अजूनकाही
“Adversity causes some men to break; others to break records.”
― William Arthur Ward
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या नागराज मंजुळे यांच्या ‘झुंड’ या सिनेमाने अनेक वाद निर्माण केले, जे अपेक्षितच होतं. ‘झुंड’मध्ये भारतातील दुर्लक्षित म्हणता येईल, अशा अनेक गोष्टींवर भाष्य आहे. त्यातील महत्त्वाची गोष्ट मात्र बहुतेकांच्या लक्षात आली नाही. ती म्हणजे खेळ, व्यायाम आणि त्यातून होऊ शकणारं व्यसनी लोकांचं व गुन्हेगाराचं पुनर्वसन.
१९५७ साली आलेल्या ‘दो आँखें बारा हाथ’ या सिनेमात व्ही. शांताराम यांनी ‘उघडा तुरुंग’ (Open Prison) ही वेगळी संकल्पना खूपच कल्पकतेनं सादर केली होती. तुरुंग, गुन्हेगार, पुनर्वसन या रटाळ व जगाला विटाळ असणार्या गोष्टी अप्रतिम गाणी व उत्कृष्ट सादरीकरणाच्या जोरावर प्रेक्षकांनी स्वीकारल्या. त्याच पठडीतला ‘झुंड’ आजच्या काळातील गुन्हेगार, व्यसनी व दुर्लक्षित अशा तरुणांची कथा आहे.
..................................................................................................................................................................
.................................................................................................................................................................
व्यसन सोडवण्यासाठी आणि मानवी मेंदूतील वेगवेगळ्या क्रिया सुधारण्यासाठी व्यायाम व खेळ यांचा वापर पाश्चात्य जगात बऱ्याच वर्षांपासून केला जातो. ६०च्या दशकात अमेरिकेचे अध्यक्ष जॉन केनेडी यांनी शाळांमधून व्यायामावर भर दिला, मात्र त्यानंतर तेथील शाळा व महाविद्यालयांमध्ये पुस्तकी अभ्यासावर भर दिल्यानं मुलांमध्ये अतिरिक्त वजन, विविध व्यसनं यांचं प्रमाण वाढून त्यांचं शाळेतील लक्ष कमी होऊन त्याचा परिणाम त्यांच्या निकालावर व सर्वांगीण प्रगतीवर दिसू लागला.
Paul Zientarski हे एक अमेरिकन शिक्षक आहेत. ते गेल्या ४० वर्षांपासून शारीरिक शिक्षण हा विषय शिकवत असून त्यांनी त्यांच्या शाळेतील मुलांचा अभ्यासातील घसरता दर्जा बघून त्याची कारणं काय असावीत, यावर अभ्यास केला. त्यांनी संशोधन करून एक नवीन कार्यक्रम तयार केला. त्यांच्या लक्षात आलं की, अतिरिक्त वजन व सतत बसून मुलांच्या बौद्धिक क्षमतांवर परिणाम झाला आहे. या मुलांना शारीरिकदृष्ट्या सक्रिय केल्यास त्यांच्या मानसिक व बौद्धिक कामगिरीवर सकारात्मक परिणाम होईल. प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आलेल्या या कार्यक्रमामुळे अनेक चांगले परिणाम दिसू लागले.
यापूर्वी व्यसनमुक्तीच्या कार्यक्रमात व्यायाम व खेळ यांचा इतर औषधांसोबत एक जोड म्हणून वापर केला जायचा, मात्र बौद्धिक प्रगतीसाठी व्यायाम उपयोगी ठरतो, हे या प्रयोगानं सिद्ध केलं.
न्यूयॉर्क शहरात ‘ओडिसी’ नावाचं एक व्यसनमुक्ती केंद्र आहे. त्यात धावणे व धावण्याच्या शर्यतीत भाग घेणे, हा व्यसनमुक्तीचा महत्त्वाचा भाग आहे. कधी काळी संघटनात्मक गुन्हेगारी जगाचा हिस्सा असलेली राहुल जाधव नावाची एक व्यक्ती, व्यसनमुक्त होऊन अल्ट्रा मॅरेथॉन धावते.
अधिक माहितीसाठी पहा -
https://www.nytimes.com/2018/11/01/nyregion/marathon-opioid-recovery-odyssey-house.html
व्यसनमुक्तीमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही असते की, व्यसन सुटल्यावर जी पोकळी निर्माण होते, ती भरून काढायला कोणत्याही खेळाचा चांगला उपयोग होतो. खेळात आक्रमकता सकारात्मक पद्धतीनं वापरली जाते. नकारात्मक ऊर्जा बाहेर काढण्यासाठी खेळ हा उत्तम उपाय आहे.
ऑलिम्पिक किंवा कोणताही पुरातन क्रीडाप्रकार हा मनोरंजन व युद्ध सुरू नसताना सैनिकांची रग जिरवायला कामात येत असे. युद्धावर नसताना सैनिकांना व योद्धा लोकांना सराव असावा म्हणून कुस्तीसारखे खेळ असत. युद्ध व कोणताही क्रीडाप्रकार हा बऱ्यापैकी सारखा असतो. हार-जीत, डावपेच, भावना व उपलब्ध असलेल्या संसाधनांचा वापर करतच लढणं व खेळणं शक्य असतं. त्यामुळे खेळ फक्त शारीरिक नसून तो मानसिक व बौद्धिकसुद्धा असतो.
‘झुंड’ या सिनेमात खेळ हा ‘Change Agent’ म्हणून काम करतो. समाजानं दुर्लक्षित केलेला एक हिस्सा आपला राग सुरुवातीला नासधूस करून बाहेर काढतो, मात्र फुटबॉलच्या रूपानं हाच समाजविरोधी राग सकारात्मक पद्धतीनं बाहेर निघतो. (‘लाथ मार’ हे गाणं या भावनेवर चपलख बसतं). फुटबॉल हा खेळ ‘झुंड’ म्हणून हिणवल्या गेलेल्या मुलांना नवीन समाजमान्य ओळख देतो, आत्मविश्वास देतो आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे जगण्याची योग्य दिशा देतो.
जगातील पेले, मॅराडोना, जोकोविच, मोहम्मद अली असे बहुतेक प्रतिभावान खेळाडू अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून आले आहेत. बहुतेक कृष्णवर्णीय खेळाडूंनी खेळाच्या माध्यमातून वर्णद्वेषाच्या लढ्याला उत्तर दिलं आहे. जगभरातील कृष्णवर्णीय खेळाडूंनी अत्यंत योग्य पद्धतीनं त्यांच्यावर झालेला अन्यायाला त्यांच्या खेळातून सर्वत्र पोहचवलं. वेस्ट इंडिजची आक्रमक क्रिकेट परंपरा समजून घेण्यासाठी ‘Fire in Babylon’ या लघुपटाचा उपयोग होतो.
सर्वच स्तरातील वाढत्या वयातील मुला-मुलींच्या शारीरिक व मानसिक बदलांना नीट हाताळण्यासाठी मैदानी खेळ उपयोगी आहेत. सुखवस्तू लोकांमध्ये वाढत्या वयातील मुलं व मुली यांच्यातील व्यसन हा मोठा चिंतेचा विषय आहे. मोबाईल, कॉम्पुटर यावर अवलंबत्व वाढल्यानं आणि आई-वडलांना वेळ नसल्यानं निम्न, मध्यम व श्रीमंत घरातील मुला-मुलींमध्ये वेगवेगळी व्यसनं आणि त्यातून होणारे गुन्हे, यांचं प्रमाण प्रचंड आहे. फक्त ते लोकलज्जेमुळे बाहेर दिसत नाही.
मुलं-मुली व्यसनी का होतात, या प्रश्नाचं उत्तर केवळ गरीब वस्तीतील पालकांनी शोधायची गरज नाही, तर त्याचा सर्वच स्तरातील पालकांनी विचार करण्याची गरज आहे. प्रेम व ओढ न मिळाल्याने कोणत्याही घरातील मुलं व्यसनी होतात. त्यामुळे ‘झुंड’ हा सिनेमा फक्त एका विशिष्ट वर्गापुरता मर्यादित नसून, सर्वच सामाजिक व आर्थिक वर्गातील लोकांचे डोळे उघडणारा आहे.
‘झुंड’ बघताना आणखी एक गोष्ट लक्षात राहते, ती म्हणजे चांगला गुरू लाभला तर कोणताही विद्यार्थी यश मिळवू शकतात. दुर्दैवानं एवढ्या चांगल्या पद्धतीनं विद्यार्थ्यांना कसलीही अपेक्षा न करता शिकवणं, यशासाठी प्रेरित करणं हे दुर्मीळ झालं आहे. त्यामुळे कोणत्याही क्षेत्रातील विद्यार्थी किंवा अगदी खेळाडूसुद्धा सैरभैर झालेले दिसतात. शिक्षकाची भूमिका समाज घडवणारी असावी, मात्र कोचिंग क्लास, बिनपगारी शिक्षक अशा विचित्र स्थितीत अडकलेले द्रोणाचार्य अर्जुन घडवू शकत नाहीत. कित्येक शिक्षक वैयक्तिक द्वेषातून चांगल्या विद्यार्थ्यांचं करिअर बरबाद करतात.
जाती व धर्म यात अडकलेला आपला समाज गुणवत्ता या निकषावर चांगले खेळाडू, कलाकार व इतर अनेक प्रकारचे तज्ज्ञ घडवण्यात अपयशी ठरला आहे. एका विशिष्ट समाजातून येणारीच नावं जर सगळीकडे दिसत असतील, तर त्या समाजाची मक्तेदारी उघडपणे स्पष्ट दिसते. निसर्ग मक्तेदारी निर्माण करत नाही. क्षमता व कौशल्य बहुतेक वेळा जात व धर्म न बघता जन्माला येतात, त्याला योग्य मार्गदर्शनाची जोड लाभली, तर महान खेळाडू, कलाकार किंवा तज्ज्ञ जन्माला येतात.
तुम्ही एखाद्या खेळावर किंवा कलेवर प्रेम करता, तेव्हा ती अवगत असणार्या व्यक्तीची जात किंवा धर्म बघत नाही, मात्र तुम्ही खेळ किंवा कला जात/धर्म यांच्या चष्म्यातून बघत असाल, तर मात्र तुम्ही स्वत:ला त्या खेळाचे चाहते म्हणवू घेऊ नये. ब्रिटिशांनी १९८३च्या क्रिकेट विश्वचषकाच्या वेळी भारतीय संघाला ज्या पद्धतीने हिणवलं होतं, त्याच ब्रिटिशांनी भारतीय संघानं विश्वचषक जिंकल्यावर शरमेनं मन खाली घातली होती!
Keren Shahar यांच्या प्रयोगातून हे सिद्ध झालं आहे की, लहानपणी आघात अनुभवलेल्या मुलांमध्ये खेळाच्या माध्यमातून राग व उतावळेपणावर नियंत्रण करता येतं. या प्रयोगात शिस्त, नाती जोडणं, समस्या सोडवणं यांसारख्या गोष्टींमध्ये खेळाद्वारे सुधारणा आढळून आली. मैदानी खेळ (विशेष करून सांघिक खेळ) हा लहान मुलांमध्ये भावनिक समस्या सोडवण्यासाठी जास्त उपयोगी असल्याचं, या व इतर अनेक प्रयोगांतून सिद्ध झाले आहे. खेळताना oxytocin नावाचं रसायन मेंदूत स्त्रवत असल्यामुळे नाती जोडण्याची आणि ती टिकवण्याची क्षमता वाढते. त्याचप्रमाणे सांघिक खेळामुळे belongingnessची जाणीव वाढीस लागून ओढ (attachment) वाढल्यानं व्यसनांचं प्रमाणही कमी होतं.
अधिक माहितीसाठी पहा -
https://onlinemasters.ohio.edu/blog/how-sports-can-be-therapeutic-for-students
‘झुंड’मध्ये दाखवलेली कथा वरील वैज्ञानिक प्रयोगांची पुष्टी करते. कोणतीही व्यक्ती आनंदानं व्यसन करत नाही किंवा मजा म्हणून चोरी करत नाही. ‘झुंड’च्या शेवटी अमिताभ बच्चन यांनी न्यायालयातील प्रसंगामध्ये अत्यंत योग्य पद्धतीनं व नाटकी न होता झोपडपट्टीतील गरीब मुलांचे प्रश्न समाजासमोर आणले आहेत. अशा मुलांना सरसकट पापी, गुन्हेगार न ठरवता सहसंवेदना वापरून त्यांना समजून कसं घ्यावं, हे ‘झुंड’मधून शिकायला मिळतं. (‘किचन कल्लाकर’ या कार्यक्रमात ‘झुंड’ची टीम आलेली असताना सूत्रधार संकर्षण कराडेच्या एका प्रश्नाला उत्तर देताना एका कलाकारानं ‘रेल्वेतून कोळसे चोरत होतो’, असं सांगितल्यावर त्याने लगेच प्रशांत दामलेंकडे बघून ‘बघितलं का महाराज?’ असा उपरोधिक प्रश्न विचारला. त्यावरून आपल्या मराठी कलाकारांची सहसंवेदना कोणत्या पातळीची आहे, हे लक्षात येतं. असाच उपरोधिक प्रश्न त्यांनी स्वर्गीय मिल्खा सिंग यांना विचारला असता का?).
गुन्हेगारीची पार्श्वभूमी असलेल्या व अभिनयाचा कोणताही अनुभव नसलेल्या कलाकारांनी काम केल्यानं ‘झुंड’ काळजाला भिडतो. कुठेही नाटकी वाटत नाही. रोज आपल्या सगळ्यांसमोर असलेले, मात्र न बघितलेले जग ‘झुंड’मधून पाहायला मिळते.
हा सिनेमा ज्यांवरून प्रेरित आहे, त्या डॉ. विजय बारसे यांनी ‘स्लम सॉकर’ नावाचा उपक्रम नागपुरात सुरू केला. त्याद्वारे व्यसन व गुन्हेगारीकडे वळलेल्या मुलांच्या पुनर्वसनानं काम सुरू आहे. अशा पद्धतीचे प्रयोग भारतात सर्वत्र राबवायला हवे. त्यामुळे खेळाद्वारे सर्वच वर्गातील भरकटलेल्या तरुणाईला नवीन दिशा मिळेल.
..................................................................................................................................................................
लेखिका डॉ. वृषाली रामदास राऊत मानसशास्त्रज्ञ आहेत.
vrushali31@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment