या युद्धात अमेरिकादी नाटो राष्ट्रांनी युक्रेनला स्वतःच्या फायद्यासाठी ‘बळीचा बकरा’ बनवले आहे!
पडघम - विदेशनामा
कॉ. भीमराव बनसोड
  • युक्रेनचा नकाशा
  • Mon , 21 March 2022
  • पडघम विदेशनामा रशिया Russia सोव्हिएत रशिया Soviet Union युक्रेन Ukraine नाटो NATO अमेरिका America संयुक्त राष्ट्रसंघ United Nation

रशियाने युक्रेनवर युद्ध लादल्याला आता तीन आठवडे होत आहेत. यात आजवर ७०० युक्रेनियन नागरिक आणि ५९ मुले ठार झाली आहेत, तर ११७६हून अधिक जखमी झाले आहेत. जवळपास ३० लाख नागरिकांनी आपल्या देशातून पलायन करून शेजारील देशांत आश्रय घेतला आहे. अजूनही ते चालूच आहे. युद्ध चालूच राहिल्यास यात आणखीही वाढ होण्याची शक्यता आहे. हे युद्ध कधी थांबेल हे सांगता येत नाहीये. वरिष्ठ पातळीवर चर्चा चालू आहे. पण त्यातून ‘मानवी गलियारा’ (म्हणजे पळून जाण्याचा मार्ग) निर्माण करण्याशिवाय फारसे काही निष्पन्न झालेले नाही. युक्रेनच्या राष्ट्रपतींची मागणी आहे की, ‘माझी रशियन अध्यक्ष पुतीन यांच्याशी प्रत्यक्ष बोलण्याची इच्छा आहे.’ पण पुतीन यांनी अजून तसा पुढाकार घेतलेला नाही. इस्त्राईलपासून तुर्कस्थानपर्यंतचे राष्ट्रप्रमुख या युद्धात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण अद्याप तरी हे युद्ध थांबवण्यात त्यांना यश आलेले नाही.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

दरम्यानच्या काळात युक्रेनचे राष्ट्रपती व्लादिमीर झेलिंस्की यांनी अमेरिका व नाटो राष्ट्रांकडे लढाऊ विमानांची मागणी केली. निदान उंचावरील रशियन विमानांना पाडू शकतील, अशी क्षेपणास्त्रे तरी द्या, अशी विनंती त्यांनी नाटो राष्ट्रांना केली आहे. नाटो सदस्य पोलंडने त्यांच्याकडे असलेल्या जुन्या रशियन बनावटीच्या विमानांची पूर्तता करण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण अमेरिकेने ही शक्यता फेटाळून लावली आहे. म्हणजे स्वतः अमेरिका किंवा इतर नाटो राष्ट्रे युक्रेनला लढाऊ विमाने अथवा तोडीस तोड शस्त्रास्त्रे देण्यास तयार नाहीत. त्यांच्याकडे गोदामात पडून असलेली, मागासलेली शस्त्रास्त्रे त्यांनी आतापर्यंत युक्रेनला दिली आहेत. पण त्याचा युक्रेनला आक्रमण थोपवण्यासाठी तर जाऊच द्या, स्वतःच्या बचावासाठीसुद्धा फारसा उपयोग होताना दिसत नाही. म्हणून युक्रेनने ‘नो फ्लाय झोन’ तरी जाहीर करावा, अशी मागणी केली आहे. पण तीही अमेरिका व इतर नाटो राष्ट्रांनी मान्य केलेली नाही. त्यामुळे कदाचित तिसरे जागतिक युद्ध भडकण्याची शक्यता त्यांना वाटत असावी.

ते खरेही आहे, कारण जर असा ‘नो फ्लाय झोन’ जाहीर केला, लढाऊ विमाने अथवा क्षेपणास्त्रे युक्रेनला पुरवली, तर या युद्धात या देशांनी भागीदारी केली, असे समजले जाईल, अशी धमकी पुतीन यांनी दिली आहे. त्यामुळे कोणतेही राष्ट्र धोका स्वीकारायला तयार नाही. तिसरे युद्ध भडकण्याच्या शक्यतेबाबत वाद नाही. पण ती अमेरिका व इतर नाटो राष्ट्रांनी यापूर्वीही ध्यानात घ्यायला हवी होती आणि मुख्य म्हणजे त्यासाठी युक्रेनला ‘बळीचा बकरा’ बनवण्याचे कारण नव्हते. पण आता युक्रेनने नाटो राष्ट्रांच्या आश्वासनांना बळी पडून स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतला आहे.

जे झाले ते झाले, त्याला इलाज नाही. मात्र त्याचे भोग युक्रेनियन नागरिकांना, आबालवृद्धांना, लहान मुलांना भोगावे लागत आहेत. या आक्रमणात युक्रेनमधील बरीचशी शहरे बेचिराख झाली आहेत. अशा परिस्थितीत युक्रेनने पुढाकार घेऊन रशियाच्या मागण्या मान्य करणे, हाच सध्यातरी एकमेव इलाज दिसतो. अन्यथा युक्रेनमध्ये आणखी जीवित व मालमत्ता यांची हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

आजवर अमेरिका व नाटो राष्ट्रांनी रशियावर जे काही निर्बंध लादले आहेत, त्यात त्यांनी नुकत्याच एका नवीन निर्बंधाची भर घातली आहे. कदाचित तो पुढील काळात परिणामकारक होऊ शकेल असे दिसते. तो म्हणजे रशियाचे अध्यक्ष पुतीन यांच्या अवतीभवती असणाऱ्या कॉर्पोरेट बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या मालकांची आहेत नाटो देशांत असलेली संपत्ती जप्त करण्याचे, त्यांची बँक अकाउंटस गोठवण्याचे, त्यांच्याशी कोणत्याही रीतीचा व्यवहार न करण्याचे, त्यांना आपल्या देशात प्रवास करण्यास प्रतिबंध केला असल्याचे जाहीप केले आहे.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

अमेरिकेने पुतीन यांचे प्रवक्ते अब्जाधीश व्हिक्टर वेक्सेलबर्ग यांच्या कुटुंबातील तीन सदस्य आणि आमदारांवर निर्बंध लादले आहेत. त्याचबरोबर यामध्ये रशियातील दुसऱ्या क्रमांकाच्या VTB बँकेच्या संचालक मंडळावरील १० जणांचा आणि रशियाचे कनिष्ठ सभागृह ड्यूमाच्या १२ सदस्यांचा समावेश आहे. शिवाय एलेना जॉर्जिएवा, एबीआर मॅनेजमेंट, बँक रोसियाचे चेअरमन दिमित्री लेबेडेव्ह आणि सेंट पीटर्सबर्गचे व्हाईस गव्हर्नर व्लादिमीर न्यागिनिन यांच्यासह चार नोविकॉम बँक बोर्ड सदस्यांनादेखील लक्ष्य करण्यात आले आहे. या व्यक्तींच्या रिअल इस्टेट, कॉर्पोरेट शेअरहोल्डिंग, बँक खाती, नौका, विमाने, दागिने आणि कलाकृती यांसह अनेक मालमत्ता गोठवल्या किंवा जप्त केल्या जाऊ शकतात, असे अमेरिकने जाहीर केले आहे.

इंग्लंडनेही ३५० रशियनांना त्यांच्या निर्बंधाच्या यादीत समाविष्ट केले आहे. रशियन व्होडकापासून स्टीलच्या आयातीपर्यंत अनेक वस्तूंवरील शुल्क वाढवले ​​आहे आणि लक्झरी वस्तूंच्या निर्यातीवर बंदी घातली आहे.

अलीशेर उस्मानोव्ह हे व्लादिमीर पुतीन यांच्या जवळच्यापैकी एक आहेत. ‘फोर्ब्स’ या मासिकानुसार त्यांची एकूण संपत्ती अंदाजे १७.६ अब्ज डॉलर आहे. ते USM होल्डिंग्स नावाच्या कंपन्यांचा समूह चालवतात. त्यात खाणी, दूरसंचार कंपन्या आणि रशियाचे सर्वांत मोठे मोबाइल नेटवर्क असलेल्या मेगाफोन यांचाही समावेश आहे. त्यांच्या मालकीचा ‘बीचवुड हाऊस’ हा बंगला लंडन शहराच्या मध्यभागी आहे. त्याची किंमत ६० दशलक्ष पौंड्स आहे आणि लंडनबाहेर ‘सटन प्लेस’ नावाची तशीच हवेली आहे. या दोन्ही मालमत्ता आता इंग्लंड सरकारने जप्त केल्या आहेत. त्यांचा व्यावसायिक भागीदार फरहाद मोशिरी ‘एव्हर्टन’ या प्रसिद्ध फुटबॉल कंपनीचा मालक आहे. शिवाय त्यांच्या कंपन्या USM, MegaFun आणि Yota या क्लबच्या मुख्य प्रायोजक आहेत. याचबरोबर यात मिखाईल फ्रिडमन आणि पेट्र एव्हन यांचाही समावेश आहे. त्याचबरोबर दिमित्री मेदवेदेव, माजी पंतप्रधान आणि अध्यक्ष, दिमित्री पेस्कोव्ह, क्रेमलिन प्रेस सेक्रेटरी आणि परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मारिया झाखारोवा यांचाही समावेश आहे.

अब्रामोविच हे आपले क्रेमलिन सरकारशी जवळचे संबंध असल्याचे नाकारतात. परंतु जर निर्बंध लादले गेले, तर त्यांची १२.४ अब्ज डॉलरची संपत्ती धोक्यात येऊ शकते. गेल्याच आठवड्यात त्यांनी चेल्सी क्लब ३ अब्ज पौंडसला (सुमारे ३०० अब्ज रुपये) आणि लंडनमधील केन्सिंग्टन पॅलेस गार्डन्समधील घर १५० दशलक्ष पौंडसला (सुमारे १५ अब्ज रुपये) विक्रीला असल्याचे सांगितले आहे. अब्रामोविच यांनी १९९०च्या दशकात म्हणजे बोरिस येल्त्सिन यांच्या काळात आपली संपत्ती निर्माण केली. तेव्हापासून त्यांची कुलीन वर्गात गणना केली जाते. त्या काळात त्यांनी सार्वजनिक क्षेत्रात असलेली ‘सिबनेफ्ट’ नावाची तेल कंपनी एका पैशाला विकत घेतली होती. त्यांच्या संपत्तीमध्ये जगातील तिसरी सर्वांत लांब नौका आहे, जी गेल्या आठवड्यात ब्रिटिश व्हर्जिन बेटांवरून निघाली होती. यासोबत त्यांची सोलारिस नावाची आणखी एक नौका बार्सिलोनाच्या किनाऱ्यावर आहे.

..................................................................................................................................................................

उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअ‍ॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...

हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal

................................................................................................................................................................ 

ओलेग डेरिपाक्सा यांच्याकडे आधी २८ अब्ज डॉलर्सची संपत्ती होती. ९०च्या दशकात त्यांनी अॅल्युमिनियमच्या व्यवसायातून भरपूर पैसा मिळवला आणि संपत्तीचे शिखर गाठले. ते मनी लाँड्रिंग, लाचखोरी, खंडणी आणि गटबाजीमध्ये गुंतलेले असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. पुतीन पंतप्रधान असताना सेचिन उपपंतप्रधान होते. आता ते रशियाच्या ‘रोझनेफ्ट’ या महाकाय तेल कंपनीचे मालक आहेत. प्योट्र इव्हान हे पुतीन यांच्या सर्वांत जवळच्या लोकांपैकी एक असल्याचे मानले जाते. तसेच मिखाईल फ्रीडमनला पुतीन यांचे अंतर्गत व्यवहार चालवणारी व्यक्ती मानली जाते. या दोघांनी रशियातील सर्वांत मोठी खाजगी क्षेत्रातील ‘अल्फा बँक’ तयार केली आहे.

फ्रीडमनची एकूण संपत्ती सुमारे १२ अब्ज डॉलर असल्याचे सांगितले जाते. ते लंडनमधील लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंडला लागून असलेल्या एका आलिशान बंगल्यात राहतात. त्याच्याकडे लंडनमध्ये ‘ॲथलॉन हाऊस’ नावाची आणखी एक मोठी मालमत्ता आहे. ती त्यांनी २०१६मध्ये ६५ दशलक्ष पौंडसला विकत घेतली होती.

याप्रमाणे केवळ अमेरिका, इंग्लंड यांनीच नव्हे, तर नाटो गटात सामील असलेल्या जपानसह इतरही देशांनी रशियन कॉर्पोरेट कंपन्यांवर, त्यांच्या मालकांवर वरील निर्बंध लादले आहेत. इतकेच केवळ नव्हे, तर जे देश वा व्यक्ती अशा श्रीमंत रशियन लोकांच्या मालमत्ता लपवण्यास मदत करतील, त्यांच्यावरदेखील कारवाई केली जाईल, असाही दम दिला आहे.

जपान सरकारने आणखी १७ रशियन नेते, व्यापारी आणि त्यांच्या कुटुंबीयांवर बंदी घातली आहे. यामध्ये रशियन संसदेचे ११ सदस्य, बँकर युरी कोवलचुक, त्यांचे नातेवाईक आणि अब्जाधीश विक्ट वेकेल्सबर्ग यांचा समावेश आहे. जपानने आतापर्यंत ६१ जणांवर बंदी घातली असून त्यांची मालमत्ता जप्त केली आहे. ऑस्ट्रेलियानेसुद्धा अशीच कारवाई केली आहे.

आता असा प्रश्न निर्माण होतो की, स्वतः पुतीन, त्यांच्याभोवती असलेला त्यांचा गोतावळा, त्यांचे दोस्त व मित्रमंडळी, ज्यांचा आंतरराष्ट्रीय क्षेत्रात दबदबा आहे, ज्यांच्या जगभर बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत, एकंदर अर्थव्यवस्थेवर ज्यांची पकड आहे, अशा पुतीनसह त्यांच्या दोस्त मित्रांची निर्मिती कोणी, कधी व कशी केली, हा महत्त्वाचा प्रश्न आहे.

रशियामध्ये १९१७ साली कामगार क्रांती झाली, तिने राजे-सरंजामदारांचा सर्व जमीन-जुमला जप्त करून त्याचे भूमिहीन शेतमजूर व गरीब कष्टकरी शेतकऱ्यांत वाटप केले होते. त्या उपरही ज्या जमिनी उरल्या होत्या, त्यावर सरकारी व सहकारी सामूहिक मालकी स्थापन करण्यात आली होती. भांडवलदारांच्या मोठे कारखान्यांचे व उद्योगधंद्द्यांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले होते. कामगार वर्गाच्या अधिपत्याखाली पंचवार्षिक योजनांच्या साहाय्याने नंतरही बरीच प्रगती करण्यात आली. त्या वेळेस बडे कारखानदार, बहुराष्ट्रीय कंपन्या तेथे अस्तित्वात नव्हत्या किंवा त्यांना अस्तित्वात येण्याची कोणतीही संधी उपलब्ध नव्हती. पण अमेरिकादी भांडवली राष्ट्रांनी सीआयएच्या मदतीने उत्पादन साधनांवरील खाजगी मालकीविरुद्ध असलेल्या कम्युनिझमविरुद्ध मोहीम आखून सोव्हिएत युनियनमधील कम्युनिस्ट सत्ता उखडून टाकली.

सोवियत युनियनमध्ये १९९१पर्यंत कशी का असेना, पण कम्युनिस्ट पक्षाची सत्ता होती. कम्युनिझम म्हणजे भांडवलशाहीचा व त्याच्याच पुढची अवस्था असलेल्या साम्राज्यशाहीचा कट्टर शत्रू. सोवियत युनियनमधील कम्युनिस्ट सत्ता उदध्वस्त करण्यासाठी जी काही कट-कारस्थाने केली गेली, त्याच्या परिणामी तेथे सुरुवातीला येल्तसिन, नंतर गोर्बाचेव यांच्या राजवटी स्थापन करण्यात आल्या. गोर्बाचेव यांनी कम्युनिस्ट पक्ष बरखास्त केला. पुढे चालून सोव्हिएत युनियनचा घटक असलेली बाल्कन राष्ट्रे फुटून निघून नाटोमध्ये सामील झाली. युक्रेनही त्याच गटाचा भाग होता. तोही फुटून निघाला. त्याचा दोष पुतीन यांनी कॉम्रेड लेनिन व त्यांच्या कम्युनिस्ट पक्षाला दिलेला आहे. त्यांच्या मते सोवियत युनियनच्या घटनेतच कॉम्रेड लेनिन यांनी अशा राष्ट्रांना फुटून निघण्याची घटनात्मक तरतूद केलेली होती. ती केली नसती तर युक्रेनसारखी राष्ट्रे फुटून निघाली नसती. कॉम्रेड लेनिन यांनी व कम्युनिस्ट पक्षानेही फार मोठी घोडचूक केली आहे. तिचे परिणाम आता रशियाला भोगावे लागत आहेत, असे पुतीन यांचे म्हणणे आहे.

सोविएत युनियनचे विघटन करण्यात आणि तेथील कम्युनिस्ट राजवटीला विरोध करण्यात अमेरिका व नाटो राष्ट्रे व सीआयए ही अमेरिकन गुप्तहेर संघटना सक्रिय सहभागी होती. सोविएत युनियनमधील कम्युनिस्ट राजवट कोसळवल्यानंतर तेथे नवीन आर्थिक व औद्योगिक धोरण राबवण्यात आले. त्यालाच ‘जागतिकीकरणाचे धोरण’ म्हणतात. त्यानुसार सार्वजनिक क्षेत्रातील मोठमोठे उद्योगधंदे, कारखाने, शेतजमिनी, तेलाच्या खाणी, विहिरी, तेल कंपन्या, वायू गॅस कंपन्या, संचार माध्यमे इत्यादींचे खाजगीकरण करण्याचा सपाटा आधी गोर्बाचेव व नंतर येल्तसीन यांनी लावला. येल्तसीन यांनीच आपला राजकीय वारस म्हणून पुतीन यांचे नाव जाहीर केले होते. त्यांनीही हेच धोरण चालू ठेवले.

हेच धोरण अमेरिकेच्या वर्चस्वाखाली असलेल्या आंतरराष्ट्रीय नाणेनिधी व जागतिक बँकेने आधीपासूनच राबवण्यास सुरुवात केली होती. या खाजगीकरणाच्या सपाट्यामध्ये त्या वेळेस  काही छोट्या-मोठ्या व लंदी-फंदी व्यक्ती होत्या, कम्युनिस्ट पक्षांमध्ये काही विशिष्ट पदावर गेलेले पदाधिकारी व राजकारणी होते. त्यांनी सरकारी मालमत्ता अत्यंत कवडीमोल किमतीने स्वतःच्या खाजगी मालकीत घेणे सुरू केले.

आता ज्यांच्यावर अमेरिका, इंग्लंड, जपान व युरोपियन युनियन इत्यादींनी बंधने घातली आहेत, ज्यांची संपत्ती जप्त करण्याचे व बँक अकाउंटस गोठवण्याचे जाहीर केले आहे, या सर्व बहुराष्ट्रीय कॉर्पोरेट घराण्यांची निर्मिती ही सार्वजनिक मालमत्तेचे खासगी मालमत्तेत रूपांतर करण्याच्या प्रक्रियेतूनच निर्माण झालेली आहे.

तसे पाहिल्यास जगभरातील विविध देशांत अशी काही ठराविक कॉर्पोरेट घराणी आहेत. त्यांचा जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठा दबदबा आहे. आपापल्या देशातील नैसर्गिक साधनसंपत्तीवर त्यांचा कब्जा आहेच, पण आपल्या देशाच्या सीमा ओलांडून जगाच्या इतरही देशांमध्येही त्यांचा कारभार चालत असल्यामुळे, वस्तूंचे उत्पादन-वितरण त्यांच्याच मालकीच्या कंपन्यांकडे असल्याचे दिसते. या कॉर्पोरेट घराण्यांचा युद्धांतून फायदा होतो. त्यासाठी ही घराणी अशी युद्धे जगातील इतर देशांवर लादत असतात. उदाहरणार्थ, अमेरिकेने इराक, सिरिया, लिबिया यांसारख्या वेगवेगळ्या देशांवर लादलेल्या युद्धात अमेरिकेतल्या अशाच कॉर्पोरेट घराण्यांचा फायदा झालेला आहे.

युक्रेनसोबतच्या युद्धातून रशियामधल्या कोणत्या कॉर्पोरेट घराण्याचा आणि त्यांच्या कंपन्यांचा फायदा होणार, याची त्यांना माहिती असल्यामुळे आता त्यांनी त्यांच्यावर बहिष्कार घालत निर्बंध लादले आहेत.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

सध्याच्या रशिया-युक्रेन युद्धातून १) अमेरिकादी नाटो राष्ट्रांनी आपल्याकडे बऱ्याच दिवसांपासून पडून असलेली निकृष्ट दर्जाची शस्त्रास्त्रे व युद्धसामग्री युक्रेनला विकून त्यातून पैसे कमावले आहेत. जर्मनीने तर सैनिकांची हेल्मेटसही युक्रेनला विकली आहेत.

२) रशियातील कॉर्पोरेट घराण्यांची इतर देशांतील जी अब्जावधी डॉलर्सची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. त्यातूनही या नाटो देशांचाच फायदा होणार आहे.

३) जेव्हा कधी हे युद्ध थांबेल, त्यानंतर युक्रेनची पुनर्ऊभारणी करण्याच्या नावाखाली जी कंत्राटे या नाटो देशातील बिल्डरांना, तेथील कॉर्पोरेट कंपन्यांना मिळतील, त्यामुळे या देशातील सिमेंट, लोखंड इत्यादी कंपन्यांना चांगली मागणी येईल. त्यातून यांच्या अर्थव्यवस्थेला गती मिळेल आणि अब्जावधी डॉलर्स कमावले जातील.

थोड्यक्यात या युद्धात अमेरिकादी नाटो राष्ट्रांनी स्वतःच्या फायद्यासाठी युक्रेनला ‘बळीचा बकरा’ बनवले आहे.

.................................................................................................................................................................

लेखक कॉ. भीमराव बनसोड मार्क्सवादी कार्यकर्ते आहेत. 

bhimraobansod@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

अभिनेते दादा कोंडके यांच्या शब्दांत सांगायचे, तर महाराष्ट्राचे राजकारण, समाजकारण, संस्कृतीकारण ‘फोकनाडांची फालमफोक’ बनले आहे

भर व्यासपीठावरून आईमाईवरून शिव्या देणे, नेत्यांचे आजारपण, शारीरिक व्यंग यांवरून शेरेबाजी करणे, महिलांविषयीच्या आपल्या मनातील गदळघाण भावनांचे मंचीय प्रदर्शन करणे, ही या योगदानाची काही ठळक उदाहरणे. हे सारे प्रचंड हिंस्त्र आहे, पण त्याहून हिंस्र, त्याहून किळसवाणी आहे- ती या सर्व विकृतीला लोकांतून मिळणारी दाद. भाषणाच्या अखेरीस ‘भारत ‘माता’ की जय’ म्हणणारा एक नेता विरोधकांच्या मातेचा उद्धार करतो. लोक टाळ्या वाजतात. .......

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ मराठी भाषेला राजकारणामुळे का होईना मिळाला, याचा आनंद व्यक्त करताना, वस्तुस्थिती नजरेआड राहू नये...

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ लावून मराठीत किती घोडदौड करता येणार आहे? मोठी गुंतवणूक कोण करणार? आणि भाषेला उर्जितावस्था कशी आणता येणार? अर्थात, ही परिस्थिती पूर्वीपासून कमी-अधिक फरकाने अशीच आहे. तरीही वाखाणण्यासारखे झालेले काम बरेच जास्त आहे, पण ते लहान लहान बेटांवर झालेले काम आहे. व्यक्तिगत व सार्वजनिक स्तरावरही तशी उदाहरणे निश्चितच आहेत. पण तुकड्या-तुकड्यांमध्ये पाहिले, तर ‘हिरवळ’ आणि समग्रतेने पाहिले (aerial view) तर ‘वाळवंट.......

धोरणाचा ‘फोकस’ बदलून लहान शेतकरी, अगदी लहान उद्योग आणि ग्रामीण रस्ते, सांडपाणी व्यवस्था, शाळा, आरोग्य सुविधा, वीज, स्थानिक बाजारपेठा वगैरे केंद्रस्थानी आल्या पाहिजेत...

महाराष्ट्रात १५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांपैकी ६० टक्के लोक रोजगारात आहेत. बिहारमध्ये हे प्रमाण ४५ टक्के आहे. यातील महत्त्वाचा फरक महिलांबाबत आहे. बिहारमध्ये महिला रोजगारात मोठ्या प्रमाणात नाहीत. परंतु महाराष्ट्रात जे लोक रोजगारात आहेत आणि बिहारमधील जे लोक रोजगारात आहेत, त्यांच्या रोजगाराच्या स्वरूपात महत्त्वाचे फरक आहेत. ग्रामीण बिहारमधील दारिद्र्य ग्रामीण महाराष्ट्रापेक्षा कमी आहे.......