एका उत्तम डॉक्टरकडे उत्तम भाषाकौशल्यही असावे. अन्न-वस्त्र-निवारा यानंतर भाषा ही माणसाची मूलभूत गरज आहे. माझा गुरांचा डॉक्टर झालेला बालमित्र एकदा गमतीने म्हणाला होता- “मी तुला तपासतो, तू मला तपास.” त्याच्या या विनोदाची टिंगलटवाळी झाली.
पण इतक्या वर्षांच्या वैद्यकीय पेशातल्या अनुभवानंतर मला कळले की, तो विनोदाचा विषय नव्हता. त्यामागे मोठे तत्त्वचिंतन दडलेले आहे. तो एक अभ्यासाचा विषय होता, आहे. तो विषय म्हणजे वैद्यकीय पेशासाठी चांगली संवादभाषा लागते. ती भाषा अबोल होती, न कळणारी होती, ती भाषा समजून घ्यायची होती, उलगडून पाहायची, वापरून, ताडून पाहायची होती, सतत सुधारण्याची तयारी ठेवण्याची होती, वापरण्यासाठी प्रवृत्त करण्याची आणि सतत शिकण्याची होती.
..................................................................................................................................................................
.................................................................................................................................................................
पशुवैद्यक पेशातले डॉक्टर आणि मानवी रुग्णांची संवाद भाषा न कळणारे माणसांचे डॉक्टर यांची परिस्थिती सारखीच असते. संवाद भाषेच्या मर्यादेतच त्यांना काम करावे लागते. त्यासाठी दोघांनाही संवादभाषेचं कसब कमवावं लागतं.
यातले निष्णात अभ्यासक देहबोलीची भाषा, नजरेची भाषा, स्पर्शाची भाषा, यांच्या निरीक्षणाच्या जोरावर काही अंदाज बांधतात आणि जास्त यशस्वी होतात. आज तर वैद्यकीय पेशात संवादभाषा वापरण्याचे संदर्भ अनेक अर्थांनी विस्तारले आहेत, विविध कारणांनी काहीसे गुंतागुंतीचेही झाले आहेत.
प्राचीन काळी दळणवळणाची साधने नव्हती, तेव्हा घरातल्या आजीबाईचा बटवा आणि गावातच वैद्यकी करणारा वैद्य यामुळे भाषेची अडचण येत नव्हती. नंतरच्या काळात दळणवळणाची साधने वाढली, वैद्यकीय पर्यटनही सुरू झाले. वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी पदवी स्तरावर १५ टक्के आणि पदव्युत्तर स्तरावर ५० टक्के परप्रांतीय अर्थात परभाषिक विद्यार्थी येऊ लागले. आसामपासून तामिळनाडू, गुजरात, बंगाल, काश्मीर, ओरिसापर्यंतचे विद्यार्थी इथे येतात. ते तपासत असलेल्या स्थानिक रुग्णांची संवादभाषा या नव्या पिढीच्या डॉक्टरांच्या आकलनापलीकडची असते. अगदी मराठी भाषा येणाऱ्यांचा जरी विचार केला, तरी मराठवाड्यातली बोलीभाषा, खान्देशातली बोलीभाषा, कोकणातील बोलीभाषा, विदर्भातली बोलीभाषा, सदाशिवपेठी मराठी, कोल्हापुरी मराठी, आदिवासी भागातील मराठी, बोलीभाषेत वैद्यकीय पेशाशी संबंधित वापरण्यात येणारे अनेक शब्द, भाषाशास्त्राच्या अभ्यासकांनाही माहिती नसण्याची शक्यता असते, अशी परिस्थिती आहे.
आपल्याकडे मराठी माध्यमांमध्ये शिक्षण देणाऱ्या शाळांची संख्या घसरली आहे. इंग्रजी माध्यमाच्या शाळांची संख्या प्रचंड वाढलेली आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी भाषेचे गुण विचारात घेतले जात नाहीत. त्यामुळे सुरुवातीपासूनच मातृभाषा असूनसुद्धा मराठी शिकण्याकडे हुशार विद्यार्थ्यांचे दुर्लक्ष होते.
..................................................................................................................................................................
अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5312/Checkmate
..................................................................................................................................................................
या साऱ्याचा परिणाम वैद्यकीय पेशावर होतो, आजच्या तंत्रज्ञान-प्रगत जगात वैद्यकीय संशोधनाचा वेग फार गतिमान आहे. वैद्यकीय पेशातील लोकांना या संशोधनांशी सुसंगत बदलांना सामोरे जाण्यासाठी सतत प्रयत्नशील राहावे लागते. रुग्णसेवेचे मापदंड बदलत आहेत. विविध तपासण्या करण्याचे तंत्रज्ञान विकसित झाले आहे.
पुराव्यावर आधारित चिकित्सा निदान आणि उपचार पद्धती (इव्हिडंस बेस्ड डायग्नोसिस, ट्रीटमेंट), हा परवलीचा शब्द आहे. या सर्वांमध्ये रुग्ण एखादी वस्तू नव्हे तर शरीराबरोबरच मन, भावना, अपेक्षा, उपेक्षा यांच्यासहित वावरणारा माणूस आहे, याचीही दक्षता वैद्यकीय पेशातल्या लोकांना घ्यावी लागते.
वैद्यकीय पेशा हे फक्त शास्त्र नव्हे, त्यात कलाही आहे. आणि ही कला भाषासंवाद कौशल्य, आत्मीयता, जिव्हाळा, अभिनयकौशल्य, समंजसपणा, प्रगल्भता, समयसूचकता, अशा अनेकविध पैलूंची रोज परीक्षा घेत असते. म्हणूनच त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या संवादभाषेचा विचार महत्त्वाचा ठरतो.
रुग्ण-डॉक्टर संबंध आणि डॉक्टर-समाज संबंध कमालीचे तणाव-ग्रस्त झाले आहेत आणि परस्पर अविश्वासाच्या ढगांआड झाकोळून गेले आहेत. संवादातील भाषेचा अयोग्य वा अपुरा वापर, भाषा समजून घेण्यात असणारे उणेपण, भाषा न कळल्यामुळे होणारे अपसमज, यांच्याशी निगडित प्रश्न आहेत. संवादभाषेचा भक्कम पूल उभारल्याशिवाय हा प्रवास सुखकर होऊ शकत नाही.
डॉक्टर-रुग्ण परस्पर विश्वास हा वैद्यकीय पेशाचा आत्मा आहे. आणि तो टिकवून ठेवणे, ही दोन्ही घटकांची जबाबदारी आहे. त्यासाठी संवादभाषेचा डोळस अभ्यास आणि वापर आवश्यक आहे. थोडक्यात बहुभाषिक समाजाची आवश्यकता, ही काळाची गरज बनली आहे.
सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, यांसारख्या किंवा धुळे-जळगाव यांसारख्या इतर राज्यांच्या सीमेवरील जिल्ह्यांत आणि मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद यांसारख्या मोठ्या शहरांत अनेक परभाषिक लोक राहतात. त्यांच्यावर उपचार करणार्या डॉक्टरांना या सगळ्या भाषांचे किमान ज्ञान असणे, ही रास्त अपेक्षा आहे.
उपचार करणारे डॉक्टर्स, वैद्यकीय कर्मचारी, परिचारिका औषधनिर्माते वगैरेंना त्यांच्या त्यांच्या कामाशी निगडित संवादभाषेतल्या नेहमीच्या शब्दांची ओळख, त्यांचा योग्य वापर, त्यांच्या चुकीच्या वापराने येणाऱ्या समस्या, याविषयीची माहिती असणे आवश्यक आहे.
अलीकडे प्रत्येक मोठ्या रुग्णालयात सामाजिक मार्गदर्शक असतात, पण त्यांच्या कामाचे स्वरूप उपचाराशी संबंधित सोयी-सुविधांची माहिती देणे आणि उपचार साखळीतल्या सर्वांशी समन्वय करून देणे इतपतच मर्यादित असते. त्यांनाही बहुभाषिक संवादकला आणि मराठीवर प्रभुत्व मिळवण्यासाठी तयार करण्याची गरज आहे.
रुग्णाच्या उपचारांची सुरुवात डॉक्टरांनी आजारांच्या लक्षणांविषयी रुग्णाशी, त्याच्या नातेवाईकांशी होणाऱ्या भाषासंवादाने होते. आणि उपचार घेऊन परत जाताना औषधे कशी घ्यावी, फेरतपासणीला कधी यावे, आहार कसा असावा, या भाषासंवादाने शेवट होतो. सांगण्याचा हेतू हा की, उपचार सेवेच्या प्रत्येक पातळीवर भाषा संवादाचे महत्त्व आहे.
..................................................................................................................................................................
उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...
हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal
................................................................................................................................................................
गंभीर आजारात, रुग्ण मरणासन्न अवस्थेत असताना, रुग्ण अतिदक्षता विभागात असताना, वाईट बातमी रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकांना कशा पद्धतीने सांगायची, याचे पुस्तकी धडे नसतात. अभ्यासातून, अनुभवातून (कधी चुकतमाकतसुद्धा) आणि आपल्या वरिष्ठांकडून डॉक्टर लोक शिकत जातात. अशा वेळी वापरायची संवादभाषा, तिचा लहेजा, उच्चारांची पद्धत, समोरच्या माणसाला संभाषण नीट कळले आहे की नाही, याची खातरजमा करणे, अशा अनेक बाबी असतात. वैद्यकीय ज्ञानाबरोबरच अशा वेळी निष्णात डॉक्टरांच्या भाषाकौशल्याच्या वापराचा कस लागतो.
नेमक्या शब्दांचे शब्दभांडार त्यांच्यासाठी उपलब्ध करून देणे हीदेखील काळाची गरज आहे. भाषेच्या वापरातील अरे-तुरे, अगं-जागं अशा एकेरी शब्दांचा वापर काही बोलीभाषांमध्ये नैसर्गिक असतो. म्हणजे ‘ए म्हाताऱ्या’ हा शब्द आपल्या आजोबाच्या वयाच्या माणसांसाठी कुठे नैसर्गिक असेल, कुठे उद्धट, याची जाणीव करून देण्यासाठीसुद्धा अशा शिक्षकांची आवश्यकता आहे.
रुग्णालयात उपचार साखळीमध्ये वेगवेगळ्या पातळ्यांवरून काम चालू असते. म्हणजे सकाळी खोली साफ करणारा, लघवी-संडासला मदत करणारा, रुग्णाची शारीरिक स्वच्छता करणाऱ्या- सलाईन लावणाऱ्या- इंजेक्शन\औषधे देणाऱ्या परिचारिका, आहार ठरवणारे आहारतज्ज्ञ, सतत उपस्थित असणारे निवासी डॉक्टर्स आणि उपचारांशी निगडित असलेले वेगवेगळे विषयाचे तज्ज्ञ डॉक्टर्स आणि त्यांची सांगड घालणारे मुख्य डॉक्टर, अशी मोठी साखळी काम करत असते. शिवाय उपचाराशी निगडित नसलेले, पण रुग्णालयाच्या लेखाविभागाशी संबंधित कर्मचारी, अशा सगळ्यांनाच संवाद समन्वयाची गरज असते. आणि हा संवाद समन्वय पुन्हा भाषेच्या वापराशीच निगडित आहे.
हे सगळे इतके तपशीलवार सांगण्याचे कारण एवढेच की, वैद्यकीय पेशात भाषासंवाद किती महत्त्वाचा आहे, याची कल्पना यावी. बालरोग तज्ज्ञ, स्त्रीरोग तज्ज्ञ, मानसोपचार तज्ज्ञ आणि सर्व अतिविशेष उपचार तज्ज्ञ यांना तर भाषेच्या तपशीलवार ज्ञानाची गरज असते.
वैद्यकीय पेशात अजून एक अनुभव येतो. एकच शब्द वेगवेगळ्या लक्षणांसाठी वापरला जातो, हेही उपचार करणाऱ्या डॉक्टरांना लक्षात घ्यावे लागते. ‘दम लागतोय’ म्हणणाऱ्यांना श्वसनाची धाप असू शकते, ‘पोट गच्च झालंय’ असे सांगायचे असते किंवा ‘अशक्तपणा जाणवतो’, हे सांगायचे असते. ‘चक्कर येतेय’ या शब्दाचेही नेमके वर्णन ऐकल्यावर वेगवेगळ्या आजारांची लक्षणे एकाच शब्दात सांगण्याचा प्रयत्न होतो, हे लक्षात येते आणि ते ओळखायचे कसबही सरावाने साध्य होते, हे लक्षात घेतले पाहिजे.
वैद्यकीय पेशाचा अशा बारिकसारिक पद्धतीने भाषेशी संबंध येतो. वैद्यकीय पेशाशी संबंधित संवादभाषा शिकवताना भाषातज्ज्ञांना या सगळ्या गोष्टी शिकवणे गरजेचे आहे. एकट्या महाराष्ट्राचा विचार केला तर आपल्याकडच्या वैद्यकीय महाविद्यालयात ७,००० वैद्यकीय विद्यार्थी आणि २४०० पदव्युत्तर वैद्यकीय विद्यार्थी शिक्षण घेत असतात. त्यांना सुरुवातीपासूनच संभाषण कौशल्यासाठी संवादभाषेचा वापर शिकवणे गरजेचे आहे. यात रोजगाराच्या संधीही आहेत –
१) वैद्यकीय विद्यार्थ्यांना रुग्णांशी संवाद करण्यासाठी आवश्यक मराठी भाषेचे ज्ञान देण्यासाठी मुद्रित, दृकश्राव्य, व्याख्यानांद्वारे प्रशिक्षणासाठी अभ्यासक्रम तयार करणे. त्यांचा वापर करण्यासाठी मराठी भाषा प्रशिक्षक तयार करणे.
२) परभाषिक वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या मातृभाषेत किंवा इंग्रजीत संवाद साधून त्यांच्या भाषाविषयक अडचणी सोडवण्यासाठी किंवा द्वैभाषिक वा बहुभाषिक भाषा-प्रशिक्षक तयार करणे. अशा प्रशिक्षणाद्वारे या विद्यार्थ्यांचा भाषेचा वापर सक्षम बनवणे.
३) ज्यांची मातृभाषा मराठी आहे, परंतु ज्यांचे प्राथमिक शिक्षण इंग्रजी किंवा इतर माध्यमात झाले आहे, त्यांना वैद्यकीय पेशाशी निगडित मराठी भाषा शिकवणे.
४) मोठ्या रुग्णालयांमध्ये संवादातील भाषाविषयक अडचणी सोडवण्यासाठी पूर्णवेळ भाषासंवादकासारखे पद निर्माण करून त्या पदासाठी अभ्यासक्रम बनवणे.
५) तज्ज्ञ भाषासंवादकांचा वापर, भाषा वापरातील चुकांमुळे रुग्णांचे नातेवाईक, रुग्णालयातील कर्मचारी यांच्यात होणारे वादविवाद सोडवणे.
६) तज्ज्ञ डॉक्टरांना रुग्णांशी संवाद करताना प्रत्यक्ष भाषा संवादक म्हणून मदत करणे.
७) आरोग्यसेवेच्या ज्या छोट्या आस्थापना असतात, तिथल्या लोकांसाठी ठराविक कालावधीसाठी निरंतर शिक्षण योजनेद्वारे भाषासंवाद कौशल्ये शिकवणे गरजेचे आहे.
८) डिजिटल माध्यमांचा वापर करून दुर्गम भागातल्या रुग्णसेवेशी संबंधित सर्वांना संवादभाषेच्या वापराचे प्रशिक्षण देणे, त्यासाठी अभ्यासक्रम तयार करणे.
९) नेहमीचे डॉक्टर, तज्ज्ञ डॉक्टर, अतिविशेष तज्ज्ञ डॉक्टर यांना प्रत्यक्ष काम करताना भाषाविषयक शंकानिरसन करून घ्यायचे असेल तर, त्यांना डिजिटल माध्यमांमार्फत किंवा २४ तासाच्या हेल्पलाइन नंबरमार्फत सुविधा पुरवण्यासाठी यंत्रणा उभारणे.
१०) पर्यटनासाठी लोक आता सर्वत्र फिरतात. त्यांना आजाराविषयीच्या तक्रारी सांगण्यासाठी, उपचार घेण्यासाठी त्या त्या भाषेतल्या शब्दांची ओळख करून देणाऱ्या पुस्तिका बनवणेही गरजेचे आहे.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
थोडक्यात वैद्यकीय पेशासाठी बहुभाषा-तज्ज्ञ निर्माण करणे, ही आता काळाची गरज आहे. या दिशेने काही ठिकाणी कामाला सुरुवातही झाली आहे. महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ, नाशिक यांनी एमबीबीएस प्रथम वर्षाच्या सुरुवातीला भाषासंवाद कौशल्य हा विषय शिकवायला प्रारंभ केला आहे.
बाळशास्त्री जांभेकर, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. एपीजे अब्दुल कलाम, पी. व्ही. नरसिंहराव अशी अनेक भारतीय भाषांवर, शिवाय काही परदेशी भाषांवरील प्रभुत्व असलेली विद्वान मंडळी ‘वैद्यकीय पेशासाठी भाषेचा वापर’ या विषयावर काम करणाऱ्यांसाठी आदर्श आहेत.
त्यांच्याइतके नाही तरी किमान चार-पाच भाषांवर प्रभुत्व मिळवणारी नवी पिढी भाषांचा वापर करून वैद्यकीय पेशाला नव्या उंचीवर नेऊ शकेल, याची खात्री वाटते. स्वास्थ्यासाठी संवाद आवश्यक आहे आणि संवादासाठी भाषाकौशल्य हवेच.
.................................................................................................................................................................
डॉ.श्रीकांत कामतकर
drkamatkar@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment