अजूनकाही
डॉ. सुहास जेवळीकर एक तत्त्वनिष्ठ मित्र. २६ फेब्रुवारी २०२२ रोजी दीर्घ आजारानं औरंगाबादेत त्याचा मृत्यु झाला. त्याची पत्नी डॉ. संध्या आणि मुलगी आरोही यांनी त्याच्या इच्छेनुसार कुठल्याही विधींशिवाय अंत्यविधी होईल, याची पूरेपूर काळजी घेतली. एवढंच नाही तर सावडणं, दहावा, तेरावा असे विधीही होणार नाहीत, हेही जाहीर केलं. या तत्त्वनिष्ठ मित्राच्या सन्मानाला साजेशी, ही भूमिका त्याच्या कुटुंबियांनी ठामपणे घेतली.
सुहास आणि माझी सुमारे ४७-४८ वर्षांची मैत्री. सुरुवात झाली औरंगाबादेतील एका काव्यवाचन स्पर्धेपासून. यात त्याला पहिलं आणि मला दुसरं बक्षिस मिळालं होतं. सुहास शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या पहिल्या वर्षाला, तर मी मिलिंदमध्ये. ७४-७५चा तो काळ. औरंगाबादेत प्रत्येक जातीचं एक महाविद्यालय होतं, आहे. मिलिंद किंवा बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात शिकायला येणारी मुलं तेथील आंदोलनाच्या पार्श्वभूमीमुळे बहुतेकदा त्या काळातील कुठल्या ना कुठल्या आंदोलनाशी जोडलेली असायची. मग ते दलितांवर होणाऱ्या अत्याचाराविरुद्धचं आंदोलन असो, नामांतराचं आंदोलन असो, मराठवाडा विकासाचं आंदोलन असो. तेव्हा खरं तर जातीय अहंकार खूप तीव्र होते. परंतु, सुहासशी कवितेमुळे मी जोडला गेलो.
..................................................................................................................................................................
.................................................................................................................................................................
त्या काळात औरंगाबादला विविध महाविद्यालयांतून वादविवाद स्पर्धांमधून भाग घेणारी काही मुलं एकत्र आली. त्याच वेळी पॅंथरसारखी संघटना सक्रीय झालेली होती. युक्रांद, समाजवादी, साम्यवादी पक्ष, स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय), ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन (आयएसएफ), छात्र युवा संघर्षवाहिनी अशा अनेक संघटना प्रस्थापित मूल्यांविरोधात संघर्षशील होत्या. केवळ दलितच नाही, तर वेगळी मूल्यं मानणाऱ्या सवर्ण मुलांच्या संघटनाही मोठ्या प्रमाणावर सक्रिय होत्या. यातून एक संवादी वातावरण निर्माण व्हायला मदत होत होती.
या पार्श्वभूमीवर औरंगाबादमध्ये ‘यंग डिबेटर्स असोसिएशन’ स्थापन झाली. त्यात देविदास तुळजापूरकर, श्याम देशपांडे, सुरेंद्र जोंधळे, विलास रणसुभे, स्मिता देशपांडे, शैला शिरवाडकर, व्यंकटेश केसरी, पद्माकर कुलकर्णी, अशोक नाईकवाडे, धनंजय पवार, प्रदीप शहाणे, सुहास, मी असे अनेक जण सक्रिय होतो. या असोसिएशनमुळे अनेक महाविद्यालयातील विद्यार्थी आपापल्या कोंडाळ्यातून बाहेर येत होते. एक संवादी आणि सशक्त वातावरण तयार होत होतं. निखळ जातीय अहंकाराऐवजी सारासार विचार करणाऱ्या भूमिका घेतल्या जात होत्या. नामांतर दंगलीनंतर मराठवाड्यात जे कलुषित वातावरण तयार झालं होतं, त्याची तीव्रता कमी करण्यात या व्यासपीठानं महत्त्वाची भूमिका पार पाडली. त्या काळात हे खूप महत्त्वाचं पाऊल होतं.
यासोबतच मराठी साहित्यात ‘लिटल मॅगझीन’सारखे प्रयोग चालले होते. दलित साहित्य, दलित थिएटर आपापल्या पद्धतीनं अस्तित्व दाखवत होतं. अन्यायग्रस्तांच्या बाजूनं ठामपणे उभे राहण्याची मानसिकता होती. यातून प्रत्येक जण अप्रत्यक्षपणे आपापला चेहरा शोधत होते. नंदकिशोर देशमुख (नंदू माधव), चंद्रकांत कुलकर्णी ही मंडळी यातूनच आपला ठाम चेहरा घेऊन उभी राहिली.
आम्ही रात्री-बेरात्री रेल्वे स्टेशन, सादिया थिएटरसमोर असे कुठेही फिरायचो. अनेक विषयांवर चर्चा व्हायची. याशिवाय एस.टी. स्टॅण्ड समोरील मॉडर्न आणि पॅराडाईज हॉटेल आमचा अड्डा झालेला होता. अर्धा कप चहा घेऊन गुलाम अली, जगजीत-चित्रा यांच्या गजला ऐकत रात्र रात्र बसता यायचं. आमच्यात अनेकदा प्रा. चंद्रकांत पाटील आणि इतरही मंडळी सहभागी व्हायची. त्यांच्यासोबत अनेक विषयांवर गंभीरपणे चर्चा व्हायच्या. या चर्चांचा माझ्या जडणघडणीत खूप उपयोग झालेला आहे.
..................................................................................................................................................................
उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...
हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal
................................................................................................................................................................
या ग्रुपमध्ये मी सगळ्यात फाटका होतो. कारण मी वेगवेगळ्या नोकऱ्या करत शिकत होतो. कसं माहिती नाही, परंतु माझ्यात आणि सुहासमध्ये एक बंध तयार झाला. नामांतराच्या आंदोलनामुळे औरंगाबादेत वातावरण खूप तापलेलं होतं. सुहास सन्मित्र कॉलनीत राहायचा. त्याला सोडायला एकदा सुहास आणि मी गुलमंडीकडून एम.पी. लॅा कॉलेज समोरच्या रस्त्यावरून त्याच्या घराकडे चाललो होतो. एस. बी. कॉलेज, एम.पी. लॉ कॉलेज हे नामांतर विरोधी आंदोलनाचे गड होते. मी दलित युवक आघाडीच्या वतीनं नामांतर आंदोलनात सक्रिय होतो. रस्त्यावर अंधार होता. त्या अंधारात एक दगड सूं सूं करत माझ्या दिशेनं आला. परंतु लागला सुहासला. त्याचा चष्मा उडाला. नाक रक्तबंबाळ झाले. त्या परिस्थितीत सुहासला त्याच्या घरी सोडलं. त्याच्या आई-वडिलांनी त्याला फटकारलं. ‘कसल्या कसल्या लोकांसोबत राहतो? बंद कर आता त्या लोकांसोबत फिरणं’, हे त्याच्या आई-वडिलांनी मला ऐकू जाईल, अशा पद्धतीनं त्याला सांगितलं. माझ्याशी कुठलाही संबंध ठेवू नये, अशी ताकीद दिली. मला वाटलं झालं, आता सुहास उद्यापासून आपल्याशी बोलणार नाही. परंतु झालं उलटं. जसं काही झालंच नाही, अशा रितीनं दुसऱ्या दिवशी तो सादिया थिएटरला आला.
त्यानंतर सुहासने अप्रत्यक्षपणे मला दत्तकच घेतलं. त्यामुळे सुहास आणि माझ्यात वेगळा बॉण्ड तयार झाला. तो जाहीरपणे दलित चळवळीच्या बाजूनं, आरक्षणाच्या बाजूनं भूमिका घ्यायचा. त्यामुळे त्याला त्याचे वर्गमित्र खूप टोचायचे. एमबीबीएसनंतर सुहासला औषधशास्त्रामध्ये पदव्युत्तर करायचं होतं. परंतु कमी मार्क असल्यानं ते मिळू शकलं नाही. उलट त्याच्यापेक्षा कमी मार्क असणाऱ्या दलित विद्यार्थ्याला आरक्षणामुळे प्रवेश मिळाला. त्याच्या वर्गमित्रांनी त्यावरून त्याला उचकावण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्याने त्याही वेळी जाहीरपणे लेख लिहून आरक्षणाचं समर्थन केलं होतं.
सुहासचं वाचन प्रचंड होतं. तो एकपाठी होता. त्यामुळे अनेक गप्पांत, चर्चांत अनेक संदर्भ त्याला सहजपणे आठवायचे. त्याच्यातील लेखक बहुमुखी होता. मंगेश पाडगांवकर हे त्याचं दैवत होतं. पाडगावकरांच्या बहुतेक सर्वच कविता त्याला तोंडपाठ होत्या. तो त्या वाचायचाही पाडगावकरी शैलीत. त्याने ‘लोकमत’, ‘लोकसत्ता’, ‘सकाळ’ अशा अनेक दैनिकांतून खूप वेगवेगळ्या पद्धतीची सदरं चालवली. ऐंशीच्या दशकात ‘विष्णुपंत’ या टोपणनावानं आणि राजानंद सुरडकर याच्या अतिशय टोकदार अर्कचित्रांसह दर रविवारी ‘ऐरणीच्या देवा’ या ‘लोकमत’मधील सदरात त्याने अतिशय जबाबदारीनं भल्याभल्यांच्या टोप्या उडवल्या होत्या.
या सदराचा लेखक कोण हा त्या वेळेस औरंगाबादेत औत्सुक्याचा विषय होता. एरवी इतरांची बेदरकारपणे खिल्ली उडवणारे स्वतःवर आल्यानंतर भयंकर नाराज झाले होते. त्यांना ते पचवणं जड गेलं. अब्रुनुकसानीचा खटला करता येतो का, याचीही चाचपणी झाली. सुहासच्या वैयक्तिक आयुष्यात देव या संकल्पतेला स्थान नव्हतं. परंतु काही व्यक्तींना तो देवाप्रमाणे वंदनीय मानायचा. ती मंडळी ऐरणीच्या देवामधील लेखामुळे कायमची दुरावली. त्याची सुहासला कायम खंत होती.
..................................................................................................................................................................
अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5312/Checkmate
..................................................................................................................................................................
कामाच्या निमित्तानं अनेकदा औरंगाबादला विमानानं ये-जा करायचो. सुहासच्या सोबतच्या अनेकांनी प्रायव्हेट प्रॅक्टीसमध्ये गडगंज पैसा कमावला. घर, दार, गाड्या सर्व सुखं त्यांनी मिळवली. उलट सुहासने आणि संध्यावहिनींनी ठरवून हे प्रलोभन नाकारलं. आपल्याला स्वतःचं आयुष्य छान पद्धतीनं जगता आलं पाहिजे, हवं तेव्हा कुठल्याही धाब्यावर जाऊन खाता आलं पाहिजे, मित्रांना वेळ देता आला पाहिजे, असा त्यांनी प्राधान्यक्रम ठरवला होता.
त्यासाठीच तो भूलतज्ज्ञ, वहिनी गायनॉकॉलॉजिस्ट, अशी प्रॅक्टिसच्या दृष्टीनं आदर्श स्थिती असताना दोघांनी शासकीय नोकऱ्या पत्करल्या. तिथं प्रामाणिकपणे सेवा बजावून अनेक मित्रांना हेवा वाटावा, असं समृद्ध आयुष्य सुहास जगला. मी केव्हाही औरंगाबादला आलो तर विमानतळावर घ्यायला येण्यापासून परत विमानतळावर सोडण्यापर्यंत सुहास सावलीसारखा माझ्यासोबत असायचा. एवढंच नाही तर तो अतिशय आवडीनं स्वयंपाक करून मित्रांना खाऊ घालायचा. ‘राम आला की, माझी किचनपासून सुटका होते’, असं संध्यावहिनी नेहमीच म्हणायच्या. तो खवय्या होता. औरंगाबाद भोवतालचा बहुतेक एकही असा धाबा नाही, जिथं सुहास, वहिनी आणि आरोही जेवायला गेले नाहीत.
आमच्या एका मित्राचा एक फंडा होता. आपण गरजेनुसार कुणाचीही मदत घ्यायची, आपलं काम करवून घ्यायचं, परंतु आपला कुणालाही ‘वापर’ करू द्यायचा नाही. याच्या उलट सुहास. तो आपल्या घाटी हॉस्पिटलमधील संबंधांचा वापर करून ज्याला गरज असेल त्याला जास्तीत जास्त वैद्यकीय मदत कशी होईल, हे पाहायचा. अनेक जण तेथे ओपीडीमध्ये यायचे. सुहास त्यांना सर्व वैद्यकीय मदत प्राधान्यानं मिळवून देऊन नंतर कॅन्टीनमध्ये नेऊन काहीतरी खाऊ घालून चहा पाजून निरोप द्यायचा. यात कधी कधी एस. टी. स्टॅण्ड समोरील मॉडर्न किंवा पॅरासाईट हॉटेलमधील वेटर्सही असायचे. या वेळी ओपीडीमधील डॉक्टरमंडळी ‘काय सुहास?’ असा कुत्सित शेरा मारायचे. परंतु तो ते हसण्यावारी न्यायचा.
माझ्या आई-वडिलांना मुंबईत बंद घर आवडायचं नाही, म्हणून ते माझ्या धाकट्या भावाकडे औरंगाबादेत राहायचे. ते कधी आजारी पडले की, सुहास आणि संध्यावहिनी गाडी घेऊन भावाकडे जाणार. त्यांना गरज असल्यास डॉ. मिलिंद देशपांडे या मित्राच्या 'सुमनांजली'मध्ये भरती करणार. तिथं त्यांची सर्व काळजी घेणार. आणि हे त्या दोघांनी एकदा नाही, अनेकदा केलं. माझ्या मुलींची नावंह त्यानंच ठेवली.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
आम्ही एकमेकांत विरघळलो होतो. मी असं मानतो की, माणसाला आयुष्यात किमान एकतरी असा मित्र असावा, ज्याच्या घराचा दरवाजा विनाप्रश्न चोवीस तास उघडा असावा आणि कुठल्याही चुकीसाठी त्याच्या खांद्यावर विश्वासानं डोकं ठेवून रडता यायला हवं. आता सुहास गेला, आणि गेल्या वर्षी ६ डिसेंबरला गुरूवर्य प्रा. ल.बा. रायमाने सर. हे दोन माझे आश्वासक दरवाजे आणि खांदे होते. दुःखात सहभागी होणं फारसं कठीण नाही, परंतु सोबत वाढलेल्या फाटक्या मित्राच्या छोट्या-मोठ्या यशात, आनंदात सहभागी होता यायला हवं. सुहास माझा फक्त दरवाजा, खांदा नव्हता, तर माझा बारमाही उत्सवही होता. त्याला विनम्र अभिवादन.
.................................................................................................................................................................
लेखक राम दोतोंडे कवी आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत.
ramdotonde@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment