‘दारवठा’ : पौगंडावस्थेचा तरल तुकडा
कला-संस्कृती - चलत्-चित्र
संदेश मुकुंद कुडतरकर
  • ‘दारवठा’चं एक पोस्टर
  • Mon , 06 March 2017
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti चलत-चित्र दारवठा Daaravtha निशांत रॉय बोंबार्डे Nishant Roy Bombarde निशांत भावसार Nishant Bhavsar नंदिता पाटकर Nandita Patkar

पौगंडावस्थेतल्या त्या काळाच्या तुकड्यात बरंच काही गोठून राहिलेलं असतं - सौंदर्य, कुतूहल, धाडस आणि एक अनामिक भीतीही. मला लख्ख आठवतं, अगदी लहान असताना शाळेत ‘आली आली ग भागाबाई’ या भारुडातल्या भागाबाईची निवडप्रक्रिया चालू होती. बाईंनी मला काळी साडी नेसवली होती आणि नाचायला सांगितलं होतं. त्यावेळच्या भावना आता पुसटशाही आठवत नाहीत, पण एवढं मात्र नक्की आठवतं की, ही गोष्ट आईला सांगितली तेव्हा आई कौतुकानं फक्त हसली होती. नंतर मीही बदललो, आईचे विचारही बदलले (खरं तर संकुचित झाले) आणि महत्त्वाचं म्हणजे सगळ्या गोष्टींकडे पाहण्याचे दृष्टिकोन बदलले होते. आईसोबत एकदा बस स्टॉपवर उभा होतो, तेव्हा माझ्या डोळ्यांदेखत तिथं उभ्या असलेल्या एका मुलाला आईने हळूच ‘बायल्या मेला’ म्हटलं. ते शब्द माझं काळीज चिरत गेले होते.

हे सगळं आठवण्याचं कारण म्हणजे निशांत रॉय बोंबार्डे या तरुण दिग्दर्शकाचा राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त ‘दारवठा’ हा लघुपट. पंकज या पौगंडावस्थेतील मुलाच्या आयुष्यातील एक लहानसा तुकडा अत्यंत नजाकतीनं हा लघुपट उलगडून दाखवतो. पंकजला नाच आवडतो. मेंदी काढून घ्यायला आवडतं. नटायला आवडतं. त्यावरून त्याचे समवयस्क मित्र त्याची चेष्टा करतात. त्याला प्रचंड शारीरिक व मानसिक त्रास देतात. पंकजच्याच शाळेतल्या त्याच्यापेक्षा मोठ्या मिलिंदबद्दल त्याला एक अनामिक ओढ आहे, आकर्षण आहे. त्यामुळे ‘मोहिनी’चं नाट्य साकारताना आधी मोहिनीची भूमिका करण्यास नकार देणारा पंकज शंकराची भूमिका मिलिंद साकारणार आहे, हे कळल्यावर मात्र एका पायावर तयार होतो. त्यानिमित्तानं मिलिंदचा सहवास लाभेल, या कल्पनेनं आनंदतो.

पंकजच्या नाचगाण्याला वडिलांचा विरोध आहे. आई मात्र त्याची जवळची मैत्रीण आहे. अगदी जात वेगळी असल्यामुळे आपल्याला कसं आपल्या प्रियकराशी लग्न करता आलं नाही, तेही ती त्याच्याशी शेअर करते. पंकजच्या लैंगिकतेचा, त्याच्या भावनांचा आदर करते आणि ‘दारवठा’ ओलांडण्याच्या प्रतीकातून खरं तर त्याला आऊट व्हायलाच मदत करते.

पंकजचा आणि त्याच्या आईचा प्रचलित समाजव्यवस्थेला आव्हान देण्यापर्यंतचा प्रवास निशांत भावसार या बालकलाकारानं आणि नंदिता पाटकर यांनी सुरेख चित्रित केला आहे. कुठेही भाषणबाजी किंवा उपदेशाचे डोस न पाजता हा लघुपट ज्या तरल, सौंदर्यात्मक रीतीनं पंकजचे अनुभवविश्व साकारतो, त्याला तोड नाही. लघुपटाचा शेवट ज्या आशावादी दृश्यानं केला आहे, त्याबद्दल दिग्दर्शकाचं कौतुक करायलाच हवं. म्हणूनच पहिला प्रयत्न असूनही राष्ट्रीय पुरस्कारापर्यंत मजल मारणाऱ्या, वेगवेगळे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवही गाजवणाऱ्या या कलात्मक, सुंदर, आशयगर्भ लघुपटाचं आणि सर्व चमूचं हार्दिक अभिनंदन.

लेखक मुंबईस्थित 'अक्सेंचर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड' या कंपनीत टीम लीड म्हणून कार्यरत आहेत.

msgsandesa@gmail.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख