल्यानं, जो काही ज्ञानताठा अशा तज्ज्ञांमध्ये दिसतो, तोही कधी सुलभाताईंमध्ये जाणवला नाही.

‘अमुक करा’ किंवा ‘करू यात का,’ अशा आग्रही स्वरातसुद्धा सुलभाताई कोणतीच सूचना करत नसत; आदेश देणं तर त्यांच्या व्यक्तिमत्त्वातच नव्हतं. ‘मला काय वाटतं’, या तीन आर्जवी शब्दांनी बोलायला सुरुवात केली की, सुलभाताईंना काहीतरी मुद्दा किंवा विषय सुचवायचा आहे, हे पुढे माझ्या अंगवळणी पडलं.

‘लोकसत्ता’च्या नागपूर आवृत्तीत मुंबईप्रमाणेच कोणतंही सदर एक वर्षच सुरू ठेवायचं, असा पायंडा संपादक म्हणून मी रूढ केला; त्याला अपवाद सुलभा पंडित आणि वसंत वाहोकर यांचा आहे. मी आधी निवासी संपादक आणि मग संपादक असतानाच्या काळात सुलभा पंडित यांनी तब्बल साडेअकरा वर्षं ‘लोकसत्ता’साठी स्तंभलेखन केलं. ‘लोकसत्ता’च्या सर्व आवृत्त्यातही एखाद्या स्तंभलेखकांनं इतकं दीर्घकाळ नियमित लेखन केल्याचं, हे एकमेव उदाहरण असावं  . 

सुबोध लेखनशैली हे सुलभाताईंचं प्रमख वैशिष्ट्य. संगीतासोबतच मराठी आणि इंग्रजी साहित्यातही त्यांना केवळ रुचीच नव्हती, तर चांगली जाणकारी होती. मराठी साहित्यातले  संत, अभिजात, विद्रोही हे मराठी साहित्यातले प्रवाह त्यांना चांगले ठाऊक होते. भारतीय लोकसंगीताबद्दल त्यांना असणारी माहिती थक्क करणारी होती. त्यातच संगीताची मूलभूत जाण असल्यानं सुलभाताईंच्या लेखनाला वजन आपसूक प्राप्त होत असे. त्यांच्या भाषेला एक डौलही असे. एकदा त्यांची कॉपी वाचायला सुरुवात केल्यावर पूर्ण वाचल्याशिवाय खाली ठेवली जात नसे. एक नितळ प्रवाहीपण त्यांच्या लेखनाला होतं. अक्षर उजव्या बाजूला किंचित झुकलेलं, पण अतिशय सुवाच्य. व्याकरणाची चूक सुलभाताईंच्या लेखनात फार क्वचित फारच क्वचित सापडत असे, अशी त्यांची भाषेवरची पकड जबर होती.

घाईत असलो तर अनेकदा सुलभाताईंचा मजकूर मी थेट अक्षरजुळणीसाठी सोडून देत असे आणि सवड मिळाल्यावर प्रूफावर एखादी नजर टाकत असे. या विदग्ध लेखनशैलीमुळेच ‘नागपूरच्या संगीतविषयक जगताच्या राजदूत’ म्हणून सुलभाताईंना एकमतानं मूकसंमती मिळाली. जिथे त्यांचा वावर असेल, तिथे त्यांना तशी वागणूक मिळू लागली, तरी सुलभाताई मात्र उतल्या नाहीत की, मातल्या नाहीत. सामाजिक वावरातली एक जन्मजात शालीनताच दर्शवणारा त्यांचा वावर असे. 

..................................................................................................................................................................

उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअ‍ॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...

हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal

................................................................................................................................................................

त्यांच्या माझ्यातला संपर्क एव्हाना सख्यात रूपांतरित झाला होता, तरी तो अकृत्रिम उबदार स्नेह धारण करेल असं काही तेव्हा वाटलं नव्हतं. ‘लोकसत्ता’च्या नागपूर आवृत्तीची सूत्रं मी स्वीकारली, तेव्हा ‘लोकसत्ता’ची परिस्थिती एकूणातच गंभीर होती. दैनिक ‘री-लाँच’ करण्याचा निर्णय व्यवस्थापनानं घेतला होता. तेव्हा नुकतेच संपादक झालेल्या कुमार केतकर यांनी नागपूरची जबाबदारी माझ्यावर टाकलेली होती. ‘री-लाँच’ची जुळवाजुळव सुरू असताना सुलभा पंडित यांचा स्तंभ प्रकाशित होत नसल्याचं लक्षात आलं. चौकशी केली तर त्यांच्या लेखनाचं २० महिन्याचं मानधन थकलेलं होतं. आणि महत्त्वाचं म्हणजे त्या संदर्भात त्यांनी चौकशी केली असता, एका ज्येष्ठ सहकाऱ्याकडून दुरुत्तर करण्यात आल्यामुळे सुलभा पंडित स्वाभाविकपणे दुखावल्या होत्या.

एक दिवस संगीतात दर्दी असलेला सहकारी राम भाकरे याला घेऊन मी थेट सुलभा पंडित यांच्या घरी धडकलो. मला बघितल्यावर सुलभा पंडित चमकल्या खऱ्या, पण ‘लोकसत्ता’च्या संदर्भात सकारात्मक राहावं, अशी मन:स्थिती नसल्याचं त्यांनी त्यांच्या परिचित मृदू शैलीत स्पष्ट सांगितलं. सुरुवातीला गप्पात तो विषय न काढता जुन्या आठवणी काढून त्यांना जरा खुलवलं, नॉस्टॅल्जिक केलं. शेवटी आता आवृत्तीची सूत्रं माझ्याकडे कशी आलेली आहेत, हे सांगून झाल्या प्रकाराबद्दल अतिशय स्पष्ट शब्दांत दिलगिरी व्यक्त केली. आणि सुलभाताईंचा रुसवा मावळला. त्यांनी पुन्हा ‘लोकसत्ता’साठी लिहायचं मान्य केलं.

माणूसमयता जन्मजातच स्वभावात असल्यानं हट्टीपणा करावा, एखादा विषय तुटेल एवढा ताणावा, हे त्यांच्या शालीन वृत्तीत बसणार नाही, याची खात्री मला होती आणि घडलंही अगदी तसंच. ‘लोकसत्ता’ री-लाँचच्या वेळेस कुमार केतकर नागपूरला आले, तेव्हा सर्व स्तंभ लेखकांसोबत त्यांची एक बैठक आयोजित केली होती. त्यात सुलभाताईंची ओळख करून देताना त्या आपल्यावर कशा नाराज होत्या, याचा ओझरता उल्लेख मी केतकरांकडे केला, तेव्हा सुलभाताई पटकन म्हणाल्या, “जाऊ द्या हो, संपला तो विषय आता”. त्यांच्या या बोलण्यातून त्यांच्यातील क्षमाशील वृत्तीचाही परिचय घडला.

बहुसंख्य लोक आपले टिकलीपेक्षाही लहान असणारे मान-अपमान आयुष्यभर जोपासत आणि उगाळत असताना सुलभाताई मात्र मोठा अपमान सहज विसरून आमच्या परिवारात सहभागी झाल्या, हे इथं आवर्जून नोंदवायला हवं .

नंतर सलग साडेअकरा वर्षं सुलभा पंडित यांनी केवळ ‘लोकसत्ता’च्या विदर्भच नाही, तर सर्व आवृत्त्यासाठी लेखन केलं. त्यांच्या नियोजित स्तंभाशिवाय अन्य एखाद्या विषयावर मजकूर मागितला आणि तो कधी वेळेत मिळाला नाही, असं कधी घडलंच नाही. या काळात आम्ही खूपच संपर्कात आलो. आठवड्यात किमान एकदा तरी आमची भेट होत असे. आमची संपादकीय बैठक वगैरे नाही किंवा कुणी व्हिजिटर नाही, याची खातरजमा केल्याशिवाय त्या कार्यालयात येत नसत. अनेकदा त्या पतीसह येत. त्यांच्या भेटीत साहित्य आणि संगीतविषयक मैफलच रंगत असे. अनेक गायक आणि लेखक समान आवडीचे असल्यामुळे आमच्या त्या मैफली कधीच बेसूर झाल्या नाहीत. संगीताच्या क्षेत्रातील दिग्गज असूनही सुलभाताईंचा ‘लोकसत्ता’च्या कार्यालयातील वावर आश्वासक वडीलधाऱ्या सहकाऱ्यासारखा असे.

हळूहळू आम्ही कौटुंबिक पातळीवरही भेटू लागलो. डॉ. सुलभा आणि प्रा. डॉ. प्रमोद पंडित दाम्पत्य अनेकदा वसंतनगरमधील आमच्या छोट्या घरी येत असे. डॉ. प्रमोद फारच माफक बोलत, तो मक्ता सुलभाताईकडेच असे. त्यांच्या येण्यानं आमचं घरही सात्त्विकतेनं उजळून जात असे. सुलभा पंडित यांच्या व्यक्तिमत्त्वाचा तो करिष्मा होता. माझी पत्नी मंगला हिच्याशीही त्यांचा स्वतंत्र संपर्क निर्माण झाला. त्या दोघींत प्रामुख्यानं साहित्यावर गप्पा होत असत. पुढे पुस्तक आणि ध्वनिफितींची देवणाघेवाण, असे उपक्रम आमच्यात सुरू झाले. मंगलाला माझं ‘बेगम’ म्हणणं त्यांना फारच अप्रूपाचं वाटे. या काळात आमच्यात एक अनौपचारिक असा स्नेहबंध बांधला गेला...

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

‘लोकसत्ता’ सोडायचा निर्णय सुलभा पंडित यांना मी सुमारे दोन महिने आधी सांगितला, तेव्हा त्या काही क्षण स्तब्ध झाल्या. ‘तुम्ही गेल्यावर मी ‘लोकसत्ता’साठी लेखन करू शकेल असं वाटत नाही’, असं त्यांनी स्पष्ट केलं. संपादक आणि स्तंभलेखक यांच्यात निर्माण झालेल्या  विश्वासाच्या नात्याचा संदर्भ त्या म्हणण्यामागे होता. नागपूरच्या काही कलावंतांनी सादर केलेल्या एका सांगीतिक कार्यक्रमाबद्दल एका कथित जाणकारानं सुलभा पंडित यांच्यावर टीका करणारा मजकूर ‘लोकसत्ता’कडे पाठवला होता. प्रत्येकाला एक मत असतं, प्रतिवाद असतो, अशी माझी धारणा असल्यामुळे तो मजकूर प्रकाशित व्हावा आणि त्या जाणकाराचं सुमारपण वाचकांसमोर उघडं पडावं असं मला वाटलं. तो मजकूर मी सुलभा पंडित यांच्याकडे पाठवला आणि त्यावर त्यांचाही प्रतिवाद मागवून घेतला. अतिशय संयत पण सडेतोडपणे सुलभा पंडित यांनी त्या छटाकभर जाणकाराच्या मजकुराचे वाभाडे काढणारा मजकूर पाठवला. खोचक संपादकीय टिपणीसह ते दोन्ही मजकूर प्रकाशित झाले. स्तंभलेखकाच्या पाठीशी संपादक ठामपणे उभा राहातो, हा अनुभव सुलभा पंडितांना बहुधा पहिल्यांदाच आला असावा. त्यामुळे त्या कृतीचं त्यांना फारच कौतुक वाटलं आणि त्यांनी ते अनेकदा बोलूनही दाखवलं.

मी ‘लोकसत्ता’ सोडल्यावर सुलभा पंडित यांनी स्तंभलेखन थांबवलं. मात्र आमच्यातल्या भेटीगाठी होतंच राहिल्या. पुढे मी दिल्लीत पडाव टाकला आणि नंतर औरंगाबादला स्थायिक झालो, तेव्हा आमच्यातल्या भेटी टेलिफोनिकच उरल्या, तरी आमच्यातला परस्पर ऋणानुबंध मुळीच क्षीण झाला नाही. नंतर प्रदीर्घ आजारानं आधी बेगम- मंगला आणि नंतर अचानक सुलभाताई पंडित यांचं निधन झालं. आमच्या स्नेहातला सूरच जणू सुलभाताईंच्या निधनामुळे मौन झाला; शालिनतेचा एक पारदर्शी प्रवाह खंडित झाल्यासारखं झालं.

नागपूरच्या सांगितिक घडामोडींची मर्मज्ञ आणि काहीशी मनोज्ञ वळणाची मनोभावे समीक्षा करणाऱ्या दुसऱ्या सुलभा पंडित यापुढे निर्माण होतील की नाही, याविषयी माझ्या मनात शंका आहे.

उर्दूत ‘फाजल’ नावाचा एक शब्द आहे. फाजल म्हणजे सालस. पत्रकारितेच्या निमित्तानं साडेचार दशकांत वेगवेगळ्या क्षेत्रातील अगणित लोकांशी संपर्क आला, मात्र सुलभा पंडित यांच्यासारखी फाजल व्यक्ती एकच आणि ती म्हणजे सुलभाताईच!

..................................................................................................................................................................

लेखक प्रवीण बर्दापूरकर दै. लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीचे माजी संपादक आहेत.

praveen.bardapurkar@gmail.com

भेट द्या - www.praveenbardapurkar.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

म. फुले-आंबेडकरी साहित्याकडे मी ‘समाज-संस्कृतीचे प्रबोधन’ म्हणून पाहतो. ते समजून घेण्यासाठी ‘फुले-आंबेडकरी वाङ्मयकोश’ उपयुक्त ठरणार आहे, यात शंका नाही

‘आंबेडकरवादी साहित्य’ हे तळागाळातील समाजाचे साहित्य आहे. तळागाळातील समाजाचे साहित्य हे अस्मितेचे साहित्य असते. अस्मिता ही प्रथमतः व्यक्त होत असते ती नावातून. प्रथमतः नावातून त्या समाजाचा ‘स्वाभिमान’ व्यक्त झाला पाहिजे. पण तळागाळातील दलित, शोषित व वंचित समाजाला स्वाभिमान व्यक्त करणारे नावदेखील धारण करता येत नाही. नव्हे, ते करू दिले जात नाही. जगभरातील सामाजिक गुलामगिरीत खितपत पडलेल्या समाजघटकांचा हाच अनुभव आहे.......

माझ्या हृदयात कायमस्वरूपी स्थान मिळवलेला हा सीमारेषाविहिन कवी तुमच्याही हृदयात घरोबा करो. माझ्याइतकंच तुमचंही भावविश्व तो समृद्ध करो

आताचा काळ भारत-पाकिस्तानातल्या अधिकारशाही वृत्तीच्या राज्यकर्त्यांनी डोकं वर काढण्याचा आहे. अशा या काळात, देशोदेशींच्या सीमारेषा पुसून टाकण्याची क्षमता असलेल्या वैश्विक कवितांचा धनी ठरलेल्या फ़ैज़चं चरित्र प्रकाशित व्हावं, ही घटना अनेक अर्थांनी प्रतीकात्मकही आहे. कधी नव्हे ती फ़ैज़सारख्या कवींची या घटकेला खरी गरज आहे, असं भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतल्या विवेकवादी मंडळींना वाटणंही स्वाभाविक आहे.......