“डोन्ट अंडरएस्टीमेट द स्टुपीडिटी ऑफ द मॅनकाइंड.”
(मानवजातीच्या मूर्खपणाला कमी लेखू नका.)
“ऐ शरीफ इंसानो! जंग टलती रहे तो बेहतर हैं
आप और हम सभीके आंगन में शमा जलती रहे तो बेहतर हैं”
पहिलं विधान आहे जगप्रसिद्ध लेखक व विचारवंत युव्हाल नोआ हरारी यांचं. ते रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी युक्रेनवर केलेल्या आक्रमणाच्या संदर्भातील आहे, तर दुसरे महान कवी व शायर साहिर लुधियानवी यांच्या एका कवितेच्या दोन ओळी आहेत. त्यामध्ये हा कलावंत जगातील सभ्य माणसे आणि समाजास कळवळून सांगत आहे की, युद्ध टाळलं गेलं तर चांगलं आहे. कारण युद्ध हीच एक समस्या आहे. मानवतेसाठी शांती हवी, युद्ध नको, असा संदेश देणारी ती कविता आहे .
गेले १५ दिवस साऱ्या जगाचे नित्यकर्म आणि चलनवलन नेहमीसारखे चालू आहे, पण एक अस्वस्थता जगभरातील करोडो लोकांच्या मनात भरून राहिली आहे. आणि एक प्रश्न विचारी माणसांना पडला आहे- तो म्हणजे आजच्या जगात छोट्या व छोटे सैन्य असणाऱ्या देशांचे सार्वभौमत्व मिटवण्याचा अधिकार मोठा बलाढ्य देशाला असतो? मानवी संस्कृतीने मागील काही हजार वर्षात शांततामय सहअस्तित्वाचे जे नीतिनियम घडवले आहेत आणि दुसऱ्या महायुद्धानंतर युनोने जगातील स्वतंत्र व सार्वभौम देशांचे परस्परसंबंध कसे असावेत, याबाबतची जी आचारसंहिता प्रस्थापित केली, ती एवढी तकलादू आहे?
..................................................................................................................................................................
.................................................................................................................................................................
छोटा देश स्वतंत्रपणे वागतो, निर्णय घेतो म्हणून बड्या देशाला त्यांच्यावर आक्रमण करायला रोखू शकत नाही? आज रशियाने युक्रेनवर लादलेल्या युद्धाने हा सर्वांत मोठा नैतिक, तात्त्विक आणि त्याहून अधिक छोट्या व कमी सामरिक शक्ती असणाऱ्या देशांच्या स्वतंत्र अस्तित्वाचा प्रश्न आपण सर्वांपुढे उभा केला आहे. गेल्या १५ दिवसांत दूरचित्रवाणीच्या छोट्या पडद्यावर जो अमानुष विध्वंस आपण सारे श्वास रोखून अस्वस्थपणे पाहात आहोत, त्याने या प्रश्नाचे गांभीर्य अधिकच गडद झाले आहे.
कोणी कितीही बौद्धिक काथ्याकूट केला तरी रशियाचे युक्रेनवरील आक्रमण हे महासत्तेच्या अहंकारी मानसिकतेचे व आपल्या प्रभावक्षेत्रातील देशांनी (हे प्रभावक्षेत्र कोणी ठरवले? त्याला कोणता नैतिक व कायदेशीर अधिकार आहे?) आपल्या मर्जीने वागावे, या वर्चस्ववादी विचारांचे द्योतक आहे, हे स्पष्ट आहे. युक्रेन जर नाटो देशात सामील झाला, तर आपल्या देशाला धोका उत्पन्न होऊ शकतो, हा रशियाचा शुद्ध कांगावा आहे. कारण आर्थिक नसली तरी रशिया ही जगातली अमेरिका आणि चीनबरोबरची लष्करी महासत्ता आहे. अत्याधुनिक हत्यारे आणि प्रचंड प्रमाणात असलेल्या आण्विक अस्त्रांमुळे अमेरिका, चीन आणि रशिया या तिन्ही देशांच्या सार्वभौमत्वाला आणि भूभागाच्या अखंडतेला जगातील इतर कोणता देश आव्हान देईल, हे केवळ अशक्य आहे.
असं फार तर केवळ उत्तर कोरियाचा किंग जोंग ऊनसारखा वेडा राष्ट्रप्रमुख करू शकेल, पण त्याचा बंदोबस्त क्षणार्धात हे तीन बडे सामरिक शक्तिशाली देश करू शकतात. त्यामुळे युक्रेन जर नाटोमध्ये सामील झाला तर आपल्या देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण होईल म्हणून युक्रेनला धडा शिकवण्यासाठी युद्ध पुकारलं, हे रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीनने दिलेले कारण तद्दन हास्यास्पद आहे.
खरं कारण वेगळं आहे. पूर्वीच्या सोविएत युनियन किंवा सतराव्या-अठराव्या शतकातील रशियन साम्राज्यवादासारखा जगावर पुन्हा आपला प्रभाव प्रस्थापित व्हावा आणि जागतिक सत्ता व्यवस्थेत पूर्वीच्या शीतयुद्धाच्या कालखंडासारखे अमेरिकेप्रमाणे (आता त्यात चीनही वाटेकरी झाला आहे) आपलेही समप्रमाणात प्रभावक्षेत्र असावे, ही पुतीन यांची महत्त्वाकांक्षा आहे. जगाचा सत्ता समतोल आर्थिक मार्गाने आपल्या सहभागाविना (आर्थिक शक्ती कमकुवत असल्यामुळे) जो आज साधला जात आहे, त्याला लष्करी सामर्थ्याने छेद देत तो केवळ अमेरिका आणि चीन असा दोन ध्रुवीय न राहता आपल्यासह त्रिकोणी व्हावा, हे रशियाचे युद्ध पुकारण्यामागचे खरे कारण आहे.
पण एकेकाळी अमेरिकेशी सत्तास्पर्धा करताना पुरेसा आर्थिक विकास न झाल्यामुळे सोवियत युनियनचे विघटन होऊन युक्रेनसह १५ नवे देश जगाच्या नकाशावर अस्तित्वात आले, या इतिहासाचे पुतीनला झालेले विस्मरण, सुरुवातीला उदधृत केलेल्या युव्हाल नोआ हरारीच्या विधानाची सत्यता पटवणारे आहे. कारण हे युद्ध पुतीनच्या वेड्या साहसचे नमुनेदार उदाहरण आहे.
सोविएत युनियनच्या विसर्जनानंतर १९९१ साली युक्रेन एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून अस्तित्वात आले, तेव्हा या राष्ट्राच्या सर्वभौमत्वाची आणि रक्षणाची हमी अमेरिका व रशियाने १९९४ साली झालेल्या ‘बुडापेस्ट करारा’ने घेतली होती. म्हणून युक्रेनने आपल्या जवळची दोन हजाराच्या आसपास असणारी अण्वस्त्रे रशियाला परत केली. बुडापेस्ट कराराला युनोच्या सुरक्षा परिषदेचे उर्वरित तीन स्थायी सदस्य ब्रिटन, फ्रान्स आणि चीनने मान्यता दिली होती. म्हणजेच या पाच बड्या देशांनी युक्रेनच्या रक्षणाची व संरक्षणाची जबाबदारी स्वीकारली होती. पण त्यानंतर आपले सामरिक सामर्थ्य वाढवत आज युनोच्या जागतिक शांततेच्या चार्टरला गुंडाळून ठेवत रशियाने युक्रेनवर उघड आक्रमण केले आहे. त्यामुळे युनोच्या अस्तित्वावर आणि उपयुक्ततेवर एक प्रकारचे प्रश्नचिन्ह लागले आहे.
सुरक्षा परिषदेच्या राशियासह सर्व पाच देशांची युक्रेनला दिलेले संरक्षणाचे वचन न पाळल्यामुळे त्यांची विश्वासार्हता पूर्णपणे धुळीस मिळाली आहे. या पुढे बड्या राष्ट्राच्या वा युनोसारख्या संघटनेच्या शब्दावर छोटे देश कसा विश्वास ठेवतील? समजा युक्रेनने त्या वेळी काही अण्वस्त्रे स्वतःकडे ठेवून घेतली असती, तर रशियाचे असे युद्ध पुकारण्याचे दु:साहस झाले असते? म्हणजेच जगाचा ठेका घेणाऱ्या सुरक्षा परिषदेच्या पाच देशांना वेगळे नियम व अन्य देशांना वेगळे नियम, अशी जी विषम अन्यायी व्यवस्था प्रस्थापित झाली आहे, त्यामुळे युनोला शक्तीविहिन आणि केवळ चर्चा, आवाहन करणारी दिवाणखान्यातली संघटना असे स्वरूप प्राप्त झाले आहे.
तसेच ती सुरक्षा परिषदेच्या स्थायी समितीच्या पाच स्थायी देशांच्याच हितांचे रक्षण करणारी संस्था झाली आहे. ती युक्रेनचे आज संरक्षण करू शकत नाही व यापुढेही कुणा बड्या देशाच्या आक्रमणापासून बचाव करू शकणार नाही, हे नग्न सत्य ठसठशीतपणे अधोरेखित झाले आहे.
..................................................................................................................................................................
अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5312/Checkmate
..................................................................................................................................................................
पुतीनचे असे अतार्किक स्वरूपाचे मत होते की, युक्रेन हे स्वतंत्र राष्ट्र कधीच नव्हते; तर तो रशियन साम्राज्याचा भाग होता आणि युक्रेनला स्वतंत्र देश मानणे ही लेनिनची चूक होती. त्यामुळे आपण विद्युतवेगाने चढाई करून दोन-तीन दिवसांत युक्रेन पादाक्रांत करू आणि त्याचा राष्ट्राध्यक्ष झेलेन्सकीला पदच्युत करून त्याजागी कळसूत्री बाहुला बसवू. म्हणजे तो आपला अंकित म्हणून राहील. पण दोन आठवडे झाले तरी रशियाला अपेक्षित यश मिळाले नाही, कारण युक्रेनचे केवळ सैन्यच नाही, तर सामान्य नागरिकही शर्थीने लढत आहेत. त्याने हे सिद्ध केलं आहे की, युक्रेन हे स्वतंत्र राष्ट्र आहे व त्याला रशियाचा भाग वा उपग्रह म्हणून कदापीही राहायचे नाही.
या १५ दिवसांत सारे जग व जनमतही रशियाविरुद्ध गेलं आहे. त्यामुळे ही लढाई रशिया निर्विवादपणे हरला आहे. उद्या तो युक्रेनचा भूभाग जिंकेलही, पण युक्रेनचे नागरिक रशियाची गुलामी सहन करतील असे वाटत नाही. सोव्हिएत युनियनला अफगाणिस्तानमधून १० वर्षांनी आणि अमेरिकेला प्रखर व सातत्यपूर्ण प्रतिकारापुढे अगतिक होत २० वर्षांनी परत माघारी फिरावं लागलं, त्या इतिहासाची पुनरावृत्ती युक्रेनमध्येही उद्या होऊ शकते. त्यात युक्रेन लोकशाहीवादी व आधुनिक देश आहे, तालिबान्यासारखा कट्टर धर्मांध नाही. त्यामुळे जागतिक जनमत त्याच्या बाजूने मोठ्या प्रमाणात राहील, हे नक्की.
पण आता पुतीन यांनी अपेक्षित यश मिळत नसल्याचे पाहून अण्वस्त्रे वापरण्याची प्रच्छन्न धमकी दिलीय. त्यामुळे जग चिंताक्रांत झालंय. कदाचित युक्रेनचे मनोधैर्य खच्ची करावे, असा हेतू असावा, असे मानण्यास जागा आहे. पण या युद्धाने जे दोन प्रश्न ऐरणीवर आले आहेत, त्यांचा गंभीरपणे विचार केला पाहिजे.
दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिका व नाटो कराराने बांधले गेलेले युरोपीय देश आणि विशाल सोव्हिएत युनियन, असे जगाचे द्वि-ध्रुवीकरण झाले होते. पण यापासून पं. नेहरू, नासिर व टिटो या तीन राष्ट्रप्रमुखांनी तटस्थ राहायचे ठरवून नैतिक आणि सैद्धांतिक पायावर ‘नाम’ (नॉन अलाईन मूव्हमेंट) नामक चळवळ व अलिप्ततावादी गट उभा केला.
प्रत्येक देश, मग तो छोटा असो की मोठा, सार्वभौमत्व आणि स्वतंत्रपणे निर्णय घेण्याचा अधिकार प्रत्येक देशाचा मूलभूत अधिकार आहे. ‘नाम’ गटामागे नैतिक बळ असलं तरी हे देश वसाहतवादाच्या जोखडातून १९५०च्या दशकात नुकतेच स्वतंत्र झाले असल्यामुळे त्यांची आर्थिक व सामरिक शक्ती मर्यादित होती, तरीही दुसऱ्या महायुद्धाच्या विध्वंसानंतर काही दशके शांततामय सहस्तित्वाचे महत्त्व जागतिक मानसिकतेत रुजवण्यात ‘नाम’ यशस्वी झाली होती, हा ताजा इतिहास आहे. पण अमेरिका आणि सोव्हिएत युनियनच्या जागतिक वर्चस्वाच्या संघर्षामुळे प्रत्येक देशाला स्वतःचे सामरिक सामर्थ्य वाढवणे आणि आर्थिक विकास जलदगतीने करणे, यावर भर देणे आवश्यक वाटू लागले. त्यामुळे विविध देशांना शस्त्रास्त्र निर्यात करून पुन्हा याच दोन महासत्तांचे अर्थकारण आणि पर्यायाने महत्त्व अधिकच वाढत गेले. पण प्रथम चीन, मग भारत, ब्राझील, दक्षिण आफ्रिका आणि युरोपियन युनियनच्या प्रगतीने नवे शतक येतायेता जग बहुधृवीय होत गेले.
आता युक्रेन युद्धामुळे पुन्हा एकदा एकीकडे अमेरिका व नाटो देश आणि दुसरीकडे रशिया व चीन अशी द्वि-धृवीय व्यवस्था करण्याची पुतीन आणि शी जीन पिंग यांची महत्त्वाकांक्षा आहे. नव्वदच्या दशकापर्यंत असताना अमेरिकेने व रशियाने अनेक देशांत सत्तापालट घडवून आणत आपले प्यादे बसवण्याचे प्रयत्न कितीदा तरी केला आहे. म्हणजेच स्वतःला महासत्ता मानणाऱ्या या दोन देशांनी (त्यात आता चीनचा समावेश करावा लागेल) कोणत्या देशात कोणत्या विचाराचे सरकार असावे, हे ठरवण्याचा अधिकार स्वतःकडे राखत युनोच्या सिद्धान्ताचा किती वेळा तरी भंग केला आहे.
..................................................................................................................................................................
उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...
हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal
................................................................................................................................................................
दुसऱ्या महायुद्धानंतर जपान आणि जर्मनीने आपल्या देशाची पुनर्बांधणी केली आहे. उद्या युक्रेनही करेल, यात शंका नाही. पण जगाची व्यवस्था आणि रचना आपल्या मर्जीने घडवण्याचा आणि राखण्याचा, त्यासाठी दुसऱ्याला काटशह देण्याचा प्रयत्न करणे आणि त्याचे बळी छोटे देश ठरवणे हे दुष्टचक्र काही थांबायला तयार नाही. तेव्हा साहिर लुधियानवी यांनी जगनियंत्याकडे कळवळून ‘बलवनों को दे दे ज्ञान’ आणि निर्बलांना सामर्थ्य दे, असं विनावतो.
युनोचा जन्म युद्ध नको, शांततामय सहस्तित्व हवे आणि मानवी हक्कांची रक्षा करणारी जागतिक व्यवस्था असावी म्हणून झाला. पण युनोत फक्त पाच सदस्य नकाराधिकार असलेली आणि मूठभरांना जागतिक व्यवस्था सुरळीत राखण्याचा ठेका देणारी जी सुरक्षा परिषद निर्माण झाली, ती आज जागतिक शांतता आणि मानवतेसाठी मारक ठरताना दिसत आहे. ही सुरक्षा परिषद बरखास्त करून युनोच्या सर्व देशांचा सहभाग असलेल्या आमसभेला अधिक बळकट करण्याची गरज आहे. पण हे कसं होणार?
दुसरा ऐरणीवर आलेला प्रश्न म्हणजे पुढील काळात अण्वस्त्रधारी होण्याची विविध देशांत स्पर्धा लागण्याची शक्यता आहे. युक्रेनवरील रशियाच्या हल्ल्याने ही शक्यता ठसठशीतपणे अधोरेखित झाली आहे. युक्रेन, जर्मनी या देशांनी स्वरक्षणासाठी भविष्यात अण्वस्त्रे असावीत असे वाटून ती निर्माण करण्याचा निर्णय घेतला तर त्यांना दोष कसा देत येईल? जपान, तैवान, इराण आदींच्या सुरक्षेला असलेला या तीन महासत्तांचा धोका पाहता, तेही अण्वस्त्रांच्या शर्यतीत उतरणार नाहीत हे कशावरून?
समजा हे देश उद्या अण्वस्त्रसज्ज झाले, तर ते या तीन लष्करी महासत्तांप्रमाणे वर्चस्ववादी भूमिकेतून वागणार नाहीत, याची कोण हमी देणार? जपान आणि जर्मनीचा काळा व रक्तरंजित साम्राज्यवादी आणि विस्तारवादी इतिहास फार जुना नाहीय. पुन्हा धर्मांध गट किंवा नॉन स्टेट अॅक्टर्स यांची संख्या व प्रभाव वाढतच आहे. त्यांच्या हाती अशी संहारक अण्वस्त्रे पडली तर? त्यामुळे जगात अण्वस्त्रधारी देशांची संख्या वाढणे आणि धर्मांध अतिरेकी गटांच्या हाती ती पडणं, हे अशुभ वर्तमान जागतिक शांतता, सहअस्तिव आणि मानवतेसाठी धोकादायक आहे.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
सारे देश अण्वस्त्रसंपन्न समज झाले तर जग अधिक शांततामय होईल? नाही. जसे सामुदायिक मानवी शहाणपण आहे, तसेच समूहाचे आंधळे वेडेपणसुद्धा आहेच की! धर्म, रंग व वंशांच्या श्रेष्ठत्वाच्या अहंगंडाने क्रूर अंध झालेले देश वा गट - नॉन स्टेट अॅक्टर्स अहंकारी व अहम ब्रह्मस्मिच्या मानसिकतेच्या मूर्खपणातून न्यूक्लियर बटन दाबू शकणार नाहीत कशावरून? त्यामुळे हा काही जागतिक शांततेचा मार्ग असू शकत नाही. मग एकच मार्ग उरतो, तो म्हणजे पूर्ण जग अण्वस्त्रमुक्त होणं होय!
या प्रश्नांना नजीकच्या भविष्यात उत्तर सापडेल असे वाटत नाही. कारण कवी प्रदीप म्हणतात त्याप्रमाणे ‘बारुद के ढेर पे बैठी हैं ये दुनिया । अॅटम बंब के जोर पर ऐठी हैं दुनिया’ हे आजचं कटू वास्तव आहे. या मानवी वेडेपणातून भविष्यात तिसरे महायुद्ध होता कामा नये. त्यासाठी साहिरचा एका कवितेच्या पुढील दोन ओळीं मार्ग दाखवू शकतात, त्या मनापासून आचरू या-
“आवो! इस तीरा- बख्त दुनिया में फिक्र कि रोशनी को आम करे।
अमन को जिन से तकवियत पहुंचे,ऐसी जंगों का एहतमाम करे।”
(या! या अभागी जगात विचार आणि कल्पनेचा प्रकाश फैलावू या.
ज्यानं विश्वशांतीला बळ मिळेल, अशा युद्धाचा बंदोबस्त करू या!)
.................................................................................................................................................................
लेखक लक्ष्मीकांत देशमुख कथा-कादंबरीकार आणि अ. भा. साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष आहेत.
laxmikant05@yahoo.co.in
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment