अजूनकाही
उत्तम नियतकालिके मानवी अस्तित्व, समाज आणि संस्कृती याबद्दल विचार करायला आणि नवे अर्थ शोधायला मदत करत राहतात. छापील स्वरूपात असेल वा ऑनलाईन प्रकाशित होत असेल, एक ‘जग’ नियतकालिकांतून आपल्याला दिसू शकते. काही नियतकालिके वेगवेगळ्या विषयांना वाहिलेली आणि तसा वैविध्यपूर्ण वाचकवर्ग समोर ठेवून निर्माण होतात, तर काही विशिष्ट विषयाला वाहिलेली असू शकतात. सर्वसाधारण तसेच विशिष्ट अभ्यासक-वाचक समोर ठेवून वेगवेगळ्या भाषांतून नियतकालिके वर्षभरात वेगवेगळ्या वेळेला प्रकाशित होत असतात. आपल्या दृष्टीकोनातून आणि मांडणीतून मित्र वा शिक्षक वा अभ्यासक अशा भूमिकांतून नियतकालिके सक्रिय असतात. समाजही अशा नियतकालिकांचे भरणपोषण करत असतो.
अनेकविध बदलांच्या प्रक्रियेतून आकार घेत नाट्यसाहित्य आणि रंगभूमी आपल्या वाचन आणि दृकश्राव्य संस्कृतीचा अविभाज्य भाग बनला आहे. अशा नाट्य आणि रंगभूमी संस्कृतीचा नियतकालिकेही महत्त्वाचा भाग राहिलेली आहेत. वर्तमानपत्रे, साप्ताहिके वा मासिके असोत, नाटक या साहित्यप्रकाराची, तसेच नाट्य अभिव्यक्तीची चर्चा नियतकालिकांतून होत असते. परंपरागत तसेच धार्मिक खेळ आणि विधी इथपासून ते लहान-मोठ्या गावातले, तसेच शहरातले नाटक असा मोठा प्रवास करत आशय, अभिव्यक्ती आणि शैलीतून सांगण्याच्या, तसेच दाखवण्याच्या, लिखित तसेच सादरीकरणाच्या रूपातून नाटक शतकानुशतके बदलत आलेले दिसते. पण, साहित्य आणि सादरीकरणाच्या वेगवेगळ्या वैशिष्ट्यांची चर्चा करत विचारविश्व उभे करणारी नियतकालिके एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकात प्रकाशित होऊ लागली.
..................................................................................................................................................................
.................................................................................................................................................................
मराठी नाट्यलेखन आणि रंगभूमीच्या इतिहासात नाट्य साहित्य आणि सादरीकरणे याबद्दलची चर्चा वेगवेगळ्या नियतकालिकातून झाली आहे. मराठी नाट्यविषयक नियतकालिके विसाव्या शतकाच्या आरंभी सुरू झाली. यात सर्वांत पहिले आणि लक्षणीय नियतकालिक म्हणून ‘रंगभूमी’ या ‘नाटक विषयाची चर्चा करणारे सचित्र मासिक पुस्तक’ याचा उल्लेख करावा लागेल. लोकप्रिय झालेल्या किर्लोस्कर नाटक मंडळी या नाट्यसंस्थेचे प्रकाशन असलेले ‘रंगभूमी’ हे मासिक विसाव्या शतकाच्या सुरुवातीला प्रकाशित होत असलेले आपल्याला दिसून येते. पुढे ‘भरतमुनी’, ‘नाटक’, एनसीपीएने प्रकाशित केलेले काही अंक, ‘समांतर’ अशी काही नियतकालिके सुरू झाली आणि नंतर काही ना काही कारणांनी कालांतराने बंद पडली.
गेली अनेक वर्षे संगीत आणि नाट्यनिर्मिती, तसेच संयोजनात सक्रिय असणाऱ्या कणकवलीच्या वसंतराव आचरेकर प्रतिष्ठानने २०१७मध्ये ‘रंगवाचा’ या नाट्यविषयक त्रैमासिकाच्या प्रकाशनाला सुरुवात केली. नाथ पै एकांकिका स्पर्धा, उत्तमोत्तम नाटकांचा ‘कणकवली नाट्यमहोत्सव’, वामनदाजी शास्त्रीय गायन स्पर्धा, शास्त्रीय संगीत रसग्रहण कार्यशाळा, नाट्यविषयक शिबिरे, चर्चासत्रे, अशा विविध उपक्रमांबरोबर गेली ४४ वर्षे सक्रिय असणाऱ्या आचरेकर प्रतिष्ठानसाठी एखादे नियतकालिक सुरू करणे संस्थात्मक स्तरावरचा महत्त्वाचा टप्पा आहे.
छापील स्वरूपात प्रकाशित होणारे ‘रंगवाचा’ गेली पाच वर्षे मराठी भाषेतील नाटक आणि रंगभूमीवरच्या विविध घटना आणि विचार प्रवाहांची चर्चा करणारे व्यासपीठ बनले आहे. त्याशिवाय, समाज-संस्कृतीचा भाग बनलेल्या नाटकाचे दस्तऐवजीकरण होणेही गरजेचे असते. ती गरजही ‘रंगवाचा’ भागवताना दिसते. अंकाचे संपादक वामन पंडित आपल्या पहिल्या संपादकीयामध्ये लिहितात त्याप्रमाणे “गेली चार दशके मराठी रंगभूमीच्या संबंधात वैयक्तिक आणि संस्थात्मक काम करताना दस्तऐवजीकरणाचा अभाव सतत अस्वस्थ करीत राहिला. नुसती अस्वस्थता बाळगून राहण्यापेक्षा निदान आपल्या परीने काही काम सुरू करावे ही नियतकालिक प्रकाशनाची मूळ प्रेरणा आहे.”
..................................................................................................................................................................
उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...
हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal
................................................................................................................................................................
‘रंगवाचा’च्या दरवेळेच्या अंकात विचार करायला लावणारा तसेच, माहिती पुरवणारा वाचनीय मजकूर छायाचित्रांसहित प्रकाशित होत असतो. रंगविशेष, रंगप्रयोग, रंगधारा, रंगभारती, रंग मानस, रंगवेध, रंगवृत्त अशा आकर्षक शीर्षकाच्या दहा-एक सदरांबरोबर इतर लेखांचाही ऐवज आपल्याला पाहायला आणि वाचायला मिळतो. अशा सदरांमधील, उदाहरणार्थ, मेधा सिधये लिहीत असलेले ‘रंगदस्त’ हे निवडक नाट्यविषयक ग्रंथांची चर्चा करणारे हे एक सदर. दुसऱ्या अंकापासून ‘नावल आणि नाटक’ या लेखाने सुरू झालेल्या या सदरातून आतापर्यंत जवळजवळ १७ लेख प्रकाशित झालेले आहेत. नाट्यक्षेत्रातील व्यक्तींची चरित्रे, आत्मचरित्रे, नाट्यसमीक्षा, नाट्यानुभव कथन असे नाटकाच्या इतिहासाबद्दल संदर्भ मूल्य असलेल्या ग्रंथांची चर्चा सिधये आपल्या लेखांतून करतात. अशा सातत्यपूर्ण लेखनातून नाट्यविषयक विचार समोर येतात आणि ते काळानुसार कसे बदलत गेले आहेत, याचेही भान वाचकाला येते.
‘रंगवाचा’त प्रकाशित होणारी जागोजागच्या नाटकांविषयी माहिती नाट्यप्रेमींसाठी, तसेच अभ्यासकांसाठी उपयुक्त ठरते. उदाहरणार्थ, हिराबाई पेडणेकरांच्या जीवनावरच्या ‘पालशेतची विहीर’ या नाट्यप्रयोगाबद्दलचा जनार्दन वेर्लेकरांचा लेख फेब्रुवारी २०१९च्या अंकात आहे. विजयकुमार नाईक लिखित आणि दिग्दर्शित या नाटकाचा प्रयोग ज्या गावी हिराबाई दीर्घ काळ राहिल्या आणि तिथे विहीर बांधून फळभाज्यांची लागवड करून राहिल्या, तिथे सादर झाला. नंतरच्या महिन्यात, मराठी भाषेतील स्त्री नाटककार आणि ‘पालशेतची विहीर’ या नाटकात अजून काय असायला हवे होते, याबद्दलची चर्चा आहे.
अशा लेखांतून प्रयोगाची माहिती कळलीच, इतिहासाची उजळणी तर झालीच, पण त्याचबरोबर वेगवेगळ्या भागात कोणत्या प्रकारे नाटक केले जाते, ठिकठिकाणच्या कलाकारांच्या निर्मितीप्रेरणा काय असतात, याबद्दल वाचकवर्गात उत्सुकता निर्माण होऊन व विविध अंगांनी चर्चेची शक्यता निर्माण झाली. महत्त्वाचे म्हणजे ‘रंगवाचा’मध्ये प्रकाशित होणारी चर्चा फक्त मराठी नाटकापुरती नसते.
अंकाचे संपादकीय धोरण, पंडित लिहितात त्याप्रमाणे, “आजच्या जागतिकीकरणाच्या काळात रंगकर्मींना फक्त आपल्याच नाट्यपरंपरेचे भान असून भागणार नाही. भारतीय नाट्यपरंपरेबरोबर पाश्चात्य नाट्यपरंपरेचे भान असणे गरजेचे आहे.” आणि त्याप्रमाणे, जगभरात होणारी नाटके, झालेले नाटकांचे दौरे, कलाकारांसमोर उभी असणारी आव्हाने, यांची चर्चा घडवून आणलेली आपल्याला दिसून येईल.
..................................................................................................................................................................
अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5312/Checkmate
..................................................................................................................................................................
या अनुषंगाने नोव्हेंबर २०१८चा ‘हॅम्लेट’ या नाटकाला वाहिलेला विशेषांक महत्त्वाचा ठरतो. नाटकाविषयी लिखाण करणारे वेगवेगळे लेखक आणि कलाकार, हाताळले जाणारे विषय, भाषिक वैविध्य आणि वाचकांबरोबर असणारे बहुस्तरीय नाते या कारणांमुळे ‘रंगवाचा’ उल्लेखनीय ठरते.
विशेष म्हणजे, ‘रंगवाचा’मध्ये एक आपुलकी दिसते. वर्गणीदारांना ‘पालक’ असे संबोधले जाते. आपुलकीबरोबर वाचकांवर पालकत्वाची जबाबदारीही टाकली आहे. पहिल्या अंकापासूनच ‘रंगवाचा’ वेगवेगळ्या ठिकाणी, तिथल्या स्थानिक संस्थांच्या सहकार्याने प्रकाशनाच्या कार्यक्रमातून वाचकांपर्यंत पोहोचवला जात आहे. अंक प्रकाशित करून तो पोस्टाने पाठवण्याबरोबर तिथल्या स्थानिक रंगकर्मींना भेटणे, ‘रंगवाचा’बद्दल चर्चा घडवून आणणे, यातून जास्तीत जास्त वाचकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न ‘रंगवाचा’ची टीम करत असते. त्यासाठी ‘रंगवाचा’चे संपादक त्या ठिकाणी पोहोचतात, अंकाचा स्टॉल टाकून जास्तीत जास्त वाचकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात. तरीही रंगकर्मीचा लेखन करण्याचा, अंक वाचण्याचा निरुत्साह आणि पालकत्व स्वीकारण्याबद्दलची अनास्था दिसून येते. याबद्दल ‘रंगवाचा’ च्या संपादकीयामधून काळजी व्यक्त झालेली दिसते.
जगभरातले नाटक मोठ्या मैदानात उभे आहे. बऱ्याच ठिकाणी नाटकाच्या अस्तित्वाचेच प्रश्न उभे ठाकले आहेत. काही ठिकाणी नाटक रूप म्हणून स्थित्यंतरातून जात आहे. नाटकाचा वाचक आणि प्रेक्षक जसा बदलत चालला आहे, तसाच लेखक आणि कलाकार वर्ग बदलत चालला आहे. आर्थिक पेच आहेत, तसेच धोरणात्मक पेच उभे आहेत. करोनाने अधिक थेट प्रश्न उभे केले असले तरी ते आधीपासूनचेही आहेत.
तसे बघायला गेले तर नाटक नेहमीच स्थित्यंतराच्या टप्प्यावर उभे राहत असलेले आपल्याला दिसते. मग नाटक आणि समाज यांचे नाते जसे बदलले आहे तसेच नाट्यविषयक नियतकालिक आणि समाज यांच्यातले नातेही बदलत राहिले आहे. ‘रंगभूमी’ हे मासिक बंद पडल्यावर सात वर्षानंतर १९२७मध्ये पुन्हा सुरू झाले. त्या अंकात, मासिकाचे संपादक शंकर बापूजी मुजूमदार ‘Once More/पुन्हा एकदा’ या आपल्या लेखात नोंदवतात की, ‘रंगभूमी’ मासिक बंद पडल्यावर त्या जागी दुसरे एखादे मासिक निघाले नाही.
त्यांच्या लेखाला आता शंभर वर्षं होतील, पण परिस्थिती बदलेल असे काही वाटत नाही. ‘रंगभूमी’ किंवा ‘रंगवाचा’सारखे एखादेच नियतकालिक त्या त्या काळात सुरू असणार आहे. छपाई, संपादन, लेखन, मुद्रितशोधन, वितरण, अशा विविध बाबींसाठी वाढत चाललेला वेळ, मानवी बळ आणि आर्थिक खर्च समोर ठेवून कामाची आखणी करावी लागत असते. यासाठी, समाजातील विचार आणि भावनांचे भरणपोषण करणाऱ्या नियतकालिकांचे पालकत्व समाजाने घेतले पाहिजे आणि नियतकालिकांनीही दमदारपणे, जबाबदारीने वाटचाल करायला हवी.
या पार्श्वभूमीवर, ‘रंगवाचा’चे पालक-वाचक, रंगकर्मी, समाजातील विविध घटक आणि ‘रंगवाचा’चे संपादक मंडळ यांच्यात ब्रेनस्टोर्मिंग होऊन पाच वर्षाच्या काळात समाजात आणि ‘रंगवाचा’च्या नातेसंबंधांमध्ये काय बदल झाले आहेत, याबद्दल सखोल चर्चा होत असेल. समाजातील वेगवेगळ्या घटकांशी बोलून ‘रंगवाचा’समोर कोणती आव्हाने आहेत, त्याचे येणाऱ्या काळातील धोरण काय असायला हवे आणि बदलत्या परिस्थितीत ‘रंगवाचा’चं कलात्मक तसेच व्यावहारिक स्वरूप कसं असावं, याबद्दल विचारविनिमय होऊन काळाला साजेशी अंमलबजावणीही होईल.
नाटक जसे बदलत जात आहे, तसे नाटकाविषयीचे नियतकालिक फक्त नाट्यविषयांपुरते वा नाट्यरसिकांपुरते असणार नाही. याचा अर्थ, नाटकांशिवाय इतर विषयांवर सर्रास साहित्य प्रकाशित करावे असे नव्हे. किंवा, मनोरंजन करणारा मजकूर वाचकांपर्यंत पोहोचवावा, असे नाही. तर, नाटकाशी निगडित व्यापक समाजाला पुकारेल अशी साहित्य आणि दृश्य मांडणी व्हायला हवी. जर नाटक आंतरशाखीय आणि समूहाची कृती आहे, असे आपण मानत असू तर नाट्यसाहित्य आणि रंगभूमीचे इतर ज्ञान आणि कला शाखांशी असणारे अधोरेखित व्हायला हवे.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
असे झाले तर ‘रंगवाचा’ फक्त नाट्यविषयक चर्चा पुढे नेऊन ती ते समाज-संस्कृतीबद्दल अधिक व्यापक मांडणी करू शकेल. अर्थात, याबद्दलचे सूचन ‘रंगवाचा’मधील प्रकाशित झालेल्या न्यूडिटीचे रंगमंचीय आविष्करण, करोनानंतरची रंगभूमीविषयीच्या चर्चेत किंवा जागतिक रंगभूमी अशा विषय आणि साहित्य निवडीतून केले गेले आहे. ते अधिक ठळक आणि वैविध्यपूर्ण झाले, तर ‘रंगवाचा’चा संख्यात्म आणि गुणात्म विस्तार होऊ शकतो.
नाट्यसाहित्य आणि रंगभूमीविषयीची चर्चा व्यापक सामाजिक आणि राजकीय धारणांच्या परिप्रेक्ष्यात घडू लागली तर प्रकाशित होणाऱ्या साहित्यातील आणि दस्तऐवजकरणातील बहुआवाजीपणाबरोबर त्याची खोली वाढू शकते. मग, साहजिकच, ‘रंगवाचा’चे पालकत्व फक्त नाटकवाल्यांपुरते मर्यादित न राहता ते समाजातील विविध घटकापर्यंत पोहोचून प्रकाशन अधिक सर्वसमावेशक होईल.
.................................................................................................................................................................
लेखक आशुतोष पोतदार नाटककार, कवी, कथालेखक आणि साहित्य–संस्कृतीचे अभ्यासक आहेत. ते फ्लेम युनिव्हर्सिटी, पुणे येथे साहित्य आणि नाटकाचे अध्यापन करतात.
potdar.ashutosh@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment