‘दीनमित्र’च्या समाजाला ‘प्रबुद्ध’ करण्याची पात्रता बाळगून असलेल्या कर्तबगार संपादकाची महाराष्ट्राने घोर उपेक्षा केली, हे कटुसत्य आहे!
ग्रंथनामा - झलक
नागनाथ कोत्तापल्ले
  • ‘विचारकिरण’च्या खंड १ ते १०ची मुखपृष्ठं
  • Tue , 22 March 2022
  • ग्रंथनामा झलक विचारकिरण Vicharkiran मुकुंदराव पाटील Mukundrao Patil दीनमित्र Deenmitra नागनाथ कोत्तापल्ले Nagnath Kottapalle

संपादक मुकुंदराव पाटील यांनी ‘दीनमित्र’ हे साप्ताहिक तरवडीसारख्या (ता. नेवासा, जिल्हा - अहमदनगर) ग्रामीण भागातून ५७ वर्षे एकहाती चालवले. त्यांच्या समग्र अग्रलेखांचे ‘विचारकिरण’ या नावाने खंड १ ते १० नुकतेच सायन पब्लिकेशनतर्फे प्रकाशित करण्यात आले आहेत. या खंडांना ज्येष्ठ समीक्षक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी ९० पानी विस्तृत प्रस्तावना लिहिली आहे. खंड १मध्ये समाविष्ट असलेल्या या प्रस्तावनेचा हा संपादित अंश...

..................................................................................................................................................................      

१.

श्रेष्ठ दर्जाचा ललितलेखक उत्तम दर्जाचा सुजाण पत्रकार असेलच असे काही सांगता येत नाही, परंतु मुकुंदराव पाटील मात्र याला अपवाद आहेत. ते मराठीतील एक प्रयोगशील ललितलेखक जसे आहेत, त्याप्रमाणेच एक निष्ठावान ध्येयवादी पत्रकारही आहेत. अर्थात ललितलेखन असो की पत्रकारिता असो, त्यांच्या प्रेरणा सारख्याच आहेत. भारतातील वंचित समूहांच्या जाणिवा समृद्ध करणे, त्यांच्याभोवती उभारलेले धर्माचे गारूड दूर करणे व त्यांची शोषणातून सुटका करणे या त्या प्रेरणा होत. या प्रेरणांनी भारलेले त्यांचे ललितलेखन जसे आहे, त्याप्रमाणेच त्यांची पत्रकारिताही आहे. अशी पत्रकारिता त्यांनी आयुष्यभर केली.

‘दीनमित्र’ हे साप्ताहिक तरवडीसारख्या (ता. नेवासा, जिल्हा - अहमदनगर) ग्रामीण भागातून त्यांनी ५७ वर्षे एकहाती चालवले. ११० वर्षांपूर्वी ग्रामीण भागातून अर्धशतकापेक्षा अधिक काळ एखादे साप्ताहिक चालवणे किती कष्टप्रद असेल, याची कल्पनाच केलेली बरी. कुठल्याही सोयी तर नाहीतच, पण ज्यांच्यासाठी वृत्तपत्र काढायचे ते सगळे विद्याविहीन, अज्ञानी आणि दरिद्री. त्यामुळे आर्थिक पाठिंबा त्यांच्याकडून कुठला मिळणार? कुठून तरी पैसा गोळा करायचा, पदरचे पैसे टाकायचे आणि अंक काढायचे असे त्यांना करावे लागलेले असणार. परंतु हे सर्व कष्ट सहन करून त्यांनी ‘दीनमित्र’ हे साप्ताहिक चालवले. त्याचे कारण त्यांची ध्येयवादी वृत्ती आणि बहुजनांच्या उद्धाराबद्दल असलेली आत्यंतिक आस्था हेच होय. या आस्थेपोटीच त्यांनी ग्रामीण भागात राहणे पसंत केले असणार.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

ग्रामीणांच्या, बहुजनांच्या, शेतकर्‍यांच्या आणि वंचितांच्या व्यथा मांडायच्या असतील, तर त्यांच्यातच राहिले पाहिजे, असा विचारही त्यांच्या मनात असू शकतो. कारण मुकुंदराव पाटील सोयीच्या दृष्टीने शहरी भागात जावेत, त्यांचे कष्ट कमी व्हावेत म्हणून छ. शाहू महाराजांनी त्यांना मदत देऊ केली होती. छ. शाहू महाराजांनी सत्यशोधकांच्या आणि ब्राह्मणेतर पक्षाच्या अनेक नियतकालिकांना मदत केलेली होती. त्याप्रमाणे त्यांनी मुकुंदराव पाटील यांनाही साह्य करण्याची तयारी दर्शवली होती. अनेक नियतकालिकांनी त्यांची मदत स्वीकारली, परंतु मुकुंदराव पाटील यांनी मात्र ती विनम्रपणे नाकारली. ग्रामीण भागातच राहणे त्यांनी पसंत केले. अशी मदत घेतली तर काहीशी उपकृततेची भावना मनात येतेच, असा विचार त्यांनी केला असणार. निर्भीड पत्रकारिता करायची असेल तर अशी कुठलीही भावना संपादकाच्या मनात येता कामा नये, हेही एक सत्य आहे. तत्कालीन नियतकालिकांचे  संपादक आणि मुकुंदराव पाटील यांच्यातील वेगळेपण अधोरेखित करणारी ही घटना होय.

मुकुंदराव पाटील यांचा जन्म १८८५मध्ये झालेला. म्हणजे एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी. याच वर्षी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झालेली होती. सत्यशोधक समाजाची स्थापना होऊन त्याचे कार्य झपाट्याने विस्तारत होते. ‘डेक्कन रॉयटस्’ घडून गेलेले होते आणि शेतकर्‍यांचे प्रश्‍न ऐरणीवर आलेले होते. अशा काळात मुकुंदराव पाटील यांच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण होत होती. अर्थात कुठलेही व्यक्तिमत्त्व सतत घडत जाते, पण त्याचा गाभा साधारणत: विसाव्या वर्षापर्यंतच तयार होतो. कृष्णराव भालेकर आणि गणपतराव पाटील यांचे संस्कार त्यांच्यावर झालेलेच असणार. या सगळ्या संस्कारामधून सिद्ध झालेले व्यक्तिमत्त्व घेऊन मुकुंदराव पाटील कार्य करत राहिले, ते मुख्यत: विसाव्या शतकात. म्हणजे भारतीय स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्यानंतरही.

२.

भारतीय इतिहासामध्ये एकोणिसाव्या शतकाला अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. या शतकामध्ये इंग्रजी सत्ता संपूर्ण भारतभर पसरत गेली. इंग्रज परकीय होते हे उघडच आहे. त्यापूर्वीही आर्य, हूण, कुशाण, मोगल इत्यादी लोक भारतात आले आणि त्यांनी येथे राज्य केले. ते स्थायिकही झाले. इंग्रज मात्र येथे स्थायिक झाले नाहीत. त्यांनी व्यापाराच्या निमित्ताने येथील संपत्ती इंग्लंडला पाठवली हेही खरे आहे. तरीही त्यांच्या येण्याने, त्यांच्या प्रशासन पद्धतीने आपल्या देशात मोठे बदल झाले. त्यांच्यामुळे यंत्रयुगाचा प्रारंभ झाला. त्यामुळेही देशात मोठे बदल झाले. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी सार्वत्रिक शिक्षण सुरू केले. या शिक्षणाचे दूरगामी परिणाम येथे झाले. इंग्लंडमध्ये राणीचे राज्य असले तरी पार्लमेंट आणि लोकशाही होती. तसेच राज्यसत्ता धर्मसत्तेपासून मुक्त झालेली होती. या गोष्टीही भारतीयांना अंतर्मुख करणार्‍या होत्या. म्हणून भारतीय लोकसुद्धा लोकशाहीची मागणी करतील, असे लोकहितवादींनी १८५०च्या आसपासच म्हटलेले होते.

इंग्रजी सत्तेच्या अस्तित्वामुळे येथील जीवन बदलू लागले, असे जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा या भूमीतूनही प्रतिसाद मिळू लागलेला होता, या भूमीत नव्या नव्या चळवळी आकाराला येऊ लागल्या होत्या, असा त्याचा अर्थ होतो. नुसत्या कुणाच्या अस्तित्वाने भूमी किंवा एखादा प्रदेश बदलत नाही. तर त्या प्रदेशातून, भूमीतून नव्या परिवर्तनाचे कोंब फुटावे लागतात. असे परिवर्तनाचे कोंब कोणा देशी राजाच्या काळात उगवून आले नाहीत, तर ते इंग्रज या परकी सत्ताधीशाच्या काळात उगवून आले, ही वस्तुस्थिती आहे. म्हणून एकोणिसावे शतक हे भारतीय इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाचे शतक आहे. या शतकाला नवजागरणाचे, भारतीय प्रबोधनाचे शतक म्हणायला हरकत नाही.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

या नवजागरण पर्वाच्या घडणीचे शिल्पकार म्हणून दोन व्यक्तिमत्त्वांचा निर्देश करावा लागतो. राजा राममोहन रॉय आणि त्यांच्या पाठोपाठ आलेले म. जोतीबा फुले ही ती दोन व्यक्तिमत्त्वे होती. राजा राममोहन रॉय यांच्या  प्रयत्नामुळे सतीबंदीचा कायदा आणि स्त्रियांचे प्रश्‍न चर्चेला येऊ शकले, हे तर त्यांचे महत्त्वाचे कार्य आहेच, पण त्यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना करून धर्म ही गोष्ट सुधारणेची, चिकित्सेची बाब असू शकते, हे दर्शवून दिले. त्याचे परिणाम बंगालवर तर झालेच, पण संपूर्ण भारतभरही झाले. भारतभर अनेक संप्रदाय निर्माण झाले. तसा तर भारतामध्ये प्राचीन काळापासून धर्मविचार सुरूच होता. अनेक पंथ आणि संप्रदाय होते. त्यांचे तत्त्वज्ञान होते, परंतु ते तत्त्वज्ञान प्रामुख्याने पारलौकिक जीवनासंबंधीच असायचे. त्यामुळे लौकिक जीवनाचा, त्यात होणार्‍या शोषणाचा आणि एकूण समाजाचा विचार त्यात क्वचितच असे. आता लौकिक जीवनातील सौख्याला प्राधान्य देऊन धर्माचा विचार सुरू झाला.

राजा राममोहन रॉय यांच्या पाठोपाठ एखाद्या झंझावाताप्रमाणे म. जोतीबा फुले यांचे आगमन झाले आणि एका नव्या जोतिपर्वाचा प्रारंभ झाला. म. फुले यांनी मूलगामी स्वरूपाचे लेखन तर केलेच, पण प्रत्यक्ष कामाचा डोंगरही उभा केला. स्त्रियांसाठी आणि अस्पृश्यांसाठी शाळांची स्थापना, अस्पृश्यांसाठी स्वत:च्या घरची विहीर खुली करणे, अनैतिक संबंधातून अडचणीत आलेल्या स्त्रियांची स्वत:च्या घरी सोय करणे, शेतकर्‍यांमध्ये जागृती करणे, दुष्काळात होरपळणार्‍यांना जगवण्यासाठी प्रयत्न करणे, अशी असंख्य कामे त्यांनी उभी केली. मुख्य म्हणजे बहुजनांच्या मुक्तीसाठी त्यांनी ‘सत्यशोधक समाजा’ची स्थापना केली. त्यासाठी ‘सार्वजनिक सत्यधर्म’ सांगितला आणि त्याचा उदार आचारधर्मही सांगितला. हे सगळे करत असताना त्यांना छळही सहन करावा लागला. त्या काळात ब्राह्मो समाज, प्रार्थना समाज, आर्य समाज असे अनेक समाज निर्माण झाले. तसाच ‘सत्यशोधक समाज’ही निर्माण झाला, असे म्हणता येणार नाही; हा समाज मूलत: वेगळा आहे. वैदिक किंवा सनातन धर्माशी कुठलेही नाते नसलेला आणि लौकिक जगणे अर्थपूर्ण करणारा असा हा ‘सार्वजनिक सत्यधर्म’ आहे.

म. फुले यांच्या कृती-उक्तींमधून एक स्वतंत्र अन्वेषण दृष्टी प्रकट होत गेली. ही अन्वेषण दृष्टी म्हणजे ‘सत्यशोधक’ विचार होय. सत्याला केंद्रस्थान देणारा, बुद्धीच्या निकषांवर प्रत्येक गोष्ट तपासली पाहिजे, असा दृष्टिकोन बाळगणारा हा विचार होय.

म. फुले यांच्या अन्वेषण दृष्टीचे महत्त्व असे की, येथून पुढे जीवनातील अनेक गोष्टींकडे पाहण्याची समाजाची दृष्टी बदलत गेली. जात, स्पृश्यास्पृश्य भेद, धर्म, स्त्री-जीवन, राजकारण आणि सत्तासंबंध, इतिहास, साहित्य आणि  संस्कृती, कृषी आणि शिक्षण अशा जीवनाच्या सर्वच क्षेत्रांत या अन्वेषण दृष्टीच्या आधारे चळवळी सुरू झाल्या.

सत्यशोधक विचार केवळ तात्कालिक विचार राहिला नाही, तर एक सार्वकालिक तत्त्वज्ञान होऊन गेले.

..................................................................................................................................................................

उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअ‍ॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...

हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal

................................................................................................................................................................

पुढे सत्यशोधकी विचाराने प्रभावित झालेले असंख्य कार्यकर्ते महाराष्ट्राच्या विविध भागात जलशांचे कार्यक्रम करू लागले. परमेश्‍वर आणि भक्त यांच्यामध्ये मध्यस्थाची आवश्यकता नाही, धर्म म्हणून अंधश्रद्धा जोपासता कामा नयेत. त्यामुळेच बहुजनांचा नाश झाला, मुलामुलींना शिक्षण दिले पाहिजे, सत्याची उपासना केली पाहिजे, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांच्या उपासनेतून जीवनात सौख्य निर्माण होते, हे आणि अशा प्रकारचा आशय असलेले जलसे सादर केले जात. शिवाय सत्यशोधकी पद्धतीने विवाहही लावले जात. या जलशांच्या निमित्ताने विपुल निर्मिती तर झालीच, पण त्यातून बहुजनांमध्ये नवजागरणही सुरू झाले.

३.

इंग्रजांच्या आगमनानंतर रेल्वे, तारायंत्रे, विद्यापीठे, कारखाने जसे सुरू झाले, तसेच आणखी एक महत्त्वाची गोष्ट घडली. ती म्हणजे छापखाने आले आणि त्यावर पुस्तके तर छापली जाऊ लागलीच, पण वर्तमानपत्रेही छापली जाऊ लागली.

ज्ञानप्रसार, स्वमत प्रतिपादन आणि माहितीचे प्रसारण यासाठी वर्तमानपत्रे निघू लागली. मराठीतील पहिले वृत्तपत्र ‘दर्पण’ होय. येथून पुढे अनेक वर्तमानपत्रे सुरू झाली. त्यातील काही स्वातंत्र्याची मागणी करणारी होती, तर काही धर्माचा प्रचार-प्रसार करणारी होती, परंतु या कुठल्याही वृत्तपत्रात बहुजनांना काचणार्‍या प्रश्‍नांसंबंधी काहीही नसे. एवढेच नाही तर बहुजनांची टिंगलटवाळी करण्याचे धोरणही वृत्तपत्रे अवलंबित असत. अशा परिस्थितीत बहुजनांच्या दु:खाला वाचा फोडणारे, तसेच बहुजनांमध्ये जागृती करणारे एखादे वर्तमानपत्र असावे, असा विचार बळावत गेला. म. फुले यांनी निमित्तपरत्वे ‘सत्सार’ या अनियतकालिकाचे दोन अंक प्रकाशित केले. परंतु नियमित स्वरूपाचे पहिले वृत्तपत्र सुरू करण्याचा मान मात्र म. फुले यांचे अनुयायी कृष्णराव भालेकर यांच्याकडे जातो. कृष्णराव भालेकर यांनी सत्यशोधकी विचारांचा प्रसार-प्रचार करण्यासाठी आणि बहुजनांची दु:खे वेशीवर टांगण्यासाठी १८७७मध्ये ‘दीनबंधू’ हे वृत्तपत्र सुरू केले.

सत्यशोधक विचार हा बहुजनांच्या, शोषितांच्या आणि अस्पृश्यांच्या मुक्तीचा एक सशक्त मार्ग आहे, हे लक्षात आल्यामुळे त्याचा प्रचार, प्रसार विविध मार्गांनी होत राहिला. साहित्य निर्मिती, व्याख्याने, जलसे आणि वृत्तपत्रे, यांमधून हा विचार लोकांपर्यंत जाऊ लागला. त्याचा जनमानसावरती परिणाम होऊ लागला. काही प्रमाणात परिवर्तनाला प्रारंभ झाला.

वृत्तपत्र हे एक प्रभावी माध्यम आहे, हे लक्षात आल्यामुळे सत्यशोधकी वृत्तपत्रे सुरू झाली, परंतु बहुजनांमधील शिक्षणाचे अत्यल्प प्रमाण, अज्ञान आणि दारिद्र्य यांमुळे बहुजनांसाठी म्हणून निघालेल्या नियतकालिकांना फारसा  लोकाश्रय मिळत नव्हता. प्रारंभीचे ‘दीनबंधू’ फारसे चालले नाही. नंतरची नियतकालिकेही फार दीर्घायुषी होती असे म्हणता येत नाही. याला अपवाद बेळगावसारख्या महाराष्ट्राबाहेरून चालवल्या जाणार्‍या ‘राष्ट्रवीर’ आणि तरवडीसारख्या अत्यंत गैरसोयीच्या खेड्यातून सलग ५७ वर्षे चालवले गेलेले मुकुंदराव पाटील यांचे ‘दीनमित्र’ होय.

मुकुंदराव पाटील यांनी त्यांचे दत्तक पिता गणपतराव सखाराम पाटील यांनी सुरू केलेल्या व त्यांच्या निधनामुळे बंद पडलेल्या ‘दीनमित्र’चे १९१०मध्ये पुनरुज्जीवन केले, ते सत्यशोधक विचारांच्या प्रचार-प्रसारासाठी आणि बहुजनांमध्ये परिवर्तन घडावे, या तीव्र इच्छेपोटी. त्यांचा पिंडच मुळी सत्यशोधकाचा होता. शिवाय एखाद्या विचारासाठी  सर्वस्वाचा त्याग करण्याची वृत्तीही त्यांच्याकडे होती.

जेथे जन्म झाला त्या घरात तर म. फुले यांचे निकटचे सहकारी कृष्णराव भालेकरांचे कार्य चालू होते. दत्तक पिता गणपतराव पाटीलही सत्यशोधकी चळवळीतील एक लढाऊ शिलेदार होते. म्हणजे सत्यशोधकी विचार आणि त्यासाठीचा त्याग पाहत पाहतच मुकुंदराव पाटील मोठे होत होते. त्यातूनच भोवतीच्या अज्ञ बहुजनांना जागे करण्याचे, त्यांच्यामध्ये नव्या जाणिवा रुजवण्याचे कंकण मुकुंदराव पाटील यांनी आपल्या हाती बांधले होते, असे म्हणावे लागते.

बहुजनांची जागृती आणि मुक्ती ही मुकुंदराव पाटील यांची प्रमुख प्रेरणा होती आणि त्यासाठी सत्यशोधक अन्वेषण दृष्टी हे प्रबळ साधन होते. ही दृष्टी सर्वदूर पोचावी, यासाठी त्यांनी ‘दीनमित्र’चे पुनरुज्जीवन केले. तेही कसल्याही सुविधा नसणार्‍या ग्रामीण भागातून. कसल्याही सुविधा नसताना अर्धशतकापेक्षा अधिक काळ एकहाती एखादे साप्ताहिक चालवणे, अत्युच्च अशा ध्येयवादाशिवाय शक्य नाही. मात्र त्यांचे संपूर्ण कार्य उपेक्षित राहिले. भारतीय समाजाचे जातिबद्ध स्वरूप पाहता, ही उपेक्षा अनवधानाने नाही, तर जाणीवपूर्वक केली गेलेली असावी, असे म्हणावे लागते.

४.

मुकुंदराव पाटील यांनी ज्या काळात आपल्या कार्याला प्रारंभ केलेला होता, तो संपूर्ण कालखंडच विविध सामाजिक आणि राजकीय चळवळींनी भारावलेला होता. स्वातंत्र्याच्या चळवळींना गती येत होती. अर्थात राष्ट्रीय अधिवेशनातून सामाजिक परिषदेला हद्दपार करण्यात आलेले असले तरी सामाजिक चळवळी सुरू होत्या. म. जोतिबा फुले आणि सत्यशोधक चळवळींनी सामाजिक सुधारणेच्या ज्या दिशा ध्वनित केलेल्या होत्या, त्या दिशांनी महाराष्ट्रामध्ये छत्रपती शाहू महाराज आणि गुजरातमध्ये बडोदानरेश सयाजीराव गायकवाड कार्य करीत होते. १९०६पासून अस्पृश्यांच्या सेवेसाठी कर्मवीर वि. रा. शिंदे यांनी ‘बहिष्कृत हितकारिणी सभे’ची स्थापना केलेली होती. प्रत्यक्ष अस्पृश्यांमध्ये त्यांनी कामही सुरू केलेले होते. कर्मवीर वि. रा. शिंदे हे प्रार्थना समाजात कार्य करत असले तरी अस्पृश्योद्धाराच्या कार्याची प्रेरणा त्यांनी म. फुले यांच्याकडूनच घेतली होती. बंगालमध्ये स्वामी विवेकानंद मिशनरी वृत्तीने कार्य करत होते. एक आध्यात्मिक व्यक्तिमत्त्व अशी त्यांची ओळख असली तरी या देशातील शूद्रातिशूद्रांबद्दल त्यांना कमालीची आस्था होती. त्यामुळे ते कमालीचे व्यथित होत असत. म. वि.रा.शिंदे आणि स्वामी विवेकानंद हे दोघेही मिशनरी वृत्तीने काम करत होते. म्हणजे मिशनरी वृत्तीने काम केल्याशिवाय या देशातील प्रश्‍न सुटणार नाहीत, याबद्दल त्यांची खात्री होती. सत्यशोधक समाजाचे कार्यकर्ते खेडोपाडी फिरून मिशनरी वृत्तीनेच कार्य करत होते. अशा सगळ्या भारलेल्या वातावरणामध्ये मुकुंदराव पाटील यांनी आपल्या कार्याला म्हणजे पत्रकारितेला प्रारंभ केला.

‘दीनमित्र’ हे कुठल्याही पक्षाला किंवा कुठल्याही नेत्याला बांधून घेऊ इच्छित नव्हते. ते स्वतंत्र राहू इच्छित होते, परंतु स्वतंत्र राहणे म्हणजे वारा येईल तशी पाठ फिरवणे नव्हे. म्हणून मुकुंदराव पाटील सत्यशोधक अन्वेषण दृष्टीच्या खुंट्याला घट्ट पकडून भोवतीच्या वास्तवावर, नेत्यांवर परखडपणे लिहीत राहिले. तीव्र मतभेद प्रकट करत राहिले. त्यातून अगदी म. गांधी, पं. नेहरूही सुटले नाहीत. काही स्पृहणीय असे दिसले तर तेही सांगायला ते विसरले नाहीत. त्यांच्यापुढे एकच ईप्सित होते आणि ते म्हणजे शूद्रातिशूद्रांचा म्हणजेच बहुजनांचा उद्धार. त्यांची शोषणमुक्ती. त्यांच्या अंधश्रद्धा दूर करणे, त्यांच्यामध्ये शिक्षणप्रसार व्हावा, यासाठी धडपड करणे हेच त्यांचे एकमेव ध्येय होते आणि या ध्येयासाठी ते शेवटच्या श्‍वासापर्यंत परिश्रम करत राहिले.

मुकुंदराव पाटील यांनी ‘दीनमित्र’ काढले तेच मुळी सत्यशोधक विचारांच्या प्रसारासाठी आणि शूद्रातिशूद्रांच्या मुक्तीसाठी. शेतकर्‍यांच्या मुक्तीसाठी. त्या दृष्टीने त्यांनी आयुष्यभर लेखन केले. २३ नोव्हेंबर १९१० रोजी ‘दीनमित्र’चा प्रारंभ झाला आणि दुसर्‍याच आठवड्यामध्ये त्यांनी लिहिलेल्या अग्रलेखाचे शीर्षक आहे- ‘शेतकर्‍यांची निकृष्ट स्थिती व ती घालविण्याचे उपाय’. १९१०मधील या पहिल्या लेखापासून १९६२पर्यंतच्या उपलब्ध अंकांपर्यंत शेतकर्‍यांसंबंधी मुकुंदराव पाटील अखंडपणे शेतकर्‍यांच्या दु:स्थितीसंबंधी लिहीत आहेत. या ५०-५२ वर्षांमध्ये इंग्रजांची राजवट असो की, स्वातंत्र्यानंतरची राजवट असो, शेतकर्‍यांच्या दु:स्थितीमध्ये फारसा फरक पडला नाही. किंबहुना या दु:स्थितीमध्ये वाढच झाली, असे मुकुंदराव पाटील यांच्या लेखनातून दिसून येते.

शेतकर्‍यांच्या दु:स्थितीचे स्वरूप तर ते सांगतातच, पण वेळोवेळी उत्पन्न होणार्‍या प्रश्‍नांमुळे शेतकर्‍यांच्या दु:स्थितीमध्ये कशी भर पडत गेली, याचाही ते विस्ताराने परामर्श घेतात. त्यावरील उपाययोजनाही सुचवतात. अनावृष्टी, अतिवृष्टी आणि दुष्काळामुळे तर शेतकर्‍यांचे हाल होतातच, पण इतर वेळीसुद्धा शेतकर्‍यांची अवस्था काबाडकष्टाची आणि हालअपेष्टांचीच असते, हे मुकुंदराव पाटील पुन्हा पुन्हा आपल्या अग्रलेखांमधून प्रकट करतात.

काळ बदलत गेला तरी शेतकर्‍यांच्या विपन्नावस्थेचे स्वरूप मुकुंदराव अनेक अग्रलेखांमधून सांगतात. पाऊस पडलाच नाही तरी शेतकरी अडचणीत येतो आणि खूप पडला तरी तो अडचणीत येतो. हवा तेव्हा आणि हवा तसा पाऊस पडणे, ही केवळ दुर्मीळ गोष्ट असते. अशा प्रकारे नैसर्गिक कारणांमुळे तर तो अडचणीत येतोच; पण याशिवाय आणखी दोन महत्त्वाच्या कारणांचा निर्देश मुकुंदराव पाटील करतात. त्यापैकी एक म्हणजे शासन वेळोवेळी जे निर्णय घेते, त्यामुळेही शेतकर्‍यांच्या दु:स्थितीत मोठीच भर पडत जाते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे धार्मिक जंजाळात अडकून तो स्वत:च स्वत:चे शोषण करून घेतो.

जुन्या काळापासून शेतीसंबंधित प्रश्‍नांची सोडवणूक करण्यासाठी एक व्यवस्था निर्माण करण्यात आलेली होती. म्हणजे गावाची शांतता व सुव्यवस्था पाहण्याचे काम पाटलांकडे होते, तर शेतीसंबंधीच्या नोंदी करण्याचे काम कुलकर्ण्यांकडे होते. हे कुलकर्णी त्या त्या गावचे असत आणि परंपरेने त्यांच्याकडे कुलकर्णीपण येत असे. म्हणजे त्या त्या गावच्या शेतीशी संबंधित सर्व नोंदी कुलकर्ण्यांच्या दप्तरी असत. गावातील पाटलांसह सर्वच शूद्रातिशूद्र म्हणजे शेतकरी इत्यादी मंडळी संपूर्णत: अशिक्षित. कुलकर्णी हा त्या भागातील अधिकृत शासकीय प्रतिनिधी. शिकलेला. लिहिता वाचता येणारा. शिवाय उच्चवर्णीय. उच्चवर्णीय म्हणून लोक त्याच्याकडे आदराने पाहतच. शिवाय महत्त्वाचा हुद्दा. अशा परिस्थितीत हे कुलकर्णी मोठ्या प्रमाणात गैरप्रकार करीत. पिकांच्या खोट्या नोंदी करणे, सारा वसूल करणार्‍यांची दिशाभूल करणे, कर्ज देणार्‍या सावकारांना शेतकर्‍यांविरोधात मदत करणे अशा असंख्य गोष्टी कुलकर्णी करत असे किंवा तो म्हणेल ती पूर्वदिशा असे. यातून शेतकर्‍यांचा छळच होत असे.

शासकीय व्यवस्थेचा आणि शेतकर्‍यांचा संबंध शेतसारा भरण्याच्या संदर्भात येतो. विशेषत: दुष्काळाच्या काळात सारा कमी करण्याच्या संदर्भात पिकांच्या नोंदी तपासल्या जातात. याबाबतही मुकुंदराव पाटील अनेक सूचना करतात. विशेषत: शासकीय अधिकार्‍यांवर विसंबून न राहता या नोंदी करताना गावातील लोकांनाही मदतीला घ्यावे, अशी एक सूचना ते करतात. तसेच वेगवेगळ्या गावात वेगवेगळी परिस्थिती असते, याची जाणीव सरकारी अधिकार्‍यांना नसते. त्यातूनही शेतकर्‍यांवर अन्याय होतो. तेव्हा गावाप्रमाणे नोंदी केल्या पाहिजेत अशीही एक महत्त्वाची सूचना मुकुंदराव पाटील करतात. व्यापारी मात्र उत्पन्नाप्रमाणे कर भरतात, पण शेतकर्‍यांना मात्र ठरावीक शेतसारा भरावाच लागतो, असेही ते सांगतात.

शेतकर्‍यांच्या संदर्भातील मुकुंदराव पाटील यांचे आणि ‘दीनमित्र’चे हे कार्य बहुमोल आहे. कायम स्मरणात ठेवले जाणारे आहे.

५.

शेती आणि शेतकरी हे मुकुंदराव पाटील यांच्या आस्थेचे विषय, पण त्या खालोखाल त्यांनी कोणावर लिहिले असेल तर ते म. गांधी यांच्याविषयी, परंतु हे सारे लेखन गुण आणि दोष दाखवणारे आहे. मुकुंदराव पाटील कुठल्या पक्षाचे जसे नाहीत, त्याप्रमाणे कोणाचे भक्त नाहीत. त्यामुळे म. गांधी यांचे थोरपण मान्य असूनही ते भक्त नाहीत. त्यामुळे त्यांचे लेखन ‘आरती’ या सदरात कधी येणार नाही. योग्य त्याची पाठराखण आणि न पटणार्‍या बाबीचा निषेध अशी मुकुंदराव पाटील यांची स्वच्छ भूमिका आहे.

मुकुंदराव पाटील जसे म. गांधी यांच्याकडे तटस्थपणे पाहतात, त्याप्रमाणेच पं. नेहरू यांच्याकडेही तटस्थपणेच पाहतात. प्रसंगी पं. नेहरूंवर टीका करणारे, त्यांना जाब मागणारे मुकुंदराव पाटील पं. नेहरूंचे मोठेपण ओळखून आहेत.

ज्या काळामध्ये मुकुंदराव पाटील लेखन करत आहेत, तो काळ भारतीय इतिहासातील इतिहासालाच वळण देणारा काळ आहे. अनेक वर्षांची गुलामी संपविण्यासाठी झालेले अभिनव लढे आणि भारताला मिळालेले स्वातंत्र्य हे तर या काळाचे वेगळेपण होतेच, पण राजेशाहीकडून लोकशाहीकडे झालेली वाटचाल त्यातील प्रमुख गोष्ट होती. तसेच समता, बंधुता आणि स्वातंत्र्य यांना केंद्रस्थान देणारी राज्यघटना निर्माण होणे, हीही महत्त्वाची गोष्ट होती आणि आहे. म्हणून येथून पुढे भारताच्या इतिहासाचे वळणच बदलले अशी ठळक नोंद करणे अपरिहार्य ठरते. अशा काळात खूप व्यक्तिमत्त्वे उदयाला आली. स्वातंत्र्यानंतर जे बदल झाले, त्यांचा विचार करताना स्वातंत्र्यपूर्व काळातील राजा राममोहन रॉय, म. जोतिबा फुले यांची नोंद करावी लागते. स्वातंत्र्यानंतर मात्र या परंपरेतील डॉ. आंबेडकर यांचे कार्य ठसठशीतपणे समोर येते. याशिवायही खूप व्यक्तिमत्त्वे अशी होती की, ज्यांनी महत्त्वाचे कर्तृत्व दर्शवलेले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि मुकुंदराव पाटील यांचे वैचारिक नाते होते.

मुकुंदराव पाटील काँग्रेसचे प्रखर टीकाकार आहेत. पण १९२०च्या आसपास भारतात कम्युनिझमचा विचार येऊन पोचला. तो शोषितांच्या मुक्तीसाठीचे एक तत्त्वज्ञान मांडतो. भारतात क्रमाने मार्क्सवादी तत्त्वज्ञानाचा प्रभाव वाढत गेला. कम्युनिस्ट पक्ष बळकट झालाच, पण या पक्षाच्या वाढीच्या भीतीने काँग्रेसने कूळ कायदा, जमीन वाटपाचा कायदा केला. (‘जमीन वाटपाचा प्रश्‍न अर्धवट आहे!’, २२ जून १९५५, खंड ९). विनोबांची भूदान कल्पना हीही कम्युनिस्टांच्या भीतीतून निर्माण झालेली आहे. तेव्हा स्वाभाविकपणेच आपणास असे वाटते की, बंडखोर म्हणून प्रसिद्ध असलेल्या सत्यशोधक विचारांचे सच्चे पाईक मुकुंदराव पाटील मार्क्सवादी विचारांचा स्वीकार करतील, किमान विरोधी भूमिका घेणार नाहीत. परंतु तसे होत नाही. (त्या काळात सत्यशोधकांना ‘बोल्शेव्हिक’ म्हणून शिवी दिली जायची, अशी नोंद मुकुंदराव पाटील यांनीच करून ठेवलेली आहे.) (‘जुन्या मुडद्यांचे नवे थडगे’, खंड २). मुकुंदराव पाटील कम्युनिझमचे कठोर टीकाकार आहेत.

६.

अहमदनगर जिल्ह्यातील अत्यंत छोट्या खेड्यामधून मुकुंदराव पाटील यांनी ‘दीनमित्र’ हे पत्र एकहाती अर्धशतकापेक्षा अधिक काळ चालवले. तेथे सुविधा कुठल्या नव्हत्याच, पण जाहिराती नाही की, कुणाचा आश्रय नाही. त्यामुळे मुकुंदराव पाटील यांच्या पत्रकारितेला एक निर्भीड रूप प्राप्त होत गेले. स्वातंत्र्यापूर्वी ते जसे निर्भीडपणे लिहीत होते, तेवढ्याच निर्भीडपणे स्वातंत्र्यानंतरही त्यांची लेखणी चालत होती. त्याचे कारण असे की, ते कुठल्या पक्षाचे सदस्य नव्हते की, कुठल्या मोठ्या नेत्याचे अनुगामित्व करणारेही होते. म्हणून ते म. गांधी, पं. नेहरू यांच्यापासून यशवंतराव चव्हाण यांच्यापर्यंत सर्वांच्या कार्यावर टीका करू शकले. त्याचे कारण कोणते म्हणाल तर ती त्यांची ध्येयवादी वृत्ती. मुळात सत्यशोधक विचारांच्या प्रसारासाठी तसेच ग्रामीणांच्या, बहुजनांच्या आणि अस्पृश्यांच्या जागृतीसाठी ‘दीनमित्र’ सुरू झालेले असल्यामुळे मुकुंदराव पाटील यांना कुणाच्या रागलोभाची पर्वा करण्याचे कारण नव्हते. एका अर्थाने आपल्या विचारांवर ठाम असलेला पत्रकार कायम विरोधी पक्षात असतो, तसे मुकुंदराव पाटील यांचे होते, असे म्हणावयास हरकत नाही. त्यामुळे कुठलीही घटना असो अगर व्यक्ती असो,  तिचा बहुजनांवर काय परिणाम होईल, अस्पृश्यांच्या मुक्तीसाठी उपयोग होईल का, हे पाहणे मुकुंदराव पाटील यांच्या दृष्टीने महत्त्वाचे होते. म्हणून त्यांचा प्रत्येक अग्रलेख काहीतरी नवा विचार देणारा, नवी दिशा देणारा आणि तेवढाच अर्थपूर्ण असायचा. हे तेव्हाच घडते, जेव्हा एक उच्च प्रकारचा ध्येयवाद त्या व्यक्तिमत्त्वाकडे असतो.

वर्तमानपत्रातील लेखनाला एका तत्कालिकतेचा संदर्भ असतो. त्यामुळे पुष्कळदा तो काळ गेला की ते लेखनही  निर्माल्यवत होऊन जाते. परंतु काही फार थोडे पत्रकर्ते असे असतात की त्यांचे लेखन कायम टवटवीत असते. असे लेखक केवळ तत्कालिक संदर्भापुरतेच लिहीत नाहीत. त्यापुढे जाऊन त्या विशिष्ट अशा घटिताच्या प्रेरणा कोणत्या होत्या, त्यातील एकूण मानवी वर्तन कसे होते, अशा एका व्यापक दृष्टीने संपादक लिहायला लागतात, तेव्हा ते लेखन सार्वकालिक होत जाते. शिवाय अशा संपादकांजवळ एक भाषिक सामर्थ्यही असते. अशा अगदी मोजक्या संपादकांमध्ये मुकुंदराव पाटील यांचा समावेश करावा लागतो. लो. टिळक, कृष्णशास्त्री चिपळूणकर, गो. ग. आगरकर, म. गांधी, डॉ. आंबेडकर यांच्या संपादकीय लेखनाला जेवढे महत्त्व आहे, तेवढेच मुकुंदराव पाटील यांच्या लेखनालाही आहे. त्यांच्या लेखनातून तत्कालीन भारत, विशेषत: महाराष्ट्रातील सामाजिक, राजकीय, धार्मिक इत्यादी बाबी दृग्गोचर होतात. म्हणून या लेखनाला केवळ ऐतिहासिक महत्त्व आहे, असे म्हणता येणार नाही तर त्यातून समाजाचे अंत:प्रवाह आणि सार्वकालिक मानवी जीवनही प्रकट होताना दिसते. त्यामुळे पुष्कळदा मुकुंदराव पाटील यांच्या लेखनामध्ये लालित्यही अवतरते. (ते एक श्रेष्ठ प्रतीचे ललित लेखक आहेत, याचा निर्देश यापूर्वी केलाच आहे.)

वृत्तपत्राच्या संपादकाला सतत सजग राहावे लागते. नजर चौफेर ठेवावी लागते. वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास करावा लागतो. मुकुंदराव पाटील इतक्या छोट्या खेड्यात राहूनही सर्व प्रकारची माहिती मिळवीत असत, असे त्यांचे अग्रलेख वाचू लागलो की लक्षात येते. स्वत:ची अन्वेषण दृष्टी तर हवीच असते, पण प्रबळ तर्कबुद्धीही असणे गरजेचे असते. हे सारे मुकुंदराव पाटील यांच्याकडे आहे. शिवाय चांगल्या संपादकाला आपल्या काळाचे नीट वाचन करता यायला हवे. आपल्या काळाचे वाचन ज्या संपादकाला करता येते, त्यास भविष्याबद्दल चिंतन करता येते. तसेच काहीसे द्रष्टेपणही अशा संपादकांकडे असते. उदाहरणार्थ, चीन भारतावर आक्रमण करू शकेल, रशियाचे भविष्यकाळात तुकडे होऊ शकतात. (‘आंधळा भलेपणा’, खंड १०) अशी भाकिते ते करतात व ती पुढे खरी झालेली दिसतात.

तसेच म. गांधी यांचा खून केला जाऊ शकतो हेही त्यांनी किमान तीन-चार वेळा सांगितलेले आहे.  उदाहरणार्थ, ‘परंतु राउंड टेबल परिषदेची बैठक यशस्वी झाल्यावर या भुतावळीस दुसरा उद्योग काही न उरल्यास, हे म. गांधींवर झडप घालील असे आमचे अंधुक भविष्य आहे... त्यांची धार्मिक व सामाजिक मते कशी काय आहेत हे आता सर्वांस कळून चुकलेच आहे. महार-मुसलमानांचे हातचे खाण्यात, चातुर्वर्ण्याची हानी होते असे त्यांना मुळीच वाटत नाही. तेव्हा, म. गांधींचे सबगोलंकारी विचार, या भुतावळाला मुळीच पटणार नाहीत आणि ते आपले मूळचे रूप प्रकट केल्याशिवाय राहणार नाहीत.’ (‘एक अंधुक भविष्य’, १९ ऑगस्ट १९३१, खंड ४) अर्थात हे भाकितही देशाच्या दुर्दैवाने खरे ठरलेले आहे.

आपल्या देशातील भविष्यकालीन माणूस सुखी-समृद्ध व्हावा या दृष्टीने त्यांचे कायम चिंतन असते. याचा अर्थ असा की, ‘दीनमित्र’ हे साप्ताहिक ग्रामीण भागातून प्रकाशित होत असले तरी एकूण समाजालाच ‘प्रबुद्ध’ करण्याची पात्रता बाळगून आहे. या कर्तबगार संपादकाची महाराष्ट्राने घोर उपेक्षा केली, हे मात्र कटू असले तरी सत्य आहे.

वर्तमानपत्रांमधले अग्रलेख किंवा इतर लेखनही एखाद्या संपादकाने केलेले असते, तेव्हा ते एका व्यक्तीने केलेले असते. परंतु मुकुंदराव पाटील यांच्यासारखा प्रतिभावान संपादक (पुन्हा ललितलेखकही) जेव्हा लिहायला लागतो, तेव्हा ते समष्टीची भावना व्यक्त करणारे लेखन होऊन जाते. तसेही मुकुंदराव पाटील यांचे लेखन समष्टीसाठीच असते. आपला वाचक कोण आहे, याची त्यांना फार उत्तम जाणीव असते. तो अर्धशिक्षित अगर अशिक्षित आहे (कारण खेडोपाडी ‘दीनमित्र’मधील मजकूर चावडीसारख्या सामूहिक ठिकाणी वाचून दाखवला जात असे.) तेव्हा त्याच्या अभ्युदयासाठी तर लिहायचेच, पण त्याला कळेल असे लिहायचे, हे मुकुंदराव पाटील यांना नीट माहीत होते. त्यामुळे ते साध्या आणि सोप्या भाषेत लिहायचे. त्याच्या भावविश्‍वाशी निगडित प्रश्‍नांवर तर लिहायचेच, पण त्याला या नव्या जगात कशाकशाचे भान आले पाहिजे, त्या दृष्टीनेही लिहायचे.

शिवाय मुकुंदराव पाटील यांचे मानवी मनाचे व वर्तनाचे आकलनही सूक्ष्म आहे व ते व्यक्तही होते. त्यामुळे त्यांचे लेखन अधिक वाचनीय होत जाते. आपले लेखन अधिक परिणामकारक व्हावे, म्हणून ते कधी स्वप्नांची निर्मिती करत, तर कधी पौराणिक कथांच्या धर्तीवर नवी पौराणिक कथा निर्माण करत.

कधीकधी स्वत:शीच संवाद साधण्याच्या शैलीमध्ये ते लिहितात आणि ते लेखन अधिक परिणामकारक होताना दिसते. देशभक्तांनी खेड्यातून काम करावे, त्यांनी अंधश्रद्धा दूर कराव्यात म्हणजे सामाजिक कार्य करावे, असे मुकुंदराव पाटील अनेक ठिकाणी लिहितात परंतु स्वत:स देशभक्त म्हणवणारे कधीही अंधश्रद्धा दूर करत नाहीत. धार्मिक शोषणाबद्दल बोलत नाहीत, ही मुकुंदराव पाटील यांची व्यथा होती. देशभक्त म्हणवणार्‍यांवर मुकुंदराव पाटील यांचा रोष आहेच. त्यातही काँग्रेसवाल्यांच्या वर्तनामुळे ते मुकुंदरावांच्या टीकेचे विषय होतात. मुकुंदराव पाटील एकाच वेळी राजकारणातील आणि त्याच वेळी धार्मिक क्षेत्रातील दांभिकांची अत्यंत प्रभावी भाषेत खिल्ली उडवताना दिसतात. त्यांचे निरीक्षण, शब्दांची निवड आणि फेक यांमधून हास्य निर्माण होत जाते आणि व्यथित करणारे सत्यही प्रकट होते. विनोदनिर्मिती हे जसे मुकुंदराव पाटील यांचे सामर्थ्य आहे, त्याप्रमाणे उपहास आणि उपरोध हेही त्यांचे मोठेच सामर्थ्य आहे.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

मुकुंदराव पाटील यांचे लेखन अधिक प्रभावी होते, ते लिहिण्याच्या ओघात त्यांनी सहजपणे वापरलेल्या म्हणी आणि वाक्प्रचारांमुळे. सर्वपरिचित असंख्य म्हणी तर ते वापरतातच, पण जुन्या परिचित म्हणींवरून नव्या म्हणी तयार करतात. तसेच रूढ शब्दांचा उपहास करण्यासाठीही नवे शब्द पर्याय म्हणून ते देतात.

७.

मुकुंदराव पाटील यांनी आपल्या ५० वर्षांच्या पत्रकारितेत असंख्य विषयांवर लिहिले आहे. विचार केला आहे. चिंतन केले आहे. धर्मसंस्कृतीपासून राजकारणापर्यंत आणि इतिहासापासून मानवी वर्तनापर्यंत असंख्य गोष्टी त्यांच्या लेखन कक्षेत आलेल्या आहेत. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरील घडामोडींपासून स्थानिक घडामोडीपर्यंतचा वेध घेऊन त्यांनी त्यातील तत्त्वार्थ शोधला आहे. इतिहासाने केलेल्या अनेक गफलतींसंबंधी लिहिले आहे, पण हे सारे करताना सत्यशोधक अन्वेषण दृष्टीचा त्यांनी वापर तर केलाच, पण ही दृष्टी अधिक समृद्धही केली. हे मुकुंदराव पाटील यांचे अत्यंत महत्त्वाचे योगदान आहे.

याच ठिकाणी आणखी एका गोष्टीची नोंद केली पाहिजे. ती अशी की वेळोवेळी त्यांनी घेतलेल्या भूमिका, लोकशाही, स्वातंत्र्य अशा संकल्पनांसंबंधीचे त्यांचे चिंतन, राष्ट्र आणि धर्म यांच्या संबंधांची त्यांनी केलेली चर्चा, जात, कर्मठपणा, अंधश्रद्धा, मंदिरे आणि तेथील शोषण, इत्यादी संबंधीचे त्यांचे चिंतन आजही आपल्या देशासाठी मार्गदर्शक आहे.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ज्या तालिबानला हटवण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानात शिरकाव केला होता, अखेर त्यांच्याच हाती सत्ता सोपवून अमेरिकेला चालते व्हावे लागले…

अफगाण लोक पुराणमतवादी असले, तरी ते स्वातंत्र्याचे कट्टर भोक्ते आहेत. त्यांनी परकीयांची सत्ता कधीच सरळपणे मान्य केलेली नाही. जगज्जेत्या, सिकंदरालाही (अलेक्झांडर), अफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळवता आला नाही. तेथील पारंपरिक ‘जिरगा’ नावाच्या व्यवस्थेला त्याने जिथे विश्वासात घेतले, तिथेच सिकंदर शासन करू शकला. एकोणिसाव्या शतकात, संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेला अफगाणिस्तानात नामुष्की सहन करावी लागली.......

‘धर्म, जात, देश, राष्ट्र’ या शब्दांचा गोंधळ जनमानसात रुजवून संघ देश, सत्ता आणि समाजजीवन यांच्या कसा केंद्रस्थानी आला, त्याच्याविषयीचे हे पुस्तक आहे

या पुस्तकाच्या निमित्ताने संघाची आणि आपली शक्तिस्थाने आणि मर्मस्थाने नीटपणे अभ्यासून, समजावून घेण्याचा प्रयत्न परिवर्तनवादी चळवळीत सुरू व्हावा ही इच्छा आहे. संघ आज अगदी ठामपणे या देशात केंद्रस्थानी सत्तेत आहे आणि केवळ केंद्रीय सत्ता नव्हे, तर समाजजीवनाच्या आणि सत्तेच्या प्रत्येक क्षेत्रात संघ आज केंद्रस्थानी उभा आहे. आपल्या असंख्य पारंब्या जमिनीत खोलवर घट्ट रोवून एखादा विशाल वटवृक्ष दिमाखात उभा असतो, तसा आज.......

‘रशिया : युरेशियन भूमी आणि संस्कृती’ : सांस्कृतिक अंगानं रशियाची प्राथमिक माहिती देणारं पुस्तक असं या लेखनाचं स्वरूप आहे. त्यामध्ये विश्लेषणावर फारसा भर नाही

आजपर्यंत मला रशिया, रशियन लोक, त्यांचं दैनंदिन जीवन आणि मनोधारणा याबाबत जे काही समजलं, ते या पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावं, असा एक उद्देश आहे. पण त्यापलीकडे जाऊन हे पुस्तक रशिया समजून घेण्यात रस असलेल्या कोणाही मराठी वाचकास उपयुक्त व्हावा, अशीही इच्छा होती. यामध्ये रशियाचा संक्षिप्त इतिहास, वैशिष्ट्यं, समाजजीवन, धर्म, साहित्य व कला आणि पर्यटनस्थळे यांचा वेध घेतला आहे.......

‘हा देश आमचा आहे’ : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केलेल्या आणि प्रजासत्ताकाच्या अमृतमहोत्सवाच्या उंबरठ्यावर उभ्या भारतीय मतदारांनी धर्मग्रस्ततेचे राजकारण करणाऱ्या पक्षाला दिलेला संदेश

लोकसभेची अठरावी निवडणूक तिचे औचित्य, तसेच निकालामुळे बहुचर्चित ठरली. ती ऐतिहासिकदेखील आहे. तेव्हा तिच्या या पुस्तकात मांडलेल्या तपशिलांना यापुढच्या विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकांच्या वेळी वेगळे संदर्भमूल्य असेल. या निवडणुकीचा प्रवास, त्या प्रवासातील वळणे, निर्णायक ठरलेले किंवा जनतेने नाकरलेले मुद्दे व इतर मांडणी राजकीय वर्तुळातील नेते व कार्यकर्ते यांना साहाय्यभूत ठरेल, अशी आशा आहे.......

‘भिंतीआडचा चीन’ : श्रीराम कुंटे यांचं हे पुस्तक माहितीपूर्ण तर आहेच, पण त्यांनी इ. स. पूर्व काळापासून आजपर्यंतचा चीन या प्रवासावर उत्तम प्रकारे प्रकाशही टाकला आहे

‘भिंतीआडचा चीन’ हे श्रीराम कुंटे यांचे पुस्तक चीनविषयी मराठीत लिहिल्या गेलेल्या आजवरच्या पुस्तकात आशयपूर्ण आणि अनेक अर्थाने परिपूर्ण मानता येईल. चीनचे नाव घेताच सर्वसाधारण भारतीयाच्या मनात एक कटुता, शत्रुभाव आणि त्या देशाच्या ऐकीव प्रगतीविषयी असूया आहे. या सर्व भावना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आपल्या विचारांची दिशा ठरवतात. अशा प्रतिमा ठोकळ असतात. त्यांना वस्तुस्थितीच्या छटा असल्या तरी त्या वस्तुनिष्ठ नसतात.......

शेतकऱ्यांपासून धोरणकर्त्यांपर्यंत आणि सामान्य शेतकऱ्यांपासून अभ्यासकांपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा ‘ज्वारी’कडे वळवण्यासाठी...

शेती हा बहुआयामी विषय आहे. त्यातील एका विषयांवर विविधांगी अभ्यास करता आला आणि पुस्तकरूपाने वाचकांसमोर मांडता आला, याचं समाधान वाटतं. या पुस्तकात ज्वारीचे विविध पदर उलगडून दाखवले आहेत. त्यापुढील अभ्यासाची दिशा दर्शवणाऱ्या नोंदी करून ठेवल्या आहेत. त्यानुसार सुचवलेल्या विषयांवर संशोधन करता येईल. ज्वारीला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणकर्त्यांनी धोरणात्मक दिशेने पाऊल टाकलं, तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.......